वाघाची डरकाळी, ५० डेसिबेल आणि घराणेशाही ……….

Submitted by विशाल कुलकर्णी on 18 October, 2010 - 02:48

“माझी स्टाइल चोराल, पण विचारांचं काय. माझे विचार त्या स्टाइल चोरात येणार नाही. मराठीचा मुद्दा घेऊन जनतेत जाताहेत. तुमचा जन्म झाला नव्हता तेव्हापासून मी मराठीचा मुद्दा हाती घेतला होता. हा जमलेला जनसागर याची साक्ष देतो!”

शिवतिर्थावर शिवसेनेचा वाघ पुन्हा एकदा गरजला. काल विजयादशमीच्या निमित्ताने नेहमीप्रमाणे होणार किं नाही होणार, सायलेंट झोन, ५० डेसिबेल अशा अनेक समस्यांमध्ये गुरफटलेला शिवसेनेचा दसरा मेळावा वाजत गाजत पार पडला. शिवसेनेच्या वाघाने पुन्हा एकदा आपल्या खास शैलीत डरकाळी फोडली. आपल्या खुमासदार भाषणात साहेबांनी अनेक मुद्दे मांडले, अनेकांवर शरसंधान केले. त्यांची माहिती जवळजवळ सर्व मुख्य वर्तमानपत्रांतून आलीच आहे. या सभेत ५० डेसिबेलची मर्यादा ओलांडुन ९०-९५ डेसिबेलपर्यंत आवाज वाढला. खरेतर वाघाच्या डरकाळीला आवाजाची मर्यादा घालायची हाच मुर्खपणा वाटतो मला. वर्षातून एकदा येणार्‍या दसरा मेळाव्याला तरी हा नियम अपवाद ठरावा असे माझे प्रामाणिक मत आहे. कदाचित ते चुकही असेल पण एक सच्चा शिवसैनिक या नात्याने मलातरी असे वाटते. असो, आता किमान आठवडाभर हा मुद्दा मिडीयावाले चघळत राहतील. निखील वागळेंच्या आवाजाला अजुन धार चढेल. सामान्यजनातही हा मुद्दा वारंवार उगळला जाईलच. त्यामुळे त्यावर मला काहीही भाष्य करायचे नाही. तो माझा प्रांतही नाही.

मला माझ्या ब्लॉगवर त्याची दखल घ्यावीशी वाटली त्याचे कारण म्हणजे साहेब म्हणाले की…..

“शिवसेनेत घराणेशाही अजिबात नाही!”

यावेळी साहेबांनी केलेले विधान सॉलीडच आहे…

“शिवसेनेत घराणेशाही बिल्कुल नाही, असे सांगत बाळासाहेब म्हणाले, उद्धव ठाकरे यांना कार्याध्यक्ष त्या कृष्णकुंजवाल्यांनी केलं. मला समजल्यावर मी भडकलो. मी म्हटलं शिवसैनिकांना विश्वासात घेतल्याशिवाय आणि मी ठरविल्याशिवाय हे होता कामा नये. त्यानंतर शिवसैनिकांनी स्वतः उद्धव ठाकरे यांची कार्याध्यक्षपदावर नियुक्ती केली, असेही आवर्जुन सांगितले. आमच्याकडे घऱाणेशाही नाही.”

गंमत अशी की साहेबांच्या म्हणण्याप्रमाणे कृष्णकुंजवाल्यांनी म्हणजे राजनीच उद्धव ठाकरे यांना कार्याध्यक्ष केलं आणि वर हे आपल्याला आवडलं नाही म्हणून शिवसेनेचा त्याग केला. खरं खोटं राजना आणि साहेबांनाच माहीत, वाईट या गोष्टीचं वाटतय की हे सगळं बोलताना साहेब एका गोष्टीकडे सरसकट दुर्लक्ष करताहेत की शिवसेनेपासून तूटून राजने स्थापन केलेली मनसेना फार थोड्या काळात शिवसेनेला आव्हान देण्याइतकी सक्षम झालीये. शिवसेनेच्या जागा घेणे जरी फार प्रमाणावर मनसेला शक्य झालेले नसले तरी मनसे फॅक्टरमुळे शिवसेनेचा फार मोठा मतदार शिवसेनेपासून दुरावत चाललाय. इतकी वर्षे शिवसेनेसी एकनिष्ठ असलेले, कधीही कुठल्याही पदाची अपेक्षा न केलेले बाळा नांदगावकर, शिरीष पारकर यांच्यासारखे कित्येक कट्टर शिवसैनिक शिवसेनेची इतक्या वर्षाची साथ सोडून राजबरोबर जातात. छगन भुजबळांसारखा ज्याने शिवसेना महाराष्ट्राच्या काना-कोपर्‍यात पोचवली असा खंदा कार्यकर्ता शिवसेना सोडताना घराणेशाहीचाच आरोप करतो. आणि शिवसेनेत घराणेशाहीला तिळमात्रही जागा नाही म्हणताना दसर्‍याच्या शुभमुहुर्तावर आदित्य ठाकरेंचे जोरदार लाँचींग केले जाते. किती कोलांट्याउड्या मारल्या जाणार आहेत अजुन?

