आमचा देश न आम्ही

Submitted by अनिकेत आमटे on 18 August, 2010 - 23:47

१२ ऑगस्ट २०१०
दुपारचे ४ वाजले होते...दवाखान्याची O.P.D. सुरु होती...अचानक लोक बिरादरी प्रकल्पाच्या गेट मधून काही आदिवासी बांधव एका माणसाला खाटेवर उचलून आणतांना दवाखान्यात काम करणाऱ्या माणसाने पाहिले....आणि धावपळ सुरु झाली....लोक बिरादरी प्रकल्पा पासुन सुमारे २५ किलो मीटर अंतरावर असलेल्या हितापाडीच्या जंगलात घराला कुंपण करण्यासाठी बांबू आणावयास व कंद-मुळे गोळा करण्यास गेलेल्या एका आदिवासी बांधवावर जंगलातील मादी अस्वलाने हल्ला चढविला....शरीराच्या अनेक भागावर अस्वलाने चावून अक्षरशः लचके तोडले होते...जंगलात एकटाच गेला असल्या मुळे त्या आदिवासी बांधवाला शोधून काढण्यास इतरांना उशीर लागला....सकाळी सुमारे ८ वाजता त्याच्या वर हल्ला झाला...हे गाव जंगलात आहे....रस्ते अतिशय वाईट...गाडी जाण्याचा प्रश्नच नाही...चालत आणि उचलून असेच आणावे लागते आजही.......आणि पुढे किती वर्षे कोण जाणे.....चालत उचलून आणे पर्यंत संध्याकाळचे ४ वाजले होते..... डॉ. प्रकाश-डॉ. मंदाकिनी यांनी प्राथमिक तपासणी केली....डॉ.दिगंत आणि डॉ.अनघा व इतर सहकाऱ्यांनी त्या जखमी बांधवाच्या जखमा स्वच्छ करून आणि अनेक टाके देऊन पट्टी बांधून बंद केल्या....या सर्व प्रकाराला तब्बल २ तास लागले....एवढ्या मोठ्या जखमा होत्या सर्वांगावर....पण त्या आदिवासी बांधवाची सहन शक्ती प्रचंड होती....तो पूर्ण पणे शुद्धीत होता...त्याने स्वतः ओढवलेला प्रसंग आम्हास सांगितला....फोटो पाठविण्याचा एकच उद्देश आहे....तो म्हणजे लोकांना परिस्थितीची जाण व्हावी....

Bear Bite Patient-1 -12 August 2010.jpg

१४ ऑगस्ट २०१०
रात्रीचे ८ वाजले होते...छत्तीसगड च्या डोक्के गावातील एका आदिवासी बांधवाला अश्याच प्रकारे दवाखान्यात आणले आहे...हा माणूस तब्बल ३ दिवसांनी लोकांना सापडला...त्याच्या जखमांना प्रचंड दुर्गंधी येत होती....या माणसाचा एक डोळा अस्वलाच्या हल्ल्यात निकामी झाला होता....त्याच्यावरही वरील प्रमाणेच उपचार केल्या गेले....लोक बिरादरी प्रकल्प हा महाराष्ट्र-छत्तीसगड-आंध्र प्रदेश च्या सीमेवर आहे....२००-२५० किलोमीटर अंतरावरून आदिवासी आणि इतरही गरीब बांधव या दवाखान्यात नेहमीच येत असतात.....राज्ये बदलली तरी परिस्थिती सारखीच आहे....छत्तीसगड मध्ये तर परिस्थिती अजून जास्त वाईट आहे.....कोण तारणार या सर्व गरीब-निरपराध बांधवांना? स्वातंत्र्य मिळाल्या पासुन किंचितही सुधारणा होत नाही...याला कोण आहे जबाबदार? या सर्व गरीब आदिवासी बांधवांसाठी गेली अनेक वर्षे करोडो रुपयांची Packages जाहीर होतात...मग परिस्थिती का बदलत नाही? संवेदना कधी होणार जाग्या? माणुसकी आणि लाज कुठे गहाण टाकली माणसाने? हा भ्रष्टाचार कधी होणार नष्ट? कोण करणार नष्ट? अनेक प्रश्न आहेत मनात पण मार्ग काय?

