अर्चना

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

तिच्या पिलाकडे बघून राहून राहून वाईट वाटतंय. गळ्यात फास अडकवून घेताना नजरेसमोर एकदाही त्याचा चेहरा आला नसेल ? त्याचे विचार आले नसतील डोक्यात? एवढ्या अफाट जगात आपलं पिल्लू एकटं पडेल त्याच्याकडे कोण बघेल? परक्या देशात आहोत आपण आपलं बाळ काय करेल? हे आणि असले बरेचसे प्रश्न अजूनही मनात घोळतायत .

मी एवढे दिवस राहत असलेल्या आधीच्या अपार्टमेंटमधल्या आमच्याच ग्रुपमधल्या एकीने गळ्याला फास लावून घेतला.. हे ऐकताना ५० चेहरे तरळून गेले डोळ्यापुढे, नक्की कोण हे कळेपर्यंत सगळ्या मैत्रिणी दिसायला लागल्या , सहजच बोलता बोलता बोलून गेलेल्या मनात सलणाऱ्या एकेकीने सांगितलेल्या स्वतःच्या गोष्टी आठवल्या. पंधराच मिनिट लागली नक्की कोण ते कळायला. पण त्या पंधरा मिनिटातली ही अवस्था आणि कोण ते कळल्यावर विश्वासच बसेना.

ती..... एवढी हसतमुख आणि बडबडणारी, सारखी बिल्डिंगभर फिरणारी. मस्तपैकी ढोलक वाजवणारी, त्याच्या तालावर मनसोक्त नाचणारी. स्वतः: फारसं शिकलेली नव्हती पण आपल्या मुलाने खूप शिकावं स्वतः:ला जमत नसतील त्या गोष्टीत प्रसंगी शेजारणींची मदत घेऊन त्याचा अभ्यास घेणारी.

एवढं कायच झालं असेल तिला? काय डाचत असेल? कोणाशीही बोलाव असं न वाटता सरळ स्वतः:ला संपवण्याचा निर्णय घेण्यापर्यंत तिला काय त्रास होत असेल? एक ना अनेक प्रश्न डोक्यात गरगरतायत.

बरं हे सगळं करायच्या आधी मुलाला घेऊन बाहेर पार्किंगमध्ये फिरली, त्याच्यासोबत खेळली, बाकीच्या बायकांशी गप्पा मारल्या आणि नवरा काही कामासाठी बाहेर गेला तेवढ्या वीस मिनिटात सगळा खेळ खलास.

कोणी म्हणतं दोघांच पट्त नव्हतं, कोणी म्हणत तिला भारतात जायच होतं, कोणी म्हणत त्यांचा बराच जुना प्रॉब्लेम होता, माणूस अतिशय चिक्कू आहे पैसा द्यायचा नाही, तिला घरी पाठवायचा नाही, वागणं नीट नाहीये त्याचं. हे असं असताना , बाई नवऱ्याची काळजी घ्यायला विसरली नव्हती;जाताना चिट्ठी सोडून गेली "माझ्या मृत्यूला कोणीही जबाबदार नाहीये" .

"माझी आई कुठय?" असं विचारल्यावर, त्या पाच वर्षाच्या बाळाला " तुझ्या आईला दवाखान्यात नेलय; हे खोटं सांगताना; माझ्या बाकीच्या मैत्रीणिंची काय अवस्था झाली असेल ही कल्पनाही करवत नाहीये. ज्यांनी तिला लटकलेलं बघितलं त्यांची तर त्याहूनही वाईट अवस्था .

ही बातमी ऐकल्या ऐकल्या प्रत्येकाने तिला शिव्या दिल्या, हे काय असलं वागणं म्हणून, पण मला मात्र वाटलं , किती सहन केल्यावर या निर्णयापर्यंत आली असेल ती.

अजूनही सुटका नाहीच झालेली तिची. सगळ्या औपचारिकता पूर्ण होईपर्यंत अजून ४-५ दिवस लागणार आहेत. घरचे कोणीही येउ शकत नाहित. ही अजूनच वाईट गोष्ट.

