अळूवडी

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 9 December, 2010 - 02:18
aluwadi
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

८-१० अळूची पाने (धुवुन, मोठ्या पानांचे पाठचे कडक देठ थोडे तासुन)
बेसन २ वाट्या
अर्धा वाटी तांदळाचे पिठ
चिंचेचा कोळ
गुळ
मिरची पावडर अर्धा ते १ चमचा (तुम्हाला आवडत असेल तसे प्रमाण घ्या)
मिठ
आल लसुण पेस्ट
कांदा चिरुन भाजुन
सुके खोबरे किसुन भाजून थोडे कुस्करुन
१ चमचा तिळ
अर्धा चमचा गरम मसाला किंवा १ चमचा गोडा मसाला
तळ्यासाठी तेल

क्रमवार पाककृती: 

वरील जिन्नसातील अळूची पाने आणि तेल वगळून सगळे बेसनमध्ये सगळे मिसळून घट्ट मिश्रण करावे.नंतर पाट किंवा मोठे ताट घेउन त्यावर अळूचे पान उलटे ठेउन त्यावर पिठाचे मिश्रण सारवायचे. मग दुसरे पान उलटेच पण विरुद्ध दिशेन लावायचे आणि त्यावर मिश्रण सारवायचे. (अगदी शेण सारवतात तसेच :हाहा:) मग अशीच उलटी पाने एकमेकांच्या विरुद्ध लावायची एका लोड साठी मोठी असतील तर ५-६ आणि छोटी असतील तर ७-८ पाने लावायची. मग लावलेल्या चारी पानांच्या कडेची बाजु थोडी आत मोडून त्याचे लोड करायचे (चटई गुंडाळतात तशी :स्मित:) आता उकडीच्या भांड्यात वाफेवर हे लोड ठेउन २० ते ३० मिनीटे हे लोड वाफवुन घ्यावेत. थोडा धिर धरा मग थंड झाल्यावर लोडच्या सुरीने वड्या पाडा (हे तुम्ही सुचवा कश्यासारख्या ते). तवा चांगला तापवुन त्यावर थोडे तेल पसरवुन त्यात अळूवड्या मंद गॅसवर खरपुस तळा. तो.पा.सु. टाईपतानाच.

वाढणी/प्रमाण: 
कितीही केल्या तरी कमीच
अधिक टिपा: 

आल लसुण पेस्ट तसेच कांदा खोबर न टाकताही प्लेन करता येतात. पण ह्यातील खोबर खाताना खुसखुशीत लागत. करुन बघाच.
कांदा खोबर्‍याची पेस्ट आजिबात करु नका चांगली नाही लागत तसाच चिरलेला तळून कांदा आणि किसुन भाजलेले खोबरे थोडे कुस्करुन टाका.
तळताना आवडत असल्याच मोहरीची फोडणी आणि वरुन थोडी चिरलेली कोथिंबीर टाकु शकता.
गोडा मसाला आणि गरम मसाला दोन्ही थोडा थोडा टाकला तरी चांगला लागतो.

अशीच अळूवडी अळूची पाने चिरुनही करता येते. ज्यांना पाने लावण्याचे काम कटकटीचे वाटते त्यांने पाने चिरुन मिश्रणात मिसळुन लोड करुन वाफवायचे. कोथिंबीर किंवा कोबीच्या वड्यांप्रमाणे. पण इसमे मजा नही.

माहितीचा स्रोत: 
पाया आईने घडविलाय आणि त्याला वेगळे वेगळे आकार देण्याच काम मी करते.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ही आहेत अळूची ताजी ताजी पाने
Vadi.JPG

हे आहे पाठचे देठ
Vadi1.JPG

असे कापुन घ्यायचे म्हणजे वडी चांगली बसते. पोकळ राहात नाही.
Vadi2.JPG

मी थाळ्यावर पान ठेउन पिठ लावते. म्हणजे पानांचा आकार पुरतो बरोबर
vadi3.JPG

अशी एकमेकांच्या विरुद्ध लावायची (३६ चा आकडा)
vadi4.JPG

माझी श्रावणी माझा भार हलका करताना
vadi5.JPG

अशा प्रकारे गुंडाळायची. मी ह्यात कडा मोडल्या नाहीत. पुर्ण झाल्यावर टोके आत टाकली आहेत.
vadi6.JPG

अशा प्रकारे लोड तयार करुन वाफवुन घ्यायचे.
vadi8.JPG

वाफवलेले लोड. (लांबी भांड्यात पुरत नसल्याने आधीच मधुन कापुन ठेवले होते)
vadi9.JPG

तव्यात शॅलोफ्राय करण्या साठी टाकलेल्या वड्या.
vadi10.JPG

झाल्या एकदाच्या (यम्मी)
vadi11.JPG

जागु मस्तच , फोटो टाक लवकर. जागु तुझ्याकडून मला पुरणपोळीची रेसिपी हवी आहे. मागे मी मिसळपाव वर वाचलेली पण आता लक्षात नाही आहे , तर वेळ मिळाल्यास मायबोलीवर टाक ना , धन्यवाद .

जागुटले, ऐकल की तू लगेच माझं Happy
तोंपासु मी करणार या शनिवारी, कांदा खोबर कधी टाकल नव्हत आता टाकुन बघते.

