मला काहितरी करायचंय..

Submitted by अजय on 15 February, 2010 - 00:50

प्रसंग -१
तो: मला काहितरी करायचंय.
मी: वा. छान. कुठल्या विषयात काय करायचंय?
तो: अमूक तमूक..
मी: मग थांबलायस कशाला?
तो: पाहतोय जरा सध्या.....

प्रसंग -२
ती: मी नेटवर्कींग सुरू करावं म्हणतेय.
मी: जरूर. मग काय केलंय त्यासाठी.
ती: अमुक तमुक ग्रूपची मेंबर झालेय.
मी: वा. छान. कुणाकुणाला भेटलीयस ग्रूपमधे? कुणाचा सल्ला विचारलास.
ती: नाही पाहतेय जरा सध्या.....

प्रसंग -३
तो: मला नवीन संकेतस्थळ चालू करायचंय. अमूक अमूक प्रकारचं.
मी: जरूर. आता संकेतस्थळ चालू करणं खूप स्वस्त आणि सोपं झालंय. आणि आता फु़कट जागा मिळते ती घेऊन सुरु करता येईल.
तो: फुकटच घ्यायचीय. पण पाहतोय मी जरा....

गेले अनेक वर्षं मी हे अनुभवतोय. व्यक्ती बदलतात. त्यांचे विषय बदलतात. कालावधी बदलतो. पण अंगात काहीतरी करावं असं वाटणारी इच्छा आणि प्रत्यक्षात काहीही न केल्याची सत्यपरिस्थिती हे मात्र सगळीकडे सारखंच. माझा एक जवळचा मित्र गेली १६ वर्षे नुसताच "पाहतोय". अजूनही "काहितरी" करायचा त्याचा उत्साह कायम आहे. यशस्वी उद्योजकांची चरित्रे आणि इतर स्फूर्तीदायक पुस्तके तो आनंदाने वाचत असतो. पण जे काही करायचं आहे त्यातलं ०.०५% ही त्याने काही केलेले नाही.

वर संकेतस्थळ चालू करणारा मित्र संगणक क्षेत्रातलाच आहे. म्हणजे तांत्रिक अडचण नाही. जागा कुठे फु़कट मिळते याचे १०-१५ पत्ते तरी त्याला ठाऊक आहे. पण प्रत्यक्ष अशा ठिकाणी जागा घेण्याचा मुहूर्त मात्र अजून लागतोय.

यातला थोडासा बदल करून अजून एक प्रकारचं उत्साही व्यक्तीमत्व असतं. यांच्याकडे भरपूर आयडीया असतात. पण प्रत्यक्षात त्यावर ते कधीच काम करत नाहीत. एकदा अशा एका मित्राने मला गोपनीयतेची शपथ घेऊन सॉफ्टवेअर मधल्या ४-५ आयडीया सांगितली. आयडीया चांगल्या होत्या. त्यावर त्याने माहितीही गोळा केली होती. हे झालं काही वर्षांपूर्वी. परत तो भेटला तेंव्हा मी चौकशी केली.

प्रसंग -४
मी: काय झालं तुझ्या कल्पनेचं.
तो: नाहीरे मायक्रोसॉफ्टने त्यांचं अगदी सेम प्रॉडक्ट आणलं.
मी : अरे छान. म्हणजे तुझ्या कल्पनेला मार्केट आहे हे सिद्ध झालं. मग तू दुसर्‍या छोट्या (Niche) मार्केटमधे काम का करत नाही? किंवा मायक्रोसॉफ्टच्या प्रॉडक्टवर Addon काही का तयार करत नाहीस?
तो: नाही रे. मला exactly मायक्रोसॉफ्टने जे केलं तेच करायचं होतं.
मी: Bad luck. पण तुझ्या त्या दुसर्‍या कल्पनेचं काय झालं.
तो: त्यावर Google ने exactly सेम प्रॉडक्ट काढलं. ते जाऊदे. तुझ्याकडे वेळ असला आणि तू कुणाला सांगणार नसला तर माझ्याकडे एक नवीन आयडीया आहे....