जीव गेला तरी देहाचे भोग संपलेले नाहियेत .

विषय: 
प्रकार: 

लालु, अगदी बरोबर. त्या वेगळ्या मनःस्थितीतल्या लोकांविषयीच बोलते आहे मी. मानसिक आजार असलेल्यांबद्दल नाही.

हिच्याबाबतीत काय परिस्थिती होती आपल्याला माहित नाही. मानसिक आजाराचा उल्लेख वरती नाही. नसेलच याची खात्री देता येत नाही पण,

>>ती..... एवढी हसतमुख आणि बडबडणारी, सारखी बिल्डिंगभर फिरणारी. मस्तपैकी ढोलक वाजवणारी, त्याच्या तालावर मनसोक्त नाचणारी.

यावरून असावा असे वाटत नाही. डिप्रेशन असलेल्या लोकांची लक्षणे वेगळी असतात. आता कदाचित ती लक्षणे दडपून ठेवत असेल, इ. इ. मते समोर येतील.

>>बरं हे सगळं करायच्या आधी मुलाला घेऊन बाहेर पार्किंगमध्ये फिरली, त्याच्यासोबत खेळली, बाकीच्या बायकांशी गप्पा मारल्या आणि नवरा काही कामासाठी बाहेर गेला तेवढ्या वीस मिनिटात सगळा खेळ खलास.

यावरून हे नैराश्याच्या झटक्यात केले असेल असेही वाटत नाही. उलट पूर्वनियोजितच वाटतय.

आणि हो, जन्मदात्या आईने वाढवले नाही तरीही बरीच यशस्वी माणसे होतात. पण म्हणून जे बाळपण त्यांच्या वाट्याला येतं ते चुकत नाहीच.

असो. हा काही V&C चा विषय नाही.
मी मला जे वाटले ते लिहीले. मला माहित आहे या एका बाबतीत माझी मते खूप strong आहेत. तुमची तशी असावीत असे माझे म्हणणे नाही. माझ्यापुरता हा विषय संपला आहे.

On the other hand, असं आपल्या वर्तुळात घडू नये म्हणून आपल्याला काय करता येईल याचा विचार करायला हवा. आपल्या गोतावळ्यातील (नातेवाईक, मित्रमंडळी) लोकांशी आवर्जून संपर्क ठेवणं, खुशाली विचारत/कळवत राहणं, त्यांच्या सुखदु:खात प्रत्यक्ष जमलं नाही तरी निदान फोन/पत्र/मेल ने सहभागी होणं आणि आपल्या सुखदु:खात त्यांना सहभागी करून घेणं - ह्या वरकरणी साध्या वाटणार्‍या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. विशेषत: परदेशात राहणार्‍या, आपल्या माणसांपासून संपर्क कमी झालेल्या, काही कारणाने स्वतःचं social circle न बनवू शकलेल्या लोकांच्या बाबतीत.

>>
अगदी माझ्या मनातलं बोललीस स्वाती. या गोष्टीवरून एका जीवाने जरी धडा घेतला तर तिचं जाणं अगदीच व्यर्थ ठरणार नाही

तेच गं अश्विनी, कशाचीच खात्री नाही. जे लिहिलं आहे त्यावरुन तिच्याबाबतीत कोणतच अनुमान काढता येणार नाही आणि काढू नये. म्हणूनच 'मुलाकडे तरी बघायचं' ही जी प्रतिक्रिया झाली त्याला दुसरी बाजू म्हणून ही मते मांडली आहेत. 'ते तसंच असणार' असं म्हणायचं नाही आहे.

