ये कुछ आधे अधुरे पन्ने है - पन्ना १

Submitted by स्वप्ना_राज on 27 November, 2009 - 23:38

पहिल्या ट्यॅपासून शेवटचा श्वास घेईपर्यंत आपण सगळेच आपापलं आयुष्य जगत असतो. प्रत्येकाचे अनुभव निराळे, सुख निराळं, दु:खं निराळी, पण कधीकधी ह्या वाटेवर चालताना असे काही अनुभव येतात ज्यांना लेबलं नाही लावता येत. काही प्रश्न पडतात ज्यांची उत्तरं शोधायला वेळ नसतो किंवा शोधूनही ती सापडत नाहीत. आयुष्याच्या धबडग्यात मग आपण ते प्रश्नसुध्द्दा विसरून जातो, ते अनुभव विसरून जातो.

माझ्या आयुष्याच्या शिदोरीत जमा झालेले हे असेच काही अनुभव आणि काही प्रश्न.......

-----

ह्या वर्षीच्याच गणपतीची गोष्ट. गौरीगणपती जायच्या दिवशी सकाळी हळदीची पानं आणायला बाहेर पडले. घराजवळच्या मार्केटमध्ये मिळाली नाहीत म्हणून थोडं दूर असलेल्या बाजारात गेले. आणि अर्ध्या वाटेवर असतानाच पावसाने गाठलं. पाऊस येईल असं ध्यानीमनीच नव्हतं त्यामुळे छत्री आणायचा प्रश्नच नव्हता. जवळच्याच एका ज्वेलरच्या दुकानाबाहेर उभी राहिले. माझं सारं लक्ष आभाळातल्या ढगांकडे. त्यामुळे शेजारी एक आजोबा येऊन उभे राहिले हे लक्षातच आलं नाही काही वेळ.

"अचानक आला नाही पाऊस?" मी शेजारी पाहिलं आणि हसले - ज्याला इंग्लिशमध्ये "polite smile" म्हणतात तसं हसू. "आज गौरी जाणार ना त्यामुळे सगळे रस्ते स्वच्छ होताहेत बघ कसे आपोआप" आजोबा पावसाच्या धारांकडे बघत म्हणाले. मी अवाक. असा विचार मी केलाच नव्हता. नुस्ती अचानक आला म्हणून पावसाला शिव्या देत बसले होते. पाऊस कमी झाल्यावर आजोबा पिशवी सावरत निघून गेले.

आज त्यांचा चेहेरा आठवत नाही पण ह्यापुढे गौरीगणपतीला जेव्हा पाऊस पडेल तेव्हा हे आजोबा नक्की आठवतील. त्यांचा अर्धा पेला भरलेला होता, माझा रिकामी. पण मला तो रिकामा असल्याची जाणीव त्यांनी करून दिली. माझं तेव्हा त्या दुकानात असणं योगायोग का विधिलिखित?

-----

खूप वर्ष झाली ह्या गोष्टीला. केरळमध्ये गेलो होतो. कसलासा संप होता त्यामुळे एक दिवस हॉटेलमध्येच बसून रहावं लागलं होतं. दुसर्या दिवशी काही मंदिरं बघायला जायचं ठरलं. त्यातलंच एक मंदीर - बरंच जुनं - आता नाव प्रयत्न करून पण नाही आठवत. देवळात छोटी छोटी अनेक देवळं. राहूनराहून सारखा एक विचार मनात येत होता - शतकानुशतकं किती लोक इथे आले असतील, किती मनं देवाकडे मोकळी झाली असतील, किती यातनांतून मुक्तीचा धावा झाला असेल. आपण आनंदाच्या प्रसंगी क्कचित देवळात जातो नाही का? नेहमी काहीतरी मागायलाच का जातो?

