शब्दार्थ

Submitted by admin on 3 June, 2008 - 19:11

एखाद्या शब्दाचा अर्थ हवाय? मग तो इथे विचारा.

या आधिचे संभाषण या दुव्यावर सापडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

'वणिग्वर' चा अर्थ काय ?
(विद्वान आणि वणिग्वर.... असे वाक्य आहे).
शब्दरत्नाकर, दाते-कर्वे व मोल्सवर्थ यात हा शब्द नाही.

गोविंद तळवलकरांच्या पुस्तकात नॅशनलिटीजसाठी राष्ट्रीक असा शब्द आला आहे.
"भाषिक विभाग हे राष्ट्रिक (नॅशनलिटीजसाठी) आहेत असे त्याचे म्हणणे होते". हा शब्द योग्य वाटतो का?

व्याकरणाच्या दृष्टीने चूक नाही.
इक प्रत्यय जर भाषेला लागू शकतो तर राष्ट्रालाही.

फक्त तो शब्द तितकासा वापरात नाही म्हणून कानाला खटकतो.

अर्थ- आर्थिक
समाज- सामाजिक
असे शब्द नेहमी वापरतो.

पण

मंगळ- मांगळिक हा तसा रेअर आहे वापरात. (तरी वापरतात म्हणा!
आणि
जशी वासंतिक संमेलने असतात तशी शारदिक नसतात किंवा हेमंतिक.

म्हणून वासंतिक कानाला खटकत नाही पण शारदिक आणि हेमंतिक खटकतात.
चूक तीनही नाहीत.

सराई म्हणजे धर्मशाळा /थोड्यावेळेकरताचा निवारा देणारी जागा बरोबर.>>>

लग्न-सराई मध्ये काय अर्थ आहे सराईचा?

माहित नाही.
बहुदा लग्नासाठी तात्पुरता उभारलेला जानवसा असावा मूळ अर्थ.
आणि मग त्याला लग्नाचा सिझन्/लगबग असा अर्थ प्राप्त झाला असावा.

सराईचा दुसरा अर्थ हंगाम असा आहे.>>

हो भरत! हा अर्थ देखिल सायुक्तिक वाटतो!

पण केवळ लग्नाच्या बातीतच वापरला जातो बहुतेक!

भाषिक चूक , भाषक बरोबर असं त्या दुसर्या धाग्यावर आहे.
भाषी असाही शब्द आहे शब्दकोशात. . भाषीय असंही वाचलंय.

तेच तर.
शारदीय म्हणतात.
शारदिक नाही.
अर्थाच्या दृष्टीने यात काय फरक आहे?
पण वापरात नाही फारसे.

'स्तनपान' हा चुकीचा शब्द रूढ झाला आहे. योग्य शब्द 'स्तन्यपान' आहे.
स्तनातून येते ते स्तन्य. बाळ स्तन्य पिते.

'स्तनपान'
संस्कृतमधे हा कुठलातरी समास असावा. संस्कृतचे जाणकार यावर काही स्पष्टीकरण करतील का?

जुन्या संस्कृत साहित्यात हा स्तनपान शब्द आहे का कुठे?

नन्द्याआजोबा,
षष्ठी तत्पुरुष- स्तनाचे पान जरा अर्थाने चुकीचे वाटतेय म्हणजे स्तनाचे पान न होता स्तनातून आलेल्या द्रवाचे पान( प्राशन ) केले जाते.
मग स्तनपान हे पंचमी तत्पुरुष होईल. 'स्तनातून (आलेल्या द्रवाचे) पान!
पण 'पंचमी तत्पुरुष' असा समास याआधी ऐकला नव्हता.

पण समजा असलाच तर,
बाळ स्तनपान करते हे योग्य.
आई स्तनपान घडवते किंवा करू देते.

जल्ला, लोक नायतर सरकारी जाहिराती आयांना स्तनपान करा असा सल्ला देतात. तो लईच अ आणि अ होतो.

'तून' हा सप्तमीचा विभक्ती प्रत्यय आहे.
विभक्ती तत्पुरुष हा तत्पुरुष समासाचा एक प्रकार.

'कातकरी समाज' म्हणजे नक्की कोण? (प्रश्न जातीबद्दल नाहीय).
काल एका लेखात 'कोकणात कातकरी समाजातल्या मुलांना' मदत करणार्‍या संस्थेबद्दल चांगली माहीती वाचली.
पण इतकी वर्षे कोकणात राहूनही म्हणजे काय ते कळले नाही.
कोकणात भटक्या म्हणजे 'धनगर समाज',पण कातकरी कोण ते मला कळले नाही.

अय्यो, तुम्हाला कातकरी माहित नाहीत.
ते तिरकमठा घेऊन फिरतात, केसांत टोपीला पिसे लावतात.
साधारण काताच्या धंद्यात किंवा वीटभट्टीवर कामे करतात आणि रानातली शिकार मारून आणतात.

आमच्या लहानपणी काथाच्या शेण्यासारख्या थाप्या, मधाची पोळी, कधी मारलेला भुरा ससा किंवा घोरपड घेऊन गावात यायचे हे लोक.
हे लोक माकड /खार मारून खातात असा प्रवाद होता. नक्की माहित नाही.

हे ओंबिलाची चटणी (झाडाच्या पानांचा कोश करून त्यात रहाणारे लाल डोंगळे , जे खूप करकचून चावतात) चटणी करून खातात ते मात्र पाहिलेलं आहे.

मी असली माणसे कोकणात कधी पाहिली नाहीत.. पण 'कात' तयार होतो तेव्हा नक्की असतील.
माकड मारणारे लोक 'वान्दरमारे' मी पाहिलेत.. पण तेच हे कातकरी हे माहित नव्हते.

ठाणे, रायगड रत्नागिरीत तरी असतात.

गंमत म्हणजे उत्तर महाराष्ट्रात कास्तकार हा शब्द म्हणजे म्हणजे शेतकरी म्हणजे बहुतेक कुणबी (किंवा शेत कसणारे कुणीही) यांच्यासाठी वापरतात.

कातकरी म्हणजे भिल्ल म्हणायला हरकत नाही. म्हणजे अगदी भिल्लच नाही, पण त्या प्रकारचं रहाणीमान असलेले. माझ्या आजोबांचे अनेक पेशंट्स कातकरी होते. अस्सल मध वगैरे द्यायचे ते आणून. आणि शेकडो वनस्पतींचे औषधी उपयोग या लोकांना माहिती असतात. पण म्हणूनच ते कोणत्याही प्रकारच्या वैद्यकीय उपचारांवर विश्वास ठेवत नाहीत. झाडपाला आणि तांत्रिक-मांत्रिकच. पूर्वी म्हणजे ७० वर्षांपूर्वी तर वैद्यक चिकित्सा हाच त्यांना जादूटोणा वाटे. आता बदल होतायत.

Pages