भोंडला,हादगा,भुलाबाई आणी मंगळागौर

Submitted by अभय आर्वीकर on 8 March, 2010 - 04:24

भोंडला,हादगा : भुलाबाईची गाणी

बालपणीच्या अशा फ़ारच कमी आठवणी असतात ज्या माणसाच्या आयुष्यभर सावलीसारख्या सोबत-सोबत चालतात. जीवनाला कितीही रंग बदलू देत, आचार-विचारांच्या संरचनेत कितीही बदल झालेत तरीही त्या आठवणी मात्र वास्तवाचे कायम स्मरण करून देत असतात. एका अर्थाने ह्या आठवणी माणसाला "डोळस दृष्टी" प्राप्त करून देत असतात. आज महिला दिनाच्या निमित्ताने झालेली अशीच एक आठवण.

माझ्या बालपणीच्या (१९७०-७५) काळात मनोरंजनाची साधने एकतर विकसित झाली नव्हती किंवा ग्रामिण भागापर्यंत पोचलेली नव्हती. दिसलाच तर एकट-दुकट रेडियो दिसायचा.दळवळणाची साधने म्हणजे सायकल (फ़क्त पुरूषांसाठी. स्त्रीला सायकलवर बसवणे लाजिरवाणे वाटायचे आणि चेष्टेचा विषय ठरायचे) किंवा रेंगीबैल. (छकडा,दमनी वगैरे) ईलेक्ट्रीक,टेलिफ़ोन गावात पोचायची होती. अर्थात ग्रामिण स्त्री-जनजीवनाचा बाह्य जगाशी फ़ारसा संबंध येत नव्हता. त्यामुळेच महिलाप्रधान सण जिव्हाळ्याने साजरे केले जात असावेत.

आश्विन शु.१० ते कोजागिरी पोर्णिमेपर्यंतचा काळ "आश्विनच्या भुलाया" म्हणुन साजरा केला जातो.या काळात मातीच्या बाहुल्या/भुलाया मांडून दररोज नित्यनेमाने गाणी म्हटली जातात. त्याकाळी छोट्या-छोट्या बालिकापासून जख्खड म्हातार्‍या महिला सुद्धा यामध्ये गाणी गायनासाठी सहभागी होत असे. त्या पैकी काही गाणी ऐकतांना माझ्या अंगावर काटा उभारायचा.तर काही गाणी ऐकून मन खुप-खुप उदास व्हायचे. कारण त्या गीतात महिलांची अपार दु:खे साठवलेली असायची. साताजन्माच्या असहायतेची कारुण्यता प्रकट झालेली असायची. अबला म्हणुन आयुष्य कंठतांना वेळोवेळी झालेली कुचंबना/मिळालेली हीन वागणुक स्पष्टपणे प्रतिबिंबीत झालेली असायची. आणि त्यासोबतच अठराविश्व दारिद्र्य लाभलेल्या संसाराचा गाडा हाकलतांना झालेली दमछाक व ससेहोलपट ठळकपणे अधोरेखित झालेली असायची.

त्यापैकी एका गीताची थोडक्यात चर्चा करूया.(ते गीत आताशा निट आठवत पण नाहीये)
या गीतामध्ये एका सुनेची माहेरची ओढ आणि कुटूंबातील उर्वरित सदस्यांची हतबलता दिसून येते.
नुकतेच लग्न होवुन सासरला नांदायला आलेल्या सुनेला तिच्या माहेरची आठवण होते,आईच्या आठवणीने जीव व्याकुळ झालेला असतो.तिकडे आईला सुद्धा लेकीची आठवण होऊन गहिवरलेले असते. म्हणुन मायलेकिंची गाठभेठ करून देण्यासाठी बाप लेकीला घेण्यासाठी आलेला असतो. बाप घ्यायला आलेला बघून आनंदाने उल्हासित झालेली सून सासूला हळूच भीत-भीत विचारते.

सून :- हात जोडूनी पायापडूनी
सासूबाई मी विनविते तुम्हाला
बावाजी आले घ्यायाला
जावू का मी माहेराला,माहेराला?

