हनुमानाचा शाप व त्यावर उतारा – भाग १

Submitted by रणजित चितळे on 18 November, 2010 - 22:42

प्रास्ताविक

प्रसिद्ध ब्रिटिश सेनांनी फील्ड मार्शल फिलिप चेटवुडच्या शब्दात थोडा बदल करून राष्ट्रव्रती कसा असावा हे थोडक्यात सांगतो -

आपल्या राष्ट्राची सुरक्षा, राष्ट्राचा सन्मान आणि राष्ट्राचे कल्याण - नेहमीच सगळ्यात आधी.

तद्नंतर आपल्या परिवाराचा सन्मान, परिवाराचे कल्याण आणि परिवाराची सोय.

स्वतःची सोय, स्वतःचे कल्याण व स्वतःची - सुरक्षा शेवटी, नेहमीच शेवटी.

हनुमानाचा शाप व त्यावर उतारा – पहिल्या भागात खालील निर्देशित मुद्द्यांवर चर्चा केली आहे.

हिंदू धर्म - विषय प्रवेश
मानवाचे अस्तित्व
त्या अस्तित्वाचे उद्दिष्ट – मानसिक प्रगती व उत्कर्ष
देश व राष्ट्रांची संकल्पना
राष्ट्राची विचारसरणी
राष्ट्रासमोर ठाकलेले महत्त्वाचे प्रश्न
राष्ट्राबद्दलची तळमळ

बहुतेक वेळा प्रस्तुत संकल्पना किंवा विचारसरणी मनाला पटेल अशी व आकर्षक वाटते पण ती अनुसरायची म्हणजे नक्की काय करायचे ह्या प्रश्नाचे उत्तर न मिळाल्यामुळे – वाचायला छान वाटते, अध्ययन करायला आवडते पण प्रस्तुत विचारसरणी रोजच्या जीवनात उपयोगात कशी आणायची असा प्रश्न पडतो.

आपण जेव्हा म्हणतो व ऐकतो की प्रत्येक हिंदू मनाला आपण हिंदू आहोत ह्याचा अभिमान असला पाहिजे हे महत्वाचे. तो योग्य तऱ्हेने प्रगट करता आला पाहिजे हे त्याहून महत्त्वाचे. हिंदू धर्माचा अभिमान बाळगणे व तो योग्य तऱ्हेने प्रगट करणे म्हणजे नक्की काय करणे? कारण हे जर स्पष्ट केले नाही तर लोकांच्या मनात आधी गोंधळ उडतो, नंतर संभ्रम उत्पन्न होतो व तद्नंतर आपल्या कृतीवरचा व धर्मावरचा विश्वास उडतो. काही लोकं मग वाटेल ते करून हिंदू धर्माचा अभिमान प्रगट करायला निघतात त्यात – प्रामुख्याने राष्ट्रीय संपत्तीची तोडफोड करणे, दारू पिऊन गणपतीच्या मिरवणुकीत धिंगाणा घालणे, आचार विचार सोडून वागणे, दुसऱ्यांशी उर्मटपणाने वागणे वा बोलणे इत्यादी गोष्टी प्रामुख्याने आढळतात.

भाग २ व ३ मध्ये राष्ट्रव्रताच्या दहा सूत्रांबद्दल लिहिले आहे. धर्मा बद्दल अभिमान बाळगणे म्हणजे नक्की काय करणे हे स्पष्ट केले आहे. ती दहा सूत्र अशी आहेत.

- आपल्या व आपल्या भोवतालच्या लहान मुलांना योग्य वळण लावणे व जागृत करणे, राष्ट्रव्रती बनवणे.
- अहंभाव कमी करणे.
- राष्ट्र सुधार कार्यात नेहमी अग्रेसर राहणे.
- लाचलुचपतीपासून व वित्तीय घोटाळ्यांपासून स्वतः दूर राहणे व दुसऱ्याला परावृत्त करणे.
- आपल्यातले कला, नैपुण्य सतत वाढवणे व छंद जोपासणे. शरीराला व्यायामाची सवय ठेवणे.
- कामाच्या चांगल्या सवयी लावून घेणे. तसेच कोणत्याही कामाची व काम करणाऱ्यांची उपेक्षा टाळणे.
- नीतिमत्ता व चांगल्या आचरणांचा सतत वापर करणे.
- टोकाच्या आवडी-निवडी टाळणे. छांदिष्टपण टाळणे व स्वतः बद्दलची कीव कमी करणे.
- दूरदर्शी बनायचा प्रयत्न करणे व स्वतःचे विचार उत्तम, उदात्त व उत्तुंग बनवणे.
- आपल्या धर्मातल्या चांगल्या नियमांचे पालन काटेकोरपणे करणे.

ह्या सूत्राचे बारकाईने वर्णन भाग २ व ३ मध्ये केले आहे. बऱ्याच वेळेला वाचणाऱ्यांना असे वाटेल की इतक्या बारकाईने वर्णन करायची गरज आहे का? मला स्वतःला वाटते आहे. आपला धर्म सोपा, आकर्षक व आकलनीय करण्यासाठी एवढ्या बारकाईची गरज आहे. कारण विचारसरणीचा गोषवारा माहिती असला तरी नेमके प्रत्येकाने कसे वागायचे हे स्पष्ट नसेल तर आधळीकोशिंबीरीचा खेळ ठरेल. माझी अशी विनंती आहे की

वाचणाऱ्यांनी हे विचारात घेऊन लेख वाचावा.

शेवटच्या भागात राष्ट्रव्रत घेण्यास कोण पात्र आहे, ते कसे घ्यायचे व ते घेतल्याने काय होईल ह्या संबंधाने रूपरेषा दिली आहे.

आपले राष्ट्र बलाढ्य, समृद्ध व कल्याणकारी करायचे असेल व ते तसे टिकवून ठेवायचे असेल तर पिढ्यापिढ्यांचा प्रयत्न सतत झाला पाहिजे. हे राष्ट्रबांधणीचे कार्य हा आपला राष्ट्रधर्म झाला पाहिजे, आपला स्वभाव झाला पाहिजे. राष्ट्रव्रताची अशी आपली संस्कृती निर्माण झाली पाहिजे. राष्ट्रव्रत हे प्रत्येकाने त्याच्या कुवतीला धरून घेतलेले पवित्र व्रत आहे. रामाच्या खारुटली प्रमाणे राष्ट्रबांधणी रुपी सेतू मध्ये घातलेले खारुटलीचे छोटे दगड आहेत. हे राष्ट्रव्रत आपल्या परिवाराच्या कल्याणाच्या आड न येणारे असे आहे. स्वतःवर ओझे न पाडणारे आहे, आपली गैरसोय न करणारे आहे आणि तरी सुद्धा राष्ट्रासाठी लागणारे सुकार्य आपल्या हातून घडवून आणणारे आहे.

