२०३ डिस्को, बुधवार पेठ, पुणे २ - अंतीम भाग - भाग १४

Submitted by बेफ़िकीर on 17 June, 2010 - 08:02

"साहू.. रेश्मा.. थापा.. "

"बाप नही है क्या? या बहोत है?"

".........."

"काय रे ***?"

"....."

"पत्ता बोल"

"२०३, डिस्को... बुधवार पेठ.. पुणे २"

आजही रात्री पंचवीस वर्षाचा साहू फरासखान्यात हजर झाला होता. आळीत काही झाले की ज्या तीन चार टाळक्यांना पकडायचे त्यात साहू सगळ्यात सोपा! त्यात आणखीन हा यादवाड सबइन्स्पेक्टर नवीन होता. साहू आईचेच नाव लावतो ही माहिती त्याला असिस्टंटने दिली. बराच वेळ चौकशी करून अन शिवीगाळ करून काही साध्य झाले नाही पाहिल्यावर साहूला सोडले, बाकीचे दोघे तिथेच थांबले.

काही नाही.. कुठल्यातरी गिर्‍हाईकाचा रेखाबरोबर वाद झाला होता अन झालेल्या भांडणाचे पर्यवसान किरकोळ मारामारीत होऊन शेवटी त्या गिर्‍हाईकाने तक्रार नोंदवली होती. त्याचे म्हणे आदल्या रात्री घड्याळ तिथेच राहिले होते. साहूला माहीत होते. रेखा प्रामाणिक होती. पण त्या माणसाला काही पटेना! त्याने शिवीगाळ केला, मग काही पोरींनी त्याला शिव्या दिल्या.. मग झाली मारामारी! आजूबाजूच्या बघ्यांपैकी साहू, नवीन अन गोपी या तिघांना आत घेतले.

यादवाडला कुणीतरी त्या गिर्‍हाईकाचे आजवरचे अनुभव लक्षात घेता तो घड्याळाबद्दल खोटे बोलत असणार हे सांगीतल्यावर त्या गिर्‍हाईकालाच झाप पडली अन साहूला सोडून देण्यात आले. नवीन अन गोपी यांना पुढच्या कागदपत्रांपुरते थांबवले. साहूला माहीत होते, शेवटी त्या गिर्‍हाईकाकडूनच शे पाचशे घेणार अन कागद फाडून टाकणार!

पासोड्या विठोबापाशी नवी कोरी ब्रिस्टॉल घेऊन एक कचकचीत झुरका मारल्यावर साहूचे लक्ष गेले श्रीकृष्ण टॉकीजकडे! आज जरा वातावरण मंद मंदच वाटत होते.

रात्रीचे साडे दहा वाजले होते. एका बंद दुकानाच्या पायरीवर साहू बसला. त्या पायरीवर बसले की खाली रस्त्यात एक नाणे कुणीतरी ठोकून ठेवले होते ते नेहमी दिसायचे साहूला. आता ते नाणे किती पैशांचे होते हे जरी दिसत नसले तरीही....

पाच वर्षांचा असताना .... ते नाणे पाच पैशांचे आहे.... हे साहूने व्यवस्थित पाहिले होते...

नाण्याकडे बघता बघता अलगदच साहूचे मन पोचले... भूतकाळात...
------------------------------------------------------------------------

कादंबरीची सुरुवात जिथे झाली होती तिथे आपण आता पोचलो आहोत.

------------------------------------------------------------------------

गोपी! या निमित्ताने गोपी तरी भेटला होता. दोघांनी एकमेकांना पोलिसांच्या समोरच मिठ्या मारल्या होत्या. गोपीने एकाच हाताने मिठी मारली होती बिचार्‍याने! आणि गोपी हळूच कानात कुजबुजलाही होता. "वेलकमपे कभी मत आना साहू, लेकिन मै, गजू और तुम मिलके अमजदको खतम करदेंगे"! गोपीला मारलेली मिठी सुटेचना! वेलकमला जाऊन त्याला भेटण्याचे धाडस मूर्खपणाचे ठरले असते. आज दोघांच्याही डोळ्यातून अश्रू बरसले होते. जुन्या पोलिसांना मात्र त्याचे कारण माहीत होते.

गोपीच्या त्या विधानांचा अर्थ बराच वेळ लावत बसला होता साहू! कुठे हा यादवाड सब इन्स्पेक्टर आणि कुठे आई वेलकमवरून डिस्कोला आली तेव्हाचा वरचा साहेब यादवाड! अजून साले आपल्यालाच पकडतात. आत्ता तर आतून बाहेर आलो आपण! रेखाचा वाद श्रीकृष्ण टॉकीजसमोर झाला तरी गोपीला उगाचच धरले. गोपी! चाळीस वर्षाचा हात तुटका गोपी! कशाला जिवंत ठेवलं होतं त्याला कुणास ठाऊक! मरायला आलाच आहे म्हणा!

