भीमाशंकर व्हाया शिडी घाट !

Submitted by Yo.Rocks on 26 August, 2009 - 15:19

१५-१६ ऑगस्टला काय करायचे ठरवता ठरवाता ऑर्कुटवरील "Trek Mates" या ग्रुपबरोबर भीमाशंकरला जायचे ठरवले.. ह्या ग्रुपमध्ये कुणालाही आधी भेटलो नव्हतो पण गेले एक वर्ष त्यांचे ट्रेकींग ईवेन्टस मात्र वाचत होतो.. त्यांच्याबरोबर जायचे म्हणजे घरातले काळजी करतील म्हणुन एका मित्राला(त्याचा पहिला वहिला ट्रेक !!) घेउन जायचे ठरवले... पहिलाच ट्रेक त्याचा म्हणुन मी त्याला "शिडी घाटचा थरार नि नेहमीची तंगडतोड याबाबत" जाणीव करुन दिली पण त्यानेही उत्साहाने भीमाशंकर पार करण्यास मी फिट आहे सांगितले..
भीमाशंकर व्हाया शिडी घाट म्हणजे एक थरारक अनुभव असे फार ऐकुन होतो.. त्यामुळे उत्साह दांडगा होता.. त्यातच निसर्गाच्या किमयाने तयार झालेले गुप्त भीमाशंकर (धबधब्याच्या पडणार्‍या पाण्याने तयार झालेले शिवलिंग) ऐकुन होतो.. तेदेखील पहायचे होते.. म्हटले पाउसचाही जोर नाहिये.. त्यामुळे जाण्यास हरकत नाही असे ठरवले..
ट्रेक लिडरने सांगितल्याप्रमाणे १५ ऑगस्टला पहाटे ५.५० ची दादरहुन कर्जत लोकल पकडुन ८ च्या सुमारास कर्जत गाठले.. तिकडेच सगळ्यांची भेट झाली.. पुण्याहून देखील ६-७ जण हजर झाले.. नि आमची एकुन संख्या ३२ झाली.. चायपानाचा कार्यक्रम उरकुन होतो तोच आधीच बुक केलेल्या तीन "टमटम (6 seater)" हजर झाल्या.. एका टमटममध्ये ११- ११ जण बसुन आम्ही टमटमची क्षमता सिद्ध केली.. Proud तिकडुनच आम्ही खांडस गावाकडे (साधारण ३४ किमी) प्रयाण केले..
पाउण एक तासाने खांडस गावात पोहोचताच गाईड्स लोकांनी विचारपुस सुरु केली.. त्यांना डावलुन आम्ही त्या गावातुन भीमाशंकरची वाट धरली.. साधारण दिड दोन किमीनंतर एक पुल लागला.. पुल संपताच समोर फलक दिसला.. शिडी घाट डावीकडे नि गणेश घाट उजवीकडे.. शिडी घाटाने(अवघड वाट) जाण्यास अंदाजे तीन तास नि गणेश घाटाने(सोप्पी वाट) जाण्यास अंदाजे ६ तास लागतात असे ऐकुन होतो.. आम्ही परतीची वाट गणेश घाटाने करायची ठरले होते.. त्याच थांब्यावर सगळ्यांची ओळख परेड झाली.. नेहमीच्या ओळख परेड पेक्षा वेगळी होती कारण इथे तुम्ही काय करतात यापेक्षा तुम्ही किती ट्रेक्स केलेत यात सगळ्यांना उत्सुकता जास्त होती.. नि नवल म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्ती पहिल्यांदाच ट्रेक करत होते !
१५ ऑगस्टचे निमित्त साधुन राष्ट्रगीत म्हटले गेले.. घोषणांची आतषबाजी करत आम्ही पुढे वाटचाल केली.. नि पावसाची रिपरिप देखील सुरु झाली.. "सगळीकडे हिरवेगार नि समोर ढगांमध्ये लपलेली भीमाशंकरची डोंगररांग" एकदम मस्त वाटत होते..
lets go.jpg