माहेरला जायची रितसर परवानगी सूनबाई मागते आहे हे बघून सासू थोडी भांबावते.तीच्या समोर अनेक प्रश्न उभे राहातात.एक तर काहीना काही पैसा लागेलच जो घरात नाहीच. दुसरे असे की शेतीत काम करणारे दोन हात पण कमी होणार. म्हणुन ती सूनेला म्हणते.

सासू :- कारलीचे बी लाव गं सूनबाई
मग जा आपल्या माहेरा,माहेरा.

कारलीच्या बियानाची लागवड करून माहेराला जाण्याचा सल्ला सूनेला मनोमन पटतो.ती बेगीबेगी लागवड उरकते आणि पुन्हा विचारते.

सून :- कारलीचे बी लावलेजी सासूबाई
आता तरी धाडा माहेरा,माहेरा.

एक वेळ मारून नेता आली.आता पुढे काय? पुन्हा सासूबाई शक्कल लढवते.

सासू :- कारलीचा वेल निघू देगं सूनबाई
मग जा आपल्या माहेरा,माहेरा.

सून पुन्हा काही दिवस कळ काढते आणि विचारते.

सून :- कारलीचा वेल निघालाजी सासूबाई
आता तरी धाडा माहेरा,माहेरा.

सासूसमोर पुन्हा तोच यक्षप्रश्न. नाही म्हणता येत नाही आणि पाठवायला गेले तर संसाराचं अर्थशास्त्र कोसळणार. कौटिल्याची अर्थनिती कळायला अर्थतज्ञ किंवा अर्थमंत्रीच लागतो या समजाला तडा देणारी सासूची वर्तणूक. आणि मग नवनविन युक्त्या लढविणे सासूचा नित्यक्रमच बनून जातो.

सासू :- कारलीला फ़ूल लागू देगं सूनबाई
मग जा आपल्या माहेरा,माहेरा.
सून :- कारलीला फ़ूल लागलेजी सासूबाई
आता तरी धाडा माहेरा,माहेरा.

कारलीचा वेल मांडवावर गेलाय.वेल फ़ुलांनी बहरून गेली. पण नशिब....?

सासू :- कारलीला कारले लागू देगं सूनबाई
मग जा आपल्या माहेरा,माहेरा.
सून :- कारलीला कारले लागलेजी सासूबाई
आता तरी धाडा माहेरा,माहेरा.

आता कष्ट फ़ळांस आले. लदबदून कारली पण लागलीत. मग अडचन कसली?
होय.थोडी अडचनच. कारली बाजारात नेऊन विकल्याखेरीज पैसा कोठून येणार?

सासू :- कारलीला बाजारा जाऊ देगं सूनबाई
मग जा आपल्या माहेरा,माहेरा.
सून :- कारली बाजारात गेलीजी सासूबाई
आता तरी धाडा माहेरा,माहेरा.

कारली बाजारात गेली आहे. खरे तर हे गीत यापुढे आनंदाच्या क्षणांकडे वळायला हवे. एवढ्या मेहेनतीने पिकविलेली कारली बाजारात जाणे हा आनंदाचा क्षण.कारण आता घरात पैसे येणार. माल विकायला बाजारा गेलेला घरधनी घराकडे काहीना काही खरेदी करून सोबत भातकं (खाऊ) आणि चार पैसे घेऊन परतायला हवा.पण पुढे या गीतात तसे काहीच होत नाही. याउलट घरात चिडचीडपणा, उदासिनता वाढीस लागलेली दिसते. आजपर्यंत घरात एकमेकाशी गोडीगुलाबीने वागणारी माणसे आता नैराश्याच्या भावनेतून एकमेकांशी फ़टकून वागतांना दिसत आहे.

काय, नेमके झालेय तरी काय? कारली मातीमोल भावाने तर नाही खपली ना? की कारलीच्या खरेदीला कोणी घेवालच मिळाला नाही?
कौटिल्याच्या अर्थशास्त्रात ते बसत नसेल तरीही तेच खरे असावे.

