भोंडला,हादगा : भुलाबाईची गाणी
बालपणीच्या अशा फ़ारच कमी आठवणी असतात ज्या माणसाच्या आयुष्यभर सावलीसारख्या सोबत-सोबत चालतात. जीवनाला कितीही रंग बदलू देत, आचार-विचारांच्या संरचनेत कितीही बदल झालेत तरीही त्या आठवणी मात्र वास्तवाचे कायम स्मरण करून देत असतात. एका अर्थाने ह्या आठवणी माणसाला "डोळस दृष्टी" प्राप्त करून देत असतात. आज महिला दिनाच्या निमित्ताने झालेली अशीच एक आठवण.
माझ्या बालपणीच्या (१९७०-७५) काळात मनोरंजनाची साधने एकतर विकसित झाली नव्हती किंवा ग्रामिण भागापर्यंत पोचलेली नव्हती. दिसलाच तर एकट-दुकट रेडियो दिसायचा.दळवळणाची साधने म्हणजे सायकल (फ़क्त पुरूषांसाठी. स्त्रीला सायकलवर बसवणे लाजिरवाणे वाटायचे आणि चेष्टेचा विषय ठरायचे) किंवा रेंगीबैल. (छकडा,दमनी वगैरे) ईलेक्ट्रीक,टेलिफ़ोन गावात पोचायची होती. अर्थात ग्रामिण स्त्री-जनजीवनाचा बाह्य जगाशी फ़ारसा संबंध येत नव्हता. त्यामुळेच महिलाप्रधान सण जिव्हाळ्याने साजरे केले जात असावेत.
आश्विन शु.१० ते कोजागिरी पोर्णिमेपर्यंतचा काळ "आश्विनच्या भुलाया" म्हणुन साजरा केला जातो.या काळात मातीच्या बाहुल्या/भुलाया मांडून दररोज नित्यनेमाने गाणी म्हटली जातात. त्याकाळी छोट्या-छोट्या बालिकापासून जख्खड म्हातार्या महिला सुद्धा यामध्ये गाणी गायनासाठी सहभागी होत असे. त्या पैकी काही गाणी ऐकतांना माझ्या अंगावर काटा उभारायचा.तर काही गाणी ऐकून मन खुप-खुप उदास व्हायचे. कारण त्या गीतात महिलांची अपार दु:खे साठवलेली असायची. साताजन्माच्या असहायतेची कारुण्यता प्रकट झालेली असायची. अबला म्हणुन आयुष्य कंठतांना वेळोवेळी झालेली कुचंबना/मिळालेली हीन वागणुक स्पष्टपणे प्रतिबिंबीत झालेली असायची. आणि त्यासोबतच अठराविश्व दारिद्र्य लाभलेल्या संसाराचा गाडा हाकलतांना झालेली दमछाक व ससेहोलपट ठळकपणे अधोरेखित झालेली असायची.
त्यापैकी एका गीताची थोडक्यात चर्चा करूया.(ते गीत आताशा निट आठवत पण नाहीये)
या गीतामध्ये एका सुनेची माहेरची ओढ आणि कुटूंबातील उर्वरित सदस्यांची हतबलता दिसून येते.
नुकतेच लग्न होवुन सासरला नांदायला आलेल्या सुनेला तिच्या माहेरची आठवण होते,आईच्या आठवणीने जीव व्याकुळ झालेला असतो.तिकडे आईला सुद्धा लेकीची आठवण होऊन गहिवरलेले असते. म्हणुन मायलेकिंची गाठभेठ करून देण्यासाठी बाप लेकीला घेण्यासाठी आलेला असतो. बाप घ्यायला आलेला बघून आनंदाने उल्हासित झालेली सून सासूला हळूच भीत-भीत विचारते.
सून :- हात जोडूनी पायापडूनी
सासूबाई मी विनविते तुम्हाला
बावाजी आले घ्यायाला
जावू का मी माहेराला,माहेराला?