Bear Bite Patient-1 -14 August 2010.jpg

देशात सुधारणा प्रचंड झाली आहे....पण नेमके कुठे-कुठे?......Multiplex, Big Bazaar, मोठाल्ले MOLLS, हॉटेल्स, कोर्पोरेट सेक्टर्स, मोबाईल, इंटरनेट आणि I.T. या सर्व क्षेत्रातील प्रगती हे सगळे आजही फक्त्त शहरा पुरतेच मर्यादित आहेत.....अपवाद-काही ठीकाणी ग्रामीण भागात मोबाईल आणि इंटरनेट सेवा पोहोचली आहे. ती पण क्रांती आहे.....पण आदिवासी बांधव आणि शहरातील झोपडपट्टीत राहणारी गरीब जनता यांच्या साठी जी काही कोट्यावधींची PACKAGES दरवर्षी जाहीर होतात त्याने नेमका विकास होतो तरी कोणाचा? खेड्यातील-पाड्यातील शाळांची परिस्थिती अतिशय दयनीय आहे.....रेशन वेळेवर मिळाले नाही म्हणून अनेक आश्रम शाळा या वर्षी तब्बल २०-२५ दिवस उशिराने सुरु झाल्यात.....त्या शाळांचे परीक्षण करणार कोण? परीक्षण करणाराही भ्रष्टाचारी निघाला की झाले.....अशा अनेक शाळा या महाराष्ट्रातील खेड्या-पाड्यात आहेत जिथे शिक्षक फक्त्त १५ ऑगस्ट, २६ जानेवारी, २ ऑक्टोबर आणि पगाराच्या दिवशी जातात....१० वी - १२ वी च्या बोर्डाच्या परीक्षेत १०० टक्के कॉपी सर्रास चालते....खेड्या पाड्यातील ९० % शिक्षक दारूच्या आणि गुटका च्या आहारी गेले आहेत....अनेक शाळांच्या समोरच पानठेला आढळतो(हे कायद्याने गुन्हा आहे तरी पण...) .....हेच शिक्षक मुलांचे आदर्श ठरतात...आणि मग मुलं पण त्याच मार्गी लागतात...तसेच हाल खेड्या-पाड्यातील दवाखान्यांचे आहेत...कोणीही डॉक्टर तयार नसतो खेड्यात जाऊन राहायला....या भागातील एका तालुक्याचा तहसीलदार आदिवासींच्या खिशात हात घालून पैसे काढायचा, सर्रास दारू पिऊन ऑफिस मध्ये बसायचा, कित्येकदा दारू पिऊन गटारात पडलेला आम्ही स्वतः त्याला बघितले आहे......सहावा वेतन आयोग लागला म्हणून काय ही परिस्थिती सुधरणार थोडी आहे.....मग हे लक्षात घ्यायला हवे की योग्य अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण, रस्ते, वीज, या मुलभूत सुविधा मिळणे हा प्रत्येक भारतीय नागरिकाचा हक्क आहे तसा तो आदिवासी आणि गरीब जनतेचा पण हक्क आहे... कारण तो ही भारतीयच नागरिक आहे....मुळ मुद्दा असा की स्वातंत्र्या नंतर जी काही PACKAGES जाहीर झालीत त्यातील एक किंवा दोन PACKAGES नीट आणि पूर्णपणे गरीब जनतेसाठी वापरली गेली असती तर देशाचे व गरिबांचे सोने झाले असते.....यागरीब जनतेला काम द्या, शिक्षणात संधी द्या....निवडणुकीत मत मिळविण्यासाठी आयते काहीही देऊ नका..... त्यांना लायक बनवा.... स्वतःच्या पायावर त्यांनी उभे राहावे असे शिक्षण द्या....अशा योजना राबवा.....योग्य अधिकाऱ्याची निवड करा...चांगले निर्व्यसनी शिक्षक व डॉक्टर नेमा.....जो चांगले काम करेल त्यालाच पगार द्या....जो काम करणार नाही त्याच्यावर कारवाई करा....त्या भ्रष्टाचारी माणसाला कायमचे निलंबित करा.....देश कुठलाच वाईट नसतो....पण त्या देशाला बळकटी देण्याचे काम आपण करायला हवे....भ्रष्टाचाराच्या घाणेरड्या विळख्यातून देशाला मुक्त करायचा आपापल्या परीने प्रयत्न करायला हवा... नुसते हवेत बोलून चालणार नाही....प्रत्येकाने कृती करायला हवी....प्रत्येक माणसाच्या मर्यादा असतात....सर्वांचे काम सारखे असू शकत नाही...प्रत्येक माणसाची काम करण्याची वेगळी पध्दत असते.....स्वतःला पडताळून प्रत्येकाने आपल्या कुवती प्रमाणे देशाला बळकटी देण्याचे काम करावे....सर्व भ्रष्टाचारी लोकांना विरोध करून व त्यांना धडा शिकवून काम केले पाहिजे...समाजाप्रती संवेदना, माणुसकी, प्रेम जागृती झाल्या शिवाय हे शक्य नाही.....म्हणून सुरवात स्वतः पासुन करावी....

