ये कुछ आधे अधुरे पन्ने है - पन्ना 5

Submitted by स्वप्ना_राज on 5 February, 2010 - 01:49

मी निराशवादी नाही. पण "इथून पुढे सगळं चांगलंच व्हणार म्हाराजा" असं म्हणण्याइतकी आशावादी सुध्दा नाही. ह्या उन्हसावलीच्या खेळात सुखाच्या सावलीपेक्षा उन्हाची रणरणच जास्त असते हे अनुभवाने पटलंय मला. स्वतःच्या अंगणभर सुखाची सावली शोधताना दिसलेले दुसर्‍याच्या अंगणातले हे उन्हाचे कवडसे.....

-----

संध्याकाळभर अभ्यास करून करून खूप दमले होते. मनात आलं कॅम्पसवर एक चक्कर टाकावी - पाय मोकळे होतील,थकवा निघून जाईल आणि तिथूनच डिनरला पण जाता येईल. बाहेरच्या कॉमनरूममध्ये पाहिलं तर माझी रूममेट कावेरी डोळे मिटून खुर्चीत बसली होती. समोरच्या टेबलावर तिने तिचा उजवा पाय ठेवला होता. "घुमने चलोगी?" मी देखल्या देवा दंडवत घातला. खरं तर कावेरी डॉर्ममधून लेक्चरहॉलपर्यंत जायची हेच तमाम प्रोफेसरांवर अनंत उपकार होते. Happy

"नही रे, मेरा पैर बहोत दर्द कर रहा है." ती कण्हत म्हणाली. ३-४ दिवसांपूर्वी घसरून पडून तिचा पाय मुरगळला होता. मी जाऊन पाहिलं तर थोडी सूज दिसत होती.

"कावेरी, आर यू शुअर हेअरलाईन फ्रॅक्चर नही है?" मी काळजीच्या सुरात विचारलं.

"यार, मुझे भी ऐसाही लग रहा है. आज रात देखती हू नही तो कल हॉस्पिटल जाऊंगी".

"पागल है क्या? रातमे और बिगड गया तो? चल, अभी जाते है हॉस्पिटल"

"अरे अब ८ बजे है. अब कैसे जायेंगे?"

"तू तय्यार हो जा. १० मिनटमे निकलते है" मी अ‍ॅडमिनला फोन केला. कॉलेजची एका चांगल्या हॉस्पिटलबरोबर अ‍ॅरेन्जमेन्ट होती. त्यामुळे कावेरी तयार होईतो दाराशी अ‍ॅम्बुलन्स आली आणि ती पाहून जवळपास रेंगाळणारे क्लासमधले काही जण आले. "स्वप्ना, हममेसे कोई साथ चले क्या?" "मै मॅनेज कर लुंगी रे. आय विल कॉल यू इफ आय नीड हेल्प"

१५ मिनिटांत आम्ही हॉस्पिटलला पोचलो. खरं तर कावेरीला त्या रात्री इमर्जन्सी वॉर्डमध्ये का नेलं काय माहित. डॉक्टरांनी हेअरलाईन फ्रॅक्चरचंच निदान केलं. तिला खुर्चीत बसवून मी त्यांनी सांगितलेली औषधं घ्यायला हॉस्पिटलच्या फार्मसीत गेले. तिथे एव्ह्ढ्या रात्री पण क्यू होता. त्यामुळे परत येईतो चांगली १५ मिनिटं गेली.

"अरे यार, यहां पे भी क्यू, चल छोड अब तू...." मी एव्हढं म्हणते आहे तोवर समोर इतका वेळ असलेला पडदा एकदम बाजूला झाला. समोर स्ट्रेचरवर एक विशीतला लुंगी नेसलेला माणूस पडला होता. त्याच्या तोंडाजवळ फेस दिसत होता. एक डॉक्टर त्याला तपासत होता. आणि एक म्हातारी बाई कुठल्यातरी दाक्षिणात्य भाषेत हात जोडून जोडून दुसर्‍या डॉक्टरला काहीतरी सांगत होती, रडत होती, पुन्हा पुन्हा स्ट्रेचरवरच्या त्या मुलाकडे बघत होती. तो डॉक्टर पण तिला काहीतरी समजावत होता, मान हलवत होता. गोठल्यासारखी मी पहात राहिले.