अश्विनी, तु विषय संपला असे म्हणालीस तरी लिहिते आहे, तुझ्या पोस्टला उत्तर म्हणून नाही तर एक माहिती म्हणून. माझ्या मित्राच्या बहिणीने जेव्हा सातवा महिना असताना आयुष्य संपवलं तेव्हा सर्वानीच तिच्याविषयी, नवर्‍याविषयी, बाकी कुटुंबाविषयी उलट-सुलट तर्क लावले. तेव्हा तिच्या आई-वडिलांनी खरी माहिती सांगितली. त्या मुलीला डिप्रेशनचा आजार होता. हा अनुवांशिक असतो म्हणे. तिच्या वडिलांनाही होता, फक्त ते कधी इतके टोकाला गेले नाहीत. ही मुलगी अभ्यासात, इतर गोष्टींत अतिशय हुशार. वडिलांना त्यांच्या भल्या मोठ्या उद्योगात मदत करायची. पण डिप्रेशनचा काळ सुरु झाला की हाताच्या नसा कापणे (दोनदा प्रयत्न केला), खाल्लेले उलटी करुन टाकणे, केसांना नेलपेंट लावणे, नवर्‍याला बोचकारणे अशी लक्षणे दिसत. उपचार सुरु होतेच. लग्न झाल्यावर काही काळ असे काहीच घडले नाही. तरी शक्यतो तिला एकटी सोडत नसत. प्रेगनन्सिमधे विषेश काळजी घ्यायला सांगितले होते. कारण "खवळलेल्या" हार्मोन्स्मूळे आजार उफाळुन वर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि त्या काळातच पून्हा डिप्रेशन मधे जाउन तिने असे करुन घेतले.

अर्थात हे सगळे तिच्या आई-बाबांनी सांगितलेले. मेडिकल सायन्समधे काही वेगळे नाव ह्या आजाराला असु शकेल परंतु त्या घरात अजुनही १-२ लोकाना हा आजार होता. त्यांच्याच घरातल्या एका सदस्याने गेल्या वर्षी जीव संपवला.

माझा मुद्दा फक्त परिस्थितीला कंटाळून आत्महत्या करणार्‍यांविषयी होता. डिप्रेशन हा वेगळाच प्रांत आहे. आणि तेही योग्य वेळी उपचार मिळाले तर टळू शकते.

'मायबोली' अश्या किती जणांचा आधार आहे हे मी वेगळं लिहायला नको. >>> Happy

स्वाती, छान लिहीलं आहेस .. अगदी तंतोतंत पटलं ..

श्यामली, खूप वाईट वाटले वाचून्..
स्वाती ला अनुमोदन..

खरंच खुप वाईट वाटतंय. शामली जमले तर त्या छोट्याची माहिती देत जा आम्हाला. मला पण हेच वाटतय की एक छोटासा जीव आपल्यावर अवलंबुन असताना एका आईला असे का करावेसे वाटले असेल..

स्वाती, बरोबर लिहिलेस गं.

विषय निघालाय म्हणुन, मागच्या वर्षी पुण्याजवळ एका खोल दरीत एक कार पडली. पोलिसाना माहिती मिळेपर्यन्त पहाणार्‍यानी सांगितले की चालकाने मुद्दाम दरीत उडी घेतली कारसकट. नंतर पंचनामा झाल्यावर कळले ते खुप दु:खद होते. एका आईने तिच्या २ मतिमंद मुलांसकट कार दरीत झोकुन दिली होती आणि तिघांचे जीवन संपवले. तिला ३ मुले. मोठी मुलगी आणि धाकटी २ मुले मतिमंद अशीच ५-७ वर्षांची. दुसरा तसा होता, आणि तिसर्‍याचा जन्म झाल्यावर त्यांना कळले की तो पण.. म्हणुन तिला नैराश्य आलेले. त्यात तिने असा निर्णय घेतला. Sad

फार फार अस्वस्थ व्हायला होते असे काही कळल्यावर. आई झाल्यापासुन तर फारच.

त्या छकुल्याची काळजी घेणारे कोणीतरी त्याला लवकर भेटो.

सुनिधी ती बातमी वाचल्याचे लख्ख आठवतंय..
खरंच वाईट होतं ते! Sad

श्यामली, वाईट वाटल वाचुन. तिने अस लहान मुलाला मागे ठेवुन जाण हा अक्षम्य गुन्हा केलाय का माहीत नाही पण असेल तर परमेश्वराने तिला मनापासुन माफ कराव आणि सद्गती दयावी. त्या मुलाला पण कोणाचेतरी प्रेम मिळावे.

