अर्चना

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

तिच्या पिलाकडे बघून राहून राहून वाईट वाटतंय. गळ्यात फास अडकवून घेताना नजरेसमोर एकदाही त्याचा चेहरा आला नसेल ? त्याचे विचार आले नसतील डोक्यात? एवढ्या अफाट जगात आपलं पिल्लू एकटं पडेल त्याच्याकडे कोण बघेल? परक्या देशात आहोत आपण आपलं बाळ काय करेल? हे आणि असले बरेचसे प्रश्न अजूनही मनात घोळतायत .

मी एवढे दिवस राहत असलेल्या आधीच्या अपार्टमेंटमधल्या आमच्याच ग्रुपमधल्या एकीने गळ्याला फास लावून घेतला.. हे ऐकताना ५० चेहरे तरळून गेले डोळ्यापुढे, नक्की कोण हे कळेपर्यंत सगळ्या मैत्रिणी दिसायला लागल्या , सहजच बोलता बोलता बोलून गेलेल्या मनात सलणाऱ्या एकेकीने सांगितलेल्या स्वतःच्या गोष्टी आठवल्या. पंधराच मिनिट लागली नक्की कोण ते कळायला. पण त्या पंधरा मिनिटातली ही अवस्था आणि कोण ते कळल्यावर विश्वासच बसेना.

ती..... एवढी हसतमुख आणि बडबडणारी, सारखी बिल्डिंगभर फिरणारी. मस्तपैकी ढोलक वाजवणारी, त्याच्या तालावर मनसोक्त नाचणारी. स्वतः: फारसं शिकलेली नव्हती पण आपल्या मुलाने खूप शिकावं स्वतः:ला जमत नसतील त्या गोष्टीत प्रसंगी शेजारणींची मदत घेऊन त्याचा अभ्यास घेणारी.

एवढं कायच झालं असेल तिला? काय डाचत असेल? कोणाशीही बोलाव असं न वाटता सरळ स्वतः:ला संपवण्याचा निर्णय घेण्यापर्यंत तिला काय त्रास होत असेल? एक ना अनेक प्रश्न डोक्यात गरगरतायत.

बरं हे सगळं करायच्या आधी मुलाला घेऊन बाहेर पार्किंगमध्ये फिरली, त्याच्यासोबत खेळली, बाकीच्या बायकांशी गप्पा मारल्या आणि नवरा काही कामासाठी बाहेर गेला तेवढ्या वीस मिनिटात सगळा खेळ खलास.

कोणी म्हणतं दोघांच पट्त नव्हतं, कोणी म्हणत तिला भारतात जायच होतं, कोणी म्हणत त्यांचा बराच जुना प्रॉब्लेम होता, माणूस अतिशय चिक्कू आहे पैसा द्यायचा नाही, तिला घरी पाठवायचा नाही, वागणं नीट नाहीये त्याचं. हे असं असताना , बाई नवऱ्याची काळजी घ्यायला विसरली नव्हती;जाताना चिट्ठी सोडून गेली "माझ्या मृत्यूला कोणीही जबाबदार नाहीये" .

"माझी आई कुठय?" असं विचारल्यावर, त्या पाच वर्षाच्या बाळाला " तुझ्या आईला दवाखान्यात नेलय; हे खोटं सांगताना; माझ्या बाकीच्या मैत्रीणिंची काय अवस्था झाली असेल ही कल्पनाही करवत नाहीये. ज्यांनी तिला लटकलेलं बघितलं त्यांची तर त्याहूनही वाईट अवस्था .

ही बातमी ऐकल्या ऐकल्या प्रत्येकाने तिला शिव्या दिल्या, हे काय असलं वागणं म्हणून, पण मला मात्र वाटलं , किती सहन केल्यावर या निर्णयापर्यंत आली असेल ती.

अजूनही सुटका नाहीच झालेली तिची. सगळ्या औपचारिकता पूर्ण होईपर्यंत अजून ४-५ दिवस लागणार आहेत. घरचे कोणीही येउ शकत नाहित. ही अजूनच वाईट गोष्ट.

जीव गेला तरी देहाचे भोग संपलेले नाहियेत .

विषय: 
प्रकार: 

फार वाईट वाटलं वाचून. तिच्या मागे तिच्या पिल्लाचे काय हाल होतील याची कल्पनाही करवत नाही. खरंच असं का वागतात माणसं याला उत्तर नाही !