त्यातही पुन्हा, गेली कित्येक वर्षे विद्यार्थीसेनेसाठी आपले सर्वस्व पणाला लावणारे अनेक युवा नेते जे विद्यार्थीसेनेतच म्हातारे झाले, त्यांना डावलून शिवसैनिकांनी (?) पुन्हा एकदा आपल्या सुज्ञपणाचा (?) दाखला देत युवासेनेच्या नेतृत्वासाठी काल आलेल्या, इथल्या संघर्षाचा, महाराष्ट्रातील परिस्थितीचा फारसा अनुभव, अभ्यास नसलेल्या आदित्य ठाकरेंची निवड केली. गेल्या दोन वर्षात आदित्य तसे स्थानिक राजकारणात बर्‍यापैकी सक्रीय आहे, म्हणजे चांगल्या दर्जाच्या कॉलेजकँटीन्ससाठी उठवलेला आवाज सद्ध्याचे "सच अ लाँग जर्नी" च्या संदर्भात गाजत असलेले वादग्रस्त आंदोलन. पण तेवढे पुरेसे नाहीये.

हे म्हणजे काँग्रेसजन जे वर्षानुवर्षे करत आलेले आहेत… म्हणजे इंदिराजीं, संजय, नंतर राजीवजी नंतर सोनीया आणि मग आता राहूल………..! तरीही ते म्हणतात आमच्याकडे घराणेशाही नाही हा जनमताचा कौल आहे. काँग्रेसला विरोध करत मोठ्या झालेल्या शिवसेनेतही आता तेच होतय…. साहेब शिवसेना सांभाळत होते तोपर्यंत माझ्यासारखा सर्वसामान्य शिवसैनिक सर्वस्वाने शिवसेनेला बांधलेला होता. पण साहेबांच्या नंतर आता उद्धव आणि त्यानंतर आदित्य….! शिवसेनाही त्याच मार्गाने चाललीये आणि साहेब म्हणताहेत शिवसेनेत घराणेशाही अजिबात नाही हा शिवसैनिकांचा कल आहे. मला वाटतं शिवसेनेचं भलं कशात आहे हे साहेबांना माझ्यापेक्षाही जास्त चांगल्या पद्धतीने कळतं, मग उद्धवजींच्या वेळचा ताजा अनुभव पाठिशी असताना पुन्हा युवासेनेची कमान आदित्यच्या हाती सोपवून एकप्रकारे घराणेशाहीलाच प्रोत्साहन देणं योग्य आहे का? आदित्यकडे तेवढा अनुभव, तेवढी ताकद आहे का? किंवा जर आदित्य हे उद्धवजींचे सुपूत्र नसते तर हे युवराजपद, युवासेनेचे नेतृत्व त्यांना मिळाले असते का?

