भुरका चटणी

Submitted by मितान on 23 July, 2010 - 10:31
लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

आमच्या मराठवाड्यात विशेषतः परभणी-बीड या भागात भुरका फार आवडीचा. शिळी भाकरी असो की रसाचे जेवण, भुरक्याचे एक बोट चाटले की जिभेवरचे सगळे शेवाळ गेलेच पाहिजे.नव्या घासाच्या नव्या चवीसाठी जीभपण नवी! या प्रकाराला काही ठिकाणी 'तळलेले तिखट ' असेही म्हणतात.

हा चटणीचा एक प्रकार आहे. करायला सोपा. तिकडे नुसते तिखट वापरून करतात. मी थोडा सौम्य करावा म्हणून थोडा बदल केला आहे.

वेळ : ५ ते ७ मिनिटे
साहित्य : पाव वाटी लाल तिखट
पाव वाटी पोहे
२ चमचे दाण्याचा कूट
लसूणपाकळ्या १०-१२
पाव वाटी तेल
जिरे-मोहरी-मीठ

क्रमवार पाककृती: 

कृती :
छोट्या कढईत तेल तापत ठेवा.
एका वाटीत तिखट आणि मीठ एकत्र करा.
तापलेल्या तेलात मोहरी जिरे टाका. मग सोलून पोह्यांसारखा चिरलेला लसूण टाका.
लसूण गुलाबी रंगाचा झाला की गॅस बंद करा. मग त्यात पोहे टाका. पोहे लगेच तळले जातील.
हे मिश्रण वाटीत ठेवलेल्या तिखटावर ओता. मग त्यात भाजलेल्या दाण्याचा कूट घाला. चांगले मिसळा. भुरका तयार.

वाढणी/प्रमाण: 
तिखट खाणारे ७-८ लोक, कमी खाणारे १५ !
अधिक टिपा: 

८-१० दिवस ही चटणी छान टिकते. ब्रेड, पोळी, भाकरी, भात, पिझ्झा, सँडविच अशा वेगवेगळ्या प्रकारांसोबत खमंग लागते.

माहितीचा स्रोत: 
आई,आजी,पणजी...
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो लालू, पोहे मिसळले की मस्त कुरकुरीत लागते चटणी. तिखटपणाही कमी होतो. आई- आजी मात्र आजही 'शुद्ध तिखटाची " करतात ही चटणी... आमच्या पुणेरी ध्यानाला झेपत नाही मग Wink

मस्त दिसतेय रेसिपी. उद्या मैत्रेयी करुन आणेल तेव्हा चव घ्यायला मिळेलच Proud
रावण पिठल्यापेक्षा तिखटाचं प्रमाण कमी आहे तेव्हा करुन बघायला हरकत नाही.

व्वा माया ..मस्त जहाल प्रकार आहे. करून पहाते.
ए........पुणेरी ध्यान कोण गं? (नाही म्हणजे रेसिपीतच उल्लेख आहे म्हणून विचारते!!!!!!!!!!)

मानुषी, पुणेरी ध्यान म्हणजे नवरा गं..त्याच्याकडे कमी तिखट खातात.. म्हणून अशी पोहे-कूट मिसळून हायब्रीड चटणी करावी लागते... Happy

दिनेशदा तुम्ही या चटणीत तिखट कमी घाला. फोडणीत थोडे तीळ पण घाला. बाकी सगळे सेम. मस्त लागते तशीपण..

बाकी ही चटणी शिल्लक राहिली तर तयार असलेल्या भाजीत आमटीत खमंगपणा वाढवण्यासाठी वेगळी फोडणी न करता मिसळली तरी चालते.

वॉव.. अगदी आवडती रेसेपी आहे की ही. मी नेहेमी करते ही भुरका चटणी. सासरी भाजीत अगदी अर्धी मिरचीच घालावी लागते, सगळेच कमी तिखट खाणारे. त्यामूळे मी आपलं माझ्यासाठी भुरका, खरडा असलं करत असते नेहेमी.

मस्त आहे, एकदम झणझणीत... पण मलाही तिखट कमी करुन पोहे तीळ घालावे लागणार. अगदीच कमी तिखट खाते मी, नुसत वाचुनच डोळ्या-नाकातुन पाणी यायला लागले Proud

नवीन माहिती कळली. माझे मेहुणे तिखट खातात त्यांना भाकरी व भुरका करून वाढीन नक्की.
यात हिरवे काहीच नाही. कढी पत्ता , कोथिंबीर? काही प्रॉब्लेम नाही. ऑथेंटिसीटी जाईल ते घातले तर.

मस्त जहाल प्रकार दिसतोय! एकदा क्रुन बघायला हवा (अर्थात तिखट कमी घालुन) रच्याकने, मी साधारण अशाच प्रकारचे लसणीचे तिखट करते. कडकडीत तेलात मोहरी टाकायची. ती तडतडली की त्यात भरपुर लसुण (चिरुन) टाकायचा. लसुण गुलाबीसर झाला की त्यात १-२ चमचे तिखट टाकुन गॅस लगेच बंद करायचा. त्यानंतर चिरलेली कोथिंबीर टाकायची. यात तिखट जळायला नको पण तळले गेले पाहीजे. तिखटाचे प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करावे. हे तेल मुगडाळ घालुन केलेल्या खिचडीबरोबर छान लागते.

वत्सला, अगदी सेम चवीचा भुरका आहे हा.. तिखट जळू नये म्हणून कडकडीत तेल तिखटावर ओतायचे. बाकी मी पण कधीकधी कोथिंबीर घालते. पण ते तिखट लवकर संपवावे लागते.

फस्क्लास चटणी. Happy आज तुम्ही दिलेल्या प्रमाणानुसार करून बघितली. ठणकामार तिखट, पण चवदार झाली.

पाककृतीसाठी धन्यवाद.

आजच खाल्ली भुरका चटणी.

आम्ही नुसतं भुरका किंवा मीठ -भुरका असं म्हणतो
नेहमी होते माझ्याकडे, अर्थात तीळ घालून.
पोह्यांची आयडिया छान आहे Happy