पण... वेलकमवर कधीही येऊ नको हे ठीक आहे. पण.. अमजदला कसं काय मारणार म्हणतो हा? आणि मुख्य म्हणजे.. गजूचाचाला कसा काय गृहीत धरतोय हा?

गजूचाचाला एकदा गाठायलाच हवा.. आत्ता कुठे असेल? कबीर डिस्को बघतोय म्हणजे गजूचाचाला वेलकमवर ठेवलेले असणार! जावे? करावा हा मूर्खपणा?? नकोच.. इतकी घाई नाही आहे.

आपण परत आल्याची बातमी सर्वत्र पसरलेली आहे पहिल्याच दिवशी! तरीही गजूचाचा भेटायला आला नाही याचा अर्थ सरळ आहे. त्याची इच्छाच नव्हती भेटायची किंवा... कबीरला घाबरत होता.

पण.. साहू हा सगळा विचार करत असताना त्याचे नशीब मात्र वेगळाच विचार करत होते...

नशीबाने गजूचाचाला कधीच साहूच्या शेजारी आणून बसवलेही होते. आपल्याच तंद्रीत नाण्याकडे पाहात असलेल्या साहूला शेजारी कोण बसले आहे म्हणण्यापेक्षाही शेजारी कुणी बसलेले आहे हेच कळले नव्हते. आणि अचानक उद्गार कानावर आले..

गजू - ये ले साडी.. चल्ल... पहनाते है.. उस हरामी कबीर को...

पाच वर्षे! पाच वर्षांच्या गॅपनंतर तो आवाज तसाच्या तसा होता. गजूने हातात दिलेली साडी तशीच ठेवून साहू अवाक होऊन गजूचाचाकडे बघतच बसला होता.

गजू - और अभ्भी पहनाते है... चल्ल.. तेरीही राह देखरहा था मै.. बदला तो तुझेही लेना है ना..????

पाच वर्षांनी मारलेल्या त्या मिठीमधे काय नव्हते? जणू बाप परत मिळाला होती साहूला.. अजून काय पाहिजे??

गजूच्या दणकट शरीरावर आपली मान विसावणारा साहू कितीतरी वेळ हमसून हमसून रडत होता. मात्र.. गजूचा एक अश्रूही निघाला नव्हता. त्याचे डोळे लागले होते श्रीकृष्ण टॉकीजच्या भिंतीकडे शुन्यात लागल्यासारखे! येणारे जाणारे विचित्र नजरेने त्या जोडीकडे पाहात होते.

बराच वेळाने एकमेकांची ख्यालीखुशाली विचारून झाली. ख्यालीही नव्हती आणि खुशालीही! शालनदीदीचा उल्लेखच झाला नव्हता बोलण्यात! फक्त तिला अमजदने जबरदस्तीने वेलकमवर नेऊन अती छळले एवढेच कळले होते. ते ऐकूनच साहू स्फुंदून रडला होता. किती केले त्या बाईने! आपल्या आईपेक्षाही किंचित मोठीच! एकदाही हिशोबात गडबड नाही, आपल्याकडे नेतृत्व देताना मुलाकडेच ते दिल्यासारखे भाव, हेवादावा नाही, कोणत्याही अवघड प्रसंगात आपले बौद्धिक घेऊन आपल्याला नवी मानसिक उभारी देणारी बाई ती.. आपल्या सूचनेवरून अमजदकडे जाऊन स्नेहाला चक्क घेऊनही आली होती...

मात्र! कबीरचा बदला मी एकटाच घेईन हे साहूने गजूला सांगीतले. गजूला उलट अभिमानच वाटला. पण त्याने साहूला लागेल ती मदत मागण्याची आज्ञाच केली होती.

आणि गजू निघून गेला होता. वेलकमचा संरक्षकच अजूनही आपल्या बाजूने आहे ही कल्पना साहूला फार म्हणजे फारच आवडली होती. हीच नेमकी वेळ होती कबीरला अद्दल घडवण्याची. मुंगूस म्हणे तीन वर्षांपुर्वीच मेला होता. त्यामुळे साहू सूड न घेता आल्याच्या दु:खात हळहळत होता. पण कबीर होता. चांगला धडधाकट होता. त्याची स्त्री बनवायला मजा येणार होती. आणि नंतर..

साहू जमाईराजाकडे वळला. आपल्या खोलीत गेल्यावर त्याला दिवसभरात पहिल्यांदाच रेखा नाराज दिसली.

आपल्याला आल्या आल्या दुसर्‍याच दिवशी पुन्हा चौकशीसाठी बोलावले म्हणून नाराज झालेली असावी असा साहूचा कयास होता. पण ती काही खुलेना.. शेवटी त्याने तिला जवळ बसवले..