तर मग केव्हा घेताय आपण राष्ट्रव्रत?

हनुमानाला मिळालेला शाप व त्यावर उतारा – भाग १

हनुमानाची गोष्ट अशी सांगतात की, जो पर्यंत त्याला त्याच्या शक्तीची कोणी जाणीव करून देणार नाही, तो पर्यंत त्याला स्वतःच्या शक्तीची जाणीव होणार नाही व स्वतःच्या शक्तीची जाणीव नसण्यामुळे तो त्याच्या शक्तीच योग्य उपयोग करू शकत नव्हता. त्याला ऋषींनी असा शाप दिला होता. किंबहुना त्याला माहीतच नव्हते की तो एका प्रचंड शक्तीचा धनी आहे. ही जाणीव करून देण्याचे काम जांबुवंताने केले. हनुमानाला कळून चुकले की तो शक्तिमान आहे व पुढे रामायण घडले.

सगळे धर्म तत्त्वतः चांगलेच असतात असे आपण लहानपणा पासून शिकतो. कोणताही धर्म मानव जातीचा उत्कर्ष कसा साध्य होईल ह्याचीच शिकवण देत असतो. त्यामुळे असा प्रश्न पडतो की सध्या जो हिंदुत्वाचा उद्घोष चालला आहे तो बरोबर आहे का? व त्याची गरज खरोखरीच आहे का? आपण सगळे येथे सामंजस्याने राहू, उगाच हिंदुत्वाचा प्रश्न उकरून जातीयवाद का निर्माण करा? व सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ह्याचा सामान्य माणसांवर काय फरक पडणार आहे? त्यांचे रोजचे सतावणारे प्रश्न सुटणार आहेत का?

ह्या सगळ्याचा विचार करायचा म्हणजे आपल्याला काही गोष्टींचा खुलासा करून घ्यावा लागेल. विचारवंतांचे व तत्त्वज्ञानी लोकांचे ध्येय हे सर्वांना सामावणाऱ्या व अस्तित्वात असलेल्या सगळ्या जीवसृष्टीला पोषक व समृद्ध करण्याचे असते. ज्ञानेश्वरांनी त्याच दृष्टिकोनातून देवाजवळ पसायदान मागितले आहे.

जोजे वांछेल तो ते लाहो। प्राणिजात सकळा।।

जो ज्याची इच्छा करेल त्याची प्राप्ती त्याला व्हावी. इथे इच्छा ह्याचा अर्थ भौतिक इच्छा नव्हे. ज्ञानेश्वरांना आत्म्याची परमोच्च प्रगती हा अर्थ अभिप्रेत आहे. ह्यालाच जिववाद म्हणतात व ह्याच साठी हे संतलोक आपला जीव खर्ची घालवतात. सर्व जिवमात्रांची अशा दृष्टीने प्रगती होण्यास जरूरीचे हे आहेकी ह्या जीवसृष्टीचे सगळे घटक सुदृढ झाले पाहिजेत. आपल्या सोयीसाठी ह्या जीवसृष्टींचा प्रमुख दोन गटां मध्ये भाग करू. प्राणिमात्र व मानव. एकूणच मानव व प्राणिमात्र ह्यांचे संवर्धन; जीवसृष्टीचे अस्तित्व व शारीरिक आणि मानसिक प्रगती, ह्या नियमांमुळे चालू असते.

जीवसृष्टीचे अस्तित्व हे निसर्गाच्या संतुलनावर अवलंबून असते. निसर्गाचा समतोल राखला जाणे किंवा निसर्गाचे संतुलन ह्याचे थोडक्यात विश्लेषण द्यायचे झाले तर, आपण आपल्या भूतलावरचा कोणताही जीव हा एकटा असा बघायचाच नाही. सगळी पृथ्वी हा एक जिवंत, जगणारा ग्रह आहे असे गृहीत धरले म्हणजे. ह्यातले प्रत्येक जीव हे स्वतंत्रपणे जगण्याचे नियंत्रण करत नाहीत, तर सर्व जिवमात्र मिळून त्यांच्या जगण्याने पृथ्वीच्या वातावरणाचे नियमन करत राहतात व पृथ्वीच्या वातावरणाचा फरक इथल्या जिवांवर साहजिकच पडतो. प्राणीमात्र व मानव हे दोन्ही घटक हा समतोल सतत सांभाळायच्या प्रयत्नात असतात. किंबहूना त्यांच्या नकळत ते होत राहते. असा प्रबंध प्रोफेसर लव्हलिक ह्या अमेरिकन शास्त्रज्ञानाने पुर्वीच मांडला आहे. आपल्या पृथ्वी वर २१ टक्के प्राणवायू आहे. जर तो, १५ टक्के असता तर कोणताही जीव जगू शकला नसता व प्राणवायूचे हेच प्रमाण जर २५ टक्के झाले तर, झाडांचे हिरवे बुंधे सुद्धा पेट घेतील. एवढेच काय पण आपल्या श्वासनलिका सुद्धा जळतील. प्राणवायूचे इतके नाजुक प्रमाण, कोट्यावधी वर्ष पृथ्वीची होऊनही कसे राहिले? हा विचारकरण्यासारखा प्रश्न आहे. प्रोफेसर लव्हलीक यांच्या मता प्रमाणे, हे संतुलन पृथ्वीवरच्या सगळ्या जीवसृष्टींच्या जगण्याने आपोआपच होत असते व जोपर्यंत अनैसर्गिकरीत्या आपण वातावरण बदलणार नाही तो पर्यन्त पुढेही होत राहील. ही झाली आपल्या अस्तित्वा बद्दलची ग्वाही व ह्या बाजूने इतक्यात काळजी करण्याचे काही कारण नाही.

