मला काहितरी करायचंय..

Submitted by अजय on 15 February, 2010 - 00:50

प्रसंग -१
तो: मला काहितरी करायचंय.
मी: वा. छान. कुठल्या विषयात काय करायचंय?
तो: अमूक तमूक..
मी: मग थांबलायस कशाला?
तो: पाहतोय जरा सध्या.....

प्रसंग -२
ती: मी नेटवर्कींग सुरू करावं म्हणतेय.
मी: जरूर. मग काय केलंय त्यासाठी.
ती: अमुक तमुक ग्रूपची मेंबर झालेय.
मी: वा. छान. कुणाकुणाला भेटलीयस ग्रूपमधे? कुणाचा सल्ला विचारलास.
ती: नाही पाहतेय जरा सध्या.....

प्रसंग -३
तो: मला नवीन संकेतस्थळ चालू करायचंय. अमूक अमूक प्रकारचं.
मी: जरूर. आता संकेतस्थळ चालू करणं खूप स्वस्त आणि सोपं झालंय. आणि आता फु़कट जागा मिळते ती घेऊन सुरु करता येईल.
तो: फुकटच घ्यायचीय. पण पाहतोय मी जरा....

गेले अनेक वर्षं मी हे अनुभवतोय. व्यक्ती बदलतात. त्यांचे विषय बदलतात. कालावधी बदलतो. पण अंगात काहीतरी करावं असं वाटणारी इच्छा आणि प्रत्यक्षात काहीही न केल्याची सत्यपरिस्थिती हे मात्र सगळीकडे सारखंच. माझा एक जवळचा मित्र गेली १६ वर्षे नुसताच "पाहतोय". अजूनही "काहितरी" करायचा त्याचा उत्साह कायम आहे. यशस्वी उद्योजकांची चरित्रे आणि इतर स्फूर्तीदायक पुस्तके तो आनंदाने वाचत असतो. पण जे काही करायचं आहे त्यातलं ०.०५% ही त्याने काही केलेले नाही.

वर संकेतस्थळ चालू करणारा मित्र संगणक क्षेत्रातलाच आहे. म्हणजे तांत्रिक अडचण नाही. जागा कुठे फु़कट मिळते याचे १०-१५ पत्ते तरी त्याला ठाऊक आहे. पण प्रत्यक्ष अशा ठिकाणी जागा घेण्याचा मुहूर्त मात्र अजून लागतोय.

यातला थोडासा बदल करून अजून एक प्रकारचं उत्साही व्यक्तीमत्व असतं. यांच्याकडे भरपूर आयडीया असतात. पण प्रत्यक्षात त्यावर ते कधीच काम करत नाहीत. एकदा अशा एका मित्राने मला गोपनीयतेची शपथ घेऊन सॉफ्टवेअर मधल्या ४-५ आयडीया सांगितली. आयडीया चांगल्या होत्या. त्यावर त्याने माहितीही गोळा केली होती. हे झालं काही वर्षांपूर्वी. परत तो भेटला तेंव्हा मी चौकशी केली.

प्रसंग -४
मी: काय झालं तुझ्या कल्पनेचं.
तो: नाहीरे मायक्रोसॉफ्टने त्यांचं अगदी सेम प्रॉडक्ट आणलं.
मी : अरे छान. म्हणजे तुझ्या कल्पनेला मार्केट आहे हे सिद्ध झालं. मग तू दुसर्‍या छोट्या (Niche) मार्केटमधे काम का करत नाही? किंवा मायक्रोसॉफ्टच्या प्रॉडक्टवर Addon काही का तयार करत नाहीस?
तो: नाही रे. मला exactly मायक्रोसॉफ्टने जे केलं तेच करायचं होतं.
मी: Bad luck. पण तुझ्या त्या दुसर्‍या कल्पनेचं काय झालं.
तो: त्यावर Google ने exactly सेम प्रॉडक्ट काढलं. ते जाऊदे. तुझ्याकडे वेळ असला आणि तू कुणाला सांगणार नसला तर माझ्याकडे एक नवीन आयडीया आहे....

