गाणी मनातली (आवडलेली मराठी गाणी)

Submitted by जिप्सी on 10 June, 2010 - 23:38

मराठी संगीत भावगीत, चित्रपटगीत, लोकगीत, नाट्यगीत अशा विविध दालनांनी सजले आहेत.
गीतकारांचे अर्थवाही शब्द, संगीतकारांनी बांधलेली सुयोग्य चाल आणि गायकांची कर्णमधुर कारागिरी, अशा अनेक गाण्यांचा खजिना मराठी गीतांमध्ये आहे.
इथे आपण आपल्याला आवडलेल्या मराठी भावगीत, चित्रपटगीत, नाटयसंगीत, लोकगीत, लावणी इ. गाण्यांची चर्चा करुया. यात नेमके तुम्हाला काय आवडले (शब्द, संगीत, आवाज की सगळेच) तेच सांगायचे आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमराठी गायकांत मन्ना डे नी पण बरीच मराठी गाणी गायलीत.
घन घन माला नभी दाटल्या, अ आ आई अशी काही गाणी आहेत. लता बरोबर, प्रीत रंगली गं, कशी राजहंसी हे पण आहे.>>>>>मन्ना डे यांनी गायलेले माझे अत्यंत आवडीचे एक गाणे. गाडगेबाबा यांच्या जीवनावर आधारीत "देवकीनंदन गोपाळा" या चित्रपटातील "गोपाळा गोपाळ देवकीनंदन गोपाळा". गीत गदिमा यांचे आणि रचनाकार राम कदम.

या चित्रपटात गाडगेबाबा यांची भुमिका डॉ. श्रीराम लागु यांनी केली होती का?

गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला
सांभाळ ही तुझी लेकरं पुण्य समजती पापाला

ही धोंड्याला म्हणती देवता, भगत धुंडती तया जोगता
स्वत:च देती त्यास योग्यता, देव म्हणूनी कुणी न भजावे
फुका शेंदरी दगडाला
गोपाला गोपाला . . . . . . . .

कुणी न रहावे खुळे अडाणी, शिक्षण घ्यावे व्हावे ज्ञानी
ह्यासाठी ही झिजते वाणी, मी जातीचा धोबी देवा
धुईन कपडा मळलेला
गोपाला गोपाला . . . . . . . .

हेच मागणे तुला श्रीहरी, घाम गाळी त्या मिळो भाकरी
कुठेच कोणी नको भिकारी, कुणी कुणाचा नको रिणकरी
कुणी न विटो नर जन्माला
गोपाला गोपाला . . . . . . . .

हो गाडगेबाबांची भूमिका डॉनीच केली होती. गाडगेबाबा गेल्यावरचे विठ्ठलाच्या पायी थरारली वीट : पं भीमसेन जोशी. त्यावरून : रम्य ही स्वर्गाहुन लंका आठवले.

घनघनमालाचे चित्रिकरण मात्र मला अजिबात आवडले नाही - अतिविशाल महिला मंडळात कोणी विनोदी गायनमास्तराने शिकवावे तसे काहीसे आहे. चित्रपट गुरुदक्षिणा

दामुअण्णा आहेत बहुतेक त्या गाण्यात. गायनक्लासात शिकवत असतात आणि त्यांचे गाणे ऐकुन घरच्या नळाला धोधो पाणी येते आणि मोरी पाण्याने भरुन जाते.. Happy

वाह!!!मस्त मेहफिल रंगविली आहे इथे सगळ्यांनी...
पण जेवढी जुनी गाणी रंगीन आहेत्...तेवढी च आजकाल ची काही निवडक गाणी ही कमाल आहेत्..खास करुन अजय्-अतुल ची...
जोगवा मधील जीव दंगला, गुंगला, रंगला जसा पिरमाची आस तु,
जीव लागला, लाभला ध्यास ह्यो नवा गहिवरला श्वास तु,
पैलतिरा नेशिल, साथ मला देशील काळीज माझं तु,
सुख भरतिला आलं, नभ धरतिला आलं, पुनवंचा चांद तु...
............श्रिया आणि हरीहरन यांनी गायले आहे.
प्रत्येकाने ऐकावे व ऐकत रहावे असे शांत composition आहे.