आता हा शेवट पहा.
आतातरी आपल्याला माहेराला जायला मिळणार की नाही या विचाराने ग्रस्त झालेली सून परत एकदा सासूला विचारती होते. सासूला तिच्या आवडीची कारलीची भाजी करून खाऊ घालते.

सून :- कारलीची भाजी केलीजी सासूबाई
आता तरी धाडा माहेरा,माहेरा.
सासू :- मला काय पुसते,बरीच दिसते
पुस आपल्या सासर्‍याला,सासर्‍याला.
सून :- मामाजी,मामाजी बाबा आले न्यायाला
जाऊ काजी माहेरा,माहेरा.
सासरा :- मला काय पुसते,बरीच दिसते
पुस आपल्या नवर्‍याला,नवर्‍याला.
सून :- स्वामीजी,स्वामीजी बाबा आले न्यायाला
जाऊ काजी माहेरा,माहेरा.

आणि मग प्राणप्रियेच्या प्रश्नाला नवरा उत्तरच देत नाही. नवरा काय म्हणतो हे गीतात लिहिलेच नाही. गीताचा दोन ओळीत थेट शेवटच करून टाकला आहे.

" घेतलीय लाठी, हाणलीय पाठी,
तुला मोठं माहेर आठवते,आठवते......!!"

गंगाधर मुटे
.......................................................................
भोंडला,हादगा आणि भुलाबाईची गाणी : महिलांच्या व्यथा. भाग-२
.......................................................................

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गीतात महिलांची अपार दु:खे साठवलेली असायची. साताजन्माच्या असहायतेची कारुण्यता प्रकट झालेली असायची.>>>>>>
मुटे भौ, हे बाकी खरे लिहिलेत, गाण्या मधे वापरलेले कडू कारल्याचे रूपक ही किती योग्य आहे, भुलाबाई च्या गाण्यांमधे मी ही हे गाणे लहानपणी ऐकले होते. माझ्या आजोळी मावशीने अभ्यासा करता एक प्रबंध आणला होता, बहुतेक सरोजिनी बाबर किवा गिरिजा कीर यांचा, तो या सारख्या गाण्यांवरच होता. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातल्या स्त्रियाची गाणी होती त्या मधे. वाचायची आवड म्हणून मावशीपेक्षा मीच जास्ती वाचला होता. आता परत अकोल्याला जाइन तेव्हा शोधला पाहिजे. नक्की सापडेल कुठे तरी जुन्या सामानात .

भोंडला किंवा हादगा म्हणजेच हे का...
नवरात्रात म्हणजे घटस्थापने पासून ते खंडे नवमी पर्यंत भोंडला करतात.. त्यात हे गाणे नक्कीच असते...
बाकी महिला वर्गच ह्या बद्दल जास्त सांगू शकेल..

हे गाणे भोंडल्यात म्हटले जाते. भोंडल्यातील बाकीही इतर गाणी सासू, नवरा, नणंद हे कसा जाच करतात, किंवा कसा दुष्टावा करतात अशा प्रकारची आहेत. लहान असताना त्यांच्या गेयतेने व अर्थ नीट न समजल्यामुळे त्यांविषयी फारसे काही वाटायचे नाही.... पण आता तीच गाणी पुन्हा आठवली की त्यातील स्त्रीची असहाय स्थिती, परावलंबित्व आणि मन मोकळे करण्याची धडपड जाणवते.