आपल्याला जी आयडीया आली आहे ती याच क्षणाला जगात हजार लोकांना तरी सुचत असेल ही जाणीवच त्याना नसते. त्यामुळे त्यातले काही शे जण ती प्रत्यक्षात आणून त्याची चाचणी करत असतील हे लक्षात येणं तर जाऊच द्या. बरं लक्षात आलं तरी दुसर्‍या कुणी ती आधी अंमलात आणली तर त्यांची लगेच निराशा होते. दुसर्‍यांच्या अंमलबजावणीला मर्यादा असू शकतील आणि तीच कल्पना थोडा फेरफार करून आपण स्वतः दुसर्‍या मार्केटमधे विकू शकतो हे त्यांना पटत नाही. नुसतं घराबाहेर पडलं तरी "खाण्याचे पदार्थ करून विकणे" ही हजारो वर्षे सार्‍या जगभर चावून चोथा Happy करून जुनी झालेली आयडीया, तिची विविध रुपे, विविध ग्राहकवर्ग आपल्याला दिसतात. आणि त्या कल्पनेची बहुतेक सगळी रुपं यशस्वी उद्योग करताना दिसत आहेत यांच्याकडेही या "युनिक आयडीया" वाल्यांचं दुर्लक्ष होतं.
आयडिया महत्वाची नसते तर तिची अंमलबजावणी (execution) महत्वाची असते हे ही त्यांच्या लक्षात येत नाही.

प्रसंग -५
तो: मला काहीतरी करायचंय
मी: मग लगेच आत्ता सुरु कर. (मी नाही, रामदासस्वामींनी सांगितलंय Happy त्यांचं थोडं ऐक). तुला आठवत नसेल तर "केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे" असं म्हणून गेले आहेत ते.
तो: म्हणजे लगेच नोकरी सोडून देऊ?
मी: लगेच नोकरी सोड असं नाही.

  1. पण आत्ता एका कागदावर कल्पना लिहून ती प्रत्यक्षात आणण्यासाठी पुढे काय करता येईल असं लिहून काढ.
  2. तुला जर काय करायचं हे माहिती नसेल तर पुढच्या ३ महिन्यात या विषयातल्या माहितगार व्यक्ती शोधून काढून त्यांना भेटून जास्त माहिती काढायची इतका निश्चय तर तुला करता येईल ना?
  3. आणि कुणिच माहीती नसेल तर पुढच्या १ महिन्यात तुझ्या २० मित्राना अशी माहितगार व्यक्ती कुठे मिळू शकेल असा प्रश्न विचारेन असा निश्चय करं.
  4. आणि हे सगळं या कागदावर लिहून सुरुवात कर. इतकं तर करता येईल ना तुला?

तो: येईल रे. पण पाहतो मी...

(सर्व प्रसंग सत्य घटनांवर आधारीत)

टीपः मराठी उद्योजक या ग्रूपमधला हा सार्वजनिक मजकूर आहे. या व्यतिरिक्त ग्रूपमधे इतर अनेक धागे आहेत जे फक्त सभासदांपूरते मर्यादित आहेत. या पानावर मराठी उद्योजक ग्रूपचे सभासद होण्यासंबंधी माहिती आहे.)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेख आणि बीबी दोन्ही एकदम वाचनीय आहेत. उद्योगात पडू इच्छिणार्‍यांनी सुरूवातीला कसल्या गोष्टींची तयारी ठेवावी याबद्दल ही कोणी लिहीले तर उपयोगी ठरेल.

प्रयोग, सुंदर पोस्ट!

नेटवर्किंग नक्कीच उपयोगाचे आहे. वर निबंध यांनी लिहिलेले आर्थिक सहकार्यासंबंधी पोस्ट अन प्रयोग ने वर लिहिलेली पोस्ट विचारात घेता, मायबोली पुढे चालुन एक व्हेंचर कॅपितलिस्ट बनु शकते! (काही चुकत असल्यास माझे अज्ञान समजावे)

नवीन उद्योग करायला जर २० लाख रुपये लागत असतील, अन एक जणाकडे ते नसतील तर दोन दोन लाख देउ शकणारे १० लोक एकत्र आले तर काय बहार येईल!!

ही स्टेप पुर्णतः विश्वासावर अवलंबुन असल्याने ती येईस्तोवर थोडा काळ जावा लागेल इतकेच. पण सुपंथ गृप चा अनुभव लक्षात घेता, ती ही वेळ लवकर्च येईल.

