जीव !

Submitted by vaiddya on 9 February, 2011 - 13:50

पुण्यात इकडे-तिकडे फिरण्यासाठी मी बस किंवा रिक्षाचा वापर करतो. बर्‍याचदा रिक्षा हाच पर्याय पुण्याच्या बस-कंपनीच्या “एक्स्ट्रा”ऑर्डिनरी कारभारामुळे सोयिस्कर वाटतो .. आणि इतरवेळी आपला जो मार्ग असतो तो कोणत्याही बस-मार्गामधे येत नसल्याने रिक्षा हा एकच पर्याय स्वतःचं वाहन नसलेल्या कोणाही माणसांपुढे उरतो. मीं अश्या लोकांमधे येत असल्याने मी रिक्षाने फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरून लॉ कॉलेज रस्त्याकडे जाण्यासाठी एक रिक्षा मिळवून आत बसलो. मला जिथे जायचं होतं ती कांचन गल्ली रिक्षाचालकाला माहित असल्याने मला फारसं काम उरलं नव्हतं .. मी प्रथम इकडे-तिकडे पाहात होतो .. रस्त्यावरच्या दोन महाविद्यालयांमधली मुला-मुलींची टोळकी पाहात होतो .. मग मला आवडणारं गोखले अर्थशास्त्र संस्थेच्या मागे असलेलं वडाचं झाड आणि मग बी एम सी सी च्या कुंपणालगत असलेली उंच बुचाची झाडं असं सगळं पाहात होतो.

अचानक रिक्षाचा वेग कमी होऊन ब्रेक लागल्याने मी पुढे काही अचानक आलं का म्हणून पाहू लागलो. पण बी एम सी सी च्या प्रवेशद्वाराजवळच्या गर्दीमधे हे अनेकदा होतं तसंच आज झालं होतं .. त्यामुळे विशेष दखल घ्यावी अशी परिस्थिती नव्हती. मी पुन्हा इतरत्र पाहू लागणार इतक्यात माझं लक्ष रिक्षा-चालकासमोरच्या काचेकडे गेलं. त्या काचेवर एक फार आकर्षक फुलपाखरू नुकतंच बसलं आणि त्या हालचालीमुळे माझं त्याच्याकडे लक्ष गेलं. त्यानंतर ते फुलपाखरू अनेकदा उडून रिक्षातल्या रिक्षात इथे तिथे फिरून पुन्हा काचेवर बसत होतं .. रिक्षा थांबत मात्र नव्हती त्यामुळे रिक्षाचालकाच्या दोन्ही बाजूंना असलेल्या उघड्या जागांमधून वारा येत असल्याने फुलपाखराला बाहेर पडता येत नव्हतं. अनेकदा ते काचेतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करून पाहात असावं तसं वाटत होतं .. मग बहुधा ते थकून जायचं आणि जरा वेळ काचेवरच बसून काढायचं. मग नवा प्रयत्न करायचं. हे असं माझा संपूर्ण प्रवासभर चालू होतं. ज्या ज्या वेळी ते फुलपाखरू उडत होतं तेव्हा ते चालक आणि त्याच्यासमोरची काच यांच्या मधल्या जागेतच उडत होतं. चालक ४०-४५ वयाचा. थोडे केस पांढरे, वाढलेल्या दाढीचे पांढरे खुंट आणि त्यावर भरघोस मिशी असा होता. अंगाने दणकट होता. ते फुलपाखरू उडताना अनेकदा चालकाचं लक्ष विचलित करेल अश्या भागात उडत होतं. अनेकदा त्याच्या थेट नजरेसमोर काचेवर बसत होतं. एकदोनदा ते त्याच्या हातावरही बसलं.

हे सगळं असं चालू असताना मला सारखं एक दडपण येत होतं. मला सतत असं वाटत होतं की या चालकाने त्या फुलपाखराला जोरात फटका मारून बाहेर काढायचा प्रयत्न करू नये. आपल्यासमोर गाडी चालवताना असं काही आलं तर त्याचा त्रास होऊ शकतो आणि तो अश्या तर्‍हेने व्यक्तही होऊ शकतो आणि त्यामुळेच मला वाटत होतं की जर याला या फुलपाखराचा त्रास होत असेल तर त्याने रिक्षा थांबवावी आणि त्याला अलगद उचलून किंवा हाताने अलगद ढकलत रिक्षाबाहेर काढावं. आणि रिक्षाचालक असं काही करेल याची मला तेव्हातरी खात्री जवळपास नव्हतीच.

पण पहिल्यानेच ते जेव्हा उडून त्याच्या समोर फिरू लागलं पण एखादं लहान मूल घरात खेळत असावं आणि त्याचा खेळ न थांबवता आपण आपलं काम करत राहावं अश्या एका समंजसपणाने त्या फुलपाखराची अडचण होऊ न देता तो आपलं रिक्षा चालवण्याचं काम चालू ठेवत राहिला नि ते फुलपाखरू निर्धास्तपणे उडत-बसत राहिलं. तरीही भिती वाटत राहिलेल्या मनाला संपूर्ण प्रवासभर त्या रिक्षाचालकाबद्दल एक अनोखा विश्वास आता वाटू लागला आणि तो त्या फुलपाखराला काहीही करणार नाही आहे ह्याची मला मनोमन खात्रीच पटली. मग माझं लक्ष त्या फुलपाखरावर केंद्रित होऊ शकलं.