हेच विचार मनात घेऊन एका देवळापुढे उभी राहिले. का कोणास ठाऊक पण शेजारच्या देवळात धक्काबुक्की होईल इतकी गर्दी आणि ह्या देवाकडे कोणीच नाही. मी हात जोडले. मी तरी काय इतर माणसांपेक्षा वेगळी? काहीतरी मागितलंच, गंमत म्हणजे काय मागितलं ते आता आठवत नाही. तेव्हा मात्र खूप महत्त्वाचं वाटलं असणार. म्हणून तर आयुष्यात पहिल्यांदा आणि कदाचित शेवटचं ज्या मंदिरात गेले तिथेसुध्द्दा देवाकडे हात पसरले. Sad

दर्शन घेऊन परत निघालो. देवळाचं दार मात्र अजब. मोठा दरवाजा पण बाहेर पडायला मात्र त्यात एक छोटं दार आणि तेही जमिनीपासून जास्त अंतरावर. साडी नेसलेल्या आईला आणि चुडीदार घातलेल्या मला प्रश्न - जमेल का? एव्हढयात कुठूनसा एक लुंगी घातलेला माणूस आला - असेल विशीतला. त्याला बोलता येत नसावं. त्याने दोन्ही हातांचे तळवे एकमेकांवर ठेवले आणि त्यावर पाय ठेवून चढून जा असं खुणेने सांगायला लागला. मी आणि आईने मान हलवली. कोणाच्या हातावर पाय ठेवून कसं जायचं? तो माणूस ऐकायला तयार नाही. पुन्हा पुन्हा खुणेने तेच सांगायला लागला. बरं भाषा येत नाही, कसं सांगावं की बाबा रे, हे असं आम्ही करू शकत नाही. शेजारी येऊन थांबलेला देवळातला पुजारी हिंदीत बोलायला लागला "कुछ नही, पाव रखके जाओ". आम्ही शेवटी त्याला सांगितलं की आम्ही असं करू शकत नाही. मारुतीचं स्मरण करून उडी मारली आणि बाहेर पडलो.

पण अजूनही कधी कधी टीव्हीवर जुनी मंदिरं पाहिली की केरळमधल्या त्या देवळातला तो माणूस आठवतो. कोण असेल तो? अजून तिथे असेल?

-----

हा अनुभव माझा एकटीचाच असेल असं वाटत नाही. अनेकांना आला असेल. आम्ही खरं तर इतक्या वेळा माथेरानला गेलोय की आजकाल फक्त हार्ट पॉइंन्टपर्यंत मस्त चालत जातो, तिथे थांबतो आणि परत निघतो. त्या दिवशीही असंच झालं. हार्ट पॉइंन्टवरून निघताना कोपर्यावर भाजलेली कणसं विकणार्या जोडप्याकडून कणसं घेतली आणि परत निघालो. ५ तरी वाजले असतील त्यामुळे सूर्यास्त व्हायच्या आत परतायची घाई होती. तरी जमेल तितके रमतगमत चाललो होतो कारण त्या झाडा-पानांत अजून जीव गुंतला होता. थंडगार स्वच्छ हवा सोडून मुंबईच्या धुरात परतणं जीवावर येत होतं. पण ते नेहमीचंच आहे. Sad

असेच चालत असताना मागून दोन जण झपझपा चालत आले. एक जण म्हणाला "सनसेट पॉईंटला कसं जायचं?". 'तुम्हाला अजून पुढे चालत जावं लागेल आणि मग एक टी जंक्शन येईल तिथे उजवीकडे वळायचं". मी हाताचा टी करून दाखवलं. "शॉर्ट्कट नाही का एखादा?". "असेलही पण मला माहित नाही हो". एव्हढं बोलून होतंय तोवर उजवीकडे एक रस्ता फुटला. "इथून गेलं तर मिळेल का?". "अहो, पण त्या रस्त्यावर काही बोर्ड नाहीये. असं कसं कुठल्याही रस्त्याने जाणार तुम्ही?" मी अवाक. "पुढे तिथेच मिळत असेल तर कदाचित?". "हे बघा, काहीही बोर्ड नसताना आणि सूर्यास्त व्हायच्या वेळी असं कुठल्याही रस्त्याने जाणं माझया मते तरी धोकादायक आहे. त्यापेक्षा तुम्ही पुढे जा आणि टी जंक्शनला तो उजवीकडचा रस्ता पकडा." दोघांनी काही खलबत केलं. बहुतेक माझं म्हणणं पटलं असावं कारण ते पुढे चालू लागले.

