कुलंगशी कुस्ती ..... अन माबोसंगे मस्ती....

Submitted by रोहित ..एक मावळा on 23 October, 2010 - 07:44

नमस्कार मायबोलीकरहो,
कुलंगला येणार का ? म्हणुन दगडांच्या राजाचा संदेश आला.आम्ही लगोलग होकार कळवला.या आधी ट्रेक केलेत पण तसा मायबोलीकरांबरोबरचा हा माझा पहिलाच ट्रेक.या आधी कुणा माबोकरांना व्यक्तिशः ओळखत नव्हतो.या निमित्ताने नवे मित्र मिळतील.तसच निसर्गाची जवळीक साधायची हि संधी कशी वाया जाऊ देणार.मायबोलीवर दबंगप्रमाणे कुलंगचा फिवर चांगलाच चढला होता.शेवटी तो दिवस उगवला १ ऑक्टोबर २०१०.रात्री शेवटची कसार्‍याला जाणारी लोकल पकडायची होती.ट्रेकिंगला लागणार्‍या सर्व साहित्याची झोळी पाठिला लटकवुन ठाणे स्टेशनला पोहोचलो.तेव्हा साडे-बारा वाजले होते.कसार्‍याची तिकिट (प्रवासी भाडे : १९ रु)काढले.हातात मायबोलीचा झेंडा घेऊन उभा असलेला प्रणव कवळे नावाचा एक माबोकर ठाण्याला भेटला.प्रणवला सारखी धाकधुक वाटत होती की पोलीस आपल्याला पकडतील कि काय ?....अयोध्येचा निकाल आताच लागला होता ना म्हणुन..(मंदिर वही बनाएंगे).तेवढ्यात सुन्या चा फोन आला ( जे पुण्याहुन येणार होते ) कि तिकिट काढुन ठेव आम्ही ठाण्याला पोहोचतोय.पण ट्रॅफिक मध्ये अडकल्या कारणाने ते वेळेवर पोहोचु शकले नाहीत. मी आणि प्रणव नी १:१० ला कसारा ट्रेन पकडली.आधीच ट्रेनमध्ये बसुन आलेले मायबोलीकर यो रॉक्स्,विनय,इंद्रा,गिरिविहार,प्रगो यांची ओळखपरेड झाली.कल्याणला प्रताप आम्हाला जॉइन झाले.कल्याण सोडल्यानंतर गारवा जाणवु लागला.येथे एव्हढी थंडी तर गडावर काय ? या कल्पनेनेच हुडहुडी भरली.

अशातर्‍हेने आम्ही आठ शुरवीर मुंबईहुन कसार्‍याला पोहोचलो.तेव्हा पहाटेचे साडेतीन वाजले होते.पुण्याचे मायबोलीकर प्राव्हेट टॅक्सी करुन येत होते.ठरलेल्या जीपने आम्ही पुढे रवाना झालो.थोड्या वेळाने 'बाबा दि ढाबा' ला उतरलो.चहा चे फर्मान सोडले.प्रवासाने थकलेले पुणेकर थोड्या वेळाने आले.मुंबई आणि पुण्याच्या माबोकरांची (सुन्या,हबा,किश्या,मल्लि,सुकी) भरतभेट झाली .आता येथे भरत कोण म्हणुन विचारु नका.चहा नाश्ता झाल्यानंतर आम्ही कुलंगसाठी कुच केले.

जीपमध्ये कोंबलेल्या आमच्या झोळ्या(सॅक्स) आणि आम्ही १३ मायबोलीकर दीड तासाच्या प्रवासानंतर आंबेवाडी गावात पोहोचलो.तस आंबेवाडीला राजुरहुन एस.टी सुटतात.एस.टी ने जायच असल्यास कसारा-घोटी-राजुर मार्गे आंबेवाडीला पोहचु शकतो.आम्ही गावात पोहोचलो तेव्हा मुक्कामी एस.टी परत राजुरला चालली होती.

कसारा-घोटी-आंबेवाडी-कुलुंगवाडी मार्ग (आतंरजालावरुन साभार)

गावाला नुकतीच जाग आली होती.पहाटेचे ते धुंद वातावरण बघुन प्रवासाचा सगळा क्षिण निघुन गेला.मस्त एकदम प्रसन्न वाटत होते.क्षितीजावर तर रंगाची उधळन चाललेली होती.

शेतकरी दादा अन संग ढवळ्या-पवळ्या.....

