शटरस्पीड, प्रकाशचित्रणातला एक अतिशय महत्वाचा पैलू. काढला जाणारा प्रत्येक फोटो कसा दिसणार हे ठरवणारा हा एक महत्वाचा घटक. वेगात जाणाऱ्या गाडीचे फोटो असोत , मऊशार सिल्की, प्रवाही दिसणारे निर्झर असोत, आकाशात रंगांची उधळण करणारे फटाके असोत कि अंधाऱ्या अपुऱ्या उजेडात काढलेले देवळाचे गाभारे असोत. कुठल्याही फोटोमध्ये सगळ्यात आधी दिसून येतं ते जमलेलं किंवा हुकलेलं एक्स्पोजर अर्थात योग्य किंवा अयोग्य प्रमाणातला प्रकाश. आणि हां कंट्रोल करणारा एक महत्वाचा (एकमेव नाही हं!) पैलू म्हणजे शटरस्पीड.
मागच्या भागात आपण अगदी थोडक्यात बघितलं कि शटर हा एक पडदा आहे. आणि तो फिल्म किंवा डिजीटल सेन्सरवर येणारा प्रकाश थोपवून धरतो. आणि आपण बटन क्लिक केल्यावर तेवढ्या पळापुरतं ते उघडतं. खरतर मागचा भाग खुपच साधा, अरंजक किंवा तांत्रिक वाटला असण्याची शक्यता आहे. पण ती माहिती थोडक्यात तरी जरुरीची होती.
हे शटर मेकेनीकल भाग असून खूप नाजूक असतो. सेकंदाच्या काही हजारांश इतका वेळ नियंत्रित करायचा असल्याने त्याचं प्रिसिजन (अचूकता) खूप जास्त असतं. या शटर ला नुसत्या हाताने हात लावलेला चालत नाही. असही ते सहज हात लावण्याइतकं समोर नसतंच.
या शटरमध्ये दोन प्रकार आहेत.
सेंट्रल लीफ शटर:
हे शटर लेन्स मध्ये असतात. आणि त्यांची पाकळ्या पाकळ्यांसारखी रचना असते. खरतर अगदी चाफ्याच्या फुलासारखी वाटतात फक्त चपटी असतात. या प्रकारचे शटर तुलनेने सोपे , स्वस्त असतात. पण जेव्हा लेन्स बदलता येणारा कॅमेरा असतो त्यावेळी प्रत्येक लेन्स मध्ये असे शटर असणे जरुरी होते. शिवाय याप्रकारच्या शटरला खूप जास्त स्पीड नसतो.
या आकृती मधे असे शटर कसे उघड बंद होते ते दाखवले आहे.
आकृती : http://www.tpub.com/content/armycomsystems/SS0507/SS05070041.htm
फोकल प्लेन शटर:
हे नावाप्रमाणे फोकल प्लेन जवळ, म्हणजे फिल्म किंवा सेन्सरच्या अगदी पुढेच असतात. हे शटर हॉरिझॉन्टल असायचे. पण आता नवीन कॅमेऱ्यामध्ये हे व्हर्टिकल म्हणजे वरखाली करता येणाऱ्या विंडो ब्लाइंडसारखे असतात. हि शटरसुद्धा मेकेनिकल असून इलेक्ट्रोनिक स्वीच / सर्किट द्वारे ओपरेट होतात. पण ते ऑपरेट होण्याचा स्पीड, सिंक्रोनायझेशन, आणि अॅक्युरसी जबरदस्त असते.
व्हर्टिकल शटर मुळे जास्त वेगवान शटर सायकल (शटर उघडून पुन्हा बंद होऊन पूर्व स्थितीला येण्याचा काळ) मिळवता येतात (१/८००० सेकंद सुद्धा, सेकंदाचा ८०००वा भाग इतका!). हे शटर कॅमेर्यामध्ये असल्याने प्रत्येक लेन्स मध्ये वेगळ्या शटरची गरज नसते. डीएसएलआर /नवीन एसएलआर मध्ये या प्रकारचे शटर असते. त्यामुळे खूप जास्त शटर स्पीड मिळवता येतो.