लगे रहो!

प्रयोग अतिशय सुंदर पोस्ट !
चंपकला अनुमोदन , " जर तुम्ही एखाद्याच्या हस्तांदोलनावर विश्वास ठेवु शकत नसाल तर तुम्हाला त्याच्या सहीवर विश्वास ठेवणं सुद्धा कठीण जाईल ". शेवटी काय तर धंद्यात विश्वास खुप महत्वाचा .

प्रयोग, मस्त पोस्टं पुन्हा एकदा.

वेंचर कॅपिटलिजम च्या मुळाशी विश्वास आहे पण तो विश्वास आहे कॅपिटलिस्टला तुमच्या बिजनेस मॉडेल वर असलेला.
कोणीही एखाद्या माणसा वर विश्वास ठेवुन डोनेशन देऊ शकतो (सुपंथचा उल्लेख केला म्हणुन) पण पैसा वाढण्या करता गुंतवणुक असेल तर मॉडेल पटलं पाहिजे.

खूप छान आहे हा बीबी. बहुतेकांची मते आवडलीत खास करुन योगेशची.

आमचे IT & Entreprenuership चे प्राध्यापक म्हणतातः

To be constantly trying new ideas to be innovative and to sustain one's competitive advantage is hard work. It requires deep thinking. I mentioned in class that most people would prefer not to think, or let sometone think for them. It is much easier to just follow some instructions. So a successful entrepreneur is a deep thinker, constantly asking why and finding out ways to do things better. That's why they are such a rare breed.

छान पोस्ट प्रयोग आणि सगळेच.
>>यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, ही म्हण मुळीच खोटी नाही. <<
खरंय. त्या मागच्या स्त्रीला तिचा चॉइस कोणी विचारतं का याबद्दल मात्र साशंकता आहे. उद्योजक बनू बघणार्‍या मुलांशी मुली लग्न करत नाहीत हा मुलींच्या मानसिकतेचा दोष आहे हे ही पटलं नाही. पाठिंबा देणारी पत्नी ही बर्‍याचदा पूर्णवेळ गृहिणी किंवा अर्धवेळ त्याच उद्योगात लक्ष घालणारी असायला लागते. थोडक्यात as an entrepreneur (स्पे.चुभूदेघे) तिचं अस्तित्व काहीच नाही याला पर्याय नाही. आणि या कारणासाठी मुलींनी पाठिंबारूपी पत्नी व्हायला नकार देणं यात मला काहीच चूक वाटत नाही.

मुळात बायकोचा पाठिंबा गृहित धरून उद्योजक बनू बघणे हे मला फारसं काही पटलं नाही. मला तो अजूनही 'मला काहीतरी करायचंय पण...' या प्रकारचा बहाणा वाटतो.

तसंच स्वतःचं वेगळं अस्तित्व बुजवून यशस्वी स्त्रीच्या मागे उभा असलेला पुरूष ही वस्तुस्थिती खूप दुर्मिळ असते हे पण नाकारता येणार नाही. कुठलीही उद्योजक बनण्याची स्वप्नं बघणारी मुलगी लग्न करताना नवर्‍याचा पाठिंबा (पूर्णवेळ गृहिणी किंवा अर्धवेळ त्याच उद्योगात लक्ष घालणे या प्रकारचा) गृहित धरणं तर सोडाच पण विचारही करू धजणार नाहीत. आजही यशस्वी स्त्रियांच्या मुलाखतीत नवरा, सासू-सासरे यांच्या पाठिंब्याचंच नको इतकं कौतुक असतं कारण ते जगावेगळं आणि दुर्मिळ असं काहीतरी अप्रूपाचं असतं. सासूने घर सांभाळलं म्हणूनच त्यांना ते करता आलं अशी टिप्पणी असते. तेव्हा बाईला उद्योजक म्हणून उभे रहायचे असते तेव्हा तिला घरच्यांचा आर्थिक/ व्यवस्था पातळीवर सपोर्ट तर सोडाच मॉरल सपोर्ट सुद्धा गृहित धरता येत नाही. तरी करणार्‍या करतातच.

थोडक्यात काय पत्नीचा सपोर्ट नाही म्हणून उद्योजक बनलो नाही हे कारण पटण्यासारखे नाही.

