हर मोडपर पूछते रहे हम जन्नतका पता
और पिछले मोडसे जिंदगी बुलाती रही
-----
सकाळची वेळ असते. कधी नव्हे ते आपल्या एका हातात वर्तमानपत्र, दुसर्या हातात चहाचा कप आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मोकळा वेळ असतो. खून, मारामार्या, अफरातफर, बॉबब्लास्ट, राजकारणाचा मासळीबाजार ह्या सगळ्या बातम्यांवरून आपली नजर नुसती फिरत जाते. आणि एकदम एक फोटो दिसतो - कुणा गोजिरवाण्या पक्षाचा, रानातून नागमोडी वळणं घेत जाणार्या पायवाटेचा, धुक्याने गुरफटलेल्या एखाद्या हिमशिखराचा. आपण उत्सुकतेने तो लेख वाचायला घेतो. तो वाचून पूर्ण होईतो आपल्याला वाटायला लागलेलं असतं की आपण पण आता कुठेतरी सुट्टीवर गेलं पाहिजे. हा विचार येण्याचा अवकाश की आत्तापर्यंत निग्रहाने दूर ठेवलेली करायच्या कामांची यादी मनात फेर धरायला लागते. मग आपल्याला तो लेख लिहिणार्या व्यक्तिचा राग यायला लागतो "स्वत: जाऊन येतात ते येतात आणि गप्प बसत नाहीत. हे असे लेख लिहून बाकीच्यांना जळवण्यात काय आसुरी आनंद मिळतो ह्यांना". मग आपण सुट्टीवर जायच्या स्थळांची यादी काढून घोकत बसतो - काझीरंगा, भूतान, मलेशिया वगैरे वगैरे वगैरे. पण खिडकीत मागच्या महिन्यात लावलेल्या जास्वंदीच्या झाडाला खच्चून लागलेली फुलं आपल्याला दिसत नाहीत. समोरच्या झाडावर एक मखमली पक्षी नाचत गात असतो त्याच्याकडे पहायला आपल्याला वेळ नसतो.
कधी ह्याच पेपरात बातमी असते - देवाच्या दर्शनाला जाऊन परतणारे किंवा जायला निघालेले लोक अपघातात दगावतात. नेमके जे कुटुंबाचे एकमेव आधारस्तंभ असतात तेच जगातून निघून जातात - मागे बायको, मुलं, कधी म्हातारे आईवडिल सोडून. आपण विचार करू लागतो - किती दिवस ट्रेकिंगला जायचं म्हणतोय पण मुहूर्त लागत नाहिये. एक दिवस असेच मरून जाऊ. आणि सगळे बेत आपल्याबरोबरच जातील. आपण एक उसासा टाकतो. आणि घरापासून १० मिनिटांच्या अंतरावर असलेलं छोटंसं पार्क रोज येताजाता हाका घालत राहतं.
एक दिवस ऑफिसमध्ये कळतं की कोणा सहकार्याचा ऐन तिशीतला भाऊ हार्ट अॅटेकने गेला - अचानक, काही ध्यानीमनी नसताना. मग संसर्गजन्य रोग पसरल्यासारख्या अश्याच बातम्या येत रहातात - कधी पेपरमध्ये, कधी सोसायटीमध्ये. आपण हळहळतो. पण मनातून एक विचार कितीही झटकला तरी जात नाही - ह्या आयुष्याचं काही खरं नाही. आज आहोत तर उद्या नाही. आपल्याला जे करावंसं वाटतं ते आपण कधी करणार? हौसेने आणलेल्या गझल्सच्या सीडीजवरची धूळ झटकत आपण विचार करत रहातो - आपण आनंदाने कधी जगणार?
मैत्रिणीचा फोन येतो तेव्हा ती सांगते - "अग कालच The Monk Who Sold His Ferrari - वाचलं. कसलं पुस्तक आहे. खरचं आपण जगतोय का आला दिवस रेटतोय ग?" मग आपण विचार करतो - आपली सुखी व्हायची, आनंदाने हसायची डेडलाईन काय आहे? गलेलठ्ठ पगाराची नोकरी लागली की? दारात चारचाकी गाडी आली की? स्वतःच्या हक्काचं छप्पर आलं की? यादी वाढत जाते आणि डेथ आली तरी डेडलाईन येत नाही. मोठ्ठ्या सुखाच्या आशेत आपण छोटीछोटी सुखं निसटू देतो. कधी कळत, नाईलाजाने, कधी नकळत.
