पेन्सिल भाजी (तांबड्या भोपळ्याची भाजी)

Submitted by तृप्ती आवटी on 19 December, 2009 - 17:30
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

पाव किलो लाल भोपळा, २ टे. स्पून भाजलेले तीळ, पाव वाटी सुक्या खोबर्‍याचा कीस, ४-५ हिरव्या मिरच्या, १ टे स्पून मेथी दाणे, ४-५ कडीपत्त्याची पानं, फोडणीसाठी तेल-हिंग-हळद-जिरं. कोथिंबीर आणि नारळ सजावटीसाठी.

क्रमवार पाककृती: 

भोपळ्याची पाठ काढुन घ्यावी. त्याच्या साधारण पाटीवरची पेन्सिल असते त्या जाडीच्या आणि दोन पेर लांबीच्या फोडी कराव्यात. कडीपत्त्याची पानं बारीक चिरुन घ्यावीत. हिरव्या मिरच्या आणि खोबरे एकत्र वाटुन घ्यावे. हिंग-हळद-जिर्‍याची फोडणी करुन त्यात मेथी दाणे घालावेत. मेथी लालसर झाली की कडीपत्त्याची पानं घालावीत आणि मग भोपळ्याच्या फोडी घालाव्यात. घाकण घालुन एक वाफ येऊ द्यावी. मग त्यात हिरवी मिरची/खोबर्‍याचे वाटण आणि तीळ घालावेत. आपल्या अंदाजाने मीठ घालावे. झाकण घालुन भाजी शिजवावी. पाणी घालु नये तसेच खूप सपक शिजवु नये. कोथिंबीर आणि नारळ घालुन सजवावी.

वाढणी/प्रमाण: 
तीन ते चार (पानात इतर भाज्या/कोशिंबीरी/चटण्या/आमट्या असल्यास)
अधिक टिपा: 

_आम्ही लहानपणी भोपळ्याची भाजी खावी म्हणुन आई त्याला गमतीने पेन्सिलीची भाजी म्हणत असे म्हणुन पेन्सिल भाजी नाव.
_कडिपत्ता बारीक चिरुन फोडणीत घातल्याने वेगळीच चव येते आणि कडिपत्ता खाल्ला जातो.
_रुचिरामधे हे वाटण घालुन करायची कृती दिली आहे. पण त्यात पाणी घालुन शिजवायचे दिले आहे आणि चारोळ्या वगैरे अनेक जिन्नस आहेत जे मी घालत नाही.
_उपासासाठी करायची असेल तर फक्त उपवासास चालणारे जिन्नस घालुन करावी.

माहितीचा स्रोत: 
आई आणि रुचिरा
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान पा. कृ. सिंडे!

भक्कम तेल, आलं लसूण जिर्‍याची गोळी, गोडा मसाला, खसखस, चिंच गूळ ही भर घातली की लग्नातल्या जेवणातली भोपळ्याची बाकरभाजी.

अगं हो हो हे सगळं रुचिरातल्या कृतीत दिलय आणि वर चारोळ्या. पण भोपळा पाणी घालुन शिजवायचा म्हणजे कैच्याकै. आमच्यात नसते लग्नात ही भाजी.

चारोळ्या आणि पाणी नाही घालायचं. गोडा मसाला पण पळवाट. ताजा तळलेला मसाला वाटून घालतात. मऽस्त झणझणीत आणि चवदार असते ही भाजी.

कशाला गं असल्या (तोंडाला पाणी सोडणार्‍या) पाककृत्या लिहिता? Sad
आता भोपळा आणून खाल्ल्याशिवाय जीवाला चैन पडेल का?

पाकृ एकदम खास, भयंकर आवडतो मला लाल भोपळा, आणि वरच्या पद्धतीने तर...
विचारूच नये.. Happy

बंगाली पध्दत अशीच असते. पण फोडणीला, पांच्-फोडन घालतात आणि सुकी लाल मिरची. आता अशी हिरवी मिरची आणि खोबरे वाटुन करुन बघिन. माझीही लाल भोपळा ही आवडीची भाजी. आणि अशी चिरुन जी चव येते भाजीला ती नेहेमी सारखी चौकोनी तुकडे करुन येत नाही, असे मला वाटते.

फारच सुरेख. नाव तर खूपच कल्पक आहे. करुन बघणार नक्की.
हिरवी पाठ असलेल्या भोपळ्याला पाणी कमी सुटते. पिवळ्या पाठीच्या भोपळ्याला जास्त सुटते.

हिरवी पाठ असलेल्या भोपळ्याला पाणी कमी सुटते. पिवळ्या पाठीच्या भोपळ्याला जास्त सुटते.
>> काळपट हिरव्या पाठिचा भोपळा चांगला असतो चविला, मी नेहमी चौकोनी तुकडे करुन करते आता अशी करुन खायला पाहिजे.

माझ्या सासुबाई म्हणायच्या नेहेमि प्रत्येक फोडीला पाठ ठेवायची.. त्या पण अश्याच लांब फोडी करायच्या अगदी सुरणाच्या सुद्धा.

अमेरिकन दुकानात मिळणारा आपल्या तांबड्या भोपळ्याच्या जवळपास जाणारा एक भोपळा म्हणजे calabaza squash. इथे बघा. ह्याची चव पण ओळखीची वाटते.

पेन्सिलशेप माहित नव्हता सिंडे आता करुन पाहीन. धन्यवाद.
नॉर्मल फोडी आणि खसखस खोबरं कांदा मसाला ही आमच्या घराण्यातील पारंपारिक कृती.

सिंडे , आज ही भाजी करून चाटून पुसून खाल्ली . मॄण्मयीच्या टिप्स सुद्धा वापरल्या . तुम्हां दोघींना थँक्स . अजून काही रेसिपीज असतील तुझ्या जादूच्या पोतडीत तर लगेच लिही बघू . तुझ्या रेसिपीजचा सप्ताह मी साजरा करेन . Happy

मैत्रेयीला पेन्सिल शेपमुळे आणि " सिंडरेलाच्या " कृतीने केल्यामुळे भाजी भयंकर आवडली . तिला वाटतेय ( परिकथेतल्या ) सिंडरेलाला सगळंच करता येतं, भोपळ्याची भाजी सुद्धा Wink . सिंडे , तुला खास सिंडरेला वेषात आमच्याकडे यावे लागेल बहुतेक . Proud

सिंडरेला, भोपळ्याच्या रथाचा पुन्हा भोपळा झाला की त्याची भाजी करून खाते. (मैत्रेयीसाठी गोष्टीचं एक्स्टेंशन).

बटरनट स्कॉशची भाजी पिठूळ नाही का होत? (तो कायमच उपलब्ध असतो दुकानात, पण घेतला नाही ह्याच कारणामुळे.)

मी दुधीभोपळा वापरुन ही भाजी केली. मस्तच लागते. सगळ्याना आवडली. सिंडी ,आईला धन्यवाद सांग.
दुधीभोपळ्याची भाजी नारळाच दुध घालुनही छान लागते.
s3_0.jpgs1_2.jpg

Pages