साहू - क्या हुवा है रेखा.. ऐसे क्युं चुपचाप??
रेखा - कुछ नही..
साहू - एक बात बताऊं.. उन दिनोसे आजकलही ज्यादा खूबसूरत लगने लगी है तू..
रेखा - उसकी वजह है..
साहू - क्या??

रेखा उठली आणि खिडकीपाशी गेली.

साहू - क्या हुवा? बोल ना??
रेखा - पेटसे हूं.. तीन महिने होगये..

ज्या बातमीने सर्वसामान्यांकडे पेढे वाटले जातात त्या बातमीने बुधवारात सुतक पाळले जाते. गर्भ राहणे!

खच्ची झालेला साहू मान खाली घालून जमीनीकडे बघत बसला होता. रेखाला रोग होताच! तो मुलालाही होणार ही शक्यता खूपच होती. या मुलाला जन्म देण्यात अर्थच नव्हता. काय हे दैव आपले!

साहू - किस.. किससे..???

रेखाने खिडकीबाहेरची नजर न हटवत अत्यंत व्यथित स्वरांमधे सांगीतले..

रेखा - ....कबीर... और कौन??

धमन्यांमधून रक्त उसळायला लागले होते साहूच्या! आत्ता समोर कबीर असता तर कदाचित त्याचा भानूच झाला असता. एकमेव प्रेयसी! तिलाही असाध्य व्याधी! त्यात ती पाच वर्षे आपल्यासोबत नव्हतीच! आणि ती पाच वर्षे अत्यंत हलाखीची गेली होती. साहू आत्ता तिच्याच अत्यंत तोकड्या मिळकतीवर गेले दोन दिवस जगत होता.. आणि त्यात ही बातमी..

खाडकन निश्चय करून उठलेल्या साहूला रेखाने शपथ घालून अडवले तेव्हा कुठे तो पुन्हा पलंगावर बसला.

रेखा - ये .. ये बच्चा.. रखते है साहू..

धक्का बसलेला साहू रेखाच्या त्या क्रूर विधानावर थक्क होऊन रेखाकडे पाहात होता.

साहू - जानती है क्या कहरही है?? जानती है उसकी जिंदगी क्या होगी?? दस साल भी जियेगा के नही पता नही.. क्या बक रही हो रेखा??
रेखा - ये... मेरा बच्चा है साहू.. मै अगर और छे महीने जिंदा रही तो इसका जनम होगा.. इसमे तुझे मै दिखती रहुंगी..
साहू - लेकिन.. इसमे.. उस कबीरका.. हरामीका..
रेखा - सिर्फ बापही सबकुछ नही होता है साहू.. तू भी तो मांका ही नाम लगाता था ना?? और.. ये भी सोच के.. किसी और ग्राहकसे मुझे ये बच्चा होता तो शायद.. हम जानतेभी नही के किससे...

वीस मिनीटे दोघेही एकमेकांच्या मिठीत स्फुंदून स्फुंदून रडत होते. 'मै अगर छे महीने और जिंदा रही तो'! काय वाक्य होते हे! किती सहज तोंडातून बाहेर पडलेले वाक्य! किती अगतिकता! मरायची किती इच्छा! बुधवार पेठ पुणे २.. ! बाकी काही नाही..

मात्र साहू तिला दूर करून म्हणाला..

साहू - तू अगर सच्ची मां है तो इसको जनम नही देगी.. और.. अब मुझे मत रोक.. मै जा रहा हूं कबीरके पास..

अंगातील ताकद कमी पडल्यामुळे साहूला न थांबवू शकलेली रेखा त्याच्या जाण्याकडे बघून शेवटी हमसाहमशी रडायला लागली. निदान मुलाचा जन्म होईपर्यंत तरी साहू जिवंत राहावा अशी तिची इच्छा होती. पण आता काही सांगता येत नव्हते.. साहू डिस्कोवर गेल्यावर काय होईल ते... मुळीच सांगता येत नव्हते. धडपडत रेखा उठली अन मुलींना एकत्र करून जमाईराजाच्या दारावर आली. नुसतिच टकामका डिस्कोकडे बघत राहिली. सलोनीला त्याचा अर्थ व्यवस्थित समजला होता. साहूची साथ द्यायला ती लंगड्याच पायांनी जमेल त्या वेगात डिस्कोकडे धावली. सलोनी वर जाऊनही आता पंधरा मिनीटे झाली होती. कुणी ओरडत नव्हते की भांडत नव्हते. कसलाच आवाज नव्हता.

हळूहळू बाकीच्या मुली पांगायला लागल्या. रेखा मात्र डोळे निश्चल करून डिस्कोकडे पाहात बसली होती. तिला सगळा इतिहास माहीत होता. बाकीच्या मुलींना माहीत नव्हता. अर्धा तास झाला. अजूनही काहीही होत नव्हते. एक दोन गिर्‍हाईके आत गेलेली होती. बाहेर मात्र कुणीच आलेले नव्हते. काय चाललंय काय??