भोंडला/हादगा नवरात्रात खेळतात. मधे पाटावर तांदळानं काढलेला हत्ती आणि मग त्याच्या भोवती फेर धरून मुली/बायका गाणी म्हणतात. पहिल्या दिवशी एक गाणं, दुसर्‍या दिवशी दोन असं करून नवव्या दिवशी नऊ गाणी. मग खिरापती ओळखायच्या. "श्री बालाजीची सासू मेली" (श्रींखंड , बासुंदी, लाडू.. वगैरे) ह्यानं सुरुवात (नियम म्हणून नव्हे - तसंही कुणी श्रींखंड,बासुंदी वगैरे केलेलं आठवत नाही मला खिरापतीला)

त्यात हे वरचं गाणं असायचच. थोडसं वेगळं व्हर्जन आहे मात्र.
कार्ल्याचा वेल लाव ग सुने मग जा आपुल्या माहेरा माहेरा
कार्ल्याचा वेल लावला ग सासुबाई आता तरी जाऊ का माहेरा माहेरा
वेलीला फुल येऊदेग सुने मग जा आपल्या माहेरा माहेरा.. वगैरे..

आणि मग एकदा वेलीला कार्ली आली की भाजी करायला लावायची सासू..
(शेवट आठवत नाही, पण बहुतेक आनंदी शेवट असायचा)

अशीच सासरच्या छळाची वर्णनं करणारी बरीच गाणी असायची..("सासुरीच्या वाटे कुचुकुचु काटे कोण पाव्हणं आलं ग बाई",) "अस्सं सासर द्वाड बाई कोंडोनी मारितं" अशी तक्रारही असायची काही गाण्यात, वेड्याचं गाणं तर लहान पणी एकदम फेमस! आता त्या वेड्याच्या बायकोला किती त्रास होत असेल ह्या सगळ्यात वगैरे जाणवायचं नाही कधी थोडं मोठं होई पर्यंत.

पण कधी कधी ही सून रुसुन पण बसायची बरं का (सासुरवाशी सून रुसुन बसली कैसी, माधवराया राणी घराशी येईना कैशी.. वगैरे)
असो, तुमच्या लेखाचा हा विषय आहे त्यामुळे मी खूप जास्त लिहिणं बरोबर नाही.. आता आटोपतं घेते.. ह्या गाण्यांची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद!

<< असो, तुमच्या लेखाचा हा विषय आहे त्यामुळे मी खूप जास्त लिहिणं बरोबर नाही.. आता आटोपतं घेते.. ह्या गाण्यांची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद! >>

अजुन लिहा. जेवढी माहीती असेल तेवढी अगदी विस्ताराने लिहिली तरी चालेल.
ती सर्व गाणी लीहून काढली तर फारच उत्तम.
येथे संग्रहीत झालेली गाणी नंतर वेगळा बाफ बनवून तिथे पेस्ट करता येईल. या निमित्ताने अशा गाण्यांचा संग्रह तयार होवू शकेल. Happy

इथे भुलाय किंवा भुलाबाई हा प्रकार हादग्यापेक्षा जरा वेगळा आहे. भुलाबाईच्या लहान मूर्ती विकत मिळतात. मी तरी विदर्भात कुठे हत्ती काढलेला पाट बघितलेला नाही. सर्वत्र या भुलाबाई असतात.

आम्हीपण भोंडल्यामधे हे गाणे म्हणायचो पण त्याचा शेवट सुखद होता. कारल्याची भाजी करुन आणि खाउन झाल्यावर सासु सुनेला माहेरी जायची परवानगी देत असे. त्यातील शेवटची ओळ अशी होती --

आणा फणी घाला वेणी जाउद्या राणी माहेरा माहेरा
आणली फणी घातली वेणी गेली राणी माहेरा माहेरा

छान आठवणी. मीही ऐकलेल्या म्हटलेल्या गाण्यात सुखांत जास्त होता. नानबानी लिहीलेलं माधवराया, तसच आडकित जाउ ई.

या गाण्यांचे व्यक्तीनुरूप शब्दांतर झाले असण्याची शक्यता आहेच. कारण गाण्यांचे शब्द अगदी सोपे आणि सहज आहेत.

मी कोकणातली. आमच्याकडेही नवरात्रात हादगा असतो. ९ दिवस ९ वेगवेगळ्या घरांच्या अंगणात हा कार्यक्रम होतो. वरील गाण्याच्या आमच्या version मधेही आनंदी शेवट आहे.
"आणा फणी घाला वेणी जाउद्या राणी माहेरा माहेरा
आणली फणी घातली वेणी गेली राणी माहेरा माहेरा" हाच.

