गाणी मनातली (आवडलेली मराठी गाणी)

Submitted by जिप्सी on 10 June, 2010 - 23:38

मराठी संगीत भावगीत, चित्रपटगीत, लोकगीत, नाट्यगीत अशा विविध दालनांनी सजले आहेत.
गीतकारांचे अर्थवाही शब्द, संगीतकारांनी बांधलेली सुयोग्य चाल आणि गायकांची कर्णमधुर कारागिरी, अशा अनेक गाण्यांचा खजिना मराठी गीतांमध्ये आहे.
इथे आपण आपल्याला आवडलेल्या मराठी भावगीत, चित्रपटगीत, नाटयसंगीत, लोकगीत, लावणी इ. गाण्यांची चर्चा करुया. यात नेमके तुम्हाला काय आवडले (शब्द, संगीत, आवाज की सगळेच) तेच सांगायचे आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

असा बेभान हा वारा...

मंगेश पाडगांवकर, हृदयनाथ मंगेशकर आणि लताबाई या तिघांची अप्रतिम कलाकृती. या गाण्याचा वेग, शब्दांची ताकद आणि लताबाईंनी ओतलेला करुण/विरह रस; सिंपली ग्रेट!

हे गाणं म्हणताना भल्या-भल्यांची त्रेधातिरपीट उडालेली पाहिली आहे. Happy

मंगेश पाडगांवकर, लताबाई ह्यांचे नाव निघालेच तर ..

भावभोळ्या भक्तीची ही एकतारी
भावनांचा तू भुकेला रे मुरारी

काजळी / वादळी गाताना तर अहाहा.

माझ्यासाठी मराठीतली २५ सर्वात आवडती गाणी द्या म्हणलं तरी अवघड आहे. खळे, बाळासाहेब ह्यांचातच ५० होतील. Happy

आशा
स्वप्नातल्या कळ्यांनो
जिवलगा राहिले दुर
गेले द्यायचे राहून तुझे नक्षत्रांचे देणे
परवशता पाश दैवे
युवतीमन
रेशमाच्या रेघांनी
समईचा शुभ्र कळया
उषःकाल होता होता
या चिमन्यांनो परत फिरा रे (बापरे काय सही आहे हे)
एकाच ह्या जन्मी फिरुनी नवी

बाळासाहेब

गेले ते दिन गेले
डौल मोराच्या मानेचा
लाजुन हासने अन
माणसीचा चित्रकार
त्या फुलांच्या गंधकोषी
निवडुंग संपूर्ण

सुमन कल्याणपूर
सावळ्या विठल्ला
केतकीच्या बनी तिथे
मृदुल करांनी
पाखरा जा दुरदेशी
वाट इथे स्वप्नातली

माणिक वर्मा
सावळाच रंग तुझा
अमृताहूनी गोड नाम
घननिळा लडिवाळा
लाविते मी निरांजन

वसंतराव देशपांडे
दाटून कंठ येतो
बगळ्यांची माळ फुले

लताबाई
गगन सदन
सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या
मावळत्या दिनकरा
मी रात टाकली
राजसा जवळी जरा बसा
बाळगु कशाला व्यर्थ कुणाची भिती गं
सख्या रे
लताची लिस्ट पूर्ण होणे अशक्य दिसते. Happy

नाट्यसंगीतही टाकायलाच पाहिजेत. बाफ वाचल्यावर गाणी एकदम आठवली. अजय, संदिप, अवघुत ही लोकं राहिली आहेत. Happy

हे म्हणजे एकेक सुर आठवावा नाहुन अमृताने आणखी लिस्ट टाकतोच. Happy

लता मंगेशकर, पी.सावळाराम आणि वसंत प्रभु यांचे मन प्रसन्न करणारे अजब रसायन...

"ह्र्दयी जागा तू अनुरागा, प्रितीला या देशिल कां ? देशील कां ?
बांधिन तेथे घरकुल चिमणे, स्वर्गाचे ते रूप ठेंगणे
शृंगाराचे कोरीव लेणे, रहावयाला येशिल कां ?
दोन मनांची उघडी दारे, आत खेळती वसंतवारे
दीप लोचनी सदैव तुं रे, संध्या तारक होशील कां ?
घरा भोवती निर्झर नाचे, जाणुन आपल्या गुढ मनाचे
झांकुन डोळे एकांताचे, जवळी मजला घेशिल कां ?'

