रानभाज्या - कवळा (आमटी, भाजी, वडी)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 17 June, 2010 - 03:24
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

कवळा, भेंडी आमटी चे जिन्नस
१ कवळ्याची जूडी (पाने खुडून चिरुन घ्यावीत)
साधारण पाव किलो भेंडी चिरुन
२ छोटे कांदे चिरुन
फोडणी - तेल, राई, जिर, कढीपत्ता, मिरची १, ५-६ मेथी दाणे,हिंग,
पाव चमचा हळद
१ ते २ चमचे मसाला
लिंबा एवढ्या चिंचेचा कोळ
तेवढाच किंवा त्यापेक्षा थोडा जास्त गुळ
चविपुरते मिठ
अर्धा चमचा गरम मसाला
थोडस ओल खोबर खरवडून

कवळा मुग भाजीचे जिन्नस :

मोड आलेले मुग १ वाटी
कवळ्याची पाने चिरुन
फोडणी : हिंग, हळद, मसाल (किंवा मिरची),
चवी पुरते मिठ
अर्धा लिंबाचा रस
गरजे पुरते पाणी
थोडी चिरलेली कोथिंबीर
थोड ओल खोबर खरवडून

कवळ्याच्या वडीचे जिन्नस :

कवळ्याची एक जुडी (पाने खुडून चिरुन)
१ मोठा कांदा चिरुन
१ ते दिड वाटी बेसन
१ चमचा गोडा मसाला
हिंग, हळद,
२-३ मिरच्या बारीक चिरुन (किंवा थोडी मिरची पुड)
थोडी कोथिंबीर चिरुन
चवि पुरते मिठ
तळण्यासाठी तेल

क्रमवार पाककृती: 

आमटीची क्रमवार पाककृती :
प्रथम भांड्यात फोडणी देउन चिरलेला कांदा घालावा व परतवावा. ह्यातही कांदा शिजवण्याची गरज नसते. कांदा कच्चटच चांगला लागतो. कांद्यावर हळद, मसाला घालावा. आता चिरलेली भेंडी व कवळा घालून परतवुन चिंचेचा कोळ घालावा. गरजे पुरते पाणी घालावे आता भेंडी शिजु द्यावीत. (चिंचेचा कोळ घातला तरी भेंडी शिजतात) भेंडी शिजली की त्यात गुळ, गरम मसाला, मिठ, ओल खोबर घालून उकळी येउ द्यावी व गॅस बंद करावा. ही आमटी भाताबरोबर सगळ्यांना खुप आवडते.

कवळा, मुग भाजी पाककृती :

प्रथम भांड्यात वरील फोडणी देउन मग त्यात मुग व चिरलेला कवळा टाकून ताटावर पाणी ठेउन मुग शिजु द्यावेत. मधुन मधुन भाजी ढवळायची. मुग शिजले की त्यात मिठ, लिंबाचा रस, ओले खोबरे घालून एक वाफ आणून गॅस बंद करावा.

कवळयाच्या वडीची पाककृती :
वरील सर्व जिन्नस एकत्र करावे शक्यतो पाणी टाकू नये. त्याच्या चपट्या वड्या तव्यावर शॅलो फ्राय कराव्यात. ह्याचीच डिप फ्राय करुन गोल भजी देखिल होते. तसेच अळु वडी व कोथिंबिर वडी प्रमाणे वाफवुनही ही वडी करता येते.

अधिक टिपा: 

कवळा हा श्रावणात येतो. चिंचेच्या, लाजाळुच्या पानांप्रमाणे ह्याची पाने असतात. शंकराला हा आवडतो म्हणून श्रावणी सोमवारी हा भाजीत घालतात. श्रावणी सोमवारी काही ठिकाणी कांदा लसुण खात खात नाहीत म्हणून वरील भाजीत कांदा नाही. तसेच वडीतही सोमवारी कांदा घालत नाहीत. इतर वेळी करताना ह्यात कांदा घालतात. बिनकांद्याची भाजी मसाला न घालता मिरचीवर जास्त चविष्ट होते.

माहितीचा स्रोत: 
आई व काही स्वतःचे प्रयोग
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pages