चॉकलेट लाव्हा केक

Submitted by साधना on 23 July, 2010 - 12:19
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१२५ ग्रॅम चॉकलेट स्लॅब. मी चॉकलेटं करण्यासाठी स्लॅब विकत आणलेली , त्यामुळे ती वापरली. त्याजागी प्लेन कॅडबरी डेअरीमिल्क वापरले तरी चालेल.
१२५ ग्रॅम अनसॉल्टेड बटर. मी अमुल बटर वापरले
३ अंडी
पाऊण कप साखर
पाव कप मैदा

क्रमवार पाककृती: 

१. ओवन २०० डिग्री सेल्सिअसला तापायला लावा.
२. चॉक्लेट आणि बटर एकत्र विरघळवुन घ्या. गॅसवर करायचे असेल तर पाव भांडे भरुन पाणी गरम करत ठेवा आणि त्यात अर्धे आत/अर्धे बाहेर राहिल असे दुसरे एक भांडे बसवुन त्यात चॉक्लेट आणि बटर टाकुन विरघळवा. थेट गॅसवर चॉक्लेट आणि बटर ठेऊन विरघळवु नका. ही स्टेप मायक्रोवेवमध्येही करता येईल.
३. अंडी (योकसकट), साखर आणि मैदा एकत्र करा आणि चांगले फेटून घ्या. बेकींग पावडरची गरज नाही.
४. वरील मिश्रण चांगले फेटले की त्यात चॉकलेटचे मिश्रण थोडे थोडे घाला. (थोडे मिश्रण घाला, सगळे चांगले मिक्स करा, परत थोडे घाला, मिक्स करा असे सगळे चॉकलेट संपेपर्यंत करा)
५. माझ्याकडे छोटे केक्स बेक करायची वेगळी भांडी नाहीत म्हणुन मी आपले चहाचे सिरॅमिक कप वापरले. कप्सना आतुन बटर लावुन घ्या. आणि प्रत्येकात कप ३/४ भरेल इतके मिश्रण ओता.
६. ओवनमध्ये मोजुन १० मिनिटे बेक करा.
७. बाहेर काढुन दोन मिनिटे थंड होऊ द्या. मग केकच्या बाजुने सुरी फिरवुन केक सोडवुन घ्या, कपावर छोटी ताटली ठेऊन कप उलटा करुन केक बाहेर काढा.
८. गरमगरम खायला द्या... Happy

वाढणी/प्रमाण: 
वरील प्रमाणात ६ लहान कप केक होतात
अधिक टिपा: 

१. केक मोजुन १० मिनिटे बेक करा. जास्त वेळ बेक केल्यास केक पुर्णपणे बेक होतो आणि लाव्हा रस पाहिल्याचा आनंद मुलांना मिळत नाही. तसेच केक करुन बराच वेळ झाल्यासही लाव्हा सुकतो. त्यामुळे जराजरा गरम असतानाच मुलांना द्या.
२. मावेत हा केक नीट होत नाही. मुलीने करुन पाहिला पण मावेतला केक आतुन बाहेर बेक होत आला त्यामुळे सेंटर बेक झाले आणि लाव्हा बाहेरच्या बाजुला राहिला Happy

माहितीचा स्रोत: 
पिझ्झाहट, इंटरनेट
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान सोपी रेसीपी, दोन शंका..
१. बेकींग पावडर नाही घातली तर केक छान फुलतो का?
२.मावेत हा केक नीट होत नाही>>>मावेत म्हणजे काय?

बेकींग पावडर नाही घातली तर केक छान फुलतो का?

बेकींग पावडरची गरज नाही या केकला. छान फुलतो त्याशिवायच.

cake.JPG

इनटर्नेट वर एका कपात करायच्या केकची क्रुती पाहिली होती त्याची आठवण झाली. पोरांना मजा वाटेल खायला. ब्राउन रंग मस्त आला आहे. व्हॅनिला इसेन्स नाही का घालायचा? त्याने अंड्याचा वास मास्क होतो व चॉकोलेट खुलून येइल. अर्थात कॅड्बरीत व्हॅनिला असतेच.

मस्त वाटतेय रेसिपी. केला की सांगते तुला कसा झाला केक ते. Happy

एक शंका: साधे मग अवन किंवा मावेच्या कन्व्हेक्शन मधे बेक करताना तडा जाऊन फुटत नाहीत का?

१२५ ग्रॅम अनसॉल्टेड बटर. मी अमुल बटर वापरले

अनसॉल्टेड अमूल बटर मुंबईत मिळू लागले काय?