रस्ता चुकु नये म्हणुन यो रॉक्स आणि सुन्या गाईडला शोधायला गेले.तोपर्यंत आम्ही फोटोग्राफिची हौस भागवुन घेत होतो.

गावातल एक कौलारु घर....

फुलांचा बहर आलेल हे शेत......


......................................

समोर उभे ठाकलेले अलंग-मदन-कुलंग आणि कुलंगशी कुस्ती करण्यास उत्सुक असलेले आपले माबोकर पैलवान.......

हाच तो कुलंग....... ४८२२ फुट...

रस्त्यावर शेणांचा सडा पडला होता. अन आमची पायपीट सुरु झाली.येथुन कुलुंगवाडी दहा-बारा किमी असेल.कुलुंगला जाणारी वाट मध्येच लागणार होती.एकीकडे सह्याद्रीच्या गगनचुंबी रांगा ,हिरवाईने पांघरलेला,नटलेला हा परिसर मन मोहुन घेत होता.

सकाळी चरायला आलेली ही अजुन एक टोळी आमच्याकडे कुतुहलाने पहात होती.

रस्त्याने गेल्यावर जास्त अंतर लागेल म्हणुन गाईडमामाने आम्हाला शॉर्टकट(ढोरवाट) ने नेले.त्या वाटेने पुढे गेल्यावर हा सुंदर ओढा लागला.

कुलंगशी कुस्ती करण्यात पटाईत असलेला हा आमचा गाईडमामा आरामात ओढा पार करून पलीकडे गेला.

पण शुज भिजु नये म्हणुन आम्हाला अशा माकडउड्या मारत ओढा पार करावा लागला.

............................................

पुढे जाताना ही फुललेली रानफुले दिसली.

दव पडल्यामुळे कोळ्याचे जाळे वेगळच भासत होत.

थोडे मागे वळुन बघितले आणि पाहतो तर काय ? आहाहा.......सह्याद्रीचे सर्वात उंच शिखर कळसुबाईं सुर्याच्या प्रकाशात न्हावुन निघताना दिसले.
सुर्याच्या प्रकाशात झळाळुन निघालेले कळसुबाईचे शिखर आणि अलंग-मदन-कुलंग या विशाल पर्वतरांगाना पॅनारोमा मध्ये घेण्याचा हा एक प्रयत्न.....

पुढे पुन्हा ढोर वाट सोडुन आम्ही मुळ रस्त्यावर आलो.सगळीकडे हिरव्यागार भाताच्या शेतानी जोर धरला होता.वेगवेगळ्या प्रकारची रानफुले रांगोळी काढल्यासारखे भासत होते.जसजस कुलंगच्या जवळ जात होतो.तसतशी त्याची भव्यता अजुन ठळकपणे दिसत होती.

थोड पुढे गेल्यावर डांबरी रस्ता सोडुन आम्ही शेताच्या बांधावरून आत शिरलो.कुलंगला जाणार्‍या या वाटेवर अजुन एक पाण्याचा ओढा लागला.

..............................................

पुढे हे एका शेतात बांधलेले झोपड दिसल.आमच्यापैकी एकाने गाईडमामाला विचारल की हे कोणत पिक आहे तेव्हा त्याने सांगितले की हे नाचणीच पीक आहे.

आता येथुन पुढे जंगलाची वाट सुरु झाली.दोन्हिबाजुला मस्त गर्द हिरवीगार झाडी असल्यामुळे थकवा जाणवत नव्हता.कुठे-कुठे मध्ये एकापेक्षा अधिक वाटा लागत होत्या.तेव्हा आम्ही खुणा लक्षात ठेवत होतो. कारण परत येताना मामा आमच्याबरोबर नसणार होता."एओ" अशी हाक मारुन पुढचा गडी मागे राहिलेल्या गड्याला आवाज देत होता.

हत्यारबंद मामा..............

अलंग आणि मदनच्या पायथ्या-पायथ्याने आम्ही कुलंगकडे सरकत होतो.आता खरी चढण चालु झाली.

अजस्र असा हा कोरडा धबधबा (थोड पाणी होत)पार करुन आम्ही वरती आलो.पावसाळ्यात कोणाची श्यामत आहे या रस्त्याने यायची असा प्रश्न मनाला पडला.

गावात उतरल्यापासुन जवळ-जवळ दिड तासाची पायपीट झाली होती.त्यामुळे या झाडाच्या सावलीत आम्ही थोडी विश्रांती घेतली.थोडासा नाश्ता केला.विन्याने आणलेले मेथिचे पराठे आणि सुकीने आणलेल्या शेंगावर सगळे तुटुन पडले.बाजुलाच थंडगार पाण्याचा झरा वहात होता.पाणी पिऊन पुढच्या चढणी साठी सज्ज झालो.