कावेरीने माझा हात धरून ओढला. "वहां मत देख स्वप्ना. सुसाईड केस है. सिम्स हर सन हॅज कन्झुम्ड सम पेस्टीसाईड. नाऊ दे आर ट्राईंग टू सेव्ह हिम" एक नर्स लगबगीने आली आणि तिने आत जाताना तो पडदा बंद केला. "चल ना स्वप्ना, कॉलेज वापस चलते है".

त्याच अ‍ॅम्बुलन्सने आम्हाला परत आणून सोडलं. आम्ही रूमवर जेवण मागवलं होतं पण दोघी नीट जेवलो नाही. पुन्हा पुन्हा त्या आईचा चेहेरा माझ्या डोळ्यासमोर येत होता. आजवर हिंदी पिक्चरमध्ये कमी का हॉस्पिटल सीन्स पाहिलेत? मुलगा ऑपरेशन थिएटरमध्ये असताना शंकराच्या किंवा गणपतीच्या मूर्तीपुढे ओरडून सगळं हॉस्पिटल डोक्यावर घेणारी निरुपा रॉय पाहिली की मी खूप चेष्टा करायची. आता तिला कधी पाहिलं की मात्र मला त्या दिवशीच्या इमर्जन्सी वॉर्डमधली ती आई आठवते. तिच्या मुलाचं काय झालं मला कधीच कळणार नाही.

पण फक्त तिच्यासाठी त्याला डॉक्टर वाचवू शकले असू देत असं मी नेहमी मनाशी म्हणते.

-----

इंजिनियरिंगचं शेवटचं वर्ष. सगळ्यांचे जॉब्स पक्के होते. त्यामुळे उरलेले दिवस दंगामस्ती, धमाल. असाच एक दिवस आमचा ग्रूप नेहमीच्या जागी बसला होता. संध्याकाळी कुठे जायचं आणि विकेन्डला कुठे ट्रीप काढायची ह्याचे खमंग बेत चालले होते.

एव्हढ्यात क्लासमधला अरविंद आला. "हे अरविंद, आज बाकीके लेक्चर्स अटेन्ड नही करोंगे क्या?" "नही रे" अरविंद उतरलेल्या चेहेर्‍याने म्हणाला. "क्या हुआ?" "अरे, वो अपने क्लासका बिनीत है ना उसके पापा नही रहे. अभी हम लोग उसीके घर जा रहे है". अरविंद निघून गेला.

आम्ही सगळे गप्पच झालो एकदम. कसं असतं ना? आपले आई-बाबा अमरत्वाचा वर घेऊन आलेत असंच आपल्याला वाटत असतं. अशीही कधीतरी वेळ येईल जेव्हा ते आपल्यात नसतील हे आपल्याला मान्यच नसतं. कारण आत कुठेतरी आपल्याला ठाऊक असतं की जोवर ते आहेत तोवर आपलं बालपण आहे. ते गेले की आपल्याला मोठं व्हावंच लागतं. दुसरा पर्याय नसतो. आणि आज बिनीतचे बाबा गेले होते.