शेवटी हिय्या करून रेखा निघाली. साहूवर कितीही प्रेम असले तरीही आपल्या गर्भाचा विचार करूनच ती थांबली होती इतका वेळ! आता थांबण्यात अर्थ नव्हता...

आणि डिस्कोच्या दारात पाऊल टाकताना.. तिला आजवरच्या बुधवार पेठेतील वास्तव्यातील सगळ्यात मोठा धक्का बसला होता..

रक्ताचा एक साधा ओघळही नसूनही धड पाऊलही टाकता येत नसलेला कबीर.. साडी नेसून खाली उतरत मृतवत नजरेने सगळ्यांकडे बघत होता... आणि मागून सलोनी त्याला शिवीगाळ करत धक्के देत होती... आणि त्याही मागून.. अत्यंत कृद्ध नजरेने उतरत असलेल्या साहूच्या हातात लाकडी दंडुका होता.. आणि सलोनी विद्रूप चेहरा करत कर्कश्श ओरडत सगळ्या गल्लीचे लक्ष वेधत होती...

"अय.. देखोरे.. छक्का आया छक्का वेलकमका.. अमजदका छक्का है ये.. बहुत सस्तेमे है... देखो देखो"

कबीरला समोरासमोर मारायला साहू हा काही धर्मयोद्धा नव्हता. कबीर एका खूप आतल्या खोलीत असताना चपळाईने तेथे पोचलेल्या साहूने लाकडाचा पहिला प्रहार त्याच्या डोक्यात केला होता. त्यानंतर त्याने त्याला बाहेर ओढत आणत खाली दाबून धरून अनेक गुद्दे मारले होते. पन्नाशीच्या पुढे गेलेल्या आणि व्यसनांच्या अतिरेकाने पोकळ झालेल्या कबीरच्या त्या शरीराला तो मार सोसू शकत नव्हता. काही कळायच्या आतच साहूचा पुढचा वार होत होता. अत्यंत बेसावध होता कबीर! आणि ओरडताच येत नव्हते. त्यातच सलोनी आली आणि तिने त्याचे कपडे टराटरा फाडले. हे सगळे दारातच चाललेले असल्यामुळे आतले आत अन बाहेरचे बाहेर राहिलेले होते. सगळे अवाक होऊन कबीरच्या परिस्थितीकडे पाहात होते. त्यातच त्याला साडी गुंडाळली. आणि खाली गल्लीत साहूची अत्यंत बदनामीकारक धिंड काढली तेव्हा पुन्हा एकदा श्रीकृष्ण टॉकीजची गल्ली स्तब्ध झाली.

केदारी चौक ओलांडताना फार काळजी घ्यावी लागली. ते दृष्य सामान्य माणसांना दाखवण्यासारखे नव्हते. फार घाईघाईत लक्ष्मी रोड क्रॉस करून वरात वेलकमच्या रस्त्याला लागली. आणि..

वेलकम...! पाच वर्षांनी साहू तिथे येत होता. शरीफाबी अजूनही वेलकमलाच आहे असे त्याला समजले होते. वेलकमच्या इमारतीसमोर उभा राहिलेल्या साहूने मागे वळून चहाच्या दुकानाकडे पाहिले म्हातारा केव्हाच मरून गेला होता. त्याचा मुलगा ते दुकान चालवत होता.

तोहफामधून भोला सुसाट वेगाने साहूकडे आला. काय झाले असेल याची कल्पना आल्यावर त्याने कबीरला वेलकमसमोरच बडवायला सुरुवात केली. एवढे होते तोवर रमासेठ वरून खाली आला.

रमासेठ! चार हजारमे फुल्ल नाईट.. यालाच मारून आपली आई आपल्याला घेऊन पळालेली होती.. साहूने भयानक नजरेने रमासेठकडे बघितले. त्याचेही वय झालेले होते. कबीरला भोलाच्या सुपुर्द करून साहूने रमासेठवर प्रहार सुरू केले.

आता तर गर्दीही थांबून बघत होती.

रमासेठ पळूही शकला नाही. अख्खे तोहफा रस्त्यावर उतरले होते. मागच्या बिल्डिंगमधल्या मुलीही आल्या होत्या. त्यांच्यातील काहींनी तर सलोनीलाही बडवून काढले. कबीर तर सगळ्यांचाच मार खात होता.

आणि तेवढ्यात तिघांनी साहूला धरले, उचलले आणि सरळ... वेलकमच्या तळघरात नेले..

तोच अंत.. आपला तोच दुर्दैवी अंत आहे हे साहूला समजले होते.. कसातरी वाट काढत अन वेदना सोसत दोन मिनिटांतच कबीरही तिथे पोचला.. त्याने साहूवर थुंकून पहिल्यांदा साहूला मारायला सुरुवात केली. तिथे आधीच असलेला गोपी मधे पडला. त्याने बिचार्‍याने उगीचच मार खाल्ला इतरांचा.. रमासेठ धावत धावत आत आला आणि ओरडला..