काही वेळाने ते टी जंक्शन आलंच. एकदा मागे मान वळवून आमच्याकडे पाहिलं त्यांनी आणि आम्ही उजवीकडे वळायची खूण केल्यावर वळून चालू लागले. आम्ही डावीकडचा रस्ता धरला. पाच-एक मिनिटं चाललो तोच एक जोडपं दिसलं. "सनसेट पॉइन्टला कसं जायचं माहिताहे का?". आम्ही परत दिशा दाखवली. एव्हाना बराच अंधार होऊ लागला होता. ते जोडपं चालू लागलं आणि आम्हीही आमचा रस्ता धरला.

दुसर्या दिवशी मात्र उगाचच मनात आलं - सूर्यास्त व्हायच्या आधी पोचले असतील का ते सगळेजण सनसेट पॉइन्टवर?

-----

आईने सांगितलेली गोष्ट. धाकटी मावशी कॉलेजला असताना तिच्या वर्गात एक मुलगी होती. दिसायला एकदम सुंदर - एकदम मुमताज नटीसारखी होती म्हणे. डोक्यावर रुमाल बांधून सायकलीवरून रोज कॉलेजला यायची आणि कॉलेजातली तमाम मुलं तिच्यावर फिदा होती. बहुतेक द्रृष्ट लागली कोणाचीतरी किंवा सौंदर्याला शाप असतो म्हणतात तसं असेल काहीतरी. एका विचित्र ट्रेन अपघातात ती गेली - अगदी शरीराचे दोन तुकडे झाले.

तेव्हापासून अफवांना उधाण आलं. त्या रूटवरच्या मोटरमनन्सना म्हणे ती दिसायची - डोक्यावर रूमाल बांधून. ट्रेनकडे पाहून हात हलवायची. आईच्या कुटुंबाने ह्यावर कधीच विश्वास ठेवला नाही. पण मावशी मात्र प्रचंड घाबरली होती काही दिवस. ती मुलगी तिची मैत्रिण होती आणि तिची कुठल्यातरी विषयाची वही मावशीकडे होती .ती वही न्यायला ती येईल अशी अनाठायी भीती तिला वाटायची काही दिवस.

अजूनही आपलं अपरं नाक उडवत गाता-नाचताना मुमताज कधी टीव्हीवर दिसली की मला मावशीच्या त्या मैत्रिणीची गोष्ट आठवते.

-----

उटीवरून निघताना आपण का परत जातोय हा प्रश्न मनात राहूनराहून येत होता. ४ दिवस निलगिरींच्या, तिथल्या शुध्द हवेच्या, खोलीच्या खिडकीतून दिसणार्या व्हॅलीच्या आणि दाटून येणार्या धुक्याच्या प्रेमातच पडले होते मी. मनातल्या मनात निलगिरीच्या कुशीत एक छानसं कॉटेजसुध्दा तयार केलं होतं. आता पुढचे काही दिवस मनातल्या मनात ते सजवण्यात जाणार होते.

शेवटी खोलीतून निघताना काही मागे तर राहिलं ना ह्याची खात्री करत होते आणि पाय आपसूकच खिडकीकडे वळले. त्यातून ४ दिवस पाहिलेलं समोरचं बंद घर. त्या घरात काही विशेष नव्हतं. पण त्याला लागून एक छोटं गार्डन होतं आणि त्यात एक पांढरा झोपाळा होता. त्यावर बसलं की समोरची व्हॅली नक्की दिसत असणार. दिवसभराच्या साईटसिईंगनंतर खोलीत परतलं की मी खिडकीतून त्याच्याकडे पहात बसायची. आजसुध्दा निघायच्या आधी पाहून घेत होते. कोणाचं घर असेल हे? ह्या झोपाळ्यावर कोण बसत असेल? पैर्णिमेच्या रात्री त्यावर बसून शांत पहुडलेली व्हॅली निरखण्याचं सुख सटवाईने कोणाच्या नशिबी लिहिलं असेल? आणि ते सुख आपल्याला मिळतंय हे आपलं भाग्य ह्याची जाणीव त्या व्यक्तिला असेल का?