"हमे भी जाना चाहिये बिनीत के घर" ग्रूपमधला कोणी एक म्हणाला. "वो तो है, लेकिन...." त्याचं अर्धवट राहिलेलं वाक्य मनातल्या मनात सगळयांनी पूर्ण केलं होतं. नातेवाईकांतलं कोणी गेल्यावर आई-बाबांना सांत्वनासाठी जाताना सगळ्यांनीच पाहिलेलं पण आपल्याच एका मित्राच्या घरी त्यासाठी जायची वेळ एव्ह्ढ्यात आपल्याला येईल असं स्वप्नात देखील चुकून कधी वाटलं नव्हतं आम्हा कोणाला. आज ती वेळ आली होती. काय करायचं असतं तिथं जाऊन? काय बोलायचं असतं? हे असं कसं झालं म्हणून दु:खावरची न धरलेली खपली काढायची असते? का तिथे आलेल्या बा़कीच्या लोकांकडे बघत बसायचं असतं? का ज्या म्रृत्यूचा आपल्याला अर्थ लागला नाही त्याचा अर्थ आपल्या मित्राला समजावून सांगायचा असतो? का अर्थ नसलेली सांत्वनाची वाक्यं बोलायची असतात? ही वाक्यं तरी काय असतात? ती बोलल्याने काय होतं?

पण बिनीतसाठी आम्ही सगळे दुसर्‍या दिवशी संध्याकाळी त्याच्या घरी गेलो. आत बरीच मोठी माणसं बसली होती - त्याचे काका वगैरे. "मेरे कॉलेजके दोस्त" म्हणून त्याने ओळख करून दिली. आम्ही ५-६ मुलं-मुली बसलो. कोणीतरी पाणी आणून दिलं. बिनीतच्या चेहेर्‍याकडे पहावत नव्हतं. आम्ही एकमेकांच्या चेहेर्‍याकडे पहात कोणीतरी आधी सुरुवात करेल म्हणून वाट पहातो होतो. "ये कैसे हुआ" हा प्रश्न निदान आमच्यापैकी तरी कोणी विचारू नये असं आम्हाला वाटत होतं. ग्रूपमधल्या शशीने त्याच्या खांदयावर नुसता हात ठेवला.

एव्हढयात केस पांढरे झालेले एक आजोबा पचकले, हो पचकले असंच म्हणेन मी. कारण इतकी वर्षं होऊन पण त्यांच्यावरचा माझा राग गेलेला नाहीये. "ये सब कैसे हुआ बिनीत? पिछले महिने आया था तब तो बिनोद ठिकठाक ही था".

बिनीतने काय सांगितलं मला खरंच आठवत नाही कारण त्याच्या बोलण्याकडे माझं लक्षच नव्हतं. असला राग आला त्या माणसाचा. दुसरा प्रश्न नाही मिळाला त्या म्हातार्‍याला विचारायला? नाही मिळाला तर गप्प का नाही बसला? बिनीतच्या बाबांऐवजी ह्या थेरड्याला का नेलं नाही देवाने?

मग बिनीतचा हुंदकाच कानावर आला. आणि त्यामागोमाग आतल्या खोलीतून त्याच्या आईच्या रडण्याचा आवाज. सगळेच चमकलो. एखाद्याचं दु:ख एकदम अंगावर आलं की कसं बावचळून जायला होतं. सर्रकन अंगावर काटा आला. स्वतःच्याच ह्रदयाची धडधड इतकी स्पष्टपणे आधी कधीच ऐकली नव्हती. प्रचंड अवघडून गेल्यासारखं वाटलं. आणखी काही वेळ इथे थांबले तर श्वास अडकेल अशी भीती वाटायला लागली.

आणि मग एकदम स्वतःचाच खूप राग आला, खूप कीव आली. एक जॉब लागला तर आपण एकदम मोठे झालो अशी आपली समजूत किती अनाठायी होती हे कळलं क्षणार्धात. दुसर्‍याच्या दारात आलेल्या म्रृत्यूने मला मुळापासून हादरवलं होतं. माझ्या आपण आता मॅच्युअर्ड झालो आहोत ह्या समजुतीच्या इमल्याला सुरूंग लावला होता. आयुष्याच्या शाळेत आपण बिगरीपर्यंत पण पोचलेलो नाहिये हे दाखवलं होतं.

पण कॉलेजच्या शेवटच्या दिवसातल्या एका वळणावर मला कणभर का होईना पण मोठं केलं होतं.