आई गं... खूप वाईट वाटलं वाचून. Sad
कसलं दु:ख असेल इतकं तिला, जिवावर उदार होण्याइतकं...

शहारा आला वाचून. खरच काय दु:ख असेल तिचं तिलाच ठावुक.

काहीही दु:ख असेना, पण जे दु:ख तिच्या पिल्लाच्या वाट्याला येणार आहे त्याच्यापुढे ते फिकेच वाटेल. पर्वताएव्हढी संकटे सहन करून आपल्या मुलांसाठी जगणार्‍या आया पाहिल्या आहेत. तिने हा निर्णय सुखासुखी घेतला नसणार हे तर उघड आहे. सगळे मार्ग संपले आता दुसरा उपायच नाही असे काहीसे वाटत असणार हे ही मान्य. पण मुलाला जन्म दिल्यावर त्याला असे दु:खाच्या खाईत लोटून जायचा अधिकार तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत मिळत नाही. कुठलेही असहनीय दु:ख हे जस्टीफाय करू शकत नाही. एकदा तुम्ही त्या कोवळ्या जीवाची जबाबदारी घेतलीत की जिवात प्राण असेपर्यंत ती निभावली पाहीजे. प्राणच देणे हे उत्तर असू शकत नाही.

अरेरे.खूप वाईट वाटलं.

अश्विनीशी पूर्णतः सहमत..

का कोण जाणे मला सगळ्याच आत्महत्या हा चुकीचा उपाय वाटतो. नव्हे, उपाय नाहीच तो..
अर्चनाबद्द्ल नक्कीच सहानुभुती आहे, ती खूप दु:ख्खातून गेली असणार,दुसरा मार्ग नसेल म्हणून तिने हे पाऊल उचललं.. पण ते छोटं पिल्लू, आई बाबा, ई. चा काय दोष ? मुळात तिने स्वतःचा एव्हढा मौल्यवान जीव का घालवायचा?

ही, किंवा पर्सिस्टंट चा संदीप शेळके अशी उदाहरणं पाहीली की मला काय बोलावं समजतच नाही! कुठलीही अडचण,त्रास हा जीवापेक्षा मोठा नसावा.. Sad Sad

न देखल्या बाईबद्दल पण हळहळाला जीव. त्याही पेक्षा तीच्या पिल्लासाठी. कितीही आगतीक झालेलं असलं माणुस तरी स्वतःच्या जीव घेण्याचं काहीच समर्थन असु शकत नाही.

did the last ceremony twice in such cases... and think its the worst decision one can take.
For personal problems, this is not the answer.

I can agree only if you are in situation like Enron CEO and decides to end yourself.

अश्विनीचं म्हणणं बरोबर आहे पण तरीही तिच्याबद्दल वाईट वाटल्याशिवाय राहिलं नाही. पण त्यात मुलाचा काय दोष. निदान त्याचा तरी विचार करायला एवढा टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी.

खुप वाइट वाटल. तिच्या लहानग्याच पुढे काय होणार हा अगदि रास्त प्रश्न आहे पण एकदम तिला दोषि ठरवु नका. बहुतांश वेळा आत्महत्त्येच्या मागे तीव्र नैराश्य (depression) असत. हे नैराश्य मेंदुतिल संप्रेरकांच्या असंतुलनामुळे निर्माण होत. कधि कधि वेळेवर लक्षात येत नाहि अगदि प्रत्यक्ष त्या व्यक्तिला देखिल आपल्याला मानसिक आजार आहे हे कळत नाहि. त्या बिचारिच पण असच असु शकेल कदाचित.

श्यामली पुढे काय झालं तेही लिहि. खरचं खूप वाईट वाटलं.

जीव गेला तरी देहाचे भोग संपलेले नाहियेत ...........
खरंय..... शेवटी तिने देहाचे दु:ख सहन होत नाही म्हणुनच हा निर्णय घेतला असेल. पण त्या बाळाचे काय? त्याचा काय दोष?
परमेश्वर त्याला हे दु:ख भोगायला बळ देवो.

खरंय मंडळी त्या बाळाचा काय दोष हाच विचार मनात येतोय सारखा. खरंच परमेश्वर त्या बाळाला तरी चांगल आयुश्य देवो.

श्यामली, माय गॉड... काटा उभा राहिला अंगावर.

अश्विनीशी १००% सहमत.