दुसरी म्हणजे जिवमात्रांची शारीरिक व मानसिक प्रगती. प्राणिमात्रांचा प्रवास एका पेशींच्या जिवांपासून, मानवा सारख्या प्रगत जीवा पर्यन्त कसा झाला हे सर्वज्ञातच आहे. चार्लस् डार्वीन ह्यांच्या सर्व्हाइवल ऑफ द फिटेस्ट व प्रोफेसर लव्हलिक ह्यांच्या कारणमीमांसे वरून अजून एक गोष्ट आपल्या लक्षात येते, ती म्हणजे पुढे आताच्या मानवाच्यादृष्टीने प्रतिकूल असे आपल्या पृथ्वीचे वातावरण जरी बदलले तरीही नवीन वातावरणाला तोंड देऊन जिवंत राहू शकेल अशी एखादी नवीन मानवजात किंवा प्रजाती निर्माण होईल व ती, ह्या आपल्याला प्रतिकूल वाटणाऱ्या वातावरणात मोठ्या ऐषारामात राहील. अस्तित्व व शारीरिक प्रगती हे न थांबणारे स्रोत आहेत ह्याची काळजी संपली की मग येते मानसिक प्रगती. मानसिक प्रगती ही खऱ्या रूपाने जिवमात्रांमध्ये मानवालाच लागू आहे. तेव्हा आपण आतापासून मानवजातीचा विचार करूया.

मानवाचे अंतिम लक्ष्य, हे मानव जातीची मानसिक प्रगती करणे आहे. ज्ञानेश्वरांनी ह्याच ध्येयाचे प्रतिपादन त्यांच्या पसायदानात केलेले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मताने, आपण सगळे ह्या आखील मानवजातीच्या मानसिक उत्कर्षासाठी सतत खपले पाहिजे. आपली प्रत्येक कृती त्यालाच पोषक अशी असली पाहिजे. आपली वृत्ती अशीच सर्वव्यापी झाली पाहिजे. आपले प्रयत्न त्याच दिशेने नित्य नेमाने झाले पाहिजेत. ह्यालाच म्हणतात मानवतावाद.

शरीर सुदृढ व निकोप होण्यासाठी हे जरुरी आहे की, शरीराचे सगळे अवयव निकोप व बलवान असले पाहिजेत. म्हणजे जो शरीर सुदृढ होण्यासाठी झटतो, त्याने शरीराचे सगळे अवयव धष्ट पुष्ट होण्याची काळजी गेतली पाहिजे. तसेच, साऱ्या मानवजातीची प्रगती व्हायची असेल तर ती, ज्याने बनलेली आहे ते सगळे मनुष्य समूह समृद्ध झाले पाहिजेत. हे मनुष्य समूह म्हणजेच भूतलावर असलेले वेगवेगळे देश. हे शरीररूपी मानवजातीचे, देशरूपी अवयव आहेत. मग साहजिकच प्रत्येक देशावर जबाबदारी पडते की, त्या त्या देशाने स्वतःची मानवजात समृद्ध करण्याच्या दृष्टीने कार्यभाग सांभाळावा. महान इटालियन क्रांतीकारी नेता, जोसेफ मॅझीनी हेच सांगत आला आहे. ह्या विश्वात जन्म झालेल्या प्रत्येक प्राणिमात्रांचे विशिष्ट असे करायचे कार्य आहे. प्रत्येकाच्या शिरांवर कोणतीनाकोणती जबाबदारी असते. तीत्याने पारखून त्याप्रमाणे कार्य करायचे असते. हे त्याचे कार्य वाया जात नाही, आखील विश्वाचे कल्याण होण्यात त्या कार्याचा उपयोग होतो. अगदी तसेच देशांचे आहे. प्रत्येक देशाच्या वाट्याला मानवजातीची मानसिक प्रगती करण्यासाठी, ठरावीक जबाबदारी आलेली असते. ती त्या त्या देशाने पार पाडल्या वाचून गत्यंतर नसते. सगळ्या मानवजातीचे कल्याण करण्याचा मक्ता कोणा एका देशावर नसतो व तसे चालणार पण नाही. प्रत्येक देशाने आपले कार्य ओळखावे, पहिल्यांदा स्वतः समृद्ध व बलिष्ठ व्हावे मग इतरांना बरोबर घेऊन पुढे जावे. आता पर्यन्त आपण ह्या मनुष्य समूहांना देश असे संबोधत होतो. पण हा सर्वव्याप्त शब्द नव्हे. देश म्हणजे, मनुष्य समूहाने व्यापलेला विशिष्ट भौगोलिक परिसर. ह्याला जीव नसतो. कोणत्याही देशाला स्थिर अशी सीमा असते. देश स्वतः काही कार्य करणारा नसतो. फक्त कार्य करणाऱ्यां साठी जागा देतो.

ह्याच देशाला अर्थ देणारी, जिवंत करणारी, त्यात राहणारी अशी माणसे असतात. आता ही माणसे सगळ्या देशात सारख्याच विचारसरणीचा उच्चार व आचार करणारी असती तर मग ह्या देशांना काही अर्थ प्राप्त झाला नसता. पण तसे नाही होत. जे जे मनुष्य समूह विशिष्ट प्रकारची विचारसरणी आचरतात, ती विचारसरणी अंगिकारण्यास प्रबळ अशी कारणे असतात, जी विचारसरणी त्या त्या देशात राहाणाऱ्या मनुष्य समूहाने वर्षोंवर्षे जोपासलेली असते, जी विचारसरणी वर्षोंवर्षीच्या विचारमंथनातून निर्माण झालेली असते, जी विचारसरणी त्या त्या मनुष्य समूहांना मार्ग दाखवते, प्रगती करण्यास आत्मविश्वास प्रदान करते, जी विचारसरणी त्या त्या मनुष्य समूहांचे मनोबल वाढवते, कारण ती विचारसरणी त्या समूहाच्या वाडवडिलांनी अनुभवाने व गाढ विचारांनी सिद्ध केलेली असते. अशी विचारसरणी व तिचा अंगीकार करणारे लोकसमूह त्या त्या देशांना अर्थ प्राप्त करून देतात. तो देश जिवंत होतो. त्या देशाला राष्ट्र म्हणतात. देशाला सीमा असतात आणि त्याच सीमेत राहून राष्ट्र विकासाची परिसीमा गाठू शकतो. राष्ट्राला अधोगती नसते, प्रगती असते. कारण प्रगती फक्त जिवंत गोष्टीच करू शकतात. मग ते ते राष्ट्र जगात त्या त्या विचारसरणीमुळे ओळखले जाऊ लागते व स्वतःचे अस्तित्व बनवते. आपोआपच राष्ट्र ज्या विचारसरणीवर बनले आहे, त्या विचारसरणीवर, व ती अनुसरणाऱ्या लोकांवर, आपले राष्ट्र जर जिवंत व प्रगत बनवायचे असेल तर आपली विचारसरणी जोपासण्याची जबाबदारी येते. अशा विचारसरणीचा उच्चार केला पाहिजे, तिचा आचार केला पाहिजे. बहुतेक बलाढ्य राष्ट्रांनी हेच केले आहे व करत आहेत. जी राष्ट्र त्यांची विचारसरणी बदलण्याच्या मागे लागतात, त्या राष्ट्रातले लोक गोंधळलेल्या मनस्थितीत राहतात. आपोआपच प्रगती थांबते. रशियाची सध्या हीच द्विधा मनस्तिथी झाली आहे. कम्युनिझम सोडवत नाही आणि कॅपिटॅलीझम धरवत नाही. पाश्चिमात्य देशांमध्ये आयन रॅन्ड यांच्या कॅपिटॅलीझम ह्या विचारसरणीचा पगडा कायम आहे, आणि ही विचारसरणी ज्यापासून उद्भवली तो त्यांचा देश पण अबाधित आहे. पाया भक्कम आहे. लोक गोंधळलेली नाहीत. परिणाम स्वरूप, पाश्चिमात्य राष्ट्रांची प्रगती न थांबता होत आहे.