आपल्याला जी आयडीया आली आहे ती याच क्षणाला जगात हजार लोकांना तरी सुचत असेल ही जाणीवच त्याना नसते. त्यामुळे त्यातले काही शे जण ती प्रत्यक्षात आणून त्याची चाचणी करत असतील हे लक्षात येणं तर जाऊच द्या. बरं लक्षात आलं तरी दुसर्‍या कुणी ती आधी अंमलात आणली तर त्यांची लगेच निराशा होते. दुसर्‍यांच्या अंमलबजावणीला मर्यादा असू शकतील आणि तीच कल्पना थोडा फेरफार करून आपण स्वतः दुसर्‍या मार्केटमधे विकू शकतो हे त्यांना पटत नाही. नुसतं घराबाहेर पडलं तरी "खाण्याचे पदार्थ करून विकणे" ही हजारो वर्षे सार्‍या जगभर चावून चोथा Happy करून जुनी झालेली आयडीया, तिची विविध रुपे, विविध ग्राहकवर्ग आपल्याला दिसतात. आणि त्या कल्पनेची बहुतेक सगळी रुपं यशस्वी उद्योग करताना दिसत आहेत यांच्याकडेही या "युनिक आयडीया" वाल्यांचं दुर्लक्ष होतं.
आयडिया महत्वाची नसते तर तिची अंमलबजावणी (execution) महत्वाची असते हे ही त्यांच्या लक्षात येत नाही.

प्रसंग -५
तो: मला काहीतरी करायचंय
मी: मग लगेच आत्ता सुरु कर. (मी नाही, रामदासस्वामींनी सांगितलंय Happy त्यांचं थोडं ऐक). तुला आठवत नसेल तर "केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे" असं म्हणून गेले आहेत ते.
तो: म्हणजे लगेच नोकरी सोडून देऊ?
मी: लगेच नोकरी सोड असं नाही.

  1. पण आत्ता एका कागदावर कल्पना लिहून ती प्रत्यक्षात आणण्यासाठी पुढे काय करता येईल असं लिहून काढ.
  2. तुला जर काय करायचं हे माहिती नसेल तर पुढच्या ३ महिन्यात या विषयातल्या माहितगार व्यक्ती शोधून काढून त्यांना भेटून जास्त माहिती काढायची इतका निश्चय तर तुला करता येईल ना?
  3. आणि कुणिच माहीती नसेल तर पुढच्या १ महिन्यात तुझ्या २० मित्राना अशी माहितगार व्यक्ती कुठे मिळू शकेल असा प्रश्न विचारेन असा निश्चय करं.
  4. आणि हे सगळं या कागदावर लिहून सुरुवात कर. इतकं तर करता येईल ना तुला?

तो: येईल रे. पण पाहतो मी...

(सर्व प्रसंग सत्य घटनांवर आधारीत)

टीपः मराठी उद्योजक या ग्रूपमधला हा सार्वजनिक मजकूर आहे. या व्यतिरिक्त ग्रूपमधे इतर अनेक धागे आहेत जे फक्त सभासदांपूरते मर्यादित आहेत. या पानावर मराठी उद्योजक ग्रूपचे सभासद होण्यासंबंधी माहिती आहे.)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लेख आहे. मला वाटत प्रत्येक व्यक्तिची काही ना काही स्वप्न असतात. पण वेळे अभावी, योग्य मार्गदर्शना अभावी ती पुर्ण करता येत नाहीत.