"अमजदभाई आरहेले है.. अब तू भी गया.. तेरी मां के जैसा.. ******"

चूक झाली होती. खूप मोठी चूक झाली होती. रेखाचे ऐकायला हवे होते. हे धाडस अजिबात करायला नको होते. आपण संपलेलो आहोत. आपल्याला मदत करायला आता गजूही येऊ शकत नाही आणि गोपी तर काही करूच शकत नाही. ही सलोनी आत आलीय पण तीच मार खातीय! काय करणार? आपण काय करणार??

तेवढ्यात धावत धावत रेखा आली आतमध्ये! आणखीनच नको ते झाले होते. ही तर अजिबातच इथे यायला नको होती. काय करायचे?? एकेक माणूस येऊन फटके लावून जातोय..

हळूहळू साहूला बराच मार बसायला लागला. साहूच्या किंकाळ्या ऐकून रेखा अन गोपी मधे पडले की त्यांना मार लागत होता. रेखाला काही होत नाही ना इकडे लक्ष देताना साहूची त्रेधातिरपीट होत होती..

भोलाही मदतीसाठी आत आला होता. पण ती त्याची चूक होती. आता कबीरने एकाला मदतीला घेऊन भोलाला पिटायला सुरुवात केली.

मगाशी बाहेर जमा झालेल्या तोहफा आणि मागच्या इमारतीतील मुलींपैकी एकही इथे यायचे धाडस करू शकत नव्हती. काय होणार आहे याचा सगळ्यांनाच अंदाज आलेला होता. आणि अमजदला मनातल्या मनात शिव्यांची लाखोली वाहात होत्या सगळ्या..

तेवढ्यात...

.... अमजद आला.. आपला अवाढव्य पण म्हातारा होत असलेला देह सावरत आणि दुनियेतला सगळा क्रोध दोन घार्‍या डोळ्यांमधे सामावत अमजदने साहूकडे पाऊल टाकले आणि रेखा अमजदच्या पायावर कोसळली..

रेखा - मत मारो साहब.. मत मारो.. भूल होगयी.. ये देखिये.. मेरे पेटमे बच्चा है.. कबीरकाही है.. मत मारीये साहू को..

आणि अमजदने साहूला सोडून रेखाच्याच पोटावर लाथ घातली.. खच्चून! आणि त्याचक्षणी...

साहू... रेश्मा... थापा...

या विदारक स्फोटकातील आजवर बसलेली सगळी वेष्टने क्रॉस करून एक मोठी ठिणगी आतवर पोचली .....

बुधवार पेठेतील आजवरचा सगळ्यात मोठा स्फोट झाला..

साहूने एका ढांगेत अमजदला गाठून आपल्या उजव्या हाताची बोटे सरळ अमजदच्या डोळ्यांमधे खुपसली..

अमजदभाई..

.... बुधवार पेठेतील सगळ्यात जास्त राक्षसी व्यक्तीमत्व अमजद एखाद्या डोंगरासारखा नाचत भयानक किंकाळ्या फोडत होता.. तोपर्यंत वरून स्नेहा आणि भानूची भाची या दोघीही धावत आल्या..

हे काय?? ... या गेल्याच नाहीत?? का???

का नाही गेल्या या??

साहूचा क्षणभर विश्वासच बसेना स्वतःच्या डोळ्यांवर...

आणि आणखीन अविश्वसनीय गोष्ट घडली... त्या दोघींनी येऊन घाबरून जायच्या ऐवजी तोहफातील आपल्या ज्या मैत्रिणी रस्त्यावर काळजीने उभ्या होत्या त्यांना ओरडून सांगीतले..

"अंदर आओ.. वेलकम खतम करदो.. "

गोपी आणि भोलाने तिथल्या तिघांच्या हातातून सुटून रमासेठची शुद्ध घालवली होती.. कबीर आधीच मार खाऊन बर्‍यापैकी लुळा पडलेला होता.. वेदना कशाबशा सहन केलेली रेखा उठून कबीरला कशानेतरी बडवायला लागली. वेलकमवरचे इतर तिघे अमजदला घाईघाईने बाहेर घेऊन जायला लागले. ते वेलकमवर नवीन होते. ऐकून त्यांना साहू माहीत होता. पण हा पोरगा इतका भयंकर असेल याची त्यांना कल्पना नव्हती. आणि आत्ता त्यांच्या दृष्टीने प्रायॉरिटी होती अमजदला वाचवणे.. त्याचे उपचार!

आणि त्या तिघांना बाहेरून आत आलेल्या बायका बुकलू लागल्या. एकच हाहाकार उडाला. कुणीतरी पोलिसात धावले. आता सगळि गल्लीच आंधळ्या अमजदवर आणि कबीर अन रमासेठवर राग काढू लागली. मागच्या इमारतीतील बायकाही आल्या.

