... आणि गावसकर 'पेटला'!

Submitted by फारएण्ड on 26 October, 2009 - 22:41

आज हे आठवण्याचे कारण म्हणजे क्रिकइन्फो च्या एका सदरात प्रत्येक तारखेला आधीच्या काही वर्षात काय झाले याची अत्यंत वाचनीय माहिती येते - त्यात या सिरीज बद्दल वाचले आणि क्रिकेट (टीव्हीवर दाखवू लागले आणि) पाहू लागलो तेव्हा अगदी सुरूवातीला पाहिलेल्या या सिरीज बद्दल च्या बर्याच गोष्टी आठवल्या.

१९८३ च्या वर्ल्ड कप मधे भारताकडून वेस्ट इंडिज चा संघ हरला. लॉईड ने राजीनामा दिला होता, पण तो बहुधा स्वीकारला गेला नाही. हा संघ एकूणच प्रचंड डिवचला गेला होता. त्यात चार महिन्यांनतर त्यांचा भारत दौरा आला...

हा संघ तेव्हा क्रिकेट मधला तेव्हाचा (आणि कदाचित आत्तापर्यंतचा) सर्वात बलाढ्य संघ होता. रिचर्डस, ग्रीनीज सारखे आक्रमक फलंदाज तर होतेच पण मार्शल, होल्डिंग, रॉबर्ट्स, डॅनियल, डेव्हिस सारखे वेगवान गोलंदाज आणि लॉईड ची कॅप्टनशिप यांच्या जोरावर ते १२-१३ वर्षे कसोटी मालिका कोठेही हरलेले नव्हते. टाटा मोटर्स (पूर्वीचे टेल्को) च्या बाबतीत एक अंतर्गत विनोद (इन जोक) कायम सांगितला जातो - "एक माणूस एक ट्रक विकत घेतल्यावर काही दिवसांनी डीलर कडे जातो आणि बर्याच तक्रारी आहेत म्हणून सांगतो. मग मेकॅनिक ने नीट बघितल्यावर कळते की आत इंजिनच नाही. आता इतके दिवस ट्रक कसा चालला यावर त्या डीलर चे उत्तर असते 'रेप्युटेशन' वर!" तेव्हाच्या विंडीज चे बोलर्स एवढे भीतीदायक असायचे की मला वाटते या मालिकेत भारताच्या अर्ध्या विकेट्स केवळ यांच्या रेप्युटेशन वरच उडाल्या असतील. ही सिरीज मी पूर्ण पाहिलेली आहे आणि काही विकेट्स बघून खरोखरच तसे वाटायचे Happy

या अशा लोकांना पहिल्याच टेस्ट मधे कानपूरला 'ग्रीन टॉप' देण्याची कल्पना कोणाच्या डोक्यातून आली असेल कोणास ठाउक! आधी ऐन भरात असलेला मार्शल आणि त्याचा नुसता वेगच नव्हे तर त्याबरोबर असलेली फलंदाजाच्या चुका ओळखून त्याप्रमाणे त्याला गोलंदाजी करण्याची प्रचंड हुशारी! स्टीव्ह वॉ नेच त्याच्या पुस्तकात लिहीले आहे की मार्शल १-२ ओव्हर्स मधेच फलंदाजाला 'वर्क आउट' करू शकत असे! दुसरा होल्डिंग - याला 'दुसरा' म्हणायचे एकच कारण म्हणजे त्याच्यापेक्षा मार्शल यावेळेस जास्त भरात होता. आणि होल्डिंग त्याच्या ८१ वगैरे सालच्या इंग्लंड विरूद्धच्या फॉर्म पेक्षा किंचित उतरला असला तरी 'डॉन जख्मी है तो क्या, फिरभी डॉन है" अशीच अवस्था होती. आणि हे दोघे थकले तरी डॅनियल आणि डेव्हिस तर कधी रॉबर्ट्स, गार्नर (याच्या उंचीमुळे याने टाकलेला यॉर्कर दुसर्या मजल्यावरून आपल्या पायात आल्यासारखा वाटतो हे संदीप पाटील का कोणीतरी म्हंटला होता Happy ) हे होतेच. नाहीतर आपल्याविरूद्ध खेळणार्यांना एकदा कपिल खेळून काढला की बाकीचे लोक केवळ स्पिनर्स येइपर्यंत बॉल ची चमक घालवण्याचे काम करत असल्यासारखे वाटत. विशेषतः भारतातील खेळपट्ट्यांवर.