माहेरला जायची रितसर परवानगी सूनबाई मागते आहे हे बघून सासू थोडी भांबावते.तीच्या समोर अनेक प्रश्न उभे राहातात.एक तर काहीना काही पैसा लागेलच जो घरात नाहीच. दुसरे असे की शेतीत काम करणारे दोन हात पण कमी होणार. म्हणुन ती सूनेला म्हणते.
सासू :- कारलीचे बी लाव गं सूनबाई
मग जा आपल्या माहेरा,माहेरा.
कारलीच्या बियानाची लागवड करून माहेराला जाण्याचा सल्ला सूनेला मनोमन पटतो.ती बेगीबेगी लागवड उरकते आणि पुन्हा विचारते.
सून :- कारलीचे बी लावलेजी सासूबाई
आता तरी धाडा माहेरा,माहेरा.
एक वेळ मारून नेता आली.आता पुढे काय? पुन्हा सासूबाई शक्कल लढवते.
सासू :- कारलीचा वेल निघू देगं सूनबाई
मग जा आपल्या माहेरा,माहेरा.
सून पुन्हा काही दिवस कळ काढते आणि विचारते.
सून :- कारलीचा वेल निघालाजी सासूबाई
आता तरी धाडा माहेरा,माहेरा.
सासूसमोर पुन्हा तोच यक्षप्रश्न. नाही म्हणता येत नाही आणि पाठवायला गेले तर संसाराचं अर्थशास्त्र कोसळणार. कौटिल्याची अर्थनिती कळायला अर्थतज्ञ किंवा अर्थमंत्रीच लागतो या समजाला तडा देणारी सासूची वर्तणूक. आणि मग नवनविन युक्त्या लढविणे सासूचा नित्यक्रमच बनून जातो.
सासू :- कारलीला फ़ूल लागू देगं सूनबाई
मग जा आपल्या माहेरा,माहेरा.
सून :- कारलीला फ़ूल लागलेजी सासूबाई
आता तरी धाडा माहेरा,माहेरा.
कारलीचा वेल मांडवावर गेलाय.वेल फ़ुलांनी बहरून गेली. पण नशिब....?
सासू :- कारलीला कारले लागू देगं सूनबाई
मग जा आपल्या माहेरा,माहेरा.
सून :- कारलीला कारले लागलेजी सासूबाई
आता तरी धाडा माहेरा,माहेरा.
आता कष्ट फ़ळांस आले. लदबदून कारली पण लागलीत. मग अडचन कसली?
होय.थोडी अडचनच. कारली बाजारात नेऊन विकल्याखेरीज पैसा कोठून येणार?
सासू :- कारलीला बाजारा जाऊ देगं सूनबाई
मग जा आपल्या माहेरा,माहेरा.
सून :- कारली बाजारात गेलीजी सासूबाई
आता तरी धाडा माहेरा,माहेरा.
कारली बाजारात गेली आहे. खरे तर हे गीत यापुढे आनंदाच्या क्षणांकडे वळायला हवे. एवढ्या मेहेनतीने पिकविलेली कारली बाजारात जाणे हा आनंदाचा क्षण.कारण आता घरात पैसे येणार. माल विकायला बाजारा गेलेला घरधनी घराकडे काहीना काही खरेदी करून सोबत भातकं (खाऊ) आणि चार पैसे घेऊन परतायला हवा.पण पुढे या गीतात तसे काहीच होत नाही. याउलट घरात चिडचीडपणा, उदासिनता वाढीस लागलेली दिसते. आजपर्यंत घरात एकमेकाशी गोडीगुलाबीने वागणारी माणसे आता नैराश्याच्या भावनेतून एकमेकांशी फ़टकून वागतांना दिसत आहे.
काय, नेमके झालेय तरी काय? कारली मातीमोल भावाने तर नाही खपली ना? की कारलीच्या खरेदीला कोणी घेवालच मिळाला नाही?
कौटिल्याच्या अर्थशास्त्रात ते बसत नसेल तरीही तेच खरे असावे.
आता हा शेवट पहा.
