मी निराशवादी नाही. पण "इथून पुढे सगळं चांगलंच व्हणार म्हाराजा" असं म्हणण्याइतकी आशावादी सुध्दा नाही. ह्या उन्हसावलीच्या खेळात सुखाच्या सावलीपेक्षा उन्हाची रणरणच जास्त असते हे अनुभवाने पटलंय मला. स्वतःच्या अंगणभर सुखाची सावली शोधताना दिसलेले दुसर्याच्या अंगणातले हे उन्हाचे कवडसे.....
-----
संध्याकाळभर अभ्यास करून करून खूप दमले होते. मनात आलं कॅम्पसवर एक चक्कर टाकावी - पाय मोकळे होतील,थकवा निघून जाईल आणि तिथूनच डिनरला पण जाता येईल. बाहेरच्या कॉमनरूममध्ये पाहिलं तर माझी रूममेट कावेरी डोळे मिटून खुर्चीत बसली होती. समोरच्या टेबलावर तिने तिचा उजवा पाय ठेवला होता. "घुमने चलोगी?" मी देखल्या देवा दंडवत घातला. खरं तर कावेरी डॉर्ममधून लेक्चरहॉलपर्यंत जायची हेच तमाम प्रोफेसरांवर अनंत उपकार होते.
"नही रे, मेरा पैर बहोत दर्द कर रहा है." ती कण्हत म्हणाली. ३-४ दिवसांपूर्वी घसरून पडून तिचा पाय मुरगळला होता. मी जाऊन पाहिलं तर थोडी सूज दिसत होती.
"कावेरी, आर यू शुअर हेअरलाईन फ्रॅक्चर नही है?" मी काळजीच्या सुरात विचारलं.
"यार, मुझे भी ऐसाही लग रहा है. आज रात देखती हू नही तो कल हॉस्पिटल जाऊंगी".
"पागल है क्या? रातमे और बिगड गया तो? चल, अभी जाते है हॉस्पिटल"
"अरे अब ८ बजे है. अब कैसे जायेंगे?"
"तू तय्यार हो जा. १० मिनटमे निकलते है" मी अॅडमिनला फोन केला. कॉलेजची एका चांगल्या हॉस्पिटलबरोबर अॅरेन्जमेन्ट होती. त्यामुळे कावेरी तयार होईतो दाराशी अॅम्बुलन्स आली आणि ती पाहून जवळपास रेंगाळणारे क्लासमधले काही जण आले. "स्वप्ना, हममेसे कोई साथ चले क्या?" "मै मॅनेज कर लुंगी रे. आय विल कॉल यू इफ आय नीड हेल्प"
१५ मिनिटांत आम्ही हॉस्पिटलला पोचलो. खरं तर कावेरीला त्या रात्री इमर्जन्सी वॉर्डमध्ये का नेलं काय माहित. डॉक्टरांनी हेअरलाईन फ्रॅक्चरचंच निदान केलं. तिला खुर्चीत बसवून मी त्यांनी सांगितलेली औषधं घ्यायला हॉस्पिटलच्या फार्मसीत गेले. तिथे एव्ह्ढ्या रात्री पण क्यू होता. त्यामुळे परत येईतो चांगली १५ मिनिटं गेली.
"अरे यार, यहां पे भी क्यू, चल छोड अब तू...." मी एव्हढं म्हणते आहे तोवर समोर इतका वेळ असलेला पडदा एकदम बाजूला झाला. समोर स्ट्रेचरवर एक विशीतला लुंगी नेसलेला माणूस पडला होता. त्याच्या तोंडाजवळ फेस दिसत होता. एक डॉक्टर त्याला तपासत होता. आणि एक म्हातारी बाई कुठल्यातरी दाक्षिणात्य भाषेत हात जोडून जोडून दुसर्या डॉक्टरला काहीतरी सांगत होती, रडत होती, पुन्हा पुन्हा स्ट्रेचरवरच्या त्या मुलाकडे बघत होती. तो डॉक्टर पण तिला काहीतरी समजावत होता, मान हलवत होता. गोठल्यासारखी मी पहात राहिले.
कावेरीने माझा हात धरून ओढला. "वहां मत देख स्वप्ना. सुसाईड केस है. सिम्स हर सन हॅज कन्झुम्ड सम पेस्टीसाईड. नाऊ दे आर ट्राईंग टू सेव्ह हिम" एक नर्स लगबगीने आली आणि तिने आत जाताना तो पडदा बंद केला. "चल ना स्वप्ना, कॉलेज वापस चलते है".