सर्व शक्तिमान पुरुषांना त्या क्षणी समजत होते.. बायका एक झाल्या तर काय करू शकतात.

अमजदच्या तोंडातून आवाजही फुटत नव्हता. वरून काही बायकांनी शरीफाला बडवत खाली आणले.

आता खरे तर साहू फक्त बघतच होता.. आणि गजूचाचा आला..

लांबवर कुठेतरी गेलेला गजूचाचा आला.. त्याने काहीतरी हत्यार आणलेले असावे.. त्याने ते कबीरच्या पोटात खुपसले.. कबीर थंड झाला.. बुधवार पेठेतील एक हीन व्यक्तीमत्व आज संपले.. त्या पाठोपाठ गजू आपल्याकडे धावतोय हे पाहून रमासेठ रस्त्यावर धावत गेला आणि साहू त्याच्यामागून धावला..

आणि साहूला कधीही विश्वास बसणार नाही असे दृष्य दिसले..

अत्यंत विचित्र दिसणारी.. घाणेरडी दिसणारी.. अकालीच साठ वर्षाची असावी अशी वाटणारी..

शालनदीदी.. रमासेठच्या पुढ्यात उभी होती..

कबीर खोटे बोलला होता.. तिला भयानक छळून शेवटी अमजदने मागच्या इमारतीत शिफ्ट करून टाकले होते.. तिथे तिची उपासमार चालू झाली होती..

आज बुधवार पेठेतील सगळा चांगुलपणा एकत्रित झाला असावा..

अमजदला फरफटत रस्त्यावर आणलेल्या मुलींनी आणि बाहेरच्या मुलींनी पाहता पाहता रमासेठ आणि अमजदला केवळ हाताच्याच माराने निव्वळ पाच एक मिनीटांत .. खलास केलेले होते..

लांबवर सायरन ऐकू येत होता..

एकमेकांना भेटायलाही वेळ नव्हता..

रेखाला भेटून साहू म्हणाला की मुलाला जन्म दे.. आणि जगलीस तर माझे नावही दे.. आणि नंतर गोपीकडे सांभाळायला ठेव..

गोपी आणि गजूला फक्त मिठीच मारली त्याने..

आणि शालनदीदीसमोर मात्र..

आजवरचा वीस वर्षांमधला सगळा धीर संपला साहूचा.. भर रस्त्यात सगळ्यांसमोर त्याने कदाचित बुधवारातील सध्याची सगळ्यात घाण वेश्या असलेल्या शालनदीदीच्या पायांवर रडत रडत डोके ठेवले..

दोघांनी क्षणभरच मिठी मारून एकमेकांच्या डोळ्यात पाहिले.. रेखाने पुन्हा साहूला मिठी मारली..

पाचही जणांनी एकमेकांना गच्च धरून ठेवले.. आणि शेवटी स्नेहा आणि भानूच्या भाचीने त्यांना वेगळे करून सांगीतले..

"पुलीस आ रही है.. भागीये भैय्या"

भैय्या! नेहानंतर ती हाक आज ऐकली होती साहूने.. श्रीनाथ टॉकीजच्या रस्त्याने त्याच क्षणी या रस्त्याला वळत असलेल्या निळ्या मेटॅडोरकडे पाहून साहू केदारी चौकाकडे पळाला..

एकच क्षण! केवळ एकच क्षण त्याने आपल्या गल्लीच्या दिशेला पाहून हात जोडले आणि मनातल्या मनात आपल्या आईला सांगीतले..

"मी सुड घेतला आई.. मी सूड घेतला"

आणि त्याचक्षणी समोर दिसत असलेल्या चालत्या पी.एम.टी. बसमधे त्याने उडी मारली आणि ..

पंचवीसच मिनिटांनी साहू स्टेशनवर पोचला होता..

कोणतीतरी शेअर गाडी घेऊन खिशातील होते नव्हते ते सगळे पैसे ड्रायव्हरला देऊन ...

साहू.. रेश्मा... थापा..

मुंबईला निघाले होते.. मिळेल त्या गाडीने रस्ते बदलत बदलत ते दुसर्‍या दिवशी ओरिसाला जायला निघणार होते..

फक्त त्यावेळेस त्यांना हे माहीत नव्हते की..

रेखावर प्रेम करून आपणही स्वतःला व्याधीग्रस्त करून घेतलेले आहे...

बुधवार पेठ अजूनही तशीच आहे.. तिथे हेच सगळे रोज होत आहे.. अनेक साहू आहेत.. अनेक ललिताच्या रेश्मा होत आहेत.. अनेक शालन नष्ट होत आहेत..

