रानभाजी १५) शेवग्याचा पाला

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 27 July, 2010 - 06:49
लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

शेवग्याचा पाला
२ मोठे कांदे
२-३ मिरच्या
३-४ पाकळ्या लसुण
चिमुटभर हिंग
पाव चमचा हळद
३-४ खवलेल चमचे ओल खोबर
चविपुरते मिठ
चिमुटभर साखर
तेल

क्रमवार पाककृती: 

प्रथम शेवग्याचा पाला काढुन धुवुन चिरुन घ्यावा. मग तव्यावर थोडा भाजावा. आता तेलावर लसुण टाकुन मिरची, कांदा, हिंग, हळद घालावे वरुन शेवग्याचा भाजलेला पाला घालावा परतुन थोडा वेळ शिजवावा. भाजलेला असल्यामुळे जास्त शिजवण्याची गरज नसते. मग मिठ, साखर, खोबर घालून थोड परतवुन गॅस बंद करावा.

वाढणी/प्रमाण: 
४-५ जणांसाठी
अधिक टिपा: 

*आमच्याइथे हा पाला भाजून घेण्याची पद्धत आहे. पण न भाजताही मी भाजी केली आहे. ती भाजलेल्या पानाएवढी टेस्टी नाही लागली. कदाचित ह्या भाजीतील जडपणा जाण्यासाठी पाला भाजुन घेत असतील.

*इतर पालेभाज्यांप्रमाणे ह्या भाजीतही डाळी घालता येतात.

*शेवग्याच्या फुलांचीही भाजी करतात.

*ही भाजी उष्ण असल्याने पावसाळ्यात किंवा हिवाळ्यातच खातात.

*बाळाच्या पाचविला ही भाजी सटवाईला नेवेद्य म्हणून पानावर दाखवुन ते नेवेद्य बाळाच्या आईने खाण्याची पद्धत आहे.

*बाळंतीणीसाठीही ही भाजी पोषक असते.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रैना, शेवग्याच्या शेंगाचे पिठले भारी लागते.. आईला पाकृ लिहायला सांगतो..
शेवग्याच्या पाल्याचे सूपपण लै भारी होते.. पालकाचे सूप करतात तसेच शेवग्याच्या पाल्याचे पण करायचे..

साधना नक्की.
टण्या मी पण करते शेंगांचे पिठले. आता सुपही करुन बघेन.
मी चिंच गुळातल्या शेंगाही करते. अगदी लहान मोठ्यांना सगळ्यांनाच आवडतात ह्या. मी मागे ह्याची रेसिपीही लिहीली होती.

या खाटिचा माझ्यावर प्रयोग झालाय, अजून हसू येते. मी सहा सात वर्षांचा असेन. शाकाहारी बनून, २/३ वर्षे झाली होती. मालवणला असताना, सगळी चुलतभावंडे चिडवायला लागली, (तू आमच्यापैकी नाहीस. गुजराथी आहेस, हॉस्पिटलमधे बदलला वगैरे ) मी रागाने उकडलेले मूळे (शिंपल्यांना खास मालवणी शब्द ) खाल्ल्या. केवळ ५/६ खाल्या असतील. मग माझा जो वकार युनुस झाला, सगळे घर डोक्यावर घेतले मी. डॉक्टरांना बोलवावे लागले. पण शेवटी मोठ्या काकीने पाजलेल्या चमचाभर खाटीने, आराम पडला.
त्यानंतर लोकांच्या चिडवण्याकडे मी दुर्लक्ष करु लागलो.

हो ना. आणि तुम्हाला सगळ्या माशांची माहीती आहे. त्यातुन तुम्ही मित्रांना बनवुन खायला घालता तरी स्वतः खात नाही. वासानेही तुम्हाला खावस नाही वाटत ?

मालवणला फक्त मे महिन्यातच जायचो. त्यामूळे ...
पुढे गोव्यात असताना पण असेच व्हायचे. मासे, भात आणि दारु वर्ज्य, मग गोव्यात का राहतोस, असे लोक विचारायचे !
बाकी चव न घेता पदार्थ शिजवायचा, हा आईकडून मिळालेला वारसा. ती कधीही पदार्थ चाखून बघत नाही. मीठ घातले कि नाही, हे पण तिला वासावरुनच कळते.