पण कधीकधी "देवाजी कृपा करतो". वाळूतून चालताना एखादा वेगळ्याच रंगाचा शिंपला मिळावा तसे काही क्षण ध्यानीमनी नसताना येतात. मग तो अलबेला शिंपला हातात घट्ट धरून आपण किनार्यावर चालत रहातो - आणखी शिंपल्यांच्या शोधात. माझ्या मुठीतले हे काही शिंपले मी घट्ट धरून ठेवलेत ते तुम्हाला दाखवतेय. पहा तुमच्याही मुठीत असतील असे काही - निसटून जायच्या आत बघा.
-----
त्या दिवशी संध्याकाळी ऑफिसमधून घरी निघाले तेव्हा जाम संतापले होते. तश्यात बाहेर येते तो एकही टॅक्सी नाही. चांगली १० मिनिटं वाट पाहिली. मग चडफडत बस स्टॉपवर जाऊन उभी राहिले. अश्या वेळी ७-८ बसेस नेमक्या आपल्याला नको असलेल्या येतात, निम्म्याहून अधिक बस स्टॉप रिकामा होतो, तरी आपण तिथेच. घड्याळ दुप्पट वेगाने धावायला लागतं, भूक लागते. तसंच झालं. शेवटी एकदाची हवी असलेली बस आली. त्यात चढताना रेटारेटी झालीच, चिडचिडही झाली. आज सकाळी उठल्याउठल्या कोणाचं तोंड बघितलं असं म्हणायचीही सोय नाही कारण केस विंचरताना माझंच पाहिलं होतं. 
पैसे देऊन तिकीट घेतलं आणि खिडकीतून बाहेर बघत झालेली चिडचिड विसरायचा प्रयत्न केला तरी काही उपयोग होईना. २ दिवस एका डॉक्युमेन्ट्साठी तंगवून शेवटी नीट पूर्ण न करताच माझ्या कलिगने मला दिलं होतं. ते लक्षात येईतो पठठा घरी निघून गेला होता. ऑनसाईट असलेल्या कलिगला त्या दिवशीच पाठवायचं होतं त्यामुळे १ तास जास्त बसून मला पूर्ण करायला लागलं होतं. कामचुकारपणा करणार्या ह्या असल्या माठांना कंपनी पोसते आणि बॉस महत्त्व देतो म्हणून माझं टाळकं सणकलं होतं.
एव्हढ्यात केसांना मागून हिसका बसला. परत कोणीतरी माठ मागच्या सीट्वर बसताना माझे काही केस घेऊन बसला असणार. सीटच्या मागे असलेल्या दांड्याला धरून मागे कोणी बसलं की हे नेहमीच होतं. मी केसांवरून एकदा हात फिरवला आणि परत विचारात गढले. उद्या येऊ देत आता, तो आहे आणि मी आहे. तरी बरं आहे, आता पुढच्या महिन्यात पीडा दुसर्या प्रोजेक्टवर जातेय ती. तिथे काय घाण करायचीय ती करू देत.
परत केस ओढले गेले. "चक चक" करत मी केस डाव्या खांद्यावरून पुढे घेतले आणि थोडी पुढे झुकून बसले. एफएम चॅनेल बदलून कुठे चांगली गाणी लागतात का ते पाहिलं. नाहीतर आज माझ्या हातून कोणाचा तरी खून नक्की होता.
एफएम वर पण आज सगळीकडे आरजेजची अर्थशून्य बडबडच होती. एखादा दिवस पण अस्सा येतो ना!
तिसर्यांदा केस ओढले गेले तेव्हा मात्र माझा संयम संपला. माणसं आहेत का कोण? तिरमिरीत मागे वळून बघते तर काय.......एक छोटंसं गोंडस बाळ माझ्याकडे पाहून हसत होतं. त्याच्या आईच्या मांडीवर उभं होतं. आणि त्याचा गुबगुबीत हात माझ्या केसांकडे झेपावत होता. माझा सगळा राग कुठल्या कुठे पळाला. "सॉरी हं, मघापासून तुमचे केस ओढतेय. कित्ती हात ओढला मी, खाली बसवलं पण ऐकत नाहिये. असं नाही करायचं." तिने परत त्या बाळाकडे बघून डोळे वटारले. पण ते कसलं ऐकतंय?