उद्योजकतेशी प्रत्यक्षपणे संबंधित हे पोस्ट आहे असं म्हणता येण्यासारखं नाही. पण बहुतांशी चर्चेमधे पुरूष उद्योजक हेच गृहित धरल्यासारखे वाटले. प्रत्येक ठिकाणी मांडण्यात आलेली गृहितके ही स्त्री उद्योजकांसाठीही तितकीच योग्य/ खरी आहेत का हे तपासून बघण्यात विषयांतर नाही असं मला वाटतं.

स्त्री विरूद्ध पुरूष असा सूर तुला जाणवला असेल. मी केवळ वस्तुस्थितीमधला फरक दाखवून द्यायचा प्रयत्न करतेय. कुण्या बाईने आपल्या नवर्‍याला असा पाठींबा दिला असेल. त्याबद्दल मला काहीच म्हणायचं नाही. पण तो असायलाच हवा. आणि मुलींनी त्यासाठी नकार दिला तर मुलींना दोष देणं, या नकारांना अडथळा मानणं हे मला संपूर्णपणे नाकर्तेपणाचं वाटतं. कुणाच्यातरी आयुष्यभराच्या सपोर्टला अपेक्षित/ गृहित धरूनच स्वतःच्या इच्छा आकांक्षा फुलवू पाहणं हे माणूस म्हणून चुकीचंच आहे. याच्यात्याच्या पायावर उभं राहून मग यशस्वी होण्याची स्वप्नं बघावीत तरी का?

>>सगळ्या विरोधांना झुगारून फार थोडे लोकच यशस्वी झालेले दिसतात. <<
तसंच असतं. सगळे थोडंच यशस्वी बनणार.
आणि अशी कारणं सांगणारे यशस्वी बनण्यास पात्र असत नाहीत नक्कीच.

नीरजा- अनुमोदन
पत्नीचा हातभार, घरच्यांच्या हातभार नसल्यास स्त्रीपुरुष कोणंसही उद्योजक बनणे अवघड आहे. पत्नीच्या बाबतीत तो आधार अध्याहृतच धरल्या जातो (ती फुकटची हिशेब तपासनीस, रिसेप्शनिस्ट वगैरे सर्व असते, प्रसंगी दागिने वगैरे विकुन उदात्त वगैरे होते :-)), तर कधी तिचं मत डावलुन ते केल्या जातं.

प्रयोग म्हणतोये ते काही अंशी पटतेय, पण माझ्यामते घरच्यांचा आधार हा फक्त एकच निकष झाला, भांडवल, प्रॉडक्ट आयडिया, जागा, या सारखा. काही वेरियेबल्स तुम्हाला अनुकुल असतील, काही नसतील. फक्त घरच्यांचा आधाराला किंचीत जास्त वेटेज इथे देण्यात येऊ शकते कारण हे २४ तासांच सर्वसमावेशक लोण आहे, सुरवातीला तरी प्रचंड झोकुन देऊन सर्व रिसोर्सेस पणाला लाऊन हे करावे लागेल.
उद्योजक होणे हा जर खरच तुमचा मुकम्मल जहाँ असेल तर यातली कुठलीही अडचण तुम्हाला रोखु शकणार नाही. नसेल तर प्रत्येकच समस्या जस्टिफायेबल कारण होऊ शकते. नाहीतर मी बी बालिष्टर झालो असतो....... Proud

limbutimbu,kamlakar,सुजा ,नीधप, महेश,shugol

तुमच्या इथल्या पैसे गुंतवण्याबद्दलच्या सगळ्या प्रतिक्रिया अप्रकाशित केल्या आहेत.

@limbutimbu
तुम्ही तुमच्या मित्राला मदतच करत आहात याबद्दल मला शंका नाही. तुम्हाला असे आवाहन करायचे असेल तर रितसर " मराठी उद्योजक" ग्रूपचे सभासद व्हा (आणि त्या बरोबर असलेल्या आचारसंहितेचे पालन करा. तुमचे नाव, गाव जाहीर करा, हे ओघानेच आले.) आणि तिथे ग्रूपमधे ते आवाहन करा. किंवा मित्राला सभासद होण्याची विनंती करा.