------ प्रितीचा हा नाजुक आविष्कार, लतादिदींचा सोनतारेचा स्वर आणि त्याला साजेसे असे वसंत प्रभु यांचे तितकेच सौम्य संगीत. "दीप लोचनी" आणि "संध्यातारक" या प्रतिमा तर मन गगनविहारी करणार्‍या आहेत.

बर्‍याचवेळा असे होते कि फक्त एकदा आपण एखादे गाणे ऐकतो आणि त्याचक्षणी ते खुप आवडते. असेच फक्त एकदाच ऐकलेले ज्योत्स्ना हर्डीकर यांचे "नयन तुजसाठी आतुरले" हे गाणे. (खरंतर ह्या गाण्यासाठी सारेगमपच्या सायली पानसेला धन्यवाद, पहिल्यांदा तिच्याकडुनच ऐकलेले). बरेच शोधल्यानंतर ओरीजनल गाणे मिळाले. ज्योत्स्ना हर्डीकर यांनी या गाण्यात घेतलेले आलाप लाजवाब आहेत.

नयन तुजसाठी आतुरले
प्रेमदिवानी झाले रे, प्रेमदिवानी झाले रे
नयन तुजसाठी आतुरले.........

तुझ्या प्रितीच्या अमृतधारा
मनमोराचा फुले पिसारा
भानच हरपुन गेले रे
नयन तुजसाठी आतुरले.........

जुळता नाते दोन मनांचे
बंध लोपले युगायुगांचे
मीच नच माझी उरले रे
नयन तुजसाठी आतुरले.........

गायिका: ज्योत्स्ना हर्डीकर
गीत: वंदना विटणकर
संगीत: अनिल मोहिले.

माझी काही आवड.
१. दयाघना
२. गेले ते दिन गेले (हे गाणं वर आहेच)
३. या चिमण्यांनो परत फिरा.
४. जिवलगा.
५. मी राधीका.

निवडुंग मधली गाणी मला फार आवडतात! ह्रुदयनाथ मंगेशकरांचे संगीत आहे. 'तू तेव्हा तशी' ' 'लव लव करी पात'.

ना धो महानोरांच्या चार गाण्यांचा संग्रह लतानी काढला होता.
राजसा जवळी जरा बसा, जीव हा पिसा, तूम्हाविण बाई
कोणता करु सिणगार सांगा तरि कानी

आज उदास उदास दूर, पांगल्या सावल्या

किती जीवाला राखायचं राखलं
राया तूम्ही जाळ्यात पाखरु टाकलं


चांद केवड्याची रात, आलिया सामोरा आज
राजा माझ्या हंबार्‍याला, बांधा वं गजरा

चारही गाणी आणि त्यातले शब्द अनोखे आहेत. राजसा ची चाल अस्सल पारंपारिक बैठकीच्या
लावणीची आहे. (नटरंग मधल्या अप्सरा आली, मधल्या काहि ओळींच्या सूरांवर, या गाण्यांचा
प्रभाव आहे)
लताने तशा फार कमी लावण्या गायल्या. पिंजरा मधली, दे रे कान्हा चोळी लुगडी, हि अध्यात्माची लावणी, तिच्याकडूनच गाण्याचा आग्रह, राम कदमांनी धरला होता. त्यांना या गाण्याची चाल लावायला बरीच मेहनत घ्यायला लागली होती. आणि अनेक चाली बांधल्यावर, कुठली फायनल करावी तेही सुचत नव्हते. शेवटी लतासाठी एक आणि कोरससाठी एक अशा दोन चाली वापरल्या आहेत. लताने त्याचे सोने केले हे खरेच आहे.

लताने गायलेल्या मोजक्या लावण्यांपैकि
सख्या सजणा नका तूम्ही जाऊ, तूम्हाविना एकली कशी र्‍हाऊ

गत करु काई, कळं ना गं बाई, सजण शिपाई परदेशी (या दोन्ही सख्या सजणा सिनेमातल्या )

बोल बोल ना का अबोला
( सिनेमा, आई मी कुठे जाऊ, संगीत उषा मंगेशकर )

रातीची झोप मज येईना, कि दिस जाईना
कुणीतरी सांगा हो सजणा
( चित्रपट ? )

बांधिला तूरा फेट्यासी, सरदार तूम्ही मी दासी
बसताच उद्या मंचकी, विसराल जून्या ओळखी
( चित्रपट ? )

आणि होनाजी बाळा मधल्या,
लटपट लटपट, तूझे चालणे

नका दूरदेसी जाऊ सजणा

सजणा नको रे बोलू मसी

मोलकरीण या चित्रपटातलं सुलोचनादीदींवर चित्रीत झालेलं आणि आशा भोसलेंच्या आवाजातलं.....