कधी कधी शंका येते की जे उद्धवजींच्या बाबतीत झाले, म्हणजे त्यांचा राजकारणात उशीरा झालेला प्रवेश, त्यामुळे उठलेले वादळ या सर्व गोष्टी आदित्यच्या बाबतीत पुन्हा फेस कराव्या लागू नयेत म्हणून तर अवघ्या २० व्या वर्षी आदित्यचा युवराज म्हणून राज्याभिषेक करण्यात आला नसावा? म्हणजे अजुन ५-१० वर्षात आदित्य राजकारणात मुरतील आणि तथाकथीत निष्ठावंत शिवसैनिक (?) उद्धवजींच्या नंतर कार्याध्यक्ष म्हणून आदित्यची निवड करायला सिद्ध होतील. कुणालाही बोलायला जागाच उरणार नाही. आता इतके वर्षे शिवसेनेसाठी खस्ता खाल्लेले निष्ठावंत, ज्येष्ठ शिवसैनिक तोंड दाबून बुक्क्यांचा मार असे म्हणत मनोमन बोटे मोडत वरवर नव्या युवराजांचा जयजयकार करतील म्हणा, पण त्यांना कोण विचारतो? मग त्यांच्यापैकी काहीजण आतल्या आत दुखावल्या जावूनही येणार्‍या संधीची वाट बघतीलही कदाचित, पण ज्यांच्याकडे वाट बघण्याइतकी सहनशीलता नाही त्यांनी संधी निर्माण करण्याचा जर प्रयत्न केला तर त्याचा दोष शिवसेनेच्या नेतृत्वालाच जाणार आहे हे निश्चित ! सुरूवात तर झालीय कडोंमपा निवडणुका तोंडावर आलेल्या असतानाच डोंबीवलीतील १०० च्यावर शिवसेना पदाधिकार्‍यांनी राजीनामे सादर केले आहेत आणि ते आपल्या निर्णयावर ठाम आहेत. निष्ठावंतांना डावलून नेतृत्वाच्या पुढे-पुढे करणार्‍यांनाच तिकीटे देण्यात आल्याची जुनीच तक्रार पुन्हा डोके वर काढतेय. ज्यांना साहेब कडवट शिवसैनिक म्हणून अभिमानाने संबोधायचे तोच कडवा शिवसैनिक आता निराश होवू लागलाय, आपल्या निष्ठेची इथे कुणाला कदर राहीलेली नाही ही भावना जोराने वर येतेय. आता या समस्येवर साहेब काय उपाय करणार आहेत?

बाळासाहेब ठाकरे या नावापेक्षाही बाळासाहेब ठाकरे या विचाराकडे आकर्षित झालेला माझ्यासारखा सामान्य शिवसैनिक आता काळजीत पडलाय. कारण विचाराची जागा आता व्यक्तीने घेतलीय की काय अशी परिस्थिती निर्माण झालीय. मराठी, मराठी माणुस, हिंदुत्व असे कळीचे मुद्दे फक्त राजकीय हेतुने बरबटल्यासाराखे वाटताहेत. मला वाटतं आता खरोखर शिवसेनेवर आत्मपरीक्षणाची वेळ आलेली आहे. जे काही होतय, चाललेय ती घराणेशाही नाही असे खरोखर साहेबांना वाटत असेल तर माझ्यासारख्या प्रामाणिक शिवसैनिकाची शिवसेनेला रामराम करायची वेळ झालेली आहे असे वाटतेय.

असं जर झालं तर हे खरंच खुप चिंताजनक आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातील एका तेजस्वी पर्वाचा अंत जवळ आला आहे काय?

एक अस्वस्थ आणि व्यथित शिवसैनिक !

गुलमोहर: 

राज ला परत शिवसेनेत घ्या आणि सिंहासन त्याला द्या.
तोच मराठी माणसाला न्याय मिळवून देयील.
शिवाजी ला सुद्धा पुत्रामोह टाळता आला नाही पण त्या मुले महाराष्ट्र चे नुकसान झालेच.
परत वर्तमानात एक संधी आली आहे बाळासाहेबांनी इथे चूक करू नये.

शिवसेनेत बर्‍याच वाईट गोष्टी आहेत. शिवसेनेत घराणेशाही आहे. शिवसेनेने पैसे घेऊन अमराठी माणसांना खासदार केले. शिवसेनेत वैचारिक गोंधळ आहे. शिवसैनिक राडा करण्यात पटाईत आहेत. शिवसेनेचे शाखाप्रमुख खंडणीबहाद्दर व गुंडगिरी करणारे आहेत . . . इ. आरोप बरेचसे खरे आहेत.

पण जर आजूबाजूला नजर फिरवून इतर पक्ष पाहिले तर हे लक्षात येते की ते पक्ष शिवसेनेच्या तुलनेत कितीतरी जास्त वाईट आहेत. शिवसेनेत ज्या वाईट गोष्टी आहेत त्या सर्व वाईट गोष्टी इतर बहुतेक पक्षात जास्त प्रमाणात आहेत. त्याव्यतिरिक्त त्या पक्षांमध्ये अजून कितीतरी जास्त वाईट गोष्टी आहेत. त्यातल्या त्यात शिवसेनाच बरी किंवा कमी वाईट असे म्हणता येईल.

