माझी भाताची सुगी

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

टपोर्‍या भरलेल्या भाताच्या लोंब्या उभ्या पातीला पेलवेनाश्या झाल्या आणि दाण्यांसह पानंही सोन्यागत पिवळी पडायला लागली, म्हणजे समजायचे की आता भात काढणीला आले आहे.
bs1.jpg

मग गडी जमवून भातकापणीला सुरुवात होते. भातकापणी म्हणजे भाताची रोपं अगदी मुळालगत कापायची.
bs2.jpg

कापत कापत पुढे सरकू तसे नीट जुळवून जागोजागी त्याचे ढीग करत जायचे. हे ढीग म्हणजे 'यंगा'.
bs3.JPG

ही कापणी सुरू झाली, म्हणजे गावातली बलुती आपला आपला हिस्सा मागायला येतात.
bs4.jpg

सगळे वावर (वावर म्हणजे शेताचा मशागतीखालचा तुकडा) कापून झाले, म्हणजे या यंगा उचलून झोडपणीसाठी खळ्यावर आणल्या जातात. जवळपास खळे नसेल तर तिथेच शेजारी खाट टाकून त्यावर झोडपणी केली जाते.
bs5.jpg

झोडपणीत काही सगळेच्या सगळे दाणे रोपापासून झडत नाहीत. मग बैलांच्या मळणीसाठी हा पाचोळा खळ्यात आणला जातो. खळे म्हणजे शेतातच पंचवीस-तीस फूट व्यासाची चोपून, सारवून, टणक केलेली जमीन. खळ्यात मधोमध एक मजबूत खुंटा रोवलेला असतो. तो तिवडा. या मळणीसाठी तिवड्याभोवती हा पाचोळा जमिनीवर पसरायचा. खुंट्याला मजबूत दोर बांधून त्या दोराला तिवड्यापासून परीघापर्यंत बैल / गायी / म्हशी ओळीत बांधायच्या. आणि तिवड्याभोवती गोल गोल हाकायच्या. त्यांच्या पायाच्या तुडवण्याने उरलेसुरले सगळे दाणे मोकळे होतात. ते झाले की हा पाचोळा खळ्यातून बाजूला काढायचा आणि दुसरा पाचोळ्याचा नवा घाणा मळणीसाठी घालायचा.
bs6.jpg

मळणीनंतर भाताची वाढवणी होते. वाढवणी म्हणजे भात सुपात भरून वार्‍याच्या झोतात उंचावरून हळूहळू खाली सोडायचे. असे केल्यामुळे भातातला सगळा पाचोळा/कस्पटं वार्‍याने उडून जातात. खाली स्वच्छ भाताची रास उरते. मग या राशी उन्हं लागण्यासाठी खळ्यात पसरून वाळवणं घातली जातात.
bs7.JPG

मळणीत निघालेला सगळा पाचोळा नीट गोळा करून तोही वाळवायचा. आणि गंजी रचून ठेवायचा. हीच गुरांची उन्हाळ्यातली वैरण.
bs8.JPG

हे झाल्यावर लगोलग रब्बी पिकांची पेरणी सुरू करावी लागते. भात काढलेल्या वावरांची नांगरट करायची.
bs9.JPG

पुढे नांगर जाईल तसा मागून त्या तासात बियाणे सोडत जायचे.
bs10.jpgbs11.JPGbs12.JPG

आता यवडं काम करूनशान भूक लागली? दमला जणू?

हा हा हा
काय हार्कत न्हाय.
थतं गंजीवर न्ह्यारीची भाकरी ठेवलीय बगा...

bs14.JPG

आन् थतंच तळाला पानी बी हाय प्याया. लय नासधूस करू नगा पान्याची. हां... हुन द्या सावका ऽऽ स..
bs15.JPG

प्रकार: 

मिनोती, आम्ही एकच न करता दोन-तीन प्रकारचे भात करतो. भावना, आमच्याकडे रब्बी पेरण्यांमध्ये मुख्यतः शाळू (ज्वारी), हरभरा, गहू, वाटाणा ही पिके असतात. आणि हो, आमची वावरं इथून तिथून लांबलचक असतात. ताली धरलेल्या असतील तर रुंदीनेही अघळपघळ असतात. Happy
प्रकाश, ही शाळवाची पेरणी चालली आहे. याला वाफे करून पाणी पाजायची गरज भासत नाही. पावसाळा नुकताच संपलेला असल्याने जमिनीत बर्‍यापैकी ओल असते. आणि थंडीत पहाटे दहिवर भरपूर असते. गव्हासाठी मात्र वाफे करून पाणी पाजायला लागते. मोगना हा आमच्याकडे दुय्यम पिकांच्या पेरणीसाठी वापरतात. म्हणजे मुख्य पीक भुईमुगाचे असेल, पण त्यात मध्येमध्ये (उदा. दर पाचव्या ओळीवर) जर तूर किंवा पावटा पेरायचा असेल तर तिफणीला मागे मोगन्याचा आकडा अडकवून पेरता येतो.

(मोगना : बांबूच्या साधारण छातीइतक्या उंचीच्या आणि आतून आरपार पोकळ केलेल्या काठीला एका टोकाला लाकडाचे नरसाळ्यासारखे तोंड बसवलेले असते. हे लाकडाचे तोंड वरच्या दिशेला करून हा मोगना तिफणीमागून न्यायचा आणि चालत चालत त्याच्या तोंडात बियाणे सोडायचे.)

अमोल, हो आंब्याच्या पेट्यांमध्ये जे वाळलेले गवत असते ते म्हणजेच हा भाताचा पाचोळा असतो. त्याने आंबे पिकायला मदत होते म्हणतात. शिवाय वाहतुकीत शॉक अ‍ॅबझॉर्बर.

झकास, तू घेतलेले प्रकाशचित्र भारीच.

प्रतिक्रियांकरता सगळ्यांना धन्यवाद. Happy

वा, गजानन, फार सुरेख माहिती सांगितलीस. फोटोही सुंदर आहेत. पण भातशेतीची खरी मजा गुढधाभर चिखलांत रोपं लावण्यांत आहे. त्याचेही फोटो टाकलेस तर भातशेतीवर सुंदर album होउ शकेल.
good luck!!

>>>> इथे कुणी वापरतच नाही.
कस वापरणार?
जमान्यापूर्वीच "गहिवर" विसरलेत Proud , दहिवर कुठून लक्षात ठेवणार???

gajanandesai, खूप छान फोटो आणि माहिती! पूर्वी लोकसत्तामध्ये सोमवारी शेतीच्या कामांची माहिती देणारं एक सदर यायचं त्याची आठवण झाली. आपल्या ताटात अन्न यायच्या आधी किती लोकांचे कष्ट आहेत ह्याची जाणीव झाली. जेवायच्या आधी खरं तर त्यांचे आभार मानायला हवेत.

धन्यवाद.

स्वप्ना, अगदी खरे बोललात. आपण अन्नाची जेव्हा सहज नासाडी करतो, तेव्हा आपल्या ताटात येणार्‍या प्रत्येक दाण्याकरता (अक्षरशः प्रत्येक दाण्याकरता) किती लोकांचे किती कष्ट खर्ची पडलेत, हे प्रत्येकाने आठवायला हवे.

जुन्या आथवनी ताज्या झाल्या!!
पन हे भात पेरनीच की लावनीच?
माझ्या मते पेरनीच!
छान! Happy

Pages