गौळण: अरे कान्हा तू मजला असा छेडू नको

Submitted by पाषाणभेद on 8 October, 2010 - 21:15

गौळण: अरे कान्हा तू मजला असा छेडू नको

अरे कान्हा तू मजला असा छेडू नको
हात धरूनी वाट माझी तू अडवू नको ||धृ||

नेहमीची मी गवळणबाई, जाते आपल्या वाटंनं
डोक्यावरती ओझं आहे, लोणी आलंय दाटून
बाजारात मला जावूदे, वाट माझी अडवू नको
अरे कान्हा तू मजला असा छेडू नको ||१||

लांबून मी आले बाई, जायचे अजून कितीक लांब
चालून चालून थकून गेले, करू किती मी काम
इथे थांबले थोडा वेळ, दम माझा तोडू नको
अरे कान्हा तू मजला असा छेडू नको ||२||

सासू माझी कशी आहे तूला नाही ठावं
समोर मी रे गरीब गाय उभी बांधून दावं
छळेल मजला सासू माझी, लोणी तू मागू नको
अरे कान्हा तू मजला असा छेडू नको ||३||

इतर सार्‍या गवळणी गेल्या का रे माझ्या पुढे?
का मीच आली पुढे त्यांच्या, सांग तू आता गडे
घाई करूदे मला जायची, वेळ माझा दवडू नको
अरे कान्हा तू मजला असा छेडू नको ||४||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
०९/१०/२०१०

गुलमोहर: 

दगडफोड्या, मस्त ....बाकी काहीही असो ...( आता याचा अर्थ तु काय घेणार हे मला माहेत नाही )

पण तु वेगवेगळे कविता प्रकार हाताळत आहेस ..., तुझा नक्केच त्यात व्यासंग असेल .!!!

सारखं सारखं गझल , मुक्तछंद वाचुन कंटाळा आलाय .... तु असेच वेगवेगळे काव्य प्रकार एक्सप्लोअर करत रहा ...पुढे मागे आम्हालाही सुचेल काही तरी या पॅटर्न मध्ये !!!

बाकी ही गौळण आवडली !!

मागील २ लावण्याही आवडल्या आहेत !!

पुलेशु !!