मकरंद, इथे तुझी गल्लत होतीये. या गोष्टीचा आणि महाराजांनी दाखविलेल्या पुत्रप्रेमाचा काहीही संबंध नाही. (आणि हो यापुढे शिवाजी हे नाव नुसते न घेता शिवाजी महाराज असे घेण्यात यावे)
कर्तुत्व नसूनही महाराजांनी कोणाच्या हातात सत्ता दिलेली नाही. संभाजीराजे शूर होते आणि कर्तृत्ववान होते. हे मान्य आहे त्यांच्याकडून चुका झाल्या, पण त्याचा धागा इथे जोडणे अचाट आहे.

>> शिवाजी ला सुद्धा पुत्रामोह टाळता आला नाही पण त्या मुले महाराष्ट्र चे नुकसान झालेच
त्या काळाची व आजच्या काळाची खरच तुलना होते का? तो काय राजकीय पक्ष होता
संभाजी राजे शुर होते... पण प्रत्येक जण शिवाजी होवु शकत नाही. असा लाखात एकच..

आणि शिवसेनेत घराणेशाहीला तिळमात्रही जागा नाही म्हणताना दसर्‍याच्या शुभमुहुर्तावर आदित्य ठाकरेंचे जोरदार लाँचींग केले जाते...............)
मस्त लेख. बाळासाहेबाना वाच्याला द्या.

अतिशय सुंदर लेख आहे. आवडला एकदम.

मनसेना फार थोड्या काळात शिवसेनेला आव्हान देण्याइतकी सक्षम झालीये.>>> मला वाटते याचे कारण म्हणजे शिवसेना सुरूवातीला ज्या रूपात होती आणि त्यामुळे त्या पिढीचे बरेचसे तरूण शिवसेनेच्या मागे गेले तशाच रूपात आता मनसे आहे आणि या पिढीच्या तरूणांना त्याचे आकर्षण वाटते. ८० च्या आसपासाची शिवसेना आणि आत्ताची मनसे यात फारसा फरक नाही. पण येथून पुढे वाढण्यासाठी नंतर शिवसेनेने जे मार्ग स्वीकारले तेच मनसे स्वीकारणार (हिंदुत्त्ववाद, "निवडून येण्याची क्षमता असलेले बाहेरचे लोक" ई. वरती उल्लेख केलेल्या गोष्टी) की आणखी काही वेगळे (आणि लोकांच्या, सच्च्या कार्यकर्त्यांच्या दृष्टीने योग्य असे) करून दाखवणार ते आता पुढच्या काही वर्षांत दिसेल.

काँग्रेस सारख्या, निदान वरकरणीतरी पक्षांतर्गत लोकशाही असलेल्या पक्षात मुख्य नेते त्याच घराण्यातील वारसदार निवडतात, तर येथे तसे काही 'बॅगेज' नसून सुद्धा तेच होते. चार दोन बंडखोर बाहेर पडून नवीन पक्ष बनवतात, पुन्हा कालांतराने इकडून तिकडे सोयीनुसार बरीच ये-जा होते (काँग्रेस मधे हे दिसले आहे, शिवसेना-मनसे मधे होते का ते कळेल). पण दोन्हीकडे पक्षातील मुख्य ज्येष्ठ नेते इतर लायक उमेदवारांसाठी ठाम राहात नाहीत, असेच चित्र दिसते.

पण जर आजूबाजूला नजर फिरवून इतर पक्ष पाहिले तर हे लक्षात येते की ते पक्ष शिवसेनेच्या तुलनेत कितीतरी जास्त वाईट आहेत. शिवसेनेत ज्या वाईट गोष्टी आहेत त्या सर्व वाईट गोष्टी इतर बहुतेक पक्षात जास्त प्रमाणात आहेत. त्याव्यतिरिक्त त्या पक्षांमध्ये अजून कितीतरी जास्त वाईट गोष्टी आहेत. त्यातल्या त्यात शिवसेनाच बरी किंवा कमी वाईट असे म्हणता येईल.>>>

हे १०० % खरे आहे... पण कमी वाईट आणि वाईट सारखेच हो.. "मी थोडा कमी अप्रामाणिक , थोडा कमी खोटे बोलणारा" याला काही अर्थ नाही... एकतर चांगला किन्वा वाईट ... पण दुर्दैवाने चांगलं म्हणाव असं काय नाही आहे.

