ये कुछ आधे अधुरे पन्ने है - पन्ना २

Submitted by स्वप्ना_राज on 10 December, 2009 - 00:03

कुछ पन्नोंपे खिलखिलाती हसी है, जिन्हे साथ लेकर जाना है
कुछ पन्नोंपे आसूओंकी लडियां है, उन्हे यही छोडे जाऊंगी
लेकिन इन आधे अधुरे पन्नोका क्या करु
शायद इन्हे बांट देनाही बेहतर होगा
बस कोई बांटनेवाला मिल जाये.......

----

ऑफिसमधून निघाले तेव्हा नेहमीपेक्षा उशीर झाला होता. आता ट्रॅफिक लागणार हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज नव्हती त्यामुळे आधीच मनाची तयारी केली. चिडचिड करायची नाही हे मनाला दहा वेळा बजावलं. तरी चिडचिड होणारच ह्याचीही खूणगाठ बांधलीच. Happy नशीब जोरावर होतं त्यामुळे कोपर्‍यावरच टॅक्सीही मिळाली. चला, अर्धी लढाई जिंकल्याच्या आवेशात बसले आणि एफएम चालू केलं.

जेमतेम १० मिनिटं झाली असतील आणि एका सिग्नलला टॅक्सी थांबली. पुढे पाहिलं तर गाड्यांची रांगच रांग. "हे भगवान, अब यहापे रुकना पडेगा" म्हातार्‍या टॅक्सीवाल्याने आमचं भविष्य वर्तवलं. मी काही बोलायला तोंड उघडणार एव्हढ्यात मागून आवाज आला "टीणी टीणी टीणी टीणी". मी मागे वळून पाहिलं. एव्हाना मागेसुध्दा गाड्यांची रांग लागली होती आणि त्या गर्दीत दूरवर एक अ‍ॅम्ब्युलन्स दिसत होती. वरचा लाल दिवा गरगर फिरत होता आणि कानाचे पडदे फाटतील असा आवाज. मी पुढे पाहिलं, सिग्नल अजून लालच. बरं तो हिरवा झाला तरी पुढे इतक्या गाड्या होत्या की आमची टॅक्सीच पार जाऊ शकेल की नाही ह्याची मला शंका आली.

मी परत मागे पाहिलं. शेजारच्या गाड्यातले ड्रायव्हरसुध्दा वळूनवळून पहात होते. कोण असेल त्या अ‍ॅम्ब्युलन्समध्ये? काय झालं असेल? जीवन आणि मरण ह्यातलं एका श्वासाचं अंतर लाल सिग्नल हिरवा होण्याला लागणार्‍या वेळापेक्षा जास्त असेल ना? मला उगाचच "मेन इन ब्लॅक" मधली टनेलच्या छतावरून उडणारी गाडी आठवायला लागली.

मी परत सिग्नलकडे वळले तर ड्रायव्हर रेअर व्ह्यू मिररमधून माझ्याकडे पहात होता. "क्या करेंगे मॅडम, देखो हिलनेको जगह नही है. इमरजन्सी है सबको पता है लेकिन मजब्रुरी है". बरोबर आहे बाबा तुझं. हे तुला कळतंय, मला कळतंय पण त्या पेशन्टच्या उश्या-पायथ्याला बसून त्याच्या चेहेर्‍यावरची प्रत्येक रेषा न्याहाळणार्‍या त्याच्या रक्ताच्या माणसांना कळणार कसं? आणि कळत असेल तरी त्याचा काय उपयोग?

असेच काही अस्वस्थ क्षण गेले. सिग्नल ग्रीन झाला. समोरच्या गाड्या सुसाट वेगाने निघाल्या - त्यांचा वेग अंमळ जास्तच वाटला मला. आणि सिग्नल पण जरा जास्तच वेळ ग्रीन राहिला का? कशी कोणास ठाऊक पण त्या अ‍ॅम्ब्युलन्सला जायला जागा झाली. आमच्याच शेजारून भरधाव निघून गेली.

