मायबोलीचे देणे

Submitted by वैभव_जोशी on 8 December, 2010 - 23:59

लिहिण्यास सुरुवात करतानाच मनात बरेच प्रश्न आहेत . उदा :- हे लिहून पूर्ण होईल की नाही कारण गद्य लेखन हा आपला पिंडच नोहे ह्याची पटत चाललेली खात्री , लिहून झालंच तर मायबोलीचा आयडी आणि पासवर्ड आठवेल की नाही , आठवलेच तर सध्या तिथे कुठले विभाग आहेत , कुठल्या विभागात हे लेखन जाईल , प्रकाशित झालंच तर ' हा कोण वैभव जोशी जो इतक्या जिव्हाळ्याने मायबोलीबद्दल बोलतो आहे ?' असे प्रश्न तर लोकांना पडणार नाहीत ना ? वगैरे वगैरे ... तरीही....

निमित्त आहे आशाताईंनी माझ्या हातून लिहिलं गेलेलं एक गाणं गायल्याचं.

ashatai_n_me.jpg

पाच एक वर्षांपूर्वी मी जेव्हा फिरत फिरत मायबोली ह्या संकेतस्थळावर आलो तेव्हा शालेय अभ्यास सोडून एकही अवांतर मराठी शब्द लिहिलेला नव्हता . संकेतस्थळावर असलेल्या यादीत कुठेतरी टिचकी मारायची म्हणून गुलमोहर विभाग उघडला गेला तेव्हापासून मी अजूनही कवितेतून बाहेर पडलो नाहीये. अवांतर वाचन (पद्य) शून्य असल्याने चारोळी विभाग जास्त जवळचा वाटला हे सांगणे न लगे. ४-५ दिवस आ वासून इतरांची प्रतिभा पाहण्यात गेल्यानंतर काहीतरी विचित्र घडू पाहतंय याची जाणीव झाली. दिवसरात्र डोक्यात जागा बदलत फिरणारे शब्द , त्यातून तयार होणार्‍या नवनवीन आकृती, त्यांची रंगसंगती .. झपाटून गेल्यागत झालं होतं. ' हे भलतंच ' (संदीप ची आठवण आली लिहितांना ) असं म्हणून चारचौघांत नॉर्मल वागणं आणि आत आत हरवत जाणं तेव्हापासूनच सुरु झालं असावं कदाचित. सुचत असलेल्या शब्दांना काही अर्थ आहे का हाच मूळ प्रश्न असल्याने ती चारोळी किंवा कविता आहे की नाही इथपर्यंत मजलच जायची नाही. मराठी कविता (!) असलेली ग्रीटिंग्स विकत घेऊन मैत्रिणींना इंप्रेस करणार्‍या एका मित्राला घाबरत घाबरत चार ओळी ऐकवल्या आणि त्याने ' तू बरा लिहू शकशील ' असं बन मस्का चहात बुडवत सांगितलं. पहिली दाद . खूपसा धीर गोळा करून मायबोली वर नाव नोंदवलं , बरेच दिवस दिलेल्या खिडकीतच काहीबाही लिहून पाहिलं आणि एक दिवस 'प्रकाशित करा' नावाच्या बटनावर टिचकी मारली. डोळे घट्ट मिटून. तिथे येणारं लिखाण आणि त्यावरच्या उत्स्फूर्त आणि अभ्यासू दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रिया आधी वाचनात आलेल्या होत्या त्यामुळे प्रकाशित केल्यानंतर रजा टाकून घरी निघून गेल्याचं आठवतंय. तेव्हापासून आजपर्यंत प्रत्येक नवीन कविता / गीत / गज़ल हातून लिहिली गेल्यानंतर लपून बसावंसं वाटतं .. पहिली प्रतिक्रिया 'आपोआप' येईपर्यंत. स्वत:हून कुणाला 'कशी वाटली?' विचारण्याचं धाडस आजही नाही. पूर्वी मित्रमैत्रिणींची प्रतीक्षा असायची आता संगीतकार , दिग्दर्शक , निर्मात्यांची असते इतकंच. पण फोन / मेसेज येईतो मधला सारा काळ निव्वळ अस्वस्थता .....