(आणि हो यापुढे शिवाजी हे नाव नुसते न घेता शिवाजी महाराज असे घेण्यात यावे)>>>>> १००% सहमत! मकरंदजी , सर्वप्रथम एक विनम्र निवेदन कृपया श्री महाराजांचे नाव घेताना आदराने घ्या, केवळ शिवाजी न म्हणता शिवाजीराजे किंवा शिवाजी महाराज म्हणा आणि त्या घटनेचा संबंध इथे जोडता येणार नाही. तुम्ही इतिहास नीट वाचलेला दिसत नाहीये, तुमच्या माहितीसाठी म्हणुन सांगतो संभाजीराजे परत आल्यावरदेखील महाराजांनी लगेच त्यांना राज्याभिषेक केला नव्हता तर त्यांना श्रुंगारपुरी नजरकैदेत ठेवण्यात आले होते. त्यानंतर संभाजीराजे रायगडावर आले ते महाराजांचा मृत्यु झाल्यानंतरच. अगदी महाराजांच्या अंतिम विधीसाठीदेखिल त्यांना बोलवण्यात आले नव्हते. अर्थात संभाजीराजांची आणि उद्धवची तुलनाच होवू शकत नाही. कारण शिवरायांच्या मृत्युनंतरही जवळ जवळ ८-१० वर्षे संभाजीराजे मुघलांशी झुंजत होते. त्यातच त्यांनी आपले प्राण देखिल दिले.

सगळ्यांच्या मतांशी सहमत. पण त्याहीपेक्षा मला इंद्राचे (इंद्रधनुष्य) मत जास्त पटले, खरोखर आत्मपरीक्षणाची वेळ आता मतदारांवरच आलीय. पण खरोखर आपल्या हातात काही आहे का? किती ठिकाणी निवडणुका खरोखर लोकशाही पद्धतीने होतात. बुथ कॅप्चरिंग आणि बोगस मतदानाच्या जमान्यात प्रामाणिकपणे मत देणे कितपत शक्य आहे.

आणखी एक प्रश्न उभा राहतो मनात...
साहेबांच्या म्हणण्यानुसार उद्धवना कार्याध्यक्ष करण्याचा प्रस्ताव राजनी मांडला होता. आता राजनी शिवसेना का सोडली याचे कारण सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. साधे शाखाधिकारी नेमण्याचा अधिकार सुद्धा राजना राहीला नव्हता. त्यांनी केलेल्या शिफ़ारशी, सुचना ठरवून, मुद्दामहुन टाळल्या जात होत्या, दुर्लक्षिल्या जात होत्या. मुळात बाळासाहेबांचीच उद्धवला कार्याध्यक्ष बनवण्याची इच्छा होती. पण राजची वाढती लोकप्रियता पाहून त्यांनी राजवरच हे ढकलले असावे. आपल्या विठ्ठलाचा मान राखायचा म्हणुन नाईलाजाने राजने हा प्रस्ताव मांडला असावा.
आता प्रश्न असा उभा राहतो की राज आता शिवसेनाद्रोही ठरले आहेत. मग एका शिवसेनाद्रोही माणसाने मांडलेला प्रस्ताव पुढेही मान्य करण्यास शिवसैनिक बाध्य आहेत काय? इथे लोकशाही नव्हे तर शिवशाही चालते म्हणणारे, माझाच निर्णय अंतीम असतो हे ठणकावणारे साहेब राजपुढे एवढे अगतिक का झाले असावेत कि त्यांना न आवडलेला राजचा निर्णय त्यांनी मान्य केला? आता जर जुन्या निष्ठावंत शिवसैनिकांनी उद्धवना पाय उतार होण्यास सांगितले तर ते साहेबांना रुचेल काय? शिवसैनिकांचा तो निर्णय साहेबांना आणि उद्धवना मान्य होइल काय?

व्यक्तीकेंद्री होणं कोणत्याही पक्षाला घातकच असते. पक्ष सुरुवात करुन स्थान मिळवीपर्यंत त्या व्यक्तीचा करिश्मा कामी येतो, पण नंतर नेतृत्वातील एककेंद्रीकरण अथवा ध्रुवीकरण पक्षालाच घातक ठरते. आम्हीही लहानपणापासून प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांना पसंती द्यायचो. त्यात त्या स्थानिक उमेदवारापेक्षा बाळासाहेबांचा करिष्माच जास्त होता. जसे आत्ता राज वाटत आहेत तसे बाळासाहेब वाटतायत. कदाचित हा करिष्माच घातक ठरत असावा. बाळासाहेबांवर अतिअवलंबनामुळे दुसर्‍या फळीतील नेत्यांच्या कर्तुत्वाला वाव, प्रसिध्दी मिळाली नाही.

कालच आदित्यला बाळासाहेब तलवार देतायत हा 'सकाळ' मधला फोटो पाहिला, त्यात आदित्यची देहबोली 'एखाद्याला मनाविरुध्द काम करावयास लावणे' अशी वाटली. अर्थात कदाचित त्या फोटोपुरता मला दिसलेला असेल. पण त्याला नको तितक्या लवकर राजकारणात आणले.