काही लोकांचे म्हणणे असते की दर वर्षी स्वातंत्र्यदिनी भ्रष्टाचार, सरकार आणि राजकीय नेते याच विषयी चर्चा होते...चांगले काय घडले मागील वर्षात हे कोणीही बोलत नाही....याचाच अर्थ असा की भ्रष्टाचाराने चांगल्या घडलेल्या प्रत्येक गोष्टीवर दरवर्षी मात केली आहे.....म्हणजेच भ्रष्टाचाराचेच पारडे जड झाले...मग या माणसांवर आणि त्यांच्या देशद्रोही कारभारावर जास्त आणि नेहमीच चर्चा होणे अगदी नैसर्गिक आहे.....आपण लिहिणारे आणि वाचणारे थोडीफार शिकलेली लोक आहोत....त्यामुळे आपले कुठल्याही प्रकारे शोषण झाले की आपण त्याची चर्चा करू शकतो.....आपणही या मध्ये भरडले जातोय.....पण जो अतिशय गरीब आहे...अशिक्षित आहे अशा माणसाचे जेव्हा शोषण होते...तो जेव्हा भरडला जातो....तेव्हा त्याला काय करावे ते काहीही कळत नाही ....ज्याच्या कडे धड अंग झाकायला कपडे नाहीत, दोन वेळेसचे पोट भरण्याची मारामार असते अशा बांधवांना सुद्धा भ्रष्टाचारी लोक सोडत नाहीत...जो आधीच नागवा आहे त्याला अजून नागवे करायचे हे आपल्या देशात सर्रास चालते...कारण त्याला आवाज नाही...त्याच्या आई-बहिणीवर बलात्कार केला तरी तो आवाज काढू शकत नाही....त्याच्या कडे पैसा नाही....कोणीही त्याची हाक ऐकत नाही....आदिवासी-गरीब लोकांनाही मन असत, भावना असतात आणि जीव पण असतो...हे सगळे जाणीव पूर्वक विसरले जाते...आणि त्यांच्यावर अत्याचार केला जातो..... हेच चित्र कायम ठेवायचे आहे या भ्रष्टाचारी लोकांना.....असेच दिसते....म्हणजेच गरीब-आदिवासींच्या नावे दरवर्षी कोट्यावधींची PACKAGES जाहीर करता येतील.....आरोग्य खात्याचे वेगळे, शिक्षण खात्याचे वेगळे, कृषी खात्याचे वेगळे.....राज्य सरकारचे वेगळे.....केंद्र सरकारचे वेगळे.....असे कितीतरी PACKAGES ....पण त्यातील जास्तीत जास्त मदत ही मधल्या मधेच लंपास होते....देशात अनेक ठिकाणी मोठ-मोठ्या धरणान मुळे लाखो लोकांना आपले घर सोडावे लागले....विस्थापित व्हावे लागले...त्यांना कधीच योग्य मोबदला मिळाला नाही....आणि त्यांचे पुनर्वसन पण नीट झाले नाही....ही गरीब अशिक्षित जनता भ्रष्टाचारी राजकारण्यांच्या भूल-थापांना नेहमीच बळी पडत असते.....