यांच्याविरूद्ध खेळण्यासाठी भारताकडे प्रमुख फलंदाज होते - गावसकर, मोहिंदर अमरनाथ, वेंगसरकर, संदीप पाटील आणि शास्त्री (आणि कपिल). आधीच्या सीझन मधे विंडीज आणि पाकच्या तोफखान्याविरूद्ध त्यांच्याच देशात पाच शतके मारणारा आणि वर्ल्ड कप च्या उपांत्य व अंतिम सामन्यात 'मॅन ऑफ द मॅच' असलेला मोहिंदर घरच्या मैदानावर आणखी चांगला खेळेल असे वाटले होते. पण मोहिंदरच्या बाबतीत हे एक अगम्य कोडे म्हणजे घरच्या मैदानांवर तो अजिबात 'चालला' नाही. त्यामुळे फलंदाजी च्या बाबतीत गावसकर काय करेल यावर बरेच काही अवलंबून होते.

या सिरीज आधी पासून गावसकर च्या खेळाकडे सर्वांचेच लक्ष होते. तेव्हा भारत जिंकणे वगैरे शक्यता केव्हाही फारच कमी असल्याने वैयक्तिक उच्चांकांना खूप महत्त्व होते. या सुमारास शतकांच्या संख्येमध्ये सोबर्स, बॉयकॉट आणि इतर बरेच नावाजलेले इंग्लिश खेळाडू यांना मागे टाकून गावसकर ब्रॅडमन च्या २९ शतकांच्या (तेव्हा सर्वात जास्त) जवळ आला होता, तसेच एकूण धावांच्या संख्येतही सर्वात जास्त असलेल्या बॉयकॉट च्या जवळ आला होता. त्यामुळे त्याच्या प्रत्येक डावाला प्रचंड महत्त्व आले होते.

तर कानपूरला मार्शल ने खेळपट्टी आणि भारतीय फलंदाजांची वेगवान गोलंदाजी खेळण्याची एकूण क्षमता याचा भरपूर वापर करत दाणादाण उडवली. ही सिरीज म्हणजे विंडीज चा बदला आहे असे दिसू लागले होते.खुद्द गावसकर दुसर्याच बॉलवर आउट झाला. आणि पहिल्या किंवा दुसर्‍या (लक्षात नाही) डावात बॉलच्या वेगामुळे त्याची बॅट त्याच्या हातातून पडली. आणि बहुधा तेव्हापासून ही सिरीज म्हणजे विंडीज वि. भारत असे न होता विंडीज गोलंदाज वि. गावसकर अशी झाली. कदाचित आपले खेळाडू 'पेटायला' अशी काहीतरी व्यक्तिगत गोष्ट कारणीभूत ठरत असावी, आणि मग जेव्हा ते आपण काय करू शकतो ते दाखवतात तेव्हा कितीही तयारी केलेला प्रतिस्पर्धी संघ त्यांच्या प्रतिभेपुढे काही करू शकत नाही.

