वाघाची डरकाळी, ५० डेसिबेल आणि घराणेशाही ……….

Submitted by विशाल कुलकर्णी on 18 October, 2010 - 02:48

“माझी स्टाइल चोराल, पण विचारांचं काय. माझे विचार त्या स्टाइल चोरात येणार नाही. मराठीचा मुद्दा घेऊन जनतेत जाताहेत. तुमचा जन्म झाला नव्हता तेव्हापासून मी मराठीचा मुद्दा हाती घेतला होता. हा जमलेला जनसागर याची साक्ष देतो!”

शिवतिर्थावर शिवसेनेचा वाघ पुन्हा एकदा गरजला. काल विजयादशमीच्या निमित्ताने नेहमीप्रमाणे होणार किं नाही होणार, सायलेंट झोन, ५० डेसिबेल अशा अनेक समस्यांमध्ये गुरफटलेला शिवसेनेचा दसरा मेळावा वाजत गाजत पार पडला. शिवसेनेच्या वाघाने पुन्हा एकदा आपल्या खास शैलीत डरकाळी फोडली. आपल्या खुमासदार भाषणात साहेबांनी अनेक मुद्दे मांडले, अनेकांवर शरसंधान केले. त्यांची माहिती जवळजवळ सर्व मुख्य वर्तमानपत्रांतून आलीच आहे. या सभेत ५० डेसिबेलची मर्यादा ओलांडुन ९०-९५ डेसिबेलपर्यंत आवाज वाढला. खरेतर वाघाच्या डरकाळीला आवाजाची मर्यादा घालायची हाच मुर्खपणा वाटतो मला. वर्षातून एकदा येणार्‍या दसरा मेळाव्याला तरी हा नियम अपवाद ठरावा असे माझे प्रामाणिक मत आहे. कदाचित ते चुकही असेल पण एक सच्चा शिवसैनिक या नात्याने मलातरी असे वाटते. असो, आता किमान आठवडाभर हा मुद्दा मिडीयावाले चघळत राहतील. निखील वागळेंच्या आवाजाला अजुन धार चढेल. सामान्यजनातही हा मुद्दा वारंवार उगळला जाईलच. त्यामुळे त्यावर मला काहीही भाष्य करायचे नाही. तो माझा प्रांतही नाही.

मला माझ्या ब्लॉगवर त्याची दखल घ्यावीशी वाटली त्याचे कारण म्हणजे साहेब म्हणाले की…..

“शिवसेनेत घराणेशाही अजिबात नाही!”

यावेळी साहेबांनी केलेले विधान सॉलीडच आहे…

“शिवसेनेत घराणेशाही बिल्कुल नाही, असे सांगत बाळासाहेब म्हणाले, उद्धव ठाकरे यांना कार्याध्यक्ष त्या कृष्णकुंजवाल्यांनी केलं. मला समजल्यावर मी भडकलो. मी म्हटलं शिवसैनिकांना विश्वासात घेतल्याशिवाय आणि मी ठरविल्याशिवाय हे होता कामा नये. त्यानंतर शिवसैनिकांनी स्वतः उद्धव ठाकरे यांची कार्याध्यक्षपदावर नियुक्ती केली, असेही आवर्जुन सांगितले. आमच्याकडे घऱाणेशाही नाही.”

