उदंड देशाटन करावे ... लडाख ... भाग १३ - त्सो-कार - पांगच्या वाळवंटात ... !

Submitted by सेनापती... on 24 August, 2010 - 20:56

पहाटे-पहाटे खोलीच्या छतामधून बारीक माती पडू लागल्याने मला आणि अभिला जाग आली. काय होतय ते समजतच नव्हते. नंतर कळले की छपरावर कोणीतरी नाचत असल्यामुळे असे होत आहे. ते कोणीतरी म्हणजे अमेय साळवी, अमेय म्हात्रे आणि कुलदीप होते हे नंतर कळले. पहाटे-पहाटे फोटो काढायला हे तिघे छपरावर चढले होते. मला जाग आल्यावर मी इतर सर्वांना जाग आणली हे वेगळे सांगायला नकोच. ७ वाजता चहा घेउन आम्ही निघायची तयारी करू लागलो.

पण पूनम काही सापडेना. कुठे गेली होती काय माहीत? नंतर ह्या तिघांचे अजून उपद्व्याप समजले. पूनम सुद्धा छतावर चढल्यानंतर ह्यांनी खालची शिडीच काढून घेतली होती. १५-२० मिं. वरतीच बसून होती. आरडा-ओरडा करायला लागल्यावर शेवटी तिला खाली घेतले आणि ८ वाजता आम्ही सरचूच्या दिशेने निघालो. सकाळी-सकाळी त्सो-मोरिरीचे सौंदर्य कालच्यापेक्षा वेगळे भासत होते. कालच्या कच्च्या रस्त्याने पुन्हा त्सो-मोरिरीला वळसा मारत आम्ही वाळूच्या पठाराकडे निघालो. वाळू कालपेक्षा जास्त भुसभूशीत जाणवत होती. आमच्या बाईकचा स्पीड फारतर तासाला २० किमी. इतका सुद्धा नव्हता. तेनसिंगला मात्र त्या कच्च्या रस्त्यावरून निघायची भलतीच घाई झाली होती बहुदा. अखेर त्याने चुक केलीच. वाळूच्या त्या रस्त्यात त्याने गाड़ी भलत्याच बाजूने नेली आणि........................

सामानाच्या वजनाने ती अख्खी गाड़ी वाळूमध्ये बसली. त्यात तेनसिंगने गाड़ी काढ़ण्यासाठी ती अजून रेस केली. आता तर ती अक्षरशः रुतली. मागुन येणाऱ्या बायकर्सना ह्याची काही कल्पनाच नव्हती. 'बाजुच्या दुसऱ्या रस्त्याने पुढे या' असे सांगायला दिपाली आम्हाला हातवारे करत होती. अभीला काही ते कळले नाहीत आणि तो पण त्याच रस्त्याने पुढे शिरला. आता त्याची बाईक सुद्धा वाळूत फसली. मग मात्र बाकी आम्ही सर्वजण उजव्या हाताने पुढे गेलो. बघतो तर गाड़ी अख्खी बसलेली. पुन्हा एकदा सर्व सामान उतरवले आणि मग 'इरादा पक्का तर दे धक्का' सुरू झाले. आजुबाजुने जाणाऱ्या अनेक गाड्यांचे ड्रायव्हर सुद्धा आमच्या मदतीला आले.अखेर अखेरचा 'दे धक्का' करून गाड़ी चांगल्या रोडला आणली.

त्यानंतर आमची हालत काय झाली होती ते फोटोंवरुन समजेल. सकाळी ८ वाजता सुद्धा तिकडे असे सणसणीत ऊन होते की चांगलीच धाप लागली होती. पाणी प्यालो. ताजेतवाने झालो आणि मग पुढे निघालो. चांगला १ तास वाया गेला होता. आता लवकरात लवकर त्सो-कार मार्गे पांग गाठणे महत्वाचे होते कारण तिकडून पुढे आम्ही दुसरी गाडी केली होती. तेनसिंगला पुन्हा आज लेहला पोचायचे असल्याने तो आम्हाला १२ च्या आत सोडणार होता. पुन्हा एकदा वाळूचे पठार पार करत पक्या रस्त्याला लागलो आणि वेगाने 'सुमधो'कडे निघालो. १० वाजून गेले तेंव्हा फाट्यापाशी आलो. इकडून डाव्या हाताने 'त्सो-कार'कडे निघालो. इकडून पुढचा रस्ता चांगला असेल असे वाटले होते पण नाही; पुढचा रस्ता परत कच्चा आणि वाळूचा. बाईकचा स्पीड देखील २५-३० च्या पुढे नेता येत नव्हता. अशात रस्ता मध्येच खाली-वर जायचा तर कधी अचानकपणे उजवी-डावीकडे. अश्यावेळी मागच्याला बाईक वरुन इतरून चालत यावे लागायचे तर कधी-कधी रायडरला सुद्धा बाईक ढकलत पुढे न्यावी लागायची.

