या नभी अंधारवेना

Submitted by अ. अ. जोशी on 4 September, 2010 - 00:41

सांजले ! पण सूर्य कलती दाखवेना...
ती दिसेना ! या नभी अंधारवेना ...

पाहिले विस्फोट, आई विखुरलेली...
आज कोणी तान्हुल्याला जोजवेना

एवढी नव्हती सवय कुठल्या सुखाची
दूरदेशी, बघ, मलाही राहवेना

मी तिचा नाही असे वाटून गेले..
आणि नंतर वाटले ते बोलवेना

ते तिचे जाणे नि येणे याच हृदयी...
सोसले पूर्वी ! नव्याने सोसवेना

प्राण मी झालो तिचा नजरेत एका
ओढणी आता तिलाही ओढवेना

पाहिले होते तिला मी लाजलेले...
एवढे की, सभ्यतेने पाहवेना

शस्त्रक्रीया आज हृदयाचीच केली
गुंतलेल्या भावनांशी खेळवेना

दु:ख इतके आर्त विणले वेदनांनी
एकही धागा सुखाचा जोडवेना

सूर्य तेंव्हा पाहिजे होता मला; पण..
चांदण्यांची रास काही मोडवेना

एवढा फिरतोस वणवण का 'अजय' तू...?
की तुलाही एकटेपण साहवेना....?

गुलमोहर: 

प्राण मी झालो तिचा नजरेत एका
ओढणी आता तिलाही ओढवेना

पाहिले होते तिला मी लाजलेले...
एवढे की, सभ्यतेने पाहवेना

क्या बात है ! Happy

क्या बात है!!!
एकदम छान!!!
सर्वच शेर आवडले.
<< शस्त्रक्रीया आज हृदयाचीच केली
गुंतलेल्या भावनांशी खेळवेना

दु:ख इतके आर्त विणले वेदनांनी
एकही धागा सुखाचा जोडवेना >> खूप छान!!!