मौनात नाहल्या सांजभारल्या वेळा
अंगाखांद्यावर अबोल पाखरशाळा
पायी पडलेली अर्थहीन ही धूळ
शब्दांत मिळेना नि:शब्दाचे मूळ

आकस्मिक यावे वादळ , व्हावी सुटका
पाखरे उडावी मुळी न करता गलका
खोलात मुळाशी हाती यावे अंबर
उन्मळून पडता शोभेचा औदुंबर.

दुसर्‍या दिवशी बिचकत बिचकत चारोळी विभाग उघडला तेव्हा आपल्याला व्यसन लागतंय याची अंधुकदेखील जाणीव नव्हती. क्षिप्रा नावाच्या कवयित्रीने ' तू पूर्ण कविता छान लिहू शकशील , का लिहीत नाहीस ?' असा प्रतिसाद दिलेला होता. 'म्हणजे कसं????' असं कुणालाच विचारू शकलो नाही. दोन चारोळ्या एकत्र केल्या म्हणजे एक कविता होत नसते , दोन यमक जुळणार्‍या ओळी लिहिल्या गेल्या तर एक गज़लचा मतला होत नसतो , चार वृत्तबद्ध ओळी म्हणजे रुबाई नव्हे हे प्रश्न कसे सुटत गेले माहीत नाही. छंद, मुक्तछंद , मीटर, वृत्त , रदीफ़ , कवाफी, नज़्म , त्रिवेणी ह्या गोष्टी आयुष्यात कधी , कुठून , कशा आल्या आणि लॅंडिंग नोट्स , स्कॅनिंग , पिचिंग , हार्मनी , इंट्रो म्युझिक , एम १ , एम २ , हे शब्द कधी ओठांवर रुळले कळलंच नाही , कळूही नये.

पहिली कविता कुठली , पहिली गज़ल कुठली , पहिलं रेकॉर्डॆड गाणं कुठलं ह्या नोंदी ठेवण्याचा स्वभाव नसल्याने , थॅंकफुली , हे लिखाण 'मी' पणाकडे झुकणार नाही अशी आशा आहे. 'पुढची' ओळ कुठून येते आहे ह्या एकाच हव्याहव्याशा अस्वस्थतेच्या भरवशावर हा प्रवास सुरू आहे. हा प्रवास परवा एका अत्यंत सुखद वळणावर काही काळ नि:शब्द झाला.

मार्च-एप्रिल २०११ मधे येऊ घातलेल्या एका म्युझिकल सिनेमासाठी माझ्याकडून गाणी लिहिली गेली आणि त्यातील एका गाण्यासाठी आशाताईंना विनंती करण्यात आली तेव्हापासून 'झोप उडणे' ह्या उक्तीचा माझ्यासारख्या निशाचरालाही प्रत्यय आला. त्यांना पायलट गाण्याची सीडी मिळाली असेल का, सोबत दिलेल्या कागदावरचं अक्षर लागलं असेल ना??? , चालीचा प्रश्न नव्हताच कारण श्री. नरेंद्र भिडे म्हणजे नखशिखांत मेलोडियस माणूस! पण कविता आवडली असेल का? कवितेमुळे तर गाणं नाकारणार नाहीत ना ? साधारण किती दिवसांनी त्यांचा फोन येत असतो? नाहीतर काय करायचं असतं? त्यांनी नाकारलंच तर त्यांच्या आवाजात आता ऑलरेडी ऐकू येत असलेलं गाणं दुसर्‍याच्या आवाजात कसं ऐकायचं ? असे अनेक संभ्रम घेऊन काही लाख क्षण जगून (!) झाल्यानंतर नरेंद्र भिडेंच्या मोबाईल वर 'आशाताई भोसले ' असं नाव झळकलं. (हे एक नवल आहे. थोडसं विषयांतर पण मोबाईलवर नाव सेव्ह करतानादेखील फक्त 'आशा भोसले ' असं का करवत नसावं? त्यांची स्वाक्षरी घेण्यासाठी म्हणून एका मोठ्ठ्या पोस्टरवर त्यांचा फोटो आणि कविता छापण्यासाठी आम्ही ज्या प्रिंटरकडे गेलो होतो तिथे काम करणार्‍या औरंगजेबाला आमच्या उत्साहाशी काहीच देणंघेणं नव्हतं पण हा फोटो आशाताई भोसलेंचा आहे असं सांगितल्यावर त्याने इमेज फाईल 'आशाजी' ह्या नावाने सेव्ह केली .. हे काय असतं???? असो.) स्पीकर मोडवर फोन टाकला तर त्यांच्या लक्षात येईल ह्या भीतीने नरेंद्रने डाव्या हाताने मला लीलया कानाशी ओढलं ..