आतातरी आपल्याला माहेराला जायला मिळणार की नाही या विचाराने ग्रस्त झालेली सून परत एकदा सासूला विचारती होते. सासूला तिच्या आवडीची कारलीची भाजी करून खाऊ घालते.
सून :- कारलीची भाजी केलीजी सासूबाई
आता तरी धाडा माहेरा,माहेरा.
सासू :- मला काय पुसते,बरीच दिसते
पुस आपल्या सासर्याला,सासर्याला.
सून :- मामाजी,मामाजी बाबा आले न्यायाला
जाऊ काजी माहेरा,माहेरा.
सासरा :- मला काय पुसते,बरीच दिसते
पुस आपल्या नवर्याला,नवर्याला.
सून :- स्वामीजी,स्वामीजी बाबा आले न्यायाला
जाऊ काजी माहेरा,माहेरा.
आणि मग प्राणप्रियेच्या प्रश्नाला नवरा उत्तरच देत नाही. नवरा काय म्हणतो हे गीतात लिहिलेच नाही. गीताचा दोन ओळीत थेट शेवटच करून टाकला आहे.
" घेतलीय लाठी, हाणलीय पाठी,
तुला मोठं माहेर आठवते,आठवते......!!"
गंगाधर मुटे
.......................................................................
भोंडला,हादगा आणि भुलाबाईची गाणी : महिलांच्या व्यथा. भाग-२
.......................................................................
मी कन्फ्युझ झालेय का
मी कन्फ्युझ झालेय का शिवबाच्या गाण्याची खरच दोन व्हर्जन्स आहेत ते माहित नाही..
एक लिंबू झेलू बाई
दोन लिंबं झेलू
दोन लिंबं झेलू बाई
तीन लिंबं झेलू
तीन लिंबं झेलू बाई
चार लिंबं झेलू
(अशी सात लिंब झेलायची)
साता लिंबाचा ---वडा
माळ घाली हनुमंताला
हनुमंताची निळी घोडी
येता जाता कमळे तोडी
एक एक कमळ तोडीले
भवानी मातेला अर्पण केले
भवानी माता प्रसन्न झाली
शिवरायाला तलवार दिली...
(पुढे शिवबाचं वर दिलेलं गाणं)
बहुतेक खेळायच्या वयात लग्न
बहुतेक खेळायच्या वयात लग्न होऊन मुली सासरी जात असल्यानं अशी गाणी आली असावीत..
म्हणजे विचार करा ना छोटिशी मुलगी, सासरी आली आहे. सासरी छळणारी अशी खाष्ट माणसं आहेत.. आणि मग माहेरची/आईची आठवण येतेय.. माहेर किती छान होतं.. दिवसभरात कसली कामं नाहीत.. खेळायचं झालं नुसतं.. पण तसं सासरी नाही ना! मग ती अर्धवट वयातली मुलगी अशा कल्पना विलासात रमते:
अक्कण माती चिक्कण माती अश्शी माती सुरेख बाई
खड्डा तो खणावा
अस्सा खड्डा सुरेख बाई
जातं ते रोवावं
अस्सं जातं सुरेख बाई
सपीठी दळावी
अश्शी सपिठी सुरेख बाई
करंज्या कराव्या
अश्श्या करंज्या सुरेख बाई
तबकी ठेवाव्या
अस्सं तबक सुरेख बाई
शेल्याने झाकावं
अस्सा शेला सुरेख बाई
माहेरी धाडावा
अस्सं माहेर सुरेख बाई
खेळाया मिळतं..
अस्सं सासर द्वाड बाई
कोंडोनी मारितं..
नानबा जरा confusion दिसतंय.
नानबा जरा confusion दिसतंय. आम्ही पाचच लिम्ब म्हणायचो.