"जाऊ द्या हो. मला काही नाही वाटलं" मी त्या बाळाचा हात हातात घेतला तर फिस्सकन हसलं बो़ळकं पसरून. आपल्या भाषेत काहीतरी सांगायला लागलं. कसलं छान वाटलं सांगू. सगळा राग, त्रास, चिडचिड कुठे गायब झाली माहित नाही. एकदम मोकळं वाटलं. जादू होती त्या हातात आणि हास्यात.
अजूनही कधी खूप चिडचिड झाली की ते बाळ आठवतं. त्याचं हसू आणि त्याचा तो स्पर्श कुपीत बंद करून ठेवायला हवा होता ना मी. काय बरं सांगत असेल ते मला आपल्या भाषेत? "अग, आयुष्य एव्हढं सिरियसली घ्यायचं नसतं" असं तर सांगत नसेल ना? लहानपणी असलेलं हे शहाणपण आपण नंतर कुठे हरवून बसतो? ते हरवू नये म्हणून का बाळं मुठी बंद करून झोपतात?
-----
देऊ़ळ कसलं छान - बाहेरून डोळ्याचं पारणं फेडणारं. पण जेव्हा जावं तेव्हा रांगेत उभे असलेले लोक, हात पसरून असलेले भिकारी, हार-फुलं-नारळ विकणार्यांचा गलका. मंदिराभोवती बांधलेली भिंत आणि दाराशी असलेली सेक्युरिटी. देवाचं रक्षण करायला माणसं लागतात ह्या कलियुगात. का आपण देवाचं रक्षण करू शकतो हा माणसाचा दुराभिमान? ह्यातून पार पडून गाभार्यात जातो तर तिथे रेटारेटी, धक्काबुक्की. मग दरवाज्यात उभा असलेला माणूस ओरडतो "पुढे चला, चलो, आगे चलो". आपल्याला उगीच आपण भिकारी असल्यासारखं वाटायला लागतं. आपण देवाचं रूप डोळ्यात साठवून घ्यायचा प्रयत्न करतो पण दोन भटजींनी त्याला पूर्ण झाकलेलं असतं. बाहेरच्या सीसीटीव्ही वरून पाहू - आपण मनाची समजूत घालतो. तरी बाहेर पडता पडता आपल्याला वाटतंच - ह्या देवळात देव आहे? मला तर वाटतं तो सकाळच्या काकडआरतीला जो गायब होत असेल तो रात्री मंदिर बंद झाल्यावरच परतत असेल. तेसुध्दा संकष्टीचा आदला दिवस आणि सोमवार सोडून कारण त्या दिवशी रात्री घरातून चालत निघालेले सेलेब्रिटीज येतात ना पहाटे त्याच्या दर्शनाला.
म्हणूनच त्या दिवशी त्या मंदिरात जावंसं वाटलं तेव्हा माझं मलाच आश्चर्य वाटलं. म्हणतात ना देवानेच बोलवायला लागतं. त्यातून त्या दिवशी माझा वाढदिवस होता. हातात एक जास्वंदीचं फूल घेऊन मी रांगेत उभी राहिले. मनात नेहमीचंच विचारचक्र. एकदम कुठूनतरी गाण्याचा आवाज आला. प्रथम मला वाटलं की कोणीतरी एफएम लावलंय मोठ्याने, मग वाटलं कोणीतरी भिकारी गात असेल. १-२ मिनिटांनी लक्षात आलं की रांगेच्या शेजारीच एक माणूस फुलं गुंफत बसला होता. हाताने काम चालू आणि तोंडाने देवाचं नाम - कोणतंतरी मराठी भजन गात होता. रांगेतली सगळी माणसं कान टवकारून ऐकत होती. त्याचा आवाज खरंच छान होता. एकदम वाटलं की त्याला दाद देऊन टाकावी - सकाळी सकाळी इतकं सुरेख भजन ऐकवल्याबद्दल. पण मग नेहमीचाच विचार आला - एक्दम काय बोलायचं? आणि ते पण फुलं विकणार्या माणसाशी? लोक काय म्हणतील? हा विचार चूक आहे हे कळत होतं पण वळेल तर शपथ. मंदिरात शिरले. आज देवदयेने फार गर्दी नव्हती. भटजींचं दर्शन न होता बाप्पाचं मस्त दर्शन झालं. 