या खालच्या फोटो मधे कॅनन कॅमेर्याचे एक शटर दाखवले आहे.
शटरचा एक फोटो http://www.usa.canon.com/dlc/controller?act=GetArticleAct&articleID=२४७
डीजीकॅम:
डीजीकॅम मध्ये कधी कधी सेंट्रल शटर असते. इथे लेन्स बदलायच्या नसल्याने सेंट्रल शटर वापरायला हरकत नसते, मात्र त्यामुळे स्पीड लिमिट असतातच. काही डीजीकॅम मध्ये मात्र असे मेकेनिकल शटर नसतेच. त्याट डिजीटल शटर असते, म्हणजे सेन्सर वर कायम प्रकाश पडतो. फक्त चित्रणाचे बटन दाबले कि तेव्हाची इमेज तेवढी मेमरी मध्ये कॅप्चर केली जाते.
या सगळ्या मुळे डीजीकॅमचा आकार छोटा होतो, किमत कमी होते. पण नॉइज, शटर लॅग वाढतो. शटर लॅग म्हणजे कॅमेर्याचं बटन दाबल्यावर, खरच फोटो घेतला जाण्यासाठी लागणारा वेळ. डीजीकॅम मध्ये हा वेळ बराच जास्त असतो. खरतर म्हणून मला घरातल्या डीजीकॅमने फारसे चांगले फोटो काढता येत नाहीत. एसएलआरच्या अंदाजाने मी शटर दाबल्यावर लगेच फोटो आला असं समजते आणि सगळा घोळ होतो.
वेगवेगळे शटर स्पीड:
बरं आता या सगळ्याचा आपल्या प्रकाशचित्रणासाठी कसा आणि काय उपयोग करायचा म्हणजे अप्लाईड सायन्स काय आहे ते बघू.
सध्यातरी या सगळ्या खुलाशा साठी सध्या अॅपेर्चर हा अजून एक महत्वाचा घटक आपण स्थिर (कॉन्स्टंट) आहे असे मानू.
शटरस्पीड म्हणजे किती वेळात हा पडदा वेगाने उघडून परत बंद होतो तो काळ. अर्थात जेवढा वेळ पडदा उघडला तेवढाच वेळ फिल्म, सेन्सरवर प्रकाश पडणार. जास्त वेगात पडदा उघडला तर अगदी कमी वेळ प्रकाश पडणार आणि कमी वेळात पडदा उघडला तर जास्त वेळ प्रकाश पडणार. गोंधळ झाला का?
म्हणजे बघा खूप प्रखर ऊन आहे बाहेर आणि तुम्ही ऑटो मोड मध्ये फोटो काढता आहात. आता कॅमेर्याने १/१२०० असा शटर स्पीड निवडला. तर एका सेकंदाच्या १२०० वा भाग इतकाच वेळ पडदा उघडा रहाणार. आणि अगदी कमी प्रकाश सेन्सर वर पडणार. कारण बाहेरचा प्रकाश इतका प्रखर आहे कि एवढ्या वेळेतच अगदी योग्य चित्रण होऊ शकते. यापेक्षा जास्त वेळ पडदा उघडला तर फोटो ओव्हर एक्सपोज होईल.
हे खालचे फोटो जास्त शटरस्पीड ठेऊन काढलेले आहेत. कारण फोटो काढायच्या वेळी खूप प्रकाश होता.
(मी एक दोन दिवसात प्रत्येक फोटोचा शटर स्पीड काय होता ते लिहेन इथे )
साप्पोरो स्नो फेस्टीवल
नारा दाईबुत्सु, बुद्ध मंदिर
समजा आता तुम्ही घरात फोटो काढताय. घरात साधारण उजेड आहे. या वेळी कॅमेर्याने १/१०० असा स्पीड निवडलाय. म्हणजे एका सेकंदाचा १०० वा भाग इतका. घरात बाहेरच्या पेक्षा कमी प्रकाश असल्याने सगळी फ्रेम चांगली प्रकाशमान दिसण्यासाठी एवढा वेळ प्रकाश आवश्यक वाटलं कॅमेर्याला. हे बघा खालचे फोटो कमी प्रकाशात काढले असल्याने शटर स्पीड जरा कमी होता.