मला एकदम माझ्या एका मित्राची गाडी आठवली. डॅशबोर्डवर लटकणारी खेळ्णी मिळतात तसंच त्याच्या गाडीत पण एक होतं. त्यावर लिहिलेलं वाक्य मात्र सुरेखः

When Prayers go up
Blessings come down

आपलं काम डोळे मिटून प्रार्थना करायचं. तेच मी केलं. आणि तेव्हापासून आजतागायत कुठेही कधीही अ‍ॅम्ब्युलन्स दिसली की मी एक सेकंद डोळे मिटून तेच करते. दवा इतकीच दुवाही महत्त्वाची नाही का?

तरी दर वेळेला अ‍ॅम्ब्युलन्स दिसली की मनात प्रश्न येतो - त्या दिवशीच्या अ‍ॅम्ब्युलन्समधली व्यक्ति वाचली असेल ना?

----

क्लायन्ट मिटींगला वाशीला चालले होते. ट्रॅफिक आणि गरमी ह्या मुंबईकरांच्या पाचवीला पुजलेल्या गोष्टी होत्याच. नाही म्हणायला एफएमवर चांगली गाणी लागली होती एव्हढाच काय तो विरंगुळा. तरी पण ९:३० ची मिटींग पोस्टपोन झाल्यामुळे ११ला बाहेर पडायला लागल्यामुळे मी वैतागले होते.

तशाच एके ठिकाणी ट्रॅफिक थांबला. अश्या वेळी एक तर कोणाची तरी गाडी मोक्याच्या ठिकाणी बंद पडलेली असते किंवा अ‍ॅक्सीडेन्ट झालेला असतो - पण नक्की काय झालंय ते कळायला मार्ग कधीच नसतो.. आपण एसी टॅक्सी बुक करायला हवी होती - मी परत चडफडले. १० मिनिटं झाली, १५ झाली तरी आम्ही जैसे थे. आणि हे एव्हढं कमी म्हणून की काय शेजारी कोंबड्या वाहून नेणारा एक टेम्पो येऊन उभा राहिला. तो रिकामा होता तरी मी नाकावर रुमाल धरला.

आता हे सांगायला हवं की मी नॉनव्हेजिटेरियन आहे आणि चिकन हा खास आवडीचा प्रकार. पण हा टेम्पो पाहिला की मला शाकाहारी व्हायला हवं असंच प्रकर्षाने वाटतं. एक तर त्या छोट्याश्या जागेत कोंबून बसवलेल्या कोंबड्या पाहून त्यांची दया येते. त्यांना मारायला घेऊन जात आहेत ह्याची जाणीव होते आणि अधिकच वाईट वाटतं. वर त्यांना खाणार्‍यात आपणसुध्दा एक आहोत हे लक्षात येऊन स्वत:चाच राग येतो.

नाकावर रुमाल घेऊन मी बसून राहिले. आपल्याला नको असलेल्या किंवा विचार करायला भाग पाडणार्‍या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं की झालं. जगणं थोडं सोपं होतं नाही का? डोक्याला त्रास कमी. मीही तेच केलं. पण ह्या वेळी टेम्पो रिकामा होता म्हणून की काय कोणास ठाऊक परत नजर तिथे गेलीच.

आणि मग माझ्या लक्षात आलं की टेम्पो रिकामा होता खरा पण पूर्णपणे नाही. त्याच्या खालच्या कप्प्यात एकच कोंबडी मरून पडली होती. बाकीच्या कोंबड्या उतरवून घेतलेल्यांनी तिला तसंच टाकून दिलं होतं. त्यांना तिचा काय उपयोग? आजारी असेल का? का गुदमरून मेली असेल? खरं तर ट्रॅफिक चालू झाला असता तर २ मिनिटं विचार करून मी सोडून दिलं असतं. खोटं का बोला? पण अजून टॅक्सी तिथंच थांबून होती. त्यामुळे परतपरत माझं लक्ष त्या कोंबडीकडे आणि डोक्यात हे प्रश्न. धडपणी इच्छीत स्थळी पोचलेल्या बाकीच्या कोंबड्या हिच्यापेक्षा नशीबवान म्हणायच्या का? अर्थात त्यांचंही जीवन औटघटकेचंच असणार होतं हे नक्की. मग ही नशिबवान म्हणायची का?

आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं बघून मी तात्पुरतं शाकाहारी होण्याचं ठरवणार होते, २ आठवडे त्या निर्णयावर ठाम रहाणार होते आणि परत नॉनव्हेजिटेरियन होणार होते. माझी इच्छाशक्ती इतकीच? टेम्पोतल्या कोंबड्या पाहून कळवळणारी मी खरी का निगरगट्ट्पणे हॉटेलमधे जाऊन चिकन खाणारी मी खरी?

का लोकांना hypocrite म्हणताना न कचरणारी मी पण hypocrite च?

----

"अंधेरी चलेंगे?" घरातून बाहेर पडता पडताच समोर दिसलेली टॅक्सी हा देवाचा क्रृपाप्रसादच असतो. Happy

"हा मॅडम" आणि आपल्याला जिथं जायचंय तिथं सोडायला तयार होणारा टॅक्सीवाला देवदूत Happy

दरवाजा बंद करून आत बसते ना बसते तोच खोकल्याची उबळ आली. माझं हे नेहमीचं आहे - सर्दी आली की तिची पाठ धरून खोकला येतो आणि मग ८-१० दिवस माझी पाठ सोडत नाही. ह्यावेळी मात्र मी अ‍ॅन्टीबायोटिक घ्यायचं नाही असा पण केला होता.

दोन-तीन वेळा खोकून झाल्यावर माझ्या लक्षात आलं की ड्रायव्हर रेअर व्ह्यू मिररमधून माझ्याकडे पहातोय. आता तो म्हाताराच होता पण तरी मी थोडी अस्वस्थ झाले.

"मॅडम, आपको जेबी नगर जाना है ना?"

"आपको कैसे पता?" मी आणखी अस्वस्थ.

"अरे मॅडम, पहले भी एक बार मैने यही पे आपको पिकअप किया था. मुझे याद है". अरे देवा!

"आप ये एरिआमे रहती है क्या?" माझ्या मनात गाणं चमकून गेलं "Mama told me, don't be talking to the strangers" Happy

"हा"

"कहांपर?" त्याने एका बिल्डींगचं नाव घेतलं. मी तिथून १० मिनिटांच्या अंतरावर असलेल्या दुसर्‍याच बिल्डींगचं नाव घेतलं. चांगली १०-१२ मजली होती. प्रत्येक मजल्यावर सहा बिर्‍हाडं त्यामुळे चेक करणं कठिण. आणि आता मी ह्याचा चेहेरा नीट पाहून घेतलाय की. परत ह्याच्या टॅक्सीत नाही बसणार. उगाच नाही सीआयडीचे एपिसोडस पहात. मी स्वतःवर आणि स्वतःच्या प्रसंगावधानावर खूश.

"अच्छा, अच्छा. लेकिन आज आप बहोत खांस रही हो. किसी अच्छे डॉक्टरको दिखाना."

"हा, वो वेदर चेन्ज हो गया है ना इस लिये" मी बंबय्या हिंदीचे तारे तोडले. येता-जाता एफएम वर हिंदी गाणी ऐकूनही आमचं हिंदी असंच इंग्रजाळलेलं.

"वो तो है, शहद खा लेना. जल्दी आराम मिलेगा देखो. लेकिन एक बार डॉक्टरको दिखाना"

"हा जी, दिखा दूंगी" मी हसून म्हटलं खरं पण पोटात गोळा. उतरायची वेळ येईपर्यंत तोही डॉक्टरला दाखवायला लागण्याइतका मोठा होणार ह्याची खात्री. आता हा आणखी काय प्रश्न विचारेल? मध्येच उतरावं का? दुसरी टॅक्सी नाही मिळाली तर? अनेक शंका.