बाहेर पडले. बूट घालायला बसले तर मघाचाच तो माणूस आता दुसरं भजन गात होता. माझ्याच्याने अगदीच रहावेना. इतक्या सुंदर गाण्याला दाद न देता जाणं पापच होतं. "फार छान गाता तुम्ही". एव्हढंच म्हणाले मी आणि पटकन निघाले तिथून. का ते नीट शब्दांत नाही सांगता येणार. एक समाधानाची गोष्ट एव्हढीच की त्या माणसाने चमकून मान वर करून पाहिलं आणि हसला एव्हढं मात्र मी पाहिलं.
I didn't make his day. He made mine.
-----
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेला गाडी लागली आणि सगळ्यांचे लॅपटॉप्स उघडले. "अरे, वो प्रेझेन्टेशन खोलना जरा. वो लास्ट पेजमे इमेज चेन्ज कर देते है". "ये क्या फॉन्ट डाला है डॉक्युमेन्ट्मे? अरे, उसे पहलेही इतना मोटा चश्मा है, अंधा हो जायेगा ये देखेगा तो. चेन्ज करो यार". मागच्या सीटवर मी आणि कलिग "लास्ट मिनिट चेन्जेस" करण्यात गुंतलोय. पुढच्या सीटवरून मार्केटिंगचा राजीव बोंबलतोय "आज नही होगा, आज हम पुनेमे है पूरा दिन सिस्टीम डेमो के लिये. कल भेजता हू". फोनवर कोकलून झाल्यावर त्याने फोनवर मेल चेक करायला सुरुवात केली. मध्येच "बहका है मन कही...." ड्रायव्हरचा एफएम लावायचा निष्फळ प्रयास. "ए बॉस, काम करना है यार." राजीवने परस्पर जामलं त्याला. एफएम बंद. मग बराच वेळ नुसताच कीबोर्डचा आवाज.
मध्ये कुठेतरी फूड कोर्ट लागलं, तिथे खाऊन झालं आणि परत गाडीत आल्यावर "मै और मेरा लॅपटॉप बाते करने लगे". आमच्या नशिबात हेच. थोड्या वेळाने राजीवने घड्याळ पाहिंलं "चलो, टाईमपे पहोचेंगे". "वो ठिक है, टाईमपे निकलेंगे क्या?" शेजारचा मयंक पुटपुटतोय एव्हढ्यात गाडी थांबली. "अरे यार, अब क्या हुआ?' राजीवला एक दिवस हार्ट अॅटॅक येणार ह्याची सर्वांना खात्री आहे ऑफिसात. आम्ही लॅपटॉपमधून डोकी काढून पाहिलं तर एक मोठा ट्रक का टॅन्कर समोर आत वळत होता. त्याचं धूड वळेतो ५-१० मिनिटं गेली असती सहजी.
मी सहज डाव्या बाजूला पाहिलं. एक छोटासाच जमिनीचा तुकडा होता. उंच वाढलेलं हिरवंगार गवत वार्यात मस्त डुलत होतं. कडेने गर्द पानांची झाडं होती त्यात कुठे कुठे पिवळी नाजूक फुलं होती - नखाएव्हढी. पानांवर सांडलेलं उन्ह चमकत होतं आणि पांढरी मोठी फुलपाखरं ह्या सगळ्यातून तोर्यात बागडत होती. खरं सांगते मी डोळे चोळून खात्री करून घेतली. कारण Time Machine मध्ये गडबड होऊन स्वर्गातला एखादा तुकडा जमिनीवर यावा तसं काहीसं वाटलं. मिटींग, प्रेझेन्टेशन सगळं सगळं विसरून त्या गवताच्या गालिच्यावर मस्त लोळून यावं, लहानपणी बनवायचो तसा त्या पिवळ्या फुलांचा आणि गवतांचा Bouquet बनवावा, भुईवर पाठ टेकून आभाळाच्या निळाईकडे मनसोक्त पहावं असं खूप वाटलं आणि मनातल्या मनात मी ते सगळं करून घेतलं
"कोई सितारे लुटा रहा था, किसीने दामन बिछा दिया" तसं हा क्षण आयुष्याने मला दिला होता आणि मी तो वाया जाऊ दिला नाही.