येथुन मदनाचे सुळके छान दिसत होते.त्या सुळक्यात निढे पण दिसल.त्या सुळक्यांच्या बाजुला जो आडवा डोंगर दिसतोय त्याला पलंग म्हणतात असे अम्हाला नंतर समजले.मदन अन अलंग ला जाण्यासाठी रॅपलिंग करुन जावे लागते.(एके दिवशी नक्कीच ती मजा अनुभवणार....)

सुर्य आता थोडा वर आला होता.येथुन पुढे कुलंगला जाण्यासाठी दोन वाटा लागतात.मामाने आम्हाला मुळ वाट सोडुन दुसर्‍या वाटेने नेले.दोन्ही बाजुंनी दाट झाडी असलेली हि वाट दगडधोंड्याची म्हणजे पाण्याची होती.झाडी वाढल्यामुळे काठीने साफ करत पुढे जात होतो.ही गुराची वाट हाय असे त्याने सांगितले.जेवणासाठी गडावर लाकडे मिळणार नाहीत म्हणून सुकलेली लाकड उचलत आम्ही चढत होतो.

अजुन किती लांब आहे हे माबोकर यो ला विचारत होते कारण फकस्त तोच गडावर आधी जाऊन आला होता.

ते बघ ती कातळभिंत दिसते ना तिथे जायचय आपल्याला.....

एक कडा आम्ही पार केला होता.त्या कड्याच्या समांतर अशा वाटेने गडाच्या पश्चिमेला आम्ही चालत होतो.सुकलेले धबधबे पार करुन पुढे जात होतो.सुकलेले असले तरी शेवाळामुळे सावकाशपणे पार करत होतो.कारण एका बाजुला खाली खोल दरी होती.जवळ-जवळ अर्धे अतंर आता पार कले होते.सुकलेल्या झाडाची लाकडे मामाने आम्हाला कोयत्याने तोडुन दिली.मामा येथुन माघारी फिरणार होता.पुढचा रस्ता योला माहीत होता.पण पुढे खरी कसोटी लागणार होती.कारण पाठिवर वजनदार झोळ्या ,हातात लाकडे आणि पुढचा रस्ता म्हणजे पाच पावलापर्यंत पुढच काही दिसत नव्हत.हो पुर्ण कारवीच जंगल,पाच ते सहा फुट उंच झाडी आणि पायाखालचा रस्ता ओला झालेला,निसरडा त्यामुळे घसरायला होत होत.त्या झाडीमधुन जाताना गरम होत नव्हत पण कधी हा पॅच संपतोय अस वाटत होत.त्यात एक ते दिड इंच लांब टोकदार सुळे असलेल्या माश्या जाम हैरान करत होत्या.माबोकर वैतागले होते.(म्हंटल घ्यायच तर घे किस एकदाचा काय तो..)

थोड वरती आल्यावर हायस वाटल.सुर्य आता बराच वर आला होता.पण वार्‍याची झुळुक आल्यावर बर वाटायच.पुढे छोटे-छोटे कारवीच जंगल लागल.

आता रॉकपॅच पार करुन पुढे चढत होतो.माबोकर एकमेकांना मदतीचा हात देत होते.साखळी लावुन पुढे लाकड पास करत होते.

हा अजुन एक रॉक पॅच.येथे कातळामध्ये कोरलेल्या छोट्या-छोट्या पायर्‍या होत्या.त्यामुळे सावकाशपणे माबोकर हळुहळु पुढे सरकत होते.

काही माबोकर काठीच्या सहाय्याने पुढे चढत होते...........

दुर राहीले ते गाव.... आता आंबेवाडी गाव बरच माग पडल होत.एव्हढे अंतर आपण चालुन आलो.
(हुश्श.....समाधानाचा सुस्कारा सोडणारा बाहुला.सॉरी...तेरा बाहुले..)

आता शेवटच्या टप्प्यात आलो होतो.पुढे दोन रॉक पॅचेस पार केले की वर..(वर म्हणजे गडावर)

साखळीने लाकड पास करत वर पोहोचलो.खाली खोल दरी दिसत होती.समोर अलंग आणि मदन डोक वर काढुन उभे होते.येथेसुद्धा दगडात कोरलेल्या पायर्‍या लागल्या.

या पायर्‍यांनी वर जाताना एक छोटिशी कातळात कोरलेली गुहा दिसली.

