रानभाज्या - कवळा (आमटी, भाजी, वडी)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 17 June, 2010 - 03:24
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

कवळा, भेंडी आमटी चे जिन्नस
१ कवळ्याची जूडी (पाने खुडून चिरुन घ्यावीत)
साधारण पाव किलो भेंडी चिरुन
२ छोटे कांदे चिरुन
फोडणी - तेल, राई, जिर, कढीपत्ता, मिरची १, ५-६ मेथी दाणे,हिंग,
पाव चमचा हळद
१ ते २ चमचे मसाला
लिंबा एवढ्या चिंचेचा कोळ
तेवढाच किंवा त्यापेक्षा थोडा जास्त गुळ
चविपुरते मिठ
अर्धा चमचा गरम मसाला
थोडस ओल खोबर खरवडून

कवळा मुग भाजीचे जिन्नस :

मोड आलेले मुग १ वाटी
कवळ्याची पाने चिरुन
फोडणी : हिंग, हळद, मसाल (किंवा मिरची),
चवी पुरते मिठ
अर्धा लिंबाचा रस
गरजे पुरते पाणी
थोडी चिरलेली कोथिंबीर
थोड ओल खोबर खरवडून

कवळ्याच्या वडीचे जिन्नस :

कवळ्याची एक जुडी (पाने खुडून चिरुन)
१ मोठा कांदा चिरुन
१ ते दिड वाटी बेसन
१ चमचा गोडा मसाला
हिंग, हळद,
२-३ मिरच्या बारीक चिरुन (किंवा थोडी मिरची पुड)
थोडी कोथिंबीर चिरुन
चवि पुरते मिठ
तळण्यासाठी तेल

क्रमवार पाककृती: 

आमटीची क्रमवार पाककृती :
प्रथम भांड्यात फोडणी देउन चिरलेला कांदा घालावा व परतवावा. ह्यातही कांदा शिजवण्याची गरज नसते. कांदा कच्चटच चांगला लागतो. कांद्यावर हळद, मसाला घालावा. आता चिरलेली भेंडी व कवळा घालून परतवुन चिंचेचा कोळ घालावा. गरजे पुरते पाणी घालावे आता भेंडी शिजु द्यावीत. (चिंचेचा कोळ घातला तरी भेंडी शिजतात) भेंडी शिजली की त्यात गुळ, गरम मसाला, मिठ, ओल खोबर घालून उकळी येउ द्यावी व गॅस बंद करावा. ही आमटी भाताबरोबर सगळ्यांना खुप आवडते.

कवळा, मुग भाजी पाककृती :

प्रथम भांड्यात वरील फोडणी देउन मग त्यात मुग व चिरलेला कवळा टाकून ताटावर पाणी ठेउन मुग शिजु द्यावेत. मधुन मधुन भाजी ढवळायची. मुग शिजले की त्यात मिठ, लिंबाचा रस, ओले खोबरे घालून एक वाफ आणून गॅस बंद करावा.

कवळयाच्या वडीची पाककृती :
वरील सर्व जिन्नस एकत्र करावे शक्यतो पाणी टाकू नये. त्याच्या चपट्या वड्या तव्यावर शॅलो फ्राय कराव्यात. ह्याचीच डिप फ्राय करुन गोल भजी देखिल होते. तसेच अळु वडी व कोथिंबिर वडी प्रमाणे वाफवुनही ही वडी करता येते.

अधिक टिपा: 

कवळा हा श्रावणात येतो. चिंचेच्या, लाजाळुच्या पानांप्रमाणे ह्याची पाने असतात. शंकराला हा आवडतो म्हणून श्रावणी सोमवारी हा भाजीत घालतात. श्रावणी सोमवारी काही ठिकाणी कांदा लसुण खात खात नाहीत म्हणून वरील भाजीत कांदा नाही. तसेच वडीतही सोमवारी कांदा घालत नाहीत. इतर वेळी करताना ह्यात कांदा घालतात. बिनकांद्याची भाजी मसाला न घालता मिरचीवर जास्त चविष्ट होते.