गंमत अशी की साहेबांच्या म्हणण्याप्रमाणे कृष्णकुंजवाल्यांनी म्हणजे राजनीच उद्धव ठाकरे यांना कार्याध्यक्ष केलं आणि वर हे आपल्याला आवडलं नाही म्हणून शिवसेनेचा त्याग केला. खरं खोटं राजना आणि साहेबांनाच माहीत, वाईट या गोष्टीचं वाटतय की हे सगळं बोलताना साहेब एका गोष्टीकडे सरसकट दुर्लक्ष करताहेत की शिवसेनेपासून तूटून राजने स्थापन केलेली मनसेना फार थोड्या काळात शिवसेनेला आव्हान देण्याइतकी सक्षम झालीये. शिवसेनेच्या जागा घेणे जरी फार प्रमाणावर मनसेला शक्य झालेले नसले तरी मनसे फॅक्टरमुळे शिवसेनेचा फार मोठा मतदार शिवसेनेपासून दुरावत चाललाय. इतकी वर्षे शिवसेनेसी एकनिष्ठ असलेले, कधीही कुठल्याही पदाची अपेक्षा न केलेले बाळा नांदगावकर, शिरीष पारकर यांच्यासारखे कित्येक कट्टर शिवसैनिक शिवसेनेची इतक्या वर्षाची साथ सोडून राजबरोबर जातात. छगन भुजबळांसारखा ज्याने शिवसेना महाराष्ट्राच्या काना-कोपर्‍यात पोचवली असा खंदा कार्यकर्ता शिवसेना सोडताना घराणेशाहीचाच आरोप करतो. आणि शिवसेनेत घराणेशाहीला तिळमात्रही जागा नाही म्हणताना दसर्‍याच्या शुभमुहुर्तावर आदित्य ठाकरेंचे जोरदार लाँचींग केले जाते. किती कोलांट्याउड्या मारल्या जाणार आहेत अजुन?

त्यातही पुन्हा, गेली कित्येक वर्षे विद्यार्थीसेनेसाठी आपले सर्वस्व पणाला लावणारे अनेक युवा नेते जे विद्यार्थीसेनेतच म्हातारे झाले, त्यांना डावलून शिवसैनिकांनी (?) पुन्हा एकदा आपल्या सुज्ञपणाचा (?) दाखला देत युवासेनेच्या नेतृत्वासाठी काल आलेल्या, इथल्या संघर्षाचा, महाराष्ट्रातील परिस्थितीचा फारसा अनुभव, अभ्यास नसलेल्या आदित्य ठाकरेंची निवड केली. गेल्या दोन वर्षात आदित्य तसे स्थानिक राजकारणात बर्‍यापैकी सक्रीय आहे, म्हणजे चांगल्या दर्जाच्या कॉलेजकँटीन्ससाठी उठवलेला आवाज सद्ध्याचे "सच अ लाँग जर्नी" च्या संदर्भात गाजत असलेले वादग्रस्त आंदोलन. पण तेवढे पुरेसे नाहीये.

हे म्हणजे काँग्रेसजन जे वर्षानुवर्षे करत आलेले आहेत… म्हणजे इंदिराजीं, संजय, नंतर राजीवजी नंतर सोनीया आणि मग आता राहूल………..! तरीही ते म्हणतात आमच्याकडे घराणेशाही नाही हा जनमताचा कौल आहे. काँग्रेसला विरोध करत मोठ्या झालेल्या शिवसेनेतही आता तेच होतय…. साहेब शिवसेना सांभाळत होते तोपर्यंत माझ्यासारखा सर्वसामान्य शिवसैनिक सर्वस्वाने शिवसेनेला बांधलेला होता. पण साहेबांच्या नंतर आता उद्धव आणि त्यानंतर आदित्य….! शिवसेनाही त्याच मार्गाने चाललीये आणि साहेब म्हणताहेत शिवसेनेत घराणेशाही अजिबात नाही हा शिवसैनिकांचा कल आहे. मला वाटतं शिवसेनेचं भलं कशात आहे हे साहेबांना माझ्यापेक्षाही जास्त चांगल्या पद्धतीने कळतं, मग उद्धवजींच्या वेळचा ताजा अनुभव पाठिशी असताना पुन्हा युवासेनेची कमान आदित्यच्या हाती सोपवून एकप्रकारे घराणेशाहीलाच प्रोत्साहन देणं योग्य आहे का? आदित्यकडे तेवढा अनुभव, तेवढी ताकद आहे का? किंवा जर आदित्य हे उद्धवजींचे सुपूत्र नसते तर हे युवराजपद, युवासेनेचे नेतृत्व त्यांना मिळाले असते का?