अजूनही कधी एक्सप्रेसवेने गेले तर ती जागा शोधायचा मी प्रयत्न करत नाही. का माहित आहे? ती माझ्या मनाच्या कोपर्यात आहे. मला पाहिजे तेव्हा तिथे जाता येतं आता.
जन्नतका किसीसे क्यो हम पूछे अब पता
जन्नतके किसी कोनेमे हमने भी आशिया बनाया है!
-----
कोणी शायर किती मोलाचं बोलून गेलाय बघा.
हर रोझ हम नशेमे होते है और शाम गुजर जाती है
एक रोझ शाम नशेमे होगी और हम गुजर जायेंगे
-----
ह्याआधीची पानं:
जियो स्वप्ना. नेहमीसारखंच
जियो स्वप्ना. नेहमीसारखंच अप्रतिम......
लहानपणी असलेलं हे शहाणपण आपण नंतर कुठे हरवून बसतो? ते हरवू नये म्हणून का बाळं मुठी बंद करून झोपतात?>>>>>व्वा, किती मस्त अर्थ सांगितलास गं.
हर रोझ हम नशेमे होते है और शाम गुजर जाती है
एक रोझ शाम नशेमे होगी और हम गुजर जायेंगे
>>>>एकदम पटलं.
(No subject)
सुंदर!!
सुंदर!!
डेथ आली तरी डेडलाईन येत
डेथ आली तरी डेडलाईन येत नाही.:(
एकदम सुंदर्..साध सोपं सहज..
छान!
छान!
छान!
छान!
सुंदर लिहितेस गं... आज माबो
सुंदर लिहितेस गं... आज माबो चालु झाल्यावर तुझे पन्ने पाहिल्यावर बाकिचे चेक करायचे सोडुन आधी तुझेच वाचले....
सुंदर!
सुंदर!
मस्तच! खूप आवडलं.
मस्तच! खूप आवडलं.
अप्रतिम लिहिता तुम्ही! लिहित
अप्रतिम लिहिता तुम्ही!
लिहित राहा!
ह्या देवळात देव आहे? मला तर वाटतं तो सकाळच्या काकडआरतीला जो गायब होत असेल तो रात्री मंदिर बंद झाल्यावरच परतत असेल. >>>> एकदम मनातलं बोललत! मला पण देवळाच्या रांगेत उभे राहिले कि असेच वाटते. अन तो भटजी आडवा आला कि त्याला 'देवाकडे' पाठवावेसे वाटते.. पण सोबत आई (किंवा हल्ली चंपी) असते त्यामुळे शांती ..शांती ..शांती!
- आपण आनंदाने कधी जगणार?>>> सुखी माणसाच्या सदर्याच्या शोधात सुखी माणसाला सदरा नसतो हे ध्यानी येईतो आपली पण शेवटचा नवा कोरा सदरा (पक्षी: शर्ट) घालायची वेळ येते!
वा ! छान वाटल वाचुन.
वा ! छान वाटल वाचुन.
आऊटडोअर्स, झकासराव, मंजूडी,
आऊटडोअर्स, झकासराव, मंजूडी, एक मुलगी, वत्सला, मयूरेश, साधना,चिंगी, रेशिम, चंपक, जागू - लिहिलेलं आवडलं हे पाहून खरंच खूप बरं वाटलं. ह्यावेळच्या पन्न्यात तसं म्हटलं तर काहीच नाही आणि तसं म्हटलं तर खूप काही आहे. पण आपल्याला भावलं ते इतरांना आवडेलच असं नाही. म्हणून ह्यावेळी थोडी साशंक होते. माबोकरांच्या सहनशक्तीची कमाल आहे
ग्रेट ! माझ्या हाती खजाना
ग्रेट ! माझ्या हाती खजाना लागलाय हिरे-मोती-माणकांचा.
खूप आभारी आहे.
मस्त लिहिले आहे. मी तर अशा
मस्त लिहिले आहे. मी तर अशा क्षणांसाठीच जगते.
क्या बात है स्वप्ना....काय
क्या बात है स्वप्ना....काय लिहीलंयंस ग....शब्दच नाहीत वर्णन करायला, खुपच सुंदर!!! प्रत्येक पन्ना पहिल्या पेक्षा उत्तमोत्तम होत चाललाय..आजुन येऊदेत.ह्या पानांत मनसोक्त हरवुन जायला आवडेल आम्हाला....
खुपच छान !!!!!!
खुपच छान !!!!!!
