व्हेज शामी कबाब

Submitted by अंजली on 10 July, 2010 - 23:50
लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

बाहेरच्या आवरणासाठी
२ कच्ची केळी (plantains) उकडून आणि खिसून
२ मोठे बटाटे उकडून आणि खिसून
१ मोठी वाटी हरभरा डाळ (चण्याची डाळ) शिजवून - फार मऊ नको - सर्व पाणी काढून
१ मोठा कांदा बारिक चिरून
१ टे. स्पून आलं लसूण पेस्ट
३-४ हि. मिरच्या बारिक चिरून
मूठभर कोथिंबीर बारिक चिरून
मूठभर पुदिना बारिक चिरून
१ टि. स्पून शहाजीरे
१/२ टि. स्पून हळ्द
१ टि. स्पून तिखट
१ टि. स्पून धने पावडर
१ टि. स्पून जीरे पावडर
१ टि. स्पून गरम मसाला
१ टि. स्पून चाट मसाला
१ चिमूटभर आमचूर
२ टे. स्पून फोडणीसाठी तेल
२ मोठे चमचे डाळीचं पीठ किंवा ब्रेडक्रम्स

कबाबमध्ये भरायच्या सारणासाठी
दीड कप (किंवा १.५ मोठी वाटी भरून किंवा साधारण १२ औंस) पनीर खिसून
१ मध्यम कांदा बारिक चिरून
२ टे. स्पून कोथंबीर बारिक चिरून
१/२ टि. स्पून चाट मसाला
१/२ कप डाळिंबाचे दाणे (किंवा मनुका, क्रॅनबेरी यापैकी काहीही)
चवी पुरतं मीठ

कोथिंबीर पुदीना चटणी
१ कोथिंबीरीची लहान जुडी
मूठभर पुदीना
५-६ हि. मिरच्या
१ टि. स्पून जीरे
मीठ
१ कप दही

कबाब तळायला किंवा कडेने सोडून भाजायला तेल

क्रमवार पाककृती: 

कबाबमधे भरायचे सारणः
सर्व जिन्नस एकत्र करून हलक्या हाताने मळून घ्या. मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून घ्या. बाजूला ठेवा.

चटणीसाठी दही सोडून बाकी सर्व जिन्नस एकत्र बारिक करून घ्या. दही घालून हवी तेवढी पातळ करा.

बाहेरचे आवरणः
पसरट पातेल्यात तेल तापवायला ठेवा. तेल तापल्यावर शहाजीरे टाकून कांदा घालून परतून घ्या. कांदा मऊ झाल्यावर आलं लसूण पेस्ट घाला. हि. मिरची, थोडी कोथंबीर, पुदिना घालून परतून घ्या. हळद, तिखट, धने-जीरे पूड, गरम मसाला, चाटमसाला घालून परतून घ्या. शिजलेली चणा डाळ घालून चांगले हलवून घ्या.
फूड प्रोसेसर मधे खिसलेला बटाटा, केळी, परतलेली चणा डाळ घालून सगळं एकत्र करून घ्या. फार चिकट वाटल्यास थोडं डाळीच पीठ / ब्रेडक्रम्स घाला.

हाताला थोडे तेल लावून केळ-बटाटा- चणाडाळ मिश्रणाची पारी करा. त्यात सारणाचा गोळा भरून हलक्या हाताने बंद करून, गोल करून हलकेच दाबून चपटे कबाब करा. पॅन मध्ये तेल घेऊन तळून घ्या किंवा 'शॅलो फ्राय' करा.

Enjoy Happy
DSCN0431.jpg

वाढणी/प्रमाण: 
१५ मोठे कबाब
अधिक टिपा: 

- plantains ऐवजी सुरण वापरून पण कबाब करता येतात.
- काही लोक बाहेरच्या आवरणासाठी सोया 'ग्रॅन्युअल्स' पण वापरतात.
- बाहेरच्या आवरणात आवडत असतील तर काजू घालू शकता.
- सारणासाठी पनीरऐवजी खवा, चीज किंवा तिन्हीचं मिश्रण वापरता येईल.
हे कबाब फार मसालेदार किंवा तिखट नसतात. पनीर, डाळिंबामुळे चव छान लागते.

माहितीचा स्रोत: 
'वाह रे वाह.कॉम' चे संजय थुम्मा, इंटरनेट, स्वप्रयोग, काही पाककलेची पुस्तके
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

लाजो, 'अधिक टिपा' मध्ये दिलय बघ: सुरण किंवा सोया ग्रॅन्युअल्स. नुसता बटाटा घेतलास तरी चालेल पण मग कबाब ऐवजी बटाट्याच्या कटलेटस सारखी चव येईल, तुला आवडत असल्यास बाकिच्या भाज्यापण घालून बघ.

धन्स अंजली Happy अग नवर्‍याला, केळ, सुरण, सोया चंक्स असल काही आवडत नाही. इतर भाज्या जसे गाजर कॉलिफ्लॉवर वगैरे घालुन बघेन Happy