वरील प्रतिक्रियांमध्ये लिहिलय तसं राज यांची वाटचाल अशीच सुरू आहे. राज यांनी दुसर्‍या फळीकडे दुर्लक्ष करुन स्वतःच्या एकट्याच्या नावावर व मराठीच्या एकमुखी मुद्द्यावर पक्ष वाढवत नेला तर कदाचित त्यांनाही काही वर्षांनी अश्या समस्येला सामोरे जावे लागेल.

विशु ,
फार छान लिहिलय. मला हे सगळ मान्य आगदी सगळ सगळ मान्य पण या मुळे मराठी माणसाचं काय नुकसान होतय हे दोघांनाही समजेनासं झालय.

<<विशाल हा खरे तर तुमचा आणि साहेबांचा प्रश्न आहे. आणि तुम्ही हा विचार 'सामन्या'त मांडला असता तर अधिक औचित्यपूर्ण झाले असते आणि बालासाहेबांच्या नजरेसही आले असते >>>

सामन्यात काहीही मांडताना ते आधी "राऊतांच्या" नजरेखालून जावे लागते..... हल्ली इतर श्रेष्ठींच्या नजरा कमजोर झाल्यात इथे फक्त आवाज काय तो राहिलाय...... Happy
आणि बरीच संधीसाधू मंडळी "वाघ" जायची वाट पहात बसलेत..... Sad की हे गडी पक्ष बदलायला मोकळे...!!!!

शिवसेना ही आता एक भरकटलेली आणि शिडाला भोकं पडलेली नाव आहे........

गेल्या आठवड्यात "बिगबॉस्"च्या विरोधात लोणावळ्यात तमाशा केला..... जबरदस्ती बंद करायला लावला. ईंडस्ट्रियल एरियात घुसून सर्व कारखाने पुर्ण दिवस बंद करवले..... नुकसान कोणाचे झाले?????
शेवटी कलर चॅनेल बंद करायच्या भाषा करणारे "सेटिंग" झाल्यावर निमूटपणे गप्प बसले. आता कलरही आहे, पाकिस्तानी कलाकारही आहेत आणि बिगबॉसही........ Angry हे दिसत नाही का ह्यांच्या "बिग बॉसला"??????/ कोणाला शेंड्या लावतात हे???

काँग्रेस आणि यांच्यात फार काही फरक नाही, फक्त कित्येक वर्षांच्या अनुभवाने काँग्रेस "खाल्लेले" कसे पचवायचे हे चांगलेच जाणते, आणि इतर पक्ष कधी नव्हे ते मिळतेय, घ्या ओरबाडून असे करत सगळे पितळ उघडे पाडत फिरतात...... एवढाच काय तो फरक...!!!!

>>काँग्रेस आणि यांच्यात फार काही फरक नाही, फक्त कित्येक वर्षांच्या अनुभवाने काँग्रेस "खाल्लेले" कसे पचवायचे हे चांगलेच जाणते, आणि इतर पक्ष कधी नव्हे ते मिळतेय, घ्या ओरबाडून असे करत सगळे पितळ उघडे पाडत फिरतात...... एवढाच काय तो फरक...!!!!

फरक हा आहे की कॉ. वाले मिळून मिसळून एकत्रीतपणे खात असावेत त्यामूळे "खायच्या" मारामार्‍या होत नासाव्यात (कलमाडी-दिक्षीत प्रकरण अपवाद! Happy ईतर पक्षात कुणी आधी खायचे यावरून मारामार्‍या होतात त्यामूळे नाही मिळाले की चव्हाट्यावर येतात.
-------------------------------------------------------------------------------
बाकी हाती तलवार देवून काय ऊपयोग, ती आधी पेलायला अन पुढे चालवायला पोलादी मनगट असावे लागते. किमान काळानुरूप बदलायला तरी कधी शिकणार हे लोक? पवार बघा काळानुरूप शेती सोडून क्रिकेट मध्ये घुसले.. याला म्हणतात दुर्दृष्टि Happy

काँग्रेस आणि यांच्यात फार काही फरक नाही, फक्त कित्येक वर्षांच्या अनुभवाने काँग्रेस "खाल्लेले" कसे पचवायचे हे चांगलेच जाणते, आणि इतर पक्ष कधी नव्हे ते मिळतेय, घ्या ओरबाडून असे करत सगळे पितळ उघडे पाडत फिरतात...... एवढाच काय तो फरक...!!!!>>> १ नं