पाचा लिंबाचा पाणवठा
माळ घाली हनुमंता
हनुमंताची निळी घोडी
येता जाता कमळे तोडी
कमळाच्या पाठीमागे होती राणी
अगं अगं राणी, इथे कुठे पाणी
पाणी नव्हे यमुना-जमुना
यमुना जमुनाची बारीक वाळू
तेथे खेळे चिल्लारी बाळू
चिल्लारी बाळुला भुक लागली
सोन्याच्या शिंपीने दूध पाजले
पाटाच्या घडीवर नीजवीले
नीज नीज बाळा वेल्हाळा
मी तर जाते सोनारवाड्या
सोनारदादा सोनारभाई गौरीचे मोती झाले का नाही?
.......पुढे गौरीच्या लग्नाचे बरेच वर्णन आहे. माझा पेशन्स संपला टाईपण्याचा...:-)
ऐलमा पैलमा गणेश देवा माझा खेळ
ऐलमा पैलमा गणेश देवा
माझा खेळ मांडूदे, करीन तुझी सेवा
माझा खेळ मांडिला वेशीच्या दारी
पारवे घुमती बुरजावरी
गुंजावाणी डोळ्यांच्या सारविल्या टिका
आमच्या गावच्या भुलोजी बायका (नायका ??)
एविनी गा तेविनी गा (हे चाल बदलून)
(कांदा चिरू..:-)) कांडा तीळ बाई तांदूळ घ्या
आमच्या आया, तुमच्या आया
खातील काय दुधोंडे
दुधोंड्याची वाजली टाळी (हे म्हणताना टाळी वाजवायची)
आयुष्य दे रे वनमाळी
माळी गेला शेता भाता
पाऊस पडला येता जाता
पड पड पावसा थेंबोथेंबी
थेंबोथेंबीच्या हळव्या लोंबी...( इथुन पुढे कोकणातले version)
हळव्या लोंबी आणुया
तांदूळ त्याचे कांडुया
मोदक लाडु बनवुया
गणरायाला (हादग्यापुढे) अर्पुया....
मस्त चाललंय
मस्त चाललंय
हस्त हा नक्षत्रांचा राजा...
हस्त हा नक्षत्रांचा राजा... अशी सुरवात असलेलं एक गाणं होतं. आठवतंय? हस्ताच्या पावसाचं काहीसं वर्णन असावं त्यात.
रोज एक एक गाण वाढ्त जायच .
रोज एक एक गाण वाढ्त जायच . गाणी आणि वेळ कमी पडायला लागला की ही Filler गाणी याय्ची
आड बाई आडवणी
आडाच पाणी काढवणी
आडात होती देवळी
देवळीत होता खराटा
आमचा हादगा मराठा
आड बाई आडवणी
आडाच पाणी काढवणी
आडात होती देवळी
देवळीत होता साबण
आमचा हादगा बामण
अस देवळीतुन बरच काही निघायच ...
नानबा , तुम्ही सान्गली किन्वा कोल्हापूरच्या आहात का ?
तुम्ही लिहिलेली अगदी सेम गाणी आम्ही सान्गलीत म्हणायचो
बरोबर आहे अश्विनी तुझं..
बरोबर आहे अश्विनी तुझं.. चिलारी बाळा वगैरेच होतं.. शिवाजी आमुचा राजा वेगळं..
आणि ते कांदा चिरू पण चुकीचं असेल माझं असं वाटतय... जोरदार गडबड झालीये माझ्या डोक्यात!
केदार, मी वाईची (सातारा जिल्हा) आहे.. बहुतेक सातारा, सांगली, कोल्हापूर भागात सारखी गाणी असावीत...
ह्या आडबाई आळवणी सारखं आणखीन एक गाणं मोठ झाल्यावर एकांच्या घरी ऐकलेलं (हे गाणं ऐकलं तेव्हा भुलाबाई हा शब्द पहिल्यांदा ऐकला)
अडकीत जाऊ खिडकीत जाऊ
खिडकीत ठेवला ----
भुलाबाईला मुलगी/गा झाली
नाव ठेवलं ----
ह्यातल्या दुसर्या --- मधे खेळायला आलेल्या मुलीचं नाव एक एक करून टाकायचं... आणि पहिल्या --- मधे त्या नावाशी यमक जुळणारी गोष्ट..
उदा.