पुन्हा एकदा स्पष्ट करतो तुमच्या हेतूंबद्दल मला शंका नाही. पण व्यक्तीरेखेत कुठेही नाव, पत्ता न लिहता असे पैसे उभारले जाण्याचा पायंडा इथे पडत असेल तर मायबोलीच्या आणि मायबोलीकरांच्या हिताच्या दृष्टीने ते अयोग्य ठरेल. त्यामुळे अशा प्रकारचे लेखन आणि प्रतिक्रिया फक्त "मराठी उद्योजक" ग्रूपचे जे सभासद झाले आहेत (आणि त्याबरोबरच स्वतःचे नाव, गाव कायम जाहिर रित्या दाखवण्याचा पारदर्शकपणा ज्यानी स्वीकारला आहे) त्यांच्यासाठिच मर्यादित असतील. ग्रूपचे सभासद सार्वजनिक नसलेला धागा काढून तिथे ही चर्चा हवी असल्यास चालू ठेवू शकतात.

अ‍ॅडमिन टीम, इट्स ओके, उडवल्यात पोस्ट ते बरेच झाले! Happy
[सुजा ,नीधप, महेश,shugol यान्च्या या विषयावर काय पोस्ट होत्या त्या माझे वाचनात आल्याच नाहीत, असो.]

>>>>तुम्हाला असे आवाहन करायचे असेल तर रितसर " मराठी उद्योजक" ग्रूपचे सभासद व्हा (आणि त्या बरोबर असलेल्या आचारसंहितेचे पालन करा. तुमचे नाव, गाव जाहीर करा, हे ओघानेच आले.) आणि तिथे ग्रूपमधे ते आवाहन करा. किंवा मित्राला सभासद होण्याची विनंती करा. <<<<

माफकरा, मी या बीबीवर तसे आवाहन करण्याच्या उद्देशाने आलो नव्हतो, तर बाहेरील माझ्या आजुबाजूची फ्याक्ट चर्चेत आली म्हणून मान्डली होती, त्यावर कमलाकर यान्नी काहीएक उपाय सुचविले होते.
असो.
आपण ती चर्चा काढली ते ठीकच केलेत.

वरील गूपच्या आचारसन्हितेतील काही भाग, खास करुन, नाव/गाव "व्यक्तिरेखेत" देखिल (प्रोफाईलमधे) जाहीररिया मान्डायचे, हे मला (limbutimbu या आयडीकरता) तितकेसे रुचले नाहीये. ग्रुपमधिल कोणीही माझी ओळख प्रत्यक्षात भेटून पटवुन घेऊ शकतो, पण म्हणून ती मायबोलीवरील माझ्या सार्वजनिक प्रोफाईलमधे सार्वजनिक वाचनाकरीता मान्डलीच पाहिजे हे मला बरोबर वाटत नसल्यानेच, आजवर मी या धाग्यान्कडे वळलो नाहीये! अजुनही विचार करतोय की नेमके काय करावे! Happy
ग्रुपकरता स्वतन्त्र प्रोफाईलची व्यवस्था नसल्याने / किन्वा, प्रोफाईलमधिल कोणतीही ठराविक माहिती सार्वजनिक्/खाजगी ग्रुपसाठी/फ्रेण्ड्स्साठी ठेवावी हा ऑप्शन नसल्याने-असल्यास मला माहित नसल्याने, हा प्रश्न येतो असे मला वाटते. त्याकरता तत्कालिक उपाय म्हणून नावगावासहित वेगळी आयडी बनवावी का????

>>>>> पण व्यक्तीरेखेत कुठेही नाव, पत्ता न लिहता असे पैसे उभारले जाण्याचा पायंडा इथे पडत असेल तर मायबोलीच्या आणि मायबोलीकरांच्या हिताच्या दृष्टीने ते अयोग्य ठरेल. <<<<<
या मुद्द्याशी मी ९९% सहमत आहे. जिथवर "पैशाचा" सम्बन्ध येतो, तर त्यास सुनिश्चित रचनाच हवी.