अतिशयोक्ति अलंकारात एक गाणं आहे.-

काळी चंद्रकळा नेसु कशी?
गळ्यात हार घालू कशी?
ओटीवर मामांजी जाऊ कशी?
दमडिचं तेल आणु कशी?

दमडीचं तेल आणलं
सासुबाईंचं न्हाणं झालं
वन्सन्ची वेणी झाली
भावोजींची दाढी झाली
मामांजींची शेन्डी झाली
उरलेलं तेल झाकुन ठेवलं
लांडोरीचा पाय लागला
वेशीबाहेर ओघळ गेला
त्यात हत्ती वाहून गेला
सासुबाई सासुबाई अन्याय झाला
दुध्-भात जेवायला वाढा
माझं उष्ट तुम्हीच काढा.

ह्यातल्या मजकुराची योग्यता वगैरे मला विचारु नका हं! वर्षानुवर्षे असं ऐकत आले, ते लिहीलंय. अशी बरीच गाणी मला माहिती आहेत. वेळ होइल तसे लिहीन.

कमळे कमळे दिवा लाव
दिवा गेला वार्‍यानं
कमळीला नेलं चोरानं
चोराच्या हातातुन सुटली
बाजेखाली लपली
सासुबाईंनी देखली
मामांजीनी ठोकली...(बिच्चारी..)

ह्या लेखाचा विषय "महिलांच्या व्यथा" असा आहे. हादग्याची सगळीच गाणी ह्या प्रकारात येणार नाहीत. त्यासाठी वेगळा बीबी करायचा की इथेच लिहायचे?

मी राहुरीला असतांना आम्ही भोंडला खेळायचो.. पाटावर हत्ती काढुन! खान्देशात त्याच काळात भुलाबाई/ गुलाबाई/ गुलोजी बसतात. शंकर-पार्वती आणी पुढे पाळण्यात बाळ अशी मातीची मूर्ती असते. गाणी दोन्हीकडे जवळजवळ सारखीच असतात. फेर धरुन गाणी म्हणतात. ती संपल्यावर खिरापत ओळखण्याचा खेळ होतो.

<< त्यासाठी वेगळा बीबी करायचा की इथेच लिहायचे? >>

इथेच लिहायचे.
अगदी आनंदाची / उल्हासाची/ विरहाची असेल तरी लीहायची.
गरज भासल्यास शिर्षकही बदलता येईल.
खिरापत ओळखण्याचा खेळ सुद्धा सार्वत्रीक दिसतोय.

गाणी जशी/जेवढी येईल तेवढी लीहा.त्यानिमीत्ताने या गाण्यांमधिल विविधताही लक्षात येऊ शकते.

लहानपणीच्या हादग्यात म्हट्लेले हे गाणे .. आठ्वेल तसे (हो अगदी ५वी-६वी पर्यन्त आम्ही मुलही हादगा खेळायचो )

=======================
श्रिकन्ता कमळाकन्ता अस कस झाल
अस कस वेड माझ्या कपाळि आल

वेडियाच्या बायकोने केल्या होत्या करन्ज्या
तिकडुन आला वेडा त्याने निरखुन पाहिले
होडि होडि म्हणुन त्याने पाण्यात सोडले

श्रिकन्ता कमळाकन्ता ...

वेडियाच्या बायकोने केल्या होत्या शेवया
तिकडुन आला वेडा त्याने निरखुन पाहिले
अळ्या अळ्या म्हणुन त्याने टाकुन दिले .

श्रिकन्ता कमळाकन्ता ...

वेडियाच्या बायकोने केले होते लाडु
तिकडुन आला वेडा त्याने निरखुन पाहिले
चेण्डू म्हणुन त्याने खेळाय्ला घेतले

श्रिकन्ता कमळाकन्ता ...