---------------------------------------------
उपास-तपासाच्या मी विरोधात आहे, पण 'फराळाच्या' नाही.... Happy

हम्म! खरंय तीव्र नैराश्य हेच कारण असतं बरेचदा. व्यक्ती निराशेच्या भरात निर्णय घेते. मला वाटतं की जीव जात असताना भान आल्यावर अगदी शेवटचा एक क्षण तीला नक्की वाटलं असणार की मला जगायचंय माझ्या बाळासाठी.. त्याचं काय होईल?

~~~~~~~~~
~~~~~~~~~
Happy

आपण इतका विचार करतोय बाळाचा मग ती तर आई आहे. असाही विचार करा की तीने खरंच असं काय भोगलं असेल की अगदी बाळाला ही सोडुन जावं, जीवन संपवावं असं तीला वाटलं. तीव्र डिप्रेशन हा आजार हे एक कारण असू शकतं अन्यथा खरंच तीला असा असह्य त्रास असू शकतो की अखेर मुलाचा विचार सोडुन तीने हे पाऊल उचललं. मी आत्महत्येचं समर्थन नाही करत. तो भित्रेपणाचा पर्याय झाला. इतर पर्यायांचा विचार तीने केला का? हे मुद्दे आहेतच. पण मला एवढंच म्हणायचं आहे की पूर्ण दोष तीला देताना,तीने काय भोगलं असेल हा मुद्दा ही विचारात घ्यायला हवा..

पूर्ण दोष तिचा नाहीच आहे. दारूण आणि असहनीय परिस्थितीचा सहभाग यात आहेच. तिने काय भोगलं असेल हा मुद्दा तर जवळजवळ सर्वांनीच विचारात घेतला आहे. ठीक आहे, तिने जे भोगले असेल त्यावर काहीच उपाय नव्हता. मान्य आहे की तिने सगळ्या पर्यायांचा विचार केला आणि नव्हता दुसरा मार्गच काही म्हणून शेवटी हे पाऊल उचलले. पुढे काय? ती सुटली. जे काही असहनीय होते, ते थांबले तिच्यापुरते. पण आता जो दुसरा लढा सुरू झाला आहे त्याचे काय? ती तर पूर्ण वाढ झालेली स्त्री होती. किमान सहन करण्याची ताकद होती तिच्यात. ज्या पाच वर्षांच्या कोवळ्या जीवाला ती त्याच परिस्थितीत सोडून गेली, त्याच्यात असेल का ती ताकद? त्याच्या गरजा तर अगणित आहेत. काही काही तर इतक्या बेसिक आहेत की त्यासाठी फक्त तिचं असणं पुरेसं आहे. भिरभिरत्या डोळ्यांनी सगळीकडे तिला शोधत असेल तो, दिसली नाही तर रडून गोंधळ घातला असेल. आज त्याचे अश्रू पुसायला कदाचित तिच्या मैत्रिणी असतील, उद्या कोण येईल? मऊ वरण भात तुपाची वाटी हातात घेऊन, त्याचा खेळ संपला का म्हणून तिष्ठत कोण राहील? उद्या तो मोठा झाला, शाळेत जायला लागला, काही बिनसले आणि बाबा रागवले तर मायेने जवळ घेऊन कोण समजवेल? ही तर सुरूवात आहे, अश्या असंख्य गोष्टींना आता त्याला एकट्यानेच सामोरे जायचे आहे. त्याच्यात असेल का ते बळ?
इतक्या लहान वयात आई जाणं ही सर्वात दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि त्याहीपेक्षा मोठे दुर्दैव म्हणजे त्याच्यावर हा आघात त्याच्यावर सगळ्यात जास्त प्रेम करणार्‍या व्यक्तिने केला आहे. या अपराधाला क्षमा नाही.

sorry श्यामली, तुझ्या पानावर इतकं सगळं लिहीलं म्हणून. पण काल पासून इतकं अस्वस्थ वाटतय ग. राहून राहून त्या न पाहिलेल्या पिल्लाचा चेहरा डोळ्यासमोर येतोय. Sad

अग सॉरी काय माझ्याही मनात नेमके हेच गोंधळ चालले आहेत. मी देखील या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करतिये. पण हे न सुटणारे प्रश्न आहेत. त्यात भर म्हणून की काय या मुलीला माहेरून तसा भक्कम आधार नव्हताच ही नवीनच माहिती कळलीये मला. आई-वडील नाहीत भाउ आहे फक्त.