मग आपल्या राष्ट्राचीच अशी गोंधळेली परिस्थिती का. आपल्या देशाचा प्रवास समृद्धीच्या वाटेवर सुरू झाला आहे त्यात शंका नाही, पण त्याची गती बरीच संथ आहे. आपल्या राष्ट्राचा जीडीपी (GDP) जरी सातत्याने वाढत असला, व आपले उद्योग धंधे बाहेरील बाजारपेठेत जास्त नफा कमावायला लागले असले तरी ते किती नितीनीयमानूसरून व किती आपल्या सरकारी नियमांची भलावण करून पुढे जात आहेत ह्याचा विचार आपण करायला पाहिजे. बऱ्याच वेळा पैसा कमावायचा म्हणून प्रस्थापित नीतिमत्ता सुद्धा ठोकरली जाऊ लागली आहे. नीतिमत्तेला धरून पैसा कमावणे व काहीही करून पैसा कमावणे ह्यातला फरक फार थोड्यांना कळू शकतो व त्यांहून थोड्यांना त्याचे महत्त्व कळू शकते. नाहीतर हल्ली सगळ्यांनी गृहीत धरले आहे की, पैसा कमावण्यासाठी सरकारचे नियम आपल्याला पाहिजेतसे लाच देऊन वळवता येतात. ह्याला उद्योगपती – ‘सरकारी शिक्षण’ म्हणतात, किंवा मग मोठमोठाली कॉनफरनसेस आयोजित करण्यात येतात, त्यात हवे तसे कायदे बनवण्याच्या दृष्टीने पाउले उचलली जातात. त्याचा परिणाम – आपल्याला मिळणाऱ्या विविध निकृष्ट सेवेतून दिसून येतो. प्रसिद्ध उद्योगपती भारतरत्न जे आर डी टाटा यांनी किती मार्मिक टिप्पणी करून ठेवली आहे ते पाहा – "मला भारत आर्थिक दृष्ट्या बलाढ्य राष्ट्र नको आहे. मला भारत सुखी व समृद्ध राष्ट्र हवा आहे". एवढेच काय पण आपला दृष्टिकोन बऱ्याच महत्त्वाच्या बाबींवर स्पष्ट नाही. आपला राजकीय दृष्टिकोन पण त्यामुळे शीड उडालेल्या जहाजा सारखा झाला आहे.

- आपला शत्रू देश व त्याच्याशी आपला व्यवहार कसा असला पाहिजे ह्यावर आपले अजून एकमत नाही.
- समान नागरी कायदा व त्या संबंधातले धोरण कायम नाही.
- आपल्या देशाच्या सीमा अजून पूर्णपणे निश्चित झाल्या नाहीत. पाक व्याप्त काश्मीरवर आपण बोलू शकत नाही.
- काश्मीर जर भारताचा अविभाज्य भाग आपण मानत असू तर पीकिस्तान बरोबर काश्मीर मुद्द्यावर आपण का म्हणून बोलायचे? आपला देश, आपले राज्य त्यात आणखीन पाकिस्तान कोठून आले? बोलायचेच तर फक्त पाक व्याप्त काश्मीरवर बोलायला पाहिजे. ‘काश्मिरीयत’ पाहिजे असे अजून सुद्धा म्हणणारी मंडळी येथे सापडतात.
- हिच गोष्ट अरुणाचल प्रदेश बद्दल. चीन आपला मित्र आहे की शत्रू राष्ट्र आहे हे अजून आपल्याला ओळखायचे आहे.
- आपल्या देशासाठी काय बरे व काय वाईट हे आपण ठरवणार का जगाचे बलाढ्य आंतरराष्ट्रीय उद्योग ठरवणार – हा अजून संभ्रम आहे आपल्याकडे. भोपाळ वायू गळती मुळे हजारो लोक मेली पण कोण्या एकाच्या अमेरिकेहून आलेल्या दूरध्वनी वरून अँडरसन महाशयांना चार्टर विमानाने अमेरिकेला परत पोहचविले जाते. ह्या वरुनच आपली विचारशक्ती किती गोंधळलेली आहे हे दिसते.
- आपल्याला जो इतिहास शिकवला जातो तो आपण पारखून घेतला पाहिजे. त्या संबंधाने आपले धोरण ठरवणारी कोणतीही संस्था अजून नाही.

आपली विचारसरणी एवढी प्रखर असताना, आपल्या पूर्वजांनी भरभक्कम तत्त्वांवर आधारलेल्या विचारांचे देणे आपल्या पदरात घातले ते फक्त जाहिरातींवर दाखवण्यासाठीच आहे काय? ती अनुसरायला आपण लाजतो का?