अडकीत जाऊ खिडकीत जाऊ
खिडकीत ठेवला अडकित्ता
भुलाबाईला मुलगी झाली
नाव ठेवलं स्मिता
(ब्रश आणि शिरीष असं उदाहरण देणार होते
)
मस्त धागा!
मस्त धागा!
माझ्या सुंद्रीचं लगीन वराडी
माझ्या सुंद्रीचं लगीन
वराडी कोण कोण येणार, माझ्या सुंद्रीचं लगीन
भाऊ म्हणे मी भाऊ, आणीन नवरा पाहून माझ्या सुंद्रीचं लगीन
बहिण म्हणे मी बहीण, करवली मी होईन माझ्या सुंद्रीचं लगीन
बाप म्हणे मी बाप, खर्चीन हुंडा लाख माझ्या सुंद्रीचं लगीन
आई म्हणे मी आई, करीन लग्नात घाई माझ्या सुंद्रीचं लगीन
चुलता म्हणे मी चुलता, येईन जेवणापुरता माझ्या सुंद्रीचं लगीन
चुलती.......
मावसा म्हणे मी मावसा बसेन दागिन्यासरसा, माझ्या सुंद्रीचं लगीन
मावशी म्हणे मी मावशी, फराळाचे माझ्यापाशी माझ्या सुंद्रीचं लगीन
मामा म्हणे मी मामा, येईन सर्व कामा माझ्या सुंद्रीचं लगीन
भट म्हणे मी भट, धरीन अंतरपाट माझ्या सुंद्रीचं लगीन
भटीण म्हणे मी भटीण, सगळ्याच पोळ्या लाटीन माझ्या सुंद्रीचं लगीन
भुलाबाईचे गाणे हा तत्कालीन
भुलाबाईचे गाणे हा तत्कालीन सामाजिक अविष्कारच असणार.
साहित्य हा समाजाचा आरसा असतो असे म्हणतात.
परंतू थोरा - मोठ्या कवी / लेखकांच्या साहित्यात ते वास्तव
प्रामाणिकपणे उतरलेले नसावे.
त्या काळात संतकवी देवास भजण्यात गुंग, त्यांचे बहूतांश काव्यवैभव/प्रतिभा देवाचे गुण गाण्यात खर्ची पडली असावी. कवी तर मुळातच कल्पना विलासात रमणारा प्राणी. त्यातही कवी हे पुरूषच. त्यामुळे महिलांचा कोंडमारा झाला असावा. आणि कदाचित त्यामुळेच अपरिहार्यपणे महिलांनी प्रस्थापित काव्याला फ़ाटा देवून स्वत:चे काव्यविश्व स्वत:च तयार केले असावे. पहाटे जात्यावर म्हटलेली गाणी असो वा बाळाला झोपवतांना म्हटलेली गाणी (अंगाईगीत?) असोत, ही त्यांची स्वरचित गाणीच आहेत. त्यामुळेच त्यांच्या या गाण्यात थोडाफ़ार यमक जुळवण्याचा भाग वगळला तर ज्याला आपण साहित्यीक दर्जा म्हणतो तो कुठेच आढळत नाही. आढळते ते निव्वळ वास्तव.
या गीतात आईच्या घराला सोन्याची पायरी आहे असे म्हटले आहे.
मग हे काय आहे? कल्पनाविलास की अतिशयोक्ती? माहेरच्या बढाया की वास्तवता?
मला यामध्ये एक भिषण वास्तविकता दिसते.कारण...
पाखरू माहेरघरा गेल्यानंतर त्याने तिच्या आईचे घर कसे ओळखायचे? काही वेगळेपण असावे ना सहज ओळखण्यासाठी? घराचे कवेलू, छप्पर, भिंती आणि दरवाजे हे नक्किच सांगण्यायोग्य नसणार.
"जेव्हा एखाद्याकडे सांगण्यासारखे काहीच नसते तेंव्हा तो बढाईचा आधार घेत असतो" हेच तर त्रिकाल अबाधित शाश्वत सत्य.