सिरीज मधे ०-१ ने मागे, पूर्ण बॅटिंग मार्शल आणि इतरांपुढे कोसळलेली, स्वत:चे अपयश हे सगळे पचवून एरव्हीचा शांत आणि बचावात्मक बॅटिंग करणारा गावसकर दिल्लीच्या दुसर्‍या टेस्ट मधे उभा राहिला तो त्याच्या चाहत्यांनी कधीही न पाहिलेला आक्रमक पवित्रा घेउन! आणि मग विंडीज च्या सर्व बोलर्सची यथेच्छ धुलाई करून त्याने केवळ ९१ बॉल्स मधे शतक केले - कसोटी सामन्यात, आणि ते ही वेस्ट इंडिज विरूद्ध! कदाचित ब्रॅडमन च्या विक्रमाची बरोबरी करताना त्यानी त्याच्या सारखेच आक्रमक खेळावे असे ठरवले असेल! त्याने मार्शल च्या एका शॉर्ट बॉल वर हुक करून मारलेली सिक्स अजूनही माझ्या डोळ्यासमोर आहे. त्याचा बहुधा मार्शलवर जास्तच राग असावा, कारण पुढच्या अहमदाबाद च्या मॅच मधे सुद्धा त्याच्या पहिल्या तीन बॉल वर सलग तीन फोर मारून त्याने जबरदस्त सुरूवात करून दिली होती. तेव्हाही शतक झाले असते पण ९० वर तो बाद झाला. पुन्हा कलकत्त्याला पहिल्याच बॉल वर मार्शल ने 'काढल्यावर' मद्रास ला ०-२ ला चौथ्या क्रमांकावर येउन नाबाद २३६ रन्स काढून ३० वे शतक नोंदवत त्याने ब्रॅडमन चा विक्रम मोडला.

भारत ही सिरीज ०-३ हरला, पण ६ टेस्ट पैकी तीन मॅच मधे विंडीज वर चक्क 'लीड' घेतला होता हे मुळात विशेष होते. आणि गावसकर (५०० रन्स, त्यात दोन शतके) व कपिल (२९ विकेट्स) हे आमचे दोन्ही हीरो या सिरीज मधून तेवढेच चांगले - किंवा इतरांविरूद्ध खेळायचे त्यापेक्षा थोडे जास्तच चांगले- खेळले, हाच आनंद आम्हाला होता. तेव्हा भरात असलेले बोथम वगैरेंसारखे लोक विंडीज विरूद्ध कसे ढेपाळत ते पाहिल्यावर तर तो आणखीनच वाढला Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सही! बहुतेक हे त्याचे कसोटीतले जलद शतक. शिर्षकावरून मला वाटले की तू त्या दात दुखीच्या मॅचचे लिहीत आहेस. त्यावेळी विंडीज मध्ये त्याने ह्या सगळ्यांना खेळून काढले त्याची आठवण झाली. Happy येउदेत अ़जून.

गावसकर अधूनमधून पेटायचा. १९८२ साली पाकिस्तानात खेळलेली मालिका भारत ४ थ्याच सामन्यात ३-० असा हरला होता. मालिकेच्या शेवटच्या ६ व्या सामन्यात अचानक गावसकर आक्रमक खेळू लागला. अगदी क्वचितच हूकचा फटका खेळणार्‍या गावसकरने अचानक जोरदार हूक आणि इतर फटके मारायला सुरुवात केली. इम्रान, सर्फराज इ. सर्वांना तो झोडपून काढू लागला व शेवटी वेगवान ६६ धावा करून बाद झाला.

१९८० मार्च मध्ये भारतीय क्रिकेटला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल इंग्लंडविरूद्ध एक सुवर्णमहोत्सवी कसोटी सामना खेळला गेला. हा सामना बॉथमचा सामना म्हणून ओळखला जातो (पहिल्या डावात ६ व दुसर्‍या डावात ७ बळी आणि पहिल्या डावात शतक). याच सामन्यात पंचांनी चुकिने यष्टीमागे झेलबाद दिलेल्या बॉब टेलरला विश्वनाथने परत बोलवून आपल्या सभ्य व खिलाडू वृत्तीचे दर्शन घडविले होते. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतल्यावर गावसकर व बिन्निने डावाची सुरूवात केली. काहि कळायच्या आत गावसकरने चेंडू जोरदार मारायला सुरूवात केली. त्याने २ षटकारही मारले. केवळ तासाभरात तो ४९ धावा करून बाद झाला. गावसकरने असे खेळण्याचे कारण कोणालाही समजले नाही. बहुतेक त्याने हा सामना गंभीरतेने घेतला नव्हता. कदाचित तो BBCI वरचा राग देखील प्रकट करत होता. जून १९७९ पासून मार्च १९८० पर्यंत भारत १७ कसोटी सामने खेळला होता (इंग्लंड मध्ये ४, भारतात ऑस्ट्रेलियाविरूद्ध ६ व पाठोपाठ पाकिस्तानविरूद्ध भारतात ६ व शेवटी हा सुवर्णमहोत्सवी कसोटी सामना). लगेचच एप्रिलमध्ये वेस्ट इंडिजमध्ये ५ सामन्यांची मालिका ठरविलेली होती. अति क्रिकेटमुळे गावसकर चिडलेला होता व त्याला वेस्ट इंडिजला जायची अजिबात इच्छा नव्हती. कदाचित या रागामुळे त्याने सुवर्णमहोत्सवी सामना अजिबात गंभीरतेने घेतला नव्हता. हा सामना संपल्यावर आपण वेस्ट इंडिज दौर्‍यासाठी उपलब्ध नाही असे गावसकरने कळवून टाकले. पाठोपाठ कपिलनेही तीच भूमिका घेतली. २ प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत शेवटी तो दौराच रद्द झाला. शेवटी गावसकरने BCCI ला नमविले.