अगदी. अगदी. Happy
यालाच गेम्स पीपल प्ले मधे 'Why don't you? Yes, But......... म्हणलय. infinite loop मध्ये जाऊ शकतो हा गेम.
हेच.. मला वजन कमी करायचय, मला नोकरी करायची आहे, मला स्वतःला बदलायचं आहे, मला समाजकार्य करायचं आहे, मला भारतात परत जायचं आहे, मला परदेशी जायचं आहे............ अशासारख्या सर्वच मुद्यांना लागु पडते. Proud

करेक्ट... या मानसिकतेमधे मी माझी बरीच वर्ष घालवली आहेत.
स्वतःचा कम्फर्ट झोन न सोडता येणे किंवा सोडायची भिती वाटणे, पडलो तर ची भिती वाटणे ( खरंतर पडलो तर पडलो.. त्यात काय.. पण आपण स्वतःला फुकटच इतकं ग्रेट मानत असतो की पडलो तर काय असे प्रश्न पडायला लागतात.. इगो प्रॉब्लेम दुसरं काय.. ) अशी काय महत्वाची कारणे असतात.

प्रयोग, तू पोस्ट लिहिलस ना ग्रेट. मी पण खूप वाचते, गोल हे अप्रतिम पुस्तक आहे, नंतर इकॉनोमिक टाइम्स, सर्व बिझ मासिके ऑनलाइन स्ट्फ. मला एवढंच म्हणायचे आहे की कधीतरी ते पुस्तक बाजुला ठेवून प्रत्यक्ष क्रुती करावी लागते, प्रॉडक्ट्स/ सर्विसेस टेस्ट करून विकाव्या लागतात अकाउंट्स नीट चेक करावे लागते. ग्राहकांना भेटून बोलून शिकावे लागते. अ‍ॅक्षन जरूरी आहे. एवढेच.

जुन्यापैकी इन सर्च ऑफ एक्सलन्स, अकिओ मोरिताचे सोनी, शेवर्लेच्या बॉसचे, द गूगल स्टोरी वगैरे फार भारी पुस्तके. एन्त्रप्रनर.कॉम पण चान्गली साइट आहे.

माझ्या मनातसुद्धा गेली अनेक वर्ष मी लिहीलेल्या व संगीतबद्ध केलेल्या गाण्यांना प्रोफेशनल गायकांकडून गावून घ्याव व मुझीक अ‍ॅरेंज करून घ्याव अस खूप वाटत पण एवढा खटाटोप करून मी मार्केटींग करू शकेन का या बाबतीत फारच साशंक आहे त्यामुळे मी स्वत:च माझी गाणी गात असते व कार्यप्रसंगी लोकांसमोर सादर करते ,कारण हे वय कमवायच नाही तसच गमवायच तर मुळीच नाही हे प्रकर्शाने जाणवत .

अजय, तुम्ही फार मस्त लिहिता- tongue in cheek म्हणतात तसे. 'मायबोली' झाली. आता तुम्ही लेखन करायचे मनावर घ्या पाहू Happy तुम्ही त्यावेळी मायबोली सुरू केली नसती तर आज आमचे काय झाले असते कोणास ठाऊक!! Happy

'उद्योजक' बनणे हे पाणीच वेगळं आहे. सर्वांना मनापासून शुभेच्छा.

सर्व उद्योजकांस माहिती:

एसबी आय तर्फे १० लाख रु. सीड कॅपीट्ल छोट्या व मध्यम उद्योजकांना देण्यात येणार आहे. यावर इंट्रेस्ट आकारले जाणार नाही.

The scheme is named SBI SMILE. It will be in place initially for one year after which the bank could extend it. This scheme will give entrepreneurs a platform to kick start their businesses. currently banks give loans to the entrepreneurs only if they have substantial capital to invest. The loan amount is around 70 -80 % of the total project cost. Under the new scheme, SBI will provide seed capital and the entrepreneur will also be able to seek a loan. Loan terms and interest rates will be determined as per existing guidelines. There will be no interest on the seed capital. you can pay the amount after you have serviced your loan. The bank will offer a five year moratorium on paying the seed capital amount. Currently SBI has SME loans of Rs. 100000 crore outstanding on its books. SBI is flush with funds hence this scheme is launched is what the market says.