(१% राखुन ठेवला, तो "व्यक्तिरेखेत लिहीणे" यावर मतभेदाकरता, तात्विक मतभेद आहे हा! स्वतन्त्र विषय आहे! कदाचित हीच ती बहुचर्चित "मराठी अ‍ॅटिट्युड" असेल माझी! Proud )

उद्योजक गृपसाठी किमान माहीती व्यक्तिरेखेत असणे अनिवार्य केलेले आहे ती उत्तम गोष्ट आहे. वैयक्तिकरित्या काही ठराविकच लोकांपुरती ओळख पटवून दिली असली तरी बाकीच्यांच्यासाठी ती साशंकता असणार. गृपमधल्या प्रत्येकाला व्यक्तिरेखा बघताना त्या त्या व्यक्तीचे नाव, गाव आणि व्यवसाय हे समजलेच पाहिजे. हा नियम कृपया बदलू नये अशी या गृपच्या अ‍ॅडमिन्सना माझी विनंती आहे.

अ‍ॅडमिन अनुमोदन.

शिवाय उद्योजकांना बॅन्क लोनची सुविधा असते. सरकारी योजना असतात. कर्ज देण्याची एक प्रक्रीया असते ती पूर्ण करावी लागते. हातचे उचलून पैसे देऊ नयेत. होतकरू उद्योजकास तिथे पाठ्वावे. त्यात त्याचे हीत/ हित च आहे
कारण बाजारात पत निर्माण करण्याचा हा श्रीगणेशा आहे.

नीधपा, ते मान्य आहे म्हणूनच मी "ग्रुपकरता" वेगळी प्रोफाईल अशा कल्पनेची विचारणा वर केली आहे. जी प्रोफाईल, ग्रुपसभासदान्व्यतिरिक्त इतरान्ना "सार्वजनिकरित्या" उघड होणार नाही. सध्या तशी सोय नाही, व तत्काळ देता येईलच, असेही नाही.
यावर सोपा उपाय म्हणजे दुसरी आयडी घेऊन, तिथे माहिती देणे हा होय
पण पुन्हा त्यावर "ड्युप्लिकेट आयडी" म्हणून बोम्बाबोम्ब व्हायची.! Wink

मामी, तुमच्या पोस्टशी मी प्रत्यक्ष अनुभव व अनुभूती व उदाहरणान्मुळे सहमत नाही, पण या बीबीचा हा विषयच नसल्याने आणि वित्तपुरवठा हा (बहुधा) ग्रुपचा उद्देशच नसल्याने, त्यावरची कारणमिमान्सा करणे टाळतो! Happy

>>>> पण प्रत्येक ठिकाणी तोंड घातले पाहिजे, ते देखील स्वतःच्याच मूर्ख अटींवर, असा काही नियम आहे का?
साजिरा, नाही, असा नियम अजुनतरी नाहीये Wink (पण हा विषय तुम्हाला "मराठी अ‍ॅटिट्युडच्या बीबी" वर चर्चेला जरुर घेता येईल असे वाटते)
फक्त, कोण प्रत्येक ठिकाणी तोण्ड घालून, कोणत्या शहाणपणाच्या अन मूर्खपणाच्या अटी माण्डतोय हे ठरविण्याचे कार्य आपण अ‍ॅडमिन-टीमवरच सोपवलेले चान्गले, नाही का? Proud
मी तर बोवा त्यान्च्या अधिकारक्षेत्रात कसलाही अधिक्षेप करत नाहीये, करू इच्छितही नाही!

ज्यांना एवढ्या उलथापालथी करून स्वतःची ओळख लपवायची गरज वाटते ते उद्योजक काय कप्पाळ बनणार.
नियम अ‍ॅडमिनने ठरवलेले आहेत. एक व्यक्ती वगळता कुणालाही त्यात प्रॉब्लेम नाहीये तेव्हा नियमांमधे काही चूक नाही हे उघडच.