१९७८ मध्ये कालिचरणच्या दुय्यम संघाविरूद्ध सुद्धा ६ व्या कसोटीत गावसकरने अचानक आक्रमक खेळ करून ४० चेंडूत ४० धावा केल्या होत्या.

१९७९ साली इंग्लंडमध्ये त्याने जवळपास ७ तासात २२१ धावा करून ४३९ धावांचा अशक्यप्राय पाठलाग करण्याचा प्रयत्न केला होता (भारताला विजयासाठी फक्त १० धावा कमी पडल्या). हा देखील एक पेटलेलाच डाव होता.

गावसकरसारखा खेलाडू सर्वप्रकारे खेळू शकत होता.पण त्या काळातील तंत्र पाहता व कल्चर पहाता बॉल इन द एअर मारणे पाप होते. बहुदा बालपणी चेंडू 'उचलल्यास' कानामागे जाळही काढत असतील. दुसरे आणि महत्वाचे म्हणजे गावसकरवर असलेले अवलम्बित्व आणि त्यामुळे त्याच्यावर आलेली जबाबदारी . गावसकर 'कोसळला' की पानीपतावर 'मुर्गी मारे, बचे दानादान' जशी स्थिती व्ह्यायची तशी आपल्या संघाची व्हायची. मुम्बईचे खेळाडू तर अतिसावध खेळत त्यात मॅच न हरणे, संघातून डच्चू न मिळावा अशी कारणे असत. या संघ न कोसळण्याच्या जबाबदारी खाली गावसकरचे सगळेच करीअर खर्च झाले असेही म्हणता येईल. त्यामुळे त्याच्या ''इन्द्रिया वळणच' पडले होते सावध आणि तंत्रशुद्ध खेळण्याचे.त्याच्या पहिल्या एकदिवसीय वर्ल्ड कपातील , ५०षटके खेळून काढलेल्या नाबाद ३६ धावांचे इंगितही यातच सापडावे. त्यामुळे कधीतरी स्वतःला सिद्ध करण्यासाठी गावसकर अशी 'बगावत' करीत असावा. भारतीय फलंदाजीत आक्रमकता सचिन वगळता उत्तर भारतीय खेळाडूनी आणली. पण त्यामुळे त्यांची करिअरेही लवकर सम्पली. वन डेच्या उदयाने चेंडू उचलणे पाप राहिले नसून पुण्य झाले आहे Proud

भारतीय फलंदाजीत आक्रमकता सचिन वगळता उत्तर भारतीय खेळाडूनी आणली. पण त्यामुळे त्यांची करिअरेही लवकर सम्पली. >>> हे तितकेसे खरे नाही. ही दोन्ही विधाने फारतर अर्धसत्य म्हणता येईल. भारतीय फलंदाजीत आक्रमकता कपिल देवच्या आगमनानंतर (ऑक्टोबर १९७८) आक्रमकता सुरू झाली. संदीप पाटील (१९७९) व श्रीकांत (१९८१) हे उत्तर भारतीय नसलेले खेळाडू सुद्धा अतिशय आक्रमक फलंदा़ज होते. त्यांचे पदार्पण कपिल देवच्या आगमनाच्या आसपास झाले होते. कपिलची कारकीर्द १६ वर्षे, श्रीकांतची ११ वर्षे तर संदीप पाटीलची ७ वर्षेच होती.

