ये कुछ आधे अधुरे पन्ने है - पन्ना ३

Submitted by स्वप्ना_राज on 16 December, 2009 - 23:23

"कोsहम?" हा प्रश्न आपण किती वेळा स्वतःला विचारतो? विचारला तरी त्याचं उत्तर किती वेळा आपल्याकडे असतं? पण आयुष्य ही अशी अफलातून चीज आहे की खूपदा शोधूनही काही प्रश्नांची उत्तरं सापडत नाहीत ती नाहीच. आणि न शोधताही कधीकधी उत्तरं आपोआप मिळतात. मग आपलीच आपल्याशी नव्याने ओळख होते - कधी सुखावणारी, कधी बुचकळ्यात पाडणारी आणि कधी मुळापासून हादरवणारी.....

-----

कारगिलचे दिवस. कधी युध्द न पहाता मोठया झालेल्या माझ्या पिढीला हे सारं नवीन. तसे दररोजच सैनिक सीमेवर लढतात. पण आज अमुक इतके भारतीय सैनिक पाकिस्तानी घुसखोरांना पिटाळून लावताना शहीद झाले किंवा सीमेवर पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या गोळीबाराच्या प्रत्युत्तराखातर आपल्या सैनिकांनी गोळीबार केला ह्या बातम्या फक्त वाचून पान उलटण्यापुरत्या होत्या, तेव्हाही - आत्तासारख्याच. Sad माझ्यासारखंच कित्येकांनी तोपर्यंत युध्द फक्त चित्रपटातच पाहिलेलं. आणि इतिहासाच्या पुस्तकात वाचलेलं - मार्कस मिळवण्यापुरतं.

पण ह्या वेळी हे युध्द वेगळं. आयुष्यात फारसं काही करू न शकलेल्या एखाद्या धाकटया भावंडाने यश मिळवत असलेल्या मोठया भावाचा करावा तसा कायम दुस्वासच करत आलेल्या शेजार्‍याने पुन्हा कुरापत काढलेली. फाळणीच्या जखमा पुन्हा ताज्या केलेल्या. लताचं १५ ऑगस्टला वाजण्यापुरतंच महत्त्व उरलेलं "जरा याद करो कुर्बानी' आत्ता कुठे वास्तव होऊन समोर ठाकलेलं. सीमेपारही आपल्यासारखीच युध्द नको असलेली सर्वसामान्य माणसं आहेत ह्या सारासार विचाराचा विसर पडावा अशीच स्थिती. भूकंप होऊन सगळं पाकिस्तान जमिनीत गडप व्हावं अशी प्रार्थना कितीदातरी तेव्हा केल्याची आठवते आता.

आणि प्रत्येक जण विचारात - आपण काय करू शकतो? वर्तमानपत्रात निधी गोळा करायच्या बातम्या वाचून मला वाटलं अनेक लोक पैसे गोळा करताहेत पण सीमेवर अक्षरशः जीव पणाला लावून लढणार्‍या सैनिकांना आपण पत्र का पाठवू नये? त्यांना कोणीतरी सांगायला हवंय की तुम्ही करताय त्या त्यागाची आम्हाला जाणीव आहे. एक अमर ज्योत उभी करून आमचं कर्तव्य संपलेलं नाही. बर्‍याचदा आम्हाला तसं वाटत असलं तरी Sad

लगेच जवळच्या सगळ्या मित्र-मैत्रिणींना कल्पना सांगितली. लोकांच्या उच्चार, विचार आणि आचारात फरक असू शकतो हे कळण्याइतका जगाचा अनुभव तेव्हा नव्हता. त्यामुळे खूप पत्रं जमतील अश्या कल्पनेत मी होते. अर्थात ज्याला कोणाला द्यायची असतील त्यांनी द्यावीत, त्यासाठी कोणाच्या मागे लागायचं नाही असं मी आधीच ठरवलं होतं कारण फक्त मनापासून लिहिली तरच त्या पत्रांना अर्थ असणार होता. "मोले घातले रडाया" असला प्रकार मला नको होता.

तरी एक जिवलग मैत्रिण पत्र नक्की लिहेल ह्याची मला इतकी खात्री की माझ्या निश्चयाला मुरड घालून मी तिला ते न देण्याचं कारण विचारलं. तिचं उत्तर ऐकून मला हसावं का रडावं हेच समजेना. "असं पत्र लिहिलं तर आपण युध्दाला प्रोत्साहन देतोय असं नाही का वाटत तुला?" तिने विचारले. "अग पण हे युध्द आपण पुकारलं का? आपल्यावर हल्ला झाला तर उत्तर नको द्यायला?" मी लॉजिकली घ्यायचं ठरवलं. "ते काहीही असो. पण माझा युध्दावर विश्वास नाही. त्याने प्रश्न सुटत नसतात". नेहमी सारासार विचार करणारी ही आज असं काय बोलतेय मला कळेना. "पण हे प्रश्न युध्द न करता सुटावेत ह्यासाठी आपण काही करतोय का? नाही ना? मग?" मी येनकेनप्रकारेण तिला समजावण्याचा प्रयत्न केला पण ती तिच्या निश्चयावर ठाम राहिली. नाहीच दिलं तिने पत्र.