वेडियाचि बायको झोपली होति पलन्गावर
तिकडुन आला वेडा त्याने निरखुन पाहिले
मेली मेली म्हणुन त्याने जाळुन टाकले

श्रिकन्ता कमळाकन्ता ...

टीप : चकल्यान्चे त्याने काय केले हे आठवत नाही . कुणी सान्गेल का ?

मला विकीपीडियावर एक लिंक मिळाली त्यात काही भोंडल्याची गाणी आहेत. एक गाणे वानगीदाखल देत आहे :

नणंदा भावजया दोघी जणी घरात नव्हतं तिसरं कोणी
शिंकाळ्यातलं/शिंक्यावरचं लोणी खाल्लं कोणी खाल्लं कोणी
तेच खाल्ल वहिनींनी वहिनींनी....
आता माझा दादा येईलग येईलग
दादाच्या मांडीवर बसीनग/बसेनग
दादा तुझी बायको चोरटी चोरटी
असू दे माझी चोरटी चोरटी
दे काठी लाबं पाठी विसल्या गुलाबाई माहेरच्या गोष्टी

उर्वरित गाणी ह्या लिंकवर वाचा : http://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%...

दमडीचं तेल आणलं
सासुबाईंचं न्हाणं झालं
वन्सन्ची वेणी झाली
भावोजींची दाढी झाली
>> अतिशयोक्ती अलंकाराच उदाहरण म्हणून होतं हे आम्हाला..

अरुंधती, आमच्या कडे नणंदा भावजयाचा शेवट असा होता:
असू दे माझी चोरटी चोरटी
दे काठी लाबं पाठी विसल्या गुलाबाई माहेरच्या गोष्टी
च्या ऐवजी
दादा तुझी बायको चोरटी
असू दे माझी चोरटी
घे काठी घाल पाठी, घराघराची लक्ष्मी मोठी..

(घाल पाठी म्हणताना आजूबाजूच्यांना जोरात बुक्के मारायचे पाठीत आणि आपला बुक्का चुकवायचा प्रयत्न करायचा)

बरीच गाणी आहेत.. जमेल तशी लिहिन.

चकल्यांचं आम्ही शाळेत असताना 'चक्रं चक्रं म्हणून त्याने फेकून दिली....श्रीकांता कमलकान्ता....' अशा प्रकारे रुपांतर करायचो!
@नानबा : हो, आम्हीसुध्दा हे गाणं असंच काहीसं म्हणत असू. बहुधा प्रत्येक भागात एकाच गाण्याचे अनेक पर्याय असावेत.... आणि हो, त्या बुक्क्या इतक्या जोरात बसायच्या (त्यात त्या मैत्रिणीशी भांडण असेल तर अजूनच जोरात ;-)) की नंतर बराच वेळ पाठ हुळहुळत असायची!

शिवाजी अमुचा राजा
त्याचा तो तोरणा किल्ला
किल्ल्यामधे सात विहिरी
सात विहिरींमधे एक एक कमळ
एक एक कमळ तोडीले
भवानी मातेला अर्पण केले
भवानी माता प्रसन्न झाली
शिवरायाला तलवार दिली
तलवार... घेऊनी आला...( इथे चाल बदल)
हिंदुंचा राजा तो झाला
हिंदुनी त्याचे स्मरण करावे
हादग्यापुढे गाणे गावें.

हे पहिले गाणे

आधी नमुया श्री गणराया
मंगलमुर्ती विघ्न हराया
मंगलमुर्ती उंदरावरी
सत्ता त्याची इंद्रावरी
इंद्र हा स्वर्गीचा राजा ( चाल बदल)
झुलती हत्तीच्या फौजा
वरुण चाकर इंद्राचा
पाऊस पाडील हस्ताचा
पड पड पावसा थेंबोथेंबी
थेंबोथेंबीच्या हळव्या लोंबी
हळव्या लोंबी आणुया, तांदुळ त्याचे कांडुया
मोदक्-लाडु बनवुया
गणरायाला अर्पुया....