>>संदीप पाटील (१९७९) व श्रीकांत (१९८१) हे उत्तर भारतीय नसलेले खेळाडू सुद्धा अतिशय आक्रमक फलंदा़ज होते.<<

अगदी खरे. माझ्या मते वर्ल्ड कप जिंकण्यात संदीप पाटीलचा मोठा हातभार होता. सेमी-फायनल(?) मध्ये इंग्लंड विरुद्धच्या मॅचमध्ये विलिसला त्याने उभ्या-उभ्या लावलेले चौकार म्हणजे, व्वाह क्या बात है!

गावसकरचा एक किस्सा वाचलेला आठवला.

१९७८ साली भारताने पाकिस्तानचा दौरा केला होता. १७ वर्षाच्या खंडानंतर भारत व पा़किस्तान एकमेकांशी खेळणार होते. पहिल्या सामन्याच्या सुरवातीला भारतीय संघाची पाकिस्तानी गायिका नूरजहाबरोबर ओळख करून देण्याचा कार्यक्रम होता. नूरजहा १९४७ पर्यंत भारतात होती. नंतर ती पाकिस्तानमध्ये स्थायिक झाली. पाकिस्तानची लता मंगेशकर असा तिचा उल्लेख केला जात असे.

गावसकरची ओळख करून देताना पाकिस्तानी कर्णधाराने "हा महान खेळाडू सुनील गावसकर" असे तिला सांगितले. त्यावर, "गावसकर मला माहित नाही. मला फक्त इम्रानखान व सर्फराज नवाझ हेच माहित आहेत" असे तिने सांगितले.

त्यानंतर पाकिस्तानी कर्णधाराने नूरजहाची सुनीलशी ओळख करून देताना, "ह्या प्रख्यात गायिका नूरजहा" असे सांगितले. त्यावर गावसकरने, "नूरजहा मला माहित नाही. मला फक्त लता व आशाच माहित आहेत." असा जबरदस्त टोला हाणला होता.

सुनील फक्त मैदानातच नव्हे तर मैदानाबाहेरसुद्धा जबरदस्त टोलेबाजी करायचा!

फार छान वर्णन फारएण्ड Happy लहानपणी पेपरमधे अशी माहिती मिळायची. हेल्मेटपण नव्हतं तेव्हा. आणि हे सगळे जायण्ट्स!!! खरंच, आउट झालं नाही तरी मिळवली... बाकी लोकांचे प्रतिसादही वाचनीय!

हे सर्व वाचून पुनःप्रत्ययाचा अमाप आनंद मिळाला. धन्यवाद.
सुनीलची एक अगदी छोटीशी पण त्याची तंत्रशुद्धता व जिद्द सांगणारी आठवण. नक्की साल नाही आठवत पण मुंबई वि. दिल्ली रणजी सामना मुंबईत होता. विकेट अतिशय खराब झाली होती व सुनील नुकताच विदेशी दौर्‍यावरून आला होता व फलंदाजीसाठी ५किंवा ६ क्रमांकावर येणार होता.[मला वाटतं, संदीप पाटील त्या वर्षी मुंबईचं नेतॄत्व करत होता] मनिंदर भलताच फॉर्मात होता व विकेट जणू त्याच्याच फिरकीसाठी केल्यासारखी. जवळच्या क्षेत्ररक्षकांच कडं लावून त्यानं मुंबईच्या वरच्या फलंदाजाना मामाच बनवलं. अत्यंत खराब विकेटवर फिरकी गोलंदाजी कशी खेळावी याचं जणूं प्रात्यक्षिक दाखवायचंच आमंत्रण मिळाल्यासारखं सुनीलने कसाही वळत असलेला चेंडू शांतपणे बॅटखाली तिथल्या तिथे थोपवून कसा ठेवता येतो हे मनींदरची दोन-तीन षटकं खेळून दाखवून दिलं. मनींदर व जवळचे क्षेत्ररक्षक हतबल [व भारून गेलेले] झाल्यावर सुनीलने हळुहळू धांवा काढायला सुरवात केली.