मग तीने सोन्याची पायरी सांगीतली त्याचा वेगळा अर्थ कसा घेणार?
आणि त्यावरी (पायरीवर) बसजो, शिदोरी सोडजो म्हणजे काय?
निरोप घेवून जाणार्या पाखराला सोबत नेलेली शिदोरीच खाण्यास सांगायला ती विसरत नाही. का? तर पाखराला तातडीने जेवायची व्यवस्था आईच्या घरी होऊ शकेल अशी परिस्थीती आईचीही नसावी.(?)
रूणझुन पाखरा जा माझ्या माहेरा
माझ्या का माहेरी सोन्याची पायरी
त्यावरी बसजो शिदोरी सोडजो
माझ्या का मातेला निरोप सांगजो
तुझ्या का लेकीला बहू सासुरवास
होते तर होऊ दे औंदाच्या मास
पुढंदी धाडीन ... गायीचे कळप
पुढंदी धाडीन ... म्हशीचे कळप
.........................................
या गाण्याचा शेवट गोड करण्यासाठी
तुझ्या का लेकीला बहू सासुरवास
ऐवजी
सुखी आहे मयना आईला सांगजो
असा बदल करून गायला जाते अशी माहीती मिळाली.
.......................................................................
मला आठवतात त्यामधे २ गाणी छान
मला आठवतात त्यामधे २ गाणी छान होती...एक झिपर्या कुत्र्याचे आणि एक 'अक्कन माती, चिक्कन माती..अश्शी माती सुरेख बाई, गहू तो पेरावा...'
झिपर्या कुत्र्याच्या गाण्यामधे सासरकड्चे कोणी पाहूणे आले माहेरवासीणीला न्यायला की सासरी जावे वाटायचे नाही म्हणून त्यान्च्यावर झिपरे कुत्रे सोडा असे गाणे होते....अन दुसर्या गाण्यामधे सासरच्या तुलनेमधे माहेरची प्रत्येक गोष्ट कशी सरस आहे हे दाखवायचा माहेरवाशीणीचा प्रयत्न...
स्वप्नालीजी ती गाणी लिहाच.
स्वप्नालीजी
ती गाणी लिहाच.
घरात म्हातारा बिमार
घरात म्हातारा बिमार झालाय.
म्हणुन वैद्याला बोलावतांना त्याला फ़ी म्हणुन खुट्याची म्हैस देण्याचा वायदा करणे म्हणजे काय?
नगदी फ़ीच का देवू नये? न देण्यायोग्य वस्तु देण्याची भाषा ही अप्रत्यक्षपणे उधार मागायची (गोड शब्दात) भाषा आहे. ती आजतागायत वापरात आहे.
वैदूदादा,वैदूदादा घरावरी चाल गा,चाल गा
बुढ्याचे मचले हाल गा, हाल गा
माही सासू म्हणते गा, म्हणते गा
तुले खुट्याची म्हैस देते गा, देते गा.
अवांतर : मचणे हा प्रमाण भाषेतील शब्द आहे का?
नसल्यास पर्यायी शब्द काय आहे?
स्वप्नाली चं गाणं: सासुरीच्या
स्वप्नाली चं गाणं:
सासुरीच्या वाटे कुचुकुचु काटे कोण पाव्हणं आलं ग बाई
सासरा पाहुणा आला ग बाई.
सासर्यानं काय आणलं ग बाई
सासर्यानं आणल्या पाटल्या ग बाई
पाटल्या मी घेत नाही सांगा मी येत नाही
साती दरवाजे लावा ग बाई
झिपरं कुत्र सोडा ग बाई
असं सासरच्या प्रत्येक माणसाला करायचं.. (तो एक एक वस्तू घेऊन येणार पण आपण जायचं नाही
)
फक्त नवरा आला की
साती दरवाजे उघडा ग बाई
झिपरं कुत्र बांधा ग बाई
(ह्या नंतर आणखीन दोन ओळी आहेत जाण्याची तयारी दाखवणार्या आठवत नाही)
--------------------
सासरची आणि माहेरची तुलना करणारं गाणं
'आला माझ्या माहेरचा वैद्य' का ग स्वप्नाली?