म्हणजे कदाचित तिच्या आईनी त्याला सांभाळलं असतं अशी थोडी तरी आशा होती ती पण मावळली. पुढे जाऊन काय हे बाळ स्वतःच्या बहिणीच्या वा भावजयिच्या हवाली करुन माणूस ४-५ महिन्यात दुसरं लग्न करून पुढच्या वाटचालीला मोकळा. Sad

असं काय होतं की आपलं बाळ, जे आपण जीवापलीकडे जपतो, त्याचा, त्याच्या भविष्याचा विचार देखिल आत्महत्येपासून परावृत्त करंत नाही? आई इतकी स्वार्थी होऊ शकते???

आई झाली म्हणून तीला माणुस म्हणवून घ्यायचा अधिकार नाही???
तिच्या काही अडचणी ज्या आईपणावर मात करणा-या असूच शकत नाहित हा विचार नाकारता नाही येणार आपल्याला.

मला वाटतं आत्महत्या ही गोष्ट विचारान्ती वगैरे होत नसते, नैराश्याच्या झटक्यात, इम्पल्स वर ते घडतं.त्या पिल्ल्लाबद्दल फार हळहळ वाटतेय! Sad
आपल्यावर पूर्णतः अवलंबून असलेले लहान जीव ही फार फार मोठी जबाबदरी आहे! कधी कधी तर काही कारण नसताना, हसत्या खेळ्त्या किंन्वा बिनघोर झोपलेल्या पोरांकडे पाहूनसुद्धा एखाद्या पॅरॅनॉइड क्षणी मला धसकायला होतं, अरे आत्ता आपल्याला अचानक काही झालं तर...!!

दुर्दैवी घटना आहे.

कारणे माहित नाहीत त्यामुळं कुठल्या एका बाजूने बोलणं तसं योग्य नाही. तिने केलेला अविचार असेल किंवा नसेलही. मराठमोळीने जे लिहिलंय त्यात तथ्य आहे. आपण सगळ्या सारासार विचार करुन बोलतोय, तिला तर तेवढा विचारही करता येत नसेल कदाचित. काही कारणांनी 'आत्महत्येचा विचार मनांत येणं', 'जगण्यात अर्थ नाही' असं वाटणं आणि आत्महत्येची प्रवृत्ती यात फरक आहे. मुले किंवा इतर काही कारणांकडे बघून जे जगतात त्यांच्यात मुळातच जगण्याची जिद्द किंवा इच्छा असते. ते कारणं शोधतात आणि ती मुलांच्यात किंवा इतर गोष्टीत दिसतात. हे आपलं माझं मत.

त्या मुलाचं नुकसान झालंच आहे, पण त्याला कोणी चांगलं वाढवणारं मिळो आणि त्याच्या पुढच्या आयुष्यावर वाईट परिणाम न होवो ही सदिच्छा!

माझ्या एका शाळकरी मैत्रिणीने गेल्या वर्षी असाच प्रयत्न केला, सुदैवाने ती वाचली. मुलाला सासुबाईंच्या खोलीत झोपायला पाठवले. नवरा बाहेरगावी गेला होता. हिने झोपेच्या गोळ्या घेतल्या. वरवर साधी वाटणारी कारणे पण अनेक वर्षांपासून मनात साचलेली. ही मुलगी हुशार, तीला आर्कितेक्ट व्हायचे होते पण आई-वडील म्हणाले शिकुन काय उपयोग, "मंग बडी पार्टीवाले कुठं सगळे शिकलेले असतात". बडी पार्टी म्हणजे स्वतःचे पेट्रोल पंप, भले मोठे होलसेल बिझिनेस असलेली स्थळं. मग ओळखीतल्या एका मुलाशी हिला लग्न करायचे होते पण पुन्हा "बडी पार्टी" नव्हती, मुलगा काय इंजिनीअर होता म्हणे. खरे तर पूण्यात COEP त शिकलेला मुलगा पण नाही. शेवटी लग्न झाले तो ही आमच्याच कॉलेजमधे पण इंजिनीअर असला तरी बडी पार्टी होती. ह्याला वडिलांनी जोर लावुन, विसा वगैरे करायला लावला आणि कॅनडाला जावे लागले. तिला नव्हते जायचे. लहानपणापासून नेलपेंट लावयला सुद्धा जिच्याकडे ब्युटिशिअन घरी यायची ती सगळ्यांची "सोनकी" कॅनडात एका देसी कुटुंबासोबत घर शेअर करुन रहात होती. सकाळचा स्वयंपाक हिने करायचा आणि संध्याकाळचा दूसरीने. मुला-माणसांच्या, नोकरा-चाकरांच्या भरल्या घरातुन उठुन असे दिवस कंठणे तिला अवघड जात होते. तिने पून्हा-२ सर्वांना सांगितले की भारतात जाउ. पण सासर्‍यांची इच्छा की एका तरी मुलाने "फॉरेन" ला गेलेच पाहिजे. थोरल्या दोघांचा धंद्यात जम बसलेला मग धाकट्याला बळे पाठवले. शेवटी एका भारत-वारीत तिने हा प्रकार केला. भारतात गेल्यावर अशासाठी की जे व्हायचे ते माझ्या माणसांमधे होउदेत. आणि लेकाला आजी-आजोबांच्या हवाली करुदेत. मग नवरा म्हणतो मी कधी विचारच नाही केला की तिला भारतात रहयची इतकी तीव्र इच्छा आहे.