देव जरी मज कधी भेटला....

आशाताईंनी ह्या गाण्याला ज्या उंचीवर नेउन ठेवलय त्याला तोड नाही. केवळ 'अप्रतिम' म्हणणं एवढंच आपण करु शकतो. Happy

देव जरी मधल्या मागण्या म्हणा व इच्छा म्हणा, हे कुठल्याही मराठी आईच्या इच्छा असू शकतात.
शिवरायांच्या मागीन शौर्या, कर्णाच्या मागीन औदार्या
ध्रुव चिलयाच्या अखंड प्रेमा

कृष्णा गोदा स्नान घालू दे, रखमाबाई तीट लावू दे
ज्ञानेशाची गाऊन ओवी, मुक्ताई निजवू दे तूजला

काय सुंदर कल्पना आहेत या !

आणि याच चित्रपटात,
कशी झोकात चालली कोळ्याची पोर

अक्षरश: झोकात गायलेय.
या काळात लता आणि आशा दोघीही, हिंदीत आघाडीवर होत्या, पण या सर्व मराठी गाण्यात त्यानी कधीही मराठीपणा सोडला नाही (आणि अर्थातच हिंदीत कधी मराठीपणा डोकाऊ दिला नाही.)

दा, जानकी चित्रपटातील "मी सोडुन सारी लाज...." हि सुद्धा लावणीच आहे ना? मागे HMV ने "लावण्यलता" नावाचा अल्बम काढला होता त्यात लता मंगेशकर यांनी गायलेल्या सर्व लावण्या आहेत.
मला त्यातील "सजण शिपाई परदेश" हि लावणी जबरदस्त आवडते. Happy

करू गत काहि सुचना गं बाई
सजण शिपाई परदेसी

रातभर जाग चांदण्याची आग
जाळी सर्व अंग पाहु कैसी बाई गं
सजण शिपाई परदेसी......

नीट सांड ताटी आसवांची मोती
डोळीयांच्या शिंपी तुझ्या पायी बाई गं
सजण शिपाई परदेसी......

तुजविन माझा जीव जाई राजा
झुरते उदासी तुझी दासी बाई गं
सजण शिपाई परदेसी......

चित्रपटः सख्या सजणा
गीतः योगेश
संगीत: राम कदम

थोडे विषयांतर - "सख्या सजणा" हा चित्रपट सुद्धा तमाशात काम करणार्‍या नाच्याच्या (नटरंगप्रमाणेच) जीवनावर आधारीत होता. उषा चव्हाण आणि गणपत पाटील अभिनित या चित्रपटात एक पैज हरल्यामुळे नायिकेला "नाच्याशी" लग्न करावे लागते आणि मग ती त्याला माणसात कशी आणते अशीच काहितरी कथा आहे.

दिनेशदा ना धों महानोरांनी लिहिलेल्या व लता मंगेशकर यांनी गायिलेल्या संग्रहात आणखी पण गाणी होती ना?
१) घन ओथंबून येती वनात राघू ओघिरती
२) बाळगू कशाला व्यर्थ कुणाची भीती ग
३) चांद केवड्याची रात (गजरा अंबाड्याला बांधायचा की हंबार्‍याला?)
४) किती जिवाला राखायचं राखलं
५) राजसा जवळी जरा बसा
६) आज उदास उदास दूर पांगल्या साउल्या
मुंबई दूरदर्शनने 'माझ्या आजोळची गाणी' या नावाने पं हृदयनाथ, लता आणि प्रिया तेंडुलकर गप्पा मारताहेत अशा थाटात ही गाणी सादर केली होती.

रातिची झोप मज येईना : चित्रपट पवनाकाठचा धोंडी (शांताबाई)
(काय बाई सांगू कसं गं सांगू आणि शालू हिरवा पाच नि मरवा ही उषा मंगेशकर यांनी गायिलेली गाणी याच चित्रपटातली)

सुषमा शिरोमणी यांनी एका कार्यक्रमात सांगितले की लताबाईंनी एका चित्रपटासाठी लावणी गाताना सांगितले, की यावर जर सुषमा नाचणार असेल तरच मी गाईन! असे कोणते गाणे आहे का? रेशमाच्या रेघांनी वर नाचणारी सुषमा आहे का?

