इन पन्नोंपे आसुओंके छिटे है
कुछ आसू मेरे, कुछ सहेलियोंके है
दर्द हरेक का अपना अपना
आसूओंकी लाली मगर एकसी है
दर नवरात्रीला न चुकता येणारी एक आठवण - अमर प्रेममधल्या शेवटच्या प्रसंगाची. नवरात्रीला सुरुवात झालेली असते. सगळीकडे देवीला घरी आणण्याची भक्तांची लगबग. त्याच गर्दीत कुठेतरी एक वयस्क स्त्री आणि एक तरूण मुलगा. रक्ताचं कसलंही नातं नसलेल्या ज्या लहानग्यावर जीवापाड प्रेम केलं तोच आता मोठा होऊन लौकिकार्थाने कोणी नसलेल्या आपल्या 'आईला' मानाने घरी घेऊन जातोय. नकळत्या वयात हा प्रसंग पाहिला तेव्हा आई-मुलाच्या नात्याचा, ते जपणार्या आपल्या देशाचा, स्त्रीला देवी मानणार्या संस्क्रृतीचा अभिमान वाटला होता मला, पण पुष्पाच्या आयुष्याची परवड लक्षात राहिली नव्हती. मग जाण आल्यावर हा सन्मान करणार्या देशातच स्त्रीच्या आयुष्याचे धिंडवडे निघालेले पाहिले, वाचले. एक माणूस म्हणून आणि एक स्त्री म्हणून थरकाप उडाला. डोळ्यावरची झापडं उतरली.
पुरुषांना दु:ख नसतील असं मी म्हणणार नाही. आम्हा बायकांनी डोळ्यातून पाणी काढलं तर कोणाला नवल वाटत नाही. पण तेच पुरुषांनी काढलं तर "रडतोयस काय बायकांसारखा" हेच ऐकावं लागण्याची शक्यता अधिक.
हे मान्य करून सुध्दा मी हेच म्हणेन की निदान ह्या देशात तरी स्त्रीचं दु:ख पुरुषापेक्षा "कांकणभर" का होईना पण जास्तच आहे. मला "Female Chauvinistic Pig" म्हणा हवं तर.
प्रत्येकीच्या दु:खाची जात वेगळी, कारणं वेगळी. केवळ स्त्री आहोत म्हणून अमुक एक गोष्ट करायची परवानगी नाही ही कोणाची ठसठसणारी वेदना तर कुठे मूळ अस्तित्वाच्या प्रश्नाची अश्वत्थाम्यालाही लाजवेल अशी भळभळणारी जखम. पण अश्रूंचा रंग मात्र एकच - पाण्यात रक्त मिसळलं की होतो तो. पहा, तुम्हीही मान डोलावलीत. ओळखीचा आहे ना हा रंग?
माझ्या वाटयाला आलेलं आकाश इवलंसं खरं पण त्यातल्याही चांदण्या निखळताना पाहिल्या आहेत मी.
-----
तिचं नाव बदलूनसुध्दा नाही लिहिणार मी. खरं तर जास्त तपशील देणारच नाही मी. कारण इथेही तिला ओळखणारा-ओळखणारी कोणीतरी भेटेलच. म्हणतात ना - It's a small world.
ती माझी रूममेट होती. प्रोजेक्टच्या कामानिमित्त मी एका वेगळ्या देशात, वेगळ्या शहरात. खरं तर आमचं जमणं कठीणच होतं. ती अबोल आणि मी मुलखाची बोलघेवडी. पण तिच्या चेहेर्यावर कायम एक हलकं हसू असायचं. She was at peace with herself and the world.
तो तिचा मित्रसुध्दा आणि कलिगसुध्दा. दररोज सकाळी तिला ऑफिसला न्यायला गाडी घेऊन यायचा तेव्हा आमच्या गप्पा व्हायच्या - अर्थात सकाळी जेव्हढया शक्य होतील तेव्हढ्याच. कधी विकेन्डला शॉपिंगला तिघे एकत्र जायचो. पुढे माझा स्वतःचा गोतावळा तयार झाला आणि त्या दोघांबरोबर बाहेर जाणं कमीकमी होतं गेलं, मग थांबलं.