आणि एका मित्राच्या बहिणीला डिप्रेशनचा तीव्र आजार होता त्यात तिने ७ महिन्यांची प्रेग असताना जीव दिला. शामली, तुझ्या मैत्रिणीचे असेच काही असेल का गं ? नाहीतर एक आई अशी-कशी आपल्या पिलाला सोडुन जाईल ? साधे तासभर शॉपिंगला गेले तरी असे वाटते आता खूप झाले, जावे आपले घरी. तिला कसे वाटले असेल शेवटच्या क्षणी Sad

>>>>तिच्या काही अडचणी ज्या आईपणावर मात करणा-या असूच शकत नाहित
त्याचाच विचार करतेय!!!
पण प्रचंड दु:खातून जाणार्‍या आणि तरिही बाळाकडे बघून जगणार्‍या निराधार बायका बघीतल्यात, त्यांच्या बरोबर काम केलंय. सतत डोमेस्टिक व्हायलंसला बळी पडलेल्या, मानसिक संतुलन बिघडेल इथवर टॉर्चर सहन केलेल्या, (त्यातली एक रेप व्हिक्टिम!!). त्यांच्यासाठी स्टोनी ब्रुक युनिव्हर्सिटीत एक गृप होता. अश्या बर्‍याचश्या बायका आपणहून मदत मागायला यायच्या नाहीत. कुणीतरी त्यांची गरज समजून त्यांना आणावं लागायचं असं आम्हाला सांगीतलं गेलं. (हा कठीण भाग). पण समाजसेविका, काउन्सेलर्स आणि अगदी टोकाच्या केसेसमधे डॉक्टर्स च्या मदतीने त्या परत शिकायला यायच्या. आपल्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करायच्या.
अर्चनाला अशी मदत मिळु शकली असती तर ती जगली असती का? असा विचार सारखा डोक्यात येतोय. (आता ह्या जर तर ला फारसा अर्थ उरला नाही.)

>>मुले किंवा इतर काही कारणांकडे बघून जे जगतात त्यांच्यात मुळातच जगण्याची जिद्द किंवा इच्छा असते. ते कारणं शोधतात आणि ती मुलांच्यात किंवा इतर गोष्टीत दिसतात.

मला हे पटत नाही. खूप जवळची उदाहरणे पाहिली आहेत की जगण्यासाठी काहीही कारण उरले नसताना, आणि मृत्युने सगळ्यातून सुटका होण्याचा मार्ग मोकळा असताना, केवळ 'आई, आमचे काय होईल?' या प्रश्नाचे उत्तर म्हणून जगण्याचा पर्याय स्विकारला गेला आहे.
ती मुले आज स्वतःच्या पायावर उभी आहेत आणि जीवनातली आव्हाने यशस्विरित्या पेलत आहेत. त्यांच्या आईने जर तेंव्हा, आता सहन करणे केवळ अशक्य आहे म्हणून हा मार्ग स्विकारला असता तर... विचारच करवत नाहीये.

>>आई झाली म्हणून तीला माणुस म्हणवून घ्यायचा अधिकार नाही???
>>तिच्या काही अडचणी ज्या आईपणावर मात करणा-या असूच शकत नाहित हा विचार नाकारता नाही येणार आपल्याला.