वर केदारच्या यादीत 'या चिमण्यांनो परत फिरा रे' हे गाणे आशाच्या नावावर आले आहे, लतादीदींचे. जिव्हाळा याच चित्रपटातले आशाने गायिलेले चंदाराणी का ग दिसतीस थकल्यावाणी आणि कशी झोकात चालली ही गाणी शाळेच्या स्नेहसंमेलनांत नाचासाठी खूप वाजायची.

रेशमाच्या रेघांनी वर नाचणारी सुषमा आहे का?>>> नाहीम नक्कीच सुषमा शिरोमणी नाही. आणि रेशमाच्या रेघांनी हे गाणे आशाताईंचे आहे. संगीत मात्र लतादिदिचे.

बघा ओघाने किती छान छान गाण्यांच्या आठवणी निघताहेत.
सख्या सजणा, हा गणपत पाटील यांनी नाच्याच्या इमेजमधून बाहेर येण्यासाठी काढायला लावला होता.
खरेच छान होता तो. (मला वाटते त्यात आणखी एक लावणी होती लताची )

लताने चाल दिलेली आणखी लावणी

गुलजार गुलछडी, नाचते मी घडीघडी
करते नखरा नखरा, बाई माझ्या पायाला
बांधलाय भवरा

या गाण्यात आशाने, भिर्रर्रर्रर्रर्र अशी मस्त तान घेतलीय. तिला तान म्हणायचे कि आणखी काही, याची
कल्पना नाही, पण भन्नाट प्रकार होता तो. (तो लताने आशाला कसा गाऊन दाखवला असेल, याची कल्पना केली तर आणखी मजा वाटते.)
लताने आशा आणि ह्रुदयनाथ कडून दोन मस्त गाणी गाऊन घेतली होती.
नाव सांग सांग सांग, थोड थांब थांब थांब
बहुतेक मराठा तितुका मेळवावा मधलेच. आणखी एक गाणे होते.

जीवाशिवाची बैलजोडी, पण तिच्याच चालीवर ह्रुदयनाथ ने गायले आहे. ते दादा कोंडके वर चित्रीत झालेय. आणि अखेरचा हा तूला दंडवत, सोडून जाते गाव.
त्या काळात, ढोलकीचे, रेकॉर्डींगचे किती अनोखे प्रकार तिने वापरले होते. पण तिचे हे कौशल्य तिने अचानक गुंडाळून ठेवले.

शाळेच्या संमेलनाचा विषय निघाला, त्या काळातली आणखी दोन गाणी, एक आशाचे
मोठ्ठ मोठ्ठ डोळं तूझं,कोळ्याचं जाळं जसं
जाळ्यात मासळी गावायची न्हाय रं
---
आल्यागेल्या भुलतील, मी भुलायची न्हाय रं

एक नाट्यगीत गायिका होत्या, त्यांचे पण एक गाणे (जय जय गौरीशंकर नाटक, बहुतेक)

हे हे हे हे हैयां
सावज माझं गवसलं, सावज माझं गवसलं
अरे अरे सावजा विसरु नको
उगाच गमजा करु नको
तीर सरासर माझा सुटला
कुणीच नाही बचावलं
(या गाण्यात मी शंकर झालो होतो. )

यांचे आणखी एक गाणे होते.

प्रियकरा, नसे हा छंद बरा
दोन घडीचा डाव, करील पाडाव
कोणाला भिता ?
होऊनीया नि:संग भजा
श्रीरंग श्रीरंग
नाहीतर कटेल अपुला गळा

पण याशिवाय नंतर कुठेच यांचे गाणे ऐकले नाही. (नाव आठवतेय का कुणाला ?)
वसंत देसाईंनी फार अनोख्या चाली दिल्या होत्या दोन्ही गाण्यांना

दिनेशदा त्या नाट्यगीत गायिका जयश्री शेजवाडकर ही गाणे विविधभारतीवर अजूनही ८/१५ दिवसात एकदा लागतातच. वेग रामाच्या बाणाचा...तांबडी माती...
अखेरचा हा तुला दंडवत मधे echo आहे तो कोणत्याही तंत्रज्ञानाने नाही तर चक्का मीना आणि उषा यांनी दिलाय (तुला दंडवत्....तुला दंडवत....) गुलजार गुलछडी माझे पण आवडते पण त्याचे संगीत आनंदघन यांचे आहे ते अजून लक्षात आले नव्हते.