आपल्या देशाने ‘सेक्यूलॅरीझम’ (सर्व धर्म समभाव) अंगिकारला आहे, पण त्याला अजून जाणीव झालेली दिसत नाही की हा - सर्व धर्म समभाव ज्या विशिष्ट विचारसरणीचा भाग आहे, जी विचारसरणी भारताला ज्ञात अशा ५००० वर्षा पासून मिळालेली आहे, जी विचारसरणी आपल्या पूर्वजांनी आचरून आपला देश समृद्ध केला होता, ज्या विचारसरणीचे आजही भारतात ८० टक्के सदस्य आहेत, असा जो हिंदू धर्म आहे, त्याचाच ‘सेक्यूलर’ हा अर्धवट लचका तोडून त्याला सजवून ठेवलेला भाग आहे. मग लचका तोडलेला भाग का घ्यायचा, सगळीच्या सगळीच विचारसरणी अंगीकारुयाना. गणित शिकायचे तर पाढे म्हणायची लाज का आपल्याला. आपल्या पूर्वजांनी हिंदू विचारसरणिरूपी पक्वान्नाचा घास आपल्या तोंडाशी आणून ठेवलेला असताना, आपण गिळायचा कंटाळा का करावा. आपण आपल्या देशाचे भाग्य समजायला हवे की आपल्याला सगळ्या विचारांचे सार तयार मिळालेले आहे. कोणा देशांसारखे विचारांचे दारिद्र्य आपल्याकडे नाही मग हा करंटेपणा कसला का सुचला आपल्याला. ओरपूया ते विचारसरणी रुपी अमृत.

हिंदू धर्म अनुसरणाऱ्यांनी ही जबाबदारी आपणहून घ्यावी – भारताच्या प्रत्येक नागरिकांवर ही जबाबदारी आपोआपच पडते की ते भारताच्या प्रगतीचे प्रहरी ठरो. सावरकरांच्याच शैलीत बोलायचे म्हणजे – आपला भारत, सांस्कृतिक दृष्ट्या जगाला मार्ग दाखवणारा व्हायला हवा व अशा भारताला शिरोग्राह्य बनवण्यासाठी हिंदू लोकांनी स्वतःहून प्रयत्न केले पाहिजेत. भारत अग्रेसर बनवण्यात आपल्याला कधी यश मिळेल? असे कोणते लोक जबाबदारीने पुढे येऊन काम करतील?

ज्यांना भारत खरोखरच बलाढ्य व समृद्ध देश व्हावा, ज्यांना हे घडायला हवे ह्याची तीव्र कळकळ आहे, ज्यांची देशासाठी झटण्याची तयारी आहे, जे स्वतःचा उत्कर्ष भारताच्याच उत्कर्षात बघतात, त्यांच भारतीयांकडून भारताची प्रगती होणार आहे. तेच लोक भारताचे खङगहस्त बनण्यास पात्र आहेत. तेच नेते आहेत व तेच जेते ठरणार आहेत. पण ही अशी प्रबळ इच्छा लोकांच्या मनात उत्पन्न कशी होणार. की जेणे करून ही इच्छा अस्वस्थ करणाऱ्या कळवळीला जन्म देईल व त्याच अस्वस्थ करणाऱ्या कळवळीच्या पोटी देशासाठी झटण्याचा मनोनिग्रह निर्माण होऊन लागणारा आत्मविश्वास प्रदान करील व जेणे करून, अशा प्रबळ इच्छेची व त्या इच्छेतून, प्रचंड प्रमाणात काम करणारी अशी न संपणारी मानवी साखळी तयार होईल, व हळूहळू भारतात राहणाऱ्या प्रत्येकाचे मन ह्या लाटेने चिंब भिजून, आपल्या देशासाठी कोणतेही काम, माझे स्वतःचे काम आहे व मी ते मन ओतून करीन असे वाटायला लावणारी तळमळ व तसे काम करणारे लोकसैन्य निर्माण होईल. हे कधी होईल? हे कसे होईल? हे होईल का?

(क्रमशः)
http://bolghevda.blogspot.com (मराठीतुन)
http://rashtravrat.blogspot.com

गुलमोहर: 

इतका सुरेख लेख अजुन दुर्लक्षीत कसा राहीला?
धन्यवाद रणजितजी Happy

फार छान लेख.. पुन्हा पुन्हा वाचण्यासारखा , विचार करायला लावणारा
आवडत्या दहात गेला.. आता पुन्हापुन्हा वाचता येईल Happy

छान लेख आहे. मला वाटते ह्याचे कारण आपल्या विचारसारणीत आहे. शिवाजी सोडला तर आपले राज्य वाटते असा कोणता राजा आपल्याकडे येवून गेला? संभाजीला आपण बदनाम केले. त्या दोघान नंतर महाराष्ट्र १९ वर्ष लढला. त्यानंतर पुन्हा स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लोक लढली पण राज्य करते अत्यंत नाकर्ते निघाले. आणि आपण आपला मतदानाचा हक्क पण बजावत नाही बरोबर. सगळीकडे नुसती बजबजपुरी माजली आहे. शिवाय सामान्य जनता पण काही कमी नाहीये. आपण सध्या सध्या गोष्टीत पण नियम पळत नाही. ना वाहतुकीचे किंवा आपले घर सोडले तर बाकीच्यांच्या घरात सरळ कचरा लोटणारी शिक्षित मनसे मी स्वतः पहिली आहेत. मग काय होणार. सध्या मेडिया पण वेडापिसा झाला आहे. लोकसत्ताकार केतकर येता जाता संघाला आणि भाजपला शिव्या घालतात त्या बऱ्याच अंक्शी योग्य पण आहेत पण सोनिया आणि मनमोहन वर एक शब्द लिहीत नाहीत. असले लोक असल्यावर मग तारतम्य कसे काय राहील. मुळात आपण आपल्या भाषेतून शिकत नाही आणि आपल्या कडे जे दयान आहे ते कमी प्रतीचे मानतो. विचार करताना सगळे पाशिचीमेकडे आहे ते चांगले असेच आपल्याकडे शिकवले जाते त्यातुने हेतुपुरस्सर आणि बऱ्याच अंशी आहेतुपुर्स्सार आपली विचार शक्ती लोप पावली आहे. मग एखादे दुसरे आमटे आणि बंग किंवा अनिल अवचट ह्यांसारखे लोक एकांडे शिलेदार होवून लढतात पण सामान्य जनतेला सरकारी लोक इतके पिलावून काढतात कि त्यांची हिम्मतच होत नाही. न्याय्संथा पण तसलीच. एक निर्णय धड नाही. मग लोक कशाला देशासाठी काय करतील. ते स्वतःचेच पोट कसे भरेल ते बघणार. ज्यांना आर्थिक उदारीकरणाचा फायदा झाला ते बाकीच्यानाकडे बघायला तयार नाहीत.
अवघड स्तीथी आहे. पण हेही दिवस जातील आणि हळू हळू जनता विचार करू लागेल अशी आशा आहे.