आणि आपले सर्वस्व गमावून बसते.....काय हाल होत असतील या लोकांचे याची आपण कल्पना पण करू शकत नाही....अशा अनेक प्रगतीशील योजना सरकार आखत असते (अर्थात यात जास्त फायदा सरकारी लोकांचा असतो)....पण त्या मध्ये जे लोक भरडले जातात त्यांचे नीट पुनर्वसन केल्यावरच या योजना राबविल्या गेल्या पाहिजेत....पुनर्वसित लोकांना घर, जमीन, आरोग्य सुविधा आणि मुलांना चांगले शिक्षण हे सर्व नीट पुरवल्या गेले पाहिजे....किती वर्षे लोक हे सहन करणार....या अत्याचारातून नक्कीच पुढे मोठा उठाव होईल....करायला काम नाही, खायला अन्न नाही म्हणून ही जनता नाईलाजेस्तव भुरट्या चोऱ्या, लुट मार किवा भिक मागतील....मग परत आपला त्यांच्या कडे बघण्याचा दृष्टीकोन बदलेल....सहानुभूती दूर होऊन त्यांच्या बद्दल चीड निर्माण होईल....पण या मागची कारणे आपण कधी तपासून पाहणार.....जन जागृती ही केलीच पाहिजे....गावा-गावात जाऊन, झोपडपट्टी मध्ये जाऊन, आदिवासी पाड्यात जाऊन...लोकांना शिक्षण घ्यायला भाग पडावे लागेल....म्हणजेच तो आयुष्यात चांगला मार्ग स्वीकारेल...अन्यायाला वाचा फोडू शकेल....हे सर्व आपल्या सारख्या सामान्य माणसाने एकत्र येऊन करण्याचे काम आहे.....ही कामे निस्वार्थ पणे व्हायला हवीत...आपापल्या परीने प्रत्येक सुशिक्षित नागरिकाने तुम्ही राहता तेथील आसपासच्या खरच गरजू लोकांना मदत करावी....बदल नक्की होईल....वेळ लागेल पण नक्की होईल.....आपल्या पुढच्या पिढ्या आनंदाने जगू शकतील.....
.....म्हणूनच या विषयावर चर्चा होणे अत्यंत आवश्यक आहे....मग ही चर्चा फक्त्त घरापुरतीच मर्यादित नको....चांगल्या शाळांमध्ये जाऊन, कॉलेज मध्ये जाऊन भ्रष्टाचार विरोधी शिक्षण देण्याचे काम करायला हवे...पुढील पिढी मधील सरकार तरी कमी भ्रष्टाचारी होईल....कारण पुढील राजकारण्यांची पिढीही याच अशाच शाळांन मधून शिकून बाहेर पडणार आहे....(अर्थात राजकारण्यांना शिक्षण सक्तीचे केले तर बदल शक्य आहे)....शाळेतच चांगले संस्कार मुलांवर झालेत तर नक्कीच त्याचा फायदा पुढील पिढीला होईल......माणसाने नेहमीच आशावादी असावे....