कधी कधी शंका येते की जे उद्धवजींच्या बाबतीत झाले, म्हणजे त्यांचा राजकारणात उशीरा झालेला प्रवेश, त्यामुळे उठलेले वादळ या सर्व गोष्टी आदित्यच्या बाबतीत पुन्हा फेस कराव्या लागू नयेत म्हणून तर अवघ्या २० व्या वर्षी आदित्यचा युवराज म्हणून राज्याभिषेक करण्यात आला नसावा? म्हणजे अजुन ५-१० वर्षात आदित्य राजकारणात मुरतील आणि तथाकथीत निष्ठावंत शिवसैनिक (?) उद्धवजींच्या नंतर कार्याध्यक्ष म्हणून आदित्यची निवड करायला सिद्ध होतील. कुणालाही बोलायला जागाच उरणार नाही. आता इतके वर्षे शिवसेनेसाठी खस्ता खाल्लेले निष्ठावंत, ज्येष्ठ शिवसैनिक तोंड दाबून बुक्क्यांचा मार असे म्हणत मनोमन बोटे मोडत वरवर नव्या युवराजांचा जयजयकार करतील म्हणा, पण त्यांना कोण विचारतो? मग त्यांच्यापैकी काहीजण आतल्या आत दुखावल्या जावूनही येणार्‍या संधीची वाट बघतीलही कदाचित, पण ज्यांच्याकडे वाट बघण्याइतकी सहनशीलता नाही त्यांनी संधी निर्माण करण्याचा जर प्रयत्न केला तर त्याचा दोष शिवसेनेच्या नेतृत्वालाच जाणार आहे हे निश्चित ! सुरूवात तर झालीय कडोंमपा निवडणुका तोंडावर आलेल्या असतानाच डोंबीवलीतील १०० च्यावर शिवसेना पदाधिकार्‍यांनी राजीनामे सादर केले आहेत आणि ते आपल्या निर्णयावर ठाम आहेत. निष्ठावंतांना डावलून नेतृत्वाच्या पुढे-पुढे करणार्‍यांनाच तिकीटे देण्यात आल्याची जुनीच तक्रार पुन्हा डोके वर काढतेय. ज्यांना साहेब कडवट शिवसैनिक म्हणून अभिमानाने संबोधायचे तोच कडवा शिवसैनिक आता निराश होवू लागलाय, आपल्या निष्ठेची इथे कुणाला कदर राहीलेली नाही ही भावना जोराने वर येतेय. आता या समस्येवर साहेब काय उपाय करणार आहेत?

बाळासाहेब ठाकरे या नावापेक्षाही बाळासाहेब ठाकरे या विचाराकडे आकर्षित झालेला माझ्यासारखा सामान्य शिवसैनिक आता काळजीत पडलाय. कारण विचाराची जागा आता व्यक्तीने घेतलीय की काय अशी परिस्थिती निर्माण झालीय. मराठी, मराठी माणुस, हिंदुत्व असे कळीचे मुद्दे फक्त राजकीय हेतुने बरबटल्यासाराखे वाटताहेत. मला वाटतं आता खरोखर शिवसेनेवर आत्मपरीक्षणाची वेळ आलेली आहे. जे काही होतय, चाललेय ती घराणेशाही नाही असे खरोखर साहेबांना वाटत असेल तर माझ्यासारख्या प्रामाणिक शिवसैनिकाची शिवसेनेला रामराम करायची वेळ झालेली आहे असे वाटतेय.

असं जर झालं तर हे खरंच खुप चिंताजनक आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातील एका तेजस्वी पर्वाचा अंत जवळ आला आहे काय?

एक अस्वस्थ आणि व्यथित शिवसैनिक !