भारतीय मसाले
आता यावेळी तुम्ही एखाद्या कोरीव लेण्यामध्ये फोटो काढताय. गुहेत फारच अंधार आहे. आणि तुमच्या कॅमेर्याने आता निवडलाय १/१० इतका स्पीड. म्हणजे एका सेकंदाचा फक्त दहावा भाग. हा काल तुलनेने फार मोठा आहे आणि आता तुम्ही जर कॅमेरा हातात धरून फोटो काढलात तर नक्की फोटो हलणार. अगदी तुम्हाला फोटो काढताना कदाचित कळणार सुद्धा नाही पण फोटो बघितलात ना कि कळेलच. हे फोटो देवळातल्या गाभाऱ्यामध्ये काढलेत. त्यामुळे खूप कमी शटर स्पीड होता. यातला दूसरा फोटो जरासा हलला आहे.
नारा दाईबुत्सु
मग अशावेळी काय करायचं? तर ट्रायपॉड वापरायाचा. किंवा कॅमेरा कशावर तरी ठेऊन फोटो काढायचा. आता तुम्हाला प्रश्न पडला असणार कि कधी ट्रायपॉड वापरायचा हे कस ठरवायचं, हो ना? मग जर एस एल आर वापरत असाल तर हे साधारणपणे लेन्स वर ठरतं. म्हणजे तुमची लेन्स ५० मिमी असेल तर १/५० स्पीड पर्यंत हाताने काढायला हरकत नाही. पण १/५० किंवा त्या खाली स्पीड गेला तर मात्र हातात कॅमेरा धरून काढलेला फोटो हलण्याची शक्यता असते. जर २०० मिमी लेन्स असेल तर १/२०० पर्यंत हातात धरून काढायला हरकत नसते. अर्थात हे फोटोग्राफरच्या क्षमतेवरही अवलंबून असते. काही जण अजून एखादा स्टॉप सुद्धा हातात धरू शकतात. तर काही जणांना आधीच ट्रायपॉड वापरायला लागतो. अनुभवी फोटोग्राफरला नेहेमी स्वत:च्या क्षमतेचा अंदाज असतोच. बाकीच्यांसाठी आधी सांगितलेला लेन्स बद्दल चा नियम वापरणे योग्य. अलीकडे काही नवीन लेन्समध्ये इमेज स्टॅबिलायझर/ अॅन्टीशेक मेकॅनिझम असतात त्यामुळे जरा फोटो हलण्याचे प्रमाण कमी होऊ शकतं.
कधी कधी मात्र हा इफेक्ट असा वेग दाखवण्यासाथी वापरता येतो.
या स्पीड मध्ये १/२", १/१०" अशा प्रकारे लिहिलेले ऑप्शन सुद्धा येतात. त्याचा अर्थ काय तर १/१/२ सेकंद म्हणजेच २ सेकंद स्पीड. किंवा १/१/१० म्हणजे १० सेकंद स्पीड. असा स्पीड सिलेक्ट झाला असेल तर तर बटन दाबल्यावर एक खर्र असा आवाज येतो आणि शटर उघडेच रहाते ते पूर्ण २ किंवा दहा (जो स्पीड असेल त्याप्रमाणे) तसेच रहाते. हा कालावधी संपला कि खटॅक असा एक आवाज येऊन शटर बंद होते आणि पूर्वस्थितीला जाते. फिल्म/ सेन्सर पूर्ण एवढा वेळ एक्सपोज होते.
हा फोटो चालत्या ट्रेन मधुन घेतलेला आहे. या फोटोला ठाणे महापौर पुरस्कार मिळाला आहे.
अजून एक बल्ब (BULB) असाही एक ऑप्शन असतो एस एल आर/ डी एस एल आर मध्ये. या मुळे आपल्याला हव्या तितक्या वेळ शटर उघडे ठेवता येते. जितका वेळ बटन दाबून ठेवू तितका वेळ ते उघडे रहाते. या ऑप्शन चा उपयोग सहसा फायर वर्क किंवा अॅस्ट्रोनॉमी बद्दल चे फोटो घ्यायला वापरतात. पण इतर वेळी अगदी अंधाऱ्या ठिकाणी, काही प्रायोगिक फोटोग्राफीच्या वेळी सुद्धा वापरता येते.