मग एके दिवशी सकाळी तो तिला न्यायला आला नाही, त्यानंतर तो कधीच आला नाही. तिने ऑफिसला जायची दुसरी सोय केली. मी विचारलं तर त्याने जॉब बदललाय एव्हढंच म्हणाली. ऑफिस हेच माझं दुसरं घर झालं होतं त्या काळात, आणि जास्त खोलात जाऊन विचारावं असं तेव्हा तरी वाटलं नाही.
विचारायला पाहिजे होतं हे जाणवलं जवळजवळ २-३ आठवड्यांनी. ऑफिसमधलं काम थोडं कमी झालं होतं. रात्रीच्या ऐवजी संध्याकाळी घरी येणं जमू लागलं. सकाळची धावपळ थांबली. आणि मग तिच्यात झालेला बदल लक्षात आला. अबोल व्यक्ति अजून अबोल होणं शक्य आहे का? मला विचारलंत तर मी म्हणेन आहे. विचारलेल्या प्रश्नाला कधी उत्तर मिळायचं, कधी नाही. टीव्ही लावून बसायची पण तो बघत नाहीये हे कळायचं. कधी जेवायची, कधी नाही. काय झालंय विचारलं तर म्हणायची "काही नाही ग राणी, मी ठिक आहे". पण डोळे कायम भरून आलेले.
शेवटी हे सगळं मला असह्य झालं. एका जिवलग मित्राकडे मी हा विषय काढला. तिच्या आईवडिलांना भारतात कळवावं का ह्यावर आमचा खल झाला. पण त्यांना काळजीत टाकावं हेही पटेना. बरं तिच्याशी बोलावं तर ती काही धड सांगत नव्हती. आमचे नुसतेच तर्कवितर्क त्यामुळे तिच्या त्या मित्राशी बोलण्यात अर्थ नव्हता. शिवाय दुसर्याच्या खाजगी बाबतीत आपण लक्ष कसं घालायचं हा विचार.
ऑफिसमधून ती माझ्या आधी घरी यायची. दररोज संध्याकाळी चावीने दरवाजा उघडताना माझ्या छातीत धडधडायचं - ही सुखरूप असेल ना? जिवाचं काही बरंवाईट तर करून घेणार नाही? पण एका संध्याकाळी हा प्रश्नच निकालात निघाला. आत आल्यावरच मला कळलं की तिचं सामान दिसत नाहीये. टेबलावर एक चिठ्ठी होती. ती दुसर्या अपार्टमेन्टमध्ये रहायला गेली होती. बस्स, फक्त एव्हढंच होतं त्यात.
आज तटस्थपणे विचार केला ना की त्या क्षणीची माझी रिअॅक्शन आठवली की माझी मलाच लाज वाटते. मला फक्त सुटल्यासारखं वाटलं होतं. जणू त्या घरातून ती निघून गेल्यावर तिचं दु:खसुध्दा माझ्या आयुष्यातून निघून गेलं होतं. तिच्या दु:खाने दु:खी व्हायची आता मला गरज नव्हती. मी फोनवर बोलताना मोठ्याने हसू शकत होते - गिल्टी फील न करता. आणि मुख्य म्हणजे हिने काही बरंवाईट करून घेतलं तर परक्या देशात पोलिसांच्या ससेमिर्याला मला तोंड द्यावं लागेल ह्याची भीती नव्हती. प्रेमात पडून "देवदास" करून घेणार्यांबद्दल मला कधीही सहानुभूती नव्हती हे ह्यामागचं कारण असू शकेल कदाचित. पण माझं त्यावेळचं वागणं माणुसकीला धरून नव्हतं हे मात्र खरं.
पुढे एकदा एका मॉलमध्ये दिसली होती पण तिनेही ओळख दाखवली नाही आणि मीही नाही. तिचं पुढे काय झालं मला माहित नाही, कधी जाणून घ्यायचा यत्न केला नाही. पण माझ्या आयुष्यातल्या एका पानावर तिचे अश्रू सांडलेत एव्हढं मात्र नक्की.
-----
खरं तर माझ्या मैत्रिणीला एक जुळी बहिण आहे हे मला माहित होतं हं. पण त्या दिवशी कॅन्टीनमध्ये आम्ही बसलो होतो तेव्हा ही बाब माझ्या मनातून साफ पुसली गेली होती. कदाचित पुढच्या आठवड्यात होणार्या डेमोचा विचार मनात होता म्हणून असेल किंवा ती बहिण भारतात आहे हे मला माझ्या मैत्रिणीने सांगितलं होतं त्यामुळे ती परदेशातल्या आमच्या ऑफिसमधल्या कॅन्टीनमध्ये कशी येईल असं कुठेतरी वाटलं म्हणून असेल. पण त्या दोघींना दुरुन सूप घेताना पाहून मी खरंच डोळे चोळले.
