भगर (वरईचे तांदूळ) + आमटी - Bhagar

Submitted by योकु on 11 June, 2019 - 14:16
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

भगरीकरता-
१ वाटी भगर
अर्धी वाटी शेंगदाण्याचा जरा जाड कूट (आवडत असेल तर जरा जास्तही चालेल)
२ मध्यम बटाटे सालासकट जाड किसून
२/४ हिरव्या मिरच्या मोठे तुकडे करून
४/५ कोकमं
अर्धा चमचा जिरं
मीठ, लाल तिखट आणि साखर चवीनुसार
साजूक तूप किंवा शेंगदाण्याचं तेल

आमटीकरता-
अर्धी वाटी दाण्याचा कूट
८/१० कोकमं
लाल तिखट, मीठ, साखर चवीनुसार
फोडाणीकरता तूप, जिरे आणि आवडत असेल तर बोटभर आल्याचा तुकडा किसून

क्रमवार पाककृती: 

भगर
भगर एकदा निसून घ्यावी
एका पॅनमध्ये तेलाची फोडणी करून त्यात जिरं घालावं ते फुललं की हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालावेत आणि वर भगर घालून मंद आचेवर परतायला घ्यावं. यातच आता कोकमं आणि बटाट्याचा कीस घालून पुढे परतत राहावं.
चांगली परतली गेलेली भगर दाणेदार आणि शुभ्र दिसते.
या स्टेजला आता मीठ, साखर, लाल तिखट (थोडसंच) घालून वर ३ वाट्या पाणी घालावं. दोन वाफांत भगर चांगली फुलते.
आता यात दाण्याचा कूट आणि जरा मऊ व्हावी म्हणून अजून अर्धी वाटी पाणी घालून दोन सणसणीत वाफा येऊ द्याव्यात.
वाफाळती, कोकमाचा जरासा गुलाबी रंग असलेली टेष्टी भगर आमटीबरोबर गरमगरमच खावी.

आमटी
मिक्सरच्या भांड्यात कोकमं, दाण्याचा कूट, लाल तिखट, मीठ आणि साखर हे गंधासारखं वाटावं. तुपाची जिरे फुलवून फोडणी करून (घेतलं असेल तर आलं फोडणीतच घालावं) त्यात हे वाटण ओतावं. आता यात जसं दाट पातळ हवं त्यानुसार पाणी घालून दणदणीत उकळी येऊ द्यावी आणि एक ५/७ मिनिटं तरी उकळू द्यावं. आमटी तयार आहे. याला कोकमाचा सुरेख रंग येतो.

वाढणी/प्रमाण: 
२ लोकांना पोटभरीचं पुरतं
अधिक टिपा: 

भगर घेतांना जपून. मुळात ती भरपूर फुलते + त्यात कूट आणि बटाटा पडणार आहे. पेशंस ठेवून एक १० मिनिटं तरी परतणं काम करायचंय.
घरातले काही लोक्स (सांगायलाच हवंय का? आं) दही घालून करतात पण मला तो प्रकार अजिब्बात नाही आवडत. विचित्र वास असतो भगरीला दह्याचा असं वाटतं मला. काही केल्या तो जात नाही (समज).
आमटी भगर गरम गरम करावी आणि मटकावून मोकळं व्हावं गार भगर चांगली लागत नाही
ही लोखंडी कढईत करू नका. कोकमामुळे अक्षरशः काळी भगर होते
यात लाड करायचे नाहीत; उपासाचे प्रकार ना हे?
लाडाचा हा एक प्रकार - चारदोन मिरे, बारका दालचिनीचा तुकडा + बटाट्याच्या आणि लाल भोपळ्याच्या फोडी + जरा काजू घालून मोकळी शिजवली तर भगरीचा उपासाचा पुलाव म्हणता येऊ शकेल.
Bhagar recipe in marathi

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भगर करताना मी कोकमां ऐवजी ताक घालते.खरंतर कधी लक्षात आले नव्हते की कोकम घालावे म्हणून.फोडणीत कढीलिंब घालते,त्याचा वास नी स्वाद चांगला येतो .
बाकी दाण्याच्या आमटीच्या रेसिपीकरिता धन्यवाद!

आमटी भगर गरम गरम करावी आणि मटकावून मोकळं व्हावं गार भगर चांगली लागत नाही>> अगदी अगदी! माझ्या चविला मी जरा आसटच आणी थोडी तिखटसरच करते भगर, आमच्याकडे सासरी बरोबर दह्यातली आमटी करतात.

मस्त मस्त.

ह्याला आम्ही फोडणीचे वरीचे तांदूळ किंवा वरीची उपासाची खिचडी म्हणतो आणि सोबत ही दाण्याची आमटी . वरीच्या खिचडीत बटाटा नाही घालत त्याऐवजी आम्ही दाण्याच्या आमटीत घालतो, उकडलेला बटाटा.