देवकी नंदन गोपाला मधे, अनेक चांगली गाणी आहेत.
त्यात गाडगेबाबांच्या पत्नीची भुमिका, आशा पोतदार या अभिनेत्रीने केली होती (फैयाजसारखाच खुप वैशिष्टपूर्ण आवाज होता तिचा) आणि त्यात संजीवनी बिडकर पण होती. आशाची एक लावणी, ह्यो मेला माज्याकडं कवापास्न कसा बगतोय, तिच्यावर चित्रित झाले होते.
लेकरु होऊ दे मले गे मरिआई, बकरु कापील तूले, असे पण मजेदार गाणे होते.
विठ्ठलाच्या पायी थरारली वीट,
उठला हुंदका, देहुच्या वार्‍यात
तूका समाधीत चाळवला

हे गाणे पंडितजींचे.

पण मला नीट आठवत असेल, तर सुधीर फडक्यांचे पण एक गाणे होते त्यात.

छिन्नी हातोळ्याचा घाव, करि दगडाचा देव
खाई दैवाचे तळाखे, त्याचं माणूस हे नाव

आळ चोरिचा घेतला, चोप देला बळव्यानं
इट्टलाचा हार चोक्या, सांग लपवला कोण
त्याच चोखोबाच्या घरी, जेवे वैकुंठीचा देव

यातल्या वर्हाडी भाषेवरुन, मला वाटते हे गाणे याच चित्रपटातले.
आणखीहि काही कडवी आहेत. आशा पोतदार वर पण एक गाणे चित्रीत झाले होते.

संध्याकाळपासून एका नाट्यगीताचा भुंगा माझ्यामागे लागलाय.
किती किती सांगू तुला ग बाई किती सांगू तुला?

पुढचे मागचे काहीही आठवत नाही.

बाई किती सांगू तूला, मज चैन नसे
सखे या समयी मला गे, नच कोणी पुसे
सखे हे बंधू नव्हेत, मम वैरी खरे
===
नको नको मला जीव, विष तरी पाजीव
सखे सोडीव

असे काहिसे शब्द आहेत. रुक्मीणीच्या तोंड्चे पद आहे.

ऑगस्ट महिन्यात दर रविवारी आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी दुपारी १२:०५ : गजानन वाटवे यांच्या गाण्यांबद्दल बोलतील त्यांच्या कन्या

ते "कोकणगाडी' चं गाणं मला खूपच आवडतं. मस्त ट्रेनचा ठेका घेतलाय. वर्णनसुध्दा सुरुवातीपासून शेवटच्या स्टेशन पर्यंत असं आहे.

मध्यंतरी रेडिओवर लागलं असताना लिहून घेतलय. कोणी आधी टाकलय का? नाहीतर आज-उद्या कडे जरा वेळ मिळाल्यावर टाकेन.

मला अफाट आवडणारं आणखी एक गाणं वा कविता म्हणा .

बा भ बोरकरांची आयुष्याची आता झाली उजवण ही कविता. ह्याला स्वरबद्ध केलं ते सलिल कुलकर्णी ह्यांनी. सलिलने फारच सुरेख चाल लावली आहे. त्याचा संधिप्रकाश ह्या अल्बम मध्ये हे गाणं आहे.

आयुष्याची आता झाली उजवण, येतो तो तो क्षण अमृताचा
जे जे भेटे ते ते दर्पणीचे बिंब, तुझे प्रतिबिंब लाडेगोडे
सुखोत्सवे आता जीव अनावर, पिंज-याचे दार उघडावे
संधिप्रकाशात अजून जो सोने, तो माझी लोचने मिटो यावी..
असावीस पास, जसा स्वप्नभास, जीवी कासावीस झाल्याविना,
संधीप्रकाशात अजून जो सोने, तो माझी लोचने मिटो यावी

कळस म्हणजे हे कडवं.

