अवघी विठाई माझी (१) - मश्रुम

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

mashroom.jpg

अवघी विठाई माझी, रचुनी त्यांचे झेले आणि फलेषु सर्वदा, हे माझे मायबोलीवरचे अनुक्रमे, भाज्या, फुले आणि फळांवरचे पहिलेवहिले लेख होते. त्यानंतर पुलाखालून बरे़च पाणी वाहून गेले. पण या मंडळीनी मला रिझवण्यात कधी हात आखडला नाही. फुलांबद्दल बरेच लिहून झाले. आता काही भाज्यांबद्दल, लिहीन म्हणतोय. त्याची ही सुरुवात.

mashrrom pizza.jpg

मश्रुम बद्दल आजही अनेकांच्या मनात अढी असते. खुप जण ते खात नाहीत. त्यापैकी काही कारणे अशी.
अनेकांना ते मांसाहारी वाटते. हे खरे आहे कि मश्रुम हा बुरशीचा एक प्रकार आहे, आणि त्याजी गणना भाज्यातच काय, वनस्पतींमधे देखील होणार नाही. त्यांच्यामधे हरितद्रव्य नसते. ते प्रकाशसंश्लेषण करत नाहीत. पण ते प्राणीही नव्हेत. मश्रुम हा एक वेगळाच वर्ग आहे.

दुसरे कारण असे कि, त्यांच्या निर्मितीबद्दल अनेक प्रवाद आहे. मराठीत त्याला जो प्रतिशब्द पुर्वी वापरात होता,तोही या गैरसमजास कारणीभूत आहे. मश्रुंमांचे अचानक "उगवणे" हे त्याच्या उत्पत्तीबाबत संदेह निर्माण करते.
पण आपल्याला जरी त्याचे दष्यरुप अचानक दिसत असले, तरी त्याची प्रक्रिया, छुप्या रितीने सुरुच असते.
त्याच्या भक्ष्यावर किंवा आतमधे, सुक्ष्म तंतूंचे जाळे पसरलेले असते. आणि ते ज्यावेळि "फ़ूलावर" येते, त्याचवेळी जमिनीवर ते दिसू लागते.
मी "फ़ूलावर" असा शब्द वापरला, कारण तो त्या रुपाच्या जास्त जवळ जाणारा आहे. वनस्पतींमधे बीजनिर्मितीचा एक भाग म्हणून फ़ुले निर्माण केली जातात, आणि मश्रुम हे पण तत्सम रुप आहे. पण फ़ूलांप्रमाणे, परागकण, परागीभवन फ़लन असे टप्पे इथे नसतात. थेट बियांचीच निर्मिती केली जाते.
इतर वनस्पतींच्या फ़ूलांप्रमाणे, किटकांना आकर्षित करण्यासाठी, रंग, सुवास, मध (खरे तर तो मध नसतो, केवळ साखरपाणी असते. मध हि पुर्णत: मधमाशांची निर्मिती आहे.) इथे नसतोच. तशी गरजच नसते. मश्रुमची बीजनिर्मिती, स्वावलंबनाने होते.त्यात इतर बाह्य घटकांचा सहभाग नसतो.
तरीपण काही मश्रुम अत्यंत आकर्षक रंगरुप घेऊन येतात. पण ते कुणासाठी असते याची कल्पना नाही. निसर्गात क्वचितच कुठला पशुपक्षी मश्रुम नियमीत खात असेल. पण मानवाला मात्र ते खाद्य म्हणून पुर्वापार माहीत आहे.
मी आधी लिहिल्याप्रमाणे, सोमवल्ली हि पण एक मश्रुमचीच जात होती. गुलाबी रंगावर पांढरे ठिपके असे तिचे रुप असे, आणि ती चंद्रप्रकाशात चमकत असे, म्हणुन हे नाव. तिच्यापासूनच सोमरस तयार करत असत. उन्मादावस्था आणणारे पेय, म्हणून ते लोकप्रिय होते.
व्यावसायिक स्वरुपात मश्रुमची लागवड ही अगदी अलिकडेच करण्यात येत असली, तरी आपल्याकडे काही मश्रुम पुर्वापार खातात.गोव्याला, मातकट रंगाचे खास मश्रुम याच दिवसात, म्हणजे पहिल्या पावसानंतर आठ दहा दिवसातच मिळतात. अर्धी ओंजळ भरुन मश्रुम, हे तीन वर्षांपुर्वी १५० ते २०० रुपयांना मिळत असत. हे मश्रुम, वारुळांवरच उगवतात. पुर्वी ते खुडण्याची खास पद्धत
होती. हे मश्रुम पहिल्यांदा ज्याला दिसतील तो त्यावर एखादी फ़ांदी झाकून ठेवत असे. मग काहि दिवसांनी त्याची वाढ पूर्ण झाली,कि तोच येऊन ते खुडत असे. इतर कुणीही त्याच्या वाटेला जात नसत. असे केल्याने, बीजनिर्मीतीस पुरेसा अवधी मिळत असे.
पण आता मात्र, तितकी सभ्यता आणि संयम न राहिल्याने, अगदी बाल्यावस्थेतच, म्हणजे अगदी काडेपेटीतल्या काड्यांइतके असतानाच ते खुडले जातात. (उत्तम किंमतीचे आकर्षण असतेच) आणि असे केल्याने, ते मिळण्याचे प्रमाण देखील कमी आहे. याची भाजी, गोव्यात मटणाचा मसाला लावुन करतात.
देशावर, भुईफ़ोडं (याचा भोरपुड असा अपभ्रंश पण आहे.) नावाचे मश्रुम खातात. हे पण शेतात पहिल्या पावसानंतर आपोआप उगवतात. याला देठ नसतो, आणि साधारण, गावठी अंड्यांप्रमाणे ते दिसतात. पण आता याचेही प्रमाण कमी होत चाललेय.
कोकणात, आणखी एक प्रकारचे मश्रुम खाल्ले जात असत. वादळात जे माड (नारळाची झाडे) आडवे होत, त्यावर जे मश्रुम उगवत तेच खात असत. बाकि कुठेही उगवलेले मश्रुम खात नसत. याची भाजी, इतर रानभाज्यांप्रमाणे, केवळ कांदा आणि ओली मिरची घालूनच करत असत.
आपल्याकडे व्यावसायिक स्वरुपात लागवड नव्याने सुरु झालेली असली, तरी काही आदीवासी झोपडीची एक खास दिशेची भिंत एका खास मिश्रणाने सारवून, मश्रुमची शेती करतच असत. व्यावसायिक लागवड करताना मात्र, गव्हाचा किंवा तांदळाचे तूस वापरुन, खास कल्चर निर्माण करावे लागते. तसेच त्याचे उत्तम उत्पादन येण्यासाठी, आर्द्रता आणि तपमान संभाळावे लागते.