अमोल.. अरेच्या.. हा लेख कसा काय निसटला माझ्या नजरेतुन?

खुप मस्त आठवणी जाग्या केल्यास रे.. गावस्कर माझा देव होता.. लहानपणी असंख्य वेळा मोठा झाल्यावर कोण होणार या मोठ्यांच्या प्रश्नाला.. गावस्कर! हे उत्तर दिलेले मला आठवते..

मी सुध्हा ती १९८३ ची सिरीज पुर्ण बघीतली होती. इन्फॅक्ट दिल्लीच्या टेस्टमधे गावस्कर जेव्हा पेटला होता त्या दिवशीच माझ्या मोठ्या भावाचे लग्न दादरच्या ब्राम्हण सहाय्यक संघाच्या हॉलमधे चालले होते.. पण माझे अर्धे लक्ष गावस्करच्या बॅटींगवर होते. त्यामुळे हॉलच्या समोरच असलेल्या एका इलेक्ट्रॉनिक दुकानासमोर जाउन दर अर्ध्या-पाउण तासाने मी चक्कर टाकुन ५-१० मिनिटे मॅच बघुन येत होतो... तिकडे हॉलमधे आइची सारखी बडबड... कुठे सारखा सारखा गायब होतोस दर अर्ध्या तासांनी ... हॉलमधे इथे एवढी कामे पडली असताना..:)

बाकी गावस्करच्या खेळाबद्दल पारायणे लिहीता येतील.. अमोल.. गावस्करवर एखादे सदर सुरु करायचे काय?..:)

आणी राज.... संदिप पाटीलच्या त्या सेमीफायनल इनिंगबद्दल शब्दच नाहीत,, काय चोपला त्या बॉब विलीसला.. यशपाल्-मोहिंदरच्या महत्वाच्या भगीदारीनंतर यशपाल शर्मा व त्याने मिळुन अजुन एक चांगली भागीदारी केली व विलीसच्या एका षटकात चार चौकार ठोकुन त्याने विजय मिळवुन दिला होता. तुला माहीत आहे ८३ वर्ल्ड कपच्या आधी एकच वर्ष.. याच बॉब विलीसला.. १९८२ मधे मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्डवर.. एका षटकात.. सहा बॉलवर सहा चौकार संदिपने ठोकले होते? त्या वेळेला विलीसचे प्रत्येक बॉलनंतर चवताळुन दुसरा बॉल टाकणे आठवते.. पण तितक्याच चवताळुन संदिप पाटिलने विलीसचा प्रत्येक बॉल सिमारेषेच्या बाहेर तडकावला होता... सिम्पली अमेझींग! (अर्थात संदिप पाटिल आमच्या बालमोहन विद्यामंदिरचा असल्यामुळे मला त्याच्याबद्दल जरा जास्तच सॉफ्ट कॉर्नर होता :))

संदिप पाटील शिवाजी पार्कजवळ सेनापती बापटांच्या पुतळ्याजवळच्या पाटीलवाडीत राहायचा. त्याच्या बाजुलाच माझा वर्गबंधु राहायचा. त्याच्या ओळखीने १९८१ चा ऑस्ट्रेलियन दौरा गाजवुन आलेल्या संदिप पाटीलला त्या दौर्‍यानंतर त्याच्या घरी जाउन भेटायला मिळाले होते.

बाकी गावस्करच्या खेळाबद्दल पारायणे लिहीता येतील..

गावस्करचा दाढदुखीवरचा मराठीतला धडा आठवला.

मस्त आठवण लिहिली आहेस फारेंड. Happy

>>> सुनीलची एक अगदी छोटीशी पण त्याची तंत्रशुद्धता व जिद्द सांगणारी आठवण.

१९८२ किंवा १९८३ च्या रणजी चषकाच्या अंतिम सामन्यात कर्नाटक व मुम्बईची लढत झाली होती. रघुराम भट्टच्या भेदक डावखुर्‍या फिरकी गोलंदाजीमुळे मुम्बईची पहिल्या डावात दाणादाण उडाली होती व त्यामुळे कर्नाटकला पहिल्या डावात धावांची आघाडी मिळाली होती. त्या सामन्यात भट्टने दोन्ही डावात एकूण १३ बळी मिळविले होते.