लाल मातीची ओली पाउलवाट तुडवत आम्ही जंगल प्रदेशाकडे वाटचाल करु लागलो.. वाटेत पाण्याचा एक ओहोळ लागला नि तिथेच काही काळ विश्रांती घेतली.. एव्हाना पावसाळी ढगांनी आकाशात दाटी केली होती.. जंगल सुरु होताच घनदाट झाडी लागली नि कातरवेळेस प्रारंभ झाला की काय वाटु लागले.. ती घनदाट झाडी बघुन इकडे एकट्या दुकट्याने येणे फक्त अशक्य असल्याची खात्री झाली.. गाईड हवाच ! आमचे ट्रेक लिडरही एक-दोन वाटेवर गोंधळले कारण पावसामुळे अस्ताव्यस्त विखुरलेले छोटेमोठे दगडधोंडे नि सगळीकडे वाढलेली झुडुपे.. यामुळे मूळ वाट ओळखणे जरा कठीणच गेले..
एक तास गेला तरी शिडीचा काही पत्ता लागत नव्हता.. आता येइल म्हणता म्हणता काहि मिनीटातच जंगल मागे सरले नि डोक्यावरील झाडांचे छप्पर गायब झाले.. पुढे जायची वाट पण बंद झाली कारण समोरच उंचसा कातळकडा उभा राहिला.. एव्हाना आम्ही देखील बरीच उंची गाठली होती ते मागे वळुन पाहताच लक्षात आले.. आता पुढची वाटचाल त्या डोंगराला वळसा घालुन करायची होती.. जिथे शक्य नाही तिथे लोखंडी शिड्या लावलेल्या आहेत..
पहिलीच शिडी डाव्या बाजुला दिसली जी एका मोठ्या खडकावरुन दुसर्‍या खडकावर जात होती.. मध्ये १०-१५ फुटाची दरी नि पुढे तिला लागुनच अजुन खोल दरी होती.. (किती खोल ते नीटसे आठवत नाहीये) पुढे ती शिडी जरी चढुन गेलात तरी क्षणाची उसंत नव्हती.. तिथेच खडकाला धरुन उभे रहायचे होते नि दोनवितभर असणार्‍या वाटेतुन पुढे सरकायचे होते.. याची कल्पना या फोटोवरुन येईलच..
1st ladder.jpg
हा थरार कमी म्हणुन की काय पावसाने जोरदार आगमन केले !! या शिडीतुन एकावेळी एकच जण हळुहळु जात होता.. आधीच शिडी घाटातील हा कठीण टप्पा त्यात पावसानेही जोर धरला.. त्यामुळे सगळ्यांना सांभाळताना, सुचना करताना लिडर्सलोकांना बरीच कसरत करावी लागली.. खरी गंमत पुढे होती.. जिथे अक्षरक्षः स्पायडरमॅनसारखे मोठ्या पाषाणाला चिकटुन जायचे होते.. कारण पुढे चार्-पाच फुट अंतराची वाटच नव्हती.. तिथे फक्त पाषाणाला असलेल्या खाचांमध्ये हात घालुन नि लिडरने दाखिवल्याप्रमाणे मोक्याच्या जागी पाय ठेवुन ती वाट पार करायची होती.. हा माझा प्रयत्न
2nd ladder.jpg
अंतर तसे फारच कमी होते पण पावसाने तो थरार रोमांचक बनवला.. हा पॅच सर करताच दुसर्‍या शिडीने अजून वरती जायचे होते.. नि गंमत म्हणजे ह्या शिडीच्या टोकाला असणार्‍या झाडाच्या मुळाचा आधार घेउन चढायचे होते !! मी लगेच ती शिडी पार केली नि झाडाजवळुनच खालचा फोटु काढला.. तेव्हा अंदाज आला वाट तेवढी सोप्पी नव्हती..
jhaad.jpg
फोटो घेत असतानाच एक दुर्घटना घडली.. काहि क्षण थांबलेला पाउस पुन्हा जोरात सुरु झाला.. नि अचानक वरतुन उंचावरुन बर्‍यापैकी मोठा दगड खाली पडला.. सुदैवाने तो खाली पहिल्या शिडीनजीक उभे असलेल्या दोघांच्या बरोबर मध्ये पडला !! सगळेजण तात्काळ सावध झाले..