Source: The Economic Times 16.02.2010

छाया जी तुम्ही ऑस्ट्रेलियातच स्टुडिओ व आर्टीस्ट भाड्याने घेऊन गाण्यांची सीडी बनवू शकता. ते आयटयून्स किंवा एखाद्या निश साईट ( जसे ओरिजिनल मराठी स्कोअर असेल तर मायबोली उदाहरणार्थ)
ला विकू शकता. गाणी सिनेमासाठी विकत घेतली गेली तर चांगले पैसे मिळू शकतात. जर तुम्हाला तुमची कला मोनेटाइज करायची असेल तर. पण रॉयल्टी अग्रीमेन्ट चान्गल्या वकिलाकडून बनवून व चेक करून घ्या.
जाहिरातीसाठी जिन्गल्स पण प्रोड्यूस करू शकता.

जर पुण्या/ मुम्बैत येणार असाल तर खूप चान्गले लोक तुम्हाला मार्गदर्शन करू शकतील. माझ्या सासू बाइंनी त्यांनी कंपोज केलेल्या चिजांची सीडी बनविली आहे. त्यांचा फक्त शैक्षणिक उद्देश होता. प्रॉड्क्षन सोपे आहे.
मार्केटिन्ग ला खपावे लागेल.

हा लेख अचूक - नेमका आहे Happy
माझ्या विपुवहीच्या वर मी लिहील होत, डेस्टिनी वर्क्स (कदाचित चूकीचा इन्ग्रजी शब्द असेल, पण मतितार्थ असा की प्राक्तन्-प्रारब्धाचे चक्र सुरूच आहे, नि त्याला लटकुन भरडायला होतय)
काही दिवसातच मी दुसरे वाक्य टाकले.....
बर मग?
मी पण काय हातपाय गाळून गप्प बसलो नाहीये.....
नाऊ आय अ‍ॅम आल्सो इन अ‍ॅक्शन!

मी प्रत्यक्ष परिस्थितीचा अन्दाज घेऊन कृतिप्रवण झालोय, याचीच निश्चिती त्या उद्गारान्मागे होती.
तर, असे वा तसे, कसल्याही परिस्थितीत, या वा त्या प्रत्यक्ष कृतीस सुरुवात करणे अत्यावश्यक!
वरील लेखामधे हा विचार अत्यन्त सु:स्पष्टपणे मान्डला गेलाय असे वाटते Happy

पण बहुसन्ख्य कृतिस सुरुवातच का करत नाहीत?
तर कृति नन्तरच्या सम्भाव्य "अपयशाच्या" केवळ विचारानेच नाऊमेद होऊन प्रत्यक्षात कृती टाळणारेच असन्ख्य असतात (बरेचदा बर्‍याच बाबतीत मी देखिल). या नकारात्मक भावनेवर विजय मिळवावाच लागतो, जर तुम्हाला खरोखरच काही घडवायचे असेल.
अन जर नसेल काही घडवायचे, तर प्रवाहपतिता सारखे, वाट्याला आलेले आयुष्य "कसलिही तक्रार" न करता आनन्दाने जगण्याची कला तरी आत्मसात करायला हविच हवी.

वरील लेख सुन्दर आहे

बरेचदा, (माझ्यासहित) बर्‍याचजणान्च्या "नियमित व्यायाम" करायच्या कल्पना जशा बारगळतात, अगदी त्याच चालीवर उद्योगाच्या कल्पनाही बारगळतात! Proud

काही व्यापारी कम्युनिटीत एखाद्या माणसाची पत तो किती वेळा दिवाळ खोर झाला व त्यातून परत उठ्ला त्यावर ठरते. अभिमानाने/ कौतुकाने सांगतात इसका तो दीवाला निकल गया था अब देखो. तसे आपले होत नाही. आर्थिक विपन्नावस्था टेम्पररी जरी आली तरी त्या व्यक्तीस दूर सारले जाते. तो मेहनतीने कर्जाचे हप्ते भरतोय ना म्हणून सपोर्ट मिळत नाही. इथे एक मोठे शेट आहेत प्रचंड उद्योग व मालमत्ता पण राहणी अगदी साधी. स्कूटरीवरून फिरतात. त्यांच्या मुलाकडे मोठ्या गाड्या वगैरे आहेत. भरपूर प्रॉपर्टी आहे. खरा उद्योजक त्या ट्रॅपिन्ग्स मध्ये कमी अडकतो. व्यवसाय हीच त्याची नशा. तोच त्याचा मित्र सर्वकाही.

