भोंडला,हादगा आणि भुलाबाईची गाणी : महिलांच्या व्यथा. भाग-२

Submitted by अभय आर्वीकर on 16 March, 2010 - 22:27

भोंडला,हादगा आणि भुलाबाईची गाणी : महिलांच्या व्यथा. भाग-२

भुलाबाईचे गाणे हा तत्कालीन सामाजिक अविष्कारच असणार.
साहित्य हा समाजाचा आरसा असतो असे म्हणतात.
परंतू थोरा – मोठ्या कवी / लेखकांच्या साहित्यात ते वास्तव
प्रामाणिकपणे उतरलेले नसावे.
त्या काळात संतकवी देवास भजण्यात गुंग, त्यांचे बहूतांश काव्यवैभव/प्रतिभा देवाचे गुण गाण्यात खर्ची पडली असावी. कवी तर मुळातच कल्पना विलासात रमणारा प्राणी. त्यातही कवी हे पुरूषच. त्यामुळे महिलांचा कोंडमारा झाला असावा. आणि कदाचित त्यामुळेच अपरिहार्यपणे महिलांनी प्रस्थापित काव्याला फ़ाटा देवून स्वत:चे काव्यविश्व स्वत:च तयार केले असावे. पहाटे जात्यावर म्हटलेली गाणी असो वा बाळाला झोपवतांना म्हटलेली गाणी (अंगाईगीत?) असोत, ही त्यांची स्वरचित गाणीच आहेत. त्यामुळेच त्यांच्या या गाण्यात थोडाफ़ार यमक जुळवण्याचा भाग वगळला तर ज्याला आपण साहित्यीक दर्जा म्हणतो तो कुठेच आढळत नाही. आढळते ते निव्वळ वास्तव.
या गीतात आईच्या घराला सोन्याची पायरी आहे असे म्हटले आहे.
मग हे काय आहे? कल्पनाविलास की अतिशयोक्ती? माहेरच्या बढाया की वास्तवता?
मला यामध्ये एक भिषण वास्तविकता दिसते.कारण…
पाखरू माहेरघरा गेल्यानंतर त्याने तिच्या आईचे घर कसे ओळखायचे? काही वेगळेपण असावे ना सहज ओळखण्यासाठी? घराचे कवेलू, छप्पर, भिंती आणि दरवाजे हे नक्किच सांगण्यायोग्य नसणार.
“जेव्हा एखाद्याकडे सांगण्यासारखे काहीच नसते तेंव्हा तो बढाईचा आधार घेत असतो” हेच तर त्रिकाल अबाधित शाश्वत सत्य.
मग तीने सोन्याची पायरी सांगीतली त्याचा वेगळा अर्थ कसा घेणार?
आणि त्यावरी (पायरीवर) बसजो, शिदोरी सोडजो म्हणजे काय?
निरोप घेवून जाणार्‍या पाखराला सोबत नेलेली शिदोरीच खाण्यास सांगायला ती विसरत नाही. का?
तर पाखराला तातडीने जेवायची व्यवस्था आईच्या घरी होऊ शकेल अशी परिस्थीती आईचीही नसावी.(?)

रूणझुन पाखरा जा माझ्या माहेरा
माझ्या का माहेरी सोन्याची पायरी
त्यावरी बसजो शिदोरी सोडजो
माझ्या का मातेला निरोप सांगजो
तुझ्या का लेकीला बहू सासुरवास
होते तर होऊ दे औंदाच्या मास
पुढंदी धाडीन … गायीचे कळप
पुढंदी धाडीन … म्हशीचे कळप
.
गंगाधर मुटे
…………………………………..
या गाण्याचा शेवट गोड करण्यासाठी
तुझ्या का लेकीला बहू सासुरवास
ऐवजी
सुखी आहे मयना आईला सांगजो
असा बदल करून गायला जाते अशी माहीती मिळाली.
……………………………………………….....……
भोंडला,हादगा आणि भुलाबाईची गाणी : महिलांच्या व्यथा. भाग-१
..........................................................................

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जेव्हा एखाद्याकडे सांगण्यासारखे काहीच नसते तेंव्हा तो बढाईचा आधार घेत असतो” हेच तर त्रिकाल अबाधित शाश्वत सत्य.
>> किंवा कदाचित, ज्याबद्दल जिव्हाळा वाटतो, ती प्रत्येक गोष्ट आपल्याकरता सोन्याच्या मोलाची असते , असंही दर्शवायच असेल!

छान..

<< किंवा कदाचित, ज्याबद्दल जिव्हाळा वाटतो, ती प्रत्येक गोष्ट आपल्याकरता सोन्याच्या मोलाची असते , असंही दर्शवायच असेल! >>

एक शंका :
मग आईच्या घरी पाठवतांना शिदोरीची गरज नव्हती.
आईच्या घरी पाच पक्वाने खायला मिळतील अशी ओळ आली असती. Happy
....
ही गाणी एखाद्या कवी/गितकाराने लिहिली असती तर समाजजीवनात जे जे काही चांगले आहे ते ते वेचून लिहीले असते आणि वास्तवाला बगल दिली असती, यात संशय नाही.
..........

भुलाबाईचे सासरे कसे?

भुलाबाई भुलाबाई सासरे कसे गं सासरे कसे?
कचेरीत बसले हे वकील जसे गं वकील जसे

भुलाबाई भुलाबाई सासू कशा गं सासू कशा?
कपाळभर कुंकू पाटलीन जशा गं पाटलीन जशा

भुलाबाई भुलाबाई भासरे कसे गं भासरे कसे?
हातामध्ये घडी मास्तर जसे गं मास्तर जसे

भुलाबाई भुलाबाई जाऊ कशी गं जाऊ कशी?
हातामध्ये लाटणं स्वंयपाकीन जशी गं स्वंयपाकीन जशी

भुलाबाई भुलाबाई दीर कसे गं दीर कसे?
डोळ्यावर गॉगल डॉक्टर जसे गं डॉक्टर जसे

भुलाबाई भुलाबाई नणंद कशी गं नणंद कशी?
हातामध्ये घडी मास्तरीन जशी गं मास्तरीन जशी

भुलाबाई भुलाबाई पती कसे गं पती कसे?
जटातून गंगा वाहे शंकरजी जसे गं शंकरजी जसे

भुलाबाई भुलाबाई आपण कशा गं आपण कशा?
शंकराच्या मांडीवर पार्वती जशा गं पार्वती जशा

भुलाबाई भुलाबाई मुल कसे गं मुल कसे?
वाकडया सोंडाचे गणपती जसे गं गणपती जसे

(संकलन : गंगाधर मुटे)