पंख दोन पेर रुंदीचे आणि त्यांच्या करड्या रंगावर पांढरा, काळा, लाल आणि पिवळा या रंगांची डोळ्यांची नक्षी असलेलं ते फुलपाखरू ! मस्त विहरत होतं. चालत्या रिक्षामधे शिरणारा हवेचा झोत टाळत ते निर्धास्त उडत होतं .. त्याच्या मागे एक पोट भरायला रिक्षा चालवणारा, त्याच्या पोटाची बेगमी करणारा त्याचा टिकटिकणारा मीटर आणि त्या मीटरचा आदेश पाळून आपापल्या कामाला रुजू व्हायला उत्सुक असा मी .. रिक्षाबाहेर एक घाईने भरलेलं जग .. मोठं .. त्यात या फुलपाखरांकडे बघायची ऊर्मी, इच्छा, वेळ आणि ऊर्जाही नाही. पण एखाद्या खर्‍या अभयारण्यात प्राण्याने असावं, आपल्याच घरात माणसाने असावं तसं निर्धास्त होतं ते. मी त्याच्या इतका निर्धास्त झालो आहे असं मला आता वाटू लागलं.

इतक्यात पांच ते सात मिनिटांचा तो माझा प्रवास संपला. रिक्षा इच्छित स्थळी थांबली. मी पैसे दिले. रिक्षावाला पुन्हा दांडकं ओढायला वाकणार इतक्यात न राहवून मी म्हणालो, “दादा, मला फार छान वाटलं, तुम्ही त्या फुलपाखराला हाकललं नाही. फटका-बिटका मारला नाही. मला खरंच चांगलं वाटलं.” त्यावर रिक्षाचालक लगेच काहेच बोलला नाही. तो खाली वाकलेलाच होता त्याने तो दांडुका ओढून रिक्षा सुरू केली आणि मग फुलपाखराकडे मायेने बघत म्हणाला, “छोटा जीव आहे साहेब” .. आता त्याने रिक्षाचा गिअर टाकला. मग पुन्हा त्याला काही सांगावंसं वाटलं .. तो म्हणाला, “तुमच्या आधीचं भाडं कोरेगांव पार्कमधून घेऊन आलो. तेव्हाच शिरलंय .. उडतंय-बसतंय .. आता काय आहेच्ये .. ”

त्या वेळी तो छोटा जीव या मोठ्या जगातल्या त्याला मिळालेल्या काचेच्या तुकड्यावर शांत बसला होता. हा छोटा मुसाफिर आज त्या रिक्षामधून कुठे-कुठे आणि किती फिरणार होता ते त्याला तरी कुठे माहित होतं ? आणि रिक्षात शिरताना तरी आपण कुठे शिरतो आहोत .. ही रिक्षा आहे, ती कोणाची तरी असते हे सगळं तरी ? आणि हे ही की आपण हे जे स्वच्छंद विहरतो आहोत ते इतर कोणाच्यातरी मालकीच्या हवेमधे, काचेवर .. आणि त्या मालकाने जर एक हात फटकारला तर आपला हा खेळ खलास होऊ शकतो.

पण फुलपाखराला स्वातंत्र्य होतं, स्वच्छंद गवसला होता. त्याच्या उडण्याच्या मार्गात आलेल्या त्या रिक्षाचालक माणसाला एका छोट्या फुलपाखराकडे एक “जीव” म्हणून बघण्याची दृष्टी आधीच अवगत होती.

आणि एखाद्या रिक्षाचालकाचं किंवा एखाद्या साध्या दिसणार्‍या माणसाचं मन इतक्या मूलभूत महत्वाच्या संस्काराने भरलेलं असू शकेल असं जगाकडे पाहात येईल अशी माझी सोय लावून तो छोटा जीव त्या रिक्षामधली त्याची यात्रा तशीच चालू ठेवत निघून गेला होता.

प्रदीप वैद्य

--
प्रदीप वैद्य

गुलमोहर: 

सुंदर!

एखाद्या साध्या, छोट्या, थोड्या काळातल्या अनुभवावरून इतका सुंदर लेख लिहिता येऊ शकतो? आवडलं. असंच लिहित रहा.
भरत मयेकर, कदाचित ते फुलपाखरू मनस्वी, स्वच्छंदी, ठिकठिकाणी भटकणार्‍या फिरस्त्यासारखं, असावं.

छान! Happy

इतके प्रतिसाद येतील असं वाटलं नव्हतं .. भरतजी .. फुलपाखरं हा ''समाज''प्रिय जीव नसावा असं मी जेव्हढं शिकलोय त्यांच्याबद्दल त्यावरून वाटतं .. त्यामुळे त्याबद्दल अपराधीपणा नकोच ! Happy

छान !

त्याच्या मागे एक पोट भरायला रिक्षा चालवणारा, त्याच्या पोटाची बेगमी करणारा त्याचा टिकटिकणारा मीटर आणि त्या मीटरचा आदेश पाळून आपापल्या कामाला रुजू व्हायला उत्सुक असा मी .. रिक्षाबाहेर एक घाईने भरलेलं जग .. मोठं ..
>>>
वैद्यजी सह्ह्ह्ह्ह्ही लिहलयतं. Happy

Pages