दुसरी शिडी पार केल्यानंतर मी तिसर्‍या शिडीकडे सरसावलो.. पावसामुळे वरतून घरंगळत येणारे पाणी.. नि निसरडी वाट.. त्यामुळे आम्ही आता सगळे जवळपास घोडागाडी करुनच जात होतो.. तिसरी शिडी मात्र खुपच सोप्पी वाटली.. पटकन चढुन गेलो नि मग पुढे जिथुन पाण्याचा छोटेखानी झरा येत होता त्याच वाटेने आणखी वर चढलो.. खुपच मजा येत होती.. कपडे भिजतील, चिखलाने माखतील इकडे लक्षच नव्हते.. बस फक्त आपल्या हातापायांची पकड बरोबर आहे ना याचा अंदाज घेत पुढे जात होतो.. त्या झर्‍याची वाटेने वरती आल्यावर उजवीकडे गुहा लागली.. तिथेच काहि काळ थांबुन विश्रांती घेतली.. गुहेसमोरच वरतुन उंचावरुन पडणारे पाणी अंगावर झेलण्याची मजा काही औरच होती.. आमच्या ग्रुपपैकी आम्ही ८-९ जणच पुढे आलो होतो.. बाकीचे अजुन पहिली नि दुसरी शिडीच पार करत होते.. एकंदर आमची तीन ग्रुपमध्ये फाळणी झाली होती.. पुढे असणारा आमचा घोळका.. मध्यम गतीचा मधला घोळका.. नि शेवटी राहिलेला संथ गतीचा घोळका (ज्यात दोन व्यक्ती "वजनदार" होत्या) :P..
वाटले तिन्ही शिड्या पार झाल्या.. बरेचसे चढुन आलो.. आता कष्ट कमी लागतील.. पण छे ! पुढे अजुन एक ६-७ फुटाचा रॉक पॅच लागतो.. तो तसाच चढावा लागतो.. लिडरने ज्यांना अशक्य होते त्यांच्या मदतीसाठी दोरखंड ठेवला होता..
तो चढुन गेल्यावर लक्षात आले.. आतासा कुठे एक डोंगर पार करुन विस्तीर्ण पठारावर आलोय !! इथुनच समोरील डोंगररांगामधील पदरगडाचे विलोभनीय दर्शन झाले.. पुढे जाताच भलीमोठी भातशेतीही नजरेस आली..! हा हिरवा पट्टा बघितला नि कोकणची आठवण आली ! त्याच शेतीतुन वाट काढत पुढे विश्रांतीसाठी बांधण्यात आलेल्या झोपड्यांमध्ये आलो नि जेवणाचे डबे उघडले.. याचठिकाणी शिडी घाटचा रस्ता नि गणेश घाटचा रस्ता एकत्र येतो..
तासभरच्या विश्रांतीनंतर आम्ही पुन्हा जंगलातुन जाणार्‍या वाटेस लागलो.. अजुन दीडएक तासाचा अवधी लागेल असे लिडरने सांगितले.. पण आता वाट सरळ चढणीची होत होती.. वाट कसली.. नुसती खडकाळ.. मध्येच खड्डे मध्येच उंचवटे.. तर मध्येच लाल मातीची घसरट वाट.. पायांच्या स्नायुंना चांगलाच व्यायाम मिळत होता.. Happy अधुन मधून पावसाच्या सरी हजेरी लावत होत्या.. पण आमचा घाम मात्र निघतच होता.. पुन्हा एकत्र आलेले सगळे आपाआपल्या कुवतीनुसार मागे पुढे विखुरले गेले.. Proud काही मिनीटातच वाट डोंगराच्या कडेने जाउ लागली.. नि समोरील निसर्गदृश्य पाहुन विलक्षण गारवा वाटला.. प्रत्येक ठिकाणी थांबुन बघत रहावे असा नजारा होता.. इतकी उंची गाठली तरी अजुन बराच डोंगर सर करायचा होता.. अर्ध्याएक तासातच पुन्हा वाट जंगलात शिरली.. पावसाळी वातावरण, गर्द झाडी , धुके यांमुळे बरेचसे अंधारुन आले होते.. भुतपटात दाखवतात तसेच वातावरण होते.. माकडांचे घुमणारे "हूप हूप" आवाज नि कुठल्या तरी पक्ष्यांची सुमधुर शीळ याने मात्र तेथील शांतता भंग होत होती..