त्याच अॅम्बुलन्सने आम्हाला परत आणून सोडलं. आम्ही रूमवर जेवण मागवलं होतं पण दोघी नीट जेवलो नाही. पुन्हा पुन्हा त्या आईचा चेहेरा माझ्या डोळ्यासमोर येत होता. आजवर हिंदी पिक्चरमध्ये कमी का हॉस्पिटल सीन्स पाहिलेत? मुलगा ऑपरेशन थिएटरमध्ये असताना शंकराच्या किंवा गणपतीच्या मूर्तीपुढे ओरडून सगळं हॉस्पिटल डोक्यावर घेणारी निरुपा रॉय पाहिली की मी खूप चेष्टा करायची. आता तिला कधी पाहिलं की मात्र मला त्या दिवशीच्या इमर्जन्सी वॉर्डमधली ती आई आठवते. तिच्या मुलाचं काय झालं मला कधीच कळणार नाही.
पण फक्त तिच्यासाठी त्याला डॉक्टर वाचवू शकले असू देत असं मी नेहमी मनाशी म्हणते.
-----
इंजिनियरिंगचं शेवटचं वर्ष. सगळ्यांचे जॉब्स पक्के होते. त्यामुळे उरलेले दिवस दंगामस्ती, धमाल. असाच एक दिवस आमचा ग्रूप नेहमीच्या जागी बसला होता. संध्याकाळी कुठे जायचं आणि विकेन्डला कुठे ट्रीप काढायची ह्याचे खमंग बेत चालले होते.
एव्हढ्यात क्लासमधला अरविंद आला. "हे अरविंद, आज बाकीके लेक्चर्स अटेन्ड नही करोंगे क्या?" "नही रे" अरविंद उतरलेल्या चेहेर्याने म्हणाला. "क्या हुआ?" "अरे, वो अपने क्लासका बिनीत है ना उसके पापा नही रहे. अभी हम लोग उसीके घर जा रहे है". अरविंद निघून गेला.
आम्ही सगळे गप्पच झालो एकदम. कसं असतं ना? आपले आई-बाबा अमरत्वाचा वर घेऊन आलेत असंच आपल्याला वाटत असतं. अशीही कधीतरी वेळ येईल जेव्हा ते आपल्यात नसतील हे आपल्याला मान्यच नसतं. कारण आत कुठेतरी आपल्याला ठाऊक असतं की जोवर ते आहेत तोवर आपलं बालपण आहे. ते गेले की आपल्याला मोठं व्हावंच लागतं. दुसरा पर्याय नसतो. आणि आज बिनीतचे बाबा गेले होते.
"हमे भी जाना चाहिये बिनीत के घर" ग्रूपमधला कोणी एक म्हणाला. "वो तो है, लेकिन...." त्याचं अर्धवट राहिलेलं वाक्य मनातल्या मनात सगळयांनी पूर्ण केलं होतं. नातेवाईकांतलं कोणी गेल्यावर आई-बाबांना सांत्वनासाठी जाताना सगळ्यांनीच पाहिलेलं पण आपल्याच एका मित्राच्या घरी त्यासाठी जायची वेळ एव्ह्ढ्यात आपल्याला येईल असं स्वप्नात देखील चुकून कधी वाटलं नव्हतं आम्हा कोणाला. आज ती वेळ आली होती. काय करायचं असतं तिथं जाऊन? काय बोलायचं असतं? हे असं कसं झालं म्हणून दु:खावरची न धरलेली खपली काढायची असते? का तिथे आलेल्या बा़कीच्या लोकांकडे बघत बसायचं असतं? का ज्या म्रृत्यूचा आपल्याला अर्थ लागला नाही त्याचा अर्थ आपल्या मित्राला समजावून सांगायचा असतो? का अर्थ नसलेली सांत्वनाची वाक्यं बोलायची असतात? ही वाक्यं तरी काय असतात? ती बोलल्याने काय होतं?
पण बिनीतसाठी आम्ही सगळे दुसर्या दिवशी संध्याकाळी त्याच्या घरी गेलो. आत बरीच मोठी माणसं बसली होती - त्याचे काका वगैरे. "मेरे कॉलेजके दोस्त" म्हणून त्याने ओळख करून दिली. आम्ही ५-६ मुलं-मुली बसलो. कोणीतरी पाणी आणून दिलं. बिनीतच्या चेहेर्याकडे पहावत नव्हतं. आम्ही एकमेकांच्या चेहेर्याकडे पहात कोणीतरी आधी सुरुवात करेल म्हणून वाट पहातो होतो. "ये कैसे हुआ" हा प्रश्न निदान आमच्यापैकी तरी कोणी विचारू नये असं आम्हाला वाटत होतं. ग्रूपमधल्या शशीने त्याच्या खांदयावर नुसता हात ठेवला.