आपण छान जगतोय म्हणा.. आपल्या मुलाला शाळेत अ‍ॅडमिशन मिळवण्यासाठी डोनेशन देतो.. हॉटेलमधे जेवतो.. पिक्चर बघतो.. नवे घर घेतो.. लग्न वगैरे करतो.. आईला आई मानतो.. बहिणीला बहीण.. आपण...

आपण आणि ते...

मधे फक्त लक्ष्मी रोड... आपल्यासारख्यांनी जाताना मुरडलेली नाके बघायला लक्ष्मी रोड अजून तसाच पडलेला आहे....

सिटि पोस्टावरून पुढे गेलात तर साहूचे कथानक लक्षात ठेवा एवढ्च विनंती करू शकतो मी...

साहू... रेश्मा... थापा...

२०३ डिस्को, बुधवार पेठ, पुणे २...

-'बेफिकीर'!

गुलमोहर: 

Nehmi vaataych he fakt TV,cinema madhech hot asel.. pan aajubajuchi paristithi atyant vidarak aahe he tumchya ya kadambarine janvun dilay. bus,train madhe parpurushacha dhakka lagla tar tyala oradnarya aamhi aamcha santap santap hoto tya striyanch kaay hot asel yacha vichar hi karvat nahi tumhi ti baju spasht kelit.. aani eka purushane te samjun ghen aani tyavar lihin kharach khup kautukaspad aahe,pudhil likhanasathi shubhechha.....vaat pahtey..

बेफिकिर,

खुपच मस्त, अगदि मनपसुन धन्यवाद.
ha bhag pan great, hi sudha kadambari kedam great.

kharach tumhi eka wegalya wishwa chi olakh karun dili.
tumchya likhana badaal tar shabd ch nahit. Happy

asech ahalu deth.

बेफिकिर...मस्त मस्त मस्तच..तुमच्या लिखाणात एक प्रकारची जादु आहे..नशा आहे....
पुढच्या कादंबरीची वाट पहातोय...

शेवटचे दोन्ही भाग आताच वाचले..इतक्या लवकर कादंबरी संपेल असं वाटलं नव्हतं..पण ह्या जळजळीत वास्तवाचा शेवटी काय अंत असणार...आणि तुमच्यामुळे अतिशय कळकळीने तो आम्हा वाचकांपर्यंत पोहोचला..ह्यासाठी तुमचे खुप आभार! लेखनाबद्दल काय लिहु? नि:शब्द झालीये..नेहमीसारखीच!!

पुढची कादंबरी पण सुरू केलीत त्यासाठी पुन्हा धन्यवाद!! वाचते आता..

वेगवान कथा आणि तितक्याच वेगाने येणारे नविन भाग. Happy
ही कादंबरी मला आवडली. मधे मधे थोडी अतिरंजित झाली होती पण तरी एकूण सादरीकरण संयत वाटले.

बेफिकीर,
गेले काही दिवस मला माबोवर येणं अजिबात शक्य झालं नाही... तुमची कादंबरी पुढे-पुढे सरकते आहे, पण मला वाचणं जमत नाहीये, ह्या विचाराने अस्वस्थ होत होते... आज एकादमात ५-६ भाग वाचून काढले...एवढ्यात शेवट होईल असं वाटलं नव्हतं... पण झाला शेवट एकदाचा! म्हणून रिलिफपण मिळाला.
मुळात असे विषय वाचवत नाहीत आणि त्यातून तुम्ही ज्या वास्तववादी आणि प्रभावी पद्धतीने ते मांडता, त्यामुळे अजूनच त्रास होतो.
शेवट पटकन झाला असला, त्यात फिल्मीपणा जाणवत असला, तरी चांगला शेवट झाला... साहूला एडस असणार ही शक्यता गृहित धरलेली होतीच... पण आता किमान तो पोलिसांपासून तरी वाचेल हा दिलासा बरा वाटला.
पुढची कादंबरी लवकरच वाचायला घेत आहे.
तुमच्या लेखनशैलीचे, त्याच्या वेगाचे कौतुक करावे तेवढे थोडेच... तुमचे दर्जेदार लेखन सातत्याने उपलब्ध करुन दिल्याबद्दल शतशः आभारी आहे.

वाचली कादंबरी, आणि आवडलीही. Happy
या आपल्याला माहिती नसलेल्या वेगळ्याच जगातले नियम, रीती-भाती-पद्धती बघून नवल, आश्चर्य, खेद, राग, दु:ख अशा सार्‍या भावना दाटून आल्या. हे सारे शब्दबद्ध करण्यासाठी प्रचंड होम-वर्क करावे लागले असेल. मागच्या कादंबरीसारखेच पात्रे, प्रसंग यांची वेगवान गुंफण आवडली. फक्त मध्येच निवेदक अचानक पुढे येऊन काहीतरी भाष्य करू लागतो, ते मात्र मध्येच रसभंग करते, असे वाटते. हाच मुद्दा मागे केदारने पण लिहिला होता. जास्त पात्रे झाल्याने बर्‍याच ठिकाणी नाईलाजाने आवरते घ्यावे लागले, असेही वाटले. पण तुमचा विषयच असा आहे, की तेवढी पात्रे नसती, तर काहीतरी अपूर्ण असल्यागत वाटले असते, हेही खरेच.