पण गंमत म्हणजे विक्रमादित्याला प्रश्न विचारून झाडावर जाऊन लटकलेल्या वेताळासारखा तो ड्रायव्हर अंधेरी येईपर्यंत आणखी काहीच बोलला नाही - अगदी एके ठिकाणी ट्रॅफिकमध्ये अडकलो तरीही. जणू मला डॉक्टरकडे जायला सांगण्यापुरतंच तोंड उघडायचं त्यानं ठरवलं होतं.

"यादसे डॉक्टरको दिखाना" उतरताना परत एकदा म्हणाला. ऑफिसमध्ये कॉफी घेताना कलिग्जना सांगितलं तर 'तुलाच बरी ग अशी कॅरॅक्टर्स गाठ पडतात' असं ऐकवलंन त्यांनी.

मी मात्र विचारात - आपण शहरात राहून जास्त पॅरेनॉईड झालोय का माणसं ओळखायला चुकतोय?

----

"घुमने चलोगी स्वप्ना?" मी पुस्तकातून डो़कं वर काढलं तर माझी मैत्रिण समोर उभी. तिचंही नाव स्वप्नाच. एमबीएच्या आमच्या वर्गात हा एक जोकच झाला होता. "देखो, स्वप्नाज आ रही है". "तुम लोग एक दुसरेको आवाज देते हो तो अजीब नही लगता? ऐसे नही लगता के खुद कोही बुला रहे हो?" आम्हाला सवय झाली होती.

आणि मजा म्हणजे आमच्या स्वभावात जमिन अस्मानाचा फरक. मी शीघ्रकोपी म्हणतात त्यातली. तर माझी मैत्रिण बर्फाचा गोळा. कशाकशाचा राग नाही. तिच्या ह्या न चिडण्याचाच मला कधीकधी जाम राग यायचा.

आज आम्ही कॅम्पसवर फिरायला बाहेर पडलो तर रात्रीचे १२ वाजले होते. तरी पण जनता बाहेर दिसतच होती. कधीकधी मला वाटायचं उगाच कॉलेजच्या लोकांनी डॉर्मज बांधल्यात. जनता चार भिंतींच्या आत असतेच कुठे? आम्ही लायब्ररीपर्यंत जाणारा रस्ता पकडला तेव्हा मात्र गर्दी तुरळक झाली. रात्री एव्हढं अंतर चालण्याइतके फार मूर्ख नव्हते कॅम्पसवर.

मी त्या दिवशी कोणावर तरी जाम उखडून होते. कोणावर आणि कशासाठी ते आता आठवणं अशक्य आहे. आता आयताच श्रोता मिळाल्यावर मी सगळी वाफ काढली. ती नेहमीप्रमाणे "जाने दो स्वप्ना. ऐसे होता है" वगैरे पाणी ओतत होती. मागचे ४ जन्म अग्निशामक दलात असणार नक्की.

मी श्वास घ्यायला थांबले तशी म्हणाली "एक गुड न्यूज है. विनय और शिखा वापस आ रहे है." सध्या तिने मुलीला नवर्‍याकडे लंडनमधेच ठेवलं होतं. मग आवराआवर करून ते भारतात कायमचे येणार होते. नवर्‍याला ह्या गोष्टीसाठी तयार करायला तिला किती कष्ट पडले होते ते मला माहित होतं. आणि ह्या न्यूजची ती किती चातकासारखी वाट पहात होती तेही ठाऊक होतं. पण आज पहाते तर चेहेर्‍यावर कुठे आनंद दिसेना. काय झालंय?

"स्वप्ना, कुछ प्रोब्लेम है क्या?" "नही रे, तुम्हे ऐसा क्यो लग रहा है? मै खुश हूं"

का कोणास ठाऊक ह्या वेळी मात्र माझा स्फोट झाला. "अरे यार, तुम्हे कभी गुस्सा नही आता, ठिक है. कोई कुछ बोलता है और तुम सुन लेती हो, चलो येभी ठीक है. If you are sad, you don't show it on your face, I can understand that too. लेकिन यार किसी खुशी के मौके पर तो हसा करो. You remind me of Mr. Spock " संतापाच्या भरात पूर्ण हिंदीत बोलायला जमेना तसा मी इंग्रजीचा आधार घेतला.