त्या दोघींची मात्र हे पाहून सॉलिड करमणूक झाली. "ये मेरी फ्रेन्ड स्वप्ना और ये मेरी जुडवा बेहन निमा" माझ्या मैत्रिणीने रीमाने ओळख करून दिली. "और हम दोनो कुंभके मेलेमे बिछडे नही, थॅन्क गॉड!" निमा खळखळून हसत म्हणाली. "तेरी सूरत देखने के लिये तरस गयी थी मै तो" रीमा डोळे मिचकावत म्हणाली. आम्ही सगळेच हसलो. जुळ्या बहिणी पहायची माझी पहिलीच खेप. दोघीत इतकं साम्य की माझी आई म्हणते तसं 'एकीला लपवावी आणि दुसरीला काढावी", पण नीट निरखून पाहिलं तर निमाचे फीचर्स माझ्या मैत्रिणीपेक्षा जास्त शार्प होते. थोडी जास्त प्रॅक्टिकल आणि खंबीर वाटली ती रीमापेक्षा तिच्या बोलण्यावरुन.
कंपनीच्या कामासाठी आलेली निमा मग २-३ आठवड्यात परत भारतात गेली. त्यापूर्वी प्रत्येक विकेन्डला आम्ही तिघी शॉपिंगला वगैरे एकत्र गेलो होतो, खूप धमाल केली होती. त्यामुळे ती परत गेल्यावर रीमाइतकंच मलाही जाणवलं. २-३ दिवस ऑफिसमध्ये एकत्र लंच घेताना तिचा विषय अपरिहार्य झाला.
"और थोडे दिन रहनी चाहिये थी रे निमा. मेरे साथ एक Tarot Card Reader के पास आने के लिये तैय्यार थी वो. जस्ट देखने के लिये के इस सबमे कुछ दम है या नही. तू तो कभी आनेसे रही. She is a sport"
"हा रे, हमेशासे ही वो ऐसे है. पर्सनल लाईफ मे भी इतना निडर होती तो इतने दुख ना उठाने पडते"
मला आश्चर्य वाटलं. आपणहून काही विचारायचं नाही हा खाक्या खरा पण ह्यावेळी रहावलं नाही. "क्या बात कर रही है" मी एकदम बोलून गेले. मग जीभ चावली आणि म्हटलं "hey, I am sorry. I shouldn't have asked"
काही क्षण गप्प राहिली रीमा आणि मग म्हणाली "मैने कितना समझाया था मम्मी-डॅडीको. मुझे निमाका होनेवाला हजबन्ड पहलेसेही पसंद नही था. लेकिन इसकी शादीही नही हो रही थी. वैसे उम्र निकली नही जा रही थी लेकिन तुम्हे तो पता है बिरादरीवाले कैसे सवाल करते रहते है. इस लिये जिसने हा कहा उसीके साथ शादी कर डाली. मैने निमाको कितना समझाया, अच्छी लिखी पढी है, नौकरी कर रही है, मम्मी-डॅडीसे ना क्यो नही करती. लेकिन सोचती हू वोभी इस सबसे तंग आ गयी थी. शायद उसने मम्मी-डॅडीके बारेमे सोचा हो. और फिर लडका अच्छे घरका, पढा-लिखा था. सबको लगा के वो दिखनेमे अच्छा नही है सिर्फ इस लिये मै इस शादीके खिलाफ हू. किसीने मेरी एक नही सुनी."
"शादी के बाद उसकी सासने रंग दिखाने शुरू किये. कभी कभी खाना भी नही देती थी. निमा बेचारी मम्मीके पास आती और मम्मी उसे पराठे वगैरे खिलाती थी. तबभी मैने उससे कहा था के डिव्होर्स दे दे. पर बादमे वो प्रेग्नंट थी."
"उसका हजबन्ड कुछ नही बोला?"
"कुछभी नही. उसके लिये मम्मी जो बोले भगवान बोलनेके बराबर है. ऐसे लोग शादी क्यो करते है रे?"