काही अवधीतच गर्द झाडीच्या जंगलातुन बाहेर पडलो नि चढण लागले.. शेवटच्या टप्प्यापर्यंत आलो होतो पण त्याचबरोबर चालही आमची मंदावली होती.. हवेतील गारवा तर विलक्षण वाढला होता.. मागे पाहीले तर गोगलगाय गतीने येणार्‍या मंडळींचा मागमुसही नव्हता.. पण प्रत्येक घोळक्याबरोबर एकेक ट्रेक लिडर राहत असल्याने चिंता नव्हती.. काही मिनीटातच आम्ही वरती पोहोचलो.. तिथे धुक्यामुळे फारच अंधुकसे दिसत होते.. बोचरी हवा अंगावर शहारे आणत होती.. अशा धुंद वातावरणात आम्ही लागलीच धरतीला पाठ टेकवली.. काहीजण आपले पाय किती सोलले गेलेत ते बघत होता (त्यात माझा मित्रही होता.. त्याची १७ ऑगस्टची देखील सुट्टी अनधिकृतपणे तेव्हाच तह झाली :P)
इथेच काही फुट अंतरावर तळे आहे.. पण दाट धुक्यामुळे (की ढगामुळे ?) तेदेखील अदृश्य झाले होते.. अर्ध्यातासातच बाकीचे पोहोचले नि एकच जल्लोष केला गेला.. सामुहीक घोळका नृत्य झाले.. डिस्को इफेक्ट यावा म्हणुन दोघा तिघांनी टॉर्च सुरु करुन झिकझ्यॅक लाईट मारु लागले.. हा जल्लोष इतक्या जोशमध्ये झाला की सगळयांचा थकवा पळुन गेला.. थंडीने आखडलेले सगळे एकदम फ्रेश झाले.. सगळेजण एकमेकांमध्ये मिसळुन गेले होते.. काही क्षणातच अंधार पडला नि मग आम्ही टॉर्च घेउन तळ्याच्या बाजुने जाणार्‍या वाटेने पुढे निघालो..
१५ मिनीटाच्या अंतरातच भीमाशंकर मंदीराच्या हद्दीत पोहोचलो.. इथेही सर्वत्र धुकेच (की ढग ? ) पसरले होते.. त्या मंदीराच्या आवारातच असलेल्या एका धर्मशाळेत आसरा घेतला.. लिडरलोकांनी आधीच बुक करुन ठेवल्याने प्रश्ण नव्हता.. पण प्रश्ण होता गुप्त भीमाशंकर नि नागफणी (भीमाशंकर डोंगरावरील सर्वोच्च टोक) कधी करायचे.. दोन्ही कडे जाण्याची वाट घनदाट जंगलातली असल्याने रात्रीची करणे फारच धोक्याचे होते.. त्यामूळे वेळेअभावी एकच काहितरी करण्याजोगे होते.. माझ्याबरोबर अनेकांनी गुप्त भीमाशंकरच्याच पर्यायाला उचलुन धरले.. नि सकाळी जायचे ठरले..
त्याच रात्री आठ्साडेआठच्या सुमारास आम्ही भीमाशंकरचे दर्शन घेतले.. गर्दी नसल्याने अगदी निवांतपणे दर्शन झाले.. चक्क गाभार्‍यात प्रवेश मिळाला.. तेदेखील शिवलिंगाजवळ जवळपास १० मिनिटे तरी बसायला मिळाले.. कोण्याएकाने हटकले नाही.. एवढे कष्ट घेउन आलो म्हणुन की काय चांगलेच फळ मिळाले होते Happy याच मंदिरासमोर चिमाजीअप्पांनी आणलेली विशाल घंटा आहे.. मंदीराच्या आवारातच दोन तीन छोटी मंदीरे नि प्राचिन दिपमाळ आहे.. तर मंदीराच्या एका बाजुला राम मंदीर आहे..