मुंबई दूरदर्शनने 'माझ्या आजोळची गाणी' या नावाने पं हृदयनाथ, लता आणि प्रिया तेंडुलकर गप्पा मारताहेत अशा थाटात ही गाणी सादर केली होती.

मी पाहिलेला हा कार्यक्रम. कार्यक्रम आणि गाणी दोन्ही छान होती.

'चांद केवड्याची रात' चीच चाल अजुन एका गाण्याला आहे (हृदयनाथ स्पेशलिटी - एकच चाल अनेक ठिकाणी वापरावी Happy )

गो-या देहावरती कांती, नागीणीची कात
वेडे झालो आम्ही द्यावी एकादीच रात ..
तुज्या रुपाचं बाशिंग डोल्यात
तुज्या वाचुनी सुन्नाट दिनरात...

ना मानोगे तो दुंगी तुम्हे गारी रे.. हे गाणं मला फार आवडतं..

तसंच मनोहर कविश्वर, सुधीर फडके जोडीची दोन्ही....

विमोह त्यागून कर्मफलांचा....
माना मानव वा परमेश्वर...

ही दोन्ही गीते वरची गाणी फार आवडतात...

विनय, ना मानोगे तो दुंगी तूम्हे गारी रे, याच चालीवर राधा मंगेशकरने, आले रे गणपति आमच्या दारी रे, गायलेय. (राग मालकंस)
हो भरत त्या जयश्री शेजवाडकरच. मग त्या कामगार रंगभुमीवर कार्यरत होत्या असे वाचले होते.

लताचेच, तिच्याच चालीतले आणखी एक गाणे आठवले,
जा जा रानीच्या पाखरा, तू जा रे भरारा
तूला घालिते चारा.

लताने अभंग तूकयाचे काढायचे ठरवले त्यावेळच्या काही आठवणी, श्रीनिवास खळ्यांनी लिहिल्या होत्या.
आधी नेमक्या काही अभंगांची निवड करायला गोनिदा आणि शांता शेळके यांना सांगितले होते. त्या दोघांनी प्रत्येकी दिडदोनशे अभंग निवडले.(आणि त्यातला कुठलाही वगळायला नकार दिला) त्यातले नेमके निवडणे फारच कठीण होते. खळ्यांनी ज्या चाली दिल्या त्या पारंपारीक नव्हत्याच शिवाय (लताशिवाय इतर कुणाला ) गायलाही अवघड होत्या. पण खळे म्हणाले होते, कि जर गायला लता उपलब्ध आहे, तर चाली साध्यासोप्या का बांधाव्यात ? पण या चाली लोकप्रिय झाल्या, तरी समुहाने गायला अवघडच आहेत, हेही खरे.
हे अभंग म्हणजे एकेक रत्न आहेत. (अगदी खरे सांगायचे तर तिने गायल्यामूळेच, भेटी लागे जीवा, वृक्षवल्ली आम्हा सोयरे, हे अभंग शाळकरी मुलांना सुद्धा माहीत झाले)

भेटी लागे जीवा
कन्या सासुर्‍यासि जाये
वूक्षवल्ली आम्हा सोयरे
खेळ मांडियेला
सुंदर ते ध्यान
हाची नेम आता
अगा करुणाकरा
आनंदाचे डोही
जेथे जातो तेथे
कमोदिनी काय जाणे तो

कधीही ऐका, मन अगदी प्रसन्न होऊन जाते.

अगदी खरे सांगायचे तर तिने गायल्यामूळेच, भेटी लागे जीवा, वृक्षवल्ली आम्हा सोयरे, हे अभंग शाळकरी मुलांना सुद्धा माहीत झाले>>>> सहमत

गजानन वाटवे यांच्या अनेक अजरामर गीतांपैकी माझे काहि आवडते.