गडावर पोहोचलो तेव्हा आमच स्वागत तीन-चार फुट वाढलेल्या गवताने केल.
हा गडाचा मुख्य दगडी दरवाजा...

"गणपती बप्पा मोरया" "छत्रपती शिवाजी महाराज की जय"
हो मायबोलीकरांच्या गर्जना झाल्या.जवळ-जवळ पाच तासाची ट्रेकींग करून ४८२२ फुट कुलंग सर केला.पावसाळ्यानंतर गडावर आमचच पहिल पाऊल होत.

गडाच्या हिरवाईने नटलेली पुर्वेकडची बाजु आणि पाण्याचे टाके...........

पण सगळ्यांच्या बॅटर्‍या आता डाऊन झाल्या होत्या.तेथुन पुढे गुहेपाशी पोहोचलो तर गुहा ओल्या होत्या.त्यात पाणी ठिबकत होत.मग गुहेच्या बाहेरच आम्हाला संसार थाटावा लागला.

गुहेच्या पुढे दोन-तीन पाण्याच्या टाक्या लागल्या.त्यातीर थंडगार पाणी पिऊन मस्त वाटल.थोडी तरतरी आली.
पाण्याचे टाके आणि मागे किल्ल्याचे भग्न अवशेष....

पोटात कावळे ओरडायला लागले होते.चुल पेटवण्यासाठी माबोकर शर्थीचे प्रयत्न करत होते.अथक प्रयत्नानंतर शेवटी एकदाची चुल पेटली.गिरिविहारांनी खिचडी बनवण्याची रेसीपि (बायकोनी दिलेली ) आणलेली होती.यो ,इंद्रा,मल्ली,गिरी जेवण करण्याच्या कामगिरिवर होते.तर बाकिचे माबोकर कंटाळलेले होते.सुन्याची तब्येत अजुन खराब झाली होती.तो गुहेच्या वर जाऊन औषधाची गोळी खाऊन पडला होता.
गडावर सावलीसाठी अस एकही झाड नव्हत.तशाच उन्हात दगडाची उशी आणि खडकाचा बिस्तर करुन पाठ टेकविली.ऊन-सावलीचा खेळ चालु होता.सावली आल्यावर बर वाटायच.मस्त एक डुलकी काढली.
तोपर्यंत खिचडी तयार झाली.खिचडी,ब्रेड-जॅमची पोटात भर टाकल्यावर थोडेसे हायसे वाटले.
जेवणानंतर अजुन एक डुलकी काढल्यानंतर आता थोड फ्रेश वाटु लागल.

गडावर फेरफटका मारायला निघालो.गडाच्या पश्चिम बाजुच्या टोकावर आम्ही चालत निघालो.गवत खुप वाढलेले असल्यामुळे जपुन पाय टाकावा लागत होता.बाजुलाच चार हजार फुट खोल दरी होती.हिरव्या गवतात फुललेली पिवळी फुल छान दिसत होती.

याला छोटा कुलुंग म्हणतात असे यो ने सांगितले.

हिच ती दरी... खालच्या दरीचा आकार यु अक्षरासारखा भासत होता.
(फोटोत नीट निरखुन बघितल की तुम्हाला एक पेंग्विनसारखा पक्षी दिसेल.त्याच्या पोटावर पांढरा रंग होता अन त्याचे पंख काळ्या रंगाचे होते.या पक्ष्यांचे थवेच्या थवे या दरीखोर्‍यातुन विहार करत होते.अस वाटत होत की आपल्याला पण यांच्यासारखे उडता आले असते तर किती मजा आली असती ना....)

कुलुंगचा हे भव्य रुप पाहुन डोळ्याच पारण फिटल.

कुलंगचा हा कोकणकडा....

सुर्य आता आमचा निरोप घ्यायच्या तयारीत होता.मग आम्ही गुहेकडे परत वळलो.

गिरी म्हणाला अंघोळीला जाऊया ...मग काय आपल्याला पण तेच पाहिजे होते.सुर्य परागंदा होण्याआधी स्नान उरकुन घेऊया.मी ,गिरी अन विन्या गडाच्या पुर्वेला जेथे पाण्याची सात-आठ टाकी आहेत तेथे पोहोचलो.पाणी मस्त थंडगार होत.थोड शेवाळ होत.मला पोहता येत असल्यामुळे मी पहिली उडी मारली अन पाण्याचा अंदाज घेतला.जवळ-जवळ दिड पुरुष खोल पाणी असेल.गिरी अन विन्यानी काठावरुन संध्यास्न्नान केल.तोपर्यंत चहा तयार झाला होता.