११:३० च्या आसपास अचानकपणे एके ठिकाणी मला गाडी काही कंट्रोल झाली नाही आणि मी-शमिका डाव्याबाजूला वाळूमध्ये धसकन पडलो. इतक्या सावकाश पडलो की कोणालाच काही लागले नाही पण कपड्यात सर्व ठिकाणी वाळू मात्र शिरली. गाडी चालवण्यात आजपर्यंत एकदा सुद्धा ब्रेक न घेतलेल्या अमेय साळवीने त्याची बाईक आता उमेशकडे दिली होती. मी पडल्यावर काही मिंनिट्समध्ये एका उजव्या चढावर उमेश आणि शोभीत सुद्धा वाळूमध्ये पडले. उमेशच्या हाताला आणि पोटाला मात्र थोड़ेसे लागले होते. सर्वजण तिकडेच थांबलो. ज़रा दम घेतला. 'बरेचदा अपघात परतीच्या प्रवासात होतात' हे मला पक्के ठावुक होते. त्यामुळे 'ह्या पुढे गाडी अजून नीट चालवा रे' असे सर्वांना सांगून आम्ही पुढे निघालो. निघून ५ मिं. होत नाहीत तो आदित्य-ऐश्वर्याने पुढचा नंबर लावला. कुठूनसा एक कुत्रा भुंकत आला आणि दचकून आदित्यचा तोलच गेला. त्सो-कारच्या त्या वाळवंटामध्ये अवघ्या १५ मिं मध्ये आम्ही एकामागुन एक असे आम्ही ३ बायकर्स धडपडलो होतो. नशिबाने कोणालाही जास्त लागले नव्हते. गाड्या सुद्धा शाबूत होत्या. कधी एकदाचा हा कच्चा रस्ता संपतोय आणि पक्क्या रस्त्याला लागतोय असे आम्हाला झाले होते. १२ वाजत आले तसे दुरवर त्सो-कार दिसायला लागले.

सकाळी १ चहा घेउन निघलेलो आम्ही ह्या आशेवर होतो की किमान त्सो-कारला तरी काही खायला मिळेल. त्सो-कारला उजव्या बाजूने वळसा मारत पुढे निघालो. रस्ता ज़रा बरा होता म्हणुन सर्व बायकर्स वेगाने पुढे निघाले. मी मात्र फोटो घ्यायला ज़रा मागे थांबलो. काही वेळातच काळा कुळकुळीत असा नविनच बांधलेला पक्का डांबरी रस्ता सुरू झाला. 'अरे वा... चमत्कारच आहे ...' असे बोलून मी सुद्धा फटकन बाईकचा वेग वाढवत पुढच्यान्ना गाठले. अवघ्या १ किमी अंतरावर तो 'पक्का डांबरी रस्ता' संपला पण उजव्या बाजूला एक टेंट सदृश्य होटेल दिसले. आम्ही काय केले असेल ते सांगायला नकोच....

बाईक्स वरुन उतरलो तेंव्हा आमचा अवतार काय होता. बाईकवर वाळू, सामानावर वाळू, कपड्यांवर - बूटात - अंगावर सर्वत्र वाळूच-वाळू. वाळूमय झालो होतो आम्ही पूर्णपणे. हात आणि तोंड धुवून जेवायला बसलो. 'जे असेल ते आण रे' सवयीप्रमाणे तोंडातून वाक्य गेलं. बघतो तर काय... इकडे तर रोटी/चपाती, मसूरची आमटी, भात, अंड आणि मग्गी. वा. मस्त जेवण झाले. तिकडून निघालो तेंव्हा १ वाजून गेला होता. म्हणजे तेनसिंगने गाडी पांगला पोचवली सुद्धा असणार. आता आम्हाला सुद्धा लवकरात लवकर पांगला पोचणे आवश्यक होते. नशीब पुढचा रस्ता परत पक्का होता. १० मिं. मध्ये रस्त्यावर तेनसिंग गाडी घेउन उभा असलेला दिसला. म्हटले हा अजून इकडे काय करतोय. बघतोय तर गाडी मध्ये सामान नहीं की इतर टीम मेम्बर्स सुद्धा नाहीत. तेनसिंग त्यांना मेनरोडला पुढच्या गाड़ीमध्ये बसवून पुन्हा आम्हाला बघायला मागे आला होता. शिवाय पांगच्या दिशेने जाणारा एक शोर्टकट सुद्धा त्याला आम्हाला दाखवायचा होता. अजून एक वाळूने भरलेला कच्चा रस्ता.