>>>> एक व्यक्ती वगळता कुणालाही त्यात प्रॉब्लेम नाहीये तेव्हा नियमांमधे काही चूक नाही हे उघडच.
तसे गृहितक मान्डू शकता, लोकशाहीत तर नक्कीच! Wink
पण माझ्यामते नियमात नाही, तर त्याच्या इम्प्लिमेन्टेशन मधे प्रॉब्लेम आहे, व तो "मायबोलिच्या आयडी" ला असलेल्या गोपनीयतेच्या अर्थात ओळख लपविण्याच्या स्वातन्त्र्याशी सम्बन्धित आहे.
तान्त्रिक दृष्ट्या, उद्योजक ग्रुपच्या सभासदास, सर्व ओळख देणे अनिवार्य या नियमाबद्दल वाद नाही, पण तसे केल्यास, ती माहिती "सर्व मायबोलीवर सार्वजनिकरित्या" उघड होते या बद्दल मला खटकतय. व उत्कृष्ट साईटबान्धणीच्या मायबोलीच्या उदाहरणात या दोन निकषान्चे क्रॉसिन्ग टाळले गेले/टाळता आले तर बरे असे वाटले म्हणून सान्गितले.
मी काय कप्पाळ उद्योजक बनेन की नाही वा अजुन काही, या विषयावर मी मुग गिळून गप्प बसणेच पसन्द करतोय.
मला या वादात जास्त पडायच नाही जेणेकरुन येथिल मूळ उद्देशासच बाधा पोचेल.
मी सूचना मान्डली ती "मायबोलिचा सभासद" या नात्याने.
आता मी येथुन रजा घेतो, माझे इथे काही काम आहे/आवश्यकता आहे असे एकन्दरीत बहुमताप्रमाणे वाटत नाही.

ओह, वरील चर्चा पाहिली. लिहिताना लक्षात आले नव्हते. पण आता कळाले.
या अशा शिस्तीमुळे मायबोली(हितगुज) चा दर्जा छान टिकून आहे. Happy
लिंबू, नियम मान्य असोनदेखील सभात्याग किंकारणम ?
एक छोटासा अपघात चुकून घडला, त्यावर योग्य उपाय पण योजला गेला.
बाकी पुढे चालणार्‍या चर्चेत नियम पाळून भाग घेण्यास कोणाची हरकत नसावी.
मी माझे मत मांडले, याउप्पर आपली मर्जी.

I agree with limbu.

by making name, profession and other info visible by default to all maaybolikars is not a good idea.

The group verifies people before accepting them as members and therefore there is a trust between the group members that the name and other information about an ID will not be misused. displaying this information to group members is therefore acceptable.The same can not be said about all the maaybolikars.

Further, I think. an avatar persona of an ID should not be tied to his real-world personality or life. As people could have their own valid reasons to keep those two separate from prying public eyes. Avatar provides a certain anonymity which I think allows people to share their true thoughts/feelings freely. This very fundamental aspect is compromised for any maaybolikar who wishes to be a part of this group.

S/he will have no alternative but to go for duplicate IDs for joining the groups. Which sounds inconvenient...

I suggest Maayboli admin to include displaying profile info to selected groups or memebers as 'must have feature' as more and more special interest groups are becoming the norm.

Please stop this unnecessary and uncalled discussion.
Asking admin team to do something is very simple.

Nobody is even seems to care about realizing the efforts of admin-team for making available what is available today.

I think the current rule with hwhat we have is adequate. Having public and private profile could be a good feature but it may not be practical.

If one does not want to disclose his or her identity then they can opt out of the group.

On the other hand, there is no need to ridicule other's opinion just because you have a different opinion. We all should respect each other as an individual and as if we are meeting face-to-face. I request to keep away from शेलकी विशेषणे. Happy

माझंही मत या ग्रुप पुरती वेगळी प्रोफाईल ठेवायला आहे. हे मी अजयना कळवलं आहे एक मत म्हणून.
त्याचबरोबर अ‍ॅडमिन टीम नी ही सुविधा उपलब्ध करुन देणे किती सोपे/कठीण आहे याचा अंदाज नाही त्यामुळे ती डिमांड करणे बरोबर वाटत नाही. शक्य झाल्यास करा, नसेल तर सोडून द्या.
त्याचबरोबर उद्योजकवाल्यांनी काही विचारपूर्वक ह्या अटी ठेवल्या असतील ती भूमिका मला समजते. दुर्दैवाने त्यांच्या अटींची पूर्तता काही ऑरगनायझेशनल कंस्ट्रेंटस मुळे मला करता येत नाही, त्यामुळे उद्योजक ग्रुपची सदस्य मी होऊ शकत नाही सध्यातरी.

केवळ वादात पडायला नको म्हणून मी इथे लिहीत नव्हते, ते आता लिहीले आहे. धन्यवाद.

