आवडलेली वाक्ये

Submitted by जिप्सी on 23 February, 2011 - 00:49

=================================================
=================================================
कधी कधी एखादे पुस्तक, कादंबरी, कथा वाचताना त्यातील एखादे वाक्य खुप आवडुन जाते किंवा मनाला पटते आणि त्या वाक्याची नोंद करण्याचा मोह आवरत नाही. कॉलेजात असताना कथा, कादंबरी, वृत्तपत्रे यातील अशीच आवडीची वाक्ये डायरीत नोंद करण्याची सवय होती. जर स्वत:चे पुस्तक असेल तर त्यावरच मार्क करायचो आणि ग्रंथसंग्रहालयातील पुस्तक असेल तर त्याची नोंद डायरीत व्हायची. एकदा "वपूर्झा" वाचनात आले आणि त्यातील वाक्यांची नोंद डायरीत करत गेलो. नंतर लक्षात आले कि हे सारे पुस्तकच संग्रही ठेवण्यासारखे आहे. :-). अशीच तुम्हाला आवडलेली वाक्ये (कथा, कादंबरी, वृत्तपत्रे, सुविचार, इ. इ. ) आपण येथे शेअर करूया. जर पुस्तकाचे, लेखकाचे नाव माहित असेल तर त्याची नोंद अवश्य करा.
=================================================
=================================================

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या आवडीचे काही.

पुस्तकाचे नावः अध्याय
लेखक: सुरेश वैद्य

आयुष्यात असे अपघात होतच असतात. चालताना ठेचा या लागणारच. त्याच्या वेदना आठवण्यात सगळं आयुष्य खर्ची घालायचं नसत. त्याचा काहि फायदाही नसतो. जे वास्तव समोर आहे. ते आणि तेव्हढंच खरं आहे. जे मिळतं त्यातच आनंद मानायचा. जे मिळालं नाही त्याच दु:ख करत बसायच नाही.

अजुन काही आवडलेले ...

" सई आम्ही फार एकटे राहिलो सई ...फार फार एकटे "

" अनिवार्य नियतीचं गरगर फिरणं मनाच्या महान संयमानं सहन करत जगायचं असतं "

" जोकोणी जीवन संघर्शात पिचला आहे त्या संघर्शात अन पिचण्यात सुध्दा एका एका सामर्थ्य शाली पुरुषार्थाचं जीवन सामावलेलं असतं "

आर्या, अमृतवेलबद्दलच लिहायला आलो होतो. Happy

अमृतवेल
लेखक: वि.स.खांडेकर

किती विचित्र आहे हे जग! घरच्या माणसांची किंमत कळायलाही घराबाहेर पडाव लागत इथ!

जीवनचक्राच्या या अखंड भ्रमंतीत माणसाला एकच गोष्ट करता येण्यासारखी आहे — दुसर्‍या माणसाशी जडलेले आपले नाते न विसरणे. त्याचे जीवन फुलावे म्हणुन त्याच्यासाठी जे जे करता येईल ते ते करणे.

नीट विचार कर बाळ. विश्वाच्या या विराट चक्रात तू आणि मी कोण आहे? या चक्राच्या कुठल्यातरी अरुंद पट्टीवर क्षणभर आसरा मिळालेले दोन जीव! दोन दवांचे थेंब, दोन धुळीचे कण! स्वत:च्या तंद्रीत अखंड भ्रमण करणारे हे अनादी, अनंत चक्र तुझ्यामाझ्या सुखदु:खाची कशी कदर करू शकेल???

मानवाचं मन केवळ भूतकाळाच्या साखळदंडांनी करकचून बांधून ठेवता येत नाही! त्याला भविष्याच्या गरूडपंखाच वरदानही लाभलं आहे.

आपलं घरटं सोडुन बाहेर गेल्याशिवाय पाखराला आकाशाचा अर्थ कळत नाही!

जुनी डायरी चाळायचा मोह झाला, मित्रा. Happy

एखादे आवडलेले सुभाषित वजा वाक्य नाही का चालणार? पुस्तक, कादंबरी किंवा ग्रंथ यातलेच हवे का?? Uhoh

जुनी डायरी चाळायचा मोह झाला, मित्रा>>>>>निंबुडा, हा मोह बिलकुल आवरू नकोस Happy

अध्याय पुस्तकातीलच अजुन काही वाक्य:

"सुखाचं एक दार बंद होताच, दुसरं दार आपोआपच उघडंल जातं. पण आपण आपले डोळे बंद केल्यामुळे हे उघडलेले दार आपल्याला दिसत नाही. दोष सुखाचा नसतो, आपल्या दृष्टीचा असतो. सुख तर सतत आपल्या भोवती रेंगाळत असतं. डोळे उघडुन पाहिलं कि ते चटकन आपल्या हाती गवसतं."

समाज हा जसा एका माणसामुळे बनत नाही, तसाच विश्वास हा केवळ एका माणसामुळे उडत नाही. आणि शेवटी जखम कितीही खोल असली तरी केंव्हा ना केंव्हा ती भरतेच.

