जुनून

Submitted by फारएण्ड on 5 June, 2008 - 09:14

फुकट मिळाला तरी राहुल रॉय चा चित्रपट पाहायचा म्हणजे जरा घाबरतच होतो, पण मधे मधे तो वाघ होतो कळाल्यावर म्हंटले जरा सुसह्य असेल तेवढे शॉट्स तरी. पण माणसाचा पौर्णिमेच्या रात्री वाघ होतो आणि दुसर्‍या दिवशी सकाळी परत माणूस हा यातील सर्वात अचाट आणि अतर्क्य भाग नाही. माणसासारखी माणसे काही प्रसंगात कसे वागतात ते त्यापेक्षा अतर्क्य आहे.

हे दोन शॉट बघा:

आपल्या डॉ मुलीच्या हातून बरा झाल्याचे सांगणारा पेशंट घरी येऊन बसलाय आणि मारक्या बकरीच्या नज़रेने इकडेतिकडे बघतोय (राहुल रॉय कडे बघून मारक्या म्हशीच्या म्हणता येत नाही). मुलगी तर एका होनहार-छाप संगीतकाराच्या प्रेमात आहे. पण हा पेशंट तिला सांगतो की मला तुझ्याशी लग्न करायचे आहे. मी उद्या परत येतो तोपर्यंत मला सांग. लगेच आई तिला सांगते की त्या फालतू संगीतकार वगैरेचा नाद सोड आणि याच्याशी लग्न कर. याचे कर्तृत्व काय? तर ऊंचे खानदान का है आणि शिकार जबरी करतो. एवढ्या दोन जमेच्या बाजू असल्यावर २४ तासांत उत्तर द्यायलाच पाहिजे ना?

दुसरा प्रसंग: राहुल रॉय आणि पूजा भट हनिमून साठी एका हॉटेलात उतरतात. मग नेमकी ती पूरणमासी की रात असल्याने रात्री राहुल रॉय स्वत:च्याच गळ्यावरून हात फिरवत काहीतरी त्रास होत असल्याचे दाखवत रूम बाहेर पडतो. "घुटन सी हो रही है" आणि बायको त्याला जाउ देते. नंतर तो वाघ बनून एका तरूणीला मारतो आणि सकाळी त्याच हॉटेल मधेच पडलेला जागा होतो. त्याला कोणीही तोपर्यंत बघत नाही. मग ही इकडेतिकडे शोधत असताना तो परत येतो. लग्नानंतरच्या पहिल्या रात्री काही तरी त्रास होत असल्याचे सांगून गायब झालेला नवरा सकाळी परत आल्यावर तिला राग बिग काही येत नाही. कारण त्याला "घुटन सी" होत होती! (मात्र पहिल्या रात्री राहुल रॉय बाहेरच राहिल्यामुळे शेवटी कोण मरणार आणि कोणाच्या गळ्यात पूजा भट पडणार ते इथेच कळते).

पूजा भट च्या चेहर्‍यावर कसलेच भाव फारसे येत नाहीत. एकदा तो होनहार प्रियकर अविनाश वाधवान येऊन तिला विचारतो की ती (आता राहुल रॉय बरोबर) आनंदी आहेस का दु:खी, तर ती रडतरडत याला आनंदी म्हणून सांगते, वर म्हणते चेहर्‍यावर जाउ नको. बहुधा पुढचा डॉयलॉग "चेहर्‍यावर जाऊ नको, आपल्या दोघांनाही acting करता येत नाही" हा एडिटिंग मधे कापला असावा Happy

आत्तापर्यंत आपण नाग, भूत वगैरे बघितले. येथे नुसता शेर च नाही तर शेर चे भूत आहे. हा शेर लोकांना मारतो, पण लपूनछपून. पुन्हा खात नाहीच. का तर म्हणे फार वर्षांपूर्वी एक शेर व शेरनी एकत्र असताना एका शिकार्‍याने त्यांच्यापैकी एकाला मारले. म्हणून दर पौर्णिमेला त्या वाघाचे भूत त्या जंगलात फिरते व जर कोणी माणूस दिसला तर त्याला मारते. आणि जर कोणी त्या वाघाला मारले तर मारणाराच दर पौर्णिमेला वाघ होतो व इतरांना मारतो. त्यामुळे चांगले आदिवसी जंगलात जाउ नको सांगत असताना राहुल रॉय साहेब जातात व वाघ होऊन बसतात.