वर कुठेतरी s/w product चा उल्लेख आहे म्हणुन, भारतीय IT company सहसा प्रोडक्ट बनवत नाही कारण त्यात त्याना बरेचदा अपयश आलेले आहे. आमच्याच companyने एक प्रोडक्ट बाजारात आनले होते, ROI ची सुरवात व्हायला १० वर्ष लागाली तोही फारसा चांगला नाही, पहिले काही वर्ष सपशेल तोटा.
त्यानंतर companyने नवीन productचा विचार केला नाही.
पुर्वी आमच्याच rival comanyत काम करणारी आता माझी वरीष्ठ म्हणुन काम करते ती तिथे एका productवरच काम करत होती.त्यांची सगळी investment वाया गेलीए. product market मधे सपशेल नाकरले गेले.उलट आता कित्येक product based IT companies , to reduce risk factor service base वाढवत आहेत.

इथे भांडवलाची कमतरता असा उल्लेख बर्‍याच जनानी केला आहे, पण असेही बरेच जण असतात की ज्यांच्याकडे surplus पैसा आहे, आणि तो त्यांना व्यवसायात/धंद्यात गुंतवायला आवदेल पण प्रामाणिक माणसे(व्यावसायिक) भेटत नाहीत. अशांनी काय करायचे? मायबोलीने सुरु केलेल्या नेटवर्कमधे अशा लोकाना जे फक्त भांडवल गुंतवण्यास तयार आहेत पण व्यवसाय करु शकत नाहीत किंवा त्यांच्याकदे वेळ नाही ,कसे सहभागी होता येइल?

>>>>मायबोलीने सुरु केलेल्या नेटवर्कमधे अशा लोकाना जे फक्त भांडवल गुंतवण्यास तयार आहेत पण व्यवसाय करु शकत नाहीत किंवा त्यांच्याकदे वेळ नाही ,कसे सहभागी होता येइल?

(१) सर्वप्रथम सदस्य होता येईल
(२) उद्योजकांचे उद्योग वा होऊ घातलेल्या उद्योजकांच्या कल्पना यावर बारकाईने लक्ष ठेवता येईल.
(३) अधिक माहिती उद्योजकाकडून ईमेलद्वारे घेता येईल. त्याची विश्वासार्हता तपासून पुढे जाता येईल.
(४) आपल्याला जी रक्कम गुंतवायची आहे, त्याला साजेशा उद्योगात भागीदारी घेण्यासाठी, तो उद्योग, त्यांचा बिझनेस प्लॅन, viability, तुम्हाला मिळू शकणारे रिटर्न्स यावर त्या उद्योजकाशी तपशीलवार वाटाघाटी करता येतील.
(५) अथवा तुमची स्वतःचीच एखादी कल्पना असेल, आणि भांडवल पुरवण्याची तयारी असेल तर कोणी भागीदारी तात्वावर ती प्रत्य्क्षात आणू इच्छित आहे का याचा तुम्हाला योग्य वाटतील अशा उद्योजकांशी संपर्क साधून अंदाज घेउ शकता.

चुकेल का म्हनुन बरेचदा काहि नविन करायचे तालायचो, आत्ता मानसिकता बदललिय चुकेल म्हनुन न केल्यापेक्शा करुन चुकलेले बरे.....

<<माझंही मत या ग्रुप पुरती वेगळी प्रोफाईल ठेवायला आहे. हे मी अजयना कळवलं आहे एक मत म्हणून. >>>

वरील चर्चेला अनुसरुन, वेगळा प्रोफाईल ठेवण कदाचीत अवघड असेल, पण एक सुचवावसं वाटतं , जर एक स्वतंत्र पान उघडुन ( फक्त ग्रुप करिता मर्यादीत ) त्यावर सगळ्या सभासदांची माहीत खाली दिलेल्या रकान्यात भरली तर सभासद्त्वाची अट पण पाळली जाईल अन सभासद न झालेल्या व्यक्तीला पण सभासदांची व्यक्तिगत माहीती नाही दिसणार.
१) नाव, आडनाव २)सध्याचा पत्ता ३)भारतातलं शहर ४)सध्याच्या व्यवसायाबद्दल माहिती ५)इच्छीत व्यवसाय

Pages