अनिकेत प्रकाश आमटे
संचालक, लोक बिरादरी आश्रमशाळा, हेमलकसा
मो. ९४२३२०८८०२
www.lbphemalkasa.org.in
www.lokbiradariprakalp.org

गुलमोहर: 

अनिकेत, अगदी भिषण वास्तव मांडलं आहे.

मीही फोटोबद्दल लिहीणार होतो मगाशीच. काही विचार करता आला त्याबद्दल तर जरुर करा...

अरे त्या फोटो वरुन वास्तव कळते. ते फोटो पाहिजेतच.

अनिकेत तुम्हाला जरा ते अनेक .. .. काढता आले तर काढाल का?

अनिकेतजी हे खरोखर भयानक आहे. आमच्यासारखीच माणसं तिथं इतकं धोकादायक जिवन जगताहेत, आयुष्याशी लढताहेत आणि आम्ही फ़क्त इथे बसुन बोटं चालवतो, भ्रष्टाचार आणि दहशतवादावर कविता करतो. आ. आमटे कुटूंब वर्षानुवर्षे तिथे प्रत्यक्ष या पातळ्यांवर निसर्गांशी लढतय. तुम्ही लोक जे करताय ते पाहिल्यावर खरोखर स्वत:च्या निष्क्रिय वाचाळतेची लाज वाटते.
याविषयी आपण काही करु शकु का? आपण मायबोलीकर या विषयावर एकत्र येवुन काही कृती करु शकू का?

विशाल, खरोखर काहीतरी करण्याची इच्छा आहे पण हे खूप कठीण आहे. अन ह्यात धोकाही तितकाच आहे रे.. अन तो धोका म्हणजे बिनभरवष्याचा टोणगा.. कधी शिंगावर घेवून उचलेल याचा अजिबात नेम नाही. यासाठी माहिती अधिकार आहेच कि रे.. ४ दिवसांपुर्वी सकाळमधे यावर एक छानसा लेख आला आहे मी संध्याकाळी त्याचे डिटेल्स टाकतो इथे. पण जर खरच काही चांगल्या कल्पना असतील या विरोधात तर मी तयार आहे रे विशाल तुझ्याबरोबर.

भिषण वास्तव आहे....फोटो टाकवे कि नाही हे मी अनेक मित्रांना विचारले...७५ टक्के हो टाक म्हणालेत...कोणालाही त्रास देण्याचा हेतू नाही...जर फोटो पाहून त्रास झाला असल्यास माफ करावे...हे असे अनेक रुग्ण आमच्या दवाखान्यात येत असतात...प्रत्यक्ष किंवा फोटो पाहिल्या शिवाय आपल्याला त्याची तीव्रता-भीषणता कळू शकत नाही...पूर्वी आमच्या कडे कॅमेरा-कॉम्प्युटर-इंटरनेट या सुविधा नव्हत्या....म्हणून जुना रेकॉर्ड फारच कमी आहे आमच्या कडे...लोक बिरादरी प्रकल्पाच्या सुरवातीच्या काळात जे काही आमचे हितचिंतक प्रकल्पाला भेट द्यायचे त्यांनीच काढलेले काही छायाचित्रे एवढाच काय तो रेकॉर्ड आहे आमच्या कडे....

भीषण आणि बोचरं वास्तव्य. आम्ही जर बघूही शकत नाही हे फोटो तर त्या लोकांनी हे सगळं कसं सहन केलं असेल त्याची कल्पना येतेय. त्यामुळे आम्हांला ते फोटो बघायला त्रास जरी झाला तरी ते इथे गरजेचे आहेत, परिस्थितीची कल्पना त्यावरूनच येतेय.

ह्म्म.. अनिकेतदादा तुझी मेल आली तेंव्हापासुन मन सुन्न आहे..
खरच अवघड आहे.
आणि ज्या परिस्थितीत तुम्ही सगळे काम करताय त्याबद्दल तुमच्या सगळ्यांच्या कामाला मनापासुन सलाम.

