माझी भाताची सुगी

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago

टपोर्‍या भरलेल्या भाताच्या लोंब्या उभ्या पातीला पेलवेनाश्या झाल्या आणि दाण्यांसह पानंही सोन्यागत पिवळी पडायला लागली, म्हणजे समजायचे की आता भात काढणीला आले आहे.
bs1.jpg

मग गडी जमवून भातकापणीला सुरुवात होते. भातकापणी म्हणजे भाताची रोपं अगदी मुळालगत कापायची.
bs2.jpg

कापत कापत पुढे सरकू तसे नीट जुळवून जागोजागी त्याचे ढीग करत जायचे. हे ढीग म्हणजे 'यंगा'.
bs3.JPG

ही कापणी सुरू झाली, म्हणजे गावातली बलुती आपला आपला हिस्सा मागायला येतात.
bs4.jpg

सगळे वावर (वावर म्हणजे शेताचा मशागतीखालचा तुकडा) कापून झाले, म्हणजे या यंगा उचलून झोडपणीसाठी खळ्यावर आणल्या जातात. जवळपास खळे नसेल तर तिथेच शेजारी खाट टाकून त्यावर झोडपणी केली जाते.
bs5.jpg

झोडपणीत काही सगळेच्या सगळे दाणे रोपापासून झडत नाहीत. मग बैलांच्या मळणीसाठी हा पाचोळा खळ्यात आणला जातो. खळे म्हणजे शेतातच पंचवीस-तीस फूट व्यासाची चोपून, सारवून, टणक केलेली जमीन. खळ्यात मधोमध एक मजबूत खुंटा रोवलेला असतो. तो तिवडा. या मळणीसाठी तिवड्याभोवती हा पाचोळा जमिनीवर पसरायचा. खुंट्याला मजबूत दोर बांधून त्या दोराला तिवड्यापासून परीघापर्यंत बैल / गायी / म्हशी ओळीत बांधायच्या. आणि तिवड्याभोवती गोल गोल हाकायच्या. त्यांच्या पायाच्या तुडवण्याने उरलेसुरले सगळे दाणे मोकळे होतात. ते झाले की हा पाचोळा खळ्यातून बाजूला काढायचा आणि दुसरा पाचोळ्याचा नवा घाणा मळणीसाठी घालायचा.
bs6.jpg

मळणीनंतर भाताची वाढवणी होते. वाढवणी म्हणजे भात सुपात भरून वार्‍याच्या झोतात उंचावरून हळूहळू खाली सोडायचे. असे केल्यामुळे भातातला सगळा पाचोळा/कस्पटं वार्‍याने उडून जातात. खाली स्वच्छ भाताची रास उरते. मग या राशी उन्हं लागण्यासाठी खळ्यात पसरून वाळवणं घातली जातात.
bs7.JPG

मळणीत निघालेला सगळा पाचोळा नीट गोळा करून तोही वाळवायचा. आणि गंजी रचून ठेवायचा. हीच गुरांची उन्हाळ्यातली वैरण.
bs8.JPG

हे झाल्यावर लगोलग रब्बी पिकांची पेरणी सुरू करावी लागते. भात काढलेल्या वावरांची नांगरट करायची.
bs9.JPG

पुढे नांगर जाईल तसा मागून त्या तासात बियाणे सोडत जायचे.
bs10.jpgbs11.JPGbs12.JPG

आता यवडं काम करूनशान भूक लागली? दमला जणू?

हा हा हा
काय हार्कत न्हाय.
थतं गंजीवर न्ह्यारीची भाकरी ठेवलीय बगा...

bs14.JPG

आन् थतंच तळाला पानी बी हाय प्याया. लय नासधूस करू नगा पान्याची. हां... हुन द्या सावका ऽऽ स..
bs15.JPG

प्रकार: 

अरे वा! मस्त माहिती आणि फोटो!
वाढवणीचा फोटो नाही का? आणि तू काय काम केलेस की फक्त फोटोच काढले.. Happy

मस्त. Happy

विषयाची मांडणी अप्रतिम... अशीच भाताची रोपं दरवर्षी येऊ दे, हीच देवाकडे प्रार्थना... शेतकरी सुखी तर देश सुखी...

मस्त माहिती आणि फोटो गजानन. वाढवणीचं वाचून जुने मराठी पिक्चर डोळ्यांसमोरुन् सरकले. कोकणात गाव कुठेय ?

छान माहिती.. मस्त फोटो.
फेसबुकमधे मजेत फार्मिंग करणार्‍या लेकिला दाखवले तेव्हा तिला कळल कि किती कठिण आहे ते शेती करण. Happy

गजा, अप्रतीम. मस्त आहे फोटो फिचर Happy आता जोंधळा पेरतील त्याच्या मळणीचे पण असेच काढ फोटो.
कोणती जात होती? रत्नागिरी २४ की इंद्रायणी?

सायो, कोकणात नाही कराडजवळ आहे त्याचे गाव Happy

गजानन
अतिशय सुंदर फोटो अन माहिती. अशी माहिती भूगोलाच्या पुस्तकात असती तर नक्कीच ३५/१०० पेक्षा जास्त मार्क मिळाले असते. पुढच्या पिकाचीही अशीच सचित्र माहिती येऊद्या.

मस्त जीडी.. गावाकड जावुन आल्यासारख वाटलं. फार छान माहिती पण दिली आहे.
माझ्याकडे उसाच्या,द्राक्षाच्या मळ्याचे आहेत फोटो. हे फोटो पाहिल्यावर वाटल कि मी अजुन जरा डिटेल मध्ये काढायला हवे होते.

जीडी.. अगदि क्रमवार माहिती अन फोटो टाकलेस.. शेती-नांगरटीची काहिच माहिती नसलेल्यांना छान माहिती पुरवलीस. भात शेती झाल्यावर मग कसलं बियाणं पेरलं रे? आमच्याइथे फक्त भात शेती होते रब्बीपिक नाहि घेतली जात. अन वरच्या तुझ्या फोटोतलं शिवार हि खुप लांबलचक आहे. Happy

गजानन- ब्येष्ट माहिती आणि फोटो.
शेती-नांगरटीची काहीच माहिती नसलेल्यांना छान माहिती पुरवलीस> अगदी अगदी.

झकास वाटलं !
गावाला भेट दिल्यासारखं....आमच्याकडं भात नसतो...पण गव्हाची कापणी मळणी सेम अशीच असते.
एक बघुन आश्चर्य वाटलं....नांगरणीच्या मागे पेरणी कशी काय ?
नांगरणी नंतर कुळवणी होते....मग वाफ़े तयार केले जातात. मग मोगन्याने पेरणी होते नाहीतर हाताने. असो... प्रत्येक भागात वेगळ्या पध्दती असतील ! Happy

वा वा! मस्त! ते टीपीकल शेतीचे शब्दही (टर्म्स) मस्त वाटले..
वर कोणीतरी म्हटलं तसं, येऊदे बाबा असाच भात दर हंगामाला! Happy

झकास तुझा फोटोही सहि आलाय! गारेगार वाटलं Happy

आवडले फोटो आणि शेती बद्दलची माहिती पण, शाळेत शेतीविषयी शिकलो होतो तेवढेच माहित होते हे सगळे शब्द बाकी शेतीचा संबंध फोटोत बघण्यापुरताच.

Pages