भिडे, नमस्कार मी आशा भोसले बोलते आहे (आं????? नका ना सांगू. अहो नरेंद्रचा रिंगटोन कुठला तरी कर्कश धिंगाणा असूनही तुमचा फोन आल्यावर सुरेल वाजला ना !!!!)
"गाणं ऐकलं मी. सुरेख केलं आहे. शब्द तर फार सुंदर आहेत................................."

पुढचा संवाद मी ऐकला नाही .. नंतर नरेंद्रने पुन्हा पुन्हा भेटेल त्यांना सांगितला तेव्हाही नाही. तो मला (न) आलेला , सर्वात कमी वेळ चाललेला आणि सर्वात जास्त काळ ऐकू येणारा एकमेव फोन. त्या वाक्यानंतरची सर्व शांतता मायबोलीच्या मालकीची . 'ये कहॉं आ गये हम' या ओळी ज्याला सुचतात त्याला लाख सलाम. 'यूँ ही साथ चलते चलते' म्हणणं माझ्या ओठी शोभत नाही कारण मधली दोनअडीच वर्षं मी मायबोलीसोबत प्रत्यक्ष चाललेलो नाहीये. तरीही अधूनमधून भेटणार्‍या मायबोलीकर मित्रांकडून नवीन कवी- कवयित्री , गुलमोहराबद्दल जाणून घेण्याची तीव्र उत्सुकता असायची जी लपवायचाही मूर्ख प्रयत्न मी वेळोवेळी केलेला आहे. घर आपुलकीचं होतंच पण आपली आवडती खोली , आवडता कोपरा आता कसा दिसतो ही उत्सुकता कुठलाही चेहरा कसा लपवू शकेल?

आशाताई केवळ रात्री आणि ते ही स्टुडिओचे दिवे मालवून डबिंग करतात इथपासून ते किमान ४-५ वेळा रेकॉर्डिंग कॅन्सल होतंच होतं , आता मुंबईच्या वार्‍या करा इथपर्यंत सर्व वदंता धडधड नावाने हृदयात वावरत होत्या. आणि तो जिवंतपणाचा बुरखा घेऊन मी त्या आठवड्यात ज्यांना ज्यांना भेटलो आहे त्यांचे लवकरच ' काय रे किती महिने झाले , भेट नाही' असे फोन येतील ह्या बाबत माझ्या मनात अजिबातच शंका नाही. आणि एक दिवस रेकॉडिंग कॅन्सल झालंच. पहाटे ५ वाजता मुंबईला जायला निघालेल्या तीन गाड्या स्टार्ट होण्याआधी 'आज आवाज नीट लागत नाहीये रियाजात , पण उद्या सकाळी ११ वाजता नक्की करू या' असा निरोप आला. ते सांगणं इतकं खरं असावं की कुणीच काही न बोलता सारे आपापल्या घरी जाऊन झोपले (असावेत). दुसर्‍या पहाटेस मात्र कसं कोण जाणे पण जाग येतानाच जाणवत होतं की हाच तो दिवस. गाडीत वेगवेगळ्या संगीतकारांची , गायकांची थट्टा मस्करीद्वारे व्हर्च्युअली कारकीर्द बरबाद करण्याच्या नेहेमीच्या प्रयत्नांतदेखील पुरेसा जोश नव्हता. प्रत्येकजण अधूनमधून काही क्षण अंतर्मुख होत होता . आयुष्यात एव्हाना बरेच हंबलिंग एक्सपीरिअन्सेस येऊन गेले आहेत तरीही एखादा अनुभव येण्याआधी , इतका आधी चाहूल देतो हे विस्मयकारक होतं. ' त्या काही ११ म्हणजे ११ ला येत नसतात बरं का ' वगैरे वाक्यं दर दहा मिनिटाला कानावर आदळत असूनही तिथे १०.३० पर्यंत पोहोचण्याची ओढ कमी होत नव्हती. वाटेत माझी कार पंक्चर झाली . एकाच्याही तोंडून साग्रसंगीत उध्दार बाहेर पडला नाही. वी वेअर जस्ट नॉट अवरसेल्व्ज. कुणीतरी ट्रॅफिक , पंक्चर अशा किरकोळ अडचणींतून उचलून स्टुडिओसमोर ठेवल्याप्रमाणे १०.२५ ला कार पार्क झाली. पहाटे ५.३० ला निघून इतके तास कसे लागले? कुठे नक्की जास्त वेळ गेला ? पवई पासून अंधेरीपर्यंत रश अवर्सची मरणाची ट्रॅफिक असून मग कसे काय पोहोचलो ?? काही आठवत नाही.