-----

ही घटना आठवते तेव्हा कुठेतरी वाचलेला एक शेर आठवतो:

गमके चाहनेवाले कमही पाये जाते है
जबभी पाये जाते है हमही पाये जाते है

दिल्ली-आग्रा ट्रीपमध्ये मथुरा पण करायचं ठरलं. आई-बाबांनी आधी पाहिलं होतं, पण आता माझ्यासाठी परत येत होते. अर्थात माणसाने ठरवलेले बेत नियतीच्या मनात असेल तरच तडीस जातात हा अनुभव सगळ्यांचाच - आपण उगाचच "तकदीर" आणि "तदबीर" चा घोळ घालत बसतो.

मथुरेतल्या कुठल्यातरी प्रसिध्द मंदिराकडे - नाव आता आठ्वत नाही आणि नेटवर शोधायचा प्रयत्न केला नाही - आमची बस निघाली तेव्हा अंधार पडला होता. भुरूभुरू पावसाला पण सुरुवात झाली होती. एके ठिकाणी बस थांबवून टूर गाईडने जनमताचा कौल घ्यायचं ठरवलं. "हम हमेशा यहीपे बस रोकते है और यहांसे पैदल जाते है. आज हमारी बदकिस्मतीसे बारिश है. पहलेही बोल देता हू के बाहर बहोत किचडमेसे जाना पडेगा. लेकिन अगर कमसे कम ५-६ लोग जाने के लिये तय्यार है तो मै लेकर चलता हू. १० मिनिटमे सोचके बोलिये" आणि तो ड्रायव्हरच्या केबिनच्या दिशेने निघून गेला.

बसमध्ये कुजबूज सुरू झाली. श्रीक्रृष्ण हा माझा लाडका देव त्यामुळे आपण जायचंच हे मी ठरवलं. "तुम्ही येणार का? कारण तुम्ही आधी पाहिलंय ते मंदिर" मी आईला विचारलं.

"तुला एक सांगू? जाऊ नकोस."

"हे काय ग आई, परत आपण येणार आहोत का इथे? आणि ५-६ लोक तयार असतील तरच तो गाईड नेणार आहे. मी एकटी चाललीये का त्याच्याबरोबर? आणि चिखलाचं म्हणत असशील तर हॉटेलवर पोचले की आंघोळ करेन की"

"तसं नाहीये. मी आधी बघून आलेय ते मंदिर म्हणून म्हणतेय. तिथे गेल्यावर प्रसन्न वाटायच्या ऐवजी फार उदास वाटतं. आता कसं सांगू तुला? नवर्‍याने सोडून दिलेल्या, निराधार, विधवा अश्या खूप बायका आहेत तिथे. आपण त्या बायकांना काही मदत करू शकत नाही ह्याचा इतका त्रास होतो. मला त्या दिवशी रात्री झोप नाही आली. तू हे असं काही पाहू नयेस असं वाटतं म्हणून म्हणतेय"

"हं" मी खिडकीबाहेरच्या पावसाकडे पहात म्हटलं. आईने केलेल्या वर्णनाने माझा अर्धा उत्साह नाही म्हटलं तरी निघून गेला होता. असं म्हणतात की देव माणसाला त्याला झेपेल एव्हढंच दु:ख देतो कारण प्रत्येकाच्या सहनशक्तीचा त्याला अंदाज असतो. आता खरं खोटं त्यालाच माहित. अंदाज नसतो तो आपला आपल्याला. स्वतःच्या आयुष्याने पदरात टाकलेलं आणि दुसर्‍याच्या ओंजळीत पडताना पाहिलेलं किती दु:ख पचवायची ताकत आपल्यात आहे ह्याचा पुरेपुर नाही तरी बराचसा अंदाज आयुष्याने पुढे मला दिला. पण तेव्हा तो मला नव्हता. उगाच कष्टी का व्हा असं म्हणून मी कच खाल्ली, माघार घेतली.