माणूस म्हणवून घ्यायचा अधिकार कुणालाच मृत्युचा अधिकार देत नाही श्यामली. मग ती आई असो वा नसो. आणि नाही, आईपणावर मात करणार्‍या अडचणी असूच शकत नाहीत. ज्या क्षणी तुम्ही कुणाला जन्म देता, त्या क्षणी तुम्ही त्या जीवाची काळजी घेण्याचे एक अदृश्य वचन दिलेले असते. कुठलीही किंमत मोजून ते पार पाडणे तुमचे कर्तव्य असते. ते जर जमत नसेल तर तुम्हाला जन्म देण्याचाच अधिकार नाही.

>>(आता ह्या जर तर ला फारसा अर्थ उरला नाही.)
मृण, असं म्हणू नकोस. अजूनही एखादी अर्चना हे वाचत असेल तर कदाचित एक क्षणभर थांबून ती विचार करेल आणि कदाचित आणखी काही मुले अनाथ होण्यापासून वाचू शकतील.

खरंच अश्विनी. एका अर्चनाच्याबाबतीत उशीर झाला. तरी तु म्हणतेस ते बरोबर!!!

ह्या केसमधे नक्की काय कारणपरंपरा आहे हे कोणालाच माहीत नाहीये. घडलं ते दुर्दैवी खरंच, पण त्यावरून अश्या आया असतातच / नसतातच अशी generalizations करणं बरोबर नाही. जगात सगळ्या प्रकारची माणसं असतात. मुलांकडे बघून तगणारी पण असतात, मुलांमुळेच depress होणारी पण असतात (postpartum depression हे एक उदाहरण), फार कशाला, आपल्याच मुलांना abuse करणारी वा जिवे मारणारीही असतात. (हे म्हणतानाही बरं वाटत नाही, पण असतात ही fact आहे.)

तिने आत्महत्या केली म्हणून नवर्‍याला व्हिलन ठरवून मोकळं होणं हा सोपा उपाय आहे. पण तशी परिस्थिती असेलच असं नाही. त्या मुलीला पूर्वापार एखादा मानसिक विकार असू शकतो - जो आता बळावला. आपल्याकडे मुळात मानसिक विकारांबाबत अज्ञान असतं आणि निदान झालं तरी ते लपवण्याकडे कल असतो.

असो. तिच्या मुलासाठी हळहळ वाटणं स्वाभाविक आहे. फक्त तिच्याबद्दल वा तिच्या संबंधितांबद्दल इतक्या अपुर्‍या माहितीवरून निष्कर्ष काढणं चुकीचं आहे.

On the other hand, असं आपल्या वर्तुळात घडू नये म्हणून आपल्याला काय करता येईल याचा विचार करायला हवा. आपल्या गोतावळ्यातील (नातेवाईक, मित्रमंडळी) लोकांशी आवर्जून संपर्क ठेवणं, खुशाली विचारत/कळवत राहणं, त्यांच्या सुखदु:खात प्रत्यक्ष जमलं नाही तरी निदान फोन/पत्र/मेल ने सहभागी होणं आणि आपल्या सुखदु:खात त्यांना सहभागी करून घेणं - ह्या वरकरणी साध्या वाटणार्‍या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. विशेषत: परदेशात राहणार्‍या, आपल्या माणसांपासून संपर्क कमी झालेल्या, काही कारणाने स्वतःचं social circle न बनवू शकलेल्या लोकांच्या बाबतीत.

'मायबोली' अश्या किती जणांचा आधार आहे हे मी वेगळं लिहायला नको.

स्वाती, नेमक्या शब्दांत लिहिलंस.
अश्विनी, मला असंच म्हणायचं होतं. तू ते एक वाक्य बाजूला काढू नको. मला असं वाटतं, तू म्हणतेयस ते लोक वेगळ्या मनःस्थितीत असतात, त्यांना मानसिक आजार वगैरे नसतो. विचार किंवा कृती एक असली तरी ती करणारे लोक वेगवेगळ्या कॅटेगरीत येऊ शकतात. या मुलीच्या कृतीमागचे कारण आपल्याला माहित नाही. आणि केवळ जन्मदात्या आईने वाढवले नाही म्हणून पुढल्या आयुष्यात कोणी यशस्वी होत नाही असे काही नाही.

Pages