पहिले चुंबन

Submitted by UlhasBhide on 15 September, 2010 - 12:16

पहिले चुंबन

अधीरतेने आज गायिले, थरथरणार्‍या अधरद्वयाने
शृंगाराच्या मैफिलीतले, पहिले वहिले गीत मुक्याने

सर्वांगी मोहरला काटा, गात्री गात्री गोड शहारे
घुसमटलेल्या श्वासांमधुनी, सतार मनि झिनि झिनि झंकारे

अमृत गोडी अनुभवण्याचे, भाग्य प्रथम अधरांस लाभता
असुयेने हिरमुसून रसना, करी शब्द ना धरी मौनता

या ओठांना त्या ओठांचे, शब्दाविण संवाद उमगले
अर्धोन्मीलित नेत्रांमधुनी, परस्परांनी भाव वाचले

....... उल्हास भिडे (१५-९-२०१०)

गुलमोहर: 

अमृत गोडी अनुभवण्याचे, भाग्य प्रथम अधरांस लाभता
असुयेने हिरमुसून रसना, करी शब्द ना धरी मौनता

खुपच सुंदर...

"या ओठांना त्या ओठांचे, शब्दाविण सवांद उमगले
अर्धोन्मीलित नेत्रांमधुनी, परस्परांनी भाव वाचले"
खूप दिवसांनी छान कविता वाचायला मिळाली. श्रुंगारिक असली
तरी कुठेहि उथळपणा नाही.
भरत मयेकरशी मी सहमत आहे.
.

उल्हास जी , एवढा नाजूक विषय अश्लीलतेची झ्हालर न येता इतक्या प्रभावी पणे मांडल्या बद्दल खूप खूप कौतुक . छान लिहिले आहे आपण

कवितेची शब्दरचना सुरेखच आहे. मान्यवरांनी त्याला नावाजलेले आहेच. आवडली मनापासुन आवडली.
उल्हासजी शुभेच्छा !

धन्यवाद ! शतशः आभार !

कविता आवडली म्हणून भरभरून प्रतिसाद दिलात.
तसच,
कधी काही आवडल नाही तरीदेखील नि:संकोचपणे सांगा.

दादा, मस्तच कविता !

रच्याकने मला माझ्या एका वात्रट मित्राने दातेसाहेबांच्या एक सुंदर गाण्याचे केलेले खास विश्लेषण आठवले...

"स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले मी तूला.."

स्वरगंगेचे भावचिंब ओले काठ....(स्वरगंगेचे काठ म्हणजे जिथून वाणी बाहेर पडते ते ओठ) वचन दिले मी तूला (ते चुंबन) Wink Proud

अमृत गोडी अनुभवण्याचे, भाग्य प्रथम अधरांस लाभता
असुयेने हिरमुसून रसना, करी शब्द ना धरी मौनता

या ओठांना त्या ओठांचे, शब्दाविण संवाद उमगले
अर्धोन्मीलित नेत्रांमधुनी, परस्परांनी भाव वाचले

व्वा !! मस्त !!! Happy

अमृत गोडी अनुभवण्याचे, भाग्य प्रथम अधरांस लाभता
असुयेने हिरमुसून रसना, करी शब्द ना धरी मौनता

या ओठांना त्या ओठांचे, शब्दाविण संवाद उमगले
अर्धोन्मीलित नेत्रांमधुनी, परस्परांनी भाव वाचले

अप्रतीम!!!!!!!!!

सुंदर, गेयपुर्ण आहे.
या ओठांना त्या ओठांचे, शब्दाविण संवाद उमगले
अर्धोन्मीलित नेत्रांमधुनी, परस्परांनी भाव वाचले>>>>>
खूपच आवडले.

:माबो मोड ऑन::
काका

मेलमधून थेट खास तुमचं पहिलं चुंबन घ्यायला आलो.
संपादन : पहिलं चुंबन ही कविता वाचायला आलो... :दिवे:

अतिशय तरल आणि सुंदर कविता आहे. शब्दमाधुर्य आहे, गेयता आहे. आणखी काय पाहीजे या कवितेत..पहिलं चुंबन असूनही देवळातच गेल्यासारखं झालं इतकी शालीन कविता आहे..

(नाहीतर असे शब्द आले कि मला लाजल्यासारखं होतं )
आता माझ्यासारख्या आडदांड माणसाला दाखवलीच आहे तर..

शृंगाराच्या मैफिलीतले, पहिले वहिले गीत मुक्याने

या ओळीतल्या शेवटच्या शब्दाचा अर्थ योग्य त्या पधतीने घेतलेला आहे याची नोंद घ्यावी.

:माबो मोड ऑफ::

सह्ह्ही ,,अरे इतकी सुंदर कविता मी कशी काय मिस् केली...

धन्स, किरण ही कविता वर आणल्या बद्दल......

काका... कसलं भारी चुंबन आहे.... यावर इतर दहा चुंबनं झक मारली... Happy

जियो काका...... अशीच चुंबने घेत रहा..... आय मिन आम्हाला वाचायला देत रहा Proud

अतिशय सुंदर कविता. हे असे क्षण आजही जपले गेले तर अशी सुंदर कविता का नाही बाहेर पडणार ?

( आमच्या बाबतीत मात्र हे असं काही असतं हे साफ विसरून गेलोय... खूप प्रयत्न करूनही भांड्यांचे आवाज, रविवारची खेकसाखेकसी आणि मी म्हणून संसार केला ..हेच सारखं का आठवत असावं ? Happy )

व्वाव !!

कसली सुंदर, तरल, डिसेन्ट कविता आहे.. आणि सतार वगैरेमुळे तर संगीतही वाजायला लागलय कानात !!

( मला दिसली कशी नाही आधी Sad )

शृंगार रस असूनही फारच तरलतेने भाव व्यक्त झालेत - प्रतिसादही किती छान दिलेत - इथे कविमन व रसिकमनाचा खरा संगम झालेला जाणवतोय....अति दुर्मिळ योग..
कवि व रसिक - दोघांनाही सलाम..

क्या बात है! आजकालच्या टिशू पेपरसारख्या झालेल्या किस यू कल्चरमधे अशी तरल, निरागस, शालीन चुंबनाची ओठांवरील शब्दसाय! मस्त.

Pages