फायर वर्क्स
फायर वर्क्स (हा फोटो एका सीडी कव्हर साठी वापरला आहे)
तुमच्या कॅमेर्यामध्ये:
डीएसएलआर /एसएलआर मध्ये साधारणपणे शटर डायल *{Main Dial}* [main command dail] आणि अॅपेर्चर डायल {Quick Control dial}[sub command dial] अशा दोन डायल किंवा बटणे असतात.हे दोन्ही घटक एकमेकांवर अवलंबून असतात.
आजकाल बऱ्याच डीजीकॅम मध्ये शटर आणि अॅपेर्चर बदलायचे ऑप्शन असतात. जर मॅन्युअल नीट वाचलत तर ते मिळतील. प्रत्येक कॅमेर्यामध्ये यासाठी वेगळी पद्धती असते त्यामुळे इथे लिहिता येणार नाही. तरी सुद्धा इथे आपण सोयीसाठी त्या सॉफ्ट कीज ना (मेनू मध्ये असणारे ऑप्शन) शटर डायल आणि अॅपेर्चर डायल अशीच नावं देऊ.
आता कॅमेर्यामध्ये शुटींग मोड असतात. मॅन्युअल मोड {M}[M], अॅपेर्चर प्रायोरिटी मोड {Av}[A], शटर प्रायोरिटी मोड {Tv}[S]. कॅमेर्याच्या कंपनी प्रमाणे यांची नावं वेगवेगळी असतात. मोड डायल वापरून वेगवेगळे मोड सिलेक्ट करता येतात.
या पैकी आपण सध्या फक्त मॅन्युअल मोड किंवा शटर प्रायोरिटी मोड वापरून बघू
मॅन्युअल मोड - शटर आणि अॅपेर्चर दोन्ही फोटोग्राफरला ठरवावे लागते
अॅपेर्चर प्रायोरिटी मोड - फोटोग्राफर अॅपेर्चर ठरवतो, आणि कॅमेरा शटरस्पीड आपोआप ठरवतो.
शटर प्रायोरिटी मोड - फोटोग्राफर शटरस्पीड ठरवतो, आणि कॅमेरा अॅपेर्चर आपोआप ठरवतो.
आधी तुमचा कॅमेरा मॅन्युअल मोड मध्ये अॅपेर्चर साधारणपणे ५.६ असे ठेवा. हे स्थिर ठेवू.
जर शटर प्रायोरिटी मोड वापरत असाल तर कॅमेरा अॅपेर्चर आपोआप ठरवेल, तुम्ही फक्त शटर स्पीड बदलून बघा.
अर्थात फक्त शटरस्पीडने तुम्हाला योग्य एक्पोजर मिळणे कठीण आहे. त्यासाठी आयएसओ,अॅपेर्चरची सुद्धा माहिती घ्यावी लागेल ती नंतर घेऊयात.
आता वेगवेगळया शटर स्पिडला एकाच वस्तूचे घरात फोटो काढा. साधारण १/१०, १/२००, १/५००, १/१०००, १/२००० हे स्पीड वापरून बघा. डीजीकॅमला कदाचित १/२००० हा ऑप्शन नसेल. आता यातल्या कमी स्पीडने फोटो जास्त एक्सपोज होतील (पांढरे दिसतील) आणि जास्त स्पीडने अगदी कमी एक्सपोज होतील (काळपट येतील).
आता भरदुपारी बाहेर जाऊन याच प्रकारे फोटो काढा आणि रिझल्ट बघा. मघाशी काढलेल्या फोटोपेक्षा एक्स्पोजर वेगळे दिसेल, कारण घरातला प्रकाश बाहेरच्या प्रकाशापेक्षा कमी होता. आता तुम्हाला अजून काही प्रयोग करता येतील.