आयला, विशल्या, काय रे लावल हेस "घराणेशाही घराणेशाही"? Proud
काल तुझा लेख वाचला अन टाकोटाक मी घरी पोचल्यावर लिम्बोटल्याला म्हणले, हे शूरवीर लिम्ब्याच्या लिम्बोटल्या, शिवसेनेतील घराणेशाही मोडून काढण्यासाठी, आदित्य ठाकरेच्या ऐवजी शिवसेनेच्या युवाखात्याची कमान तू साम्भाळशील का? बेटाऽऽ, तू पण युवा आहेस, बहुधा (माझ्याइतकाच) देखणाही असावास Wink , बोल, माझ्या आग्रहा खातर आजवर तू चूकतमाकत का होईना, सन्घशाखेवर जातोसच की, तर मग माझ्या शब्दाखातर अन या तमाम जनतेच्या "घराणेशाही नष्ट करण्याच्या तळतळाटाखातर" तू शिवसेनेचे युवाखाते साम्भाळायला जाशिल का? बोल, हो म्हणत असलास तर लगोलग साहेबान्शी बोलून घेतो! Proud
आतुन लिम्बी ऐकत होती... ती तरातरा धावत आलि अन माझ्या तोन्डापुढे दोन्ही हाताचे पन्जे ओवाळत म्हणाली,
तोन्ड बघा एकेकाने आरशात, म्हणे चालले शिवसेनेचे युवाखाते साम्भाळायला! शिवसेनेसारख्या पक्षात खाते साम्भाळायचे म्हणजे काय तुम्हाला तुमची हापिसातली हेडक्लार्की साम्भाळण्याइतके सोप्पे वाटले का?
हे बघा, आम्हाला शिवाजी जरुर हवाय, पण शेजारच्या घरात जन्माला येऊदे, आमच्या नको! ज्यान्ना हा घराणेशाहीचा जप करीत बसायच असेल तर जरुर बसूद्यात, त्यान्ना म्हणावं हव तर तुमचीच पोरे पाठवा घराणेशाही मोडायला! कोण थाम्बवलय? Proud
लिम्बोटल्या, जा रे तू, आत जाऊन अभ्यास कर, यान्च काही ऐकु नकोस, डोचक फिरलय-- म्हणे जन्तेच्या (माबोकरान्च्या? Proud ) आग्रहाखातर शिवसेनेतली घराणेशाही नष्ट करायला चाल्लेत.... ते देखिल स्वतःच्या पोटच्या गोळ्याला वापरुन ! नस्ती अवदसा मेली सुचते तरी कशी यान्ना? Wink
तर अस्स हे विशल्या, मी चान्गला शिवसेनेतली घराणेशाही मोडायला निघालो होतो पण लिम्बीने मोडता घातलाय! माझ्याच्याने नै बा होणार काही. आता सगळी मदार तुम्हा लोकान्वरच! बोला, कोण कोण पाठवताय आपापल्या पोराटोरान्ना शिवसेनेत युवा खात्याची कमान साम्भाळायला? Biggrin

लिंबुदा Happy

<<<फरक हा आहे की कॉ. वाले मिळून मिसळून एकत्रीतपणे खात असावेत त्यामूळे "खायच्या" मारामार्‍या होत नासाव्यात (कलमाडी-दिक्षीत प्रकरण अपवाद! ईतर पक्षात कुणी आधी खायचे यावरून मारामार्‍या होतात त्यामूळे नाही मिळाले की चव्हाट्यावर येतात.>>>>> १००% सहमत योग !

आजची मटाची बातमी.....

'राष्ट्रकुल' घोटाळ्यात पंतप्रधानही?

<<<राष्ट्रकुल स्पधेर्च्या आयोजनातील आथिर्क गैरव्यवहारांसाठी केवळ भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष सुरेश कलमाडी हेच जबाबदार नसून पंतप्रधान कार्यालयही त्यासाठी जबाबदार असल्याचा खळबळजनक आरोप भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी यांनी येथे केला. स्पधेर्साठी ७० हजार कोटींपैकी १६०० कोटी रुपयेच मंजूर झाले होते. उर्वरित रकमेच्या अनेक कामांवर पंतप्रधान कार्यालयाचे शिक्के आहेत, त्यावर सरकार काय उत्तर देणार आहे? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. >>>>>>

इथे पंतप्रधान कार्यालयही असे म्हणायचे आहे का गडकरींना किंवा वार्ताहराला ! कारण मला नाही वाटत मा. मनमोहनसिंग यात गुंतले असतील म्हणुन.