परमेश्वराने या जगात प्रत्येक व्यक्ती हि युनिक बनवली आहे. एका व्यक्तीसारखी दुसरी व्यक्ती नाही. अंगठ्याचा ठसा सुद्धा कोणाचा सारखा असु शकत नाही तर प्रत्येकाची सहन करायची, विचार करायची क्षमता कशी सारखी असेल. शेवटी बनवणाराही तोच आणि बुद्धीदाताही तोच.

अशी फुलझाड असतात जी कुठेही आरामात फारशी निगा न घेतापण फुलतात आणि अशी पण असतात जी योग्य नीगा मिळाली नाही तर पाण्याअभावी सुकुन जातात किंवा अति उन्हाने जळुन जातात. सुकुन जाणार्या फुलझाडांना अस कस म्हणता येईल कि तुमच्या अंगावरच्या फुलांसाठी तुम्ही अजिबात सुकता कामा नये.

हे टाळता आल असत किंवा येउ शकल असत हा स्वतंत्र विषय होईल पण तिने अस करुन खुप मोठा गुन्हा, अपराध केला अस म्हणण्यापेक्षा तिला सावरणार कोणी भेटु शकल नाही अस म्हणता येईल.

डिप्रेशन हा वेगळाच प्रांत आहे. आणि तेही योग्य वेळी उपचार मिळाले तर टळू शकते.>>

योगा अशा आजारांवर मात करतो. आमच्या योगा केंद्रात असे स्त्री पुरुष येतात आणि वर्षभर योगा शिकून ते स्वतःच योगाचे स्वयंसेवक होतात. योगामधे मनोविकार दुर करण्याची अफाट शक्ती आहे. पण आपण भारतीय योगाला हवे तेवढे महत्त्व देत नाही याचे फारच फार वाईट वाटते.

श्यामली खुप वाईट वाटले ग. असे दिसते की ती कोणाशीही बोललेली नसावी तिच्या दु:खाबद्दल. किती महत्वाचे असते नाही आपल्या अडचणीन्बद्दल आपल्या जवळच्या व्यक्तीन्शी बोलणे. (अर्थात काहि जणान्ना बोलके करणे अवघड असते, त्यान्च्या स्वभावामुळे.. )

आई ग... हे काल वाचलंच नाही. किती भयंकर. वाचतानाही रडतेय मी.

देव करो नि त्या मुलाचं तरी सगळं नीट होवो.

मला त्या बाळाची फार काळजी वाटते आहे. शिवाय त्याला आजी आणि आजोबा ही नाहि आहेत. माझी काही मदत होउ शकते का? क्रुपाया सान्गा.

आपण अर्चना ला मदत करू शकलो असतो नक्किच.... तीने मन मोकळे केले असते कुणा जवळ तर हे टाळता आले असते ... पण आता या जर तर ला अरथ नाही. जे घडलं ते दुर्दैवीच....

बीला अनुमोदन, योगामधे मनोविकार दुर करण्याची अफाट शक्ती आहे.

बापरे...खुपच दुखद घटना ..... तीच कुटुंब कोणत्या स्थीती मधुन जात असेल याचा विचार पण करवत नाही ....

हे परमेश्वरा तीच्या आत्म्याला शांती मिळो....

मला काही लिहावसंच वाटत नाहीये... तो पाच वर्षाचा मुलगा सारखा डोळ्यासमोर दिसतो आहे. Sad

खरच अतिशय दुखद घटना.....

खूप वाईट वाटलं वाचून. विशेषतः त्या बाळाच्या बाबतीत.

प्रत्येकाची परिस्थितीला react होण्याची capacity वेगवेगळी असते. कधीकधी परदेशात एकेकटं राहिल्यावर मन मोकळं करायलाही कुणी मिळत नाही. मित्र मैत्रिणीत वागणं वेगळं आणि अगदी एखाद्याच्या मनाच्या तळाशी काय चाललय याचा अंदाज येणं वेगळं.