चहा-बिस्किटे खावुन सुर्यास्ताचा सोहळा बघत बसलो.

.................................................................

सुर्य गुडुप झाला.आता गडाला काळोखाने आपल्या मिठित घेतले.आता चांगलाच गारवा जाणवु लागला होता.मी तर थंडीसाठी काहि आणले नव्हते.विन्याने त्याच्याजवळ असलेले जास्तीचे विंगसुटर मला दिले.(खरच धन्यवाद).वन,टू,थ्री,फोर...स्टार्ट.रातकिड्यांनी एकसुरात ओरडायला सुरुवात केली.अन आमच्या मैफिलीची सुरुवात झाली.जेवणाची आधिच तयार करुन ठेवली होती.(रेडी टु इट) मग काय गुहेच्या समोरच गोल रिंगण करुन बसलो.कॅम्प फायर तर करु शकत नव्हतो.कारण जेवणासाठी लाकड मुश्किलीने पेटली होती.
मग एक मेणबत्ती मध्ये ठेवली.(हवा लागु नये म्हणुन सर्व बाजुंनी पाण्याच्या बाटल्या लावल्या होत्या.)
आकाशात टिमटीमणार्‍या चांदण्यानीसुद्धा हजेरी लावली.खर सांगु का मी कवि ना गायक... मग मी फक्त एक श्रोता बनलो.विन्याने गाण्यांनी सुरुवात केली.लावणी,मराठी-हिंदी गाण्यांवर आम्ही डोलु लागलो. हबाच्या गावरान कवितांनी त्यात जोश भरला.प्रगो,सुकी अन यो च्या कवितापण ज्याम भारी,किश्याचे किस्से,अन माबोवरची खमंग महाचर्चा असा सांग्रसंग्रहीत कार्यक्रम पार पडला.(बाकी जास्त काय लिहित नाही.हबाच्या लेखात सगळ्यांचे पोस्टमार्टम झालेय म्हणुन....)
राजमा-चावल,पनीर मक्खनी आणि ब्रेड असा मस्त बेत जेवणासाठी होता.

जेवण झाल्यावर कुठे झोपायचे असा सवाल सगळ्यांना पडला.गुहेत तर पाणी साचल होत.गुहेच्या वरती मोकळी जागा होती.पण थंडीने कुडकुडलो असतो.गवत जास्त असल्यामुळे सरपटणार्‍या जनावरांची जास्त भिती होतीं. दव पडल असत तर अजुन प्रॉब्लेम झाला असता.नाय हो करत शेवटी गुहेच्या समोरच्या जागेतच आम्ही लवंडलो.कॅरीमॅट वैगेरे आणली नव्हती.म सुन्याने आणलेल्या कॅरिमॅटवर जागा करुन झोपलो.येव्हढ्याशा जागेत आम्ही सात (सुन्या ,मी,माझ्याबाजुला गिरी,इंद्रा,मल्ली ,यो अन विन्या)जण कसेबसे मावलो.अक्षरशा एका कुशीवरुन दुसर्‍या कुशिवर वळताच येत नव्हत.बर झाल निदान थंडी तरी लागणार नाही.आतल्या किचनमध्ये (जेवणासाठीची छोटी गुहा)सुकी, ह बा, प्रगो नि प्रणव कवळे पहुडले होते.पायाच्या खालच्या जागेत प्रताप अन किश्या होते.
वरती आकाशात चांदण्यांनी खेळ मांडला होता तर आत किचनवाल्या माबोकरांनी मर्डर(गोमेचा)केला होता.
त्यानंतर जवळ-जवळ अर्धा तास ह.ह.पु.वा. झाली.प्रगोने जी त्याच्या भंडारातुन विनोदाची पखरण केली.
(खरच फुल पैसा वसुल....)

सकाळी साडे-पाचचा गजर लावला.कधी निद्राधीन झालो कळलच नाही.पहाटे साडे-पाचला जाग आली.
यो,विन्या, सुकी, किश्या, प्रगो, आणी मी असे आम्ही माबोकर सुर्योदय बघण्यासाठी गडाच्या पुर्वेला असलेल्या टोकाकडे कुच केले.वाढलेल्या गवतातुन माग काढित आम्ही त्या टेकाडावर पोहोचलो.
सुर्योदय व्हायला अजुन अवकाश होता.लाल-तांबड्या रंगानी आसमंत भारुन टाकला होता.

सुर्योदयाच्या प्रतिक्षेत असलेले मायबोलीकर.....