बटरची १०० ग्रॅमची स्लॅब मिळते तेवढीच वापरली तर चालेल काय? की १२५ ग्रॅमच हवी?? Happy

आणि साध्या गोल अवनमध्ये मग ठेवून चालणर नाहीत ना?

अनसॉल्टेड अमूल बटर मुंबईत मिळू लागले काय?
नाही नं.. पण रेसिपीत वाचुन लोक लगेच विचारतील अनसॉल्टॅड कुठे मिळेल, म्हणुन मी काय वापरले ते सांगितले Happy मुंबईत अन्सॉल्टेड, ओर्गनिक, ४०% फॅट व.व. असले ऑत्प्शन्स मिळाय्ला पुढचा जन्म उजाडेल.. Happy

साधे मग अवन किंवा मावेच्या कन्व्हेक्शन मधे बेक करताना तडा जाऊन फुटत नाहीत का?

नाही. मी सुद्धा घाबरत घाबरतच ठेवले. माझ्याकडे लाओपालाचे एकदम छोटे कप होते ते वापरले.

अंड्याचा वास येत नाही. मी स्पॉंज केक केलेला तेव्हा इसेंस घालायला विसरले होते आणि प्रचंड वास येत होता अंड्याचा. पण या केकला अजिबात येत नाही. तरीही घातला तर काही बिघडेल असे वाटत नाही.

फक्त पाव कप मैदा याचसाठी की त्यामुळे मिश्रण जास्त घट्ट होत नाही आणि केकचा चमच्याने तुकडा पाडला की आतले मिश्रण जरासेच शिजलेले असले तरी प्रवाही राहते आणि बाहेर वाहते... मुलांना जाम मजा वाटते हा वाहता लाव्हा पाहुन..

आणि साध्या गोल अवनमध्ये मग ठेवून चालणर नाहीत ना?
प्रयोग करुन बघ की.. हवे तर वरील मिश्रणाच्या अर्धे घे आणि कर. आणि नाहीच झाले तर सरळ अजुन १० मिनिटे बेक कर. पुर्ण बेक केलेलाही मस्त लागतो... माझे ६ झालेले त्यातले ३ लेकीने लगेच गट्टम केले आणि तिन संध्याकाळी गट्टम केले, तेव्हाही चव सुंदर आली, फक्त आतला लावा सुकला होता

बटरची १०० ग्रॅमची स्लॅब मिळते तेवढीच वापरली तर चालेल काय? की १२५ ग्रॅमच हवी??

केकच्या बाबतीत मी रिस्क घेत नाही. आपण प्रमाण बदलले की केक बिघडतो हा माझा अनुभव आहे. Happy

पुण्यात चॉकलेट स्लॅब कुठे मिळेल

मुंबैत अरिफे नावाचे दुकान आहे, क्रॉफर्ड मार्केट, बांद्रा वेस्ट आणि अंधेरी वेस्टला त्याची दुकाने आहेत. तिथे ही स्लॅब मिळते. त्यांच्या दुकानात चॉकलेट मेकिंग, केक मेकिंगचे सगळॅ साहित्य मिळते पण त्यांची बहुतेक मोनोपॉली आहे ह्या धंद्यात...

अंधेरी वेस्टला शॉपर्स कॉर्नर नावाचा मॉल वगैरे असेल बहुतेक. तिथे आहे. मी अजुन गेले नाहीये. रेल्वे स्टेशनसमोरच आहे. बांद्रयाला शॉपर्स स्टॉप समोर थोडेसे पुढे आहे. दोन दुकानांच्या मध्ये पण जरा आत आहे, रस्त्याला एकदम लागुन नाहीये, पण रस्त्याला लागुन पाटी आहे Happy

चॉकलेट स्लॅब १८० रु. ला अर्धा किलो ह्या भावाने मिळते. तिन प्रकार बिटर, डार्क आणि मिल्क. बिटर आणि डार्क घेऊन ते मिक्स करुन त्याची चॉकलेटे बनवली की एकदम मस्त लागतात चवीला.

अगं पण अमूल बटर सॉल्टेडच असते की... Uhoh

आणि साध्या गोल अवनमध्ये मग ठेवून चालणर नाहीत ना?
प्रयोग करुन बघ की..
हम्म्........ घरचे मग फोडायचा प्रयोग करू म्हणतेस... चालेल Wink

बरं, कोणीतरी होममेड चॉकलेट्सचीही पाकृ टाका ना...

तेच तर सांगतेय की रेसिपीत जरी अनसॉल्टेड असलं तरी आपल्याकडे सॉल्टॅडच मिळते, म्हणुन तेच वापरायचे.