स्वप्ना.... नेहमीप्रमाणेच
स्वप्ना.... नेहमीप्रमाणेच अप्रतिम!
माबो बंद असल्यामुळे उशिर झाला वाचायला
सही !! खुप छान लिहितेस तू
सही !! खुप छान लिहितेस तू स्वप्ना. प्रत्येक वाक्यागणिक अगदी अगदी म्हणावेसे वाटते. तुझी संवेदनशीलता तर लाजवाब आहेच पण लिहिण्याची हातोटीही मस्त आहे.
हाये! झक्कास!! हा पण पन्ना
हाये! झक्कास!!
हा पण पन्ना खास पन्ना.
sumati_wankhede, अश्विनीमामी,
sumati_wankhede, अश्विनीमामी, सुमेधा पुनकर, हसरी, मंजिरी, आस, चिन्नु - खूप आभार
सुंदर
सुंदर
पन्ना पन्ना... बूटा बूटा...
पन्ना पन्ना... बूटा बूटा... हाल हमारा जाने है
तू लिहिलेले पन्ने वाचले की असं का होतं? होतं खरं... हे नक्की.
जियो!
मस्त लिहीलयस हे पान पण.
मस्त लिहीलयस हे पान पण. आवडले.
मस्त
मस्त
svalekar, दाद, रूनी पॉटर,
svalekar, दाद, रूनी पॉटर, चिमुरी - थेन्क्यू, थेन्क्यू
दाद, असं होतं ह्यात माझं काही नाही हो. हे सगळे अनुभव काही खास नाहीत, चारचौघांसारखेच मला आले आहेत. मी फक्त लिहिलं एव्हढंच. म्हणून सगळ्यांना आपलेच अनुभव लिहिलेत असं वाटतं
स्वप्ना..तुझे पन्ने आले ना कि
स्वप्ना..तुझे पन्ने आले ना कि सर्वात आधी तेच वाचायचे ,हा अधिलिखित नियम झालाय माझा,.u really make my day friend!!
नींद भी खुली न थी कि हाय धूप ढल गयी
पांव जब तलक उठे कि जिंदगी फिसल गई
पात-पात झर गये कि शाख -शाख जल गयी,
चाह तो निकल सकी न,पर उमर निकल गयी
और हम खडे खडे,बहार देखते रहे,
कारवां गुजर गया,गुबार देखते रहे!
असं आमचं होऊ नये म्हणून स्वप्ना तू लिहित राहा..
स्वप्ना..तुझे पन्ने आले ना कि
स्वप्ना..तुझे पन्ने आले ना कि सर्वात आधी तेच वाचायचे ,हा अधिलिखित नियम झालाय माझा,.u really make my day friend!!
नींद भी खुली न थी कि हाय धूप ढल गयी
पांव जब तलक उठे कि जिंदगी फिसल गई
पात-पात झर गये कि शाख -शाख जल गयी,
चाह तो निकल सकी न,पर उमर निकल गयी
और हम खडे खडे,बहार देखते रहे,
कारवां गुजर गया,गुबार देखते रहे!
असं आमचं होऊ नये म्हणून स्वप्ना तू लिहित राहा..
स्वप्ना..तुझे पन्ने आले ना कि
स्वप्ना..तुझे पन्ने आले ना कि सर्वात आधी तेच वाचायचे ,हा अधिलिखित नियम झालाय माझा,.u really make my day friend!!
नींद भी खुली न थी कि हाय धूप ढल गयी
पांव जब तलक उठे कि जिंदगी फिसल गई
पात-पात झर गये कि शाख -शाख जल गयी,
चाह तो निकल सकी न,पर उमर निकल गयी
और हम खडे खडे,बहार देखते रहे,
कारवां गुजर गया,गुबार देखते रहे!
असं आमचं होऊ नये म्हणून स्वप्ना तू लिहित राहा..
अरेच्चा.. एकच प्रतिसाद तीन
अरेच्चा.. एकच प्रतिसाद तीन तीन वेळा गेला!!!!! sorry!!!!!
>>अरेच्चा.. एकच प्रतिसाद तीन
>>अरेच्चा.. एकच प्रतिसाद तीन तीन वेळा गेला
आणि मी उगाच खूश झाले होते की ४ आणखी बकर्यांनी लेख वाचला.
पण थॅक्स ग वर्षा, भावना पोचल्या 
Pages