कॉफी कप केक्स विथ मोका आयसिंग

Submitted by लाजो on 13 May, 2010 - 21:32
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

कप केक्स (मफिन्स):

१/२ कप कनोला/सनफ्लावर तेल
३/४ कप बारीक साखर
२ अंडी
१ कप दुध
२ + १/२ कप सेल्फ रेसिंग फ्लार
१ टी स्पून इंस्टंट कॉफी ग्रॅन्युल्स (नेसकॅफे/ब्रु वगैरे)

मोका क्रिम:

१/२ कप क्रिम चीज (सॉफ्ट)
२ टे. स्पून सॉफ्ट बटर
२ टी स्पून दुध
१ टी स्पून कोको ( किंवा १+१/२ टी स्पून ड्रिंकिंग चॉकलेट)
१/२ टी स्पून इंस्टंट कॉफी ग्रॅन्युल्स (नेसकॅफे/ब्रु वगैरे)
१ टे स्पून पिठी साखर

सजावटीसाठी: जेम्स, m & m किंवा डार्क चॉक बट्टन्स

क्रमवार पाककृती: 

पूर्वतयारी:

१. ओवन १८० से. तापमानाला तापत ठेववा.
२. मफिन पॅन्स मधे पेपर कप्स घालुन तयार ठेवावे. पेपर कप्स नसतिल तर मफिन पॅन नीट ग्रीस करुन मैदा भुरभुरवुन तयार ठेवावेत.

कप केक्स:

१. सर्वप्रथम सेल्फ रेसिंग फ्लार, साखर एकत्र बारीक चाळणीतुन एका मिक्सिंग बोल मधे चाळावे.
२. सर्व ओले जिन्नस = २ अंडी + १/२ कप तेल + १ कप दूध (यातले २ चमचे दूध काढुन ठेवावे) एकत्र करुन लाकडी चमच्याने मिक्स करावे.
३. काढुन ठेवलेल्या २ चमचे दुधात कॉफी ग्रून्युल्स नीट मिक्स करावेत आणि हे मिश्रण ओल्या मिश्रणत हलकेच मिक्स करावे.
४. आता कोरड्या मिश्रणात मधे खड्डा करुन हे ओले मिश्रण हळुहळु ओतावे. लाकडी चमच्याने नीट मिक्स करावे. मिश्रण एकजीव होईपर्यंत चांगले घोटावे.
५. हे मिश्रण तयार मफिन पॅन्स मधे घालावे व बेक करायला ठेवावे.
६. कप केक्स तयार झाले की बाहेर काढुन थंड होऊ द्यावे.

मोका क्रिम:

१. क्रिम चीज (सॉफ्ट असावे. फ्रिज मधुन एक तासभर तरी बाहेर काढुन ठेवावे) + सॉफ्ट बटर + साखर हँड मिक्सर ने एकत्र फेटावे.
२. २ टी स्पून दुधात कोको पावडर आणि कॉफी ग्रून्युल्स नीट मिक्स करुन घ्यावेत. हे मिश्रण वरच्या क्रिम मधे मिक्स करावे व परत एकदा हँड मिक्सर ने एकत्र फेटावे.
३. मिश्रण पायपिंग बॅग मधे भरावे.

डेकोरेशन:

१. पायपिंग बॅग चे नोझल कप केक्स च्या मधे खुपसुन थोडे क्रिम आत घालावे. आणि मग केकवर पसरावे.
२. आयसिंग सेट व्हायच्या आधी वरती जेम्स/m & m/ चॉक बटन्स लावावित.
३. सर्व करायच्या आधी आयसिंग पूर्ण सेट होऊ द्यावे.

हे तय्यार कप केक्स Happy

IMG_1462.JPG

वाढणी/प्रमाण: 
या मिश्रणात साधारण ८ मोठे मफिन्स होतात.
अधिक टिपा: 

१. सेल्फ रेसिंग फ्लार ऐवजी = अडिच कप प्लेन फ्लार + ३ टी स्पून बेकिंग पावडर चालेल.
२. कप केक्स्/मफिन्स हे शक्यतो थोडे डेन्स असतात त्यामुळे मिश्रण एलेक्ट्रिक मिक्सर ने मिक्स करु नये, हातानेच नीट फेटावे. मिक्सर वापरलाच तर अगदी लोएस्ट सेटिंगवर जिन्नस मिक्स होण्या इतपतच वापरावा.
३. क्रिम्/आयसिंग करायच्या आधी केक पुर्णपणे थंड होऊ द्यावेत. अन्यथा आयसिंग मेल्ट होईल.
४. वर दिलेले कप केक्स चे मिश्रण हे बेसिक मिश्रण आहे. त्यात आपल्या आवडी प्रमाणे फ्लेवर्स घालु शकता. उदा - स्ट्रॉबेरी चे तुकडे आणि इसेन्स, बेदाणे आणि मध वगैरे वगैरे.
५. आयसिंग्/क्रिम मधे सुद्धा कोको आणि कॉफी ऐवजी कुठलाही दुसरा इसेन्स वापरु शकता.