दिनेशदा मी पण कधी चव घेत नाही. माझ्या सा.बा. नविन नविन लग्न झाल तेंव्हा सांगायच्या की चव घेउन बघायची. पण मला कधी गरज वाटली नाही. कारण मला माझ्या अंदाजावर विश्वास आहे. मी अजुनही कितीही प्रमाणात बनवले तरी सगळे अंदाजेच टाकते. चव बघायची जरुर लागत नाही.

माझा पण अनुभव हरभराच्या भाजीचा अतिभयानक आहे...झाले असे कि आम्ही लहानपणी जेवायला बसलो होतो आणि आमच्या वडिलांच्या मित्रा कडून एक टिफिन आला. अतिशय गरम होता. त्यांच्या कडून नेहमी मासे किवा चिकन यायचे. भूक लागलेली आणि तो टिफिन उघडेना. खूप प्रयत्न केले आणि उघडला त्या भाजीचे स्वरूप हिरवे गार आणि आमची अपेक्षा चमचमीत तिखट मटणाची होती. ती भाजी आंबट आणि चवीला बेचव लागली त्यात अपेक्षाभंग दुख्ख जास्त झाले होते.

बी आमटीत उकळीआल्यावर म्हणजे कोथिंबिरसारखी घालायची असेल तर मग शिजते का ही भाजी लगेच ?>>>>>>
पाने कोवळी असतात शेवग्याची त्यामुळे उकळी आलेल्या डाळीत टाकली की लगेच ती शिजतात. वरणाचा रंग मंद हिरवा होतो. पाला घातला वरणात की मग कोथिम्बीर घालायची नाही. पाला थोडा कच्चा थोडा शिजलेला ठेवला की त्यातील सत्व टिकून राहते आणि चव देखील नुस्त्या पाल्याची येते. इथे वारेमाप मिळतो हा पाला. तमिळ लोकांचे रोजचे अन्न आहे.

मीठ घातले कि नाही, हे पण तिला वासावरुनच कळते.>>>> हो. मीठ घातले की वेगळाच वास येतो अन्नाला. मलाही वासावरूनच मीठाचे प्रमाण (कमी/जास्त) बघायची सवय आहे.

शेवग्यासारखं उत्कृष्ठ प्रथीनांचा साठा असणारं दुसरं कोणतंही झाड नाही. बाजारात मिळणाऱ्या कोणत्याही प्रोटीन पावडरचा बेस मोरिंगा म्हणजेच शेवगा असतो. भारतातून पाल्याची पावडर निर्यात होते आणि त्याची प्रोटीन पावडर आयात होते व आपण इपोर्टेड म्हणून विकत घेतो.

खर आहे . मी हल्ली मधून मधून शेवग्याचा पाला घालते जेवणात. काल मुलींनी खावी म्हणून शेवग्याचा पाला पावभाजीत टाकला होता. काही कळल नाही मुलिंना आणि आज कोलंबीत टाकला आहे.

हल्ली आपल्याइकडे सुद्धा मोरिंगा गोळ्या मिळतात. पण लहानपणापासून मुलांना भाजी खायला लावणे हेच बरे. कोवळ्यापाल्याची अनेकदा आवडीने खाल्ली जाते, मात्र पावसाळी म्हणून मुद्दाम केलेल्या टाकळ्याला जरा नाक मुरडतात.

मी एकदा केली होती शेवग्याच्या पानांची भाजी. फारच चरबट लागली, खाववली नाही. तेव्हापासून धसकाच घेतला या भाजीचा.

आता मी हा पाला आणते, सावलीत सुकवते आणि बारीक करून ठेवते. शक्य त्या त्या पदार्थांमधे घालते चिमूट चिमूट. कळतही नाही खाताना.

सहेली पाला कोवळा घ्यायचा. आणि जर अस वाटत असेल तर थोडा आधी भाजून घ्यायचा तव्यावर मग भाजी करायची.

शेवग्याच्या पानांच्या भाजीत शेवटी ( भाजी शिजत आल्यावर) अंडी फोडून घातली तरी भाजी मस्त लागते. किंवा पीठ पेरूनही छान होते.

जागू, आमच्याकडेही ह्याच पद्धतीने शेवग्याच्या पाल्याची भाजी करतात, त्यात मुके वालही(मोड न आलेले वाल) घालतो.
टवणे सरांची सूप करण्याची आयडीया आवडली.

Pages