.............................................................

बर्‍याच वेळ झाला तरी सुर्य वर डोक काढायला वेळ लावत होता.मग मी आणि प्रणव तेथुन थोडे पुढे गेलो.त्या टेकडिच्या थोडे खाली उतरलो.तेथुन 'C' च्या आकाराचा अलंग आणि मदनचा सुळका लय भारी दिसत होता.

येथुन भंडारदरा बॅकवाटर वर बांधलेला घाटघर प्रकल्प दिसतो.तसेच रतनगड आणि आजोबा पर्वताचे दर्शन घडते.
(प्रकाश पुरेसा नसल्यामुळे चित्र बरोबर आल नाही.)

शेवटी एकदाचे सुर्यनारायनणाचे दर्शन झाले.

आपल्या तेजोमय किरणांनी सृष्टीला नवसंजीवनी देणार्‍या या वीराचे हे रुप मनाला खुप आनंद देणारे होते.

तेथुन आम्ही परत त्या टेकाडाकडे माघारी फिरलो.
छोटा कुलंग आणि मोठा कुलंग ची हि जोडी भन्नाट दिसत होती.

पुढे आम्हाला एक घळ दिसली.खाली पाण्याच्या टाक्या दिसल्या.याची रचना अशी केलेली आहे की वरुन पडणारे पाणी या घळितुन थेट त्या टाक्यात जाते.पाण्याचे टाके भरल्यानंतर पुढे गोमुखातुन(त्या काळात केलेले दगडी बांधकाम) पाणी दरीत पडते.वेळेअभावी आम्ही तेथे खाली जाऊ शकलो नाही.

सुर्याच्या कोवळ्या किरणांचा मनसोक्त आस्वाद घेतल्यानंतर आम्ही चहा पिण्यासठी गुहेकडे वळलो.

सुर्याचे तेज आता प्रखर होत चालले होते.चहा-नाश्ता करुन लगेच गड उतरायला लागणार होता.कारण नंतर उन्हाने जास्त त्रास झाला असता.

पुढे या पाण्याने हात-पाय धुवुन घेतले.सकाळच्या विधी उरकुन घेतल्या.

गडावरील काही प्रकाशचित्र...............

चहा-बिस्किट आणि मॅगीची भर पोटात टाकली.सगळ्यांनी आपआपल्या बॅगा पॅक करायला घेतल्या.पाण्याच्या बाटल्या भरुन घेतल्या.सुन्याची तब्येत खुपच खराब होती.त्याला मागुन यो आणी विन्या घेऊन येणार होते.त्याची बॅग प्रणव आणि यो ने शेर केली .आम्ही बाकीचे माबोकर पुढे रवाना झालो.गडाचा निरोप घेताना परत एकदा गडावर नजर टाकली.जेव्हढे डोळ्यात साठवता येईल तेव्हढे साठविले.नजरेनेच कुलंगला कडकडुन मिठी मारली.(दोस्ता ..परत येईन रे मी.)

आता गड उतरताना कस लागणार होता.पहिले दोन पॅच व्यवस्थित उतरायला लागणार होते.एक जरी पाय चुकला तर खाली दरी आ वासुन होती.सरळ उतरायला जमत नव्हत.कारण मागे बॅग खाली टेकत होती.मग क्रॉस होऊन कातळभिंतिचा आधार घेऊन उतरत होतो.तर काहि जण उलटे उतरत होते.

माबोकर हळुहळु खाली उतरत होते.एकदाचे ते रॉकपॅचेस संपले.जशी गड चढताना मजा येत होती.तशीच उतरतनासुद्धा धमाल येत होती.फोनची बॅटरी लो झाली असल्यामुळे उतरतानाचे फोटो काढता आले नाही.आता पुन्हा कारवीचे जंगल सुरु झाले.उंच आणि दाट झाडीमुळे पायाखालच मुश्किलीने दिसत होत.त्यामुळे घसरायला होत होत.तसच बाजुच्या झाडीला पकडुन खाली उतरत होतो.पण कधी- कधी ती रोपटी मुळासकट हातात येत होती.त्याने हाताला खाज सुद्धा लागत होती.जवळ-जवळ सगळ्यांचीच उतरताना घसरगुंडी झाली.शेवटी एकदाचे ते जंगल संपल.सगळे येईपर्यंत एका झाडाखाली थांबलो.सुन्या मध्ये-मध्ये आराम करत येत होता.यो आल्यावर त्याने सांगितले की गिरि पडला होता.कारवीच्या झाडांमुळे वाचला.एक-एक करत सगळे तो पॅच पार करुन आले.मोकळ्या जागेत श्वास घेत होतो.कुणाची किति-किति घासलेय (पँट) ते बघत होते.एकाची तर फाटली (पॅंट)होती.अर्धा गड उतरलोय पण पुढची वाट शोधावी लागणार होती.

