... भांडू नकोस राणी

Submitted by अ. अ. जोशी on 7 September, 2010 - 14:12

पाहून पाठ इकडे फिरवू नकोस राणी
इतके महत्त्व कोणा देऊ नकोस राणी

आयुष्य वेचलेले समजून घे जरासे
नुसती फुले सकाळी चढवू नकोस राणी

तू कालच्याप्रमाणे नव्हतीस आजही अन
बाता तरी उद्याच्या मारू नकोस राणी

जमले न घालणेही फुंकर जरा मनावर
खपल्या तरी व्रणाच्या काढू नकोस राणी

जमले तुला न होते सगळेच सांगणेही
खोटे तरी कुणाशी बोलू नकोस राणी

होतो कधी तुझा मी; होईनही कदाचित....
इतक्यात भाव कुठला खाऊ नकोस राणी

बोलू नकोस किंवा कौतुक नको करू तू...
इतकी तुला विनंती...., भांडू नकोस राणी

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

होतो कधी तुझा मी; होईनही कदाचित....
इतक्यात भाव कुठला खाऊ नकोस राणी

बोलू नकोस किंवा कौतुक नको करू तू...
इतकी तुला विनंती...., भांडू नकोस राणी

........अप्रतिम अजयराव....!!!

आयुष्य वेचलेले समजून घे जरासे
नुसती फुले सकाळी चढवू नकोस राणी

हा शेर खूप आवडला...
वा वा ... छान गझल...

कौतुक नको करू तू....इथे अडल्यासारखे वाटले....
नावाजुही नको तू किंवा नावही घेऊ नको कसे वाटेल?

पद्मजा,
कौतुक नको करू तू ...
इथे क च्या पुनरावृत्तीमुळे थांबून थांबून म्हणायला लागते हे खरे. पण माझ्यामते ते तसेच ठेवायला लागेल.
इतका सखोल विचार केल्याबद्दल धन्यवाद.