स्टुडिओ दुसर्‍या मजल्यावर . लिफ्ट नाही (!!! आपलं ठीक आहे त्या कशा येणार????) १०.३० पासून ट्रॅक्स लोड करणे , साऊंड बॅलन्स करणे ह्यातच जवळपास अर्धा तास गेला. १०.५५ ला एक फोन करायला हवा म्हणजे निदान निघतील तरी पेडर रोड वरून अशी पुटपुट दोन तीन माईक्समधून आली पण फोन करण्याचं धाडस कोण करणार? चहा तरी घेऊ म्हणून वळेपर्यंत १०.५८ ला आशाताई स्टुडिओच्या दारात. वय वर्षे ७८ , दोन्ही गुडघ्यांचं ऑपरेशन झालेलं (ऐकीव माहिती) , व्यवस्थित जिने चढून , अजिबात दम न लागता 'नमस्कार , चला सुरू करू या???????????????' एक बाहेरची रूम (जिथे आम्ही सगळे उभे होतो) , एक मॉनिटर रूम आणि एक रेकॉर्डिंग रूम . नरेंद्र भिडे आणि आशाताई मॉनिटर रूममध्ये गेल्यानंतर बाहेर जे काय उरलं होतं त्याला केवळ पोकळीच म्हणता येईल. ' आत जास्त गडबड नको आहे हां त्या गाताना ' असे धडे अनेको दिवसांपासून भिडे गुरुजींनी गिरवून घेतले असल्याने आत जाणं वगैरे प्रश्नच उद्भवत नव्हते. पण नरेंद्रनेच दार उघडून मला आणि दिग्दर्शक आदित्य इंगळेला आत मधे बोलावलं.

'बसा ना तुम्ही इथे ' केवळ नमस्कार करायला वाकलो होतो म्हणूनच तोंडभर पसरलेलं समाधान लपलं असावं. आदित्यने मेकिंग शूट करायला सुरुवात केली . मधेच तो मला ' अरे हे पॉझ चं बटन हेच ना?' वगैरे विचारत असावा. पण ट्रॅक सुरू झाला होता आणि त्या गाणं समजून घेत होत्या. म्हणजे कसं की ' इथे मोन्टाज असणार ना? हा आलाप फेडिंग आहे नक्की ' वगैरे वगैरे . १२-१५ ओळींवरून आणि साडेचार मिनिटाच्या ट्रॅकवरून सिनेमा इतका समजू शकतो? ' हे गाणं ज्या अक्कांच्या तोंडी आहे त्या किती वर्षांच्या आहेत? सुंदर आहेत का? ' नानाविध तर्‍हांनी गाणं कोळून प्यायलं. बरं हे सुरू असताना ज्या आज्ञाधारकपणे संगीतकाराच्या सूचना लिहून घेत होत्या त्याला तोड नाही. ते उसनं नाही आणता येत. 'ओह! शुध्द निषाद आहे होय .. तरीच म्हणते मी ' करत कागदावर पटापट खुणा.'पुण्याचे बामण.. शब्दोच्चार नीट लागतात तुम्हाला , आम्ही वर्‍हाडी ' म्हणत बाबूजींचा 'ष' आणि पाठोपाठ खळखळून हसणं. आतापर्यंत खूप जणांचं हसणं ऐकलं आहे पण ओठ विलगण्याआधी थेट सूर लागलेलं हे पहिलं. एकदा इथेच ट्रॅकवर गाते म्हणाल्या.