अरे काय जबरदस्त लेख आहे. खूपच विचारप्रवर्तक. मला वाटत टायटल वरून कळत नाही की हा लेख कशाबाबत असेल. रणजीत, थँक यू.

खरोखरच विचारप्रवर्तक लेख..सुरुवातीला वाचत जाताना मला असे वाटले की झाले आता यावरून जोरदार गदारोळ उडणार..पण जसे जसे पुढे वाचत गेलो तसे त्यातली कळकळ जाणवली...
खरंच, प्रत्येकाने आपल्या मनाला विचारायचे हे प्रश्न आहेत...
आपला देश आपला देश म्हणत आपण रहातो..पण आपण काय करतो...
यात दिलेले सगळेच्या सगळे सोडा काही नियम तरी पाळतो का नाही याबाबत शंका आहे....आणि मग नुसती वांझोटी काळजी...आपल्या देशाचे काय होणार...
असे म्हणायला पाहीजे आपल्या या अशा वागण्याने आपल्या देशाचे कसे होणार....रणजितभाऊ फारच सुंदर लिहीले आहे तुम्ही...

आणि भावनेच्या भरात म्हणून नाही पण विचारांती म्हणतो आहे की यातले नियम पाळण्याचा मी प्रयत्न करेन आणि इतरांना प्रवृत्त करेन.

धोरण व कृती या दोन्ही पातळ्यांवर आपण गोंधळलेलो आहोत हे मान्यच आहे पण आपण जी लोकशाही गणतंत्राची घटनात्मक चौकट आखली आहे तिचेचे हे व्यवच्छेदक लक्षण नाही काय? एकतंत्री धोरण व कृती हुकूमशाहीची लक्षणे आहेत.
आपला शत्रु देश व त्याच्याशी आपला व्यवहार कसा असला पाहीजे ह्या वर एकमत अजुन नाही.,- समान नागरी कायदा व त्या संबंधातले धोरण कायम नाही.>>> नक्की काय 'एकमत' अपेक्षित आहे?

@रणजित चितळे, आपला लेख छान आहे,अभ्यासपूर्ण आहे,आपण राष्ट्र्वतीची मार्शल फिलीप चेतवूड च्या शब्दांत थोडा बदल करून केलेली व्याख्याही आवडली.सावरकरांचे वाक्य 'आपण अखिल मानव जातीच्या विकासासाठी झटले पाहिजे' हेही खरेच आहे. आपण राष्ट्रवतीची जी दशसुत्री मांडली आहे,तिचाही नवीन पिढीच्या भवितव्यासाठी विचार व्हायला हवा.मात्र तरीही काही मुद्दे खटकले,ते प्रांजळपणे मांडण्याचा प्रयत्न करीत आहे.
१)सर्वधर्मसमभाव-जी विचारसरणी आमच्या पूर्वजांनी आचरून हा देश समृध्द केला...सेक्युलर हा त्याचाच एक लचका वगैरे.
२)आपण हिंदू धर्माविषयी अत्यंत आग्रही वाटलात.
हे मुद्दे मला खटकले कारण आपल्या हिंदू धर्मात सर्वधर्मसमभाव खरोखर अस्तित्वात होता का? याविषयी आपण सारेच जाणून आहोत.श्रुती,स्मृती,वेद पुराणे यांचा कालावधी कितीही ताणला तरी,तो ५-७००० वर्षांपेक्षा जास्त नाही,या विषयी आपण माझ्या मताशी सहमत व्हाल.मनुने वर्ण्यव्यवस्था निर्माण केली आणि तेव्हापासून आजवर वर्ण,जाती,पंथभेद पाळले जात आहेत.स्वातंत्र्यानंतर बदल इतकाच झाला आहे की हे सर्व भेद आता मनातून पाळले जातात.प्रत्येकाने आपल्या धर्माविषयी अभिमान बाळगावा याविषयी मला काहीही म्हणावयाचे नाही(मीही हिंदूच आहे).धर्म ही एक जीवनपद्धती मात्र आहे,एका विशिष्ट मानवी समुहासाठी एक तर दुसऱ्या मानवी समुहासाठी दुसरी याप्रमाणे अनेक जीवनपद्धती पूर्वीपासून अस्तित्वात आहेत.आणि एखाददुसरा अपवाद सोडल्यास या 'धर्म' नावाच्या जीवनपद्धतीने त्या-त्या धर्मातील दुर्बल घटकावर सतत अन्यायच लादला आहे. धर्म ही संकल्पना जरी समाजाच्या धारण-पोषण-नियमनासाठी बनविली गेली असली,तरी माझ्या मते कोणताही धर्म सर्वकाळ समाजाचे धारण करू शकत नाही.काळानुसार त्यात बदल करणे अपरिहार्य ठरते.आज भारत हा स्वतंत्र,सार्वभौम देश आहे.आपली राज्यघटना-आपले संविधान जे नैसर्गीक न्यायतत्वे आणि मानवतेवर आधारित आहे, हीच भारताची जीवनपद्धती आणि 'धर्म' का मानू नये?
आता हिंदू शब्दाविषयी थोडेसे- १)हिंदू हा शब्द 'इंडस व्ह्याली' अर्थात सिंधू खोऱ्यातील लोकांसाठी वापरण्यात आलेली संज्ञा आहे.ही संज्ञा परकीय लोकांनी उपहासात्मक दृष्टीने वापरली होती.ज्याचा तत्कालीन अर्थ(परकीयांच्या लेखी) चोर,डाकू,असा केला जात होता.
२)हा शब्द रामायण ,महाभारतात आढळत नाही.तो त्याच्या खूप अलीकडचा आहे.
३)मनूच्या काळापासून हिंदू नव्हे तर वेदिक धर्म अस्तित्वात होता.
४)पहिल्या शतकाच्या आसपास हिंदू ही संज्ञा 'धर्म' या अर्थाने वापरली जाऊ लागली.पण त्यास प्रकट असे स्वरूप नव्हते.
५)आठव्या शतकाच्या आसपास शंकराचार्यांनी मूळ वेदिक धर्मास 'हिंदू' शब्द दिला आणि खऱ्या अर्थाने हिंदू धर्माचा प्रवास सुरु झाला.
६)हे सारे(थोडे किरकोळ विषयांतर करूनही) सांगण्याचे कारण हिंदू किंवा कोणत्याही धर्मावर टीका करण्यासाठी नसून ऐतिहासिक तथ्ये मांडण्यासाठी आहे.कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये.
धर्म ही काळ,देश,समाज,व्यक्तिगणिक बदलणारी गोष्ट आहे.त्यातील चांगले बदल सकारात्मक दृष्ट्या स्वीकारून आपण पुढे जायला हवे.जातीधर्माचे विष आपल्या भारताच्या पुढच्या पिढ्यांत पाझरणार नाही,याची विशेष काळजी आपण घ्यायला हवी.त्यासाठी प्रत्येकाने सुरुवात स्वतःपासून करायला हवी. धन्यवाद.