गुलमोहर: 

विशल्या.. छान मांडलं आहेस. मी सुद्धा एक सच्चा शिवसैनिक पण पक्षविरहीत.. Happy कालचं भाषण खरोखर जबरदस्त होतं, बरेच खुलासे केले बाळासाहेबांनी..युवासेनेचं नवं आकर्षण.. एक नवी पिढी भरपूर हिम्मत अन नवी स्वप्ने घेऊन महाराष्ट्र तरूण वर्गासमोर येते आहे तेव्हा ह्या दलदलीच्या राजकारणात तीला कितीसा पाय रोवता येणार आहे हे तीचे भविष्यातले कार्यच ठरवेल.

शिवसेनेचा स्वतःचा असा मतदार उरलेला नाही. मराठी-हिंदुत्व-ओबीसी, या तिनही एकमेकाला छेद देणार्‍या गोष्टींवर एकाचवेळी पकड मिळवण्याच्या प्रयत्नात सगळेच हातून गेले आहे. ग्रामीण भागात, राष्ट्रवादीचा जन्म होण्याआधी असंतुष्ट कार्यकर्त्यांना शिवसेना ही जागा होती, आता तेही संपले. उमेदवार ठरवताना, 'निवडून येउ शकणे' हा सत्ताकारणाचा एकमेव निकष सोडून मातोश्रीच्या जवळचा कोण या मुद्द्यावर निर्णय होउ लागले, उदा.सोलापुरात शिवसेनेची लागलेली वाट. हाच प्रकार कमीअधिक प्रमाणात सगळीकडेच झाला आहे.

मी लहापणापासून शिवसेनेची वाटचाल बघतोय. आता शिवसेनेचा वैचारिक गोंधळ झालाय असे वाटतेय. हळूहळू पण निश्चितपणे सेनेचा प्रभाव कमी होतोय.

भारतामध्ये पूर्वी राजेशाही होती आणि आता तीच राजकारणामध्ये घराणेशाही म्हणून पुढे चालत आहे. बाळासाहेब ठाकरे यांची अपरिहार्यता आणि असहाय्यता त्यांना असे निर्णय घेण्यास (कि आजूबाजूचे स्व घोषित नेते दबावामुळे ) भाग पडत आहे. कारण सेनेमध्ये आता कोणी दखल घ्यावे असे नेते नाहीत. परत कधी चुकून माकून युतीची सत्ता आली तर कंट्रोल असावा, पण असे जर घडलेच तर त्यानंतर पुन्हा कधी शिवसेना पक्ष म्हणून उभा राहू शकणार नाही. कारण सगळेच मलिदा खाण्याकरता तुटून पडणार.
आदित्य ठाकरे बद्दल म्हणाल तर, आमचे पिताश्री पण जर कार्याध्यक्ष (कुठल्याही पक्षाचे) असते तर, आम्ही पण युवा पक्षाचे नेते झालो असतो.

>>इतकी वर्षे शिवसेनेसी एकनिष्ठ असलेले.......................आणि शिवसेनेत घराणेशाहीला तिळमात्रही जागा नाही म्हणताना दसर्‍याच्या शुभमुहुर्तावर आदित्य ठाकरेंचे जोरदार लाँचींग केले जाते. किती कोलांट्याउड्या मारल्या जाणार आहेत अजुन?

कालच्या भाषणातला विरोधाभास जाणवला मला. तो तू अत्यंत छान मांडला आहेस Happy
एकंदर कठीण आहे.

विशाल , कालच्या भाषणातील व कृतीतील विरोधाभास छान मांडलायस.
'कोणता हा झेंडा घेऊ हाती?' अशीच कार्यकर्त्यांची अवस्था झाली असावी.