टूर गाईड परत आला तेव्हा कोणीच बाहेर पडायला तयार नव्हतं. बस मुक्कामाच्या ठिकाणी परत निघाली. अंधारात बघून मी देवाला हात जोडले. त्याचं दर्शन झालं नाही ह्याचं तेव्हाही मला वाईट वाटलं नाही आणि आजही वाटत नाहीये. कारण देवाला पहायला देवळातच जावं लागतं असं मला कधीच वाटलेलं नाही.

पण पुढल्या वळणावर दु:ख दबा धरून बसलंय म्हणून मी तेव्हा वाट बदलली हे चूक केलं का बरोबर हे अजून मला माहित नाही. Sad

-----

कभी कोशिशभी मत करना इन गिले पन्नोंको सुखानेकी
बस यही तो एक सबूत है मेरे पास
के जिंदगीने इक हसीके बदले
हमेशा सौ आसू रुलाये है

-----

ह्याआधीची पानं:

पन्ना १

पन्ना २

पन्ना ३

पन्ना ४

गुलमोहर: 

किती मस्त लिहितेस ग. असेच काहीसे अनुभव आम्हां सगळ्यांनाच कधी ना कधी आलेत, त्यामुळे या लिखाणाशी जास्त रिलेट करू शकतो आम्ही.

सुरेख लिहित आहेस. Happy
असेच काहीसे अनुभव आम्हां सगळ्यांनाच कधी ना कधी आलेत>>>>.
सहमत आहे प्राची.

स्वप्ना... खरंच खूप छान लिहितेस तु!
हिच का ती मालिकांवर लिहिणारी असा प्रश्न पडतो मग >>
दीपूर्झा... सहमत Happy

प्राची, दीपूर्झा, साधना, झकासराव, मंजिरी, आऊटडोअर्स - वेळ काढून वाचल्याबद्दल आणि प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद Happy त्यामुळेच अजून लिहिण्याचं धाडस होतंय Wink

छान लिहिले आहे.मी कॉलेजमधे असताना आमचा एक क्लासमेट अचानक हार्ट फेल ने गेला होता.तेव्हा पण खूप धक्का बसला होता..विशीचा होता तो तेव्हा...

>>अपने क्लासका बिनीत है ना उसके पापा नही रहे
अशाच काहिशा प्रसंगातून मी पण गेलो आहे. पण त्या मित्राची अवस्था बिनीतच्या अगदी उलटी होती.
त्याचे कुणी नातेवाईक यायचे होते अजून म्हणून मृतदेह ठेवला होता. रात्री ९ च्या सुमारास कळले,
आणि तसेच जेवण सोडून उठलो. सगळे जणं मिळून पोचलो तेव्हा १० वाजले होते. मित्र कसा असेल,
काय करत असेल, याचे तर्क/अंदाज बांधत पोचलो. किलकिल्या दारावर हलकेच टकटक केली.
कुणीतरी दार उघडले. ओळख सांगितल्यावर, मित्र आला. चेहेर्‍यावर शांतता होती. आम्ही दर्शन घेतले
बाहेरच्या खोलीत थांबलो. तो बोलत होता पण शांत होता. आम्हीच कसनुसे झालो होतो.
"आता बाबा नसण्याची सवय करायला हवी. मार्केट यार्डात जाणे, वर्षाची खरेदी. आईला सांभाळायला हवं"
"असं कसं झालं पण? " नको वाटत असताना एकाने विचारलंच. आता हा रडेल की काय अशी पुसटशी शंका मला आली.
"बाबांनी माझा शर्ट घातला की त्यांना काहितरी होतंच. तसंच झालं आत्ता. मला माहिती नव्हतं
की ते माझा शर्ट घालून कामावर गेले होते. नाहीतर मी घालू देत नाही त्यांना" शांतपणे मित्र उत्तरला.
"अरे काहितरीच काय विचार करतोस ? "
"नाही असं आधीपण दोनदा झालं होतं, थोडक्यात निभावलं तेव्हा."
आम्ही गप्प ......... काय बोलावं सुचेना. शेवटी धीर करून एकाने विचारलं.
"आई कशी आहे?"
"आई पूर्णपणे कोलमडली आहे. तिला सावरायला महिने तरी लागतील. पण सावरेल ती. मी आहे ना."
..... परत भयाण शांतता. आत बाहेर करणारी घरातली मंडळी जो आवाज करत होती तेवढाच फक्त.
"जेवलात का?" - मित्र.