या मंदीराच्या बाजुनेच उतरणीची वाट गुप्त भीमाशंकराकडे नेते..
आम्ही सकाळीच निघालो त्यामुळे आल्हाददायक वातावरण होते.. ही वाट सुद्धा घनदाट जंगलातुन आहे.. येथुन जाताना आम्ही कुठे "शेकरु" (पंख असलेली मोठी खार.. अतिशय लाजाळु नि दिसण्यास अत्यंत दुर्मिळ असा हा जीव भीमाशंकरच्या जंगलात आढळतो) दिसतेय का म्हणुन शांततेत जात होतो.. पण आमच्या नशिबात शेकरुदर्शनाचा योग नव्हता.. Sad तेवढे कुठे आम्ही नशिबवान..
दोन ओहोळ पार केल्यानंतर वीसएक मिनीटात धबधब्याचा मोठा आवाज कानी पडला.. नि गुप्त भीमाशंकराचे ठिकाण आल्याची चाहुल लागली.. क्षणात डावीकडे धबधबा नजरेस पडला.. आम्ही लगेच ज्या ठिकाणी धबधब्याचे पाणी पडते त्या दिशेने उतरु लागलो.. जिथे पाणी पडते तिथेच एका बाजुला हे छोटे गुप्त भीमाशंकर नजरेस पडले.. त्याच्यावरतुन पाणी जात असल्याने एकाला बाजुला झोपवुन पाणी अडवण्यास सांगितले.. Happy
gupt.jpg
दर्शन घेउन सगळ्यांनी पाण्यात डुबक्या मारुन घेतल्या.. नि नाश्त्यासाठी परतीची वाट धरली..
साधारणत: ११ च्या सुमारास आम्ही गणेश घाटाने परतण्यास सुरवात केली.. शिडी घाटाने वर आल्यावर आता ह्या वाटेत काहीच दम वाटला नाही.. वाट जरी सरळ असली तरी अंतर बरेच असल्याने दमछाक करणारी मात्र आहे.. या घाटातच गणेश मंदिर लागते.. बाप्पांचे दर्शन घेउन अर्ध्या तासातच आम्ही पुर्णतः डोंगर खाली उतरलो नि ज्या पुलाजवळुन सुरवात केली होती तिथे साडेचारच्या सुमारास पोहोचलो ! परतानादेखील गोगलगाय गतीने येणार्‍यांनी अपेक्षेप्रमाणे पोहोचण्यास अजुन एक तास घेतलाच.. तोवर आम्ही गरम भजी नि चहाचा आस्वाद घेतला..
१५-१६ ऑगस्टची सुट्टीचा चांगलाच फायदा झाला.. ग्रुपही चांगला मिळाला.. नविन मित्र मिळाले.. लिडरलोक्सही अगदी मित्रत्वाने सगळे सांभाळुन घेत होते.. मी तर ठरवले पुन्हा भीमाशंकरला जायचे झाले तर शिडी घाटानेच ! नि पावसातच !! ज्यांचा पहिला ट्रेक होता त्यांना तर अभिमान वाटत होता चक्क शिडी घाटाने भीमाशंकर गाठले !! तो थरार काही वेगळाच ! वजनदार लोकांनीदेखील ठेचकाळे खात, वेदना सहन करत ट्रेक यशस्वीरित्या पार केला ते कौतुक वेगळेच होते !
शेवटी आवड, मानसिक संतुलन नि जिद्द महत्त्वाची.. (नि हो तितकीच अंगात मस्ती देखील हवी) !! Proud