परंपरा आहे, म्हणून दसरा मेळावा करायचा एवढेच. कुठचाही ठोस कार्यक्रम नाही, कुठे जातो आहोत, ते माहिती नाही, इच्छाही नाही- अशी त्यांची सध्या अवस्था आहे. कालचे डेसिबल वाढले असतीलही. पण ते हतबलतेतून वाढल्यागत वाटले. ते डरकाळ्यांचे आणि गर्जनांचे डेसिबल नाही वाटले. शिवसेना आणि बाळासाहेबांचा करिश्मा लयास जाऊ लागल्याच्या पडघमांचे डेसिबल वाटले. घराणेशाही नाही तर निष्ठावंतांनी शिवसेना का सोडली? आणि घराण्याच्या वारसांना स्टाईल कॉपी करण्यापासून कुणी अडवले होते काय? बाळासाहेबांच्या एक शतांश तरी करिश्मा त्या उद्धव नावाच्या माणसात आहे काय? आदित्य तर दूरच. उद्धवची कार्यशैली आणि शिवसेनेचे रीतसर संस्थान बनवण्याचा त्याने घातलेला घाट हा तर स्वतंत्र आणि मोठा विषय आहे. बाळासाहेब अनेक सामान्य शिवसैनिकांसाठी आणि जनतेसाठी अक्षरश: लार्जर दॅन लाईफ झाले होते. पण एक्झॅक्टली याच कारणाने शिवसेना उतरणीस लागल्याचे बघणे हे वेदनादायक आहे. 'तुमच्या हट्टाग्रहांमुळे एक वेळ अशी येईल बाळासाहेब, की तुम्ही मागे वळून पाहाल, तेव्हा कुणीच तुम्हाला दिसणार नाही..' असं नाना पटेकर एकदा जाहीरपणे बोलला होता, ते आठवल्याशिवाय राहत नाही.

आवाज कुणाचा ..... हे केवळ ५० डेसिबेल्स मध्ये बसणे अशक्यच.
सेना बदलली असेलही कदाचित पण शिवसेनेकडे पाहण्याचा दृष्टीकोन मात्र सर्वांचाच बदललेला दिसतोय. (IMO)

'तुमच्या हट्टाग्रहांमुळे एक वेळ अशी येईल बाळासाहेब, की तुम्ही मागे वळून पाहाल, तेव्हा कुणीच तुम्हाला दिसणार नाही..' असं नाना पटेकर एकदा जाहीरपणे बोलला होता, ते आठवल्याशिवाय राहत नाही.

यावर बाळासाहेबही कोण तो मच्छर ? मी त्याला किंमत देत नाही अस म्हणाले. याची किंमत भोगुन पुन्हा नानाला या गणपतीत भेटुन झाले.

१९८९ पासुन मराठी माणसाने शिवशाहीचे स्वप्न पाहिले. त्याला दुरदृष्टीने नसलेल्या एकट्या बाळासाहेबच नाही पण शिवसेनेच्या आणि फुटुन निघालेल्या मनसेच्या नेत्यांनी सुरुंग लावला.

किमान पक्षी जुन्या जाणत्या शिवसेना कार्यकर्त्याच्या म्हणण्याला मान देऊन दोन्ही पाती एकत्र व्हाव्यात. आता सर्वच पक्षात लाचारीची लागवड झाली आहे. त्यात हुशार नेते कधी मोठी पाती तर कधी धाकटी पाती करीत आणखी वाट लावतील.

रंपरा आहे, म्हणून दसरा मेळावा करायचा एवढेच. कुठचाही ठोस कार्यक्रम नाही, कुठे जातो आहोत, ते माहिती नाही, इच्छाही नाही- अशी त्यांची सध्या अवस्था आहे. कालचे डेसिबल वाढले असतीलही. पण ते हतबलतेतून वाढल्यागत वाटले. ते डरकाळ्यांचे आणि गर्जनांचे डेसिबल नाही वाटले. शिवसेना आणि बाळासाहेबांचा करिश्मा लयास जाऊ लागल्याच्या पडघमांचे डेसिबल वाटले>>>>>>>
अगदी माझ्या मनातले बोललास साजिर्‍या ! मुळातच आता कुठला नवीन आणि नेमका मुद्दाच उरलेला नाहीये शिवसेनेकडे. एक मराठीचा मुद्दा होता त्यातही आता वाटेकरी आलाय Wink कालचे भाषण म्हणजे निव्वळ सारवासारव वाटली.