मला तरी काय माहित? मी अवाक होऊन ऐकत राहिले. एका मेट्रोतल्या सुशिक्षित घरात हे असं होत असेल ह्याचं आश्चर्य नव्हतं. सुशिक्षित घरातच हे असं आणि बरंच काही घडतं हे माहित झालंय. शिक्षणाचा आणि सुसंस्क्रृत असण्याचा दुरान्वयेही संबंध नाही हेही माहित आहे. पण आपल्या ओळखीतच कुठेतरी असं घडतंय ह्याचा कोणास ठाऊक का पण थोडा धक्का बसला.
"अब कैसे है सब?"
"अब थोडा बेटीका सपोर्ट है उसे. लेकिन अभीभी उसकी सास बोलती है के घर मे नौकर नही रखने है. पिछले बरस तक बर्तन मांजने का काम निमाका होता था. अभी उसने खुदकी सॅलरीसे एक नौकर रखा है."
"अभीभी डिव्होर्स..."
"अब बोलती है, मैने डिव्होर्स ले लिया तो बच्चीका क्या होगा, आगे चलके उसे तकलीफ ना हो"
मला एकदम बहिणाबाईंच्या "लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते" चा नवा अर्थ लागला. मनात येईल ते आणि तसंच करेल असं वाटणारी निमा खाजगी जीवनात इतकी हतबल का झाली असेल? एक स्त्री दुसरीला असं कसं वागवू शकते? दोर्यात गुंफलेले चार काळे मणी असा फास लावू शकतात की जीवच घुसमटावा?
आणि रीमाच्या हताश चेहेर्याकडे बघताना आणखी एक विचार मनात पिंगा घालू लागला. हिचं लव्ह मॅरेज, यूएस मध्ये एका चांगल्या कंपनीत कायमस्वरूपी नोकरी, एक छान मोठं घर. एकाच आईच्या पोटी एकाच वेळी एकच चेहेरा घेऊन आलेल्या ह्या दोघी. पण मग सटवाईने एव्हढे वेगळे लेख त्यांच्या कपाळावर का लिहिले असतील?
-----
तिची माझी ओळख कुठे झाली माहित आहे? आमच्या ऑफिसच्या रिसेप्शनमध्ये. आम्हा दोघींचा जॉइन करायचा दिवस एकच. पहिल्याच दिवशी उशीर होऊ नये म्हणून मी लवकर निघाले होते आणि लवकर पोचले होते. HRची बाई येईतो आम्ही दोघी रिसेप्शनमध्ये बसलो होतो. मी आपणहून कधी कोणाशी बोलायला जात नाही. पण ऑफिसात येणारे कार्ड पंच करताना आमच्याकडे "आले नवे बकरे इथे पिळून घ्यायला" अश्या थाटात पहात होते. मग मीच तिच्याशी बोलणं सुरु केलं. गंमत म्हणजे आमची आणखी एक कंपनी सेम निघाली. मी तिथला जॉब सोडल्यावर तिने जॉईन केलं होतं. आम्हा दोघींना ह्या योगायोगाची मजाच वाटली.
तिचं डिपार्टमेन्ट वेगळं होतं पण आम्ही लंच एकत्र घेऊ लागलो. पुढे काही दिवसांनी आपोआप आमचे लंच आपापल्या टीमसोबत होऊ लागले. पण ४ चा चहा आम्ही एकत्रच घ्यायचो. संध्याकाळी निघतानासुध्द्दा आम्ही बहुधा एकत्रच निघायचो. असंच एकदा बोलताना कळलं की तिचं लव्ह मॅरेज होतं. आडनाव जरी गुजराती लावत असली तरी ती मूळची तामिळ ब्राह्मण. मला तर ऐकून शॉकच बसला कारण ती गुजराती इतकं अस्खलित बोलायची की ती गुजराती नसेल अशी मला कधी पुसटशीही शंका आली नाही. "ओये, तू दिखती भी तो गुजराती है. ऐसे पहले सेही दिखती थी या शादीके बाद दिखनी लगी?" मी हसून म्हणाले. "तो अब तेरे घरपे फिल्टर कॉफी मिलेगी" "अरे कहा रे, मै खुद फिल्टर कॉफीके लिये तरस गयी हू. घरमे साऊथ इंडियन खानाभी नही बनता है" ती किंचित हिसमूसून म्हणाली होती.