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सही!!!! एकदम थरारक.. फोटो पाहूनच टरकले मी तर.. ट्रेक करणं काय असेल!!!
शिडी घाटात 'शिड्या' लावल्यामुळे त्याचं नाव तसं पडलंय का?

(नि हो तितकीच अंगात मस्ती देखील हवी) !! >>> जल्ला श्रावणी रविवारी मस्त पलंगावर बसून गरमा गरम भजी खायची सोडून (इतर रविवारी पक्ष्याची आहूती देऊन).... दगडांवर डोचकं आपटायला जायचं म्हंजी अंगात मस्ती हविच... Proud

वृत्तांत आणि फोटो बघून पुढल्या वर्षीचा बेत नक्की... Happy

धन्स दोस्तलोक्स Happy
'शिड्या' लावल्यामुळे त्याचं नाव तसं पडलंय का?
>> होय !

जिएस.. शुभेच्छा.. तुमचे पण अनुभव येउदेत मग Happy

इंद्रा.. Proud पुढल्या वर्षी नको.. जिएसबरोबरच जा !

मस्तच!!!

मी यष्टीने थेट वर गेलो होतो, तिथून उतरून देवळात जावे लागते >> ते पुणे जिल्ह्यातून गेले तर.. शिडी घाट, गणपती घाट हे कोकणातून येताना लागतात.

आम्ही एकदा भीमाशंकर ते पेठचा किल्ला असा ट्रेक केला होता (गणपती घाटातुन). जवळ जवळ १२-१४ तास लागले होते. याच दिवसात, अनंत चतुर्दशीला..

जबरदस्त रे योग्या. वाचतानाच ऐवढा थरार जाणवला तर तिथे तू किती अनुभवला असशील त्याची कल्पना येतेय.
झकासा त्याने कौतुक पण केलय रे.

योग्या, वृतांत एवढा भारी मग अनुभव तर एकदम जबरी असेल.. Proud
गुप्त शिवलिंगाचे दर्शन इथे दिल्याबद्द्दल धन्स... Happy

सही रे, शिडीघाटातून पावसाळ्यात म्हणजे भलतेच धाडस ! मी उन्हाळ्यात केला होता चढून ऊतरून.
फोटो पण मस्त !

हो.. वाटच मुळीच जंगलातुन जात असल्याने नि आधी तिथे काही लुटालुटीचे प्रकार घडलेले असल्याने शक्यतो दहा जणांच्यातरी ग्रुपने जाणे योग्य.. पाच सहा जण जात असाल तर रविवारच निवडावा.. थोडीफार वर्दळ तरी असेल..

लयी भारी! २००१ च्या ऑगस्ट मधे कर्जत खांड्स मार्गे जाऊन गणेश घाटाने वरती चढून गेलो होतो. अगदी अस्साच निसर्ग, धुके, तुंगीचं जंगल त्यातल्या प्राण्यांचे आवाज, तळं तिथे एक रात्र राहून सकाळी बसने माळशेजला आलो आणि तिथे पुन्हा दरीत अक्षरशः भटकलो. श्रावणात सोमवारी भारी गर्दी असते भीमाशंकराला. थोडं रिस्की होतच निसरड्यामुळे आणि पावसामुळे, पण इतकं निसर्गसौंदर्य उपभोगायचं असेल तर हीच सगळ्यात योग्य वेळ. खूप छान लिहिला आहेस वृत्तांत आणि फोटो सुद्धा झक्कास!
बघू माझा पुन्हा केव्हा योग येतो ते, शिडी घाट राहीला आहेच पण आता थोडं चापल्य कमी झाल्यासारखं वाटतय आणि जबाबदारीही वाढलेय, तरीही जमवूच! Happy

जबरदस्त रे ! सिप्ला कंपनीचे मित्र मिळुण २००१ साली हा ट्रेक केला होता.. कर्जत मार्गे........ मस्त पाउस अन हिरवेगार डोंगर..... लांबुन दिसणारे ते कोसळणारे धब्धबे.......... जबरी!

एक मुंबई चा ग्रुप आला होता मागे मागे...... जाम धमाल केली मग.......!

आगे पिछे हमारी सरकार्.यहां के हम है राजकुमार........ Happy

खुपच छान लिहीले आहेस. मस्तच झाला की तुमचा ट्रेक. खुप अवघड असते ट्रेक करणे हे मला माहीत आहे. मी केला आहे फेब ०९ मधे एक ट्रेक. कॅनीअन व्हॅली चा, लोणावळा-खंडाळा जवळील.
२ तारखेला आम्ही गेलो होतो भिमाशंकर ला तेव्हा आम्हाला दिसले दोन ते तीन शेकरु. आम्ही गेलो होतो गुप्त भीमाशंकर बघायला त्या वाटेवर होते आणी दोन तर येताना पायर्‍या संपता संपता एका मोठ्या झाडावर घरटयात होते. फोटो आहेत ते टाकतो नंतर.

पेठच्या किल्ल्यासमोर (उजव्या बाजूला) एक उंच खडा कडा असलेला पहाड दिसतो. तेच भीमाशंकर आहे की त्याच्या दुसर्‍या बाजूला बरेच वीजेचे मनोरे असलेला उंच डोंगर दिसतो ते भीमाशंकर आहे? हे मी कोठिंबेच्या गोविद्यापीठममध्ये उभं राहून समोर जे दिसतंय त्याप्रमाणे विचारतेय.