आता अविनाश वाधवान आणि पूजा भट ला एकत्र आणायचे म्हणजे राहुल रॉय ला मारले पाहिजे (आणि ते नाही केले तर वाधवान साहेब जबरी पीळ गज़ला गात बसतील). पण ते कसे करणार? पोलीस तर विश्वास ठेवत नाहीत. ज्याच्यावर आरोप आहे तो काहीच दिवसांपूर्वी वाघाच्या हल्ल्यात मेला हे डॉक्टरांनी जाहीर केलेले असताना पुन्हा उठून बसला, व जेव्हा वाघाच्या हल्ल्याच्या खुणा असलेले खून होतात तेव्हा तो नेमका गायब असतो या गोष्टींची संगती वगैरे लावायच्या भानगडीत पोलिस पडत नाहीत. एकतर अवतार गिल पाहुणा कलाकार असल्याने तो काय काय करणार? पण निदान जरा काही दिवस नजरकैदेत राहुल रॉय ला ठेउन बघू. किंवा निदान झू मधल्या पिंजर्‍यात ठेउन बघू, झालाच वाघ तर तिकडे वापरता येईल असा व्यावहारिक दृष्टिकोन ही कोणी दाखवत नाही.

पण इंग्रजांनी उगाच आपल्यावर राज्य नाही केले! त्या जंगलात आलेल्या एका ब्रिटिश फॉरेस्ट ऑफिसर ने एक जुने बाड लिहून ठेवलेले असते. त्यात याला मारायचा मार्ग लिहीलेला असतो. मग अविनाश वाधवान चा इंडियाना जोन्स होतो आणि एका गुहेतील देवळात पौर्णिमेच्या चंद्राचा लेसर पेक्षाही पॉवरफुल 'किरण' ज्या खंजीरावर पडतो तो खंजीर घेऊन बर्‍याच फाइटिंग नंतर शेवटी राहुल रॉय ला मारतो.

यानंतर केवळ "पूर्णवेळ माणूसच राहतो" एवढे क्वालिफिकेशन वाधवान ला पुरेसे असायला हवे. पण तोपर्यंत त्याच्या गाण्यांच्या कॅसेट्स वगैरे निघालेल्या असतात, म्हणजे तो ही प्रश्न सुटला.

अशा चित्रपटांमधे सहसा नायक दिवसा एकदम 'गरीब बिचारा' असतो व कधीतरी एकदम सिरीयल किलर, मास्क, शहेनशाह, वाघाचे भूत वगैरे होतो. उलट येथे राहुल रॉय माणूस असताना एवढी कृत्ये करतो की त्याने वाघ होऊन वेगळे काय केले असा प्रश्न पडतो. त्यात तो काली करतूते करतो म्हणून काय पिक्चरभर काळा ड्रेस घालूनच फिरलं पाहिजे काय? मूळ वाघाच्या हल्ल्यातून मेला हे डॉक्टर सांगत असताना भिंतीतून आलेल्या एका किरणामुळे तो परत जिवंत होतो (त्यानंतर पण पूर्ण बरा व्हायला पूजा भट ला त्याला आठ पंधरा दिवस स्वत:च्या हाताने सूप वगैरे भरवायला लागते). मग मात्र गोळी (लॉंग शॉट मधे वरच्या खिशाला व क्लोजप मधे पोटाला) लागली तरी एक मिनीटात ती जखम भरून काढू शकतो. म्हणजे गोळीमुळे फक्त त्याचा खिसा गायब होतो. वाघाचेही आपण वाघ आहोत की भूत हे नक्की ठरत नाही, कारण कधी सामान्य वाघांप्रमाणे रस्त्यावरून चालावे लागते तर कधी तो पूजा भट ला स्वप्न पाडून बाजूच्या भिंतीतून रक्त सोडू शकतो, बंगल्यात असताना आलेल्या पोलिसाच्या बंद कारमधेच एकदम जाऊ शकतो.

पूजा भट ने कधीतरी '...धनी मातुर माझा देवा वाघावानी असू दे...' हे गाणं जरा जास्तच सिरीयसली म्हंटले असेल का? Happy

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दर पौर्णिमेला त्या वाघाचे भूत त्या जंगलात फिरते व जर कोणी माणूस दिसला तर त्याला मारते. आणि जर कोणी त्या वाघाला मारले तर मारणाराच दर पौर्णिमेला वाघ होतो व इतरांना मारतो. ................

Lol Biggrin
पण भुताला कसे मारेल कुणी..? ऑलरेडी च मेलेले असणे..हेच तर भुताचे प्रिरिक्वीझीट आहे ना?