अश्विनी, शिवाजी आमुचा राजा आम्ही असं म्हणायचो:
शिवाजी अमुचा राजा
त्याचा तो तोरणा किल्ला
किल्ल्यामधे सात विहिरी
सात विहिरींमधे सात कमळे
एक एक कमळ तोडीले
भवानी मातेला अर्पण केले
भवानी माता प्रसन्न झाली
शिवरायाला तलवार दिली
तलवार... घेऊनी आला...( इथे चाल बदल)
हिंदुंचा राजा तो झाला
हिंदुनी त्याचे स्मरण करावे
हादग्यापुढे गाणे गावें.

आणि हेच गाणं कन्टिन्यू करून

हादगा देव मी पूजिते
सख्यांना बोलाविते
हदगा देव मी पूजिते
लवंगा, सुपार्‍या, वेलदोडे
करून ठेवले विडे
आणिक दुधाचे दुध पेढे
वाहून हागद्यापुढे
हदगा देव मी पूजिते
सख्यांना बोलाविते
हदगा देव मी पूजिते.

बाकी कुठलीही गाणी असूदेत नसुदेत, हादगा सुरू व्हायचा ह्या गाण्यानं.. वेळोवेळी गाण्याची चाल बदलते.
हे गाणं लिहिताना मला जाणवलं की ह्यातल्या बर्‍याच शब्दांचे वाच्यार्थ सोडा, मतितार्थही मला अजिबात कळत नाहीये Proud

(जे आठवलं नाही तिथे "---" टाकलय.. ज्यांना माहिती आहे त्यांनी सांगा- त्यानुसार बदल करेन.
आणखीन काही चुकलं असेल तरी सांगा)

ऐलमा पैलमा गणेश देवा
माझा खेळ मांडूदे, करीन तुझी सेवा
माझा खेळ मांडिला वेशीच्या दारी
पारवत गुंजे गुंजावाणी
गुंजावाणी ---च्या सारविल्या टिका
आमच्या गावच्या भुलोजी बायका
एविनी गा तेविनी गा (हे चाल बदलून)
कांदा चिरू बाई तांदूळ घ्या
आमच्या आया, तुमच्या आया
खातील काय दुधोंडे
दुधोंड्याची वाजली टाळी (हे म्हणताना टाळी वाजवायची)
आयुष्य दे रे वनमाळी

माळी गेला शेता भाता
पाऊस पडला येता जाता
पड पड पावसा थेंबोथेंबी
थेंबोथेंबीच्या आडव्या लोंबी
आडव्या लोंबती अंगणा
अंगणा तुझी सात वर्ष
भोंडल्या तुझी बारा वर्ष
अतुल्या मतुल्या
चरणी चातुल्या
चरणीचे धोंडे
हातपाय खणखणीत गोंडे
एकएक गोंडा वीसावीसाचा
सार्‍या नांगर नेसायचा
नेसा ग नेसा बाहुल्यांनो
अडीच वर्ष पावल्यांनो

(पुढे मी ब्लँक!!!!)

हे एकदम गेय आहे.. चाल माहित असताना म्हटलं तर खूप गोड वाटतं...

कृष्ण घालितो लोळण
आली यशोदा धावून
काय रे मागतोस बाळा
तुला देते मी आणून

'आई मला चंद्र दे आणून, त्याचा चेंडू दे करून'
"असलं रे कसलं बाळा, तुझं जगाच्या वेगळं"

कृष्ण घालितो लोळण
आली यशोदा धावून
काय रे मागतोस बाळा
तुला देते मी आणून

'आई मला साप दे आणून, त्याचा चाबूक दे करून'
"असलं रे कसलं बाळा, तुझं जगाच्या वेगळं"

कृष्ण घालितो लोळण
आली यशोदा धावून
काय रे मागतोस बाळा
तुला देते मी आणून
<< आठवतील ते सगळे विचित्र प्रकार घालायचे 'श्रीकांता कमलकांता' मधल्या सारखे ह्या मधेही - जास्तच अशक्य प्रकार Wink >>

Pages