आम्हाला नुसते वाचूनच ते पचतेय- न पचतेय, आणि त्यातल्या कथानकाने हतबुद्ध व्हायला होतेय, तेवढ्यात तुमचा पुढचा भाग तयार- हे खरेच कौतुकास्पद आहे. तुम्हाला शुभेच्छा. Happy

बेफिकीर, काल्पनिक कादंबरी की जळजळीत वास्तव तुम्ही रेखाटलत तुम्हालाच माहीत. जर स्वर्ग आणि नरक अश्या दोन संकल्पना मानल्या तर आम्ही तमाम शिकले सवरलेले नोकरदार स्वर्गातच आहोत असा भास तुमच्या नरकायातना भोगणार्‍या माणसांच्या कादंबरीच्या वाचनाने आला. अगदी याच भावना जोगत्यांच्या जीवनावरचा नवीन चित्रपट पहाताना होता.

बेफिकिर...... अ फ ला तू न ....... आहात तुम्ही...
पुर्ण वाचेन आणी मगच प्रतिसाद देईन अस ठरवल होत..... ते आत्ता करतोय....
अगदी खिळवून ठेवल होतत..... ईतके दिवस... झपाटल्यासारखा वाचत सुट्लो होतो हा लेख..
जिथे वेळ मिळेल तिथे वाचत होतो, ऑफिसमद्धे नेटवर आणी प्रवासात प्रिन्ट्स.
लेख फार कमी वाचतो मी, आणी त्यात म्रुत्युजय नन्तर हाच लेख वाचला..... खूप खूप सुन्दर....

तुमच्या शब्दात समोरच्याला खिळ्वून ठेवण्याची ताकद आहे...... हे सहजासहजी कुणाला जमत नाही....
आणी ते तुम्हाला जमल म्हणून मी सुद्धा खिळलो गेलो....
शब्द अपुरे पडताहेत, ईतका मला तुमचा हा लेख आवडला......

पुढच्या लेखनास माझ्याकडून तुम्हास खूप खूप शुभेच्छा..........

बेफिकीर 'सलाम'!
मी जेव्हा ही कथा वाचली तेव्हा माबो चा सद्स्य नव्ह्तो. आता आर्वजुन प्रतिक्रीया देत आहे.

पूर्वी जेव्हा मंडई - दगडुशेट ला जायचो तेव्हा कुतुहलाने त्या भागाकडे लक्ष जायचेच, ट़कामका ईकडे - तिकडे नजर जायची आणि मनात नाना विचार यायचे, ........ हे कुतुहल तुम्हे शमवले आणि जळजळीत वास्तव दाखवुन दिलेत....... आता जेव्हा त्या भागात जाईल तेव्हा तीथे 'रेश्मा' 'साहु' 'रेखा' दिसतील, आणि पूर्वीच्या विचारांची लाज वाटेल ...... सलाम! ...

काय ताकद आहे राव लिखाणात .... एकरुप झालो कथानकात ...

अजुन एक - एवढी मोठी कथा असताना ही तुम्ही कधी वाट पाहायला लावली नाहित त्याबद्द्ल स्पेशल आभार.

'हाफ राईस ...' ला पण प्रतिसाद टाकणार आहे ... पण एक विनंती - 'हाफ राईस ...' आणि '२०३ डिस्को...' एकत्र प्रकाशित कराच (पुस्तक रुपात) ....

मनापासून आभार सचिन!

मी सोलापूर सेक्स स्कॅन्डल व २०३ डिस्को प्रकाशित करण्याच्या विचारात आहे, कारण दोन्हींना आर्थिक जबाबदारी स्वतः उचलणारे प्रकाशक लाभू शकत आहेत असे दिसते.

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

मी सोलापूर सेक्स स्कॅन्डल व २०३ डिस्को प्रकाशित करण्याच्या विचारात आहे, कारण दोन्हींना आर्थिक जबाबदारी स्वतः उचलणारे प्रकाशक लाभू शकत आहेत असे दिसते.>> वा अभिनंदन ! अशा संग्रही ठेवण्यासारख्या कथा प्रकाशित झाल्याच पाहिजेत .... 'हाफ राईस ...' पण संग्रही आहे ... त्यासाठी खारीचा वाटा उचलण्याची तयारी आहे ...

बेफिकिर खरच तुम्ही यु आर ग्रेट आहात : मला शब्द्च सुचत नाही आहेत मन सुन्न झाले आहे वाचुन , डोळ्याम्ध्ये
पाणी आले माझ्या.

Pages