त्या दिवशी मला वाटलं की मी हिला कधी ओळखलंच नाही का? मग इतके दिवस जिला मी माझी मैत्रीण समजत होते ती कोण? आमच्यात इतके टोकाचे मतभेद असू शकतात? ह्यापलीकडे आमची मैत्री टिकू शकेल?

पण आमची मैत्री टिकली. प्रत्येक व्यक्तिला मतस्वातंत्र्य आहे आणि एका निकोप नात्यात ते असायलाच हवं हा धडा मला दिला ते सीमेवरच्या मी कधी न पाहिलेल्या सैनिकांनी लढलेल्या युध्दाने. "Agree to Disagree" हे मला कधी झेपेल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं पण माझीच ही ओळख मला कारगिलने दिली.

-----

आता तुम्ही विचार करत असाल की शेवटी किती पत्रं गोळा झाली? सांगू? ३. फक्त तीन - मी लिहिलेलं धरून हं.

त्यातलं दुसरं पत्र तेव्हा इंग्लंडमध्ये असलेल्या एका मित्राने पाठवलं होतं. नंतरच्या त्याच्या मेलमध्ये त्याने त्याबद्दलचा किस्साही लिहिला. इमेल मिळाल्यावर लगेच ऑफिसमधे बसून त्याने पत्र लिहिलं आणि एनव्हलपमध्ये घातलं खरं पण भारतात पाठवायला त्याला स्टॅम्प मिळेना. एव्हढयात त्याचा एक मित्र तिथे आला. हा भारतात पत्र पाठवायला स्टॅम्प शोधतोय म्हटल्यावर त्याने आपल्याकडचे आणून दिले. आणि मग ह्याने ते पत्र पोस्ट केलं. तुम्हाला मजा माहित आहे? त्याचा तो मित्र पाकिस्तानी होता.

आजही कधी कारगिलचा विषय निघाला की मला हे सगळं सगळं आठवतं. आणि मग मनात विचार येतो की कोणा सैनिकाने आमची इतक्या प्रयासाने लिहिलेली ती ३ पत्रं वाचली तरी असतील का?

-----

"थांब रे, जास्वंदीचं फूल आणि नारळ घ्यायचाय देवाला द्यायला" मी भावाला थांबवत म्हटलं. सकाळची वेळ होती त्यामुळे देवळात विशेष गर्दी नव्हती कारण तो दिवस मंगळवार कुठे होता? देवळाबाहेर दोनच फुलवाले होते. एक बाई होती आणि दुसरा पुरुष. मी जिथे उभी होते तिथून खरं तर त्या पुरुषाचं दुकान जवळचं होतं पण ते ओलांडून मी त्या बाईकडे गेले. अर्थात ह्या देवळाचं वैशिष्ट्य हेच की इथे तुम्ही आला नाहीत तरी तुम्हाला कोणी हैराण करत नाही. हे देऊळ सेलिब्रिटीजसाठी नाहीये. त्यामुळे असेल कदाचित पण इथे देवाचं अस्तित्त्व अजून जाणवतं.

मी फूल आणि नारळ घेतला. दर्शन आणि प्रसाद घेईतो भाऊ गप्प होता. तिथून बाहेर पडल्यावर मात्र त्याला राहवेना "काय ग, तुला ते आधीचं दुकान दिसलं नाही होय? ते ओलांडून पुढे गेलीस ते."

"तिथे फुलं ताजी नव्हती" मी सबब सांगतेय हे त्याला कळणार हेही मला माहित होतं - त्याचं बारसं जेवलेय मी.

"देवळातून बाहेर पडल्या पडल्या तरी थापा मारू नकोस"

"तुला माहित आहे कारण. पण माझ्याच तोंडून वदवून घ्यायचंय ना? त्या दुसर्‍या दुकानात बाई होती म्हणून गेले तिथे. तेव्हढीच तिच्या कच्च्याबच्च्यांना मदत"

"आणि त्या माणसाला नसतील का कच्चीबच्ची? त्या बाईला नवरा असेलच की"

"हं" उत्तर सुचलं नाही के हे "हं" मदतीला येतंच.

"तुझ्याकडून माझी ही अपेक्षा नव्हती. परवाच वैतागत होतीस ना की तुझा बॉस कितीही चांगलं काम केलं तरी टीममधल्या मुलांचं कौतुक करतो आणि जेन्डर बायस्ड आहे म्हणून? आता तू काय आहेस?"

कटू असलं तरी सत्य होतं. किंबहुना कटू होतं म्हणूनच कदाचित ते सत्य होतं. मनात म्हटलं - बाबा रे, माझीसुध्दा माझ्याकडून ही अपेक्षा नव्हतीच. पण आपण स्वत:च स्वत:च्या अपेक्षा किती वेळा पूर्ण करतो?