(सांगलीहून गायक होण्यासाठी मुंबईस आलेल्या तरुणाची ही गोष्ट . 'पाहुणा' नावाच्या अभिराम भडकमकर लिखित नाटकावर आधारलेली. मुंबईत तो ज्यांच्याकडे पेईंग गेस्ट म्हणून राहतो त्या आक्का. सडेतोड , वेळप्रसंगी फटकळ , "गाणी गाऊन दोन वेळचं गिळायला मिळत नाही पाहुणे ऽऽऽ" म्हणणार्‍या. त्या दोघांमधे गहिरं होत जाणारं नातं आणि एका वळणावर , अपयशांनी खचून त्याचं अक्कांच्या कंबरेला मिठी मारून रडणं आणि दोघे आपापल्या खोलीत अंधारात असताना बॅकड्रॉपला वाजणारं हे गाणं)

एक अनोळखी फूल
झुले माझ्या वेलीवर
माझे कुतुहल जागे
त्याची नीज अनावर

त्याचे रंग रूप न्यारे
त्याचा गंधही निराळा
परी पाहूनिया त्याला
दाटे मायेचा उमाळा
कुण्या अंगणाचे ऋण... आले कुशीत कुठून
फुटे डोळ्यांना पाझर... भिजू लागला पदर

गाठ भेट , नाती गोती
नशिबाचा खेळ सारा
कधी ओल्या चिंब लाटा
कधी कोरडा किनारा
एक नाळ तुटायाला ... पुरे होतो एक क्षण
एक धागा जुळायाला.. किती उशीर ... उशीर !!!

ट्रॅक रिहर्सल ला कुणी असं १००% गातात का? असं वाटे वाटेतो त्या रेकॉर्डिंग रूम मधे गेल्या , स्वत:च्या हाताने माईक लावून घेतला स्वत:ला हवा तसा आणि रिहर्सलची पाटी स्वच्छ पुसत गाणं दहापट उंचीवर नेऊन ठेवलं. माईकसमोर ताठ उभे राहून एक एक जागा लखलखीत करून टाकली. दुस-या अंतर्‍याला डोळे मिटले तर आत्ममग्न चित्रकार , रांगोळी काढण्यात रमलेली स्त्री , स्वत:वरच बरसणारा पाऊस असं वाटवाटेल ते दिसत राहिलं. २० मिनिटे रिहर्सल , ४० मिनिटात फायनल डब ! आहे?

नंतर बरेच ऐहिक क्षण लाभले. 'हे शब्द गायला मिळाले , लिखाण थांबवू नका (ह्या रेकॉर्डिंगनंतर खरोखर त्याच दिवशी लेखन थांबवण्याची माझी इच्छा होती जी नरेंद्र ने त्यांना सांगितली) , कवीची सही हवी (जी देण्याचा उद्दामपणा घडला नाही नशिबाने!) ' पासून कविता वाचून दाखवताना त्यांना न आवरलेले अश्रू ...............
पण .. पण ते ऐहिकच शेवटी. त्या जे गा(य)ल्या ते अलौकिक. असे पुन्हा होणे नाही. पुन्हा दुसरं एखादं गाणं गायल्या तरीही बहुतेक नाही कारण तेव्हा मी अधिक निर्ढावलेला असेन. त्यानंतर वांग्याच्या भाजीपासून ते बिरड्याच्या उसळीपर्यंत सर्व चर्चा करून त्या जेव्हा बाहेर पडल्या .. त्या क्षणी मनात पहिला आलेला विचार ..मायबोली !

ह्या आधीही मी मायबोलीवरती रिपोर्ट कार्ड मिळाल्यानंतरच्या उत्साहात पळत पळत आलो आहे. अखिल भारतीय कविसंमेलनात कविता सादर केल्यानंतर म्हणा किंवा पहिला अल्बम रेकॉर्ड झाल्यानंतर म्हणा. मध्यंतरी मात्र ह्यात खंड पडला होता. वेळेअभावीच असे नाही म्हणणार . काही गैरसमजही होते . काही समज दृढ होत गेले होते . घर म्हटलं की ह्या सगळ्या गोष्टी आल्याच. परंतू कवितेशी निगडित प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीनंतर प्रकर्षाने मायबोलीची आठवण होणं अपरिहार्य आहे. मुळात मी कवी नव्हे. जे काही घडलं ते इथे आल्याने घडलं. मी इथून निघता निघता 'मेट्रन' नावाचा आयडीही घेतला होता . थोडा मनोरंजनासाठी म्हणा , थोडा काही नॉन इश्यूज सेट्ल करण्यासाठी म्हणा . काही काळ मजा आली , काही काळ आसुरी आनंदही मिळाला असावा. पण त्यात कायमस्वरूपी काही नव्हतं. जे लोक प्रत्यक्ष भेटले आहेत किंवा मेल, चॅट मधून बोलले आहेत त्यांच्यासोबत आत्मीयता अजूनही टिकून आहे. ज्यांना कधी भेटू शकलो नाही त्यांच्याबद्दल केवळ भेटण्याची उत्सुकता आहे. एवढंच खरं.