घराणेशाही सर्वच पक्षात (क्षेत्रात) आहे उदा. राजकारण, बॉलिवुड, संगित - कला, समाजसेवा, वैद्यकिय व्यावसाय, शेती व्यावसाय... शिवसेना त्याला का अपवाद ठरावी? जवाहर, इंदिरा, संजिव, राजिव, राहुल... चालतात आता तर लोक ते ग्राह्यच धरतात. मग आदित्याचे लाँचिंग करण्यात गैर काय आहे? कडव्या शिवसैनिकांची काळजी असती तर हजारो लायक शिवसैनिकांना डावलुन उद्धवांची नेमणुक बाळासा्हेबांनी केलीच नसती. तसेच राजलाही दुर केले नसते.

बाकी ढाण्या वाघातील स्पष्टवक्ते पणा नाहिसा झालेला आहे. उद्धवाच्या नेमणुकी बाबत चक्क खोटे विधान केले. मला त्यांचे विचार पटत नसतिलही पण त्यांच्यातील स्पष्टवक्ते पणा या गुणाबद्दल आदर होता... आता तोही नाहिसा झाला आहे. Sad

आदित्य चे लॉचिंग करण्यात गैर काही नाही. पण दुसर्‍याच्या घराणेशाहीबद्दल बोम्बलू नये ना. ठीक तुमची चालू द्या आमची चालू द्या. असे धोरण पाहिजे की नको.? दुसर्‍यानी घराणेशाही करू नये त्याचा युवराज वगैरे कुत्सित उल्लेख हे करणार आणि स्वतः त्याच्याही पुढे जाणार याबद्दल आक्षेप आहे ना!
सेनेची युवा शाखा साम्भाळायला सेनेत आदित्यपेक्षा कर्तबगार कार्यकर्ता नाही असे जाहीर करा आधी...

आदित्य चे लॉचिंग करण्यात गैर काही नाही. पण दुसर्‍याच्या घराणेशाहीबद्दल बोम्बलू नये ना.>>>..

अगदी हेच म्हणायचय मला. मग सेनेत घराणेशाही नाही म्हणणे अतीच होतेय ना Wink

विशल्या, मूळात माझा "घराणेशाही" या शब्दालाच आक्षेप आहे, हा शब्दच चूकीचा आहे
कस ते सान्गतो, बघ
पूर्वी जातवार बारा बलुत्यान्ची व्यवस्था असायची, त्यात शिम्प्याचा पोरगा शिम्पी बनायचा, न्हाव्याचा न्हावीच, सुताराचा सुतारच वगैरे वगैरे.......! राजाचा राजपुत्र राजाच बनायचा, तसच जर आजकालच्या राजकारण्यान्ची मुले राजकारणातच पडली तर त्यात घराणेशाही कस्ली? अरे ती तर आपली थोर सान्स्कृतिक परम्परा आहे! Proud
उगीच आपल कोणत्या तरी लालबावट्यान्नी (हव तर लालपावट्यान्नी अस म्हणा Proud ) विरोधाला विरोध करत अमक्या शाह्या तमक्या शाह्या करत करत घराणेशाही हा शब्द रुजवला अन आम्हि तो बिनदिक्कत वापरतोय, अस नको वाटायला तुला? Wink
आता वाघाच्या पोटी वाघ जन्मणार नाही तर मग काय लान्डगा जन्मेल की शेळीमेन्ढी जन्मेल??? इत्कस साध कस कळत नाही कुणाला?

खरय लिंबुदा तुमचं Proud
आता कसं समजवणार यांना की बाबारे लोकशाही ही फक्त लोकांनी पाळायची असते, ती राजे महाराजांना थोडीच बाध्य असते Wink

बाबारे, राजेशाही म्हणजे ऐरावतावरची सैर! ज्यास तो ऐरावत काबुत ठेवता येतो तो राज्य करतो Happy

लोकशाहीचे मात्र तितके सोप्पे नाही, सहस्रपादी गोमेवर आरुढ होउन जो तिच्या सहस्रपादी चालीला आपल्यामताबरहुकुम कब्जात ठेवेल, तो लोकशाहीतला खरा राजकारणी मुत्सद्दी राजा! Proud

एकेकाळी हिन्दुहृदयसम्राट असेच होते, सध्या मोदिन्ची चलती आहे! सहस्रपादी गोमे वरुन Biggrin

Pages