>सासुरीच्या वाटे कुचुकुचु
>सासुरीच्या वाटे कुचुकुचु काटे
त्यानंतर माहेरच्या वाटे नारळ फुटे असेही होते.
>>झिपरं कुत्र सोडा ग
>>झिपरं कुत्र सोडा ग बाई
झिपर्या कुत्र्याला सोडा ग बाई, असेही म्हणतात..
हल्ली या शेवटच्या २/४ ओळी घेऊन, कोल्हापुरात महेन्द्र ज्वेलर्स ने जाहीरात केली आहे...
नेकलेस मी घेत नाही, सांगा मी येत नाही, साती दरवाजे...
आणि फक्त महेंद्र ज्वेलर्स चा असला तर येते म्हणे
माहीतीपुर्ण आहे.
माहीतीपुर्ण आहे.
अडकीत जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत
अडकीत जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत होती बाटली,
तुमचे प्रतिसाद बघून, आम्हाला खुशी वाटली.
आड बाई आडवणी आडाच पाणी
आड बाई आडवणी
आडाच पाणी काढवणी
आडात पडली सुपारी
आमचा भोंडला दुपारी
आड बाई आडवणी
आडाच पाणी काढवणी
आडात पडला शिंपला
आमचा भोंडला संपला
नानबा, भोंडला हा प्रकार जवळ
नानबा, भोंडला हा प्रकार जवळ जवळ लोप पावला आहे. कुठे कुठे महाभोंडला हा राजकिय प्रकार केला जातो पण आताशा दांडियाच जास्त भाव घेतो. श्री. गंगाधरजींच्या मुळे आणी तुझ्या
कृष्ण घालितो लोळण
आली यशोदा धावून
काय रे मागतोस बाळा
तुला देते मी आणून
या गाण्याने मला नॉस्टेल्जिक व्हायला झाल. जवळ जवळ ३५- ४० वर्ष मागे गेलो. चिंचवडला एका चाळीत राहयचो आम्ही. मुली भोंडला करायच्या. आम्ही नुसती खिरापत खायचो. त्यात पण डांबरटपणा. शेजारी जरा एक मंद दादा होता. त्यांचा बहिणींचा भोंडला संपुन खिरापत ओळखा सुरु व्हायच्या आधी मी त्याला विचारायचो. आज काय रे तुमची खिरापत ? मग त्याने सांगितली की ती मी फोडायचो. एक दिवस, दोन दिवस , तिसर्या दिवशी मला बंदी हुकुम बजावण्यात आला.
मज्जा आली.
खिरापत ? मग त्याने सांगितली
खिरापत ? मग त्याने सांगितली की ती मी फोडायचो.
किती मजेदार असते बालपण. नाही?
एक गाण मला आठ्वतय हस्त हा
एक गाण मला आठ्वतय
हस्त हा जीवनाचा राजा
पावतो जनांचिया काजा
तयासी नमस्कार माझा
दहा मधले आठ गेले
( पावसाची नक्षत्रे दहा पैकी म्रुग, आर्द्रा, पुनर्वसु, पुष्य, आश्लेषा, मघा, पुर्वा,उत्तरा मग हस्त यायच)
हस्ताची ही पाळी आली
म्हणोनी त्याने गंमत केली
ज्याच्या योगे झाला चिखल
त्याही चिखलात लावल्या केळी
एकेक केळ मोठाल
?? देवा वाहिल
बहुदा या नंतर एक शेवटच गाण
बहुदा या नंतर एक शेवटच गाण असायच जे माझ्या इंटरेस्टच होत कारण या गाण्याच्या शेवटी खिरापतीला काय ग ? अस होत.
बहुदा कुणी लिहील नाहीये. बघुया आठ्वतेका सगळ ?
भोपळ्याच फुल बाई फुलरंजना.