एव्हढयात केस पांढरे झालेले एक आजोबा पचकले, हो पचकले असंच म्हणेन मी. कारण इतकी वर्षं होऊन पण त्यांच्यावरचा माझा राग गेलेला नाहीये. "ये सब कैसे हुआ बिनीत? पिछले महिने आया था तब तो बिनोद ठिकठाक ही था".
बिनीतने काय सांगितलं मला खरंच आठवत नाही कारण त्याच्या बोलण्याकडे माझं लक्षच नव्हतं. असला राग आला त्या माणसाचा. दुसरा प्रश्न नाही मिळाला त्या म्हातार्याला विचारायला? नाही मिळाला तर गप्प का नाही बसला? बिनीतच्या बाबांऐवजी ह्या थेरड्याला का नेलं नाही देवाने?
मग बिनीतचा हुंदकाच कानावर आला. आणि त्यामागोमाग आतल्या खोलीतून त्याच्या आईच्या रडण्याचा आवाज. सगळेच चमकलो. एखाद्याचं दु:ख एकदम अंगावर आलं की कसं बावचळून जायला होतं. सर्रकन अंगावर काटा आला. स्वतःच्याच ह्रदयाची धडधड इतकी स्पष्टपणे आधी कधीच ऐकली नव्हती. प्रचंड अवघडून गेल्यासारखं वाटलं. आणखी काही वेळ इथे थांबले तर श्वास अडकेल अशी भीती वाटायला लागली.
आणि मग एकदम स्वतःचाच खूप राग आला, खूप कीव आली. एक जॉब लागला तर आपण एकदम मोठे झालो अशी आपली समजूत किती अनाठायी होती हे कळलं क्षणार्धात. दुसर्याच्या दारात आलेल्या म्रृत्यूने मला मुळापासून हादरवलं होतं. माझ्या आपण आता मॅच्युअर्ड झालो आहोत ह्या समजुतीच्या इमल्याला सुरूंग लावला होता. आयुष्याच्या शाळेत आपण बिगरीपर्यंत पण पोचलेलो नाहिये हे दाखवलं होतं.
पण कॉलेजच्या शेवटच्या दिवसातल्या एका वळणावर मला कणभर का होईना पण मोठं केलं होतं.
-----
ही घटना आठवते तेव्हा कुठेतरी वाचलेला एक शेर आठवतो:
गमके चाहनेवाले कमही पाये जाते है
जबभी पाये जाते है हमही पाये जाते है
दिल्ली-आग्रा ट्रीपमध्ये मथुरा पण करायचं ठरलं. आई-बाबांनी आधी पाहिलं होतं, पण आता माझ्यासाठी परत येत होते. अर्थात माणसाने ठरवलेले बेत नियतीच्या मनात असेल तरच तडीस जातात हा अनुभव सगळ्यांचाच - आपण उगाचच "तकदीर" आणि "तदबीर" चा घोळ घालत बसतो.
मथुरेतल्या कुठल्यातरी प्रसिध्द मंदिराकडे - नाव आता आठ्वत नाही आणि नेटवर शोधायचा प्रयत्न केला नाही - आमची बस निघाली तेव्हा अंधार पडला होता. भुरूभुरू पावसाला पण सुरुवात झाली होती. एके ठिकाणी बस थांबवून टूर गाईडने जनमताचा कौल घ्यायचं ठरवलं. "हम हमेशा यहीपे बस रोकते है और यहांसे पैदल जाते है. आज हमारी बदकिस्मतीसे बारिश है. पहलेही बोल देता हू के बाहर बहोत किचडमेसे जाना पडेगा. लेकिन अगर कमसे कम ५-६ लोग जाने के लिये तय्यार है तो मै लेकर चलता हू. १० मिनिटमे सोचके बोलिये" आणि तो ड्रायव्हरच्या केबिनच्या दिशेने निघून गेला.
बसमध्ये कुजबूज सुरू झाली. श्रीक्रृष्ण हा माझा लाडका देव त्यामुळे आपण जायचंच हे मी ठरवलं. "तुम्ही येणार का? कारण तुम्ही आधी पाहिलंय ते मंदिर" मी आईला विचारलं.
"तुला एक सांगू? जाऊ नकोस."