ज्या शोर्टकटने तेनसिंग आम्हाला घेउन गेला त्या रस्त्यावरुन त्याची गाडी तर व्यवस्थित निघून गेली; आम्ही मात्र लटकलो. पुन्हा एकदा मागच्याला उतरवत तर कधी बाईक ढकलत वाळू खात-खात आम्ही मुख्य रस्त्याला लागलो. किमान १०-१२ किमी.चा फेरा नक्कीच वाचला होता. आता पक्का डांबरी रस्ता लागला. चला आता पुढे तरी नीट मस्तपैकी जाऊ ह्या कल्पनेने मन सुखावले. पण काही कल्पना किती क्षणभंगुर ठरतात नाही...!!!

२-३मिन. मध्ये तो सुखद रस्ता संपला आणि त्या पुढचा ३७ कि.मी.चा पांग पर्यंतचा संपूर्ण रस्ता अतिशय भयानक अश्या परिस्थितिमध्ये आम्ही पार केला. पूर्ण रस्त्याचे काम सुरू होते. दुपारच्या त्या रणरणीत उन्हात चांगली किलोभर वाळू खात आम्ही पुढे-पुढे सरकत होतो. कधी बाईक सांभाळत तर कधी ती वाळूवरुन कशीबशी न पड़ता सरकवत. एका मोठ्या पठारावरून तो कच्चा रस्ता जात होता. उजव्या आणि डाव्या बाजूने असंख्य छोटे-छोटे रस्ते येणाऱ्या जाणाऱ्या ट्रक्सनी बनवून ठेवले होते. ज्या जागेवरून ट्रक गेला असेल तिकडची वाळू दाबली गेली असल्याने त्याच जागेवरून आम्ही बाईक पुढे काढत होतो नाहीतर बाईक पूर्णवेळ ढकलतच न्यावी लागेल की काय असे वाटत होते. अखेर एके ठिकाणी आम्हाला उतरावेच लागले. बाईक्स जास्तीतजास्त पुढे नेउन पिलियन रायडरला आम्ही खाली उतरवले. मात्र कुलदीपने अमेय म्हात्रेला बरेच आधी उतरवले असल्याने तो जवळ-जवळ २५० मी. अंतर तरी चालून आला असेल. आल्यानंतर कुलदीपला शिव्या पडल्या हे काही वेगळे सांगायला नकोच... दुरवर रस्ता वर चढत चांगला होत जातोय असे दिसू लागले आणि आम्ही आमच्या बाईक्सचा वेग वाढवला. पांगच्या ४ किमी. आधी रस्ता पुन्हा एकदा पक्का होत घाट उतरु लागला. खाली दुरवर काही दुकानी आणि गाड्या पार्क केलेल्या दिसत होत्या. आम्ही समजलो.. हुशश्श्श्....... आले एकदाचे पांग.

पांगला गाडी मधून पुढे गेलेले सर्व टीम मेंबर्स भेटले. हातात तसा जास्त वेळ नव्हता पण किमान चहा घेउन फ्रेश झालो. कुलदीप आणि अमेय साळवीच्या बाईक्सना सुद्धा भूका लागल्या होत्या, त्यांची भूक भागवली. उगाच आमच्या बाईक्स निषेध करू नयेत म्हणुन त्यांना सुद्धा थोड़े खायला दिले. थकलेल्या रायडर्स आणि पिलियन रायडर्सनी आपल्या जागा गाड़ीमध्ये बदलल्या आणि अर्ध्यातासात आम्ही तिकडून पुढे सटकलो. फोटो काढण्याची शुद्ध राहिली नव्हती. अजून सरचू बरेच लांब होते. अंधार पडायला अवघे ३ तास उरले होते. त्याआधी 'लाचूलुंग-ला' आणि 'नकी-ला' पार करणे आवश्यक होते. तासाभरात 'लाचूलुंग-ला' समोर उभा राहिला. फोटू-ला, खर्दुंग-ला, चांग-ला असे एक-सो-एक अनुभव पाठीशी असल्याने लाचूलुंग-लाच्या १६६१६ फुट उंचीला घाबरण्याचे काहीच कारण नव्हते. तो पार करत आम्ही पुन्हा १००० भर फुट खाली उतरलो आणि लगेच 'नकी-ला' कडे मोर्चा वळवला. ६ वाजत आले होते आणि हवेत आता गारवा जाणवू लागला होता. नकी-ला च्या १५५४७ फुट उंचीवर पोचलो तेंव्हा इतकी थंडी वाढली की मी-शमिकाने बाईक थांबवून जाकेट्स अंगात चढवली. तिकडे मागे अमेयच्या बाईकवर बसलेल्या पूनमने पायात फ़क्त फ्लोटर्स घातल्याचे लक्ष्यात आले. ४ वाजता पांगला असताना ती गाडीमधून बाईकवर शिफ्ट झाली होती ते सुद्धा पायात सोक्स न घालता. आता थंडीने तिचे पाय गारठले होते. माझ्याकडे असलेले शमिकाचे एक्स्ट्रा सॉक्स तिला दिले तेंव्हा कुठे तिच्या जिवातजीव आला.