तु कर आज संध्याकाळी. नीरजा खुष होईल अगदी, जर तिला चॉकलेट फ्लेवर पसंत असेल तर...

ब-याच रेसिपीजमध्ये अनसॉल्टेड बटर असते. मी रेसिपी जशी मिळालीय तशी लिहिलीय, म्हणजे ज्यांना अनसॉल्टेडचा ऑप्शन मिळतोय ते तो वापरु शकतात. आपण सॉल्टेड वापरल्यावर काहीतरी फरक पडत असणारच, फक्त लक्षात येत नसेल एवढेच.

कानफुटका मग ठेऊन बघ. मग फुटल्याचे दु:ख जास्त होणार नाही... Happy

घरचे लोणी वापरुन पहा की.

माझी आई आमच्या लहानपणी घरी चॉकलेट्स करायची विकतची परवडायची नाहीत म्हणून. ती घरचे लोणी, साखरेचा पाक, कोको पावडर (साठेचा कोको वापरायची ती), मिल्क पावडर वापरायची त्यात. प्रमाण आता तिला सांगता येणार नाही.

साधना, इथल्या सुगरणींच्या कृती वाचून बेकिंगसाठी धीर गोळा करायचा प्रयत्न करते आहे.
एकदा ठरलं की ही कृती करुन पाहिनच. धन्यवाद. Happy

पण चॉकलेट्-साखरेच्या गोडीबरोबर मिठाची चव चांगली लागत असेल.

आणि अगदी उरकाच्या बायांना घरचं लोणी वापरता येईल की, वेईंगस्केलवर वजन करून Wink

होममेड चॉकलेट्स मी शिकले, केली आणि वाढदिवसाला विकतच्या चॉकलेट्साइवजी तीच दिली या वर्षी ऐशुला आणि शाळेत ती हिटही झाली. आता प्रोब्लेम हा आहे की माझ्याकडचे चॉकलेट स्लॅब संपले आणि नव्या मुंबईतुन मुंबईत जायला जमत नाही... Sad

त्या दुकानाची मोनोपॉली आहे ह्या धंद्यात आणि वर रविवारी दुकान बंदही ठेवतात Sad कुठे दुसरीकडे स्लॅब्स मिळत असतील तर सांगा मंडळी.

अश्वे, ती चॉकलेटच्या वड्यांची पाकृ जुन्या मायबोलीवर बहुतेक आहे. शोधून तुझ्या विपूत चिकटवते.

रैना, हा केक सोप्पा आहे, बेकींग पावडर नसल्याने बिघडायची शक्यता फारच कमी आहे. तुला बेकिंग ट्रायल म्हणून करून बघायला हरकत नाही.

घरी करायच्या चॉकलेट्सची कृती आहे माझ्याकडे. मी टाकते इथे. करणा-यांनी स्वतःच्या जबाबदारीवर करावीत... काही बिघडले तर मंडळ जबाबदार नाही Happy

बाकी होममेड्सची कृती मी परत स्लॅब्स आणुन चॉकलेट्स केली की इथे सचित्र टाकेन... असल्या गोष्टी सोबत चित्रे असली की जास्त जवळच्या वाटु लागतात....

चॉकलेटच्या स्लॅब्ज्स आणून त्याची परत चॉकलेट्स करायची???

होय. वेगवेगळी सेंटर्स वापरुन मस्त चॉकलेट्स करता येतात. खरेतर विकतचे स्लॅब्स आणुन ते वितळवुन परत गोठवायचे हे खुप सोप्पे वाटते पण ते तितके सोप्पे नाहीये... Happy पदार्थ बिघडवण्यात एक्स्पर्ट असलेल्यांची ही कृती पण बिघडलेली आहे.

कोको वापरला तरी होतात ना चॉकलेट्स?
होत असतील, मी केली नाहीत, पण त्यांना विकतच्या चॉकलेट्सची चव येत नाही. मी स्लॅब्स आणुन केलेली त्यांना सेम विकतच्याची चव आली होती. माझ्या लेकीला चॉकलेट सोडून दुसरा कुठलाही फ्लेवर चालत नाही. ती नॅचरल्स आइसक्रिमवाल्याकडे गेली तरी चॉकलेट आइसक्रिमच खाते. त्यामुळे मी चॉकलेट्समध्ये प्रयोग करत असते.

हे लावा चॉकलेट केक कुकर मध्ये करता येतील का? आम्ही घरी कुकरमध्ये केक करतो ४५ मि. मंद आचेवर. ही रेसीपी एवढी यम्म आहे की अगदीच रहावत नाहीय मला.. Proud

Pages