तेव्हा सखे आण तुळशीचे पान, तुझ्याघरी वाण नाही त्याची,
तूच ओढलेले, त्यासवे दे पाणी, थोर ना त्याहूनी, तीर्थ दुजे,
संधीप्रकाशात अजून जो सोने, तो माझी लोचने मिटो यावी
वाळल्या ओठा दे, निरोपाचे फूल, भूलीतली भूल शेवटली,
संधीप्रकाशात अजून जो सोने, तो माझी लोचने मिटो यावी

जे काही सलिलने केलं ते सुंदर आहे. त्याचा त्याच त्या चालींपेक्षा वेगळं काही तरी ह्यात आहे. कविता वाचली तेंव्हा लक्षात होती, पण ऐकल्यावर आपसुक डोळे भरुन येतात किंवा वेगळ्या विश्वात जायला होतं. मन अचानक थोडे शांत होते, वस्तुस्थितीत यायला थोडासा वेळ लागतो. ह्यालाच ध्यान म्हणावे काय? मरणाला इतकं सुंदर पेश एक बाकीबाबच करु जाणे. तसे मरणावरच्या अनेक सुंदर कविता भा रा तांब्यानी रचल्या आहेत उदा जन पळ भर म्हणतील हाय हाय पण ही फार वेगळी, मरणाकडे पॉझिटिव्ह पाहणारी.

हे गाणं प्रत्येकाने ऐकायलाच हवे असे आहे. Happy

नविन गाणी लिहायला आता सुरु करतो. Happy

केदार, धन्यवाद एका छान गाण्याची ओळख करून दिल्याबद्दल :).
हे गाणे ऐकलेच नव्हते.

मध्यंतरी रेडिओवर लागलं असताना लिहून घेतलय. कोणी आधी टाकलय का? नाहीतर आज-उद्या कडे जरा वेळ मिळाल्यावर टाकेन.>>>>>मामी, लवकर टाका गाणे.

लाल बत्ती हिरवी झाली, आली, कोकण गाडी
आली कोकण गाडी, दादा, आली कोकण गाडी

ठाणे मुंब्रा कल्याणाची ओलांडून खाडी
कोकण गाडी, आली कोकण गाडी
दादा, आली कोकण गाडी ||

जंक्शन आता मागे गेले, पनवेलीचे ठेशन आले
ओढ लावी कर्नाळ्याची हिरवी हिरवी झाडी ||

आपट्यापासून गाठील रोहे, तयार ठेवा नारळ पोहे
स्वागताला कोकणवासी सजले खेडोपाडी ||

कशासाठी? पोटासाठी, कोकणपट्टी घाटासाठी
आगिनगाडी नागिणजैसी जाते नागमोडी ||

दर्यावरचा खाईल वारा, पिऊन घेईल पाऊसधारा
बघता बघता मागे टाकील सावंताची वाडी ||

येथे डोंगर तेथे सागर, (नारळ, पोफळ हिरवे आगर)३
कणखर काळ्या सह्याद्रीची थडथडणारी नाडी ||

सरता कोकण पुढती जाते, गोव्यासंगे जुळवी नाते
कर्नाटक अन केरळ, तामिळ प्रेमे यांना जोडी ||

कोकणवासी जनतेलाही भवितव्याची देते ग्वाही
सुखी होऊ दे गाबित कोळी कष्टाळू कुळवाडी ||

शिंग तुतारी झडला ताशा, फळास आल्या अपुल्या आशा
कोकणच्या कैवारी नाथा आशिर्वादा धाडी ||

- वसंत बापट

ठळक शब्द टायपो नसून तसेच आहेत.

बापटांची अशीच 'दख्खनराणी' ही डेक्कन क्वीन वर अतिशय सुंदर कविता आहे. माझी आई नेहेमी म्हणते.

मामी हे गाणे कधी ऐकलेच नव्हते. पण कोकण रेल्वे बाबत कोकणी माणसांनी पाहिलेली स्वप्ने काहि प्रत्यक्षात उतरली नाहीत.
कुसुमाग्रजांची पण आगिनगाडी अशी कविता होती.

हे गाणे, खरेतर कविता बहुधा अगदी अलीकडे संगीतबद्ध/स्वरबद्ध झाले असावे. आकाशवाणीवर गेले वर्षभरातच ऐकले.किंवा धूळ खात पडलेले असावे कारण गायक शरद जांभेकर आहेत.
पाठ्यपुस्तकातील काही कविता (जसे बी यांची माझी कन्या -गाइ पाण्यावर काय म्हणुनि आल्या) याही स्वरबद्ध झाल्यात.

