पेन्सिल भाजी (तांबड्या भोपळ्याची भाजी)

Submitted by तृप्ती आवटी on 19 December, 2009 - 17:30
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

पाव किलो लाल भोपळा, २ टे. स्पून भाजलेले तीळ, पाव वाटी सुक्या खोबर्‍याचा कीस, ४-५ हिरव्या मिरच्या, १ टे स्पून मेथी दाणे, ४-५ कडीपत्त्याची पानं, फोडणीसाठी तेल-हिंग-हळद-जिरं. कोथिंबीर आणि नारळ सजावटीसाठी.

क्रमवार पाककृती: 

भोपळ्याची पाठ काढुन घ्यावी. त्याच्या साधारण पाटीवरची पेन्सिल असते त्या जाडीच्या आणि दोन पेर लांबीच्या फोडी कराव्यात. कडीपत्त्याची पानं बारीक चिरुन घ्यावीत. हिरव्या मिरच्या आणि खोबरे एकत्र वाटुन घ्यावे. हिंग-हळद-जिर्‍याची फोडणी करुन त्यात मेथी दाणे घालावेत. मेथी लालसर झाली की कडीपत्त्याची पानं घालावीत आणि मग भोपळ्याच्या फोडी घालाव्यात. घाकण घालुन एक वाफ येऊ द्यावी. मग त्यात हिरवी मिरची/खोबर्‍याचे वाटण आणि तीळ घालावेत. आपल्या अंदाजाने मीठ घालावे. झाकण घालुन भाजी शिजवावी. पाणी घालु नये तसेच खूप सपक शिजवु नये. कोथिंबीर आणि नारळ घालुन सजवावी.

वाढणी/प्रमाण: 
तीन ते चार (पानात इतर भाज्या/कोशिंबीरी/चटण्या/आमट्या असल्यास)
अधिक टिपा: 

_आम्ही लहानपणी भोपळ्याची भाजी खावी म्हणुन आई त्याला गमतीने पेन्सिलीची भाजी म्हणत असे म्हणुन पेन्सिल भाजी नाव.
_कडिपत्ता बारीक चिरुन फोडणीत घातल्याने वेगळीच चव येते आणि कडिपत्ता खाल्ला जातो.
_रुचिरामधे हे वाटण घालुन करायची कृती दिली आहे. पण त्यात पाणी घालुन शिजवायचे दिले आहे आणि चारोळ्या वगैरे अनेक जिन्नस आहेत जे मी घालत नाही.
_उपासासाठी करायची असेल तर फक्त उपवासास चालणारे जिन्नस घालुन करावी.

माहितीचा स्रोत: 
आई आणि रुचिरा
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सिंडी, काल तुझ्या पद्धतीची भाजी केली. मस्त झाली. मी सुकं खोबरं, तीळ भाजून घेऊन मिरच्या, कढीपत्त्याबरोबर वाटले नी भाजीत घातले.

सायो, तीळ भाजूनच घ्यायचे. मी लिहायचं विसरले होते Happy मी पण बरेचदा कडिपत्ता, कोथिंबीर, नारळ असं सगळच वाटुन घेते. मस्त चव येते.

मला लाल भोपळा अजिबात आवडत नव्हता. साधारण याच कृतीने साबांनी केलेली पाहिली होती,आता तशीच करते.
सीमाचा फोटो भन्नाट आहे. दुधीची अशा पद्धतीने करुन पाहायला हवी आता.

ज्या कांही ठराविक भाज्यांत घालण्यासाठीच कडीपत्ता निर्माण झाला त्यात तांबडा भोपळा अग्रणी असावा ! Wink
किंचित गुळ घालूनही या भाजीचा स्वाद वाढतो, असं आपलं मला वाटतं.

गिरगावातलं फेमस अनंताश्रम. तिथे आम्ही मासे खायला गेलो होतो. थाळी मागवली तर बरोबर वाटी ओसंडून वाहणारी लाल भोपळ्याची भाजीही आली. इतकी चविष्ट भाजी मी तरी आधी खाल्ली नव्हती. भरपूर खोबरं वगैरे घालून केली होती. मी तर मासे बाजूला ठेऊन या भाजीवरच ताव मारला.

बाजारात पिकलेल्या भोपळ्याचा वास आला की घेतेच घेते. कच्च्या भोपळ्याची भाजी वेगळी लागते.

छान

<<गिरगावातलं फेमस अनंताश्रम. तिथे आम्ही मासे खायला गेलो होतो. थाळी मागवली तर बरोबर वाटी ओसंडून वाहणारी लाल भोपळ्याची भाजीही आली. इतकी चविष्ट भाजी मी तरी आधी खाल्ली नव्हती>> मामीजी, अनंताश्रमाचा व माझा जवळचा व खूप जुना संबध होता [ ती खाणावळ - "हॉटेल" संज्ञा त्याला नाही लावता येत - आता बंद झालीय]; मासे तिथली स्पेशॅलिटी असली तरी तिथं शाकाहारी जेवणही छान मिळायचं हे अगदी खरंय.

बरे झाले ही भाजी वर आली. करायची राहुन गेली होती. कालच कापलेले butternut squash विकत आणले आहे, त्यामुळे पेन्सिल नाही पण चौकोनी फोडींची आज करतेच.

काल केली हि भाजी. नुसत्या भोपळ्याची भाजी फारशी आवडीची नाही तरी या प्रकारे थोडीशी करुन पाहिली. एकदम मस्त लागते.

छान भाजी, अगदी पारंपारिक ! या भाजीत थोडे गवारीच्या शेंगांचे तुकडे घालतात आमच्याकडे ! ही भाजी गरमा गरम तर छान लागतेच, पण थंड भाजी, थंड भाता बरोबर कालवून, यम्म्म्म्मी !

रच्याकने: लहान्पणी मलाही अजीब्बात आवडत नसे लाल भो. ची भाजी, आणि पंक्तीमध्ये जेवायला गेलं ती तिथे अगदी असायचीच ! पण पानाचे द्रोण कलंडू नयेत म्हणून ला.भो.भाजीत खोचून ठेवायलाच कामी यायची ! पंक्तीत काय ईतर भरपूर पदार्थ असल्याने, ला.भो.भाजीत इन्टरेस्ट नसायचाच कधी. पण तळकोकणात हर्सूल ला आत्याकडे एकदा ही भाजी खाल्ली, खूप आवडली आणि मग नेहमीच खाऊ लागलो !

सिंडरेला, हा प्रकार करून पाहणार नक्की! थँक्स वेगळी रेसिपी शेअर केल्याबद्दल. Happy

ध्वनी, फोडणीत हळद घालतांना गॅस कमी असावा आणि हळद घातल्यावर पटकन भाजी घालावी म्हणजे फोडणी जळत नाही (काळी होत नाही). मी हळद तिखट दोन्ही नेहमी फोडणीमधेच घालते, भाजी खमंग होते.

Pages