ही ढिम्मच. एव्हाना आम्ही लायब्ररीजवळ आलो होतो. "यहां बैठते है? ती म्हणाली. आम्ही पायर्‍यांवर बसलो. पाचेक मिनिटं शांततेत गेली. आणि एकदम ती म्हणाली "तुम्हे सच कहूं स्वप्ना. I get scared when I get some good news. लाईफमे इतनी प्रोब्लेम्स देखी है के कुछ अच्छा होता है तो ऐसा लगता है के अब जरूर कुछ बुराभी होगा. अब तो हसनेसे डरती हूं"

आपण लोकांना किती कमी ओळखतो नाही? अगदी जिवाभावाच्या मित्र-मैत्रिणींनाही. तिला आयुष्यात काय काय पहावं लागलंय तिनेच एकदा सांगितलं होतं. दु:ख सगळ्यांनाच असतात हे वाचलं होतं, आपल्याला आपली पर्वताएव्हढी आणि दुसर्‍याची राईएव्हढी वाटतात हेही वाचलं होतं. तरीही तिच्या दु:खापुढे माझी राईएव्हढी आहेत हेच मला कायम वाटत आलेलं होतं. पण त्या पर्वताएव्हढया दु:खाखाली दबून माझी ही जिवलग मैत्रीण हसायलाच घाबरत असेल असं मला कधी स्वप्नात देखील वाटलं नव्हतं.

कृष्णाकडे दु:ख मागणार्‍या कुंतीचा एक अंश हिच्यात आणि माझ्यात पण. कुंती हिला भेटली असती तर तिने दु:ख मागायचं धाडस केलं असतं? गुलजार काय म्हणाला होता त्याचा अर्थ आता कुठे मला लागला.

जीनेके लिये सोचाही नही दर्द संभालने होंगे
मुस्कुराये तो मुस्कुराने के कर्ज उतारने होंगे
मुस्कुराऊ कभी तो लगता है, जैसे होठोंपे कर्ज रखा है

------

ये कुछ आधे अधुरे पन्ने है - पन्ना १

गुलमोहर: 

हे देखील छान लिहीलं आहेस. अ‍ॅम्ब्युलन्स दिसली कि माझ्याही पोटात गोळाच येतो, तितक्या गर्दीतून तो ड्रायव्हर वाट कसा काढेल याचीच काळजी वाटत रहाते.

मंडळी, वाचल्याबद्द्ल आणि अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद! Happy आवडेल की नाही ह्याची धास्ती पोटात घेऊनच हे लिहिलं. हे अनुभव सामान्य आहेत. पण ते आले की प्रत्येक वेळी मनाचा एक गुंता होऊन बसतो. कोणाला आवर्जून सांगावं असं ह्यात काही आहे ह्याची खात्री नाही. आणि कोणाला सांगावं अशी माणसं नेहमीच भेटतात असंही नाही. ह्या निमित्ताने मला भेटली म्हणून आनंद झाला.

खूपच छान लिहीलयं............नेहमी घडणारे प्रसंग पण मांडणी अतिशय सुरेख झाली आहे, लिहीत रहा......... Happy

मस्तच गं स्वप्ना. Happy आधीच्या पन्न्याची लिंक इथे दे ना. म्हणजे शोधायला नको. नंतर कधी वाचावसं वाटलं तर एकत्र वाचता येतं.

काहीच नसलेल्यात बरेचकाही शोधायला खुपकाही लागते अन ते तुमच्याजवळ आहे.
अगदी छान लिहिलय....!

मस्त लिहिलंय... ते अँब्युलन्सचं मात्र सेम हिअर बरं का... तो आवाज आला की आधी मनातल्या मनात प्रार्थना करतो.

Pages