आता पुन्हा तसे रागलोभाचे , रुसव्याफुगव्यांचे बंध जुळण्याइतका मी निरागस राहिलो आहे की नाही कल्पना नाही पण प्रवासाच्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर , अगदी पूर्वीगत धावतपळत नाही आलो तरीही, मला हे रिपोर्ट कार्ड दाखवायला इथेच प्रथम यावसं वाटलं. पुढचं खरंच माहीत नाही. सर्वांना मन:पूर्वक शत शत धन्यवाद आणि शुभेच्छा !!!

क्षणभंगुर सारी माया , सारे मोह
आकंठ बुडावे असा एक ना डोह
नैमित्तिक इथले फुलणे , झुरणे , सुकणे
ही माती शाश्वत, बाकी सारे.. देह !!!

===============================================================================

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अभिनंदन!! लेख फारच सुंदर लिहीला आहे. सगळ्या भावना पोचल्या. Happy
पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा!

स्वाती आंबोळे ना अनुमोदक!
तुमचे अभिनंदन व पुढच्या वाटचाली साठी अनेक शुभेच्छा!

वैभव, अभिनंदन. Happy मनोगत फारच छान लिहिले आहे.

पुन्हा घेतली मी भरारी वगैरे
>>
मलापण आवडली होती ही एकदम. त्या ऑनलाईन मुशायर्‍यातल्या तुमच्या सगळ्या गझला भारी होत्या. कित्येक महिने झाले ऐकून, पण तरीही शब्द लक्षात आहेत.. पुन्हा सज्ज झाले शिकारी वगैरे.. Happy

प्रिय वैभव,
तुझा एक 'पंखा' म्हणून् .... एक सामान्य वाचक आणि श्रोता म्हणून ... कसंही पाहिलं तरी लेख नितांत वाचनीय आहे. तुझ्या साहित्यिक वाटचालीतले हे काही सुवर्ण-क्षण तू तब्बेतीने शब्दांकित केले आहेस. ती 'तबियत' हे तुझं सगळ्यात मोठ्ठं बलस्थान आहे. 'हे आपल्यात आहे' याची जाणीव होण्यासाठीसुद्धा काहीतरी अघटित घडावं लागतं .... एखादा अपघात, एखादा योगायोग, एखादा हादरा, एखादी शलाका अवचित चमकणं. तसं काहीतरी तुझ्या बाबतीत घडल्यावर तू कधी 'ते' थांबवू -रोखू शकला नाहीस. 'त्या'चे नित्यनवे आविष्कार उमाळ्यासारखे फुटत राहिले आहेत. आता हे घटित झालं आहे.
अल्बम, सिनेमा, टीव्ही-सीरियल अशा व्यापारी माध्यमातही सगळीकडे तुझ्या प्रतिभेचं मनःपूर्वक स्वागत झालंय. याचं श्रेय नशीबापेक्षाही तुझ्यातल्या प्रतिभेलाच आहे. नशीब नावाचा काही पदार्थ खरंच असतो का हा एक वादाचा विषय आहे [निदान माझ्यापुरता तरी], पण प्रतिभेचं तसं नाही. प्रतिभा स्वयंसिद्ध असते. वृत्त आणि छंद, गझलच्या व्याकरणाच्या मागण्या, मीटर, कडव्यांची संख्या, कुणीतरी ठरवलेली 'सिच्युएशन' , कुणीतरी आधीच ठरवलेली चाल, ह्या सगळ्या अडथळ्यांमधून प्रतिभेची शर्यत चाललेली असते. कुणाशी? स्वतःशीच. सुरुवातीला हे अडथळे म्हणजेच आव्हानं वाटतील, ते ओलांडण्यात एक 'थ्रिल' असेल, पुढे त्याची नशा चढेल. मग कालांतराने ते अडथळे वाटेनासे होतील, त्यांचे पांगुळगाडे होतील ... हे असलं काहीतरी विपरीत तुझ्या बाबतीत होईल का [कारण बहुतेक सर्वच कलाप्रकारात आणि कित्येक मोठमोठ्या कलाकारांच्या बाबतीत हे घडलं आहे -'मी जिंकलो! मी हरलो!!'] अशी वेडी शंका मनात येतेच. अर्थात तुझ्या बाबतीत तसं काही घडू नये हीच सदिच्छा. तू नेहमी जिंकतच रहा बाबा, कधीच हरू नकोस! आणि सर्वात महत्वाचं, जिंकणं आणि हरणं यातला फरक तुझा तुला सदोदित जाणवत राहो !! कारण, दुसरा कोणी - अगदी तुझा सगा-सोयराही - ते तुला सांगू- समजावू शकणार नाही.
बापू.