आम्ही सगळेजण आता काय बोलू या विवंचनेत अन् हा पूर्णपणे शांत. सगळ्यांच्या उलटं ह्याचं. खूप काही शिकवून गेला तो तेवढ्या छोट्या प्रसंगात.

तू वरती लिहीलेलं वाचून हेच आठवलं. छान लिहीतेस.

>>अपने क्लासका बिनीत है ना उसके पापा नही रह>><<
ह्या भागाने जरा अस्वस्थ झाले. अशीच गोष्ट आठवली. अगदी सेम अवस्था झालेली मी. मी १४-१५ वर्षाची असताना मैत्रीणीचे वडील गेले तेव्हा. काय करावे,काय बोलावे काहीच कळत नसताना मी घरी गेले तिच्या. मला बघताच जोरात धावत येवून तिने मला मिठी मारली. पुढचे काही कळायच्या आतच माझे हात मी पुढे केलेले व जशी मिठी मारली तिने मला ,आम्ही दोघीनी एकदम टाहो फोडला. मलाच माझे कळले नाही की हे कसे काय झाले. खूप बिथरले/घाबरले होते मी. आदल्याच दिवशी तिच्या वडिलांच्या हातचे जेवण आम्ही मित्र-मैत्रेणी आग्रहाने जेवलो होतो, त्यावेळी त्यानी म्हटले होते , अरे बेटा खावो खावो.. कल किसे पता की मै ये खिला पाउगां....
असो.
ते असे असते ना.. आपण एकदम आई-वडिलांच्या सुरक्षित अश्या आवरणात जगत असतो म्हणा की आपल्याला ह्या गोष्टी शिवत नाहीत कधी तोवर आणि मग एक दिवस अचानक धक्का बसतो तेव्हा खूप घाबरते मन...

छान लिह्तेस स्वप्ना... शोधून वाचले आधीचे भाग जे पाहिले न्हवते. कुठेतरी अगदी तुझ्यासारखेच विचार आपल्याही डोक्यात आलेले काही गोष्टींवर बघून विस्मय झाला. Happy

स्वप्ना,मनाला भिडणारं लिहिलयस एकदम..

अपने क्लासका बिनीत है ना उसके पापा नही रहे...>>>>>माझ्या कॉलेजमधल्या मित्राचा सख्खा भाऊ वारला होता अचानक, तेव्हा आम्ही त्याच्या घरी गेलो होतो तेव्हाची आमची आणि त्याच्या घरच्यांची अवस्था डोळ्यासमोर आली एकदम.. त्याच्या घरचे पूर्ण कोलमडुन गेले होते आणि आमच्याकडे सांत्वनासाठी शब्दच नव्हते... एक दिड तास सगळे नुसते गप्प बसुन होतो.. शेवटी फक्त `आईबाबांची काळजी घे आणि स्वतःला सांभाळ रे ' एवढच बोलुन बाहेर पडलो.. Sad

अनिलभाई, चिनूक्स, अमृता, sneha1, स्वाती_आंबोळे, नंद्या, बस्के, मनःस्विनी, सायो, मयूरेश - तुम्हा सगळ्यांना धन्यवाद Happy

नंद्या, तुमचा अनुभव शेअर केल्याबद्दल खरंच धन्यवाद! तुमचा मित्र ग्रेट म्हणायला हवा. असल्या दु:खातून सावरणं महाकठिण. Sad

मनःस्विनी, तुमचाही अनुभव शेअर केल्याबद्दल धन्यवाद! वाचून कसंतरीच झालं. वास्तुपुरुष तथास्तु म्हणतो असं माझी आजी म्हणायची ते खरं असतं की काय असं वाटू लागलं आहे. Sad मी आधी एका लेखात म्हटलं होतं त्याप्रमाणे माझ्या आयुष्यात आलेले हे अनुभव युनिक अजिबात नाहीत. आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधी आलेले. पण ते शेअर करावेत आणि दुसर्‍या कोणाच्या अनुभवातून शिकायला मिळावं एव्हढाच ह्या लिखाणामागचा हेतू.