"हे काय ग आई, परत आपण येणार आहोत का इथे? आणि ५-६ लोक तयार असतील तरच तो गाईड नेणार आहे. मी एकटी चाललीये का त्याच्याबरोबर? आणि चिखलाचं म्हणत असशील तर हॉटेलवर पोचले की आंघोळ करेन की"
"तसं नाहीये. मी आधी बघून आलेय ते मंदिर म्हणून म्हणतेय. तिथे गेल्यावर प्रसन्न वाटायच्या ऐवजी फार उदास वाटतं. आता कसं सांगू तुला? नवर्याने सोडून दिलेल्या, निराधार, विधवा अश्या खूप बायका आहेत तिथे. आपण त्या बायकांना काही मदत करू शकत नाही ह्याचा इतका त्रास होतो. मला त्या दिवशी रात्री झोप नाही आली. तू हे असं काही पाहू नयेस असं वाटतं म्हणून म्हणतेय"
"हं" मी खिडकीबाहेरच्या पावसाकडे पहात म्हटलं. आईने केलेल्या वर्णनाने माझा अर्धा उत्साह नाही म्हटलं तरी निघून गेला होता. असं म्हणतात की देव माणसाला त्याला झेपेल एव्हढंच दु:ख देतो कारण प्रत्येकाच्या सहनशक्तीचा त्याला अंदाज असतो. आता खरं खोटं त्यालाच माहित. अंदाज नसतो तो आपला आपल्याला. स्वतःच्या आयुष्याने पदरात टाकलेलं आणि दुसर्याच्या ओंजळीत पडताना पाहिलेलं किती दु:ख पचवायची ताकत आपल्यात आहे ह्याचा पुरेपुर नाही तरी बराचसा अंदाज आयुष्याने पुढे मला दिला. पण तेव्हा तो मला नव्हता. उगाच कष्टी का व्हा असं म्हणून मी कच खाल्ली, माघार घेतली.
टूर गाईड परत आला तेव्हा कोणीच बाहेर पडायला तयार नव्हतं. बस मुक्कामाच्या ठिकाणी परत निघाली. अंधारात बघून मी देवाला हात जोडले. त्याचं दर्शन झालं नाही ह्याचं तेव्हाही मला वाईट वाटलं नाही आणि आजही वाटत नाहीये. कारण देवाला पहायला देवळातच जावं लागतं असं मला कधीच वाटलेलं नाही.
पण पुढल्या वळणावर दु:ख दबा धरून बसलंय म्हणून मी तेव्हा वाट बदलली हे चूक केलं का बरोबर हे अजून मला माहित नाही. 
-----
कभी कोशिशभी मत करना इन गिले पन्नोंको सुखानेकी
बस यही तो एक सबूत है मेरे पास
के जिंदगीने इक हसीके बदले
हमेशा सौ आसू रुलाये है
-----
ह्याआधीची पानं:
खरे जाऊ नयेच मनावर सावट येते.
खरे जाऊ नयेच मनावर सावट येते. मला एकेका मंदिराची/ चर्च ची देखील व्हाइब लगेच येते. काही काही मंदिरे नुसती व्हायब्रेट होत असतात सकारात्मक ऊर्जेने. काही ठिकाणी उभे राहावेसे ही वाट्त नाही. परवा बालराजेश्वर मुलुन्ड इथे गेले होते. तिथे इतकी साधी कुत्री आरामात बसली झोपली होती की मला अगदी मजा वाट्ली.
आमच्या ऑफिस च्या जवळ एक दोन देवी असलेले देऊळ आहे. अगदी दोन मोठ्या बहिणींना भेटून आल्यासारखे वाट्ते तिथे.
स्वप्ना, फारचं तरलं आणि हळवे
स्वप्ना, फारचं तरलं आणि हळवे आहेत तुझ्या आयुष्यातील हे अनुभव. कितीतती वाक्य वाचतावाचताचं डोळ्यात पाणी टचटचते.
योगमहे, बी धन्यवाद
योगमहे, बी धन्यवाद
अश्निनीमामी, अनुमोदन १००%
अगदी मनातलच लिहिलं आहेस. पण
अगदी मनातलच लिहिलं आहेस.
पण पुढल्या वळणावर दु:ख दबा धरून बसलंय म्हणून मी तेव्हा वाट बदलली हे चूक केलं का बरोबर हे अजून मला माहित नाही. >>> टिपून घेतले हे वाक्य.
धन्यवाद माधव!
धन्यवाद माधव!
ह्म्म्म्म
ह्म्म्म्म
पानांमागून पानं वाचतेय...