माहितीचा स्रोत: 
आई व काही स्वतःचे प्रयोग
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

थोडी चिंचेसारखी पाने दिसताहेत. हल्ली मी बाजारात पालेभाज्या नीट निरखुन पाहु लागलेय.. पण तुझ्या भाज्या अजुन मिळाल्या नाहीत.. Sad एक दिवस उरणलाच चक्कर टाकते. बरेच दिवस जाणे नाही झाले तिकडे.. तुलाही भेटेन त्या निमित्ताने...

जागू, तुझ्या आधीच्या पाकृंच्या लिंक्स 'लागणारे जिन्नस' मध्ये का देते आहेस... मला प्रत्येक वेळी वाटतं की ह्या भाजीत ह्या सगळ्या भाज्या लागतात.... गौरींना नैवेद्य असतो तश्या Happy

साधना कधी येतेस ? भाज्या संपायच्या आत ये.
मंजू कुठे टाकू ? अधिक टिपा मध्ये टाकू का ?

मला प्रत्येक वेळी वाटतं की ह्या भाजीत ह्या सगळ्या भाज्या लागतात...<< मंजे Biggrin

जागु मी पण शोधते ग हल्ली या भाज्या. यातल्या काही मला जांभळीनाक्याला मिळाल्या. गेल्या वर्षीची भारंगीची भाजी तर तुलाच विचारुन केली होती मी Happy

ही भाजी बघुन मला ती लाजाळुसारखी वाटत्ये. हेवे लाजाळुच नाहीयेना? Uhoh

मस्तच आहेत सगळ्या रेसिपीज. अन फोटोसकट टाकल्या आहेत हे बेष्टच. आता आमच्या इथल्या ( दरिद्री) इंग्रो मधे अशा भाज्या कधी मिळतील याची वाट पहावी लागेल Wink

मेधा अग जर शोधल्यास तर सापडतील ठाण्यात.
दिनेशदा काल मी वाघाटीची फळ पाहीली. परत दिसली की टाकतेच.

ही पाने थोडी तरोट्याच्या भाजी सारखी दिसतात आहेत. लहानपणी पावसाळ्यात आमच्या अंगणात आपोआप उगवायचा. आधी माझी आई काढून टाकत असे, पण मग एकदा माझ्या आजोबांनी पाहिला आणि मग तिला सांगितलं की हा भाजी सारखी खातात, अगदी कोवळा असताना याची मेथी सारखी भाजी करून बघ. मस्तच लागायची ती भाजी. पण पानं थोडे मोठे झाले की मग उग्र लागतात.

अगं टायकुळा म्हणजेच टाकळा ना???? . वर बघ लिहिलीय.
कवळा वेगळी आहे. मी ज्याला टायकुळा म्हणुन ओळखते तो वर टाकळा मध्ये लिहिलाय तसा दिसतो.

जागू, तांदुळजा ची पाने त्रिकोणी आणि थोड्या शिरा असतात. पाने पातळ असतात. याला किरमिजी रंगाचे तूरे येतात. भाजी अत्यंत चवदार. गरीब लोकांचा तो आहार आहे. पण जाणकार लोकांकडुन ओळखून घ्यावी लागते. (कारण अशाच दिसणार्‍या बर्‍याच वनस्पती असतात.)
शंकर पाटलांच्या एका कथेत, याचा कथेत अगदी करुण उलेख आहे.