सगळ्यात पहिल्यांदा,
मी स्वतः यातून गेलो आहे आणि काही बाबतीत अजूनही यातून जात असतो. लोका सांगे ब्रम्हज्ञान आणि आपण कोरडा पाषाण असे म्हणायला हरकत नाही. पण कोरड्या पाषाणाकडून का होईना जर ब्रम्हज्ञान मिळत असेल तर घ्यायला काय हरकत आहे? (हे माझे वाक्य नाही. चोरलेले आहे).

@साधना, जागू, निकिता, आशूडी,
प्रसंग५ मधल्या पायर्‍या करून पहा कदाचित उपयोग होऊ शकेल.

@पूनम,
"मायबोली झाली"? छे छे. आत्ता कुठे सुरुवात आहे. आता मदतीला जसे जास्त हात मिळताहेत तशी अजून मजा येते आहे.
@छाया देसाई
तुमच्यासारख्याच मनात असणार्‍या शंकांना एकमेकांकडून मदत व्हावी आणि उत्तरं मिळावं म्हणून तर आपण या ग्रूपची सुरुवात केली आहे. मायबोलीवरही आधी काहि जणांनी तुमच्यासारखे प्रकल्प केले आहेत.
@प्रयोग,
तुम्हाला योग्य वाटत असेल तर तुमची कल्पना ग्रूपमधे थोडी तपशीलात लिहा. कदाचित काही मार्ग सुचवता येईल. माझ्या माहितीत खरे व्हेंचर कॅपिटलिस्ट रिटर्न मागत नाहीत तर मालकीहक्क मागतात. ते द्यायची तुमची तयारी हवी.
@प्रिती फुसे
अभिनंदन आगे बढो.
@रैना, limbutimbu, नीधप,
ही मानसिकता बर्‍याच गोष्टींना लागू पडते हे अगदी खरं. पण कधी कधी कारण अंगात भिनलेला आळशीपणा आणि ऐदीपणाची शरीराला लागलेली चटक हेही असू शकतं. म्हणजे माझ्या बाबतीत तरी तसं आहे. कारण गेले काही वर्षे मी नियमीत व्यायाम करायचा आणि लवकर उठायचं असं ठरवतोय पण अजून स्वप्नं"पाहतोय" जमतं का ते.
@अश्विनीमामी
माहितीबद्दल धन्यवाद.

अगदी खरं आहे. आळशीपणा बरेचदा ह्याला कारणीभूत असतो.
जोपर्यंत तो किडा वळवळत असतो..तोपर्यंतच जे काय करायचं ते केलं तर होतं नाहीतर तो किडा वळवळत मरुन जातो तसाच.
मायबोली नसती तर काय हा प्रश्न खूपदाच पडतो पूनम मलाही. सगळी सुरवात इथूनच झालीये Happy
मायबोली जिंदाबाद....अजय जिंदाबाद Happy

प्रयोग अगदी अगदी. माझ्या स्वत: च्या वहिनीने मग काय तुमच टर्न ओवर आणि कमिशन असे हेटाळणी स्वरूपात विचारले होते. यावर्शी किती? असे भावाने विचारल्यावर आम्ही ९ म्हण्लो तर तो म्हणे लाख का? मग स्वतःच म्हणला नाही नाही ९ लाख फारच कमी आहे ना! तरी ते उद्योजक आहेत पण सॉफ्ट वेअर वाले. आम्ही ओल्ड इकॉनमीतले = मालविके.

एकेक स्वभावाचाही फरक असतो. काही लोक आज्ञाधारक असतात. त्यांना सिक्युरिटीची गरज असते. काही आपल्या इन्सेक्युरिटी बरोबर राहतात. पैशाच्या रिस्का घेतात. धड्पड्तात. मला स्वतः ला ऑथोरिटीसमोर नमणे आवड्त नाही. पूर्ण निर्णय स्वातंत्र्य ही माझी गरज आहे. असे लोक नोकरीत खूष राहू शकत नाहीत.