मामाने आम्हाला येथेच आणुन सोडले होते.येथुन मामाने आणलेल्या वाटेने न जाता गडाच्या मुळ वाटेने उतरायचे होते.येताना आम्ही खुणा लक्षात ठेवल्या होत्या.या वाटेनेसुद्धा पुर्ण उतार होता.एका पॉईटला तर
ही वाट दरीत जातेय का अस वाटल.मग मी पुढे जाऊन चेक केले.झाडे तोडण्याचा आवाज येत होता.खाली गावातल्या बाया लाकड तोडत होत्या.अजुन पुढे गेल्यावर त्या कड्यातुन खाली उतरायला कोरलेल्या पायर्‍या दिसल्या. हो म्हणजे आपण बरोबर चाललो होतो.प्रत्येकवेळी पुढचा माबोकर उतरल्यानंतर मागच्या गड्याला सांगत होता.(येथे पाय ठेव,पुढे घसरण आहे) अस एकमेकांना सहाय्य करुन आम्ही तो कडा खाली उतरलो.

चढताना आम्ही जिथे पहिल्या ठिकाणी थांबलो.तिथेच त्या झाडाखाली विसावा घेतला.झर्‍याच पाणी पिऊन तृप्त झालो.मी आणलेले भडंग(कुरमुरा,चिवडा मिक्स) आणि खाकरा खाऊन पोटाला थोडा आधार दिला.जवळजवळ साडेतीन-चार तासांमध्ये आम्ही खाली उतरलो.

घाबरतात तर सगळे,फाटते तर सगळ्यांचीच....पण भीतीच्या पुढे..काय ?
भीतीच्या पुढे ....आपले मायबोलीकर
हो तो जो मागे दिसतोय ना तोच कुलंग सर करुन आलोय. नाद करायच नाय काय........

(फोटो: विन्याच्या कॅमेरातुन..)

घामाने अंग ओल झाल होत.मग या ओढ्यातच मस्त डुंबुन घेतल.

आम्ही अंघोळ करत होतो तोवर सुन्या,मल्ली आणि यो पुढे गेले.त्यांना जेवणाची व्यवस्था करायची होती.सुन्याला दवाखान्यात न्यायच होत.आता परत तंगडतोड सुरु झाली.गडाच्या पायथ्यापासुन ते गावापर्यंत चार-पाच किमी अंतर असेल.खर म्हणजे हे अंतर चालायच जिवावर आल होत.पाय ओढत कसेतरी गावात एकदाचे पोहोचलो.जेवणाची आधिच ऑर्डर दिली होती.बटाट्याची भाजी ,वरण-भात असा बेत होता.मस्त जेवण झाले.येथुन एस.टी होती.पण राजुरपर्यंतच होती.मग विन्या आणि मल्लि यांनी टेंपो ठरविला.कुलंगला शेवटचा बायबाय करत टेंपोतुन कसार्‍याला निघालो.

कसार्‍याला संध्याकाळी पाच-साडेपाचच्या दरम्यान पोहोचलो.परतीची तिकिटे काढली.रविवार असल्यामुळे गर्दी होती.तेव्हढ्यात ट्रेन आली आणि आमची धावाधाव सुरु झाली.शेवटी मालडब्यात मायबोलीकरांनी जागा पकडली.मग पुन्हा मैफिल सुरु झाली.विन्याच्या झकास लावण्या,त्याला हबाची साथ आणि ज्याची सर्व आतुरतेने वाट पहात होते,ती आली....तीच ती धावत्या लोकलमध्ये नाचली ती अप्सरा......
मग काय उडत्या गाण्यांच्या चालीवर सुरु झालेली यात्रा गणपतीच्या आरतीने संपली.

गणपत्ती बप्पा मोरया ...छत्रपती शिवाजी महाराज की जय असा एकच गजर झाला.सर्व आपआपल्या दिशेने निघुन गेले.

राहिल्या फक्त आठवणी...कधी न विसरता येणार्‍या...
खरच हा निसर्ग मनाला वेड लावुन टाकतो ना..
मायबोलीकर ....पुन्हा भेटुया अशाच एका सफरीवर...

तोपर्यंत......... No Destination...................