माळ्याचा माळ बाई माळरंजना
माळ्याची सांडली भिकबाळी
हुड्कुन दे पण हुड्केना
हुडकली पण सापडेना
शि़क्यावरच लोणी वाहात जा
ताट वाटी झळकत जा
ताट वाटी झळकली
???????????
सर्प म्हणे मी एकुला
दारी आंबा पिकुला
दारी आंब्याची फोड ग
खिरापतीला काय ग ?
नानबा नी लिहिलेली सगळी गाणी
नानबा नी लिहिलेली सगळी गाणी आम्हि भोन्ड्ल्याला पार्ल्यात ( मुम्बईत) म्हणायचो. अणी सगळ्यात शेवटी "खिरापत" ओळ्खायची आणी खाउन भोन्ड्ला समाप्त. मग खेळायला पळायच. लगोरी, लन्गडी, डबाएईस पाइस, उठी का बशी.
गंगाधरजी, अशीच एक
गंगाधरजी, अशीच एक मंगळागौरीच्या गाण्यान्ची आपल्याकडे प्रथा आहे....त्याची ही गाणी जमवूया...एक गाणे माझ्याकडून..
"नाच ग घुमा,
कशी मी नाचू?
या गावचा, त्या गावचा,
शिंपी नाही आला, चोळी नाही मला,
कशी मी नाचू?
नाच ग घुमा,
कशी मी नाचू?
या गावचा, त्या गावचा,
कासार नाही आला, बांगड्या नाही मला,
कशी मी नाचू?
नाच ग घुमा,
) हातात घेउन ते उडवत म्हणायचे..)
कशी मी नाचू?
या गावचा, त्या गावचा,
सोनार नाही आला, हार (?) नाही मला,
कशी मी नाचू?
"
असेच बरेच जण येत नाहीत आणि घुमा काही नाचत नाही...:डोमा:
(हे गाणे घुमाने हातात सूप (प्यायचे नाही, धान्य पाखडायचे
पण या गाण्यामधून समाजाची १८-पगड जातीमधे केलेली रचना आणि त्यामधली dependency चांगली दाखवली आहे...
अजुन "खूर्ची-का-मिर्ची", "अकूल्या-नकूल्या" ची गाणी आहेत्....माझ्या आईला पिंगा मस्त घालता यायचा...
(१) या या भुलाबाई, आमच्या
(१)
या या भुलाबाई, आमच्या आळी,तुमच्या आळी
तुमच्या अंगात हिरवी चोळी
हिरव्या चोळीवर बसला मोर,बसला मोर,
बसल्या मोरावर सांडले दाणे
भुलोजी राणे घरी नाही,घरी नाही.
(२)
या या भुलाबाई, आमच्या आळी,तुमच्या आळी
तुमच्या अंगात लाल चोळी
लाल चोळीवर बसला मोर,बसला मोर,
बसल्या मोरावर सांडला बुक्का
भुलोजी अप्पा घरी नाही,घरी नाही.
(संकलन-गंगाधर मुटे)
खूप चांगला लेख आणि तितकीच छान
खूप चांगला लेख आणि तितकीच छान चर्चा ...
माहीती मिळतेय
एकच पापड भाजला,भाजला चुलीमागे
एकच पापड भाजला,भाजला
चुलीमागे ठेविला,ठेविला
सासुबाईने पाहीला,पाहिला
कोरा कागद लिहिला,लिहिला
झुनझुन गाडी जुंतली,जुंतली
त्यात मैना बैसवली,बैसवली
काऊन मैना कोमावली,कोमावली
माहेराला पाठवली,पाठवली.
(संकलन-गंगाधर मुटे)
मुटेजी, हा लेख तुम्ही
मुटेजी,
हा लेख तुम्ही मनोगतावर पण टाकला होतात का? मला असं वाटतंय की मी भोंडल्याची काही गाणी तिथे प्रतिसादात लिहिली होती. जरा लिंक देता का तुमच्या मनोगतावरील सेम लेखाची? तिथे टाकलेली गाणी इथे पण पेस्ट करेन म्हणत्ये.
Pages