परत जायचा रस्ता यायच्या रस्त्याहून वेगळा त्यामुळे मी खिडकीबाहेरच नजर लावून बसले होते. दुसर्या दिवशी करायच्या कामाची यादी निर्धाराने मनातून परतवून लावत होते. मुंबईच्या विमानतळावर उतरल्याशिवाय त्याचा विचारही करायचा नाही असं पुन्हापुन्हा मनाला बजावत होते.

अचानक एका वळणावर कार थांबली आणि एकदम नजरेच्या टप्प्यात आली ती दूरवर असलेली एक ख्रिश्चन दफनभूमी. बांधकाम तसं काहीच नाही त्यामुळे गाडी थांबली नसती तर कदाचित माझं लक्षही गेलं नसतं. नुस्ती गर्द झाडांची दाटी, जमिनीवर पसरलेलं हिरवकच्च गवत आणि त्या उतारावर १०-१५ कबरी. कुठल्याही दफनभूमीची मला नेहमीच भीती वाटत आलेली आहे. खरं तर ह्या जगात नसलेल्या माणसांना काय घाबरायचं, नाही का? त्यापेक्षा जिवंत माणसं कधीकधी जास्त घातक असतात.

पण खरं सांगू? त्या दिवशी त्या कबरी पाहून त्या माणसांच्या भाग्याचा हेवा वाटला. इथं जिवंत माणसं शांती मिळावी म्हणून जन्मभर धडपडतात, किती सायास करतात पण वाळवंटातल्या म्रृगजळासारखी ती जन्मभर अप्राप्य रहाते. आणि ह्या लोकांना मात्र हे दान म्रृत्यूनं पदरात टाकलं होतं - हिरवाईच्या कुशीत मोकळ्या आभाळाखाली शांतपणे निजायचं. कोण असतील हे भाग्यवान जीव?

-----

वैसे तो जिंदगीकी आधी किताब लिखनी बाकी है शायद
लेकिन ये कुछ आधे अधुरे पन्ने है जो बुलाते रहते है

गुलमोहर: 

अनिलभाई, राधिका, अर्चु, सान्वी, खूप खूप धन्यवाद - वाचल्याबद्दल आणि अभिप्रायाबद्दल Happy

छान लिहिलंयस गं..... असे अनुभव असतात पण आठवत नाहीत.. तु लिहिल्यावर मलाही काही आठवले Happy

खूपच छान.............
बरेच साधे, छोटे छोटे अनुभव खूप शिकवून जातात नाही.............?
छान वाटलं तुमचे अनुभव वाचून.....

प्रत्येकाच्या आयुश्यात अश्या बर्‍याच गोश्टि घडत असतात पण सगळ्यांनाच त्यातले वेगळेपण जाणवुन ते कागदावर ऊतरवण जमत नाहि. ते तुम्हाला जमते. हाहि एक सुखद अनुभवच नाहि का?

सुंदर. आठवणी बर्‍याच जणांजवळ असतात. पण इतके संवेदनाशील व विचारवंत मन नि सुंदर भाषाशैली असल्याने वाचून एकदम फार बरे वाटले.

साधना, saakshi, अक्षरी, नंदिनी, चिंगी, सुनिल परचुरे, झक्की, suruchi13 - धन्यवाद Happy

वैसे तो जिंदगीकी आधी किताब लिखनी बाकी है शायद
लेकिन ये कुछ आधे अधुरे पन्ने है जो बुलाते रहते है>>> व्वा Happy सहीये

मस्त!

फार सुंदर..!! सुरेख भाषाशैली..
प्रत्येक अनुभव डोळ्यापुढे तरळून गेला.
पु. ले. शु. Happy

लाजो, अश्विनीके, किरू - खूप धन्यवाद. किरू, हे पु. ले. शु. काय आहे हे थोडा वेळ कळलं नाही. मग "पुढील लेखनासाठी शुभेच्छा" अशी ट्यूब पेटली Happy

Pages