पूजा भट ने कधीतरी '...धनी मातुर माझा देवा वाघावानी असू दे...' हे गाणं जरा जास्तच सिरीयसली म्हंटले असेल का? >> Rofl
हपा >> जमलंय अगदी Lol

रच्याकने, एकता कपूर कृपेने, बर्फी फेम अनुराग बसु कृत जुनूनचे एलॅबोरेट रिक्रिएशनही उपलब्ध आहे - https://youtu.be/RKwXiJ5MfVA (क्या हादसा क्या हकीकत - खाल, एपिसोड्स १६० - १७६).
यात त्या भूत वाघाची बॅकस्टोरी अधिक डिटेल्डमध्ये दिली आहे, तसेच राहुल रॉय कॅरेक्टरला रिडेम्प्शनदेखील आहे.
इच्छुकांनी लाभ घ्यावा Happy

पण निदान जरा काही दिवस नजरकैदेत राहुल रॉय ला ठेउन बघू. किंवा निदान झू मधल्या पिंजर्‍यात ठेउन बघू, झालाच वाघ तर तिकडे वापरता येईल असा व्यावहारिक दृष्टिकोन ही कोणी दाखवत नाही.>>> Lol Rofl

मारक्या बकरीच्या नज़रेने इकडेतिकडे बघतोय (राहुल रॉय कडे बघून मारक्या म्हशीच्या म्हणता येत नाही)>>> एक्दम काळ्या वेषातला बारीक डोळे करून बघणारा रारॉ डोळ्यांपुढे आला Lol

लेख हहपुवा , पंचेस आवडले. Lol

हर्पा, जबरदस्त जमले आहे. आता सगळ्या बी-ग्रेड सिनेमांचे वाल्मिकी (आय मीन वाल्या कोळी) व्हा. Lol

(रच्याकने, माझ्या पीलीभीत सागा या सिनेमाच्या धाग्यावर पण 'शार्दूल' शब्दाच्या अर्थाची चर्चा झाली होती. Happy )

<<<>निदान झू मधल्या पिंजर्‍यात ठेउन बघू, झालाच वाघ तर तिकडे वापरता येईल असा व्यावहारिक दृष्टिकोन ही कोणी दाखवत नाही. >>>>>
लई भारी..

हपा, संस्कृत श्लोकाबद्दल _/\_ स्विकारा हो..

सर्वांचे मनापासून आभार!

बी-ग्रेड सिनेमांचे वाल्मिकी (आय मीन वाल्या कोळी) >> खतरनाक उपाधी आहे. प्रयत्न करेन. Lol

आत्ता मी मुद्दाम तो घुटन सी हो रही है...वाला सीन बघितला..
अशक्य विनोदी आहे..आणि फा च्या कमेंट्स आठवुन आठवून फार हसायला येत होते...
विशेषतः तो राहुल रॉय वाघात convert होताना.. भयानक करायच्या नादात...अत्यंत विनोदी झाले आहे!!
आणि पूजा मठ्ठ!
चलो मै तुम्हे कुछ दिन के लिये तुम्हारे मा बाप के यहा छोड आता हूँ....
हे ऐकून तर खूप हसायला आले .....
म्हणजे फा च्या लॉजिक नुसार..
.. पहिल्या रात्री राहुल रॉय बाहेरच राहिल्यामुळे शेवटी कोण मरणार आणि कोणाच्या गळ्यात पूजा भट पडणार ते इथेच कळते...

पण मधे मधे तो वाघ होतो कळाल्यावर म्हंटले जरा सुसह्य असेल तेवढे शॉट्स तरी.
यानंतर केवळ "पूर्णवेळ माणूसच राहतो" एवढे क्वालिफिकेशन वाधवान ला पुरेसे असायला हवे.
बहुधा पुढचा डॉयलॉग "चेहर्‍यावर जाऊ नको, आपल्या दोघांनाही acting करता येत नाही" हा एडिटिंग मधे कापला असावा
पूजा भट ने कधीतरी '...धनी मातुर माझा देवा वाघावानी असू दे...' हे गाणं जरा जास्तच सिरीयसली म्हंटले असेल का?
राहुल रॉय ला वाघाच्या ऐवजी तरस बनवणं जास्त शोभलं असतं त्याला....
समस्त वाघ जमातीनी तुझं असं काय घोडं मारलंय की तू त्यांच्यापैकी एकाला 'राहूल रॉय' बनवायला निघालायस....
>>>> ख्याक ख्याक ख्याक

आता मराठीत एकश्लोकी जुनून

झाला इस्पितळात राहुल जसा पूजा-विवाहोत्सुक
सोडोनी अविनाश तेथ दिधला, होता जरी प्रेमिक
पूजा-राहुल चंद्ररात्रिकरिता जाता गळा खाजला
मारी वाघरुपे मुलीस नर अन् झाला सकाळी पुन्हा
क्रोधे तो अविनाश पत्रपठणी, राहूल संहारिला
'फारेण्डे' स्मरिला जुनून, मग तो 'हर्पा'मुखे गायिला

Biggrin काय प्रतिभा!!!!!
Happy राहुल संहारिला...!! ( कायमचाच का नाही संहारिला ?)

हपा Rofl

राहूल हो गया फिदा पूजापे शफाखानेमे
अविनाश अडाये अपनी टांग भी अफसानेमे
राहूल की हो गयी शादी पूजासे शादीखानेमे
कमरे में गये दोनो हनीमून को मनानेमे

( क्रमशः)

Pages