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे रोहीत...... अ प्र ति म लिहीले आहेस तू... पुन्हा त्या आठवणींना नव्याने उजाळा मिळाला.. धन्यवाद Happy
नि फोटो पण सही म्हणजे सहीच... खासकरुन पॅनोरामा व्ह्यू, छोटा नि मोठा कुलंग नि शेवटचा फोटो Happy

राहिल्या फक्त आठवणी...कधी न विसरता येणार्‍या...
खरच हा निसर्ग मनाला वेड लावुन टाकतो ना..
मायबोलीकर ....पुन्हा भेटुया अशाच एका सफरीवर...
>> मिलेंगे फिर मिलेंगे.. Happy

क्या बात है रोहित,.... नितांतसुंदर वर्णन. कुलंगला गेल्या सारखच वाटलं.... लै भारी. Happy

राहिल्या फक्त आठवणी...कधी न विसरता येणार्‍या...
खरच हा निसर्ग मनाला वेड लावुन टाकतो ना..
मायबोलीकर ....पुन्हा भेटुया अशाच एका सफरीवर... >> मिलेंगे फिर मिलेंगे......परत एकदा मजा !!!

क्लास मित्रा!!!!!!! वर्णन आणि फोटो दोन्ही एकदम खास!!!!

प्रत्येकाचा अनुभव वेगळा !!>>>> अगदी अगदी

:पुन्हा एकदा प्रचंड जळफळाट करणारा पण तेव्हढ्याच कौतुकाने वृतांत वाचणारा बाहुला:

राहिल्या फक्त आठवणी...कधी न विसरता येणार्‍या...
खरच हा निसर्ग मनाला वेड लावुन टाकतो ना..
मायबोलीकर ....पुन्हा भेटुया अशाच एका सफरीवर... >> कधी .. केव्हा.. अन कुठे फक्त सांग .. यारा..

रोहित.. तुझ्यासारखाच शांत.. सुंदर .. अन मोजक्या शब्दातही खूप काही सांगून जाणारा वृतांत... अवघड पॅच चे प्रचि मधे दर्शन घडवल्याबद्दल.. आभार... !

रोहीत, खुप छान लिहीलस ! Happy
फोटोच सगळं वर्णन करतायत !

>> मिलेंगे फिर मिलेंगे..... << आता हा जानेवारी कधी येणार ? Happy

रोहित ...एकदम मस्त वर्णन...
परत एकदा जाउन आल्यासारख वाटल कुलंगला...
Happy

ये हुई ना बात Happy मस्त आलेत फोटो Happy
>>> काही फोटो पाहताना तर "बरं झाले मी नाही गेलो" असा विचार आला <<<<
अगदी अगदी, त्या मधल्या शेवटच्या रॉकप्याचमधिल पायर्‍या बघितल्यावर याला पायर्‍या का म्हणत असावेत असा प्रश्न पडला! असो.
पण कोण ना कोण जाऊन गड जागता ठेवलाच पाहिजे!

धन्यवाद.... दिनेशदा,योगेश,नंद्या,.....
सुकी,सुन्या,विन्या,गिरी,यो,प्रगो,हबा.....धन्यवाद रे...अन आपण लवकरच पुन्हा भेटु ..धमाल करु..(एओ)
सुन्या तु सांगितलेला बदल केला आहे रे लेखात.....
योगेश २४...तु यायला पाहिजे होते रे...तुझ्या कॅमेराच्या नजरेतुन अजुन चांगल दर्शन घडले असते रे...
धन्यवाद लिंबुटींबुजी...... हो आम्ही भटके तो वारसा नक्किच टिकवुन ठेवु........

रोही.... ओ.... ssssssssssssssssssssssssssssssssssssssssss ऐ... !

रोहित छान रेखाटले आहेस... सगळ्या क्षणांची आठवण ताजी झाली Happy

मो.कॅ.चे फोटो पण छान आले आहेत.

<<गोड फेक लाईट आहे रे >>
योगी, बघ रे हे काय ते .. आपण गाइड शोधायला गेलो आणि इकडे हे लाइट घेतायत ! Proud
पुढच्या वेळेस ह्यांच्यासाठी मिसगाईडच शोधूया !

पुढच्या वेळेस ह्यांच्यासाठी मिसगाईडच शोधूया ! << सुन्या हरकत नाही रे .. मिसगाईडची.. आता कुलंगने बरच काही शिकवलं आहे.. नशिबानं चुकलो तरी हूकणार तर नक्कीच नाही... !

Pages