वैभवच्या जुन्या कविता शोधण्याच्या निमित्ताने बर्‍याच महिन्यांनी जुन्या मायबोलीवर जाणे झाले...
मागच्या २ वर्षांत खूप नवे मायबोलीकर आले आहेत. त्यांच्यासाठी आणि वैभवदादाच्या सर्व चाहत्यांसाठी ह्या त्याच्या जुन्या रचना -

टीपः ह्या फक्त काहीच कवितांच्याच links आहेत.. बाकीच्या कविता/चारोळ्या आपण सहज शोधू शकालच :). तसेच, निमित्त वैभवदादाच्या कवितांचे असले तरी अजून काही उत्तम कविता वाचायला मिळतील. so Enjoy!!! Happy

http://www.maayboli.com/hitguj/messages/119403/102780.html?1138875175
http://www.maayboli.com/hitguj/messages/119403/103163.html?1139412795
http://www.maayboli.com/hitguj/messages/119403/103786.html?1140686899
http://www.maayboli.com/hitguj/messages/119403/103979.html?1140880070 (बंदिनी - my fav)
http://www.maayboli.com/hitguj/messages/119403/104099.html?1141116349
http://www.maayboli.com/hitguj/messages/119403/94109.html?1136518990
http://www.maayboli.com/hitguj/messages/119403/94245.html?1136867549
http://www.maayboli.com/hitguj/messages/119403/94375.html?1137062423
http://www.maayboli.com/hitguj/messages/119403/102319.html?1137917667

http://www.maayboli.com/hitguj/messages/119403/116347.html?1158144579 (चांदणे - गझल)
http://www.maayboli.com/hitguj/messages/119403/116852.html?1158918436 (तळ)
http://www.maayboli.com/hitguj/messages/119403/117471.html?1160075494
http://www.maayboli.com/hitguj/messages/119403/117784.html?1160662484 (पोर्ट्रेट - आठवतंय, तेव्हा खूप आवडली होती)

इत्यादी, इत्यादी..
चला त्यानिमित्ताने त्या जुन्या दिवसांना उजाळा मिळाला...
श्यामली, बैरागी, स्वातीताई, सारंग, बापू, झाड, बी, चिन्नु, मिल्या, किरु, धुंदरवी, निरकुल (आता यातले सगळे ID अजून आहेत की तेच तेच repeat झालेत ते माहित नाही, आणि कोणाचा उल्लेख राहिला असल्यास क्षमा रे!! )... सगळ्यांना भेटलो पुन्हा.. Happy

अणि हो, वैभवच्या पुढाकरातून सुरू झालेल्या मायबोलीवरच्या गझल कार्यशाळेलाही नक्की भेट द्या... आमच्या सगळ्यांच्या (नव्या, कोर्‍या, कच्च्या इ इ ) गझल तिथे वाचायला मिळतील.
http://www.maayboli.com/karyashala

आणि जाता जाता,
या सगळ्या जुन्या कवितांच्या सोबत, "स्टार माझा"मधली विजेती कविता "डोह" वैभवच्या परवानगीने इथे पोस्टतोय...