दुसर्‍या डावातही रघुराम भट्टची फिरकी खेळणे मुम्बईकरांना खूप अवघड जात होते. गावसकरसुद्धा त्याच्या फिरकीसमोर चाचपडत होता. मुम्बई दुसर्‍या डावात सर्वबाद होऊन डावाने हरणार असे वाटत होते. त्यावेळी गावसकरने रघुरामच्या फिरकीसमोर जवळपास निम्म्याहून अधिक दिवस डाव्या हाताने फलंदाजी केली व आपल्या तंत्रशुद्ध खेळाने मुम्बईचा ऑल आऊट होऊन दिला नाही. दोनही हाताने चांगली फलंदाजी करण्याचे हे बहुतेक इतिहासातले एकमेव उदाहरण असावे.

काय सांगाल का ????>>सनी डेज बघा. WI Tour वर दाढ दुखत असताना त्याने double century केली होती त्याबद्दल आहे.

पुन्हा शोधताना आता त्या दिल्लीच्या मॅचचा व्हिडीओ सापडला. पण ती मार्शलला मारलेली सिक्स दिसली नाही. होल्डिंग आणि मार्शल चा "र्‍हिदम" मात्र जबरी आहे. सुरूवातीला गावसकरची मुलाखत आणि आणि नंतर तो ते हायलाईट्स आहेत.
http://www.youtube.com/watch?v=wFhGOR1AH98

हा याच मॅचवरचा लेख क्रिकइन्फो वरचा लेख!
http://www.espncricinfo.com/magazine/content/story/452776.html

मला माझ्या लेखातील आणि या लेखातील मुद्दे बरेचसे सारखे वाटले. माझा लेख या लेखाच्या सुमारे सहा महिने आधी लिहीलेला आहे याची नम्रपणे टिमकी गाजवतो Happy

सुनीलबद्दल एक सांगायचं राहिलं. मला आठवतं सचिन नुकताच आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळायला लागला होता तेंव्हा कॉमेंटरी बॉक्समधे बहुधा बॉय़कॉटने त्याच्याबद्दल गावसकरला विचारलं. सुनील म्हणाला होता कीं ' संथ खेळामुळे मला बरेच जण सुनील ऐवजीं ' स्नेल' [ snail ] गावसकर म्हणतात पण आतां हा पोरगा [ सचिन] खेळायला लागेल तेंव्हा तर मला आतां काय म्हणायचं हा पेंचच पडेल त्याना !'. सचिन शतकांचं शतक पूर्ण करेल, हेंही भाकीत करणारा सुनीलच पहिला असावा. तात्पर्य : सुनील हा तंत्रशुद्ध महान फलंदाजच नाही तर खेळाचा गाढा अभ्यासू व खेळाडूंचं अचूक मूल्यमापनही करणारा आहे. आणि, खरीखुरी प्रतिभा कुणात दिसली तर त्याला मार्गदर्शन व प्रोत्साहनही देणारा आहे.

सुनील गावस्कर बद्दल कुणी काहीही बोललं तरी या माणसाने या खेळाचे बारकावे आपल्याला शिकवलेत. या खेळात पैसा नसताना सुनील गावसकर हा संघाचा आधारस्तंभ बनला. इतका कि तो गेला कि पत्त्यासारखी बॅटींग ऑडर कोसळायची.

सुनीलवर लिहीलेल्या या लेखाबद्दल मी तुझा कायमचा ऋणी झालो. या सिरीजमधे वेंगसरकरने चांगली कामगिरी केलेली ना ?

त्याने मार्शल च्या एका शॉर्ट बॉल वर हुक करून मारलेली सिक्स अजूनही माझ्या डोळ्यासमोर आहे. <<< अगदी.

गावस्कर जेव्ह नव्व्दी मध्ये यायचा तेव्हा कधीच धास्ती वाटत नव्हती, आता सेंच्युरी मारणारच हा एव्हढं आत्मविश्वास असायचं, फार क्वचित प्रसंगी गावस्कर नव्व्दीत बाद झालाय.