बापरे!! कसल्या अवघड परिस्थितीत किती चांगले काम करता तुम्ही. लेख वाचून सुन्न झालेय. आयुष्य सगळे लहान गावामधे गेल्याने हे वास्तव फार जवळुन पाहिले आहे. हे असे शिक्षक, शाळा सगळेच. काय करावे, कुठे सुरुवात करावी हेच कळात नाही.

आम्हांला ते फोटो बघायला त्रास जरी झाला तरी ते इथे गरजेचे आहेत, परिस्थितीची कल्पना त्यावरूनच येतेय.>>> अनुमोदन.
ज्या परिस्थितीत तुम्ही सगळे काम करताय त्याबद्दल तुमच्या सगळ्यांच्या कामाला मनापासुन सलाम.>> १००%

खरचं अगदी भीषण वास्तव्य आहे हे. अश्या अवघड परिस्थितीत काम करणार्‍या तुम्हा सगळ्यांना मनापासून सलाम.

१) स्वातंत्र्य मिळाल्या पासुन किंचितही सुधारणा होत नाही...याला कोण आहे जबाबदार? या सर्व गरीब आदिवासी बांधवांसाठी गेली अनेक वर्षे करोडो रुपयांची Packages जाहीर होतात...मग परिस्थिती का बदलत नाही? संवेदना कधी होणार जाग्या? माणुसकी आणि लाज कुठे गहाण टाकली माणसाने? हा भ्रष्टाचार कधी होणार नष्ट? कोण करणार नष्ट?

२) देशात सुधारणा प्रचंड झाली आहे....पण नेमके कुठे-कुठे?......Multiplex, Big Bazaar, मोठाल्ले MOLLS, हॉटेल्स, कोर्पोरेट सेक्टर्स, मोबाईल, इंटरनेट आणि I.T. या सर्व क्षेत्रातील प्रगती हे सगळे आजही फक्त्त शहरा पुरतेच मर्यादित आहेत.....अपवाद-काही ठीकाणी ग्रामीण भागात मोबाईल आणि इंटरनेट सेवा पोहोचली आहे. ती पण क्रांती आहे.....पण आदिवासी बांधव आणि शहरातील झोपडपट्टीत राहणारी गरीब जनता यांच्या साठी जी काही कोट्यावधींची PACKAGES दरवर्षी जाहीर होतात त्याने नेमका विकास होतो तरी कोणाचा?

३)मुळ मुद्दा असा की स्वातंत्र्या नंतर जी काही PACKAGES जाहीर झालीत त्यातील एक किंवा दोन PACKAGES नीट आणि पूर्णपणे गरीब जनतेसाठी वापरली गेली असती तर देशाचे व गरिबांचे सोने झाले असते.

४) यागरीब जनतेला काम द्या, शिक्षणात संधी द्या....निवडणुकीत मत मिळविण्यासाठी आयते काहीही देऊ नका..... त्यांना लायक बनवा.... स्वतःच्या पायावर त्यांनी उभे राहावे असे शिक्षण द्या....अशा योजना राबवा.

५) .पण जो अतिशय गरीब आहे...अशिक्षित आहे अशा माणसाचे जेव्हा शोषण होते...तो जेव्हा भरडला जातो....तेव्हा त्याला काय करावे ते काहीही कळत नाही ....ज्याच्या कडे धड अंग झाकायला कपडे नाहीत, दोन वेळेसचे पोट भरण्याची मारामार असते अशा बांधवांना सुद्धा भ्रष्टाचारी लोक सोडत नाहीत...जो आधीच नागवा आहे त्याला अजून नागवे करायचे हे आपल्या देशात सर्रास चालते...कारण त्याला आवाज नाही...

६) अशा अनेक प्रगतीशील योजना सरकार आखत असते (अर्थात यात जास्त फायदा सरकारी लोकांचा असतो)...