अजून काही प्रयोग:
जोरात जाणाऱ्या गाडीचा फोटो, एखाद्या नाचऱ्या पक्षाचा फोटो किंवा एखाद्या खेळाडूचा फोटो काढताना फोटो बऱ्याच वेळा हलू शकतात. कारण त्यांच्या वेगवान हालचालीच्या वेगापेक्षा शटर स्पीड कमी असतो. अशा वेळी शटर स्पीड वाढवला तर छान फोटो काढता येतील आणि तो महत्वाचा क्षण अगदी अलगद पकडता येईल. शटर स्पीड वाढवण्यासाठी आयएसओ वाढवणे, अॅपेर्चर वाढवणे अशा काही गोष्टी करता येतात.
धबधबा किंवा पाण्याचा एखाद्या अवखळ झऱ्याचा फोटो आपण पहातो. तिथे पाणी अगदी सिल्की स्मूथ प्रवाही दिसतं. आणि तो फोटो चित्रासारखा कसा दिसतोय याचं अप्रूप आपल्याला वाटत रहातं हो ना? हा इफेक्टही घेता आलाय तो शटरस्पीड मुळे.शटर स्पीड कमी ठेऊन असे फोटो घेता येतात. याबद्दलही आपण पुन्हा केव्हातरी जास्त माहिती करून घेऊयात.
जास्त स्पीड असल्याने पाणी शिंतोडे उडाल्यासारखरे दिसते
स्पीड कमी केल्यावर मात्र प्रवाहि दिसतय.
जास्त शटर स्पीड असल्याने मोमेंट फ्रिज झालेले काही फोटो
Tokyo metropolis या मॅगझिन मधे प्रकाशित.
यामधे दिसणार्या त्या छोट्या किड्याचा पंखांचा वेग इतका जास्त आहे की १/५०० या शटर स्पीड ला सुद्धा त्याचे पंख दिसत नाहिएत!
चला तर कॅमेरा घेउन आता तुमच्या फोटोग्राफी प्रयोगाना सुरुवात करा!
*[] - निकॉन कॅमेर्यातली नावे
*{} - कॅनन कॅमेर्यातली नावे
_________________
आधिचे लेखः
फोटोग्राफी : तुमचा कॅमेरा
फोटोग्राफी : फिल्टर्स
फोटोग्राफी: जादूचा मंत्र (फोटोसह)
फोटोग्राफी: कॅमेरा खरेदी
फोटोग्राफी: कॅमेर्याची काळजी भाग २
फोटोग्राफी: कॅमेर्याची काळजी
हे सगळे लेख इथेही (प्रकाशरान - http://prakashraan.blogspot.com/) आहेत.
ज ह ब ह री फोटोज सावली !
ज ह ब ह री फोटोज सावली !
ये हुई ना बात.... कंपॅरिझन
ये हुई ना बात....
कंपॅरिझन करणारे अजून फोटो दाखव की. फरक ठळकपणे लक्षात येउ दे आमच्यासारख्या नवोदितांच्या...
नेहमीप्रमाणे सुंदर लेख
नेहमीप्रमाणे सुंदर लेख सावली..
>यातला दूसरा फोटो जरासा हलला आहे
जाणवले नाही जास्त..
>>शिबुया स्टेशनमधली गर्दीची वेळ
१-२ स्टॉप जास्त असते तर हा अजून चांगला वेगाचा इफेक्ट दाखवता आला असता ना? ... हा जरा जास्तच ब्लर आहे... याच्या पुढचा मस्त आहे...
फायरवर्क्स जबरदस्त!!!
हा फोटो चालत्या ट्रेन मधुन
हा फोटो चालत्या ट्रेन मधुन घेतलेला आहे. या फोटोला ठाणे महापौर पुरस्कार मिळाला आहे. <<< सावली.. अभिनंदन. फोटो एकदम जबरा... खरोखर उपयुक्त माहीती. पुर्वी वाटायचं कि कॅमेरा हालला म्हणून असे काहीतरी फोटू येतात, पण आता कळलं हि कशाची खरी कमाल आहे. धन्स सावली. फोटोग्राफीची अंकलिपी इथे सुरू केल्याबद्दल.