: डोह :-
प्रत्येक डोहाचा तळ गाठायलाच हवा असं नाही
एखादा डोह असू द्यावा अथांग...
कुठल्याही क्षणी हक्काने जावं
आपलं प्रतिबिंबही पडणार नाही
अशा अंतरावर बसून बघत रहावं
आपण डोहाकडे ..
डोहाने आपल्याकडे
ना आपल्या चेह-यावर तृष्णा
ना त्याच्या पाण्यावर तरंग
मुळात अपेक्षाच नाहीत तर...
कसला अपेक्षाभंग
डोळ्यांनीच विचारावं त्याला
इतका स्थायी स्वभाव कुठून मिळाला
अन हलकेच, एखादं पान आपल्या दिशेने सरकवत
त्याने दाखवून द्यावं..
बरीच आंतरिक उर्मी आहे.. पण तळाला.
अशावेळी ते पान परत पाण्यात सोडून द्यावं.
हाती आलेला प्रत्येक पुरावा वापरायलाच हवा.. असं नाही
प्रत्येक डोहाचा तळ गाठायलाच हवा असं नाही
-- वैभव !!!
(१३.५.२००७, ००.५३)

ही एवढी लांबलचक पोस्ट चिकाटीने वाचल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद!
Happy

खुप खुप अभिनंदन वैभवआणि पुढच्या वाटचालीसाठी अगणीत अगणीत शुभेच्छा!!! Happy

कित्येकदा वैभवच्या कवितेवर "फारच सुंदर" , "अप्रतिम " "मस्तच" किंवा अस्ल्याच काय प्रतिक्रिया द्यायच्या दरवेळी असं वाटायच पण दुसरे शब्दच नसायचे प्रतिक्रियेसाठी

@ स्वाती हल्ली "निनावी" च्या कविताही मिसत्ये मी

अप्रतिम लेख वैभवजी!!

अभिनंदन आणि वाटचालीस मनापासून शुभेच्छा!!

ऑनलाईन मुशायर्‍यात आपल्या काही गझल तुमच्याच तोंडून ऐकायला मिळाल्या...निव्वळ अप्रतिम!! थँक्स टू "मिलींद छत्रे"...अर्थात "मिल्या"

अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा! आणि इथं हे सारं शेअर केलंत म्हणून खूप धन्यवाद. आता त्या गाण्याची प्रतीक्षा आहे. Happy

अभिनंदन गुरुजी ! एकदम कृतार्थ झाल्याचे फिलींग असेल ना ?
खुप आवडला हा लेख सुद्धा. तुमच्या कवितांप्रमाणेच आत जाऊन भिडणारा Happy

वर आनंदयात्री यांनी दिलेल्या लिंक्सपैकी 'पोर्ट्रेट' वाचली. खूप आवडली. बाकीच्याही वाचेन आता. Happy

बाकी, 'मेट्रन'ने जुन्या माबोवर बरीच धमाल उडवली होती असं दिसतंय.

अभिनंदन वैभव....
तुम्ही लिहित होतात ते गुलमोहराचे सुगीचे दिवस होते.... त्यानंतर गुलमोहर आजतागायत पुन्हा तसा बहरला नाही!
तुमच्या पुनरागमनाच्या प्रतिक्षेत....
-स्वरुप

तुमचे मनापासून अभिनंदन वैभव जी Happy
आमच्याबरोबर शेअर करून आम्हालाही तुमच्या आनंदात सामिल करून घेतल्याबद्दल आभार
आता भारतात कधी येते आणी कधी हे गाणे मिळवते असं झालंय..

वैभवजी, अभिनंदन व शुभेच्छा.
खर्‍या प्रतिभेला न्याय मिळाल्याचं पहाणं हाही एक कांहीसा दुर्मिळ पण निखळ आनंद !!

वैभव,
मनापासून अभिनंदन! आणि मायबोलीच्या माझ्यासारख्या सदस्यांना आशाताईंच्या रेक्~ओर्डिंग रूम मधे तुमच्या बरोबर नेलंत त्याबद्दल धन्यवाद.

तुमच्या बरोबर या गाण्याचा अनुभव घेताना ज्या नादात होतो त्यातून एका वाक्यानं ठेचकाळलो जरासा. तुमचं हे वाक्य "मुळात मी कवी नव्हे" वाचलं आणि म्हटलं अरे हे काय, माझ्या अनुभवाप्रमाणे तर तुमचं कवि-पण हे भूगर्भात वाहत असलेल्या झर्~यासारखं. कुणी तरी खणायचं निमित्त व्हावं आणि ते निर्मळ पाणी वाहातं व्हावं तसं मायबोली हे तुमच्या कविपणाला प्रकट करणारं निमित्त.

तुमच्या कवितेचा निर्मळ झरा असाच झुळझुळता राहो ही या प्रसंगी सदिच्छा.

-सतीश

Pages