पहिले मागणी प्रमाणे पुरवठा या न्यायाने लिहून देत असे. आता हे काम करते. कामापुरती मामी हे मलाच पट्ते! Happy आपण लोकांचे काम करून दिले, वेळेवर माल/ सर्विस प्रोवाइड केली की मग आपल्यावर कुणाची मालकी नाही. आपल्या वेळावर आपलाच हक्क असतो हे मला आवड्ते. भले मी फक्त कुत्रे चालवीन नाहीतर पुस्तक वाचेन. आता पैसा कधीच पुरेसा नसतो. नाहीतर वॉरेन बफेट रिटायर झाले असते की. जर बिल, वॉरेन ,स्टीव मेहनत करतात व नवे उद्योग करतात नवी उत्पादने आणतात तर आपण प्रयत्न तरी करायला हवा.
सितारोंसे आगे जहां और भी है.

व्यापारी कम्युनिटीबद्दल अगदी अगदी मामी.
आपल्याकडे नोकरीतही हे बायस खूप असतात. कोणीही ब्रेक घेऊन काही केल्यास ती व्यक्ति संशयित ठरते. जपान मध्ये मला प्रामुख्याने हा फरक आढळला वेस्टरनर्सच्या बाबतीत. म्हणजे डीग्री मिळाल्यानंतर एखाद वर्ष बॅकपॅकिंग करत फिरणे, मग चक्क इंग्रजी शिकवण्याच्या निमीत्ताने जपानात शिरकाव करणे, मग चक्क मोठ्या आय बँकेत ट्रेडर म्हणुन शिरणे. मध्येच दोन वर्ष पोरांकडे पाहण्यासाठी किंवा जग फिरण्यासाठी सॅबॅटिकल घेणे. कमाल आहे. हीच रिस्क टेकिंग मानसिकता कामात आपोआप प्रतीत होते.
ही जिगर आपल्या मराठी म.व.पणात सहसा बसत नाही. एकदा डिग्र्या मिळुन चिकटलो की पुढे पुढे वाहत जाणे. आपल्याकडे असली धरसोड केल्यास पोरगं वाया गेलं चा शिक्का बसतो. भारतात असले रेझ्युमे पहायला सुद्धा मिळत नाहीत, मराठी तर अपवादानेच. Happy

लोकांकडे दुर्लक्ष करणे हेच उत्तम खरोखर. स्वतः आयुष्यात एक तासही नोकरी न केलेल्या एका बाईने मला "कितना कमा लेती हो तुम" असं विचारलं होतं आणि वर "बस इतनाही ? असंही ऐकवलं होतं. आणि मी चक्क नर्व्हर्स झाले होते ते ऐकुन. (त्यावेळेला जपानात ४ तास दिवसाचे कम्युट करुन नोकरी करायचे, त्यामानाने खरंच पगार चांगला नव्हता. नंतर मेहनतीला यश आलं, दिवस पालटले वगैरे. ) पण त्यावर अमितनी माझं मोठ्ठं बौद्धिक घेतलं होतं की तू वेडपट आहेस का हे ऐकुन घ्यायला आणि डिप्रेस व्हायला म्हणून.

अजय धन्यवाद...

प्रसंग ५ मधल्या पाय-या खरेच करुन बघणार आहे. मला महिन्याला बॅंक, पगाराने बॅलॅंस होते याचाच खुप आधार वाटतो आणि त्या आधाराने मला अगदीच पांगळे करुन सोडले आहे. काहीही करायचे म्हटले तर लगेच मनात विचार - बॅंक इमबॅलॅंस तर होणार नाही ना???? Happy

अजय. सुंदर लेख आणि विचार.. मामी आणि प्रयोग, दोघांचेही पोस्ट उत्तम!!

मी काहीतरी करायला सुरूवात केलिये.. बघू या आता कितपत जमतय ते!!!

Pages