उखाणे - मायबोली इश्टाईल !

Submitted by राफा on 29 February, 2008 - 05:17

१.
अमुकरावांच्या संसारात फार रहावे लागते दक्ष
आमच्या मियांचे असते भलत्याच ‘बीबी’वर लक्ष

२.
लग्नाच्या पंगतीतच अमुकरावाना दिला चेकमेट
नाव घेताना म्हटलं, खरं घेऊ.. का डुप्लिकेट ?

३.
संसाराच्या ‘काहीच्या काही कविते’चं
तेव्हा मला कळलं गमक
बाहेर ‘मुक्तछंद’ चालू झाले ह्यांचे
जेव्हा घरी जुळेना यमक !

४.
अमुकरावाना झालीये भूतबाधा
त्यातून कधी बरे होतील काय ?
भांडताना हवेत बघून म्हणतात
मॉडरेटर इथे लक्ष देतील काय ?

५.
अमुकरावाना झालं अजीर्ण
केला जरी मी साधाच बेत
कितीही वाढलं तरी म्हणायचे
छान आहे, ‘अजून येवू देत’ !

६.
ह्यानी प्रपोज करताना म्हटलं
कधी गं जुळतील आपुल्या तारा
म्हटल आत्ताच तर पोस्ट केलंत,
थोड्या वेळाने रिफ्रेश मारा !

७.
दर भेटीत द्यायचे वचन लग्नाचं
एक दिवस म्हटलं: आता बास !
आपला ‘गुलमोहर’ होणार आहे
का नुसताच ‘जनरल टाईमपास’

८.
बैठकीनंतरच्या भेटीत वाटलं
ह्यांच्या एक कानाखाली देऊ का ?
म्हणाले फायनल करण्याआधी,
जरा तुझा 'प्रिव्ह्यू' घेऊ का ?

९.
साधं मत विचारलं तरी
सांगायला वेळ काय घेतात..
आधी शर्टाला बरं म्हटलं असलं
तरच साडीवर अभिप्राय देतात

१०.
’व्ही ऍंड सी’ झालाय ह्यांचा छंद
अगदी लहान गोष्टीही ताणतात
भाजी करपली म्हणून भांडतानाही
मधे ‘आर एस एस’ आणतात

११.
मीलनराती घेतला हातात हात
आणि अमुकराव जरासे अडले
पुढे काय? ते विचारायला त्यानी
दोन नवीन बीबी उघडले

***

गुलमोहर: 

खूप दिवसांनी इथे आलो आणि मज्जा आली.. अजूनही प्रतिक्रिया येत आहेत हे बघून खूप आनंद झाला Happy
सर्वांना खूप खूप धन्यवाद!!!

हसून हसून मेले.

मायबोलीवरील " अक्षर वाङ्मय " आहे हे .

Pages