-----

एमबीए करायचं ठरवलं आणि नकटीच्या लग्नाला लागली नसेल एव्हढी तयारी करावी लागली. त्यातलीच काहीतरी फॉर्मॅलिटी पूर्ण करायला बँकेत गेले. सकाळी सकाळी गेले होते तरी मॅनेजर निवांत होते त्यामुळे सगळी चौकशी झाली - कुठे करणार, किती वर्षांचा कोर्स वगैरे वगैरे. बोलता बोलता त्यांनी एकदम विचारलं "चहा घेणार का? आमच्या सगळ्या क्लायन्टना फार आवडतो इथला चहा" बँकेच्या आसपास कुठे हॉटेल नाही हे मला माहित होतं त्यामुळे मी सहज विचारलं "तुम्ही चहा कुठून मागवता? इथे तर कुठे हॉटेल नाहीये". "तो स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता आहे ना तिथे कोपर्‍यावर आहे एक दुकान. तिथूनच मागवतो"

माझा चेहेरा फोटो काढण्यालायक झाला असणार कारण ते लगेच हसत म्हणाले "अग, आग्रह नाही. पाहिजे असेल तर मागवतो. घाबरलीस का काय?" मी हसले पण चहा घेतला नाही. आणि मग तिथून बाहेर पडताना ते कधीही न पाहिलेलं स्मशानभूमीकडे जाणार्‍या रस्त्यावरचं दुकान डोळ्यांसमोर दिसायला लागलं. नेमकं शब्दात नाही सांगता येणार काय वाटलं ते. पण अंत्यसंस्कार करून परतणारी मंडळी तिथं चहा घ्यायला थांबत असतील ह्यावर का कोणास ठाऊक माझा विश्वासच बसेना. एखाद्या व्यक्तिला जगातून कायमचा निरोप दिल्यावर रोज सकाळी उठून घेतो तसा चहा घ्यायचा? कसंसंच वाटलं.

आणि मग एकदम महाभारतातली कथा आठवली. त्या यक्षाला युधिष्ठीराने काय सांगितलं? जन्मापासून सोबत असलेलं म्रृत्यू हे एकमेव सत्य आपण माणसं कायम नाकारतो हे जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. मग ते सत्य एव्हढया जवळून पाहिल्यानंतर माणसं चहा घेण्याइतकं नॉर्मल वागू शकत असतील सुध्दा. किंवा असंही असू शकेल की ह्या शाश्वत सत्याची प्रकर्षाने जाणीव झाल्यावर ते विसरायचा प्रयत्न करण्यासाठी रोजच्या जीवनातल्या एखाद्या रूटीन गोष्टीचा आधार घेत असतील.

ह्या लोकांपेक्षा मी जराही वेगळी नाही. मीही अमर असल्यासारखीच वागते. 'आज करे सो कल कर, कल करे सो परसो" ही आयुष्याची टॅगलाईन होऊन बसलेय. पण कुठेतरी "द शो मस्ट गो ऑन" चा दिलासा हवाच असतो आयुष्याला. त्यामुळेच २६/११ नंतर विलक्षण हादरलेली मी अंगणातल्या संध्याकाळी दंगा करणार्‍या मुलांवर नेहमीप्रमाणे न चिडता त्यांचा खेळ पहात होतेच की.

तरीही त्या दिवशी मी आतून कुठेतरी हलले. कारण म्रृत्यू एखादा संसर्गजन्य रोग असल्यासारखं त्या स्मशानाजवळच्या दुकानातून आलेला चहा घ्यायला कचरेपर्यंत मी त्याची धास्ती घेतली आहे हे त्या दिवशी मला जाणवलं.

"जिंदगी तो बेवफा है एक दिन ठुकरायेगी. मौत मेहबूबा है अपने साथ लेकर जायेगी." हे शेवटचा श्वास घेईतो मान्य होणारच नाहीये का? Sad म्रृत्यूच्या डोळ्यांत पाहून "Hello, Mr. Death" म्हणायचं धैर्य कधी येणारच नाही?

-----

हर सुबह जो दिखाता है आईना वो सूरत तो मेरी है
फिर इन पन्नोंसे जो उभरती है वो तस्वीर किसकी है?

-----

ह्याआधीची पानं:

ये कुछ आधे अधुरे पन्ने है - पन्ना १

ये कुछ आधे अधुरे पन्ने है - पन्ना २

गुलमोहर: 

छान Happy

स्वप्ना- तिन्ही भाग खूप आवडले. लिहीत रहा. मुख्य म्हणजे विचार करत रहा, तपासुन पहात रहा.
गंमत सांगु-हीच ती अचाट टी.व्ही पाहणारी मुलगी हे खरं वाटेना. Wink

स्वप्ना, काय लिहितेस गं?? एकाच वेळी इतक गंभीर आणि विनोदी लिहायला कस जमत तुला?
हॅट्स ऑफ टु यु Happy
अशीच लिहित रहा. खूप खूप शुभेच्छा.

मंडळी, लिहिलेलं वाचल्याबद्दल आणि प्रतिसादाबद्द्ल खूप खूप धन्यवाद! Happy

रैना, अचाट टीव्ही नाही हो पहात मी दररोज. फक्त रविवारी पहाते. Happy बाकीच्या दिवशी आमच्याही घरी मालिकांचंच दळण चालू असतं.

छानच. Happy

Pages