अजून काही प्रयोग मधले फोटो भन्नाटच... अन त्या पक्ष्यांचे फोटो सुद्धा सुंदर.
मनापासुन धन्यवाद सावली या
मनापासुन धन्यवाद सावली
या भागाची आतुरतेने वाट पाहत होतो. :). जितके सुंदर फोटो तितकीच उपयुक्त माहीती.
पुन्हा एकदा निवडक दहात.
अतिशय सोप्या शब्दात समजावून
अतिशय सोप्या शब्दात समजावून सांगितलयस लेखात
फोटो जबरीच!!!!!!
सावली, खूप छान व सोप्या भाषेत
सावली, खूप छान व सोप्या भाषेत समजावतेयस. कीप इट अप. फोटोंबद्दल...बोलती बंद.
मलाही शटर स्पीड व अॅपेर्चर
मलाही शटर स्पीड व अॅपेर्चर याबद्द्ल गोंधळ होताच, आता ह लेख वाचून कळालं धन्यवाद.
आत्ता शटर स्पीड वर प्रयोग करायला सुरू करतो.
फोटोही मस्तच आहेत. शेवटच फोटूतर जबरदस्तच.
मस्त माहिती. हे वाचून मला एस
मस्त माहिती. हे वाचून मला एस एल आर घेऊ वाट्तो आहे.
तुमचे लेख निवड्क १० त आहेत.
तुमचे लेख निवड्क १० त आहेत. छान माहिती.
ही तर आमच्यासाठी अलिबाबाची
ही तर आमच्यासाठी अलिबाबाची गुहाच आहे.
अतिसुंदर फोटो आणि त्याहून सुंदर, सहज कळेल अशी माहिती !!!
आता हे तंत्र आपल्या आवाक्यात आलेय. खुप वर्षांपुर्वी मी बीबीसी ची, व्हॉट आईज कांट सी, या व्हीडीओ मधे अशी अनोखी दृष्ये टिपलेली बघितली होती.
सह्हीच लेख धन्यवाद
सह्हीच लेख धन्यवाद सावली!
लेख वाचल्यावर हे लक्षात आलं:
१. कमी शटर स्पीड: वस्तूची गती दाखवतो. ट्रायपॉड ची गरज भासते.
२. जास्त शटर स्पीड: वेगातली वस्तू स्थिर दाखवतो. ट्रायपॉड ची गरज नाही.
सावली, हे बरोबर आहे का?
आणि हे पण बरोबर आहे का?
१. कमी शटर स्पीड + जास्त अॅपर्चर + जास्त ISO = अंधारातल्या फोटो साठी.
२. जास्त शटर स्पीड + कमी अॅपर्चर + कमी ISO = प्रकाशातल्या फोटो साठी.
फोटो जबरी आहेत आणि लेखमाला
फोटो जबरी आहेत आणि लेखमाला उत्कृष्ट माहिती देत आहे.
फोटो जबरी आहेत आणि लेखमाला
फोटो जबरी आहेत आणि लेखमाला उत्कृष्ट माहिती देत आहे.
आहाहा. एक नंबर महान फोटो
आहाहा. एक नंबर महान फोटो आहेत.. आणि माहितीही मस्तच.. आता फोटो काढताना विचार करून फोटो काढायला सुरुवात केली पाहिजे..
सावली, तुझा लेख, माबोची
सावली, तुझा लेख, माबोची त्याची लिंक आणि ब्लॉगची लिंक मी माझ्या मित्रमंडळी, भावंडांना हटकून पाठवतेच पाठवते (जेणेकरून नेक्स्ट टाईम आमचे त्यांनी काढलेले फोटूज अजून देखणे, नेटके यावेत!!! :फिदी:)
छान सोप्या भाषेत लिहितेस त्यामुळे माझ्यासारख्या तंत्रपंगु (टेक्नॉलॉजिकली हॅन्डीकॅप्ड ला अजून चांगला शब्द कोणता? :-)) व्यक्तीलाही उलगडा होऊ लागतो! धन्यवाद!
व्वा उस्ताद व्वा!!!
व्वा उस्ताद व्वा!!!