नितीनजी आता ही दोन्ही पाती एकत्र येणे शक्य नाही. कारण दोघांचेही इगो प्रबळ आहेत. मुळात मराठी किंबहुना महाराष्ट्रीय माणसाबद्दल यांना कितपत आपुलकी आहे याचीच शंका येतेय. Sad

छान लेख विशाल !
उमेदवार ठरवताना, 'निवडून येउ शकणे' हा सत्ताकारणाचा एकमेव निकष सोडून मातोश्रीच्या जवळचा कोण या मुद्द्यावर निर्णय होउ लागले, >>>> आगाऊ मला वाटतं , शिवसेना सोडुन गेलेल्यांच्या मते सगळ्यात मोठा निकष होता कोण मोठी थैली देऊ शकतो आणि कोण नार्वेकरच्या मर्जीत बसु शकत.
एक मात्र निश्चित आहे की बाळासाहेबांचा आणि शिवसेनेचा करिष्मा लोप पावत चाललाय , वाईट वाटतं एका मातब्बर मराठी पक्षाची उतरण बघताना.

सगळेच पक्ष एका माळेचे मणी आहेत, जनसामान्यानीं टॅक्स भरायचा, आणि यानीं पोस्टरबाजी करत सभा, दौरे घेवून उधळायचे Sad

कारण विचाराची जागा आता व्यक्तीने घेतलीय की काय अशी परिस्थिती निर्माण झालीय.>>> विचार आहे असा आपला फक्त गैरसमज होता... खरा डाव तोच आहे जो महाराष्ट्रातल्या बहुतांश घराण्यांनी खेळला. खुर्ची हाच परमेश्वर... छान लिहीलयसं. हा विचार उघडपणे मांडला गेला पाहिजे तरच मराठी माणूस या मुद्द्यावर जनतेची दिशाभूल करणार्‍यांना हे कळेल की आंधळेपणाने पाठीमागून धावणारी पिढी संपली. जागृत आणि निर्णयक्षम युवा पिढीला फसवता येणार नाही.

विशाल,
लेख छान आहे.. बाळासाहेबांबद्दल अन त्यांच्या कार्याबद्दल मला वाटतं आजही सर्वच शिवसैनीकांना आदर आहे. एक राजकीय व्यक्तीमत्व म्हणून मला त्यांच्या एकंदर कारकिर्दीचं कौतूक आहेच पण प्रत्त्येक गोष्टीला संदर्भ असतोच- शिवसेनेची स्थापना, मुद्दा, विचार, प्रसार याला ७०-८० च्या काळात जो संदर्भ होता आणि त्यायोगे जे अनुकूल जनतेचे मत होते ते सर्व आता नाहीये.
अगदी राम मंदीर सारख्या राष्ट्रीय मुद्द्यावरून देखिल जनता पुढे गेली आहे- जनतेला वारंवार मूर्ख बनवता येणार नाही हे आता सिध्द झालय.
तेव्हा तेच तेच जुने मुद्दे घेवून सेना काय कुठलाच पक्ष फार काळ तग धरू शकणार नाही हे सत्त्य आहे. मनसे ची "पोच" फक्त मराठी माणसाचा मुद्दा याच रिसायकलिंग तत्वात आहे- पण एका ठराविक काळानंतर तेही संपेल, संपत आहे. आज मराठी माणसाला खुद्द मराठी म्हणून नव्हे तर "सक्षम" अन "लायक" म्हणून संधी मिळत आहेत, हव्या आहेत- हा मोठा मानसिक बदल मध्यम वर्गीय पिढीत झाला आहे. मध्यम वर्ग हा शिवसेनेचा पहिल्यापासून भक्कम आधार होता- पण त्यांच्या बदलत्या मानसिकतेला अन बदलेल्या गरजा, प्रश्ण, प्रायोरिटीज ना डावलून नुसतच मराठी चा मुद्द धरून सेना काय किंवा मनसे काय कुणीच जास्त काळ तग धरू शकणार नाही.
मला एकंदरीतच असं वाटतय की आता आपला मध्यम वर्गीय समाज कुठला पक्ष, कोण नेता, या पेक्षा "अजेंडा काय, कामगिरी काय, भविष्याची योजना काय" या गोष्टींना अधिक मह्त्व देतो.