मी प्युअर व्हाइट भगर पक्षी व र्‍याचे तांदूळ. दाण्याची आमटी, चिंच घालून . पुणेरी असल्याने कोकम थिंग इज नॉट देअर इन माय किचन.
सोबत उपासाची बटाट्याची भाजी. बरोबर गुड क्वालिटी दही किंवा काकडी ची दह्यातली कोशिंबीर. मी उपासतापास नाही करत. एकाद्या दिवशी
मूड आला तर असेच करते.

छान आहे पाकृ.. अशी करून बघायला हवी आता कोकम घालून Happy
प्रत्येक एकादशी ला करते, थोडी वेगळी पद्धत आहे माझी.. तुपाची फोडणी करते, त्यात जिरं, हिरव्या मिरच्या, काकडीचा कीस किंवा बटाट्याचा कीस परतून घेऊन मग भगर टाकते.. आणि हो दही आणि दाकू हवंच मला

फोटो कुठाय रे?
त्याशिवाय रेस्पी नापास असते भावा.

आमच्याकडे सुद्धा अमा ची रेसिपी असते भगरीची. लिंबाच्या गोड लोणच्यासह. कधीतरी बटाटा पापड भरीस.

मला यात गुळ घालून बनवलेला भात खूप आवडतो. उपवासाला मी हाच पदार्थ खातो. आमच्यात तिखट व गोड प्रकाराला भगरीचा भात असे म्हणतात. भगरीच्या भाकरी/थालिपीठं ही खूप टेस्टी लागतात, त्या आमच्याकडे बटाट्याची कांदा लसूण न घातलेल्या सुक्या भाजीबरोबर खातात.

रेसिपी छान.
मी प्युअर व्हाइट भगर पक्षी व र्‍याचे तांदूळ. >> म्हणजे??

आमच्याकडेही भगर-आमटी असेल तर भगर नुसतीच थोडे मीठ घालून शिजवतात. आमटी चिंच-गूळ / ताक अशी अदलून बदलून होते. चिंच गुळाची जास्त छान लागते. अजिबात आंबट काहीही न घालता सुद्धा होते. ती सुद्धा चांगलीच लागते.

सासरी फोडणीची भगर असते..त्यात जिरे, बटाटा, दाण्याचे कूट असते. माहेरी उपासाला जिरे चालत नाहीत. उपासाला फारसे खाण्याचे लाड न करण्याची माहेरची पद्धत. त्यामुळे नुसत्या कुटाची भगर करतात. ती तशीही चांगली लागते. गरम असेल, तर वरून तूप घेऊन, हवं असल्यास दह्यासोबत खातात. अशी कुटाची थंड भगर वरून दही +दूध किंवा ताक घालून खायला मला स्वतः ला खूप आवडते!!!

फोडणीची भगर असते..त्यात जिरे, बटाटा, दाण्याचे कूट असते. > >>>ही कशी करतात? साधारण साबुदाणा खिचडीसारखी वरीच्या तांदुळाची खिचडी खाल्लीय. पण वरीचे तांदुळ कधी स्वतः वापरले /बनवले नाहीत. साबुदाण्यासारखे भिजवतात की भातासारखी दुप्पट पाणी घालुन शिजवायचे?

ऑल टाईम फेव्हरीट. लाल तिखटाऐवजी आम्ही हिरवी मिरची घालतो. आमटी बरोबर खायची असल्याने भगरीचे लाड नाहीत. जर आमटी करायची नसेल तर रुचिरात सांगितल्याप्रमाणे तुपाच्या फोडणीत दालचिनी, लवंग पावडर घालून बटाटा, दाण्याचे कूट, थोडासा गूळ, कोकम घालून भगर खिचडी करायची.

आमच्याकडेही भगर फक्त मिठ टाकून शिजवतात. मी बरेचदा भिजवलेली भगर वाफऊन करतो खुसखुस (Couscous) सारखी. यापध्दतीने करुन पहायलाच हवी.

फोडणीची भगर असते..त्यात जिरे, बटाटा, दाण्याचे कूट असते. > >>>ही कशी करतात?
वर दिलेली रेसीपी फोडणीच्या भगरीचीच आहे ना? Uhoh

भगर म्हणजे वरी हे धान्य गिरणीत भरडून बनवली जाते. भारतात फक्त घोटी इथे भगर मिल आहेत. साळीपासून तांदूळ बनवतो तसं वरई पासून भगर बनते. आदिवासी भागात मी न कांडलेली वरई मिठ घालून शिजवून खाताना पाहिली आहे व खाल्ली सुध्दा आहे. आजकाल मिलेट म्हणजे तृणधान्ये विषयी बरीच जागृती होत आहे. वरई बरोबर सावा, भादला, कोद्रा असे बरेच जंगली धान्य आहे. नागली वरई शेती सारखीच असते.