जेव्हढे दिवस.......ज्या तर्‍हेने हसत खेळत जातील, जाऊ द्या. तिथे कुठे मतभेताचे कारण निर्माण होतंय, असे वाटताच त्याला तिथेच सोडुन पुढे निघुन जावं.

पहिल्या वेळेची लढाई मी हरलो होतो. पण त्यातुनच मला दुसर्‍या वेळच्या विजयाचा मार्ग दिसत होता.

सज्जनांनो, नेभळटपणा सोडा आणि राजकारणात या !
त्याशिवाय राजकारणातली गटारगंगा स्वच्छ होणार नाही ..

(स्वा.शेतकरी संघटनेच्या मुखपत्रात हि घोषणा वाचली होती)

एका ठिकाणी वाचलेले हे:

Knowing others is itelligence, but knowing self is wisdom

Don't fear shadows, they simply mean there is a light nearby.

इंग्रजी वाक्ये चालतील अशी अपेक्षा. Uhoh

पळसाची फुलं, पोपटाच्या चोचीसारखी दिसायची. होतां होतां सगळा पळस केशरी दिसूं लागायचा, जणू काही विठ्ठलाचे वारकरीच खांद्यावर भगव्या पताका घेऊन पंढरीला निघाले आहेत.‍‍ '‍

माचीवरला बुधा - गो. नी. दाण्डेकर

अग्नि आणि पृथ्वी यांच्या धुंद प्रणयांतून सह्याद्रि जन्मास आला.
अग्नीच्या धगधगीत उग्र वीर्याचा हा अविष्कारहि तितकाच उग्र आहे. पौरूषाचा मूर्तिमंत साक्षात्कार म्हणजे सह्याद्रि. त्याच्या आवडीनिवडी आणी खोडी पुरूषी आहेत. त्याचे खेळणे-खिदळणेहि पुरूषी आहे. त्यांत बायकी नाजूकपणाला जागाच नाही. कारण सह्याद्रि हा ज्वालामुखीचा उद्रेक आहे. अतिप्रचंड, अतिराकट, अतिदणकट अन् काळा कभिन्न. रामोशा सारखा. पण मनाने मात्र दिलदार राजा आहे तो. आडदांड सामर्थ्य हेच त्याचे सौंदर्य. तरीपण कधीकाळी कुणा शिल्पसोनारांनी सह्याद्रीच्या कानात सुंदर आणि नाजूक लेणी घातली. त्याच्या अटिव अन् पिळदार देहाला कोणाची दृष्ट लागू नये, म्हणून मराठी मुलुखाने त्याच्या दंडावर जेजुरीच्या खंडोबाच्या आणि कोल्हापूरच्या ज्योतिबाच्या घडीव पेट्या बांधल्या. त्याच्या गळ्यात कुणी सप्तशृंग भवानीचा टाक घातला. मनगटात किल्ले कोटांचे कडीतोडे घातले. सह्याद्रीला इतके नटवले सजवले तरीपण तो दिसायचा तसाच दिसतो ! रामोशासारखा ! तालमीच्या मातीत अंग घुसळून बाहेर आलेल्या रामोशासारखा !
सह्याद्रीचा खांदाबांधा विशाल आहे, तितकाच तो आवळ आणि रेखीव आहे. त्याच्या घट्ट खांद्यावरून असे कापीव कडे सुटलेले आहेत की, तेथून खाली डोकावत नाही. डोळेच फिरतात ! मुसळधार पावसात तो न्हाऊ लागला की, त्याच्या खांद्यावरून धो धो धारा खालच्या काळदरीत कोसळू लागतात. आणि मग जो आवास घुमतो, तो ऐकावा. सह्याद्रीचे हसणे, खिदळणे ते ! बेहोश खिदळत असतो.
पावसाळ्यात शतसहस्त्र धारांखाली सह्याद्रि सतत निथळत असतो. चार महिने त्याचे हे महास्नान चालू असते. काळ्यासावळ्या असंख्य मेघमाला, त्याच्या राकट गालावरून अन् भालावरून आपले नाजूक हात फिरवित, घागरी घागरींनी त्याच्या मस्तकावर धारा धरून त्याला स्नान घालीत असतात. हे त्याचे स्नानोदक खळखळ उड्या मारीत त्याच्या अंगावरून खाली येत असते. त्याच्या अंगावरची तालमीची तांबडी माती या महास्नानात धूऊन निघते. तरी सगळी साफ नाहीच. बरीचशी.
दिवाळी संपली की सह्याद्रीचा हा स्नानसोहळा संपतो. त्या हसर्‍या मेघमाला सह्याद्रीच्या अंगावर हिरवागार शेला पांघरतात. त्याच्या आडव्या भरदार छातीवर तो हिरवा गर्द शेला फारच शोभतो. कांचनाच्या, शंखासुराच्या, सोनचाफ्याच्या व बिट्टीच्या पिवळ्या जर्द फुलांची भरजरी किनार त्या शेल्यावर खुलत असते. हा थाटाचा शेला सह्याद्रीला पांघरून त्या मेघमाला त्याचा निरोप घेतात. मात्र जातांना त्या त्याच्या कानांत हळूच कुजबुजतात,

"आता पुढच्या ज्येष्ठांत मृगावर बसून माघारी येऊं हं ! तोपर्यंत वाट पाहा !"