लेख चागला आहे. माज्या मते मतदानाची सक्ती जर सरकारने केली तर काही फरक पडेल का?....हा १ उपाय कसा वाटतो?.....

डॉ साहेब - आपल्याला नम्र अभिवादन - आपला प्रतिसाद वाचला खुप आवडला. प्रत्येक मुद्दा पटला - त्यात न पटण्या सारखे काहीच नाही. अगदी चपखल पणे हिंदू धर्मावर त्यात जे निगेटीव्ह पॉइन्टस आहेत ते आपण दाखवलेत. तसेच हिंदू ह्या नावाच्या उत्पत्ती बद्दलचे जी विधान केलीत ती पण पूर्ण पणे मला पटतात. एकाच गोष्टीत थोडा माझ्या विचारात (आणि माझा विचार पूर्ण पणे चूकीचा असू शकतो - तो एखाद वेळेस अजून काही वर्षांच्या अनूभवाने माझ्या लक्षात येईलही) व आपल्या विचारात बदल आहे.

ह्या सगळ्याचा विचार सगळ्यात पहिल्यांदी http://rashtravrat.blogspot.com/2010/05/rashtravrat.html
येथे केला आहे. इंग्रजी मध्ये लेख आहे.

ह्या सगळ्याचा विचार २, ३ व ४ भागातून केला आहे.
१. - सेक्यूलर लचका वगैरे - ४ थ्या भागात ह्याच बद्दल थोडक्यात लिहीले आहे.............. ह्याच संकल्पनेतुन “सर्व भुत हीत” हे ब्रिद वाक्य आपल्या धर्माने आपल्याला दिले आहे. तसेच बृहदअरण्यक उपनीषदात सर्व सुष्टीला उद्देशुन केलेली सर्वेपिसुखिनःसंतु । सर्वेसंतु निरामया। सर्वेभद्राणी पश्यंतु। मा कश्चीत् दुःखमाप्नुयात। (१.४.१४ बृहदअरण्यक) अशी प्रार्थना आढळेल. ही प्रार्थना सर्व सृष्टीला लागु आहे. तसेच “सर्व भुत हीतार्थ” (भगवद्गीता, १२ अध्याय, ४ श्लोक) ही संकल्पना हल्लीच्या “सर्व धर्म समभाव” ह्या पेक्षा प्रगल्भ आहे. “सर्व भुत हितार्थ” ही संकल्पना सर्व धर्मांना सामावुन घेतेच पण त्या ही पुढे जाउन सगळ्या प्रकारच्या विचारसरण्यांना सामावून घेते, नास्तिक लोकांना सामावून घेते, जिवंत गोष्टी व त्या पेक्षाही पुढे जावून अजिवीत गोष्टीना सुद्धा सामावुन घेते. एवढेच काय आपली पुथ्वी ही सा-या सृष्टीचा एक घटक समजुन सा-या सुष्टीचा येथे विचार असतो. व त्या सर्वांचा उत्थान ह्या संकल्पनेत केलेला आढळतो. आपली “वसुधैव कुटुंबकम्” ही संकल्पना आजच्या “ग्लोबल व्हिलेज” पेक्षा फार पुर्वीची व सर्व समावेशक आहे. http://www.maayboli.com/node/21790

२. - मी हिंदू आहे व मराठीतून हा लेख मी जास्त करून आपल्या मराठी भाषिक व हिंदूं वाचिकांसाठी लिहीला आहे. आपण जन्माने हिंदू जन्माला आलो. आपले जसे नाव पाडले गेले तसे आपला धर्म पण आपल्या आई वडलांनी सांगितला प्रत्येक धर्म मुलतः चांगलेच असतात असे मानून मी जरी हिंदू धर्मात कालांतरानी ब-याच कमिया आल्या असतील तरी तो चांगला करून आचरण करण्यात मला सुज्ञपणा वाटतो - दूसरा धर्म अंगिकारण्या पेक्षा. कारण त्यात सुद्धा काही कमिया असतीलच. म्हणून हिंदू धर्मा बद्दल लिहीले आहे. पण http://rashtravrat.blogspot.com/2010/05/rashtravrat.html
ह्या लेखात हिंदू धर्मा बद्दल गोषवारा दिला आहे पण एवढा हिंदू धर्मा बद्दल आग्रह नाही.
................धर्म ही एक जीवनपद्धती मात्र आहे,एका विशिष्ट मानवी समुहासाठी एक तर दुसऱ्या मानवी समुहासाठी दुसरी याप्रमाणे अनेक जीवनपद्धती पूर्वीपासून अस्तित्वात आहेत.आणि एखाददुसरा अपवाद सोडल्यास या 'धर्म' नावाच्या जीवनपद्धतीने त्या-त्या धर्मातील दुर्बल घटकावर सतत अन्यायच लादला आहे. धर्म ही संकल्पना जरी समाजाच्या धारण-पोषण-नियमनासाठी बनविली गेली असली,तरी माझ्या मते कोणताही धर्म सर्वकाळ समाजाचे धारण करू शकत नाही.काळानुसार त्यात बदल करणे............................