असो. घराणेशाही ही राजकारणात अगदी १९४७ पासून आहे त्यात नविन काहीच नाही. पण निदान गांधी घराण्यातील नविन पिढीने नविन समस्या अन नविन भविष्य यावर लक्ष केंद्रीत केले- त्याचे चांगले परिणाम अन जनतेचा कौल त्यांच्या बाजूने लागला. महाराष्ट्रात किंवा एकंदर मराठी घराणेशाहीतील लोक एकमेकां निव्वळ पाय ओढण्यात किंव्वा पैसा ऊपटण्यात गर्क असल्याने जनतेने त्यांना नाकारले आहे हे सत्त्य जितक्या लवकर ते पचवतील तितके बरे. बाकी आजकालच्या मिडीया धंद्यात- रोज एका नविन युवराजाचा राज्याभिषेक होत असतो त्यात काही विशेष नाही. हेच मिडीयावाले पुन्हा युवराजांचे पतन चघळायला काही काळाने एकत्र येतात- शेवटी "आज धंदा कशावर चालतोय याला महत्व आहे".

विशाल हा खरे तर तुमचा आणि साहेबांचा प्रश्न आहे. आणि तुम्ही हा विचार 'सामन्या'त मांडला असता तर अधिक औचित्यपूर्ण झाले असते आणि बालासाहेबांच्या नजरेसही आले असते आणि त्यानी आत्मपरिक्षणही केले असते. अजूनहे करा वेळ गेलेली नाही. नार्वेकराना देखील दिले तरी चालेल वाचायला , ते सामन्यात छापून आणतील. सामान्य मराठी माणसानी त्याना १९९५ ला संधी दिली होती करंटेपणाने त्यानी ती घालवली . आता शिवसेना संपली काय अन बहरली काय सामान्य माणसाना त्याचे काहीही सोयरसुतक राहिलेले नाही. पाटक्या शिवसैनिकांची मनगटे गळे सोन्याच्या लगडीनी भरून गेलेले अन खेड्यापाड्यातले शिवसैनिक काळ्या काचांच्या गाडीत अदृष्य झाले. अरे काँग्रेसने हे केले म्हणून तुम्हाला बसवले तुम्ही तर त्याच्याही पुढचे निघाले.कॉन्ग्रेसच्या विद्यापीठातच तुम्हीही डिग्र्या घेतल्या.

म्हणे मराठी माणूस! चन्द्रिका केनिया, प्रीतीश नन्दी , राजकुमार धूत, पी सी अलेक्झान्डर हे कोण तुमचे मेव्हणे की पाव्हणे? मराठी माणसानी का मते द्यावीत तुम्हाला?

ठाकरे कुटुम्बियापैकी बेळगावला जाऊन सीमावासियांची शेवटची भेट कधी व कोणी घेतली होती?

लेखही छान आणी प्रतिसादही.
आणि शिवसेनेत घराणेशाहीला तिळमात्रही जागा नाही म्हणताना दसर्‍याच्या शुभमुहुर्तावर आदित्य ठाकरेंचे जोरदार लाँचींग केले जाते.

आपल्या उक्ती आणी कृतीतला हा विरोधाभास बाळासाहेबांसारख्या कसलेल्या व्यंगचित्रकारालाही दिसू नये ?