अरे हि भाजी टाकळा म्हणजे टायकुळा नाही? ह्म्म बरोबर. याची पानं मेथीच्या पानांसारखी दिसताहेत.
साधना पाहिला गं टाकळा. Happy
जागु सुग्रण आहेस वाटत.. माबोकरांना जेवायला बोलाव बघु एकदा सर्वांना.. खुप सार्‍या रेसिपी लिहितेस अगदि माश्यांच्याहि Happy

जागू, मिळाला मला तांदूळजाचा फोटो. हि भाजी पावसातच नाही तर एरवीही असते.
समजा एखाद्या जागी उगवलेली दिसली, तर परिसरात आणखी रोपे असतातच.
पण हिला काटे नसतात (अशीच दिसणारी, पण काटे असणारी एक वनस्पती असते. )
हिची पाने फारतर एक इंच लांबीरुंदीची असतात.

tanduLaja.jpg

धन्यवाद दिनेशदा, हा का तांदुळजा ? आहो ही आमच्याइथे उगवत असते. आम्ही ह्याला माठच म्हणतो. उगवली आता की टाकतेच फोटोसकट रेसिपी.

हो हिलाच आम्हीही माठ म्हणतो.. लाल आणि हिरवा दोन प्रकार... Happy

जागु, काल कवळा मिळाला बाजारात.... काल खास तुझ्यासाठी गेले होते बेलापुर गावातल्या बाजारात. तिथे तुझ्या भाज्या आणि मासे मिळणार याची खात्री होती. खरबी-कोलंबी होती पण मी पैसे सुट्टे करुन आणिपर्यंत कोळणीला धीर धरवला नाही Sad मग मी तिच्याकडुन बोईट घेतले आणि रविवार साजरा केला.. Happy

अग खरबी कोलंबीच तसच असत. ती राहत नाही. म्हणून मिळाली की लगेच घ्यायची.
कवळ्याच काय केलस ?

कालच दादरला कवळ्याची भाजी मिळाली. हिरवा माठ घालून पण ही भाजी करतात का? पहिल्यांदाच आणली आहे. जागू मुळे वेगवेगळ्या भाज्या घ्यायची सवय लागली आहे.

मंगळागौरीच्या एका खेळाच्या गाण्यात हा 'कवळा' आहे.

आवळा वेचू की कवळा वेचू
आवळ्याकवळ्याची भाजी करू
शेवंती वेचू की मोगरा वेचू
शेवंती मोगर्‍याची वेणी करू

Wink

ही भाजी यावर्षी एकदा मिळाली होती. मी कांद्यावर परतुन केली. मस्त लागते. तेव्हा तुझा हा धागा पाहीला नव्हता.
भारंगी सुद्धा एकदा आणली. तीही कांद्यावर परतुन केली. आवडली.

सामी माठात घातलीस तरी चालेल. शिवाय मिस्क भाजी आमच्याइथे ऋषीची भाजी करतात. माझ्या लेखनात आह ऋषीची भाजी म्हणुत त्यातही चांगला लागतो.

कवळ्याच्या कोबीच्या वड्यांप्रमाणेही वड्या करता येतात.

थॅन्क्स जागू, अग आमच्याघरी गणपतीत ऋषीची भाजी करतात. यावर्षी आई कशी करते ते लक्ष देवून पाहेन.
पण ही भाजी आता नुसती माठ घालून करेन.

जागु ताई लग्ना आधी मी श्रावण पाळत नव्हते तेव्हा गावी घरी या भाजीत जवळा टाकुन बनवेली भाजी खाल्ली....असली भारी लागत होती....:)
आणि हिरवा माठ व लाल माठाचे कोवळे देठ फोडणीच्या वरणात टाकतेस का तु शेवग्याची शेंग टाकतात तशी???? मस्त लागते

ह्या सगळ्या भाज्या आणि माशाच्या रेसिपी वाचून माझ्या तोंडाला पानी सुटलय, टपक टपक टपक. मी ना पुढच्या पावसाळ्यापूर्वी सगळ्या फोटोची प्रिंट काढून बाजारात नेणारे. आणि मग भाजीवाल्या शोधणार ह्या भाज्या आणून देतील अशा. अरे पण माशाचं काय मला ना मासे निवडता येत न साफ करता. मला सगळ्या माशाच्या रेसिपी टेस्ट करायच्या आहेत.

Pages