खूपच छान नि उपयुक्त माहिती..
खूपच छान नि उपयुक्त माहिती.. अजून येउ दे..
नंद्या, योगेश२४
नंद्या, योगेश२४ ,आशुतोष०७१,आऊटडोअर्स ,रंगासेठ,जयु ,दिनेशदा,झकासराव,हिम्सकूल,इंद्रधनुष्य,Yo.Rocks सगळ्यांनाच प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद.
@मन-कवडा,हो, बरोबर. जरा जास्त ब्लर हवे होते, काढले तेव्हा!!
@सूर्यकिरण , धन्स पण त्याला फार वर्ष झालीत आता . ३/ ४ तरी. मला नक्की आठवत नाहिए.
@असुदे, अजुन फोटो टाकायचा प्रयत्न करेन. फक्त अस नको व्हायला कि फोटो जास्त आणि मजकुर कमी
@अश्विनीमामी, नक्की घ्या.
@महेश देशपांडे, हो बरोबर आहे.
@अरुंधती कुलकर्णी, नक्की दे लिंक्स
सावली, धन्स
सावली, धन्स
क्या बात है, सावली. अगदी शतश
क्या बात है, सावली. अगदी शतश धन्यवाद.
मी बरेच जणांकडून ही भानगड समजावून घेण्याचा प्रयत्न केला. पण आत्तापर्यंतचा अनुभव म्हणजे प्रोफेशनल फोटोग्राफरना असे नीट समजावून सांगता येत नाही. कदाचित त्यांच्या ते इतके अंगवळणी पडले असेल की त्यात काय सांगायचे असा प्रश्न असेल. असो.
इतक्या साध्या आणि सोप्या भाषेत समजावून दिल्याबद्दल आभार.
आणि हो ही लेख-मालिका फारच सुरेख चालली आहे आणि लवकरच पुस्तकरुपाने येणे आवश्यक आहे. आजकाल इंग्रजीत यावर अनेक मासिके आणि पुस्तके उपलब्ध आहेत. पण मराठीत इतके सहजसुंदर लिखाण अजूनतरी कुठे पाहण्यात नाही. त्यामुळे कळकळीची विनंती ही गोष्ट मनावर घे.
बाकी मला पडलेले काही प्रश्न...
बरेचदा ट्रेकिंग करताना असे होते की एका भागात गडद सावली आणि दुसऱया भागात प्रखर उन. अशा वेळी एकतर तो फोटो अंडरएक्सपोज होतो कींवा ओव्हर. त्यासाठी काय करायचे?
चँप त्याचे उत्तर सावलीच्या या
चँप त्याचे उत्तर सावलीच्या या आधीच्या भागात. आहे. वाचून बघ बरे.
>>पण मराठीत इतके सहजसुंदर
>>पण मराठीत इतके सहजसुंदर लिखाण अजूनतरी कुठे पाहण्यात नाही.
अगदी अगदी... यासाठी सावली चे खूप आभार
आठवले! कच्च्या (रॉ) छ्ब्या
आठवले! कच्च्या (रॉ) छ्ब्या साठवण्याबाबत काय मत आहे?
मी सध्या जेपेग आणी रॉ साठवतो आहे. पण त्यामुळे कठीणड्राईव्ह त्याचे कठीण झाले आहे असे किंचाळतो आहे.
कमी झुम असल्याने पक्षी छोटा भाग व्यापतात. रॉ मधील तेव्हढाच भाग वापरुन त्याचे प्रोसेसींग केले तर जास्त डिटेल्स दिसतील असा माझा कयास आहे.
छान माहितीपूर्ण लेख!
छान माहितीपूर्ण लेख!
धन्यवाद. आश्चिग तुम्हाला
धन्यवाद.
आश्चिग
तुम्हाला जास्त हार्डड्राइव्ह लागतीलच. जेपेग स्टोअर केलि नाहित तरी चालेल. फक्त रॉ ठेवा शक्य असेल तर.
माझ्याकडे १३०जिबी ड्राइव्ह होता खुप जुना तो केव्हाच भरला मग मी १.५टिबी चा घेतला होता तो बराच चालेल अजुन.