मग तिचं डिपार्टमेन्ट मुंबईतल्याच दुसर्या लोकेशनला शिफ्ट झालं. तरी ऑफिस कम्युनिकेटरवर रोज गप्पा होत. आणि मग पोंगलचा दिवस आला. नेटवरून शोधून मी तामिळमधे कसं विश करायचं ते पाहून घेतलं आणि तिला एसएमएस केला. १० मिनिटांनी उत्तर आलं. "Thank God! At least someone remembers that i am Tamil. :-(" तिला सकाळपासून घरातल्या कोणीही ह्या सणानिमित्त विशच केलं नव्हतं आणि करतील अशी आशाही नव्हती. जणू तिचं तामिळ असणं घरातले सगळे विसरून गेले होते.
तुमच्यापैकी काही जणांना ह्यात वावगं काहीच दिसणार नाही कदाचित. पण आपली मातृभाषा, ज्या जातीत आपण जन्म घेतो तिचे संस्कार, सण हे आपल्या व्यक्तिमत्त्वाचा, अस्त्तित्त्वाचा एक अविभाज्य भाग असतात. ते संस्कार नाकारले जाणं - कळत किंवा नकळत - म्हणजे एका तर्हेने तुमचं अस्त्तित्त्वच नाकारलं जाणं. ज्या घराला, तिथल्या संस्कारांना, रीतीला, भाषेला तिने आपलं मानलं त्यांच्याकडून ही एव्हढी बाब विसरली जावी हयाचं तिला किती दु:ख झालं असेल ह्याची कल्पना मला त्या शेवटच्या रडवेल्या आयकॉनवरून आली.
स्त्रीने लग्नानंतर दुधातल्या साखरेप्रमाणे सासरच्या घरी विरघळून जावं अशीच अपेक्षा असते. पण त्या साखरेचा गोडवा आणि तो ज्या मातीतून आला आहे ती माती दुधानेही विसरता कामा नये, नाही का?
-----
अभिनेत्री मीनाकुमारीचा एक शेर आहे:
टुकडे टुकडे दिन बीता
धज्जी धज्जी रात मिली
जिसका जितना आंचल था
उतनी ही सौगात मिली
शेवटी आमची झोळीच फाटकी हेच खरं का?
-----
ह्याआधीची पानं:
सुरेख लिहिलं आहेस..
सुरेख लिहिलं आहेस..
svalekar, डुआय, शैलजा, खूप
svalekar, डुआय, शैलजा, खूप खूप धन्यवाद!
स्वप्ना एवढे सुंदर अर्थपूर्ण
स्वप्ना एवढे सुंदर अर्थपूर्ण शेर.. कुठून मिळवतेस???
नेहमीप्रमाणे मस्त !!
नेहमीप्रमाणे मस्त !!
dreamgirl, लेखाच्या
dreamgirl, लेखाच्या सुरुवातीच्या ओळी माझ्या आहेत आणि लेखाच्या शेवटाला मीनाकुमारीचा शेर आहे तो लोकसत्तात दररोज शेरोशायरीवर एक कॉलम येतो त्यात आला होता. धनुडी, धन्यवाद ग!
सुरेख! शेर सहीच!
सुरेख! शेर सहीच!
क्या बात ... क्या बात....
क्या बात ... क्या बात....
लग्न झाल्यावर आपलं सगळं -
लग्न झाल्यावर आपलं सगळं - आई-बाबा, मित्रमैत्रिणी वगैरे सर्व सोडून दुसर्या घरात जाणे व सगळ्यात कठीण असे मातॄत्व निभावणे - या करता सर्व स्त्रियांना कायमच सलाम, दंडवत. त्यामुळे हा लेख विशेष आवडला.
माझ्या एका रचनेत हे मांडायचा प्रयत्न केला आहे - http://www.maayboli.com/node/24188
अप्रतिमच, मस्त लिहिले.
अप्रतिमच, मस्त लिहिले.
स्त्रीने लग्नानंतर दुधातल्या
स्त्रीने लग्नानंतर दुधातल्या साखरेप्रमाणे सासरच्या घरी विरघळून जावं अशीच अपेक्षा असते. पण त्या साखरेचा गोडवा आणि तो ज्या मातीतून आला आहे ती माती दुधानेही विसरता कामा नये, नाही का?>>>>>> खुप छान
Pages