त्या काळी अ‍ॅण्डी रॉबर्ट्सबद्दल बोललं जायचं पण माझ्या मते मायकेल होल्डिंग हा नैसर्गिक वेगवान बॉलर होता. त्याचा रन अप आजही यू ट्यूबर पाहता येईल. डिस्कव्हरी वर चित्ता, हरीण असे प्राणी पळतांना स्लो मोशन मधे जसे ग्रेसफुल वाटतात तस्सा त्याचा रन अप. आणि त्याच लयीत टाकलेले चेंडू. विशेषतः त्याचा तो बीमर !!

मार्शल खुनशी होता. मात्र सुनीलपुढे त्याचं काही चाललं नाही. गार्नर हा राक्षस होता.

<< पण माझ्या मते मायकेल होल्डिंग हा नैसर्गिक वेगवान बॉलर होता....जसे ग्रेसफुल वाटतात तस्सा त्याचा रन अप. आणि त्याच लयीत टाकलेले चेंडू. >> १००% सहमत. इतकं शांत, गोड हंसणं असणारासुद्धां जगातला तो एकमेव खराखुरा वेगवान गोलंदाज असावा !!

खतरनाक बोलर्स होते ते चारही! होल्डिंगबाबत सहमत. त्याचे नाव डिकी बर्ड ने "व्हिस्परिंग डेथ" त्यामुळेच ठेवले. इतकी वेगवान व भेदक गोलंदाजी करताना तो जवळून कधी जायचा कळायचे ही नाही असे त्याचे म्हणणे होते.

युरी - वेंगसरकरही १९८३ च्या त्या सिरीज मधे चांगला खेळला होता. त्याची विंडीज विरूद्धची सर्व (६ की ७ लक्षात नाही) भारतातच आहेत - पण ते ही काही कमी नाही त्यावेळची त्यांची बोलिंग व आपली इतर बॅटिंग पाहता. जेव्हा विंडीज भरात होते तेव्हा इतर खेळाडूंची त्यांच्याविरूद्ध शतके ३-४ पेक्षा जास्त नव्हती. गावसकरची तब्बल १३!

वा वा! मजा आली वाचायला. योगायोग म्हणजे २-३ दिवसांपुर्वीच मी युट्युब वर गावस्करचे ९१ बॉल मध्ये केलेल्या शतकाची इनिंग्स बघितली. मर्व ह्युज, ब्रुस रीड वगैरेच्या बॉलिंगवर हा माणूस डोक्यावर फक्त हॅट घालून खेळत होता हे बघून फार आश्चर्य आणि कौतूक वाटलं.

मॅच जिंकण्यापेक्षा वैयक्तिक रेकॉर्ड वर भर बद्दलचा मुद्दा आधी ही एकण्यात आला होता. गावस्कर स्वतः करता खेळतो हे वाक्य तर मी बर्याच वेळा त्या काळच्या क्रिकेट्बघू आप्तांकडून एकलय.

धन्यवाद Happy गावसकरच्या कसोटी पदार्पणाला ५० वर्षे झाली. कालच फेबुवर पोस्ट्स पाहिल्या होत्या.

बाकी कसोटीत सलामीला येणार्‍याकरता मॅच जिंकावी की आपले रन्स करून घ्यावेत असे ठरवण्याची वेळ फारशी येत नसेल. आधी मुळात त्याच्या काळात स्वतःसाठी तर स्वतःसाठी पण निदान खेळ असे म्हणावे अशी अवस्था होती Happy बहुतांश मॅचेस मधे जिंकण्याबिंकण्याची शक्यता नसे, त्यामुळे पब्लिकचा इण्टरेस्ट गावसकरच्या रेकॉर्ड्सकडेच जास्त असे. या सिरीज मधे तर तो नक्कीच होता. या सिरीज मधली त्याची दिल्ली व अहमदाबादची बॅटिंग म्हणजे खतरनाक गोलंदाजी विरूद्ध आक्रमक फलंदाजीची जबरी उदाहरणे आहेत.

Pages