आत्महत्या करणार्‍या व्यक्तीशी ती त्या मनःस्थितीत असताना कुणी चार जिव्हाळ्याचे शब्द बोलले तरी ती त्या विचारापासून परावृत्त होऊ शकते. दुर्दैवाने अर्चनाला ती संधी मिळाली नाही.

कितीही स्पष्टीकरणं द्या खूप वाईट वाटतय. Sad त्या मुलाची वाढ निकोप व्हावी एवढीच इच्छा.

बापरे... अतिशय अतिशय वाईट. आपल्याला इतकं वाईट वाटतय.... का? ह्या प्रश्नाच्या उत्तरासाठी आपल्यासारखे अगदी तिर्‍हाईतही इतके कासाविस होतायत... तर मोठं झाल्यावर ह्या प्रश्नांची उत्तरं शोधणार्‍या त्या बाळाचं काय होईल?
मी विचारही करू शकत नाही...
जो जन्माला घालतो, चोच देतो तो चाराही देईलच.... हे पुस्तकात शोभणारं वाक्यं आहे... प्रत्यक्षात घरट्याला ऊबही हवी असते मायेची, हक्काची....
छ्छे. अगदिच अगतिक झाल्यासारखं वाटतय. स्वाती म्हणतेय तसं आपल्या आजूबाजूच्यांशी संवाद ठेवणं आवश्यक आहे.... आपल्यापरीने ते तरी करू शकतो.
त्या पिल्लाला सुखी ठेवावं देवानं.... अजून काय?

माझ्या मनात जो काही उलट सुलट गोंधळ उडालाय तो तर सर्वांनी आधीच चर्चिला आहे, न पाहिलेलं पिलु डोळ्यासमोरुन हलत नाहीये Sad

ह्म्म्म्म्......मला वाटत होतं की भूक लागणे ही जितकी स्वाभाविक संवेदना आहे तितकीच..... आपल्या पिल्लाचे रक्षण करणे ही सुद्धा.
कुठलेही, अगदी कुठलेही दु:ख याला अपवाद नसावे.

I guess I was wrong. असो.

पण मला नेहमी एक आश्चर्य वाटायचं या मूल मागे ठेवून आत्महत्या केलेल्या मातांचं की हे यांना करवतं कसं. अगदी आभाळ कोसळलं असलं तरी जे आभाळ त्या छोट्या जीवावर कोसळणार आहे त्यापुढे ते मोठे आहे का असे का त्यांना वाटत नसावे? ती मानसिकता मला समजूच शकत नव्हती. पण वरची मते वाचल्यावर ते आश्चर्य नाहीसे झाले. Sad

ती बिरबलाची गोष्ट मला नेहमी खोटी वाटायची, जीवात जीव असेतोवर माकडीण मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करते पण जेंव्हा जीवावरच बेतते तेंव्हा तेच मूल ती पायाखाली धरते. अशक्य वाटायची ती गोष्ट...... पण आता नाही वाटत. Sad

खूपच वाईट वाचले वाचून...!

तिचे पिल्लूहि डोळ्यासमोर आले .. रडायलाच आले. आपण न पाहताहि त्या मूलांबद्द्ल इतके वाटले तर तिचे काय झाले असेल!!

इथे बरयाच जणांनी नमूद केले कि त्या मूलाचे काय होइल? मला एवढेच म्हणावसे वाटते कि ते मूल फक्त तिचिच जबाबदारि नाहि आहे, तेवाढिच ती त्या मूलाच्या वडिलांचिहि जबाबदारि आहे.

खरंय... जे झालं ते फारच वाईट झालं...

पण माझ्या मते या नंतरच्या चर्चेला (विशेषकरुन जर-तर च्या चर्चेला) तसा फारसा काही अर्थ नाहीये...

ही चर्चा वाचताना माझ्या मनात फक्त इतकंच आलं:-

"जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय!"