पानांमागून पानं वाचतेय... आयुष्याचीच पानं वाचल्यासारखी वाटताहेत... छोटी छोटी उदाहरणं... आयुष्याच्या अडथळ्यांच्या स्पर्धेत धावताना मध्येच आडवी येणारी... आणि ती सहजपणे ओलांडून आपला कल पुढच्या अडथळ्याला पार करण्याकडे असतो.. कारण आपलं लक्ष आपल्या अंतीम लक्ष्याकडे असतं...
आवडलं... मुख्य म्हणजे बर्याच ठिकाणी पटलंही... कारण प्रत्येक आवडलेलं पटतंच असं काही नाही...
बरं आता सगळंच पटलं असं म्हणाले नाही कारण... बिनीतच्या बाबांऐवजी ह्या थेरड्याला का नेलं नाही देवाने?>> नकळत या वाक्यापाशी अडखळले... माहीत नाही पण आत्तापर्यंतचं लेखन संवेदनाशील आहे... हेच वाक्य तेवढं अतिसंवेदनाशील का बरं... मान्य आहे त्या वेळी हा संवाद पूर्णपणे चूकीचा होता... १००% त्या आजोबांची चूक! कदाचित तुमच्या आधीच्या भावूक लिखाणामुळे तुमच्यामधील सर्वसामान्य अतिसंवेदनाशील (जी पटकन रिअॅक्ट होऊ शकते) व्यक्ती दुर्लक्षित झाली... आणि त्यावेळच्या तरूण उतावीळ जोशपूर्ण वयाला अनुसरून निघालेली उस्फूर्त प्रतिक्रिया असावी ती...
तरीही...असो... काये कधी कधी आपण एखाद्याचं चित्र रंगवतो आपल्या मनाच्या कॅनव्हासवर... आणि मग आपल्या मतांच्या फ्रेममध्ये बसवू पाहतो... जरासा कोपरा बाहेर येतोय असं दिसलं की अस्वस्थ होतो... माझंही असंच काहीसं झालं असावं... असो...
बा.द. वे... मी ही स्वप्ना...
पन्नोवाल्या स्वप्नाची फॅन! 
पु.ले.शु.
dreamgirl, अगदी बरोबर बोललात.
dreamgirl, अगदी बरोबर बोललात. मला आणखीही एक प्रतिक्रिया आली होती ह्याच वाक्यावर तुमच्यासारखीच. त्यांनाही मी हेच म्हटलं की तेव्हाच्या वयाला अनुसरून जी प्रतिक्रिया झाली होती ती मी फिल्टर न करता तशीच्या तशी दिली. वाढत्या वयाने जे थोडंफार शहाणपण आलंय त्यात ती बसत नसली तरीही. कारण तो अनुभव त्या वेळचा होता.
असो. आवर्जून प्रतिसाद दिलात त्याबद्दल धन्स
माबोच्या शब्दात सांगायचं तर रिक्षा फिरवते आहे हा आरोप मान्य करून म्हणेन की माझं ह्यापुढचं लिखाण वाचलंत तर ४-५ शब्दांचा का होईना - चांगला/वाईट - प्रतिसाद नक्की द्या. त्याशिवाय लिहिलेलं कोणी वाचतंय की नाही हे समजत नाही. 
निव्वळ अप्रतिम...
निव्वळ अप्रतिम...
आसपास नेहेमी घडणार्या गोष्टी
आसपास नेहेमी घडणार्या गोष्टी छान टिपतेस व छान मांडतेस.
ड्रीमगर्लने काय नेमका प्रतिसाद दिलाय ! ग्रेटच ! त्यावरची तुझीही प्रतिक्रिया मॅच्युअर्ड, दोघींना धन्यवाद...
मग बिनीतचा हुंदकाच कानावर
मग बिनीतचा हुंदकाच कानावर आला. आणि त्यामागोमाग आतल्या खोलीतून त्याच्या आईच्या रडण्याचा आवाज. <<< कधी कधी असे वाटते की अशा प्रसंगी असे कोसळणारे रडू दु:खाचा निचरा व्हायला मदत करते. त्यामुळे त्या गृहस्थांचे वागणे त्यावेळी योग्य वाटले नसेल पण अगदीच चुकले असेही मला वाटत नाही. (कदाचित भावनांना वाट मिळावी म्हणून मुद्दामही त्यांनी तसे विचारले असावे.)
स्वप्ना, हा भागही आवडला.
लेखन आवडले सगळी पान वाचुन
लेखन आवडले सगळी पान वाचुन काढ्ली.
khupch chhan
khupch chhan
Pages