मयूरेश, खरं आहे. अश्या प्रसंगी काय बोलायचं असतं हे मला अजूनही ठाऊक नाही Sad

सायो, मी हे लेख वेळ मिळेल तसे पूर्ण करते त्यामुळे कधीकधी सुरुवात केल्यापासून ते संपेपर्यत एक-दोन आठवडे पण होतात. पण होतं काय की जेव्हा प्रकाशित करते तेव्हा सुरुवात केल्याचीच तारीख येते. तोपर्यत मध्ये अनेक लेख लिहिले गेलेले असतात आणि त्यामुळे यादीत कदाचित हे लेख मागे रहात असतील आणि लक्ष जात नसेल. मला हे कळलं म्हणून मी आता ड्राफ्ट लिखाण दुसर्‍या ठिकाणी कॉपी करून प्रकाशित करते आणि मग ड्राफ्ट डिलिट करते.

स्वप्ना, अतिशय अतिशय सुंदर लिहिते आहेस. लिहितेयस म्हणण्यापेक्षा, सांगतेयस म्हणणं अधिक योग्य... इतकं समोर बसून बोलल्यासारखं... ओघवतं आहे.
ही डायरीही नाही आणि आठवणींचा निव्वळ गंधही नाही.... काही झाडं ठरवून, अन काही अशीच... म्हणून लावलेली बाग फुलल्यावर कसं वाटतं तसं वाटतय...
(इतके दिवस वाचलं नव्हतं... कसं चुकलं माहीत नाही... आता नाही चुकवणार)

सुन्दर. स्वप्ना तू खरेच लिहिणे सीरीअसली घे. कामाच्या गड्बडीत अंतरीच्या ऊर्मी हरवून जातात नाहीतर.
The Temple must be Vrindavan where all the forgotten and unwanted widows of rural India are sent. It is one of the worst human rights violations situation. Rather than ignoring, one must fight to save their lot and improve their quality of life.

Personally speaking, I am all done with death and negativity and widowhood the whole package.
This year is about resurgence and rediscovering one's happy self, good health and being positive. One must not let these feelings affects one's inner growth once the grieving is over.

रेशिम, मंजुडी, अश्विनीमामी धन्यवाद Happy

>>स्वप्ना तू खरेच लिहिणे सीरीअसली घे

म्हणून तर इथे लिहिते आहे Happy

मामी, मला वाटतं ते बांके बिहारीचं मंदिर होतं. आता अर्थात ह्या गोष्टीला खूप वर्ष झाली त्यामुळे नीट आठवत नाहीये. खरं सांगायचं तर अजूनही कधी मथुरेला गेलेच तर हया मंदिरात जायची हिंमत होईल असं वाटत नाही. Sad नक्की कशी मदत करायची तेच कळत नाही आणि मग वाटायला लागतं की आकाश फाटलंय तर आपण तरी कुठेकुठे म्हणून ठिगळ लावणार Sad दुर्गा आणि कालीची पूजा करणारा आपला देश स्त्रियांना असं वागवतो हा केवढा विरोधाभास आहे!

देव माणसाला त्याला झेपेल एव्हढंच दु:ख देतो कारण प्रत्येकाच्या सहनशक्तीचा त्याला अंदाज असतो. आता खरं खोटं त्यालाच माहित. अंदाज नसतो तो आपला आपल्याला. स्वतःच्या आयुष्याने पदरात टाकलेलं आणि दुसर्‍याच्या ओंजळीत पडताना पाहिलेलं किती दु:ख पचवायची ताकत आपल्यात आहे ह्याचा पुरेपुर नाही तरी बराचसा अंदाज
>>
आवडलं आणि पटलंही..

Pages