जागू, याच्या बेसनात करंदी घालतात. तसेच एखादे शिराळे पण किसून घालतात. (हि टिप खास कुणासाठी बरं ?)
नारळाच्या दूधात या वड्या शिजवून पण छान लागतात. दूध पूर्ण आटेपर्यंत शिजवायचे.

ही कांदा खोबर्‍याची आयडीया माझीच आहे. काही जण वाटण करुन घालतात. पण मला त्या आजीबात आवडत नाहीत. पण तेच आख्खे ठेउन खुसखुशीत होतात वड्या.

हो रुपाली श्रावणात म्हणून प्लेनच करतात अळूवड्या.

नुतन कालच माझ्या मनात आल की एखाद्या गुरुवारी पुरण पोळ्या करायच्या. मैने तेरे मन की बात जान ली.

शुभांगी नक्की टाकुन बघ.

दिनेशदा तुमच्याकडून नेहमीच वेगळी माहीती मिळते. दुध चिंचेमुळे फाटन नाही ना ? तो करंदीचा प्रकार मी, साधना, भ्रमर, नुतन आणि आमच्या सारख्या मासेप्रेमिंसाच असेल. एकदा नक्की करुन बघेन. पण बाकी मिश्रण तेच टाकायचे का ?

जागूतै आता अळूची पानं शोधावी लागतिल >>> अल्पना अगं अरवी मिळते ना तुमच्याकडे ? लाउन टाक घरच्या बागेतल्या कुंडीत दोन तिन अळकुड्या. दोन आठवड्यात मस्त १२-१५ पानं मिळतिल तुला ताजी ताजी. Happy

डॅफोडील्स अळकुड्यांची पाने अळूवडीसाठी नाही वापरत. अळकुड्यांना हिरवीगार पाने येतात. वडीचा अळू वेगळा असतो. वर पाने दिली आहेत. त्यांची देठे काळी असतात.
आणि दोन तिन अळकुडीत १२-१५ पान आठवड्यात नाही मिळ्णार महिन्यानी ४-५ पान मिळतील. त्यातल पण कापताना मधल पान ठेवायच असत.

अगं डॅफो इथे पानं पण मिळतात, पण खाजरी असतात बहूदा. आठवड्याच्या बाजारात मिळतात कधी कधी.
आता चक्कर मारावीच लागेल.

हो जागु हिरवी पानं खाजरीच असतात. काळ्या देठांची अळूच चांगली असते. Happy
इथे बंगलोर मध्ये अळूवड्यासाठी पानं कधीच दिसली नाहीत मग मी अरवी लाउन बघितली. दोन तिन आठवड्यात आली चांगली पानं.
आत्ता पर्यंत तिन चार वेळा वड्या केल्या. Happy
ते मधलंपान ठेवायचं मला माहित नव्ह्तं. Happy

अल्पना पाने खाजरी असतातच तशीही पण जास्त खाजरी असली तर चिंच थोडी जास्त लावायची.

नुतन Happy

डॅफोडील्स मधले पान ठेवले म्हणजे झाडाला चांगला जोम मिळतो. नविन पानाला पोषण जास्त मिळत असते झाडाचे त्याच्या वाढीसाठी.

दिनेशदा चांगली धारदार सुरी आणि आपल्या हातातली कसब असली की नाही बाहेरजात मिश्रण उंडा मधुन कापताना.

मस्त रेसिपी. वड्या एकदम जबरी दिसता आहेत.
ह्यावेळी इंग्रोमध्ये मस्त आळूची पानं मिळाली आहेत. विकएंडला आळूवड्या करीन. रेसिपी शेअर केल्याबद्दल खुप खुप आभार!

जागू, मस्तच तोंपासु रेसिपी Happy
मी कांदा नाही टाकत कधी, पुढच्या वेळी टाकुन बघेन.
आता पुरणपोळीची रेसिपी येऊ देत लवकर Happy

जागूची कृती आणि यात चक्क मासे नाहीत. Proud
आमच्या सारख्या शाकाहारी लोकांची दया आलेली दिसतेय.
जागू मी सगळ्या कृती वाचत असते बर का प्रतिसाद देत नसले तरी.

अगदी किलर आळूवड्या आहेत जागू. कांदा खोबरं घालून नाही कधी ट्राय केल्या पण मस्तच लागत असतील. फोटो पाहून अगदी आईच्या हातच्या अळूवडया आठवल्या.

मी कांदा खोबरे नाही घालत. पण कैच्याकै आवडते. दोन अव आणि दहिभात स्वर्गच. जागुतै शाकाहारी झाल्या जणू Happy

मस्त रेसिपी आणि फोटो.
>>आमच्या सारख्या शाकाहारी लोकांची दया आलेली दिसतेय>> Lol

जागु मस्तच गा.
तू दिलेल्या आळुला आता सहा सात पान आल्येत आणि या शनिवार रविवार करुयात हा विचारच करत होते इतक्यात तुझीच रेसिपी आली.

मी कांदा, खोबर ,आलं, लसुण नाही घालत पण या वेळी घालुन पाहीन.
बाकी वड्या झक्कासच दिसतायत. एकदम तोंपासु. Happy

Pages