मामी ते कोकणवासी सजले खेडोपाडी असे आहे बहुधा.

मामी ते कोकणवासी सजले खेडोपाडी असे आहे बहुधा. >>> हो का? मला जरा त्या शब्दाबद्दल शंका होतीच (सगले? कि जमले? that was the question. तर हे वेगळच निघालं). गाण्यात बरोबर करून टाकते. धन्स भरत्_मयेकर.

या सगळ्या कविता आंतरजाला वर उपलब्ध का बरे नाहित? आपण माबोवर या सहज सर्च करता येतील अशा document करून ठेवल्या पाहिजेत.

नविन गाणी लिहायला आता सुरु करतो

लिहा.. Happy

अजुन एक .. इथे काही गाण्यांचा उल्लेख येतो जी गाणी इतर कोणीच ऐकलेली नसतात आणि कदाचित आता बाजारातही उपलब्ध नसतात. अशी गाणी इथे उपलब्ध होतील का जिथुन इतर मायबोलीकर ती डाऊनलोड करुन ऐकु शकतील??

मामी, धन्यवाद संपूर्ण गाणे लिहिल्याबद्दल.
हे गाणे मी एकदा सारेगामा लिटिल चॅम्प्समध्ये ऐकले होते. Happy

http://www.aathavanitli-gani.com/index.htm

हि पण एक साईट आहे. इथेसुध्दा केवळ शब्द दिले आहेत.

अजून एक साईट आहे. त्यात रागावर आधारीत गाण्यांची सुची आहे.
मराठी : http://www.swarganga.org/marathisongs.php
हिन्दी : http://www.swarganga.org/hindisongs.php

मस्त माहिती. सर्वांना धन्यवाद Happy

ह्रुदयनाथ मंगेशकर संगीतकार म्हणुन महान आहेतच, पण गायक म्हणुन देखिल मराठी संगीतामधे त्यांचा वेगळा ठसा आहेच. पण मला त्यांची खालील ठराविकच गाणी ठाउक आहेत. आणखी काही असतील तर कृपया कळवा.

१. मानसीचा चित्रकार तो
२. नको देवराया
३. डौल मोराच्या मानंचा
४. वेगवेगळी फुले उमलली
५. लाजुन हासणे
६. ती गेली तेव्हा
७.घर थकलेले संन्यासी

http://www.geetmanjusha.com/marathi

आणखी काही असतील तर कृपया कळवा.>>>>>

१. त्या फुलांच्या गंधकोषी सांग तु आहेस का
२. छडी लागे छ्म छम, विद्या येई घम घम
३. नाव सांग सांग सांग नाव सांग
४. तु तेंव्हा तशी, तु तेव्हा अशी

योगेश, धन्यवाद. विस्मरणात गेली होती. खरं तर शाळाअ-कॉलेजात असताना मराठी गाणी अगदी गीतकार -संगीतकारांसकट पाठ होती. पण पुढे तुम्ही राखलात तसा व्यासंग नाही करता आला. असो. ईथे येऊन पुन्हा ते दिवस गवसतील असं दिसतय. Happy

११च गाणी... म्हणजे संगीतकार हृदयनाथांमुळे गायक ह्रूदयनाथ मागे पडले असं म्हणाचं का ? Sad

११च गाणी... म्हणजे संगीतकार हृदयनाथांमुळे गायक ह्रूदयनाथ मागे पडले असं म्हणाचं का ?>>>>अजुनही काही असतील, आज घरी जाऊन मी पाहतो Happy

शूर अम्ही सरदार अम्हाला काय कुणाची भीती?
अशी निशा पुन्हा कधी दिसेल का (युगुलगीत - सोबत लता).

हृदयनाथांनी गायिलेल्या गीतांपैकी बहुतेक अन्य संगीतकारांकडे गायलेली आहेत हे आणखी विशेष!
ती येते आणिक जाते हे गाणे महेंद्र कपूरना इतके आवडले की ते त्यांनी गायला मागितले , तर त्या फुलांच्या गंधकोषी मुकेशसाठी बनवलेले, पंडितजींनी स्वतः गायिले.(सारेगमप मुळे मिळालेली माहिती).

Pages