नकी-ला उतरु लागतो तसे २१ लूप्स समोर येतात. खाली-खाली उतरत जाणारा २१ वळणे असलेला हा रस्ता अतिशय सुंदर आहे. पांगच्या वाळवंटामधून इकडे आल्यावर तर हा रस्ता आम्हाला स्वर्गाहून सुंदर असा भासत होता. शिवाय रुक्ष, झाडे नसलेल्या प्रदेशाच्या जागी आता हिरवी झाडे दिसू लागली होती. २१ लूप्सचा रस्ता १५३०२ फुट उंचीवरून सुरू होत १३७८० फुट उंचीवर येउन संपतो. म्हणजेच अवघ्या ८-१० किमी मध्ये थेट १५०० फुट खाली. २१ लूप्स जिथे संपतात तिकडे 'ब्रांडी नाला' आहे. ह्याचे नाव ब्रांडी नाला का ते माहीत नाही पण २१ लूप्स उतरल्यावर बहुदा ब्रांडी सारखी झिंग चढत असावी. आम्हाला तरी मस्तच झिंग चढली होती. ब्रांडीची नाही तर किमान रायडिंगची तरी. इकडून सरचू २१ किमी. लांब आहे. नाल्यावरचा ब्रिज पार करून पुढे निघालो. अंधार पडत आला असल्याने आमचा वेग पुन्हा कमी झाला होता. शिवाय रस्ता सुद्धा बराच वळणा-वळणाचा होता. ७:३० वाजता आम्ही सरचू मध्ये प्रवेश केला. गाडी पुढे गेली होती आणि रहायची सोय गाडीच्या ड्रायव्हरनेच केली होती. तेंव्हा आम्हाला आता त्या अंधारात त्याला शोधणे भाग होते. सरचूवरुन सुद्धा जवळ-जवळ ८ किमी. पुढे आलो तरी कोणी भेटेना. हवेत चांगलीच थंडी वाढली होती. टेम्परेचर ९ डिग. झाले होते. अखेर आर्मी पोलिसांच्या सांगण्यावरुन सर्वांना तिकडच्या एका चेकपोस्टवर थांबवले आणि मी-अभिजित शोधाशोध करायला अजून पुढे निघालो. एका कैंपसाइटवर चौकशी करत असताना समोरून एक गाडी येताना दिसली. मी धावतच रस्त्यावर पोचलो आणि गाडीला हात केला. अंदाज बरोबर निघाला होता. उमेश ड्रायव्हरला घेउन आम्हाला शोधायला मागे आला होता. शेवटी ९ च्या आसपास सर्व साइटवर पोचलो. रात्रीच्या जेवणावर आजचे एक-सो-एक किस्से एकमेकांना सांगत, ऐकवत वेळ भुर्रकन निघून गेला.

आज खरच भन्नाट दिवस होता. जरी गेल्या २ दिवसात आम्ही लेहवरुन निघून 'त्सो-कार'मार्गे सरचूला आल्याने 'तांगलांग-ला' (जगातील सर्वोच्च द्वितीय उंचीचा पास - उंची १७५८२ फुट) आम्ही स्किप केला तरी सुद्धा 'त्सो-कार - पांगचा रुक्ष वाळवंटी प्रदेश' आणि मग 'नकी-ला, २१ लूप्स - सरचूचा हिरवागार प्रदेशात बाईक चालवायला मज्जा तर आलीच होती त्याशिवाय सर्वांच्याच कणखर मनोवृत्तीचा कस लागला होता. उद्याची आखणी करून आम्ही सर्व झोपी गेलो. उद्याचे लक्ष्य होते 'बारालाच्छा-ला' आणि 'रोहतांग पास' करत मनाली ... अर्थात काश्मिरला टाटा करत हिमाचल प्रदेश मध्ये प्रवेश..........

पुढील भाग : रोहतांगचा चिखल सारा ... !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान! Happy

मस्त...