७) किती वर्षे लोक हे सहन करणार....या अत्याचारातून नक्कीच पुढे मोठा उठाव होईल....करायला काम नाही, खायला अन्न नाही म्हणून ही जनता नाईलाजेस्तव भुरट्या चोऱ्या, लुट मार किवा भिक मागतील...

८) मग परत आपला त्यांच्या कडे बघण्याचा दृष्टीकोन बदलेल....सहानुभूती दूर होऊन त्यांच्या बद्दल चीड निर्माण होईल....पण या मागची कारणे आपण कधी तपासून पाहणार...

९) म्हणूनच या विषयावर चर्चा होणे अत्यंत आवश्यक आहे....मग ही चर्चा फक्त्त घरापुरतीच मर्यादित नको....चांगल्या शाळांमध्ये जाऊन, कॉलेज मध्ये जाऊन भ्रष्टाचार विरोधी शिक्षण देण्याचे काम करायला हवे...

अनिकेत, तुम्ही अत्यंत महत्वाचे मुद्दे मांडलेत.
बर्‍याच दिवसानंतर एक चांगला लेख वाचायला मिळाला.
आजकाल असा विचार करणारी माणसेच दुर्मिळ झाली. आणि त्या विचाराला अंगिकारून पुढे जाण्याची गोष्ट त्यापेक्षाही दुर्मिळ.

लेख फ़ार फ़ार आवडला. आवडत्या दहात स्थान.
अवश्य भेटू.

अनिकेत, आमचा देश अन आम्हि..... खरच किति भिशण आहे सार... बर्याच वर्शानन्तर नागपुर मेडिकल कॉलेज ला जाण्याचा प्रसन्ग आला. तिथलि अधोगति बघुन अत्यन्त वाईट वाटले. खर तर सर्वच शासकिय यन्त्रणा (आरोग्य, शि़क्षण) ह्याच मार्गाने जात आहे. उद्या हिच चित्रे नागपुर, पुणे वा मुम्बैतलि आहे असे सान्गितल्यास आश्चर्य वाटु नये अशि परिस्थिति आहे.

>> पण या मागची कारणे आपण कधी तपासून पाहणार...
कारणे खरच आपल्याला माहित नाहि काय. भ्रश्टाचार, जातियवाद, राजकारण हिच सर्वात मोठी कारणे आहेत. ह्याचा फायदा घेणार्या व्यापारी शक्तिपुढे आज सारा देश गुलाम आहे. पुर्वि इन्ग्रज हा व्यापार करित. ह्या नविन गुलामि चि जाणिव आम्हाला होनार कधी, त्या विरुद्ध आपण लढणार कधि... सारच अशक्य..

भयानक वास्तव! डोळे खाडकन उघडायला लावतील असे फोटो..... आणि तुम्ही मांडलेले मुद्देही तेवढेच महत्त्वाचे! इथे फोटो टाकल्याबद्दल अभिनंदन! आपापले डोळे झाकून घेतले म्हणजे परिस्थिती बदलत नसते, त्यासाठी आपणच ठोस पावले उचलावी लागतात. ह्यातून भ्रष्टाचारमुक्त राष्ट्राकडे प्रवास करण्याची प्रेरणा सर्वांना मिळो!

नमस्कार अनिकेत,

तुझ्या लेखावर प्रतिक्रिया देण्यापेक्षा काही प्रत्यक्ष काम करता आले तर त्या दृष्टीने काम करित आहे. भारतात आल्यावर आपली भेट होईलच, तोवर इथे भेटत राहु.

फेसबुक वर आपली ओळख आहेच, तु इथे आलास ह्याचा आनंद वाटला. आजवर मायबोली वर आमटे परिवाराबद्दल खुप जणांनी लिहिलेले आहे. आज आमटे परिवाराचा सदस्य मायबोलीकर झाला !

-भारत करडक

Pages