छान लिहिलयस विशाल.
घराणेशाही नाही असं फक्त म्हणायच आणि कायम उद्धवला झुकते माप देण्याचं काम साहेबांनी केलय. मला वाटतं की त्याचवेळी राज कडे नेतॄत्व दिलं असतं तर कदाचित वेगळं चित्र दिसलं असतं. उद्धव ला कार्याध्यक्ष केलं ते कॄष्ण्कुंजवाल्यांनी असं म्हणताना आपलीच अगतिकता दाखवून दिली बाळासाहेबांनी.

मी हिटलर्,माझाच कंट्रोल वगैरे म्हणणार्‍या बाळासाहेबांनी तेव्हाच उद्धवला का दूर केलं नाही त्या पदावरुन? शेवटी येन केन प्रकारेण सत्ता महत्वाची, ती आपल्याच कुटुंबात राहिली पाहिजे ह्याच हव्यासापायी आता युवराज आदित्य मैदानात उतरलेत. बाकी युवराजांचं कर्तॄत्व शुन्य. रोहिंग्टन मिस्त्रीचं पुस्तक त्याने पुर्ण वाचलंही नसेल पण त्यावरुन वादळ उठवून देऊन आपलं नाव चर्चेत आणलं एवढच युवराजांनी केलय.

सुंदर लेख!!

पण दरवेळी निवडणुकांमध्ये हाच प्रश्न पडतो की "मत द्यायचं कोणाला??".. म्हणून मग त्यातल्या त्यात बरा, अशाला द्यावं लागतं.. मतदानावर बहिष्कार हे जोपर्यंत अक्खा मतदारसंघ करत नाही, तोपर्यंत प्रभावी नाही.. (म्हणजे कधीच नाही!!)

मतदारांपुढे उमेदवाराला स्वत:वर लादून घेण्याशिवाय पर्याय उरला नाही, हे खरं!

बाळासाहेबांच आता वय झालय आणि त्यांनाही कळुन चुकलय कि शिवसेनेची जी ओळख त्यांनी निर्माण केलीय ती उद्धवला कायम राखता येणार नाहीय. आणि म्हणुन या वयातही ते जीवाचा आटापीटा करुन सभा गाजवतायत. राज ठाकरेंनी जो एकहाती करिश्मा दाखवलाय तो उद्धवला कधीच जमणार नाही. आणि बाळासाहेब जर राज ठाकरेंवर विचार, स्टाइल चोरण्याचे आरोप करतायत पण जर ते खरे असतील तर मराठी माणुस काही वेडा नाहीय की आंधळेपणाने राज ठाकरेंवर विश्वास टाकायला. बाळासाहेब हे आदरणीय आहेत पण वस्तुस्थीतीकडे मराठी जनता दुर्लक्ष कस करेल?
एवढ वय झाल तरी शिवसेनेची डागडुगी करायला बाळासाहेबांना याव लागत ही लाजीरवाणी गोष्ट आहे.
सध्याच्या मराठी पिढीला मराठी माणसाचा, महाराष्ट्राचा विकास झाल्याशी घेणदेण आहे. मग तो शिवसेनेकडुन होवो की राज ठाकरें कडुन्....आणि ही बाब राज ठाकरेंच्या चांगलीच लक्षात आलीय.

विशाल छान लेख!

एकच उपाय आहे..

युवराज आणि युवराजांच्या पुत्राला पदावरुन हटवुन राजला परत आणणे आणि त्याच्या हाती नेतृत्व सोपवणे. जे आपल्याला कळते ते त्याना कळत नसेल का? पण पुत्रमोह कोणाला सुटलाय?
साहेबांनंतर संपणार सेना..

मला वाटतं आता खरोखर शिवसेनेवर आत्मपरीक्षणाची वेळ आलेली आहे. >>>> राजकीय पक्ष कोणताही असो... सगळ्यांनी आपल्या पुरता आत्मपरिक्षण करून घेतले आहे... आणि त्याचीच फळे आपण भोगत आहोत... आत्मपरिक्षणाची खरी गरज आहे ती मतदार राजाला...

Pages