रिकामे झालेले कुंभ घेऊन मेघमाला निघून जातात.

दाट दाट झाडी, खोल खोल दर्‍या, भयाण घळी, अति प्रचंड शिखरे, उंचच उंच सरळ सुळके, भयंकर तुटलेले ताठ कडे, अस्ताव्यस्त पसरलेली पठारे, भीषण अन् अवघड लवणे, घातली वाकणे, आडवळणी घाट, अडचणीच्या खिंडी, दुर्लंघ्य चढाव, आधारशून्य घसरडे उतार, फसव्या खोंगळ्या, लांबच लांब सोंडा, भयाण कपार्‍या, काळ्याकभिन्न दरडी आणि मृत्यूच्या जबड्यासारख्या गुहा ! असे आहे सह्याद्रीचे रूप. सह्याद्रि बिकट, हेकट अन् हिरवट आहे.
त्याच्या कुशी-खांद्यावर राहायची हिम्मत फक्त मराठ्यांत आहे. वाघांतहि आहे. कारण तेहि मराठ्यांच्याइतकेच शूर आहेत !

राजा शिवछत्रपति :- बाबासाहेब पुरंदरे

चिंगी
धन्यवाद तर जिप्सीला,जिप्सीच्या कल्पनेला, हा खजाना उघडुन दिल्याबद्द्ल.

कुठल्या पुस्तकातील नाही आहे, पण सिंधुताई सपकाळांचे "भाषण दिल्याशिवाय राशन मिळत नाही" हे वाक्य जाम आवडते..

'बाबासाहेब, माझही एक काळजापासून तुमच्यापाशी मागणं आहे. द्याच!'

'दिलं! काय हवं, आप्पासाहेब ?'

"मी मेल्यानंतर माझी राख आणि अस्थी या पावनखिंडीत अन् रायगडाच्या टकमक टोकावरून खालच्या दरीत टाका !'

(गो. नी. दाण्डेकर यांनी बाबासाहेब पुरंदरे यांना उद्देशून काढलेले हृदयस्पर्शी उद्गार)

आयुष्यात जेव्हा वादळ येतं तेव्हा मातीत पाय घट्ट रुतुन उभं राहयचं प्रश्न वादळाचा नसतो ते जेवढ्या वेगाने येतं तेवढ्या वेगाने निघुन जातं, आपण किती सावरलो आहे हे महत्वाचं असतं.
(हे वाक्य जसं च्या तसं नाही आहे पण माझ्या आठवणीत आहे ते लिहलं आहे. )

पंचतारांकित - लेखिका : प्रिया तेंडुलकर

जिप्सी, वपुर्झाबद्दल सहमत.

'राधेय' मधलं एक वाक्य

माणसं जातात. माघारी राहतं, ते त्यांचं आसन. ते तसंच मोकळं राहतं, राहावं! तरच जीवनाला अर्थ! माणसानं इतकं किर्तीवंत व्हावं की, त्याच्या माघारी त्याचं आसन बराच काळ तसंच मोकळं राहावं. ती जागा व्यापण्याचं धाष्टर्य कुणाला होऊ नये.

*प्रॉब्लेम्स नसतात कोणाला? ते शेवटपर्यंत असतात. पण प्रत्येक प्रॉब्लेमला उत्तर हे असतचं. ते सोडवायला कधी वेळ हवा असतो, कधी पैसा तर कधी माणसं या तिन्ही गोष्टीपलिकडचा प्रॉब्लेम अस्तित्वात नसतो.

* प्रश्नांपासून नेहमीच पळता येत नाही,कधी ना कधी ते पळणार्‍याला गाठतातच,पळवाटा मुक्कामाला पोहचवत नाहीत, मुक्कामाला पोहचवतात ते सरळ रस्तेच.....

* पावसातून भटकताना अंगावरचा शर्ट भिजतो , तेंव्हा काही वाटत नाही. तो अंगावरच हळू हळू सुकतो त्याचंही काही वाटत नाही.सुकला नाही तरी ओल्याची सवय होते.पण म्हणून कोणी ओलाच शर्ट घाल म्हटले तर.....

वपुर्झा : व. पु. काळे

*जगातील कुठलीच गोष्ट परिपुर्ण नाही. परमेश्वरानं सोनं निर्माण केलं. चाफ़्याची फ़ुलं सुद्धा त्यानंच निर्माण केली. मग त्याला सोन्याला चाफ़्याचा वास नसता का देता आला ? अपुर्णतेतही काही मजा आहेच की..

*पाठीला चमत्कारिक ठिकाणी खाज सुटावी , आपला हात वर पोहचत नाही व दुसर्याला नक्की जागा सापडत नाही अशी अवस्था जीवनात ही बर्याचदा होते..

गुलमोहर : व. पु. काळे

वपुर्झा मध्ये अजुन बरीच वाक्ये आहेत पण नंतर.
जिप्सी हा सुंदर धागा सुरु केल्याबद्दल धन्यवाद. Happy

Pages