१. प्रीतीची आसवे पथ्थरात पाझरली
तो सलीम राजपुत्र, नर्तकी अनारकली

२. फांद्यांवरी बांधिले ग, मुलिंनि हिंदोले
पंचमिचा सण आला, डोळे माझे ओले

३. बादशहाच्या अमर प्रीतिचे, मंदिर एक विशाल, यमुनाकाठी ताजमहाल

४. गगनि उगवला सायंतारा

५. चंद्रावरती दोन गुलाब, सहज दृष्टिला घडला लाभ

६. मी निरांजनातील वात, माझ्या देवापाशी जळते, हासत देवघरात

----------------------------------------------------------------------------

प्रीतीची आसवे पथ्थरात पाझरली
तो सलीम राजपुत्र, नर्तकी अनारकली

अनोळखी शिपाइगड्या एकदाच पाहिले
शूराच्या चरणावर मस्त हुस्न वाहिले
इष्काच्या दरबारी चांदरात बरसली

बंड करुन उठली तलवार सलीमची
राजनिष्ठ राजबीज आस मोंगलांची
अकबराच्या न्यायकसोटीस प्रीत उतरली

ते शराबि नैन कधी कुणा नाहि डरले
राजा वा रयतेला ना कधीच घाबरले
मिलनाच्या वाटेवर भिंत जरी बांधली

अल्लाच्या दरबारी दोन पाखरे जुळी
पंख मिटुन मूकपणे चढली एका सुळी
तो पतंग ती शमा एकसाथ जाळली

गीत - अनिल भारती
संगीत - गजानन वाटवे
गायक - गजानन वाटवे

योगेश, कुठले गाणे आधीचे ते माहीत नाही, पण लीडर सिनेमात
इक शहनशाह ने बनवाके हसी ताजमहल
सारी दुनियाको मुहोब्बतकी निशानी दी है

असे गाणे आहे (लता, रफी)
आणि दोन्ही (हे आणि वाटव्यांचे)गाणी, ललित रागावरच आधारीत आहेत.

कोणाकडे शामा चित्तार आणि हेमंतकुमार चे
दर्यावरी रं तरली होडी रं
तुझी माझी प्रित अशी
साजणा ,
होडीतुन जाऊ घरी
हे गाणे आहे का?
पुर्वी रेडिओवर लागायचं आता नाही लागत...
असेल तर please द्या ना...

सुधीर फडके जोडीची दोन्ही....

विमोह त्यागून कर्मफलांचा....
माना मानव वा परमेश्वर...

ही दोन्ही गाणी सुंदर आहेत. ऐकताना खरेच कर्मफलांचा विमोह त्यागायची भावना मनात जागते Happy फडक्यांच्या आवाजाची कमाल आहे अगदी. ह्यात काय दमदार आवाज लावलाय आणि तेच 'धुंद येथ मी स्वैर झोकतो..' मध्ये काय कातर आवाज लावलाय.. दोन्ही गाण्यांमध्ये जमीनासमानाचा फरक आहे.

खळे म्हणाले होते, कि जर गायला लता उपलब्ध आहे, तर चाली साध्यासोप्या का बांधाव्यात ? पण या चाली लोकप्रिय झाल्या, तरी समुहाने गायला अवघडच आहेत, हेही खरे.

खळ्यांच्या चाली ऐकताना अगदी साध्यासोप्या वाटतात आणि आपण सोबत गुणगुणायला तोंड उघडले की कळते काय चीज आहे ते... Happy श्रावणात घननिळा बरसला मला खुप आवडते पण त्याची चाल काय अवघड.. प्रत्येक कडव्याची वेगळी चाल..

आज इतका धुवांधार पाऊस पडतोय इथे .. सकाळपासुन पावसाची गाणी लागलीत रेडिओवर..

येताना 'आज कुणीतरी यावे' ऐकले. हे गाणे म्हणजे आनंदाचा आणि उत्साहाचा एक खळाळता झरा आहे.

गजानन वाटव्यांनी गांधीजींवरचे पण एक गाणे गायिले आहे ना?

काल रात्री पु.लं नी गायिलेले 'बाई या पावसाने ' ऐकले
पु.लंनी महाराष्ट्रातल्या दिग्गज गायकांकडून गाऊन घेतलेली ही गाणी
१) माणिक वर्मा : हसले मनी चांदणे
२) ज्योत्स्ना भोळे - माझिया माहेरा जा - २ मधे २ ओळींच्या मधल्या जागा जास्त विलोभनीय
३) पं भीमसेन जोशी : इंद्रायणी काठी
४) पं वसंतराव देशपांडे - अनेक गाणी - इथेच टाका तंबू (आशा सोबत)
५) पं जितेंद्र अभिषेकी - शब्दावाचुन कळले सारे
आता रेडिओवर भीमसेन जोशी-आशा यांचे द्वंद्वगीत लागलेय...
बरसे रस .चित्रपट पतिव्रता

Pages