हे तंत्र व मार्केटींग न जमल्याने, यात पूर्वी अनेक जणांनी नुकसान सोसलेले आहे. पण आता बरे दिवस आलेत असे दिसतेय.
अरब जगतात, हे फ़ारसे लोकप्रिय दिसले नाहीत, पण यूरप आणि अर्थातच चीन व जपान मधे हे बरेच लोकप्रिय आहेत. फ़्रेंच लोक जंगलातील, मश्रुम गोळा करण्यासाठी खास सहली आखतात. पण मश्रुमच्या बाबतीत एक सावधगिरी बाळगणे अत्यंत आवश्यक असते, ती म्हणजे पूर्ण खात्री असल्याशिवाय, कुठेही उगवलेले मश्रुम खाऊ नयेत. बरेच मश्रुम विषारी असतात. (फ़्रेंच लोक देखील, जाणकारांच्या
सल्ल्याशिवाय, ते उपयोगात आणत नाहीत.) माझे फ़्रेंच मित्र खास माझ्यासाठी ते घेऊन येत असत. अनेक रंगाचे, आकाराचे मश्रूम मी खाल्ले आणि खिलवले आहेत. आता त्यांची नावेदेखील लक्षात नाहीत.
वरच्या फ़ोटोत आहेत ते ऑयीष्टर मश्रुम्स. ते मिळतात भारतात, ताजे नाही मिळाले, तर सुकवलेले मिळतात. स्वादात ते जरा बटन मश्रुम पे़क्षा उजवे असतात. पण यांचे देठ कधीकधी चामट निघतात, (कापतानाच ते लक्षात येते, आणि मग ते वगळले तर चांगले. ) मी त्याचा पिझ्झा केला होता. बेस तयारच वापरला होता. या मश्रुमबरोबर, सन ड्राइड टोमॅटो वापरले होते. हा फ़ोटो ग्रील
करण्या पूर्वी घेतल्याने, चीज तसेच दिसतेय.
बटन मश्रुम ना फ़ार मसाले वापरू नयेत, कारण त्यांने त्याचा स्वाद लपतो, असे मला वाटते. या ताज्या बटन मश्रुमचे माझे एक आवडते लोणचे, असे.
लागणारे जिन्नस असे - २०० ग्रॅम ताजे बटन मश्रूम, दोन टेबलस्पून तेल, दोन टेबलस्पून व्हीनीगर, दोन टेबलस्पून मोहरी, एक टेबलस्पून लाल तिखट, थोडासा हिंग व हळद, एक टिस्पून साखर, मीठ,
कृति अशी : मोहरी किंचीत भरडून घ्या. मश्रुमचे हव्या त्या आकारात तूकडे करुन घ्या. मग तेल गरम करुन त्यात हिंग व हळद घाला. मश्रुम घाला. बाकिचे जिन्नस घालून, दोन मिनिटे शिजवा. झाले तयार.
मश्रुमच्या आणखी काहि प्रकारांबद्दल मग लिहिन.

विषय: 
प्रकार: 

Pages