हो आपल्या धर्माला हळू हळू बुरशी लागून अत्यंत अन्याय आपल्याच धर्मातल्या दूर्बलांवर झाला. म्हणूनच आपल्याला देश काल पात्रा प्रमाणे त्यात बदल करायला हवा. भाग ३ मध्ये ह्या बद्दल लिहीले आहे -

आपले धर्मनिर्देश, आपली धर्म शास्त्रे, घालुन दिलेली धर्म सुत्रे ही आपल्या पुर्वजांनी त्यांच्या अनुभवातुन समाजात आनंदाने आयुष्य जगण्याच्या दृष्टीने दिलेली आपल्याला एक दिशा आहे. ह्या नियमांचे पालन केल्याने आपल्याला आपल्या आत्म्याची प्रगती होण्यास मदत होते. आपली चित्तशुद्धी होते, सचेतन बुद्धी वाढीस लागते. धर्म निर्देश, शास्त्रे, सुत्रे, व्रत, वैकल्ये ही सगळी स्वतःचे मन व आजुबाजुचे वातावरण प्रसन्न बनवण्याच्या हेतुने तयार केली होती व तशी बंधने घातली गेली होती. सामाजिक सौहार्द्रता व समरसता टिकवुन ठेवण्याच्या दृष्टीकोनातून तयार केली गेली होती. त्याला देश, काल पात्राच्या मर्यादा होत्या व अजुनही आहेत. त्या मुळेच प्रत्येकाने हल्लीच्या काळी ही सुत्रे विचार करुन अमलात आणली पाहीजेत. आजच्या देशाच्या गरजा, कालाच्या मर्यादा व पात्रता ह्याचा विचार करुन प्रसंगी त्या सुत्रात यथार्थ बदल करुन त्या त्या सुत्रांचा, व्रतांचा व धर्मनिर्देशाचे पालन केले पाहीजे.

..................आज भारत हा स्वतंत्र,सार्वभौम देश आहे.आपली राज्यघटना-आपले संविधान जे नैसर्गीक न्यायतत्वे आणि मानवतेवर आधारित आहे, हीच भारताची जीवनपद्धती आणि 'धर्म' का मानू नये?

येथे थोडा विचारात बदल आहे - मला असे वाटते की माणसाला चांगल्या जिवन शैली (भौतिकवाद) बरोबरच आधीभौतीक किंवा पारमार्थिक उत्कर्ष आभिप्रेत आहे व राज्य घटना ही पारमार्थिक उत्कर्ष देण्यास तोकडी पडते व म्हणून धर्माचे अधिष्ठान मानवाच्या जिवनात कधीच जाणार नाही असे मला वाटते (कोणच्या तरी नावाने किंवा रुपाने तो कोणच्या तरी धर्माचा सदस्य असतो त्याच्या कळत किंवा नकळत. मी येथे स्पिरीच्युअल उत्कर्ष म्हणत आहे).
शेवटी मी येथे एका पर्शियन कवीची कवीता देतो -

I died a mineral and became a plant.
I died a plant and rose an animal.
I died an animal and I was man.
Why should I fear? When was I less by dying?
Yet once more I shall die as a man, to soar
with the blessed angels; but even from angel hood
I must pass on. All except God perishes.
When I have sacrificed my angel soul,
I shall become that which no mind ever conceived.
O let me not exist! For Non-Existence proclaims,
“To HIM we shall return”

Jalal ud-Din ar-Rumi– A thirteenth century Persian poet.

डॉ साहेब आपण वेळ काढून लेख वाचलात व त्यावरचे आपले संशोधन पूर्ण विचार वाचून मला खूप बरे वाटले.

सर्व भूत हितार्थ
सर्वेपि सुखिन: सन्तु
वसुधैव कुटुंबकम ....हे सारे मनाला पटते पण ते प्रत्यक्षात आचरणात आणले गेले नाही.काही धर्म मार्तंडांनी आपल्या संस्कृतीला कर्मकांडात बंदिस्त करून टाकले.मूळ संहितेतील दोष तसेच ठेवून,संहितेत जे काही चांगले होते,त्याचीही वाट लावून टाकली.नवीन बदल स्वीकारले गेले नाहीत,कारण तो या लोकांच्या मुळावरच घाव बसला असता.
कोणत्याही धर्माने किती लोकांची पारमार्थिक प्रगती झाली,हा संशोधनाचा विषय आहे.अशी नावे हाताच्या बोटावर सांगता येतील,इतकीच आहेत.इथे मी ज्ञात इतिहासाबद्दल बोलत आहे.उदा. सिद्धार्थ गौतम,स्वामी विवेकानंद,गांधीजी(होय,मी यांना योगी मानतो)अशीच आणखी दोन-चार नावे असतील. माझा प्रश्न असा आहे की केवळ मानवतेचे पालन केल्याने अध्यात्मिक प्रगती,आणि मोक्षाप्रत जाणे शक्य नाही का?त्यासाठी 'धर्म' नावाच्या वेगळ्या संकल्पनेची खरोखर आवश्यकता आहे का?
आपण माझी प्रतिक्रिया समजून घेऊन प्रतीसाद दिलात ,निकोप चर्चा केलीत ,त्याबद्दल मी आपला आभारी आहे,कारण असे मुद्दे आपसात सामंजस्य नसेल तर ते वितंडवादाकडे ओढून नेतात.धन्यवाद.

" आपल्या राष्ट्राची सुरक्षा, राष्ट्राचा सन्मान आणि राष्ट्राचे कल्याण - नेहमीच सगळ्यात आधी.तद्नंतर आपल्या परिवाराचा सन्मान, परिवाराचे कल्याण आणि परिवाराची सोय.स्वतःची सोय, स्वतःचे कल्याण व स्वतःची - सुरक्षा शेवटी, नेहमीच शेवटी. "

हा धागा टाकला व आत्ता जून २०१४ यात अनेक वर्षांचे अंतर पडले आहे. वरील वाक्यातील मतितार्थ सध्या मोदींच्या वक्तव्यांचा व कर्तेपणाचा सार भाग आहे.
एका अर्थाने असा निस्पृह व कार्यक्षम नेता भारताला पंतप्रधान म्हणून लाभला आहे. त्यामुळे आधीच्या प्रतिसादातील निराशा व उद्विघ्नता आता दूर जाताना दिसते. अर्थात अजून बराच काळ लोटला की परिस्थितीच्या रेट्यातून मोदी व त्यांचे सरकार कसे ताऊन सुलाखून निघते यावर बरेच अवलंबून आहे.