माहितीचा स्रोत: 
माझे आणि मैत्रिणीचे प्रयोग.
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त Happy या विकांताला नक्की ट्राय करणार Happy

मी फक्त अ‍ॅलुमीनियमच्या केकच्या भांड्यात (कन्वेक्शन वर) आणि काचेच्या (मावेमधे )केले आहे. माझे प्रश्न

पुण्यात पेपर कप्स , मफिन पॅन्स कुठे मिळतील Uhoh

आणि मफिन पॅन्स नसेल तर पेपर कप्स वापरता येतात का ?

मावेत कन्व्हेक्शन वर कराय झाल तर काय बदल करावे लागतील सेटिंग मधे आणि भांड कोणत वापराव लागेल मावे कन्व्हेक्शन मोड वर?

सेल्फ रे.फ्ला असेल तर बेकिंग पावडर लागत नाही का? बे.पा. नाही घातली तरी केक फुगतो का?

ठांकु सगळ्यांना Happy

@वर्षा, ते पेपर कप्स पुण्यात आता कुठे मिळतिल माहित नाही पण पूर्वी कँपात चंदन मधे मिळायचे. आता चंदन पण आहे की नाही माहित नाही. कप नसतिल तर कुठल्याही छोट्या साच्यात कर. Happy

कवे, सेल्फ रेसिंग फ्लार मधे बेकिंग पावडर असते. वेगळी लागत नाही. मा वे चे सेटिंग्स मला माहित नाहीत गं बयो Sad

लाजोजी, नेहमीच्या केक मधे से.रे.फ्ला असुन सुद्धा मी बेपा घालते कारण बेपा कमी झाली तरी केक फुगुन परत बसतो असा अनुभव आहे. कदाचित इथे मला चांगली ऑथेंटिक से.रा.फ्ला मिळाली नसेल Sad

नेहमीच्या केक साठी
१ cup से.रा.फ्ला.
१ १/२ चमचा बे.पा.
२ अंडी
३/४ कप साखर
३/४ कप तुप्/तेल्/बटर
बाकी कोको बिको आणि इसेंस ज्या त्या प्रमाणे घेते
ह्या प्रमाणात जर बेपा कमी झाली की केक बसतो. फ्लफी होत नाही
साधा मैदा घेतला तर अजुन १ च.बेपा घालावी लागते

मावशे, केक बसण्याच काय कारण असु शकेल? (हे स्पे.टवाळ लोकांसाठी केकचे पाय दुखत असतील उभ राहुन म्हणुन तो बसतो अस उत्तर अपेक्षित नाही :P)

कवे, असेल कदाचित. मी तरी नव्हती घातली बे.पा. मावशे, केक बसण्याच काय कारण असु शकेल? << पुरेसा फेटला गेला नाही, ओव्हवन्चे टेंप बरोबर नाही. केक चे मिश्रण ज्या भांड्यात ओतले त्याची कपासिटी (भांड मोठ पसरट आणि त्यामानाने मिश्रण कमी) अशी काही कारण असु शकतिल.

तोषा Happy नक्की करु केकगटग Happy

फोटोतले एक दोन कमी झाल्यासारखे वाटताहेत. इथल्या कुणीतरी खाल्ले वाटते <<< दिनेशदा, केक झाल्यावर फोटो काढायच्या आधी एक केक नवरोबांनी आधीच खल्ला होता Happy

तिला मला केक्स शिकवायला जमणार असेल तर मी स्टुडंट व्हायला पण तयार आहे <<<<<<कवे,मग तर गुरुला मावशी म्हणुन उपयोग नाही, पाया पड आधी Proud

हो, तेच गं साधना Happy
मफिन्स चे पेपरकप्स थोडे मोठे असतात. वेगवेगळ्या डिझाईन्स, रंगात मिळतात. पण छोट्या कप्स मधे केले तरी चालेल. मिनी कप केक्स होतिल Happy

लाजो- टेरिफीक. Happy
बेकिंगची मला प्रचंड भिती वाटते. लोणच्यांची आणि पाकातल्या लाडवांची सुद्धा एवढी वाटत नाही. एकदा कधीतरी वेळ काढुन बेकिंग शिकेन म्हणते.

ते पेपर कप मेल्ट होत नाहित का अवन मधे<<< नाही. पेपर कप्स हे बेकिंग पेपरचे बनवलेले असतात. मफिन टीन मधे पेपर कप्स ठेवुन मग त्यामधे बॅटर घालायचे. उद्या फोटो काढुन डकवते.

तो पर्यंत अंदाज यायला हा फोटो बघ.

Picture 075.jpg

मफिन टीन मधे पेपर कप्स .
या फोटोतले केक मी पॅटी पॅन मधे केलेत आणि मग डेकोरेट करुन ते मफिन पेपर कप्स मधे ठेवलेत.

अगं लाजो
मी पूर्वी चांगल्या रेसिपीज/काहीही मा.बो.वरचं, माउस राइट क्लिक करून लेकीला जीमेल करायची ...आता हेही पाठवायचं आहे पण राइट क्लिक करून ते जमतच नाहीये. (बादवे लेक मफिन्स मस्त करते व तिच्याकडे हे मफिनपात्र आहे.)
काही बदल झालेत का?

Pages