काही दिवस अश्रु ढाळले जातील... काही आठवणी काही जणांकडून जपून ठेवल्या जातील... हे का झालं याबद्दल उलट-सुलट तर्क्-वितर्क लढविले जातील...
पण ते फक्त तेवढ्यापुरतंच असेल... कोणाचंही कोणावाचून काहीही अडत नाही, हे एक चिरंतन सत्य आहे. काही जण याला कटू सत्य म्हणतील, पण माझ्या मते हे एक वरदान आहे... कारण आयुष्य हे असंच चालू राहिलं पाहिजे... ते कोणासाठीही थांबता कामा नये... जुन्या कटू आठवणी विसरल्या गेल्याच पाहिजेत... येणा-या नवीन क्षणांचं स्वागत झालंच पाहिजे...

काही प्रतिसादांमधे असाही रोख दिसला की या चर्चेमुळे अजुन कोणी अर्चना जर हे वाचत असेल तर कदाचित तिचे मतपरिवर्तन होऊ शकेल. पण खरं सांगू, इतक्या गंभीर विषयाबाबत, अशा चर्चामुळे मतपरिवर्तन होऊ शकेल असं मला नाही वाटत. शिवाय, म्हणतात ना - ज्याचं जळतं त्यालाच कळतं. आपण कितीही विचार केला तरी त्या व्यक्तीची त्या क्षणी काय मानसिक अवस्था असेल याची कल्पना करणं केवळ अशक्य आहे. माणूस अनेकदा भावनेच्या भरात असं काही वागून जातो की त्याची कोणत्याही प्रकारे कारणमीमांसा करणं खुपच कठीण होऊन बसतं.

अश्व्निनीला अनुमोदन.
मला नाही वाटत कि कुठलेही सन्कट, दु;ख बाळापुढे मोठे आहे, उलट ते इन्स्पिरेशन असायला हवे प्रत्येक सन्कटाला सामोरे जाण्यासाठी.

दोन भयानक प्रकार आठवले. २००४ साली घडलेल्या २ घटना. एकात जुना प्रियकर परत आला, बाळाचा तो स्विकार करत नाहि म्हणुन आईने १ वर्षाच्या बाळाचा मांडीवर गळा दाबुन.........खात्री न वाटल्यानं गच्चीतुन फेकुन.... आणि दुसरा प्रकार्...झोपेत अंगाखाली २ महिन्याचे मूल दबले गेले, सासरचे रागावतील म्हणुन घाबरुन आईने गटारात फेकुन...... Sad Sad
हे कलियुग आहे खरंच. काय म्हाणावं? त्या बाळांचं म्हा दुर्भाग्य की अशा माता त्याना जन्मदात्या (?) म्हणुन मिळाल्या....

पल्ली,
प्रस्तुत लेखातील अर्चनाच्या कृत्याचे परीणाम जरी तिच्या मुलाला भोगावे लागणार असले तरी आपल्या बाळाला इजा व्हावी ह्या हेतूने तिने हे केलेले नाहीये. वरच्या अमानूष उदाहरणांतील स्त्रियांशी तिची तुलना करणे अन्यायकारक होईल.

अंगावर काटा आला वाचुन. तिच्या बाळा साठि खुप खुप वाईट वाटतय त्याच सार लवकर सुरळित होवो.....अर्चनाला शांति मिळो.

बरं हे सगळं करायच्या आधी मुलाला घेऊन बाहेर पार्किंगमध्ये फिरली, त्याच्यासोबत खेळली, बाकीच्या बायकांशी गप्पा मारल्या आणि नवरा काही कामासाठी बाहेर गेला तेवढ्या वीस मिनिटात सगळा खेळ खलास.
---------------------------------------------------------
मला आशा आहे कि पोलीस नीट चौकशी करुन ही "आत्महत्या"च होती हे निश्चित करतील. या टाईमलाईन वरुन तर जरा संशयास्पद वाटतेय. असो.

काहीही झाले तरी त्या निष्पाप (न पाहिलेल्या) मुलाचा चेहरा एक्सारखा डोळ्यासमोर येतोय. देव त्या चिमण्या जीवाला हा आघात सहन करण्याची शक्ती देवो.

Pages